धिस अमेरिकन लाईफ

Submitted by वाट्टेल ते on 29 June, 2018 - 17:01

पु. लंच अपूर्वाई वाचून इंग्लड आणि इतर युरोपातील राहणीबद्दल कल्पना करत मोठे (वयाने) झालेल्या अनेकांपैकी मी एक. अमेरिकेत राहणारे कोणीही माझ्या परिचयाचे नसल्याने अशाच काही अमेरिकेवरील पुस्तकांवर विसंबून, त्यातल्या गोष्टी प्रमाण घरून या देशात पाय ठेवला. आता इतक्या वर्षांनी मात्र पुस्तकी ज्ञानावर भरोसा ठेऊ नये इतपत शिकले आहे. त्यांचीपण चूक नाही, ही मंडळी थोडक्या दिवसांकरता इथे कोणाकडेतरी येतात, ४ गोष्टी बघतात शितावरून भाताची परीक्षा करून प्रवासवर्णने छापतात. जे लोक पुस्तक काढण्याइतके भाग्यवान नसतात ते मुक्तपीठात लिहितात ( पहा दैनिक सकाळ) आणि केवळ चेष्टेचे धनी होतात. अजून एक दुसऱ्या प्रकारची गोष्टींची पुस्तके पण असतात जी अमेरिकेत स्थिरावलेले मराठी लिहीतात , त्यात एक अमुक कुमार आणि तमुक कुमारी कोणत्या विद्यापीठात कसे कसे शिकले , मग कामाच्या इथे गोड अपघात होऊन त्यातून बाहेर कसे पडले, मग शेवटी एकमेकांना कसे भेटले आणि पुन्हा वेगळे झाले छाप कहाण्या असतात. कधीकधी त्यात त्यांचा भारतातील लोकांबरोबरच संघर्ष वगैरे असतो. हे सगळे ठीक असले तरी इथल्या आयुष्याबद्दल त्यातून काहीही उलगडा होत नाही. तर हल्ली म्हणे भारतातील जवळपास सगळ्याच घरातून इथे राहायला आलेले लोक आहेत ते आपापल्या माणसांना सांगत असतीलच , पण तरी तुम्हाला सांगणारे कोणी नसेल किंवा असतील ते, ‘या अडाण्याला काय कळणार आहे’ समजुतीत असतील तर अशा सगळ्या नवख्यांसाठी ही अमेरिकेतील मराठी मध्यमवर्गीय राहणीमानाची चुणूक. हे वाचून आणि त्यातून योग्य तो धडा घेऊन अमेरिकेत आपल्या कोणा भारतीय नातेवाईकांकडे गेलात तर त्यांनी तुमच्याकडे मोरू असल्यासारखे पाहू नये आणि शेंड्या लावू नये इतपत साध्य झाले म्हणजे बस.

पूर्वतयारी -

अमेरिकेला येण्याची पूर्वतयारी म्हणून प्रथम अमेरिकेचा नकाशा आणा. महत्वाची राज्ये, त्यातील महत्वाची ठिकाणे, देशी लोकांची झुंबड असणारी ठराविक ठिकाणे उदा. नायगारा , डिस्ने पार्क वगैरे नकाशावर नीट पुन्हा पुन्हा पाहून ठेवा. अनेक शहरे जोडणारे मोठे प्रसिद्ध हायवे उदा. I ९५, I ८०. नकाशाचा अभ्यास एक सागर आहे तेव्हा आपण ज्या भागात जास्त दिवस राहणार असाल तो भाग, ते घर गूगल earth वर बघून, अगदी लागून असलेल्या रस्त्यांची नावे, दिशा तोंडपाठ करा, अमुक boulevard ने वर जा आणि तमुक ड्राईव्हने खाली ये, हे चालणार नाही.

नकाशाबरोबर timezone या गोष्टीचा सखोल अभ्यास करा. जरा डोके वापरलेत तर रॉकेट science इतके अवघड प्रकरण नाहीये हे. “आता xxx ठिकाणी किती वाजले आहेत“ हा प्रश्न चुकून सुद्धा स्थानिक यजमानांना विचारू नये. मग अमेरिका केवढा अगडबंब आहे (म्हणजे आहेच) , भारतातल्या लोकांना वेळेचे गणितच कसे करता येत नाही वगैरे तुमची अकारण अक्कल काढण्यात येईल.

