क्षण वेचताना-4

Submitted by व्यक्त अव्यक्त on 30 June, 2018 - 04:15

फडताळ आठवणींचे

काही क्षण अगदी आपल्या आसपास वावरून पसार होतात. आठवणींच्या दावणीला त्यांना बांधावे म्हटले तर कधी ए कदम घट्ट निरगाठ बसते, जी सुटता सुटत नाही.

कधी निसर गाठ बनते जी काळाच्या थोड्याश्या हिसक्यानिशी सुटून जाते. मग असे क्षण कुलूपबंद करण्यासाठी माझ्यापाशी एकच मार्ग राहतो, तो फडताळात बंदिस्त करण्याचा.

फडताळ म्हटल्यावर डोळ्यांसमोर उभा राहतो तो कपाटसदृश्य,3 किंवा 4 खणांचा भिंतीच्या अंगातला कप्पा. लाकडी कपाट किंवा गोदरेजचं कपाट ही फार नंतरची चैन असण्याच्या काळातील हे भिंतीतील कपाट 

खोलीतील फडताळात कुंकू, टिकली, पावडर, सुईदोऱ्याचं सामान , असं बरंच किडुकमिडुक सामान असे त्यात. जुन्या बैठ्या घरातला लुसलुशीत अंधार, त्याला सरावू पाहणारे, बाहेरचा उजेड पिऊन आलेले आपले डोळे फडताळात हव्या त्या वस्तूचा शोध घेण्यात गुंतलेले. अश्या वेळी खिडकीतून येणाऱ्या उन्हाच्या कवडश्यांचा जरा आधार वाटे. नकळत आसपासची खुंटी, कोनाडा, ही मंडळी प्रकाशाशी सलगी करत अन हवी ती गोष्ट सापडून जाई.

    माजघरातील फडताळ हे एक वेगळे प्रकरण असायचे. खाऊचे डबे, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवण्याचे ते एक हक्काचे ठिकाण होते.ते फडताळ उघडताना त्यातील पदार्थांचा व भोवतीच्या हवेचा, चुलीत पेटत असलेल्या निखाऱ्यांचा, वैलावर तापत असलेल्या दुधातल्या हळदीच्या पानाचा एक मिश्र घमघमाट येतो, तो आजही तो शब्द उच्चारल्यावर मनातल्या मनात मी नाकात भरून घेते.

    फडताळाप्रमाणेच भिंतीजवळचा कोनाडा म्हणजे घरातल्या साऱ्यांचा मोलाच्या वस्तू जपून ठेवायचा हक्काचा कोपरा. सहज जाता जाता काही वस्तू मिळावी अन ती विश्वासाने कोनाड्याकडे सुपूर्द करावी.त्याच विश्वासाने एखादी काळजीपूर्वक जपून ठेवायची वस्तूही बाळगणारा विश्वासू सोबती.कोनाड्यातली चिमणी जी आपल्या चिमणिएव्हढ्या जिवाने घर उजळे, तिच्यासाठी जागा जपणारा.

त्याची बहीण खुंटी, थोडं उंचावरचं अढळ स्थान पटकावून असलेली.सदैव नम्र. दिसायला नाजूक अगदी घरच्या कारभारणीसारखी, हिला पेलतंय न पेलतंय असं वाटेस्तोवर जबाबदाऱ्या समर्थपणे पेलनारी. कर्त्यापुरुषाची वजनदार पिशवी असो वा शाळेतल्या बाळूच दप्तर, दोन्ही काळजीपूर्वक जपणारी व अभिमानाने मिरवणारी. घराच्या जुन्या घट्ट मैत्रिणीसारखी, प्रसंगी आधार देणारी.

  घराची ही जुनी जाणती मंडळी जेवढी चिवट, तेवढंच घरासमोरचं अंगणही लवचिक बने. लग्नसराईमध्ये मांडव पेलून  हळदीच्या अंगाचं बने. सुट्ट्यांमध्ये खेळायला येणाऱ्या पोरांच्या चिखलपायांचं बने.मधेच पोर धडपडलं की आईच्या कळवळणाऱ्या जीवाचं बने.उन्हाळ्यात सुकत घातलेल्या रंगीबेरंगी वाळवणाच बने.

   घरात येणारा आगंतुक येई, तो याच अंगणातून. अंगणाच्या मेरेपाशीच खणखणीत आवाजात सादवणारी त्याची बोली घराला मोह पाडे. शेलक्या शब्दांत केलेला उद्धार, प्रेमळपणे वाहिलेल्या लाखोल्या घर काना आड करे, अन ओट्यावर बसायला त्याला सावली देई. आपुलकीचा मान नेहमीच उंबरा ओलांडून आत जायचा असे.मुखदर्शनी जमदग्नी वाटणारी ही मुलखावेगळी माणसं, त्यांची ती भाषा, अन तोंडदेखलं लहानसं वाटणारं पण आतून मोठया काळजाच ते जुनं घर

    आता ते जुनं घर नाही, घरापुढं असलेलं अंगण तर काळाच्या ओघात मागे पडलं. वळचणीतून आत येणाऱ्या चुकार पागोळ्याही नाहीत.पडवी व ओटा तर आक्रसून गेले मुळी. मायेचं असं वावर विस्कळीत झाल्यावर शब्दही कुठले ठिकाणा देऊन रहायला ?

  वस्तूंची घडणावळ बदलली, शब्द बदलले, माणसेही कदाचित बदलायच्या मार्गावर आहेत. दोन पिढ्यांतले दळणवळण म्हणण्यातले मजेशीर वळण जाऊन उसनी घेतलेली परकी भाषा रूढ झाली. निखाऱ्यावर फुलणाऱ्या भाकरीवर येणाऱ्या पापुदऱ्याप्रमाणे भाषेतल्या शब्दांवर मायेचे पापुद्रे आता येत नाहीत, अतिपरीचयाचे बटर लावले जाते.

वाक्यावाक्याला डिअर चे पालुपद जोडले जाते. रांगड्या भाषेतला गोडवा त्यात नाही.

वाक्यावाक्याला आगंतुक कौतुकाचा अत्तर फवारा मारला गेला की भावना परक्या वाटू लागतात. मग मी हळूच माझ्या मनातल्या त्या फडताळाच दार उघडते अन खोल भरभरून श्वास घेते. थोड्याश्या कुरकुरणार्या कड्या बिजागरांचा होणारा आवाज कानात साठवून घेते.जुन्यानव्याचा फेर धरला जातो अन लहानपणीच्या त्या आजीच्या जुन्या घराची सय येत रहाते.
© सिद्धी नितीन महाजन

Group content visibility: 
Use group defaults