चिरुमाला (भाग ८)

Submitted by मिरिंडा on 4 July, 2018 - 08:15

बसचा प्रवास लीना आणि मुलांना अतिशय आवडला. मुलं बसमध्ये कधी न बसल्याने खिडकीतून बाहेर पाहण्यात त्यांचा बराच वेळ गेला. पावसामुळे झालेली हिरवी गार शेते , जंगले आणि डोंगर दऱ्या पाहताना त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटत होते. अधून मधून हे गाव कोणतं , ते गाव कोणतं असं विचारत होते. मला काहिच माहिती नसल्याने ते नाराज होत होते. रात्रीचे नऊ वाजत होते. आम्ही रामनूरला उतरलो. पावसाची झोंड उठली होती. आम्ही आमच्या छत्र्या उघडून स्टँड वर पाऊस कमी होण्याची वाट पाहत बसलो होतो. बराच वेळाने पाऊस थोडा कमी झाला. जुडेकरला आधी सांगितल्यामुळे तो तेवढा थोड्याच वेळात स्टँडवर आला मग मंद दिव्यांचा प्रकाश असलेल्या रस्त्याने आम्ही चौघांनी चालायला सुरुवात केली. जंगलाचा रस्ता थोडा भीतीदायक होता. पण तोही लवकरच संपला. हातातलं सामान आता जड वाटू लागलं होतं. जुडेकरला त्रास होत असेल असे वाटून मी थोडावेळ थांबण्याचे ठरवले. पण जुडेकर नाही म्हणाला. मग आम्ही चालत राहिलो. जंगल संपवून आम्ही मोकळ्या मैदानावर आलो. समोर दिसणारे वाड्याचे गेट पाहून लीना म्हणाली, अहो हा वाडा खूपच मोठा आहे, नाही ? " मी मानेनेच होकार दिला. आम्ही गेटपाशी पोहोचलो. जुडेकरने हातातले सामान खाली ठेवून गेटचे कुलूप उघडले. मग मुख्य दरवाज्याचे कुलूप उघडून आत प्रवेश केला. सगळे लाइट लावले. प्रचंड मोठ्या हॉलला पाहून लीना म्हणाली, " हा म्हण्जे अगदी रेल्वे प्लॅटफॉर्म वाटतोय. " मी पुन्हा होकार भरला. सामान आत ठेवल्यावर जुडेकर म्हणाला, " सर मी आता निघतो. उद्या सकाळी येईन . " मी त्याला आग्रह केला. पण तो थांबायला तयार झाला नाही. तो गेल्यावर प्रथम लीना स्वैपाकघरात गेली. बायकांच्या सवयी प्रमाणे तिने " इथे काहीच व्यवस्था नाही ...... " असे म्हंटले. त्यावर मला मी काहीच तयारी केली नाही असे वाटले. अचानक मला कवटीची आठवण झाली. मी विचलित झालो. पण अशा रात्रीच्या वेळेस मी काही करू शकत नव्हतो. दहा वाजत होते. लीनाने जेवण तयार केले. आम्ही थोड्याच वेळात जेवून झोपण्याच्या तयारीला लागलो. खालच्याच मोठ्या बेडरूममध्ये आम्ही एकत्र झोपण्याचे ठरवले. माझ्या मनात परत परत ती कवटी नष्ट करण्याचे विचार येत राहिले. लीना आणि मुलं दमल्यामुळे लवकरच त्यांना झोप लागली. मलाही झोप येतच होती. मी हळूच दरवाज्या उघडला. तरीही आवाज आलाच. लीना जागी झाली. " काय चाललंय हो तुमचं ? " विचारल्यावर मी थोडा दचालो. पण स्वतःला सावरीत म्हणालो, " पाणी प्यायचंय म्हणून उठलोय. तू झोप . " ती लगेचच झोपेच्या आधीन झाली. मी ते निमित्त साधून वरच्या मजल्यावर गेलो. ती खोली उघडली. लाइट लावला. आणि दरवाज्याच्या मागे पाहिलं. तिथे कवटी नव्हती. ........ ते पाहून मला भीती वाटली. मी सगळ्या खोलीभर कवटीचा शोध घेतला. पण सापडली नाही. मग अर्धवट उघडे फडताळ पूर्ण उघडले. आतल्या खणांमध्ये मातीचा बोट बोट थर साचला होता. इथे फक्त कवटी कशी आली. मला कळेना की कोणी मुद्दाम करीत होतं. मग मनात प्रश्न आला, को ण क र णा र ? इथे कोणीही येण्याची शक्यता नव्हती. आपण त्वरा केली नसल्याचे माझ्या लक्षात आले. मी पुन्हा एकदा फडताळ उघडले. हाताला घाण लागणार हे माहीत असूनही मी फडताळाच्या खालच्या खणांतून हात फिरवला. मग वरच्या खणात हात फिरवला. माझ्या हाताला एक दगड लागला. जो बराच बारिक होता. मी तो बाहेर काढला. आणि दिव्याच्या प्रकाशात तो पहिला. तो फकीरबाबांनी दिलेल्या उदी मधला चकाकणारा तांबूस रंगचा खडा होता. म्हणजे फकीर बाबांचा यात संबंध असेल की काय मला शंका येऊ लागली. कदाचित एखाद्या उंदराने किंवा त्या दिवशी दिसलेल्या मांजराने कवटी नेली असावी असेही मला वाटले. मी बाहेर आलो कुलुप घातलं आणि बाजूच्या खिडकी कडे आलो. जिथून पलिकडचा भाग दिसत होता. पण तिथली खिडकी जशी मी बंद केली होती तशीच होती. हातातला खडा घेऊन मी हात धुवायला बाथरूममध्ये गेलो. खडा मी इतर खड्यांमध्ये ठेवला आणि आता पुडी भिंतीतल्या एका मोठ्या कोनाड्यात ठेवली. ......... दमलेले असल्याने सगळ्यांच्याच झोपा उशिरा उघडल्या. सकाळ प्रसन्नता घेऊन उगवली. मला आणि लीनाला चहा घेताना फार बरं वाटलं . मला बरं वाटलं कारण लीना आली होती. मागचे पंधरा वीस दिवस माझे एकट्याने जात होते. जेवणाची पंचाईत होत होती. ती आता होणार नव्हती. अजूनही माझ्या मनात कुतुहल मिश्रीत भीती होती, की कवटी नक्की कुठे गेली. असो. लीनामुळे मला नाश्ता मिळाला. तिला जुडेकर आवडल्या नसल्याचं तिनी सांगितलं. जुडेकर एक पस्तिशी उलटलेला चिवट , लोखंडाच्या कांबीप्रमाणे शरीरयष्टी असलेला माणूस होता. तो फक्त क्लास फोरच नाही तर क्लास थ्रीचीही कामे करीत असे. एक दिवस मला ते धोकादायक वाटलं. म्हणजे हा काहीही करू शकतो. पण त्याने माझ्यावर केलेले उपकार आणि माझी घेतलेली
काळजी आठवल्याने मी तो विचार झटकून टाकला.
मुलं उठली होती . दोघेही दुध वगैरे प्यायल्यानंतर बाहेर खेळायला गेली. नुकतीच पावसाने उघडीप घेतली होती . लावलेल्या बागेतील फुलझाडांची रोपे आता अंग धरीत होती. त्यामुळे परिसर चांगला दिसत होता. थोड्यावेळाने जुडेकर आला
आणि थोडा खूष दिसत होता. मी त्याला विचारले, " आज काय विशेष ? " त्यावर तो म्हणाला "सर दोन चार दिवसात तुम्हाला गाडी मिळेल.
