पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - १३. बीस साल बाद (१९६२)

Submitted by स्वप्ना_राज on 30 June, 2018 - 10:13

रात्रीची वेळ. एक भव्य हवेली.

‘मै नही मानती. तुम कुछ भी कह लो' एका स्त्रीचा आवाज.
‘खामोश' एका पुरुषाचं दरडावणं

मग एक जमीनदार, त्या हवेलीचा मालक बाहेर पडतो. बाहेर मिट्ट काळोख. दाटलेलं रान. पैंजणाचा आवाज. त्या आवाजाचा मागोवा घेत तो चाललाय. एका क्षणी तो कॅमेराला पाठमोरा होतो आणि त्याच्या मागे आपल्याला एक हात दिसतो.....मोठमोठी नखं असलेला. मग एक किंकाळी ऐकू येते. आणि त्या किंकाळीतच आगगाडीच्या इंजिनाच्या शिट्टीचा आवाज मिसळतो.

१९६२ सालच्या 'बीस साल बाद' ची ही रोमांचक सुरुवात. निर्माता हेमंत कुमार आणि दिग्दर्शन बिरेन नाग. ही कहाणी आहे चंदनगढच्या ठाकूर घराण्याची आणि त्या घराण्याला असलेल्या शापाची. अपरात्री ट्रेनने चंदनगढ स्टेशनवर उतरणारा तरुण असतो ह्या घराण्याचा शेवटचा वंशज कुमार विजयसिंह. हत्या झाली तो कुमारचा काका. काकाच्या हत्येनंतर कुमार आपल्या पिढीजात हवेलीत येतो. स्टेशनवर जेव्हा तो पोर्टरला हवेलीत जायचं आहे असं सांगतो तेव्हा पोर्टर त्याला म्हणतोही की त्या भुतिया हवेलीत आता काय ठेवलंय? तिथल्या घराण्याचा तर शापामुळे निर्वंश झालाय. तेव्हढ्यात स्टेशनबाहेर एक बग्गी येऊन थांबते. कुमारला न्यायला डॉक्टर पांडे आलेले असतात. त्यांच्याशी बोलताना कुमारला कळतं हे खून कोण करतंय हे शोधून काढायला ठाकुरांनी १०००० रुपयांचं इनाम जाहीर करूनही काही फायदा झालेला नसतो. माझाही खून झाला तर इस्टेट कोणाला मिळणार हे जेव्हा कुमार विचारतो तेव्हा डॉक्टर मोकळेपणाने सांगून टाकतात की त्याच्या काकांनी केलेल्या मृत्यूपत्राद्वारे ती त्यांनाच मिळणार असते. पण काही दिवसांपूर्वी मोहन इस्टेटीतला वाटा मागायला कुमारच्या काकांकडे आला होता. मोहनच्या वडिलांचं कुमारच्या आजोबांसोबत हाडवैर असतं. डॉक्टर कुमारला सांगतात की त्याने चंदनगढला यावं असं त्यांना अजिबात वाटत नव्हतं कारण इथे त्याच्या जीवाला धोका आहे.

कुमारला हवेलीत सोडून डॉक्टर निघून जातात. हवेलीत फक्त एक जुना नोकर लक्ष्मण राहिलेला असतो. तो कुमारला सांगतो की बाकीचे सगळे नोकर शापाच्या भीतीने काम सोडून पळून गेलेत, मीपण जाणार आहे पण तुम्ही येईपर्यंत थांबलो. दुसर्या दिवशी सकाळी कुमार गावात फिरायला निघतो तेव्हा त्याची भेट राधाशी होते. राधाचे काका रामलाल गावातले वैद्यजी असतात. त्यांच्या घराजवळच कुमारला मोहनसुध्दा भेटतो.

