जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!

Submitted by निनाद on 1 July, 2018 - 19:09

साधारणपणे सात तारखेनंतर दुकानातली गर्दी भयंकर असायची. कारण प्रेसचे पगार व्हायचे. एखाद्या आठवड्याने गर्दी जरा कमी व्हायची. मग आई एका संध्याकाळी हाक मारायची आणि यादी करायला बसवायची. मी आमच्या दोन खोल्यांच्या घरात स्वयंपाक खोलीमध्ये पाटावर बसून वाट बघायचो. आईकडे तिने काढून ठेवलेला पाठकोरा कागद असायचा. मी खाली धरायला वही घेऊन पेन्सिलिने यादी करायला सुरुवात करायचो.

हं लिही,
स्वच्छ मोहोरी शंभर ग्रॅम.
जिरे पन्नास ग्रॅम, त्याला सांग काड्या नकोत!
हरबरा डाळ एक किलो, स्वच्छ हवी, मागच्यावेळी पिवळे खडे निघाले होते.
मुगाची डाळ एक किलो
गुळ अर्धा किलो
शेंगदाणे अर्धा किलो, खवट नको. नाहीतर आई परत करायला येईल म्हणावं!
खोबरे पाव किलो - वास अजिबात नको.
असे सगळे सांगत सांगत यादी तयार होत असे.
यादी व्यवस्थित खिशात ठेव. सुरेशला सांग की सगळे व्यवस्थित दे, नाहीतर आई येईल. अशा सगळ्या धमक्या माझ्याकडून वदवल्या जात.
शेवटी मी न रहावून विचारेच, आई बिस्किट?
बरं लिही एक पारले!

तोवर पाटावर बसून यादी लिहिल्याने घातलेली मांडी दुखायला लागत असे. कारण आईची यादी ही प्रत्येक जिन्नस किती शिल्लक आहे हे पाहत पाहत चाले.

मग तेल.
तेलाची आमच्याकडे एक किटली होती. आई तेल संपत आले की उरलेले तेल एका बुटल्यात काढून ठेवत असे आणि मग धुवून वाळवलेली किटली माझ्या हाती येत असे.

सगळी यादी एकदा वदवून सुचना पाठ झाल्या आहे की नाहीत हे पाहून मग आमची स्वारी बाहेर पडे. पैसे वगैरे मिळत नसत. आई ते परस्पर सुरेशला देत असे.

घराबाहेर दादांची त्यांनी त्यांच्या तरुणपणात वापरलेली एक हिरव्या रंगाची सायकल उभीच असे. ही सायकल आजच्या दिवशी मला मिळे.
मग हँडलला पांढर्‍या तिन-चार पिशव्या एकाबाजूला आणि चकचक करणारी धुतलेली किटली दुसर्‍या बाजूला अडकवून मी सायकल घेऊन निघे.
शाहू पथावरून पुढे गेले की साठेबाईंचे घर. त्यासमोर डॉ बर्जेंचा पांढरा रंग दिलेला सुरेख टुमदार बंगला. मग निळ्या रंगात रंगवलेले भंडारी भुवन लागे. पुढे उजव्या बाजूला वळून गेले वास्को हॉटेल लागत असे. त्या चौकात एक खुप छान छोटीशी बाग होती. त्या बागेला उगाच एक फेरी मी मारत असे.

