भारतीय लोकांमुळे इतर जनतेला बसणारे कल्चरल शॉक अर्थात ओरांग इंडिया तमाशा.

Submitted by विक्रमसिंह on 2 July, 2018 - 02:13

प्रवास करताना किंवा परदेशी रहाताना किंवा भारतातच असताना आपल्या मुळे इतर जनतेला किती धक्के आणि त्रास आपण देत असतो याची कल्पनाच न केलेली बरी. इंडोनेशियात असताना आम्ही आपल्या अशा टिपिकल भारतीय पद्धतीला ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) म्हणजे भारतीय लोकांचा तमाशा म्हणायचो. ओआयटीची किती तरी उदाहरणे देता येतील

- कुठेही शिस्तीत रांग न लावता एकदम गर्दी करणे, जसा काही जन्माला येतानाच देवाने आपल्याला कायम रांगेत पुढे रहाण्याचा मान दिला आहे. दुकानामधे दुसर्‍या गिर्‍हाइकाशी दुकानदार बोलत असताना आपलेच घोडे पुढे दामटणे हे त्याचे दुसरे रूप.
- परदेशी विमानतळावर भारतात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार व इतर देशात जाणार्‍या विमानाचे प्रवेशद्वार यात शिस्तीच्या बाबतीत जमीन अस्मानाचा फरक दिसतो.
- सार्वजनिक अस्वछता आणि स्वछतेच्या आपल्या कल्पना.
- आपल्या मसाल्यांचा घमघमाट. कित्येक ठिकाणी म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना घरे भाड्यानी देताना अटी घातल्या जातात.
- मला ईंडोनेशियात लोक विचारायचे. तुमच्या बायका पोट उघड का टाकतात. (साडी घातलेल्या). बघण्याचा दृष्टीकोन वेगळा पण हाही त्यांच्या साठी शॉकच ना. (हा नुसता शॉक , पण ओआयटी नाही)

बर्‍याच वेळेला आपल्या गावीही नसते की आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होतोय.
तुम्ही पण असे शॉकलेले लोक पाहिले असतील. ओआयटी (त्रास देणारे शॉक) अनुभवले असतील.

टीप : मला आपल्याबद्दल टिका करायची नाही. आपले (भारतीयांचे) कित्येक गुण आवडल्याचे लोक आवर्जून सांगतात. त्याबद्दल वेगळा एक धागा काढायला हरकत नाही. पण बर्‍याच वेळेला आपल्याकडून अनाहूत पणे चुका होउ नयेत ही इच्छा. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गर्दी करणे, वेळ किंवा दिलेला शब्द न पाळणे, अस्वच्छता/गलिच्छपणा, दांभिकपणा, इन्फास्ट्रक्चरचा अभाव, शिस्त नसणे याबद्दल भारतातच असताना कितीही शिव्या घातल्या तरी भारताबाहेरील लोकांनी त्याबद्दल बोलू नये, हे लक्षात ठेवा.

सार्वजनिक ठिकाणी 2 मित्र हातात हात घेऊन, गळ्यात हात घालून मुक्तपणे फिरतात,

पर्सनल स्पेस चा अभाव, पश्चिमात्य लोकांच्या तुलनेत आपण एकमेकांच्या जवळ उभे रहातो, जवळ जाऊन बोलतो, बोलताना सहज दुसऱ्याला स्पर्श करतो, युरोपिअन लोकांना त्यांच्या स्पेस वर हे आक्रमण वाटते

लग्न झालेले आणि पोरे असलेले बाप्ये, त्यांच्या आई वडिलांच्या सोबत राहतात,

पोराच्या पोस्ट ग्रॅड ची फी बाप भरतो

बायका , हाफ पॅन्ट, t शर्ट, क्वचित सलवार कमीज घालून स्विमिंग पूलधे उतरतात

.. शंभर वर्षांआधी हेच गोरे बीचवर पोलीस लावून बायकांच्या स्कर्टची गुडघ्यापासून लांबी मोजायचे. निर्धारित पेक्षा जास्त आखूड पेहराव असेल तर सरळ अटक करुन जेलात घालायचे. ही कायदेबाजी इतकी वाढली की कोण्या एका पोलिसाने एका स्त्रीने वरच्या अंगभर कपड्यांच्या आत बिकिनी घातली आहे की काय ही शंका आली म्हणून तपासणी करायचा हट्ट केला.