त्या रात्री कुमारला कोण्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज येतो. पण एक दरवाजा बंद होतो आणि तो आवाज थांबतो. तिथे असलेलं एका स्त्रीचं चित्र कुमार निरखत असताना त्याला पैंजणाचा आवाज येतो आणि शब्द ऐकू येतात 'कोई नही बच सकता'. जोराच्या वार्याने ती तसबीर पडते. तेव्हा तिथे आलेला लक्ष्मण त्याला शापामागची कहाणी सांगतो. वीस वर्षांपूर्वी कुमारचे आजोबा त्यांच्या भावाच्या मृत्यूनंतर जमीनदार होतात आणि गावातल्या मुलीबाळींवर वाईट नजर ठेवायला सुरुवात करतात. ते रामपूरच्या मुखियाच्या मुलीला तिच्या लग्नाच्या दिवशीच पळवून आणतात. पण ती निसटते. जमीनदारचे नोकर तिचा पाठलाग करतात. त्याच्या तावडीतून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात कड्यावरून पडून ती मरते. आणि तेव्हापासून रोज रात्री तो पैंजणाचा आवाज ऐकू येतो जो जमीनदार घराण्यातल्या पुरुषांना जंगलात असलेल्या दलदलीजवळ घेऊन जातो....त्यांच्या मृत्युपाशी. आधी कुमारचे आजोबा, मग त्याचे वडील आणि नंतर काका ह्या शापाला बळी पडलेले असतात. आता फक्त एक वारस उरलेला असतो – कुमार. ते चित्र त्याच मुखियाच्या मुलीचं असतं आणि घराण्यातल्या कुठल्याही पुरुषाने पुन्हा तसली चूक करू नये म्हणून ते तिथे लावलेलं असतं. त्या रात्री कुमारलाही तो पैंजणाचा आवाज ऐकू येतो तेव्हा मात्र तो ह्या सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायला आपण रात्री दलदलीजवळ जायचं असं ठरवतो.

दुसर्या दिवशी सकाळी तो राधाच्या काकांकडे जातो तेव्हा आपला हा निर्णय तो त्यांना सांगतो. त्या रात्रीपासून पैंजणाच्या आवाजासोबत एक गाणंही ऐकू येऊ लागतं आणि अतृप्त आत्म्याच्या भीतीने गावात जबरदस्त दहशत पसरते. गावात खुन्याचा शोध घ्यायला आलेला डिटेक्टीव्ह गोपीचंद लक्ष्मण रात्री हवेलीच्या गच्चीतून कोणाला तरी कंदिलाने इशारा करत असल्याचं कुमारच्या निदर्शनास आणून देतो. कुमारचा कोट घातलेल्या कोणा अज्ञात व्यक्तीचा दलदलीजवळ खून होतो. राधा कुमारला गाव सोडून जायची विनंती करते पण कुमार नकार देतो. राधा आणि कुमारचं प्रेम फुलू लागतं पण ठाकुरांच्या घराण्याला असलेल्या शापापायी राधाचा जीव जाईल ह्या भीतीने तिचे काका तिला कुमारला भेटायला बंदी घालतात. रात्री अपरात्री गाणं ऐकून दलदलीजवळ फिरणार्या कुमारच्या हाती काहीच लागत नाही आणि दिवसेंदिवस हे गूढ अधिकच गहन होत जातं.

काय होतं राधा आणि कुमारच्या प्रेमाचं? ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण होते का ठाकुरांच्या घराण्याला असलेला शाप निष्पाप राधालाही भोवतो? लक्ष्मण कोणाला इशारा देत असतो? गावात औषधालाही रुग्ण नाही असं म्हणणारे डॉक्टर पांडे रोज रात्री दलदलीजवळ काय करत असतात? एका डोळ्यावर पॅच लावलेली व्यक्ती कोण असते? रात्री हवेलीत कोण रडत असतं? कुमारला रात्री हवेलीत एक स्त्री धावत जाताना दिसते ती कोण असते? दलदलीजवळ रोज रात्री कोणाच्या गाण्याचे सूर ऐकू येतात? पैंजणाच्या आवाजाचं रहस्य काय असतं? कोण करत असतं जमीनदारांचे खून?

वेताळाने राजा विक्रमाला हे सर्व प्रश्न विचारले असते तर त्यानेही वेताळाला उत्तरं मिळवण्यासाठी हा चित्रपट पहा असाच सल्ला दिला असता. Happy त्यामुळे रहस्यप्रधान चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पहा. सध्याच्या पावसाळी हवेत वाफाळता चहा आणि गरमागरम कांदाभज्यांची प्लेट मात्र जवळ ठेवायला विसरू नका. Happy ज्यांनी हा चित्रपट आधीच पाहिलाय किंवा ज्यांना पाहायचाच नाहीये त्यांनी पुढे वाचायला निदान माझी तरी काही हरकत नाही Wink