मग एक छोटा रस्ता घेऊन मी सुरेशकडे पोहोचत असे. एका बाजुला सायकल लावून किटली आणि पिशव्या घेऊन दुकानाबाहेर मी उभा रहात असे. दुकानात बहुदा अजुनही गर्दी असेच. पण मला पाहिले की तो हात लांब करून यादी हातातून घेत असे. मी आई ने दिलेल्या सगळ्या सुचना घडाघडा म्हणून दाखवे. त्याकडे त्याचे बहुदा लक्ष नसेच. कारण तो पटापट वर्तमानपत्राचे कागद फाडून मोहोरी बांधण्यात गढलेला असे.
या पुड्या कागदात बांधल्यावर त्यावर तो ज्यावेगाने दोरा गुंडाळून गाठ मारत असे ते अगदी मी पाहात बसे.
एक मोठा दोर्‍याचा बिंडा छताला अडकवलेला असे आणि त्यातून दणादण दोरा काढून भराभर पुड्या बांधल्या जात. जर दोन किलो पेक्षा मोठी मागणी असेल तर धान्य सरळ पिशवीमध्येच ओतले जायचे. महिन्याचे दोन किलो तेल किटली मध्ये ओतले जायचे. हे तेल पण एका मोठ्या पिंपातून काढून किटलीत यायचे.
गुळाच्या भेल्या असत. त्या फोडायला एक पहार आणि पाच किलोचे माप असे. योग्य तेव्हढा गुळ फोडून कागदात बांधला जायचा.

दोरा बांधलेल्या या पुड्या पिशव्यात भरून मी त्या सायकल च्या हँडल अडकवायचो. एका बाजूला तेल भरलेली किटली असायची. आता जड झालेली सायकल हातात घेऊन हळूहळू चालत घरी याचो. पिशवी मध्ये मेणकागदाच्या पॅकेजिंग मधला बिस्किटाचा पुडा अगदी अलगदपणे वर ठेवलेला असायचा.

घरी आल्यावर सगळे किराणामालाचे सामान डब्यात भरले जायचे. काही पितळी डबे होते, काही पारले बिस्किटांचे होते. सगळे जिन्नस जागच्या जागी जात. मग कागदांचा एक छोटा ढीग व्हायचा. त्यावरच्या बातम्या वाचून झाल्या की परत रद्दीमध्ये जायचा. दोर्‍यांचा एक मोठा गुंडाळा असे त्याला सगळे दोरे बांधून ठेऊन दिले जायचे. हेच दोरे मला पतंग उडवताना मिळायचे.

आता या सगळ्यात प्रश्न असा आहे की

यात प्लास्टिक कुठे होते?
कुठे आवश्यक होते?
अचानक कसे इतके प्लॅस्टिक आवश्यक झाले आणि आपण इतके यात गुरफटून बसलो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचायला छान वाटलं.
स्वयंपाकघरातले पाट जाऊन डायनिंग टेबल आणि खुर्च्या आल्या, त्यांच्यासोबतीने प्लास्टिकही आलं. सायकल जाऊन स्कूटर आली.

मस्त आठवण करून दिलीत. विशेषतः दुकानात वरती अडकवलेल्या सुताच्या गुंड्याची. ही वस्तू मी विसरूनच गेले होते. लहानपणी तो गोल गोल फिरणारा गुबगुबीत गुंडा बघायला मला खूप आवडायचं.
प्लॅस्टिक आलं ते आयुष्य सोयीस्कर करण्यासाठी. हे जे तुम्ही लिहिलं आहे, की जिर्यात काड्या नकोत, मोहरी स्वच्छ हवी, वगैरे, ते तसं आहे की नाही हे स्वतः पाहून घेण्याची सोय सुपरमार्केटांमुळे आली आणि त्याबरोबरच प्लॅस्टिकच्या पिशव्या अपरिहार्यपणे आल्या. किराणा दुकानदारांनापण मग पुडीला दोरा गुंडाळत बसण्यापेक्षा प्लॅस्टिक पिशवीत माल देणं सोयीस्कर वाटू लागलं.
कालची चैन ही आजची सोय आणि उद्याची गरज होऊन बसते. कितीतरी उदाहरणं आहेत. लहान मुलांचे डायपर्स, सॅनिटरी पॅड्स, पाण्याच्या विकत मिळणाऱ्या बाटल्या, या सगळ्यात प्रचंड सोय आहे. हळूहळू त्या गरजाच बनल्या आहेत. परत मागे जायचं ठरवलं तर कष्ट आणि कटकट बरीच वाढते जी आपल्याला नको वाटते.
मला प्लॅस्टिक वापराचं समर्थन मुळीच करायचं नाही. उलट प्लॅस्टिक आणि इतर use and throw वस्तू कमीत कमी वापराव्यात अशाच मताची मी आहे.