अवांतरास माफी असावी.

मी जनरलाइझ करु शकत नाही. कारण सगळ्या भारतीयांना हे लागू नाही. मी पाहिलेल्या काही घटना.
१. आधीच्या धाग्यात लिहीले आहे तसे बरेच लोक ट्रेन, बस मध्ये चढताना, एखादी सीट रिकामी झाली की, लिफ्ट मध्ये जाताना, बाहेर पडताना घुसण्याचा प्रयत्न करतात . इथल्या पध्दतीप्रमाणे स्त्रिया, म्हातारी माणसे यांना आधी प्राधान्य दिले जाते. पण बर्‍याच भारतीयांच्या ते अंगवळणी पडायला खूप काळ जातो.

हे कदाचीत भारतीयांव्यतिरि़क्त इतरांनाही लागू होईल.
२. ऑफिसमध्ये ब्रेकफास्ट आणि मधल्या वेळेच्या खाण्यासाठी दुध, फळे, ब्रेड, सिरीयल्स, क्रिस्प्स वगैरे असतात. कित्येक भारतीय सकाळपासून संध्याकाळपर्यंत तेवढेच खातात. फार कमी वेळा स्वतःचा डबा. माझ्या ऑफिसचं एक दोन महिन्यांचं बजेट कोलमडलं होतं. त्यानंतर ठरावीक पदार्थ कमी प्रमाणात ठेवायला सुरुवात झाली. दर महिन्याच्या शेवटी होणार्‍या गेट-टुगेदरला ही असंच. पदार्थांवर असा ताव मारायचा की १० मिनीटे उशीरा येणार्‍याला काही मिळू नये.
३. अनेक लोक आठवड्यातून एक किंवा दोनदा वेगवेगळे स्नॅक्स, चॉकलेट, डोनट्स आपापल्या टीमसाठी आणतात. काही भारतीय त्या टीममध्ये नसतानाही ते खातात. अर्थात ते सगळ्यांसाठीच आणलेले असते. पण ज्या टीमचा आणि आपला संबंध नाही त्यांच्या डेस्क जवळ फक्त खाण्यासाठी जाणे (मलातरी) लाजिरवाणे वाटते.

लाउड मिरवणुका, लग्नाच्या वराती. ह्या अगदी छोट्या असल्या तरी ढोल व इतर आवाज खूप वेळ वाजत राहतात.
फटाक्यांचे आवाज. जनरली लाउड कल्चर.

भोचक पणा मला लोक कायम तुम्ही बँकेत काम करता का विचारतात. पूर्वी बिझनेस होता तेव्हा बुटी क आहे का( नवृयाने काढून दिलेले/ पार्लर चालवतेस का विचारत.
मी नुकतेच बॅड ब्लड थेरॅनोस घोटाळ्यावर पुस्तक वाचले त्यात भारतीय वृत्तीने काय घोटाळे करतात त्याचे उत्तम चित्रण आहे. बॉसच्या पुढे पुढे करणे , यस मॅन गिरी, शुद्ध थापा मारणे, सिस्टिम ब्रेक करून काय मिळ वता येइल तेबघायची वृत्ती. धकले तर करून टाकले टाइप.