विकीपिडीयावर हा चित्रपट १९५१ सालच्या हिट बंगाली चित्रपट 'जीघंसा' (जो मुळात सर ऑर्थर कॉनन डॉयल यांच्या ‘The Hound Of The Baskervilles’ वर बेतलेला होता) चं रुपांतर आहे असं म्हटलंय. तसंच हेमेंद्रकुमार रॉय ह्यांच्या 'Nishithini Bivishika’ ह्या कादंबरीचाही उल्लेख आहे. मी तो बंगाली चित्रपटही पाहिलेला नाही आणि ती कादंबरीही वाचलेली नाही. मला तरी हा चित्रपट नेहमीच ‘The Hound Of The Baskervilles’ वर बेतलेला वाटतो. कंदिलाचा इशारा करणारा नोकर, दलदल, कुमारचे कपडे घातलेल्या व्यक्तीचा खून हे सगळं तंतोतंत डॉयलच्या पुस्तकातल्यासारखंच आहे. असो. हमे आम खानेसे मतलब. गुठलिया कायको गिननेका?

तर आता चित्रपटाच्या कास्टबद्दल. कुमार विजयसिंहच्या भूमिकेत आहे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या ख्यातनाम अभिनेत्यांपैकी एक नावाजलेला निष्णात अभिनेता - विश्वजित. खुर्चीतून पडलात का? उठा, उठा. मी गम्मत केली. पुन्हा ट्राय करू. तर कुमार विजयसिंहच्या भूमिकेत आहे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या आद्य ठोकळ्यापैकी एक ठोकळा - विश्वजित. हे लेखात आधी सांगितलं असतं तर बर्याच लोकांचा हा चित्रपट बघायचा उत्साह आधीच आटला असता एव्हढी ह्या बंगालीबाबूंची अभिनयक्षमता अचाट आहे. मला विश्वजितला पाहिलं की का कोणास ठाऊक पण रामदास पाध्येंच्या अर्धवटरावची जाम आठवण होते. अर्थात अर्धवटराव बाहुला असूनही थोडीफार अ‍ॅक्टिंग करतो हा मुद्दा वेगळा. विश्वजितला पडद्यावर पाहणं हा अत्यंत तापदायक अनुभव आहे हे ज्याने तो ताप अनुभवला आहे त्यालाच कळेल. तुम्हाला अजून तो योग (!) आला नसेल तर त्याचा एखादातरी चित्रपट अवश्य पहा. घराण्याला असलेल्या तथाकथित शापावर विश्वास नसलेला पण डोळ्यासमोर घडणार्या अतर्क्य घटनांचं मूळ कारण शोधता येत नसल्याने गोंधळलेला, काहीसा धास्तावलेला, तरीही जीव वाचवण्यासाठी गाव सोडून निघून जाणं मंजूर नसलेला, राधाच्या प्रेमात पडलेला उच्चशिक्षित उमदा कुमार त्याने कमालीचा सपाट रंगवलाय. त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट एव्हढीच की ह्या चित्रपटात त्याला गिटार किंवा तत्सम वाद्य वाजवायला (की बडवायला?) मुळीच स्कोप नाही. मला रहस्यप्रधान चित्रपट मनापासून आवडतात म्हणून मी त्याला सहन करून हा चित्रपट पाहिला पण तरी शेवटीशेवटी तो लांब नखंवाल्या बोटांच्या हाताचा मालक ह्याला एकदाचा उडवेल तर आपण (आणि राधा!) सुटू असा विचार मनात आलाच.

वहिदाला राधाच्या भूमिकेत कुमारवर प्रेम करणं, बकर्या चारणं आणि काकाला मस्का लावणं ह्यापलीकडे अभिनयाला फारसा वाव नाही. पण गावातल्या मुलीचा अल्लडपणा, कुमारच्या प्रेमात पडल्यावर त्याच्या काळजीने तिची होणारी तगमग, काकाने त्याला भेटायला बंदी घातल्यावर होणारी कुतरओढ ह्या सार्‍या छटा तिने सहजगत्या रंगवल्या आहेत. डॉक्टर पांडेच्या भूमिकेत मदन पुरी आणि मोहनच्या भूमिकेत सज्जन (ह्याला माझी पिढी राजा विक्रम झालेल्या अरुण गोविलला वात आणणारा वेताळ म्हणून ओळखते!) भाव खाऊन जातात. मनमोहन कृष्णने राधाचा प्रेमळ काका रामलाल एव्हढ्या खुबीने वठवलाय की त्याच्या कपटीपणाची अजिबात शंका येऊ नये. अनेक वर्षांपूर्वी मी जेव्हा हा चित्रपट प्रथम पाहिला होता तेव्हा तो खुनी असल्याचं कळल्यावर चकित झाले होते. असित सेनचा गोपीचंद जासूस भारतीय रहस्यप्रधान चित्रपटात mandatory असलेली हलकीफुलकी बाजू बर्यापैकी सांभाळतो.