नकाशाचा अभ्यास करता करता तुमच्या लक्षात येईल की एखाद्या डोंबिवली व उत्तर प्रदेश मधल्या कोणत्यातरी गावातल्या माणसाच्या आयुष्यात अंतर असते तसेच इथे ही ठिकठिकाणी असू शकते. माझ्या ओळखीचा कोणीतरी क्ष माणूस पण अमेरिकेत राहतो याइतके भोंगळ विधान दुसरे नाही. त्यामुळे येताना त्याला पाठवायला पार्सले वगैरे भानगडी गळ्यात घेऊ नयेत. अमेरिकेत म्हणजे कुठे याबद्दल specific रहा. नाहीतर तुम्ही असायचात फ्लोरिडात आणि तुमचा क्ष हा माणूस वॉशिंग्टन स्टेट मध्ये ( जाता जाता - जसे भारतात गांधी तसे अमेरिकेत वॉशिंग्टनच्या नावे स्टेट, सिटी, गाव, रोड, पेपर, बँक, शाळा, युनिव्हर्सिटी सगळे काही आहे. )

सध्याचे राष्ट(उचा)पती , सिनेटर, अमेरिकन राजकारण व सरकारच्या सिस्टिम्स याबद्दल थोडे वाचन वाढवा. भारताइतकी गम्मत नसली नसली तरी CNN विरुद्ध Fox आणि एकूणच राजकारणात हल्ली इथेही करमणूक बरीच वाढली आहे. सध्या सर्वत्र उजव्या विचारसरणीच्या आत्मकेंद्री हुकूमशहा प्रवृत्तीच्या लोकांचे सरकार स्थापन होत आहे त्याची अपरिहार्यता वगैरे अनुषंगाने युरोपीय राजकारण व तिथल्या घटनांची नोंद ठेवा. तुम्ही स्त्री असाल तर हा विषय option ला टाकू शकता. इतर अनेक जिव्हाळ्याचे विषय जसे की अमेरिकेचे अर्थकारण व फेड, बंदुका, शिक्षण, technology यावर अभ्यास वाढवा.

अमेरिकेन शब्दकोश हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. इंग्लिश भाषा हा मराठी माणसाचा एकमेकांकडून खास अपमान करून घेण्याचा विषय आहे, अमेरिकेत तर अजून सावळागोंधळ. तुमचे शुद्ध तुपातली इंग्रजी इथे चालणार नाही. यात एक दिलासा असा आहे की (तुमच्या दृष्टीने) स्पेल्लिंग कितीही चुकले तरी बेहत्तर पण उच्चार चुकले तर तुमची मापे काढण्यात येतात. सुरुवात करूया विमानतळापासून. इमिग्रेशन आणि कस्टम्समधून बाहेर आलात की तुमचा स्थानिक यजमान तुम्हाला भेटतो. त्याला इमिग्रेशन आणि कस्टम्सला मला काय विचारले, काय बोलले ते कळले नाही वगैरे चऱ्हाट लावून (मनातल्या मनात) हसण्याची संधी देऊ नये. त्याऐवजी काही घरगुती गोष्टी , खाऊ, हवामान यावर बोलणे काढावे. कारला गाडी म्हणालात तरी चालेल तर डिकीला ट्रंकच म्हटले पाहिजे. स्वतंत्र घर असेल तर गाडी गराज मध्ये ( जागा उरल्यास )ठेवण्यात येते. त्याला चुकूनसुद्धा गॅरेज असे म्हणू नये. भारतीय लोक ज्याला गॅरेज म्हणतात त्याला इथे ऑटो बॉडी शॉप वगैरे म्हटले जाते. अधिक इम्प्रेशन मारायचे असेल तर गाडीत सगळे बसून बाहेर निघताना शॉटगन म्हणावे म्हणजे तुम्हाला ड्रायव्हरच्या शेजारी बसण्याची संधी मिळेल. गाडी रस्त्यात “सिग्नलला” नाही तर “लाईटला” थांबेल. समजा स्थानिक यजमान तुम्हाला मॉलमध्ये घेऊन निघाला आहे तर त्याला गाडी एंट्रन्सला पूल करण्यास सांगावे म्हणजे तुम्हाला दारात सोडून तो पार्किंग शोधात बसेल. मॉल मध्ये ठिकठिकाणी एस्कलेटर असतात, त्यावर हमखास उजवीकडेच उभे रहा. नाहीतर एलेव्हेटर म्हणजे लिफ्ट असतात, त्यात शिरताना किंवा बाहेर पडताना मुंबईच्या लोकलमध्ये शिरत असल्यासारखी घाई करू नका. शॉपिंग करताना “सगळं मेड इन चायना आहे” हे सत्य सारखे मोठ्याने बोलण्याची गरज नाही. ठिकठिकाणी सेल असतात, लोकांकडे कुपने असतात . सगळे उणे अधिक होऊन शेवटी किती डॉलर झाले हे मशीन सांगतात , आपण आकडेमोडीची आणि कधी ६२ ने कधी ६७ ने गुणण्याची तसदी घेऊ नये. निर्ढावलेले भारतीय अमेरिकन यजमान व्यवस्थित किंमत असल्याशिवाय वस्तू विकत घेत नसतात याबद्दल खात्री बाळगा. शेवटी दमून हादडायला म्हणजे रेस्टरंटला ( ऊच्चारावर मेहनत घ्या) नेतात. कृपया ‘हॉटेल’ म्हणू नका. हॉटेल म्हणजे बाहेरगावी गेल्यावर जिथे राहतो ते. त्यात पुन्हा मॉटेल ते सध्याचे AirBnB असे बारीक बारीक भेद असू शकतात हे लक्षात घ्या.