मी स्वतः केलेल्या काही चुका,

- हो , नाही मानेनी सांगणे. आपला मान हलवण्याचा अर्थ फक्त आपल्यालाच समजतो. माझ्या पहिल्या जर्मन भेटीमधे आमचा सहकार्य समझोता जवळपास मोडला होता. (यात काहिही अतिशयोक्ती नाही). त्यांना वाटायच मी एखादी गोष्ट एकदा हो म्हणायचो, एकदा नाही. शेवटी मी त्यांना सांगितल की मी तोंडानी जे काही हो, नाही म्हणेन तेवढेच धरायचे. मुंडी हलवणे लक्षात घ्यायचे नाही. Happy
- दोन लोक बोलत असताना आपण मधे बोलणे. ही आपल्याला फार वाईट सवय असते. आपण मल्टी टास्कींग असतो. तिकडे जमत नाही.
- चीन मधे मी एकदा त्यांच्या पाकीस्तानला असलेल्या त्यांच्या पाठिंब्या बद्दल टिका केली होती. दुसर्‍या दिवशी मला सुरुवातीलाच सांगण्यात आल, राजकारणावर चर्चा करायची नाही.
- घरच्या लोकांच्या नसत्या चौकश्या.
- कितीही अवेळी विमान पोचणार असले तरी विमानतळावर बोलावणे. लोक येतात, नाही अस नाही. पण तिथे सुट्टीला किती महत्व देतात ही तिथे राहिल्याशिवाय नाही समजत.
- please, thank u, sorry वगैरेचा कंजूष वापर. आपण फार उद्धट असल्यासारखे त्यांना वाट्ण्याची शक्यता असते. आपण मुद्दाम तसे काही करत नसतो, पण आपल्याला सवयच नसते.
- ड्रेस कोड. माझ ब्राझिलला नेहमी चुकायच. त्यांचा काहीतरी अलिखित नियम असावा. मी जेंव्हा नुसता टाय घालून यायचो, तेंव्हा मंडळी सुटात. आणि मी सुटात तर बाकी सर्व साधे. कायम मी वेगळा असायचो. शेवटी मी ऑफिसातच एक सूट ठेवला होता.
- ड्रिंक कुठल घ्यायच, किती घ्यायच, कस घ्यायच, कशात घ्यायच याचे पण आपले अंदाज चुकतात.
- एखादी गोष्ट आपल्याला मान्य नसेल तर स्पष्टपणे नाही सांगता न येण. गोल गोल बोलून आपणच नुकसान करून घेत असतो. शिवाय आपल्याबद्दल कायमचे वाईट मत होते ते वेगळेच. (हा ही एक कल्चरचा परिणाम).

- हो , नाही मानेनी सांगणे. आपला मान हलवण्याचा अर्थ फक्त आपल्यालाच समजतो. माझ्या पहिल्या जर्मन भेटीमधे आमचा सहकार्य समझोता जवळपास मोडला होता. (यात काहिही अतिशयोक्ती नाही). त्यांना वाटायच मी एखादी गोष्ट एकदा हो म्हणायचो, एकदा नाही. शेवटी मी त्यांना सांगितल की मी तोंडानी जे काही हो, नाही म्हणेन तेवढेच धरायचे. मुंडी हलवणे लक्षात घ्यायचे नाही. Happy

हे एकदम परफेक्ट. ते लोक कायम गोंधळलेले असतात भारतीय माणूस मानेने हो म्हणतोय का नाही.

सहजगत्या विषय निघणे वेगळे पण.. इथे आपण आपल्याच लोकांची यथेच्छ बदनामी करण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रमाणे वाटतंय.

ओरांग इंडिया तमाशा (ओआयटी) >> पर्फेक्ट.
भारतीय लोक एकट्याने कदाचित ठीक वागतील पण समुहाने लाज आणतात... खासकरून आंध्र साईडचे लोक. (दुर्दैवाने मला ह्याच लोकांचा खराब अनुभव सातत्याने येत राहिला)