चित्रपटातली गाण्यांना संगीत हेमंतकुमारचं, आवाज लतादीदींचा आणि शब्दसाज शकील बदायुनीचा एव्हढं सांगितलं म्हणजे ती अत्यंत श्रवणीय आहेत हे वेगळं सांगायला नको. त्यातलं माझं सर्वात आवडतं गाणं म्हणजे अर्थात 'कही दीप जले कही दिल'. रात्रीचा मिट्ट काळोख, किर्र रान, कमरेइतक्या उंचीचं गवत, त्यातून वळत जाणारी वाट आणि सोबत ऐकू येणारे संथ गूढ शब्द. खोलीत पूर्ण अंधार करून हे गाणं पाहताना आजही अंगावर काटा येतो - घरातल्या दुसर्या खोलीत माणसं असली तरी. हर रूपमे है कातिल. डॉक्टर पांडे, मोहनबाबू, लक्ष्मण का भटकणारा अतृप्त आत्मा? का कोणी तिसरंच? कथानकाला रहस्यमयी कलाटणी देणारे किती अचूक शब्द. शकील आणि लतादीदी दोघांना ह्या गाण्याने फिल्मफेअरचं अ‍ॅवॉर्ड मिळवून दिलं ह्यात नवल नाही.

कुमारची भेट होण्याआधी राधा गाते ते 'सपने सुहाने लडकपनके', दोघांचं प्रेम बहरात येतं तेव्हाची 'बेकरार करके हमे यू ना जाईये' आणि 'जरा नजरोंसे कह दो जी' ही गाणी रोमँटिक गाण्यांच्या रसिकांसाठी मेजवानीच. कुमारला भेटायला मनाई केल्यावर उदास राधा गाते ते ‘ये मोहब्बत मे' हे गाणं ह्या चित्रपटात आहे हे मला आठवत नव्हतं. मला तरी ते फारसं आवडलं नाही.

चित्रपटाच्या कथानकात (निदान माझ्या मते तरी!) कच्चे दुवे फारसे नाहीत. तरी पण मोहन हा खरं तर एक पोलीस इन्स्पेक्टर असल्याचा सुगावा गावात कोणालाच कसा लागत नाही हे रहस्य शेवटपर्यंत उलगडत नाही. चित्रपट एडीट केल्यामुळे असेल कदाचित पण तो डोळ्याला पॅच लावलेला माणूस कोण असतो तेही मला कळलं नाही. तसंच राधाचे काका म्हणजेच रामपूर गावाचा तो मुखिया हे गावातल्या कोणालाच, अगदी वयोवृध्द लोकांनाही, ठाऊक नसावं हे पटत नाही. कुमारचा मृत्यू झाल्यास डॉक्टर पांडेना इस्टेट मिळणार अशी तरतूद त्याच्या काकांनी मृत्यूपत्रात का केलेली असते ह्याचं स्पष्टीकरण मिळत नाही. आणि राधाचे काका तिला कुमारला लग्नासंबंधी बोलणी करायला रात्री दलदलीजवळच्या मंदिरात यायला सांग असं सांगतात तेव्हा साध्याभोळ्या राधाला त्यात काही वावगं वाटत नाही ते ठीक पण कुमारला त्यात कसलाही संशय येऊ नये हे प्रेक्षक म्हणून पचनी पडत नाही.