आवडले लिखाण

परत मागे जायचं ठरवलं तर कष्ट आणि कटकट बरीच वाढते जी आपल्याला नको वाटते. वावे +१

खुप छान.. सवयी.. लावाव्या तश्या लागतात.. इथुनच घ्यायच अन परत इथेच मातीला द्यायच.. हेच बहुदा सगळे विसरले.. मी पण कितीतरी वेळा पिठाचा डबा घेवुन चक्कीवर गेलेय... त्या चक्कीवर गेलं की मला ते गाणं आठवायच.. कशी झोकात चालतीय गिरणी.. Happy

खूप छान लिहिलेय, आवडले.

मागे जाणे नको, गैरसोयीचे हे कागदावर पटते पण माणूस नावाचा राक्षस इतका भयंकर आहे की त्याने प्रत्येक सोयीचा गैरफायदा घेतला. त्यामुळे त्याला मागे ढकलून बुडावर बांबू मारल्याशिवाय त्याच्या हातून काही होत नाही. एवढे करूनही तो सुधारणार नाहीच. उद्या बंदी मागे घेतली तर परत आहे तेच सुरू होणार.

प्लॅस्टिकबंदीचा टेबलाखालून लाभ कुणाला होणार हे क्षणभर बाजूला ठेवूया, आज प्लॅस्टिकबंदीमुळे गैरसोय झालेला प्रत्येकजण उद्या सरकारने ही बंदी मागे घेतली तर प्लास्टिकचा गैरवापर टाळणार आहे का? प्लास्टिक कचरा चुकीच्या ठिकाणी टाकणार नाही याची जबाबदारी घेणार का? शंभरातील 90 जणांनी ही जबाबदारी घेतली तर फरक पडेल. प्रत्यक्ष चित्र 10,000 त एकजण ही जबाबदारी आपली समजतो हे आहे.

रच्याकने, धान्य, भाजीपाला साफ करून ,प्लॅस्टिकमध्ये पॅक करून देण्याच्या सोयींमुळे उत्पादक ते ग्राहक यामधली साखळी लाम्ब होत गेली. त्यामुळे किंमती वाढल्या पण वाढत्या किंमतीचा फायदा उत्पादकाला मिळणे कमी झाले.

छान.
आवडलं.

तुम्हाला संपर्कातून एक ईमेल पाठवलं आहे. कृपया वाचून उत्तर द्यावे ही विनंती.

खूप आवडले लिखाण Happy .
या पुड्या कागदात बांधल्यावर त्यावर तो ज्यावेगाने दोरा गुंडाळून गाठ मारत असे ते अगदी मी पाहात बसे.
एक मोठा दोर्‍याचा बिंडा छताला अडकवलेला असे आणि त्यातून दणादण दोरा काढून भराभर पुड्या बांधल्या जात.>>>>> अगदी अगदी .
आम्हीही पूडीचा देरा नीट सोडवून दूसरीकडे गुंडाळून ठेवत असू .

कागदकाळातल्या काही आठवणी म्हणजे , कागदाच्या पूड्यात बांधून मिळणारे समोसे , ती केशरी चटणी पण कागदात बांधून मिळायची .
आणि दूसरी म्हणजे आजीकडे असलेल्या पूडीतल्या पेपरमिन्टच्या गोळ्या Happy
मेणकागदातली बिस्किटे , पूट्ठ्याच्या बॉक्समध्ये मिळणारी बर्बॉन ची दिस्किटे , कोलगेटची पत्र्याची ट्युब , जी लाटण्याने दाबून दाबून संपवावी लागे .
प्लॅस्टिकबंदीचा फायदा कोणाला आणि किती ही नक्की विचारकरण्याची गोष्ट आहे पण हल्ली सगळीकडे कापडाच्या पिशव्या घेउन फिरणारी लोक बघितली की मज्जा वाटते .
आपण आपल्यापूरती तरी सुरुवात करावी हे नक्की .