कंपनीच्या कॅफे मध्ये ( कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर अशी कॅफे चालवणार्‍या कंपनीला ऑफिसमध्ये जागा देऊन सेटअप केला होता) ओटमीलच्या बाऊलवर वरती घालायला वॉलनट्स आणि रेझिन्स मिळत.. बाजूला बरण्या भरलेल्या असत. हे त्या कॅफेमध्ये मागच्या सातवर्षापासून चालू होते. कंपनीने एक्स्पान्शन करायचे ठरवल्यावर खोर्‍याने विप्रो कॉग्निझंटचे पब्लिक आले.
मग हे पब्लिक बाऊल भरून वॉलनट आणि रेझिन्स आणि ते लपवण्यासाठी वरती ओटमील चा थर असे करू लागली. आता दिवसभरात तर कोणी बाऊलभरून वॉलनट्स आणि रेझिन्स खाऊ शकत नाही... म्हणजे हे लोक वरचा ओटमील चा थर खाऊन बाकी ड्रायफ्रुट्स घरी घेऊन जात असणार (हाऊ ग्रोस). तर कॅफे मॅनेजमेंटला अचानक ड्रायफ्रुटच्या बरण्या लगोलग रिकाम्या कशा होत आहेत हे कळाल्यावर त्यांनी अगदी लहान कप्समध्ये (जो सँपल घेण्यासाठी वापरतो) वॉलनट आणि रेझिन्स ठेवायला सुरूवात केली. अब्यूज करणार्‍या लोकांना हे का केले कळलेच नाही ते लोक धडाधड सात आठ कप ऊपडे करून ओटमील च्या बाऊलमध्ये भरायला लागली. मग मॅनेजमेंटने तिथे कायम स्वरूपी माणूस ऊभा केला आणि असे करणार्‍या लोकांना सन्मानाने हटकायला सुरूवात केली. तर हे लोक एका बाऊल साठी एकच कप घ्यावा असा कुठे नियम आहे म्हणत (विचित्र ईंग्लिश बोलत) वाद घालत. मग मॅनेजमेंटने ओटमील सोबत ड्रायफ्रुट देणेच बंद केले.. कायमचेच. सगळे एम्प्लॉयी लोक खूप वैतागले देसी लोकांच्या अश्या वगाण्याने.
ह्यातच अजून... सूप बरोबर बन आणि बटर मिळतो म्हणून आठ दहा बटरचे क्यूब्स पळवणे.... जेवण झाल्यावरही तासभर गप्पा मारत बसत जागा अडवून ठेवणे... पाच सात मिनिटे मायक्रोवेव वापरणे असे सगळे चालूच होते.
ह्याचा परिणाम कॅफे मॅनेजमेंटची देसी लोकांविरूद्ध खप्पा मर्जी होण्यात झाला आणि मॅनेजमेंट सगळ्याच देसी लोकांशी अतिशय रूड वागू लागले.
फीडबॅक देण्याची वेळ आली तेव्हा ह्याच देसी लोकांनी फार वाईट फीडबॅक दिले आणि सात-आठ वर्षे मॅनेजर असलेल्या साठ वर्षांच्या बाईला जी सगळ्यांना फार प्रिय होती...कायम हसत खेळत असे आपुलकीने विचारपूस करीत असे.. फूल ऑन एनर्जी.. कंपनीने दुसर्‍या लांबच्या ऑफिसमध्ये बदली केले.

नंतर माझी बदली कंपनीच्या त्याच लांबच्या ऑफिसमध्ये झाली जिथे विप्रो/कॉग्निझंटचा शिरकाव झाला नव्हता तिथे तीच मॅनेजर आनंदाने ओटमील बरोबर ड्रायफ्रुटच्या बरण्या भरत असे. माझी तिच्याशी फार आधीपासून ओळख असल्याने तिने देसी लोकांबद्दलचा कडवट सूर
माझ्याशी बोलतांना कधी जाणवू दिला नाही...

सहजगत्या विषय निघणे वेगळे पण.. इथे आपण आपल्याच लोकांची यथेच्छ बदनामी करण्याचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रमाणे वाटतंय.>> अजिबात नाही. उलट आपण काय काय चुका करतो हे माहित असणे अतिशय महत्वाचे आहे. बर्‍याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला चुकिच्या आहेत हे सुद्धा कळत नाही. अशा सांगण्यासाठी हा धागा आहे.
त्यातून एक Dos and Donts ची एक यादी निघाली तर खरेच चांगले ट्रेनिंग मटेरियल होईल. Happy

मला सुद्धा माझ्या सुरुवातीच्या काळात अशी कुणी यादी दिली असती तर आवडले असते.
विश्वास ठेवा लोकांचा फायदाच होईल. खच्चीकरण होण्याऐवजी आत्मविश्वास वाढेल. माझा हा उद्देश आहे.

विश्वास ठेवा लोकांचा फायदाच होईल. खच्चीकरण होण्याऐवजी आत्मविश्वास वाढेल. माझा हा उद्देश आहे.>>> जर हे खरंय, तर आजपासून तुम्ही माझे आदर्श! Happy
पण त्यासाठी बाकी लोकांनीही या लेखाला त्याच दृष्टीने प्रतिसाद द्यायला हवेत.

>> रस्त्यावर थुंकणे
अतिशय किळसवाणे पण काही लोकांच्या अंगवळणी पडलेली सवय. काही वर्षांपूर्वी मी काम करत असलेल्या कंपनीत एक अमेरिकन आला होता. त्याने एअरपोर्ट वरून येताना वाटेत एके ठिकाणी "रस्त्यावर चूळ भरणाऱ्या एका माणसाचा" फोटो काढला होता. त्यांच्या दृष्टीने हे "पूर्वी कधीही न पाहिलेले" दृश्य असते.