ह्या थोड्याफार बाबी नजरेआड केल्या तर गोल्डन एरातल्या रहस्यमय चित्रपटांच्या यादीतला (उदा. गुमनाम, मेरा साया, कोहरा, वो कौन थी) एक आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे ह्यात शंकाच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंस ग... हा चित्रपट बऱ्याच वर्षापूर्वी दुदवर पाहिलाय. तो हात आता येणार या धास्तीने मी आधीच डोळे मिटून घ्यायचे। Happy

कही दीप जले.... माझे खूप लाडके आहे. पहिली दोन कडवी एक आर्त प्रेमगीत म्हणून सहज खपतील. तिसरे कडवे मात्र चित्रपटाशी इमान राखते.

मेरा गीत तेरे दिल की पुकार है
जहाँ मैं हूँ वहीं तेरा प्यार है
मेरा दिल है तेरी महफ़िल
ज़रा देख ले आ कर परवाने
तेरी कौन सी है मंज़िल
कहीं दीप जले कहीं दिल

ना मैं सपना हूँ ना कोई राज़ हूँ
एक दर्द भरी आवाज़ हूँ
पिया देर न कर, आ मिल
ज़रा देख ले आ कर परवाने
तेरी कौन सी है मंज़िल
कहीं दीप जले कहीं दिल

परत बघायला हवा. मोहन हे कॅरेक्टर अजिबात आठवत नाहीय.

मस्त! Hound of the Baskerville वाचली आहे. तेव्हा इंटरनेटवर वाचलं होतं की बीस साल बाद त्या कथेवर आधारित आहे. पण यात शाप बदलला आहे असं दिसतंय. चित्रपटात कुत्र्याचा शापाशी ( Hound म्हणजे कुत्राच ना?) काही संबंध नाही का?
मी चित्रपट पाहिलेला नाही. पण Hound... मधे डॉ. पांडेला पॅरलल जी व्यक्तिरेखा आहे, तो मूळचा Baskerville असतो आणि म्हणून तो इस्टेटीचा वारसदार ठरणार असतो. अर्थात तिथे तोच खुनी/ कपटी आहे. इथे वेगळा दिसतोय.

छान लिहीलंय. पिक्चर पाहून काही वर्षं झाली. त्यामुळे तुझ्या प्रश्नांची उत्तरं काही आली नाहीत. जमलं तर कदाचित परत बघेन पिक्चर. पुर्वी पाहिला होता तेव्हा आवडला होता.

वावे, कथा भारतीय मनाला आकर्षित करेल अशी बदलली आहे व चांगली जमली आहे. कोहराची कथाही अशीच बदलली पण तो बदल कथेत नीट फिट बसला नाही, त्यामुळे चित्रपट फसला.

मूळ हाउंडस.... तर भन्नाट आहे. कितीनदा वाचलीय पण धडकी भरतेच भरते.

कुत्र्याच्या जागी चित्रपटात मांजर वापरले आहे. कसे ते कळण्यासाठी चित्रपट पाहा Happy Happy

मधे डॉ. पांडेला पॅरलल जी व्यक्तिरेखा आहे, तो मूळचा Baskerville असतो आणि म्हणून तो इस्टेटीचा वारसदार ठरणार असतो. अर्थात तिथे तोच खुनी/ कपटी आहे. इथे वेगळा दिसतोय.>>>>

चित्रपटात इस्टेट प्रकरण प्रेक्षकांचा संशय डॉक्टरवर जावा यासाठी आहे, बाकी स्वप्ना म्हणते तसे चित्रपटात डॉक्टरला इस्टेटीचा वारसदार का केले याचे काहीही कारण दिलेले नाही. कुणीच उरला नसेल तर गावाला दानपत्र लिहून देता आले असते की.

साधना, मोहन कुबड्या घेऊन वावरत असतो. कोहराबद्दल तुझ्याशी सहमत अगदी. कथानक बदलून पण भारतीय रूपात उपरंच वाटलं. हाउन्डबद्दल अगदी अगदी....

ननि, pravintherider नक्की पहा. मी पण खूप वर्षांनी पाहिला आणि एन्जॉय केला.