{धान्य, भाजीपाला साफ करून ,प्लॅस्टिकमध्ये पॅक करून देण्याच्या सोयींमुळे उत्पादक ते ग्राहक यामधली साखळी लाम्ब होत गेली. त्यामुळे किंमती वाढल्या पण वाढत्या किंमतीचा फायदा उत्पादकाला मिळणे कमी झाले.}

किंमती वाढल्या कारण ग्राहकाचा साफ करायचा त्रास वाचला. आता या साखळीत जो साफ करायची सेवा पुरवणार तोच किंमतीमधला फरक मिळवणार ना. उत्पादकाने जर अतिरिक्त सुविधा पुरवली नाही तर वाढत्या किंमतीचा फायदा उत्पादकाला का मिळावा?

पुडीचा दोरा किती दिवसांनी शब्द ऐकला.. आमचेकडे हा दोरा देवांना फुलांचे हार करायला वापरला जायचा.
लेख आवडला.. Happy खरोखर तेव्हा प्लास्टीक फारसे दिसायचे नाही..

मस्त लेख. आवडला.

परत मागे जायचं ठरवलं तर कष्ट आणि कटकट बरीच वाढते जी आपल्याला नको वाटते. >>> यात मागे जाणं कुठंय? पुढेच तर जायचय - चांगल्या पर्यावरणाकडे.

बहुतेक बदल हे त्रासदायकच असतात पण आपले भले कशात आहे ते कळले तर ते स्विकारले जातात.

लेख खरच खूप छान आहे. प्रचंड आवडला.
आम्ही पण आमच्या लहानपणी फक्त दुध पिशवीतून मिळत असे. बाकी तेल, साखर इ. आम्ही किटली आणि पुड्यांमधूनच आणायचो.

खूप छान लेख... जुन्या आठवणींना उजाळा... प्रतिसादही छान आलेत...

छान लेख. मी हे सर्व केलेले आहे. पुडीचा दोरा यस्स गुंडाळून ठेवायचे काम माझे असे. बारके बारके सामान पण मी लावून डब्यात ठेवायची. पितळेचे डबे. तीन सहा महिन्यांनी चिंच लावून घासायचे. व सर्व वस्तू स्टीलच्या. चाळण्या गाळणी वगैरे स्टीलचे नाहीतर इतर मेटलचे. दशको दशके वस्तू घरात ठेवलेल्या . आई व मी घासत असू. अजून तो चिंच प्लस राखेचा वास डोक्यात आहे.

दोरे सुतळी पण जमवून ठेवायचो व वापरायचो. तुम्ही पार्ले लिहिलेत तसे वर्शातून एक दोनदाच प्लास्टिकच्या पाकि टातल्या चिप्स मिळत. वेफर्स!!!

एक धाकट्या काकू प्लास्टिकच्या वस्तू आणून वापरत त्यांच्या घरी गेले की हे किती मॉ डर्न आहेत असे फील यायचे.

मला प्लास्टिक व टपर वेअर चा काहीच सोस नाही. ती क्रेज आली तेव्हा ह्ये काय असे झाले होते.

फारच पूर्वी. प्लास्टिकचे रंगीत रिब्बन कडेने कातरून एका स्क्रंची मध्ये घालून केसात माळत प्लास्टिकचा गजरा.
रोज अबोली, मोगर्‍या जुईचे गजरे करून माळ णार्‍या बहिणीं एकदा हे प्लास्टिकचे फूल बघून खूप हसल्या होत्या.
फुलांचे गुच्छ पण विदाउट प्लास्टिक व रिबन येत.