इतर काही शॉक्स:
१. सिंगापोर मध्ये तमिळ लोक मोठ्या प्रमाणात आहेत. पण ते अनेकदा "सार्वजनिक ठिकाणी दिसण्या वागण्याचे कसलेही भान" नसल्यासारखे वागतात. तेथे बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांसाठी हा खूप मोठा कल्चरल शॉक असतो.

२. पुणे बंगळूर रस्ता चौपदरी होण्याच्या आधीची घटना आहे. तेंव्हा हि कुणीतरी लिहून वृत्तपत्रात दिली होती. जर्मनीहून एक ऑफिसर आला होता तो कंपनीच्या कारने या रस्त्याने चालला होता. समोरून वेगाने वाहन येत आहे हे दिसत असताना "जजमेंट" घेऊन डाव्या बाजूच्या वाहनाला ओव्हरटेक करणे हे आपले तत्कालीन "ड्रायविंग कल्चर" होते. दोनतीन वेळा असे झाल्यावर त्या ऑफिसरने मध्ये एके ठिकाणी ड्रायवरला कार बाजूला घ्यायला सांगितले. आणि थेट जर्मनीच्या ऑफिसात फोन करून आपला जीव धोक्यात असल्याचे कळवले होते.

३. एकदा एक ब्रिटीश प्रोजेक्ट मॅनेजर आमच्या पुण्यातील ऑफिसमध्ये आला होता. तेंव्हा उभ्या उभ्या सहज गप्पा मारताना टीम मधला एकजण त्याला काहीतरी सांगण्यासाठी म्हणून अगदी त्याच्या जवळ गेला. हे लोक पर्सनल स्पेस विषयी फार जागरूक असतात. त्याला इतक्या जवळ आलेला पाहून ब्रिटीश मॅनेजर दचकून दोन पावले मागे गेला होता.

४. भारतीय "आयटी-जायन्ट्स कंपन्या"मधल्या कर्मचाऱ्यांविषयी हायझेनबर्ग यांनी लिहिलेले शब्द न शब्द खरा आहे. मुख्य म्हणजे हपापल्या सारखी किंवा कधीही न मिळाल्यासारखी वृत्ती. सर्वच बाबतीत. बरीच वर्षे झाली या गोष्टीला. युके मध्ये एकदा तिथल्या एका टेलीकॉम कंपनीने टेस्टिंग साठी म्हणून लॅंडलाईनवरून एका नंबरवर फोन केल्यास भारतात मोफत बोलता येईल अशी सोय ठेवली होती. बघता बघता ती बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळे भारतीय कर्मचारी काम धंदे सोडून ऑफिसमधल्या फोनवरून तासतासभर भारतात फोनवर बोलत बसले होते. काही तासातच अनेक कंपन्यांना हा नंबर ब्लॉक करावा लागला.

दुसर्‍या देशात आपल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना पाठवताना त्या कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे की सर्व डेप्युटीजना सांस्कृतिक / सामाजिक बदलांची व सेन्सिबिलीटीजची माहिती देणे. हे होत नाही व त्यामुळे वर उल्लेखलेले किस्से घडतात. अश्या सेश्याना हजर राहूनसुद्धा गाढवपणा करणारे नग आढळतीलच पण संख्या कमी होईल. बहुसंख्य लोक हे फरक समजल्यावर नीट वागू लागतात असा माझा अनुभव आहे. त्याचबरोबर तिथे असणारा मॅनेजर/टिमलिड स्वतः किती तारतम्याने वागतो त्यावरदेखील बरेच अवलंबून असते.
माझ्या दुर्दैवाने मी कँटिनमध्ये घोळक्याने मोठमोठ्याने आवाज करतात ते अगदी 'बीओ' येतो अशी चित्रविचित्र एस्कलेशन हँडल केली आहेत. त्यातली बहुतेक सर्व टिम मेंबरना समजावून सांगितल्यावर पुन्हा त्यांच्याकडूनच तश्या घटना होण्याचे प्रमाण कमी झाल्याचे आढळले आहे.