म्हणजे तुम्ही बँकेत पटकन येऊ शकता. फक्त ड्रायव्हर मिळणार नाही असं मी ऐकलंय. " नंतर खरोखरीच येणाऱ्या गुरुवारी मला जिल्ह्याच्या कार्यालयात बोलावले आणि गाडीच्या चाव्या आमच्या मोठया साहेबांनी सुपूर्त केल्या. तो ओडिसी होता. त्यांचं नाव मोहंती होतं. ते मला म्हणाले,
" मि. सबनीस खरंतर तुमच्या पोस्टला गाडी देण्याची पद्धत नाही, पण तुमचं काम आणि रामनूर सारखं लहान गाव पाहून गाडी देण्यात आलेली आहे. ड्राइव्ह मात्र तुम्हाला करावं लागेल. " मी त्यांचे आभार मानले. आणि गाडीची चावी खिशात ठेवून बाहेर पडलो. केव्हातरी कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर मी गाडी शिकलो होतो. मला फक्त आता सरावाची गरज होती. तसेही मी राहत असलेला भाग सराव करण्यासाठी योग्य होता.
त्यादिवशी मी संध्याकाळी गाडीने घरी आलो. गाडी रुबाबात पोर्चमधे उभी केली. ती एक फॅमिली कार होती. काहीही असो, मला गाडी मिळाली
या आनंदात लीनाने तिची पुजा केली आणि काहीतरी गोडधोड करण्याच्या तयारीला ती लागली. आता सगळ्या जागेलाच एकूण आवाज आणि अस्तित्व निर्माण झालेलं होतं. इतके दिवस मौन व्रत घेतलेला वाडा आता मुलांच्या, लीनाच्या आणि माझ्याही मोठयाने बोलण्याने गजबजल्यासारखा वाटू लागला. ..................
असेच काही महिने गेले . मुलांच्या शाळा व्यवस्थित चालू होत्या. लीनाला मात्र कंटाळवाणं वाटू लागलं. शेजारपाजार नसल्याने दुपारच्या मोकळ्या वेळात काय करावं तिला समजेना. आताशा ती सगळ्या खोल्या उघडून आणि स्वच्छ करून घेत होती. एक तात्पुरत्या स्वरूपाची मोलकरीणही मिळाली. वाड्याला बाहेरूनही रंग दिला गेला. परत ती जुडेकरची मेहेरबानी म्हणावी लागली. आजकाल घरी येताना लांबून वाडा चमकत असल्यासारखा मला दिसू लागला. हळूहळू मी वाड्याच्या प्रेमात पडलो. आणि लीनाही. लवकरच मी पाटील , फकीरबाबा आणि तो भिकारी यांना विसरून गेलो. मध्यंतरी एकदा रजा घेऊन मी हरिदासला भेटून आलो . वाड्याच्या कागदपत्रांचे रजिस्ट्रेशन वगैरे करून आलो. हरिदास माझ्या सुखी चेहऱ्याकडे पाहत राहिला. त्याला मी वाड्यासंबंधात काही समस्या सांगेन असं वाटलं. पण माझी काहीच तक्रार नसल्याने तो थोडा आश्चर्य चकित झाला. ........ दिवस चांगले चालले होते. मुलांची अभ्यासातली प्रगतीही समाधानकारक होती. एक दिवस माझ्या मनात आलं. स्टाफ आणि गावातले प्रतिष्ठीत लोक आणि जिल्ह्याच्या कार्यालयातील मुख्य मॅनेजर यांना पार्टी द्यावी. म्हणजे सगळेच घरी येतील, ओळखी वाढतील आणि गावात माझ्या येण्याचं कौतुकही होईल. तसंच बँकेचंही नाव होईल. ऑफिस स्टाफला मी माझी योजना सांगितली. आमचे असि. मेनेज पै फारच खूष झाले. ते म्हणाले, " सर अशी पार्टी आजपर्यंत कोणीच दिली नव्हती. मुलांच्या चांगल्या प्रगतीमुळे त्यांना वार्षिक स्नेहसंमेलनात पारितोषिकेही मिळाली. मला आता प्रिन्सिपॉल नन मॅडम व्यक्तिशः ओळखू लागल्या. वर्ष पूर्ण होत आल्याने मी आनंदात होतो. आजपर्यंतच्या बदल्यांमध्ये इतकं चांगलं गाव मला मिळालं नसल्याचं वाटू लागलं. .......... पंधरावीस दिवस तसं काही खास घडलं नाही. कर्ज मागणारेही स्वस्थ बसले होते. नेहेमीचं रुटीन चालू होतं. एक दिवस गोळे माझ्या केबीन मध्ये आला संध्याकाळचे पाच वाजत होते. त्याने केबिनचा दरवाज्या अर्धवट उघडा ठेवला होता. मी मान वर केली. प्रश्नार्थक मुद्रेने त्याला काय विचारले. " सर ही माझी मिसेस. .... " असं म्हणून आत आलेल्या एका स्त्रीची ओळख करून दिली. तिचा चेहरा अतिशय मोहक होता. ओठ रक्तासारखे लाल आणि जाड होते. इतके जाड ओठ स्त्रीचे मी प्रथमच पाहत होतो. एकूण बांधा अतिशय कमनीय आणि आकर्षक होता. भरगच्च छाती जिला मुद्दाम करकचून बांधले होते असे मला वाटले. भडक लाल साडी त्यावर घातलेला निळाशार ब्लाउज . तिला पाहून हिला कुठेतरी पाहिलेले असल्याचा भास झाला. मग आठवले तिचा चेहरा पाटलांच्या वाड्याच्या वरच्या खोलीत असलेल्या चित्रातल्या स्त्रीप्रमाणे भासत होता. मी एकटक पाहत राहिलो. ती गालातल्या गालात हसत होती. उगाचच जुजबी शब्द बोलून मी त्या दोघांना घालवले. ....... ̱ गोळे गेला होता . पण त्याची बायको माझ्या डोक्यातून जाईना. संध्याकाळी मी घरी गेलो. मुलं आणि लीना अतिशय खूश दिसले. मी त्यांना गावात फेरफटका मारायला घेऊन गेलो. गाव लहान असलं तरी बरं होतं. लहान मुलांसाठी पार्कही होती. मग येताना आम्ही नदीवर गेलो. नदी जोरात वाहत होती. नदीच्या पलीकडच्या तिरावर किल्ला दिसला. तो थोडा पडका वाटला. असल्या खेडेगावात त्याच्याकडे कोण लक्ष देणार. मुंबईसारख्या शहरात सुद्धा जुन्या इमारती दुर्लक्षित राहतात. येताना जुडेकरचे घरही पाहिले. त्याला मुलं नसल्याने त्याच्या बायकोला मुलांना कोठे ठेवू आणि कुठे नको असे झाले होते. त्याची फक्त बायको लीनाला आवडली. गावात नदीचे नाव रौरव असल्याचे कळले. हे काय नाव ? माझ्या मनात आलं. रौरव हे नाव नरकाचे असल्याचे माझ्या लक्षात आले. कारण माही आई पोथ्या पुराणं वाचीत असे. त्यात रौरव , कुंभिपाक अशी नरकाची नावे नमूद केली होती. असेही ऐकले की त्या नदीचे पाणी कोणी पीत नाही कारण ते विषारी आहे असा समज गावकऱ्यांचा होता. रात्री साडेआठच्या आसपास आम्ही घरी आलो.