खाण्याची गोष्ट निघाली आहे तेव्हा तुम्ही शुद्ध शाकाहारी असला तरी कोणत्या प्राण्याला किंवा त्याच्या अंगावरच्या विशिष्ट भागाला काय म्हणतात हे माहीत असणे इथे अत्यंत गरजेचे आहे. आणि ते काही मनुष्यप्राण्यांचे अन्न आहे त्याला शी , ई करत नाक मुरडू नये. कुत्रा खाणाऱ्या विश्वामित्राची गोष्ट आठवून एकदा गुगलवरून स्टेक , पोर्क, बीफ, टर्की, चिकन, लॅम्ब वगैरे सर्व माहिती काढावी. अगदीच नाही जमले तर व्हीगन, वेजिटेरिअन जगण्याबाद्दल इत्यंभूत माहिती गोळा करून आपण एका अत्यंत एलिट कल्टमधले आहोत हे लोकांच्या मनावर ठसवावे.

टोमॅटो सॉसला केचप म्हणतात पण पिझाबरोबर मागू नये. किन्वा हे एक राजगिऱ्यासारखे धान्य आहे, विशेष काही नाही. साधारणपणे बर्गर नावाच्या गोष्टीत बीफ असतेच याची खात्री बाळगा. स्मूदी म्हणजे फळे भाज्या आणि दह्याचा स्ट्रॉने प्यायचा काला. इटालियन जेवणात नुसते पास्ताच्या आकारात बदल करून अनंत प्रकार केले जातात. थाय म्हणजे नारळाच्या दुधातल्या भाज्या. चायनीज म्हणजे बिघडलेला फोडणीचा तेलकट भात. पॅनकेक म्हणजे घावन. मेक्सिकन जेवण म्हणजे उसळ, भात आणि मक्याची पोळी असे सगळे एकत्र. भाज्या हा प्रकार कांदा, गाजर, भोपळी मिरच्या, पालक वगैरे प्रकारात संपतो. अमेरिकन जनता आठवड्याची सर्व १४ जेवणे मांस खाते हे लक्षात ठेवा. इतर सर्व गोष्टींप्रमाणेच फळे व भाज्यांना वेगळी नावे आहेत. भारतातली फळे भाज्या ( आणि माणसेपण ) इथल्यांचे बोन्साय असावे असे दिसतात. एकूणच अमेरिकेत uniformity ठेवण्याच्या पद्धतीमुळे काहीही खात असू तरी चवीत विशेष फरक नसावा अशी काळजी घेण्यात येते. किंबहुना तुमच्या दृष्टीने चव अशी नसेलच फक्त उदरं भरणं , जाता जाता एक , फक्त हा शब्द तुमच्या शब्दकोशातून ताबडतोब काढून टाका.

