......कार्यकर्ता......

Submitted by Patil 002 on 25 June, 2018 - 11:27

गरीबांचा बुलंद आवाज.....
साहेबांना प्रचंड बहुमताने विजयी करा.........
नाद नाय करायचा वाघाचा...
येऊन येऊन येणार कोण??"

घोषणांनी सत्तुचा आवाज पार बसला होता. दिवसभर पायाला भिंगरी. एका दिवसाला पाच- सहा गावं. मतदान जवळ आलेलं. गावागावात बूथ. मतदार याद्या. पोलिंग एजेंट. स्लिपा वाटायच्या. मतदानाच्या आदल्या दिवशी जेवणावळी. इतर गोष्टी. सगळी कामं सत्तूला करावी लागायची. साहेबांचा सत्तूवर खूप विश्वास. भरोशाचा कार्यकर्ता....

पक्षाचं काम करताना सत्तूचं कामावरलं लक्ष उडालं. पण त्याला वाटायचं साहेबांचा आशीर्वाद आहे. साहेब आहेत तोपर्यंत काहीच कमी नाही.....

मतमोजणी झाली. साहेब निवडून आले. गुलालाची उधळण. साहेब गाडीतून उतरले. फटाक्याच्या माळा पेटल्या. कार्यकर्त्यांचे अंतकरणापासून आभार. असेच पाठीशी रहा. सेवा करण्याची संधी द्या. भावपूर्ण भाषण संपले. साहेब मुंबईला रवाना झाले.......

महिन्या दोन महिन्यांतून साहेब तालुक्याला येतात. सत्तूला साहेबांची सगळी सोय करावी लागते. आठ-दहा दिवस त्यांच्याबरोबर. दौरे.. मीटिंग.. माती.. लग्न... साहेब सत्तूला घेतल्याशिवाय मतदारसंघात जातच नाहीत. दौरा संपला कि साहेब पुन्हा मुंबईला जातात.....

साहेब मंत्री होऊन २-३ वर्ष झालेली. पंचायतीचं इलेकशन लागलं. सत्तुच तिकीट फीक्स झालं. पण तिथ आरक्षण पडलं. सत्तू आणि कार्यकर्ते निराश झाले.......

साहेब आले. सर्वांची समजूत काढली. एका लुगड्यानं म्हातारं होत नाही. अजून लांब टप्पा आहे. पुढच्या वेळी नक्की विचार करू. कार्यकर्ते जोमानं कामला लागले. मतदान झाले. पंचायतीमध्ये साहेबांच्या गटाला घवघवीत यश मिळाले......

दिवस असेच जात होते. एक संपली कि दुसरी निवडणूक येत होती. सत्तूच्या मागचे काम संपत नव्हते. सत्तूला २ मूलं झाली. दोन एकर डाळींब बाग काढून टाकावी लागली. पी.डी.सी.सी. बँकेचे दीर्घ मुदतीचे कर्जहि होते. घरी थकलेले वडील. आजारी आई. दोन पोरांचा शाळेचा खर्च. पण नडत नव्हतं. साहेबांच्या शब्दानं कर्जे मिळत होती.......

सत्तूचं गावात वजन होत. वर्गमित्र मुंबई पुण्याला नोकरी, व्यवसायास गेलेले. ते इनोव्हा गाड्या घेऊन गावाकडं यायचे. सत्तूला भेटायचे. नमस्कार करायचे. म्हणायचे आमच्या बदलीचं तेवढं साहेबांना बोला. तुमच्या शब्दाला मान आहे... तुमचं वजन आहे. सत्तूची छाती फुगायची......

तोंडावर झेड.पी. ची निवडणूक आलेली. जागा ओपनच हो! कुठलीच अडचण नव्हती. सत्तूच्या तिकिटाचं जवळ जवळ नक्कीच. अचानक एके दिवशी साहेबानी सत्तूला मुंबईला बोलवलं. सत्तूला खूप बरं वाटलं. सत्तू मुंबईला गेला. एसी चेंबर मध्ये शिरला. साहेबानी चहा, नाष्टा मागवला. झेड.पी. चा विषय काढला. यावेळी खुप टफ निवडणूक आहे. दुसर्‍या गटाने खुपच उचल खाल्लीया. आपल्याला तगडा उमेदवार पाहीजे. खरं तर सत्तूचाच नंबर आहे. पण पैशाचा प्रश्न आहे. पक्ष आणि मी आहेच. पण उमेदवाराने स्वतः १५ ते २० लाख घातले पाहिजेत. सत्तूची परिस्थिती नाही. म्हणून एवढ्या वेळी सत्तूनं गप्प बसावं. पक्षाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. माझ्याही अस्तित्वाचा सवाल आहे. पुढच्या झेडपीला सत्तूचाच नंबर असणार. माझा शब्द आहे......

साहेबांचं खरं होतं. आजकाल पैशाशिवाय निवडणूक नाही. सत्तूच्या जागी सचिनराव उभे राहिले. गावाकडे येऊन कार्यकर्ते प्रचाराला लागले. सत्तूने पुन्हा पायाला भिंगरी बांधली. सचिनराव १० हजार मताने निवडून आले......