दुसर्‍या दिवसापासून मी झपाटल्यासारखे काम करू लागलो. माझं काम पद्धतशीर असल्याने लवकारच मी स्टाफचा आवडता झालो. कामाला शिस्त आल्याने काम सोपे झाले. हेड ऑफिसला जाणारी माहिती वेळेवर जाऊ लागली. सगळेच जण झोकून काम करू लागले. वेगवेगळ्ञा मिटिंग्ज मी हाताळू लागलो. मोहंती साहेबांचे मत माझ्या बद्दल चांगले झाले. ...... आता माझ्या मनाने पार्टीचे देण्याचे घेतले. गावातल्या प्रतिष्ठीत लोकांची यादी केली गे ली . आमचे मॅनेजर उत्साहाने हे काम करू लागले . पार्टीचा दिवस सत्ताविस डिसेंबर ठरवला गेला. पार्टी माझ्या वाड्यासमोरच्या मोकळ्या मैदानात देण्याचे ठरले. जिल्ह्याच्या गावातून केटरिंगचा
कॉन्ट्रॅक्टर आला. जास्त उत्साहाने जुडेकर काम करीत होता. पण एक गोष्ट मला खटकली. लोनचे काम तो फार उत्साहाने करीत होता. मी त्या
त्या माणसांचे आगत स्वागत जुडेकर जरा जास्तच लक्ष देऊन करीत होता. हाच जुडेकर पूर्वी हेडऑफिसला होता. एक दोन वेळा मोहंती साहेबांकडूनही त्याला जास्त महत्व दिले गेल्याचे लक्षात आले. तो प्रत्येक मिटिंगला माझ्या बरोबर येत असे. एका मिटिंगनंतर मी मोहंती साहेबांच्या केबिनमधून बाहेर पडत होतो. जुडेकर हेडऑफिसमध ल्या श्रीवास्तवशी बोलताना आढळला. श्रीवास्तव बोलत होता, " अरे यार,
चांदीका क्या हुवा ? "असे म्हणून त्याने अंगठा तर्जनीवर चोळला ते पाहून मला संशय आला. पण मी ती गोष्ट तेवढ्यावरच सोडून दिली. निदान्
ती गोष्ट सोडल्याचे मी जुडेकरला दाखवले. ...........अचानक मग प्रत्येक महिन्यात माझ्याकडे कर्जाचे अर्ज जास्त संख्येने येऊ लागले. मी सहज
म्हणून मागचे रेकॉर्ड पाहिले. मी यायच्या आधी पर्यंत असे अर्ज क्वचितच आलेले आढळले. आता मला जुडेकर कडे लक्ष ठेवणं भाग होतं. असो.
पार्टीचे सगळे नियोजन पै (आमचे असि. मॅनेजर ) पाह्त होते. डिसेंबरचा महिना उजाडला. अचानक एक दिवस गोळेनी घरी येण्याचा आग्रह केला.
मला त्याची धास्ती वाटत असे. मी अर्थातच नाही म्हंटले. त्याला ते फारसे आवडले नसावे. पण तो तसं काही म्हणाला नाही किंवा त्याच्या रोजच्या कामात फरक पडलेला दिसला नाही. वाढ्यासमोरचे मैदान साफ करून घेतले. तिथे एक जाजम अंथरले. त्यावर रेडकार्पेट घातले. एक लहानसे स्टेज बांधले. सगळी व्यवस्था अर्थातच जुडेकर करीत होता. ..............एका शनिवारी असाच बँकेतून बाहेर पडत होतो. तेवढ्यात गाडीत बसता बसता मला मुंबईला आलेला भिकारी मला परत दिसला. माझ्याकडे पाहून त्याने विचित्र हातवारे केले. आणि झोळितले धान्य त्याने माझ्या गाडीच्या दिशेने फेकले. माझ्या अशा गोष्टींवर बिलकुल विश्वास नव्हता. जुडेकर घाबरलेला दिसला. तो म्हणाला," सर हा भिकारी वीसेक
वर्षांपूर्वी गावात दिसत असे. तेव्हा मी लहान होतो. आणि त्याला गावकर्‍यांनी इथून घालवला होता. ही लक्षणं चांगली नाहीत. .........मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही.

(क्र म शः )

Group content visibility: 
Public - accessible to all site users