मी स्वतः आयुष्यात पहिल्यांदा दुसर्‍या देशात कामाला गेलो तेव्हा क्लायंटच्या ऑफिसमध्ये एकटाच देसी होतो, माझ्याबरोबर माझ्या कंपनीतले कोणी नव्हते. छोटा देश, त्यात छोटे खेडे. स्थानिक कर्मचार्‍यांचे वय सरासरी ५०+. सुरुवातीला चुका झाल्या, त्याचा फटका बसला तसे त्यातून शिकलो देखील. उदा. मी ८.३० ते ९च्या दरम्यान ऑफिसला पोचायचो. कारण तिथे किती वाजता या वगैरे लिहिलेले नव्हते आणि मी भारतातून ज्या ऑफिसमधून गेलो होतो तिथे ८.३०/९ म्हणजे रामप्रहरच होता. रोज मी ६.३०/७ च्या पुढेपर्यंत बसून काम करत असे. मला वाटले क्लायंट खुश असेल कारण मी काम नक्कीच पूर्ण करत होतो, जास्तच करत होतो. मात्र क्लायंटचा म्हातारा डायरेक्टर मी ८च्या आता येत नाही व ५च्या पुढे ऑफिसात बसतो या कारणाने नाखुश होता. काही महिन्यात हे माझ्या लक्षात आले, मी ८च्या आत पोचू लागलो मात्र ६च्या पुढे संध्याकाळी बाहेर पडायचो. मग त्याने एकदा मला सांगितले की आता लवकर येतोस ते चांगले आहे मात्र ५च्यापुढे देखील थांबत जाऊ नकोस Happy

एखाद्या वस्तूला, व्यक्तीला चुकून पाय लागल्यास पटकन नमस्कार करायची सवय खूप भारतीयांना असते. कुणी अमेरिकनास असा नमस्कार पहिल्यांदा घडतो तेव्हा त्या व्यक्तीचा गोंधळलेला चेहरा बघण्यासारखा असतो Biggrin त्यानंतर आपल्या देसी बंद्यानं/बंदीनं नमस्कार का करायचा वगैरे भारतीय इंग्रजीत सांगताना ऐकणं म्हणजे भयंकर हसायची मज्जा Biggrin

येईल ना, का नाही? गुलमोहर ललितलेखन ह्या गृपमधून बाहेर पडा. ज्या ज्या धाग्यांचा त्रास होत असेल त्यातून असेच बाहेर पडा.

विक्रमसिंह आणि बाकीच्या बर्‍याच जणांच्या पोस्ट्सशी सहमत.
मध्यंतरी इकडे ट्युलिप शो ला गेलो होतो. तिकडे साऊथ इंडियन गृप आला होता. ३,४ कपल्स असावीत आणि एखाद दोन लहान मुलं. पण अगदी लाज आणत होती. फुलांच्या वाफ्यांमधून चालायला पायवाट होती पण ती न वापरता फुलं ओलांडून पलिकडे जाणं किंवा फुलांच्याच मधून पाय देऊन जाणं. फुलांशेजारी आडवं होऊन यडचापासारखे हातात हात घालून फोटो काढणं वगैरे सगळा वेडेपणा चालू होता.

वरच्या अनेक पोस्टशी सहमत.
स्ट्रॉबेरी पिकिंगला गेलेलो तर वर सायो म्हणत्येय तसंच झाडांवर पाय देउन चालणे, मोठमोठ्याने बोलणे, मधेच उभे रहाणे आणि आपण कोणाची वाट अडवतोय हे गावीही नसणे, पोरं स्ट्रॉबेरीवर पाय देत आहेत तर त्यांना न अडवणे आणि आपण फोटो काढत बसणे. पैसे देउन मग नास्ता न करता ले ले करुन चिंधीगिरी करणे. वाट्टेल तसं पार्किंग करणे .... हे सगळं करण्यात गुज्जू /सौदी लोक आघाडीवर असायचे पण गेल्या खेपेत मराठीपण दिसले. Sad