सत्तूची पोरं आता मोठी झालेली. गेल्या वर्षी वडील गेले. धाकला पोरगा कॉलेजला होता. थोरला पोरगा पुण्याला प्रायव्हेट जॉब करीत होता. त्यालाही गव्हर्मेंटमध्ये चिकटवणार असा साहेबांनी शब्द दिलाय. डी.सी.सी बँकेचे कर्ज दुप्पट झालेलं. शिल्लक राहिलेली बाग फेल गेलेली. पण एकदा पोरं नोकरीला लागली कि, महिन्याला लाखभर रुपये येतील. कर्ज काय फीटून जाईल. मग बायकोला चार दागिने घेता येतील. घराची डागडुजी करता येईल. बागपण वाढवता येईल. शिवाय येणार्‍या निवडणुकीत आपणच उमेदवार. साहेबांनी शब्द दिलाय. आता कल्ले पांढरे झाले. टक्कल पडलं. कार्यकर्ते विचारतात, सत्तू तात्या तब्बेत कशी आहे? वय झाल्यासारखं वाटतंय. जेष्ठ कार्यकर्ता म्हणून तरी साहेब नक्कीच तिकीट देणार.......

अलीकडे साहेबांचे चिरंजीव पण राजकारणात उतरले आहेत. धाकलं साहेब अलीकडं प्रत्येक कार्यक्रमात येतात. भाषण करतात. गरिबांची सेवा करणारं आमचं घराणं आहे म्हणतात. कोणाचे काम असेल तर डायरेक्ट मंत्र्यांना फोन करतात. त्यांच्याबरोबर नेहमी १०-२० कार्यकर्ते असतात.

वर्षभरातच झेड.पी. ची निवडणूक जाहिर झाली. उमेदवारीसाठी सत्तूच अग्रेसर होता. जेष्ठ म्हणून. एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून.

एके दिवशी साहेबांनी सत्तूला बोलावले. म्हणाले, "आपलेच दात आणि आपलेच ओठ. चिरंजीव ऐकायला तयार नाहीत. पण मला चिरंजीवा पेक्षा सत्तू कार्यकर्ता जवळचा आहे. ज्यानं माझ्यासाठी उभी हयात घालवली, त्यांना आम्ही विसरणार नाही. पण चिरंजीव ऐकत नाहीत. आम्ही काय करावं? तू म्हणशील तस करू."
साहेबांची अवस्था बघून सत्तूला भरून आलं. सत्तूनं साहेबाना ठामपणे सांगितलं, "धाकल्या साहेबांचा अर्ज भरा. घरातच फाटाफूट नको. आम्ही पक्षासाठी एवढे दिवस राबलो. आता साहेबांच्या घराण्यासाठी राबु........"

सत्तूला उदास वाटत होतं.
हयात राजकारणात घालवली. घरात बापाच्या जागी साहेबांचा फोटो लावला. बागा पण गेल्या. शेती संपली. घरदार उध्वस्त झालं. पोरगा निवडून येणार या आशेवर बाप मरून गेला. बायका पोरं देशोधडीला लागली. बरोबरीचे मित्र प्रगती करुन कुठल्या कुठं गेले. आपण मात्र साहेबांचे खंदे समर्थक. विश्वासू साथीदार.
घरात नाही ज्वारीचा दाणा आणि आणि पुढारी उताणा, अशी अवस्था.
उद्या पोरांनी विचारलं तर बापाचं कर्तव्य काय सांगायचं ???????

सत्तुला सकाळी उशिरा जाग आली ती धाकल्या साहेबांच्या हाकेनं. सत्तू जागा होऊन बाहेर आला. धाकल्या साहेबानी पाय धरले. म्हणाले, "तुमच्या सारखे कार्यकर्ते आहेत म्हणूनच राजकारणात आमच्या घराण्याचं नाव आहे. आता आमचं निवडून येणं तुमच्याच हातात आहे." धाकल्या साहेबानी पुन्हा एकदा पाय धरले. सत्तूने त्यांना उठवले......

धाकल्या साहेबांच्या प्रचारासाठी सत्तू नावाचा कार्यकर्ता कामाला लागला. त्याने पुन्हा पायाला भिंगरी बांधली.....

Group content visibility: 
Use group defaults

वास्तवदर्शी कथा,
भविष्यात येणाऱ्या सत्तेची स्वप्ने पाहत आयुष्य बरबाद करणारे लोक पाहण्यात आहेत.

वास्तवदर्शी कथा,
भविष्यात येणाऱ्या सत्तेची स्वप्ने पाहत आयुष्य बरबाद करणारे लोक पाहण्यात आहेत. +१११

खुप छान लिहीता तुम्ही,
हल्ली माबोवर असे एकसंध वाचावे असे लिखाण दुर्मिळ झालेय. (हेमावैम)
पुलेशु. Happy