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार Happy

खूप आवडता सिनेमा Happy
अप्रतीम गाणी, सुंदर वहिदा आणि चांगल्यापैकी जमून आलेला सस्पेन्स! जे पहिल्यांदा बघत असतील किंवा मूळ Hound of Baskerville ची कथा माहिती नसेल तर खुनी कोण याचा सहजासहजी अंदाज येत नाही. विश्वजित फारसा आवडत नाही पण या चित्रपटात आणि कोहरामधे तो बराच सुसह्य आहे.
विश्वजितने हिंदी चित्रपटकारकीर्दीची सुरवात सस्पेन्स चित्रपटांतूनच केली आहे..बीस साल बाद, कोहरा, बिन बादल बरसात, ये रात फिर ना आयेगी. त्याच्या इतर रोमंटिक चित्रपटांपेक्षा याच चित्रपटात त्याने त्यातल्या त्यात बरा अभिनय केला आहे Happy

छान लिहिलं आहे.
फार पूर्वी पाहिला तेव्हा चांगला वाटला होता हा चित्रपट.

===
< विश्वजित फारसा आवडत नाही पण या चित्रपटात आणि कोहरामधे तो बराच सुसह्य आहे.
विश्वजितने हिंदी चित्रपटकारकीर्दीची सुरवात सस्पेन्स चित्रपटांतूनच केली आहे..बीस साल बाद, कोहरा, बिन बादल बरसात, ये रात फिर ना आयेगी. त्याच्या इतर रोमंटिक चित्रपटांपेक्षा याच चित्रपटात त्याने त्यातल्या त्यात बरा अभिनय केला आहे Happy
>>> + १.

छान लिहीलेय. Happy
खूप वर्षांपूर्वी पाहिलाय आणि काळे मांजर, मद्दड विश्वजित, सुंदर वहिदा व कर्णमधूर गाणी फक्त आठवत होती..

उत्तम. खुप वर्षांपुर्वी पाहिला होता. तुझा लेख वाचून परत पाहावासा वाटतोय.

विश्वजीत बद्दल शिरीष कणेकरांनी मस्त लिहीलय. तो शोभेल अश्या रूपात एकदाच दिसला कजरा मोहब्बतवाला..

'कही दीप जले कही दिल'

या गाण्या बद्दल असे बोलले जाते ख.खो.को.जा.

मध्यंतरी लतादीदींचा आवाज बिघडला इतका की त्यांनी सर्व रेकॉर्डिंगज थांबवली , थोडे थोडके नव्हे तर तब्बल दोन एक वर्षे दीदींनी एक ही गाणे रेकॉर्ड केले नाही. बर्‍याच अफवा उठल्या होत्या , करणी, शेंदूर खायला घातला इ इ.

घसा बरा झाला तरी दीदी रेकॉर्डिंग करायला धजावत नव्हत्या , त्यांचा आत्मविश्वास खचला होता जणू.

'बिस साल बाद' ची गाणीं रेकोर्डिंग करण्याची वेळ आली तेव्हा हेमंतदांना त्यातल्या ' 'कही दीप जले कही दिल' गाण्यासाठी फक्त दीदींचा आवाज हवा होता पण दीदी तर कोणतेच रेकॉर्डींग करायला तयार नव्हत्या , हेमंतदांनी अनेक मार्गाने दीदींना समजावले 'तुमच्या आवाजाला काही एक झालेले नाही , तुम्ही उगाचच एखाद्या अनामिक भितीने आत्मविश्वास गमवून बसला आहात इ'.

दीदी तरी ही तयार झाल्या नाहीत, शेवटी हेमंतदा म्हणाले
"दीदी आपण असे करु तुम्ही रेकॉर्डिंग़ कराच एक प्रयत्न म्हणून , चांगले वाटले तर गाणे वापरु नाही तर दुसर्‍या कोणा गायिकेच्या आवाजात पुन्हा रेकॉर्डींग करतो , मग तर झाले ?"

दीदी कशाबश्या तयार झाला , 'कही दीप जले कही दिल' गाणे पहील्याच टेक मध्ये ओक्के झाले. रेकॉर्डिंग ऐकताच दिदींना कळाले 'आपल्या अवाजाला काहीही झाले नाही , आपण पहिल्या सारखेच सुरेख गाणे म्हणू शकतो "

आणि दीदींचा अवाज पुन्हा एकदा रेकॉर्डींग रुम मध्ये निनादू लागला ..

'कही दीप जले कही दिल' हे गाणे जर लक्ष देऊन ऐकले तर दीदींच्या त्या वेळेच्या खचलेल्या आत्मविश्वासाची जाणीव होते राहते , डिलिव्हरी जराशी दबलेली, काहीशी चाचरत / अडखळत येते आहे असा भास होते.