बाहेर फिरताना अनेक चित्तचक्षुचमत्कारिक प्रकार तुम्हाला दिसतील. मोठे लोक, त्यांच्या मोठ्या गाड्या, मोठी घरे, लहान लहान कपडे, तुमच्या मेंदूत न मावणारे त्यांचे विविध प्रश्न या साऱ्याचा बाऊ करायचे कारण नाही. २ घरांत फरक असायचा तसा दोन देशांत फरक असणारच. मोकळ्या मनाने ते स्वीकारा आणि पुढे चला.

दिनक्रम

रोज छान कपडे घालून चालायला जात जा, एकतर वजन आटोक्यात राहील व रस्त्यात कुत्रे आणि म्हातारे, म्हाताऱ्या भेटतील. लोकांच्या गराजमध्ये भोचकपणे बघू नका. एखादी फटाकडी १७० च्या हार्टरेटने समोरून पळत गेली तरी वेड्यासारखे मान वळवून बघत बसू नका. एकतर तुमचा हार्टरेट वाढेल आणि दुसरे म्हणजे ती ५ पोरांची आई असू शकेल (अर्थात त्यामुळे काही फरक पडत नाही). त्यापेक्षा म्हातारे, म्हाताऱ्या यांच्याशी बोला. त्यांच्या कुत्र्यांचे भरमसाट कौतुक करणे हे त्यांच्या तोंडाचे कुलूप उघडण्याची चावी आहे. त्यांना काहीही विचारा, एकतर त्यांना भरपूर वेळ असतो आणि ते तुम्हाला एक एक चित्तचक्षुर्वैसत्य कहाण्या सांगू शकतील ज्या घरी जाऊन स्थानिक यजमानांच्या तोंडावर फेकण्याला बऱ्या पडतील. अमेरिकन लाईफ जास्त जवळून कळेल. तसाही स्थानिक यजमान तुमच्याशी अखंड बोलत बसणे आणि माहिती देते या प्रकाराला इतका धास्तावलेला असतो की तुमची बोलण्याची भूक परस्पर भागत असेल तर त्यालाही हायसे वाटते.

घरातील मुले तुमच्याशी शिस्तीत असतील तर ठीक आहे नाहीतर त्यांच्यापासून सावध. ते काय बोलत आहेत त्यातले अक्षरही तुम्हाला कळणार नाही. त्यांना उगीचच गॉन विथ द विंड किंवा ऍबी लिंकन वगैरेबद्दल किंवा ऐकूणच जास्त काही विचारू नये. तुम्हाला होता त्याप्रमाणे शाळेतल्या इतिहासाचा त्यांनापण कंटाळा असतो. भारतीय खाणे कौतुकाने खात असतील तर मात्र आलेली स्त्री पाहुणी रोज नवं नवीन खानसेवा पुरवून घरातल्या बाईला जबरदस्त टक्कर देऊ शकते. एक महत्वाचा नियम लक्षात ठेवा की पिझा या प्रकाराला कधीही कोणतीही नावे ठेवू नयेत.

घरात आलेली पाहुणी, यजमान बाईचा भार हलका करावा म्हणून स्वंयपाकघर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते आणि तिथेच संघर्षाची मोठी ठिणगी पडते. भारतात तुम्ही फेकलं तितकी भांडी धुवायला लोक असतात तसे इथे नाही, तेव्हा अमेरिकन लोक कागद वापरतात तशी भांडी वापरू नका. स्वयंपाक करताना पीठ, भाज्यांची साले वगैरे नेहमीप्रमाणे खाली पाडणे , आणि छे - कुठे पडलंय, मला दिसतसुद्धा नाहीये असे निर्गुण भाव ठेवणे हा अक्षम्य गुन्हा ठरू शकतो हे स्त्री वर्गाने विशेष करून लक्षात ठेवा. घरात वाट्टेल तसा पसारा करून गोंधळ घालूनही घर कायम चकाचक हॉटेलसारखे दिसत राहावे अशी अमेरिकन भारतीय गृहिणीची अगदी माफक अपेक्षा असते.

