माझं आजोळ बेळगाव

Submitted by वेन्गुर्लेकर on 3 July, 2018 - 05:52

एप्रिल मध्ये परीक्षा संपता संपताच वेध लागायचे ते बेळगावला पळायचे.. नक्की आठवत नाही पण साधारण ७/८ तारिखला परीक्षा आटोपत आलेल्या असायच्या आणि पेपर सोपा गेल्याच्या आनंदापेक्षा मामाच्या गावाला जायचंय हाच आनंद मनात साठायला लागायचा .तयारी सुरु व्हायची. एसटी लागण्याची भीती हे एकच कारण मनात धाकधूक निर्माण करायचं. वेंगुर्ला ते बेळगाव साधारण तीन साडे तीन तासाचा प्रवास करायला फक्त बेळगावच्या ओढीपोटी तयार असायचो .नाहीतर एसटी नुसती बघितली तरी एक विचित्र गोळा पोटात तयार व्हायचा. दुपारी जेऊन एप्रिल मधल्या भर दुपारी वेंगुर्ला बेळगाव एसटी पकडायचो बस स्टॅन्डवर जाऊन . आणि हो जरी एसटीशी माझं वाकड असाल तरी वेंगुर्ल्याचा एसटी स्टॅन्ड हि मात्र आवडीची जागा असायची. मस्त मोकळा हवेशीर प्रशस्त एसटी स्टॅन्ड आणि डेपो . आजूबाजूला डुलणारी नारळाची झाड,तिथला तो बुकस्टॉल आणि चांदोबा ,इंद्रजाल कॉमिक्स याच्याबरोबर मधेच दिसणारे काही चावट मासिकाचे कव्हर्स .जे बघून न बघितल्यासारखी ऍक्टिंग ,बॅकग्राऊंडला नवनाथ रसवंती गृहाचा तालबद्ध घुगारच छूनुक छूनुक म्युझिक . पेपरमिंट,आवळासुपारी विकणार्रे स्टॉल . आणि या सगळ्या मस्त वातावरणात डेपोमध्ये उन्हात गरम झालेली एक लालबुंद एसटी फ्लॅट क्रमांक २ किंवा जो असेल तो तिथे लागायची.गरम हवेचा झोत सोडत. सगळ्यांची एसटीमध्ये घुसायाची घाई . तश्या गर्दीत गाडीमध्ये घुसून जागा पकडणारे बाबा हिरो वाटायचे. एसटीमध्ये बसल्यावर आईच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायची घाई असायची. कारण एकच तो पोटातला गोळा आणि त्याहीपेक्षा गाडी लागण्याच्या कार्यक्रमानंतर याआधी अनुभवलेल्या लोकांच्या नजरांची भीती. सॉलीड लाज वाटायची. मग एकदा झोपून गेलो कि गाडी लागणार नाही अशी एक स्ट्रॅटेजि असायची.गाडीमध्ये गर्दी घाटावरच्या माहेरकरणीची,बेळगावला कॉलेज ला असणाऱ्या विद्यायथ्यांची,बेळगाव हुन वेंगुर्ल्याला आलेय व्यापार्याची असायची. वेंगुर्ला सोडून गाडी सावंतवाडी क्रॉस करून चढणीला लागली कि समजायचं दाणोली आलं. आजूबाजूला जंगलाचा गारवा जाणवायला लागायचा. आता गाडी घाट चढ़ताना दम टाकायला लागायची .
आंबोली येताच हवेत छानसा गारवा जाणवू लागायचा.. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला उंचच उंच कातीव कडे .आणि पावसात धोधो कोसळणार्या धबधब्यांचे काही खुणा दिसायच्या. आणि गाडी हळू हळू आंबोलीच्या एस टी स्टॅण्डवर थांबताच लोकांची उतरायची घाई सुरु व्हायची. आंबोलीचा एस ती स्टॅन्ड म्हणजे एक नमुनाच होता. एक कळकट्ट कॅन्टीन तिथून येणार चुरचुरीत भजी आणि वड्यांचा तो परिचित वास ,पानबीडीचे स्टॉल्स आणि आजूबाजूला सुस्कारे टाकत असलेल्या एस टी च्या बसेस . बाबा काहीतरी आणायला खाली उतरलेले असायचे आणि सर्व पससेंजर आले तरी परत आले नाहीत म्हणून आई आणि आम्ही पॅनिक मोड मध्ये असायचो. पण बाबा बरोबर कंडक्टर बरोबर गप्पागोष्टी करत गाडीत चढायचे. आणि आमचा जीव भांड्यात पडायचा .

गाडी थोडी पुढे जाताच उजवीकडे जेआरडी इंटरनॅशनल नावाचं हॉटेल दिसायचं ,स्विमिन्ग पूल असलेलं .आमच्यासाठी ते हॉटेल म्हणजे काहीतरी एक्दम भारी श्रीमंत लोकांसाठीच असलेली गोष्ट होती.
छान थंड हवेत एस टी फ्रेश मूड मध्ये धावू लागायची ,आजूबाजूला दिसणाऱ्या शेतांना,कानूर ,नागणवाडी सारख्या छोट्या गावांना मागे टाकत कधी कर्नाटक राज्याच्या हद्दीत शिरायची कळायचं पण नाही . यावरून आठवलं कि लहानपणी माझे आजोबा ,मामा बेळगाव महाराष्ट्र मध्ये येणार असं बोलायचे तेव्हा मला आशा वाटायची कि एकदा बेळगाव महाराष्ट्रात आलं कि हा एवढा लांब एस टी चा प्रवास करावा लागणार नाही :)जवळ येईल बेळगाव आपल्या.
शिनोळी मागे टाकल्यावर जस हिंडलगा दिसायला लागायचं कि वाटायचं पोचलो आता आजोळी . आर्मी कॅम्पस दिसायला लागायचे .एखाद दुसरा जवान सायकल वर टांगा मारत जाताना दिसायचा. हिंडलग्याचा जेल दिसायचा. या जेल बद्दल नतर कळालेलं ले कि मोहरा फिल्म च शूटिंग या जेल मध्ये झालेलं . हिंडलगा गणपती मंदिर गेलं कि बेळगावचा शहरी चेहरा दिसायला सुरु व्हायचा ......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.

आमचे जुने शेजारी आणि जवळचे स्नेही त्यातल्या काकू बेळगावच्या. त्यांच्या तोंडून बरंचं ऐकलंय. त्यामुळे ऐकून परीचयाचं आहे बेळगाव, तिथले भाग. तसेच अनेक पुस्तकात वाचलंय बेळगावबद्दल. वेंगुर्ला बेळगाव इतकं जवळ आहे हे मात्र माहिती नव्हतं.

ते st त बसल्यावर आई च्या मांडीवर डोकं ठेवायची घाई........अगदी अगदी.....मला कधी उलटी नाही झाली पण नक्की काय व्हायचं ते कळायचं नाही...मी बोलायचे मान दुखतेय.....
बाकी गावी जायचं वर्णन आणि आपल्या मनाची अवस्था मस्त च अगदी माझ्यासारखी च