घरातील सर्व अप्लायन्सेसना, सोफ्या ला टेबलाला प्लास्टिकचे टिकाउ कवर्स घालाय्ची पण एक मध्यमवर्गीय फॅशन होती. ती आमच्या माहेरी व नंतर माझ्याकडे कधी आली नाही. त्यापेक्षा वस्तू पुसून साफ करते मी.

लेख छान आहे. पण त्यावेळची इतर life style आहे का आत्ता ? ती पण अंगीकारा आणि मग प्लॅस्टिक नको म्हणा. ती तयारी आहे का ? आणि वर्तमान पत्राची शाई कुठे चांगली असते?

मी खर तर प्लॅस्टिक फार वापरत नाही पण तरी ही बंदी मला अव्यवहार्य वाटते.

वावे + 111

आम्ही स्वतः प्लास्टिक केवळ टिफिन्साठी वापरायचो, आता काचेचे आलेत, पण कवर अजुन प्लास्टीक आहेच Uhoh

बाकी पिशव्या कापडी किंवा रेग्झिनच्या. रेग्झिन पण धोकादायक का? माशे - मटणासाठी नायलॉनसदृश कपड्याच्या.

मी लहान असताना दुध काचेच्या बाटलीतून्नच यायचं. दही, इडलीचं पीठ आणायची पद्धतच नव्हती.

आम्ही तर उन्हाळा सोडता पंखाही वापरत नसू. कुलर, एसी ची गरजही नव्हती. उन्हाळ्यातलं तापमान दाखवायचे भारताच्या नकाशातल्या चार शहरांचं आणि मग महाराष्ट्रात मुम्बई, पुणे, नागपूर. मुम्बई ३४ - ३६ म्हणजे डोक्यावरून पाणी. नागपुरकरांकडचे, दिल्लीश्वरांचे ४२ मला मुम्बईत बसून लै वाटायचे .

लहानपणी काय काय रिसायकल करायचो ते आजकाल कोण्णी करत नाही. आम्ही वाया घालवतो कारण आम्हाला परवडतं असा काहीसा माज करतात लोक्स. Uhoh

यात मागे जाणं कुठंय? पुढेच तर जायचय - चांगल्या पर्यावरणाकडे.>> बरोबर आहे. पण काळाच्या दृष्टीने आपण स्टील/लोखंड/ कागद /कापड या मटेरियलकडून प्लॅस्टिक या सर्वव्यापी मटेरियलकडे आलो आहोत. आधी आणि नंतर या अर्थाने मी मागे जाणं असं म्हटलं.

आमच्या लहानपणी मायबोली आणि व्हाट्सअप नव्हते त्यामुळे भरपूर मोकळा वेळ असायचा पुडीचे दोरे बांधण्यापासून ते डब्बे भरण्यापर्यन्त सर्व काम करायला ! पण आता Uhoh
--------
खरं पाहता प्लास्टिक वापरायला इतर पर्याय नाहीच.

छान जमलाय लेख.
अगदी असच लहानपणी अनुभवलय. आत्ता आत्ता पर्यंत, प्लास्टिक वस्तू मध्ये खाणे पिणे होत नव्हते.

सही लिहिलंय.. अगदीच सारे रिलेट नाही झाले.. पण काही झाले आणि काही नाही ते सुद्धा आवडले.

प्लास्टीकबाबत काय बोलावे?
लोकांना एखादी गोष्ट वापारायची सवय लागली तर ते व्यसनासारखेच असते. तिथे आरोग्याला त्रास होतोय हे समजूनही लोकं सोडत नाहीत. मग ईथे पर्यावरणाचा र्हास होतोय म्हणून सोडतील का..
प्लास्टीकबंदी यशस्वी व्हावी असे वाटत असेल तर कमीतकमी त्रासाचे पर्याय हवेत.

Pages