इतक्या वर्षात तुम्हाला भारतात बघायला वेळ झाला नसेल तेव्हा जुने राहिलेले सर्व सिनेमा, tv serial, आणि त्यात भर म्हणून खास अमेरिकन करमणूक यात तुमचा बराच वेळ जाईल. तुमच्या वयाच्या इथल्या बायका बघून दिवसेंदिवस अधिकाधिक कूssssल होण्याच्या दिशेने तुम्हाला जायचे आहे हे लक्षात ठेवा. घरातले इतर काम उगीच फार अंगावर घेऊ नका, इथल्या लोकांच्या सवयी मोडू नका. एक जाता जाता - laundry म्हणजे कपडे धुणे हा प्रकार वीकली असतो, कधीतरी तुमच्यावर उपकार म्हणून आठवड्याच्या मध्येच laundry करण्यात येऊ शकते. चुकून माकून रंग जाणारा एखादा कपडा घेऊन आलात तर तुम्हाला मरेपर्यंत उचक्या लागतील इतकी तुमची आठवण वारंवार काढली जाईल हे लक्षात ठेवा.

यजमानाचा एकूण रागरंग बघून पुढ्यात पडेल ते खा, उपमा, पोहे, साबुदाणा खिचडी आणि इडली हे प्रकार हे इथे जेवणातले समजले जाऊ शकते हे ध्यानात ठेवा. यजमानाला उगीच भारतीय आहार, त्यातले कार्ब्स, फॅटवर लेक्चर देण्याची संधी देऊ नका. काही दिवस गेले की एखादे दिवशी यजमानांना अचानक उपरती होते त्या दिवशी तुम्हाला हवे तसे चमचमीत न मागता मिळते, तर थोडा संयम बाळगा.

तर, तसे याबद्दल एक पुस्तकच लिहिण्याचा मानस आहे पण तुम्ही गूगल नावाची एक गोष्ट वापरायला शिकलात की कशाचीही गरज नाही तेव्हा तेवढे लक्षात ठेवा. मग कधी येताय अमेरिकेला ?

Group content visibility: 
Use group defaults

लेखनात एव्हढा उद्धट टोन का आहे ते कळलं नाही.

>> स्मूदी म्हणजे फळे भाज्या आणि दह्याचा स्ट्रॉने प्यायचा काला. इटालियन जेवणात नुसते पास्ताच्या आकारात बदल करून अनंत प्रकार केले जातात. थाय म्हणजे नारळाच्या दुधातल्या भाज्या. चायनीज म्हणजे बिघडलेला फोडणीचा तेलकट भात. पॅनकेक म्हणजे घावन. मेक्सिकन जेवण म्हणजे उसळ, भात आणि मक्याची पोळी असे सगळे एकत्र. भाज्या हा प्रकार कांदा, गाजर, भोपळी मिरच्या, पालक वगैरे प्रकारात संपतो
ह्यातलं ओव्हरसिम्प्लिफिकेशन खटकलं.

अगदीच असे नाहिए अमेरिका.....काही फरक बघताना मजा वाटते, सुखद धक्के बसतात, देशात गेल्यावर इथले आवडलेले पदार्थही आठवतात.

इथले लोक कसलातरी पुडी घालून केलेला चहा, त्यातहि सा़खर नाहीच, दूध कमी नि भारतातले तीन कप मावतील एव्हढ्या मोठ्या मग मधे घालून पितात. फस्क्लास उकळ उकळ के केलेला नि दूध साखर भरपूर घातलेला चहा पीत नाहीत.
एका जेवणात भाजी, कोशिंबीर, वरण भात, पातळ भाजी, चटणी गोडाचा पदार्थ नि ताज्या पोळ्या असे सगळे पदार्थ महिन्यातून फार तर एकदा किंवा दोनदा मिळतात, किंवा तुमच्या यजमानांच्या मित्रांनी जेवायला बोलवले तर एकाच जेवणात यातले तीनहून अधिक पदार्थ मिळतात.