>>>>खासकरून आंध्र साईडचे लोक. <<<<

“ खूपच रेसीस्ट आहे “ असे म्हणायला कोणीच आले नाही का?
Wink

......
पण भयानक बेशिस्त वागतात काही समूह, असे नमुने प्रत्येक जात-जमातीत असतातच पण अमेरीकेत असताना मला सुद्धा वरच्या राज्यातल्यांचे व कंजूष तामिळांचे सिंगापूरमधले माझे काह्री अनुभव,
मोठ्याने ढेकर देणे , ते सुद्धा लसूण वगैरे खावून.
आपल्याच भाषेत मोठ्याने मिटींग मध्ये बोलणे,
ऑफीसमध्ये दहाला येणे व आधी देशात फोन लावून जोरात बोलणे,
ऑफीसच्या पाण्याच्या बाटल्य्स घरी नेणे,
घामाचा भयानक वास, व तसा तो घामाने बरबटलेला शर्ट , मुलं/मुली काखेत असे पिवळटलेले कपडे घालून यायचे की बघायला घाण वाटायच , त्यात तो वास.
एखाद्या पार्टीत कन्ट्रुबुशन न देता घुसणे,
पायात चप्पल असे कॉन्फरेन्सला....
इतका अजागळपणा हा मला तरी ह्या दोन समूहात ज्यास्त दिसलाय. इतर राज्यातील लोकांमध्ये असतो पण अमेरीकेत, सिंगापूर ह्या देशातील हा अनुभव आहे जिथे हे समूह खोर्‍याने असतात.

इथे बर्‍याच जणांनी लिहिल्याप्रमानणे काही फुकट असेल ते पुरेपूर वसूल करणे हे होतेच, पण देसी जनतेची एक मी पाहिलेली कॉमन खोड म्हणजे घेण्यचे काम १० वेळा केले तर निदान २-४ वेळा स्वतः ही द्यावे याची जाणीव नसणे! इथे स्थानिक समाजात कम्युनिटी स्पिरिट खूप असते. " गिव्हिंग बॅक" ही कन्सेप्ट सर्वमान्य असते. चार-सहा महिन्यातुन एखाद्या दिवशी गावात स्वच्छता अभियान, गरजूंना दोन वेळेचे मोफत अन्न देणारी कम्युनिटी किचन्स, मुलांच्या शाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम, स्पोर्ट्स इव्हेन्ट्स, गावातले लोकांनी एकत्र येऊन राबवलेले सामाजिक कार्यक्रम, संमेलने असे असंख्य उपक्रम समाजच्या सर्व स्तरांवर सतत चालू असतात जे केवळ स्वयंसेवकांच्या भरवश्यावर चालतात. जी त्या त्या गावासाठी , शाळेसाठी अभिमानाची गोष्ट असते. लोक बहुधा २-३ ठिकाणी इतरांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाहुण्यासारखे गेले तर पुढच्या वेळी स्वतः हातभार लावायला जातात, इतकेच नव्हे तर आपल्या लहान मुलांना पण शक्य तिथे घेऊन जातात व्हॉलन्टियर करायला, जेणे करून त्यांनाही ती सवय पडावी. पण बहुधा देसी लोक ( अपवाद असतात अर्थात ) सोयीचा फायदा घेतात पण स्वतः कुठेही व्हॉलन्टियर करत नाहीत!

देसी लोकांची संख्या वाढली तशी आअम्च्या इथे शाळेचे बरेच स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना स्वयंसेवकांअभावी झळ बसू लागली. तेव्हा त्या त्या उपक्रमांच्या डायरेक्टर्स ना सर्वांनी स्वयंसेवय्क होणे सक्तीचे करणे, तसे न केल्यास जादाचे पैसे भरावे लागणे अशी पावले उचलावी लागली! जे लाजिरवाणे आहे. नागरिकांनी , पालकांनी स्वप्रेरणेने, कळकळीपोटी एकत्र येऊन उपक्रम राबवणे आणि सक्ती केल्यामुळे येऊन पाट्या टाकणे या दोन्ही अनुभवात सामाजिक आणि संस्कृतिक दृष्ट्या किती फरक आहे!!

चांगले प्रतिसाद आहेत. महत्त्वाचे म्हणजे कुठेही कोणी तुच्छ भाव न दाखवता संयत लिहित आहेत. आता जे आहे ते आहे. आहे तसे मांडणे गरजेचे आहे. विक्रमसिंह यांनी म्हटल्याप्रमाणे बिहेवियरगाइड बनवले पाहिजेच.

Pages