<<भारतातली फळे भाज्या ( आणि माणसेपण ) इथल्यांचे बोन्साय असावे असे दिसतात. >>
पण राव, भारतातल्या भाज्यांना जी चव असते ती इथे नाही हो. फार तर भारतातला मसाला आणून इथे भाजी केली तर मसाला चांगला लागेल, पण इथली कोबी, फ्लावर, वांगी नुसतीच आकाराने मोठी, चवीला भारतातल्याच भाज्या.
फुलांना फक्त भारतातच सुगंध येतो. अगदी वास दरवळतो दूरवर. भारतातून इथे बिया आणून (कस्टमवाल्यांची नजर चुकवून)फुलझाडे लावली तरी फार तर एक दोन वर्षे वास येईल.

तुम्हांला भारतातल्या पाहुण्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव दिलेला दिसतो आहे म्हणून इतक्या वैतागून ‘एकदाचं गाईड छापूनच टाकते ना‘ म्हणत लिहिलं आहेत?
लेखातल्या काही गोष्टी पटल्या, एस्पेशली भारतात काय म्हणतात आणि इथे काय म्हणतात टाईप्स. बाकी लेख सो सो आहे.

टोमॅटो सॉसला केचप म्हणतात पण पिझाबरोबर मागू नये.
>> हे मी लुमिनाती शीकागो ला केले होते, सर्वर चा लुक अजून लक्षात आहे.

जे वाचून " फॉर हिअर ऑर टू गो" पुस्तकाची आठवण झाली,

अमेरिकेत स्थिरावलेली भारतीयांची पहिली पिढी, त्यांना ऍडजस्ट होताना आलेल्या अडचणी, नव्याने आलेले लोक /प्रवासी/परफॉर्म करण्यासाठी येणारे कलाकार आणि स्थानिक भारतीय यातले फ्लॅश पॉईंट्स, या लोकांच्या भारतातल्या नातेवाईकांकडून आणि भारतातल्या लोकांच्या NRI नातेवाईकांकडून अपेक्षा/अपेक्षाभंग, या बाबत लोकांचे छान भाष्य होते.

अगदीच वाट्टेल ते.

मुळात पुलंनी 50 वर्षांपूर्वी जे लिहिलेय ते वाचून आजच्या युरोप अमेरिकेची कल्पना करणे हास्यास्पद आहे. मुक्तपीठिय दळणाला नावे ठेवताना स्वतः तसेच दळण करायचे ही गंमतच आहे.

मस्त लिहिलंय.

गेली १५ वर्ष माबोवर असल्याने अन उसगावात राहत असल्याने इथे कसे टोले द्यावेत त्याचा भरपूर अभ्यास दिसतोय Lol

>>
स्मूदी म्हणजे फळे भाज्या आणि दह्याचा स्ट्रॉने प्यायचा काला. इटालियन जेवणात नुसते पास्ताच्या आकारात बदल करून अनंत प्रकार केले जातात. थाय म्हणजे नारळाच्या दुधातल्या भाज्या. चायनीज म्हणजे बिघडलेला फोडणीचा तेलकट भात. पॅनकेक म्हणजे घावन. मेक्सिकन जेवण म्हणजे उसळ, भात आणि मक्याची पोळी असे सगळे एकत्र. भाज्या हा प्रकार कांदा, गाजर, भोपळी मिरच्या, पालक वगैरे प्रकारात संपतो
<<
हे भारीय

<<बाहेर फिरताना अनेक चित्तचक्षुचमत्कारिक प्रकार तुम्हाला दिसतील. मोठे लोक....>>
इथे मोठे लोक म्हणजे वजनाने जाडे लोक समजावे का??

लेखनात एव्हढा उद्धट टोन का आहे ते कळलं नाही. >> +१, पहिल्या पॅरा नंतर काही तरी वेगळे वाचायला मिळेल असे वाटले होते.

" तुम्ही गूगल नावाची एक गोष्ट वापरायला शिकलात की कशाचीही गरज नाही तेव्हा तेवढे लक्षात ठेवा." हे लिहिल्यामूळे लेखाच्याच टोनमधे लेखाचीही गरज नाही असेही म्हणून शकतो Lol

खरं तर मला इतका उद्धट वाटला नाही.बाकी चायनीज म्हणजे बिघडलेला मसालेभात वगैरे जनरलाईज्ड विनोद आपण भारतीय खाण्याबद्दल पण करतच असतो.