हुज्जत…

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 27 June, 2018 - 03:21

हुज्जत…

दहा वर्षांपूर्वी मेटे काका सेवानिवृत्त झाले आणि संध्याकाळच्या भाजी रहाटाची नवीन जबाबदारी स्वीकारून त्यांनी मंजू मावशीला त्या रोजच्या व्यापातून मुक्त केले. तेव्हापासूनच संध्याकाळचा बाजार फेरफटका ठरलेला. आजही ते संध्याकाळचे बाहेर पडले. बाजारात गर्दी जरा जास्तच होती. ज्या कोणाकडे पाहावं तो वडाची फांदी, पूजेचं साहित्य घेऊन बसलेला. जांभळं, करवंद, आंबे, केळी अन फणसाचे गरे यांचा नुसता घमघमाट. रमजान नंतर आज पुन्हा फळांचा भाव वधारलेला. " कधी आहे ग वटपौर्णिमा?" त्यांनी भाजीवालीला विचारले, " अहो काका, उद्या; घ्या ना पूजेचं सामान." काकांनी काही क्षण विचार केला अन भाजीबरोबर दर सालाप्रमाणे पूजेचं सर्व साहित्य घेतले. हो, हि जबाबदारीही त्यांनी स्वतःहून स्वीकारली होती.

काका घरी परतले. सूनबाईंनी दार उघडले . तिच्या हातात सामानाची पिशवी देत त्यांनी वडाची फांदी दाखवली . सुनेने पिशवी घेतली . " ही फांदी कशाला? " तिने विचारलं . " अगं ? उद्या उपवास असेल ना तुझा ? तू पूजा करून जाशील असं वाटलं " " मी नाही हां धरणार उपवास . सकाळच्या घाईत वेळ आहे कुणाकडे ? गेल्या वर्षी आईनी पूजा मांडली मी आपलं फक्त " म म " म्हटलं . आणि कोणी बघितलाय पुढचा जन्म ? यांच जन्माचं काही खरं नाही . मनी नाही भाव अन कशाला म्हणायचं पतिदेवा मला पाव? एक फोन करायचा ना आधी " सून पुढे किती काय काय बोलत होती . काकांनी कानाचे पडदे बंद करून घेतले ...

त्यांचच मन त्यांना ऐकवत होतं... त्याच्याशीच ते हुज्जत घालू लागले, " खरंच काय गरज होती तुला? कशाला अपेक्षा ठेवायची? काय म्हणून आणलीस हि फांदी? तुझ्या बायकोने जपली व्रत - वैकल्य, पुढच्या पिढीनेहि ती जपावी असा अट्टाहास का? मनापासून वाटायला नको? तू गेल्यावर दुखवटा म्हणून केलंच नाही काही वर्षभर, तू नाहीस हे माहित असूनही म्हटलं उगाच सुनेच्या पूजेत व्यत्यय नको पडायला घेऊया सामान छान वाटेल तिला ...पण नाही तसं नाहीये काही ... खरंच असतात का सात जन्म? बरोबरच तर म्हणाली ती... याच जन्माचं काही खरं नाही... तू तरी कुठे आहेस या क्षणी आत्ता ? माझ्यासोबत? गेलीस ना सोडून? का आणायचो मी हि फांदी? तुझा आग्रह असायचाच गं पण त्याहूनही मलाच तू हवी होतीस पुढचे सात जन्म ... पण तू गेलीस सौभाग्याचं लेणं लेऊन मी राहिलो इथे असाच एकटा....

किती तरी वेळ ते हातात ती फांदी घेऊन बसले होते, त्यांच्या अश्रूंत न्हाऊन ती फांदीही गहिवरली. काका निमूट उठले... घराबाहेर पडले... सोसायटीच्या कंपाउंड मध्ये पेंगवीन चा डस्टबिन तोंड उघडून उभा होता. त्याच्या तोंडात फांदी खाऊ घालून ते खाली मानेने घरी परतले ते भावनाशून्य होऊनच ..........

©मयुरी चवाथे-शिंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

चांगले लिहीलेस.
पण सुनेचा मुद्दा पण पटला. तिला मनापासून नसेल करायचे तर ढोंग तरी करत नाहीये हे छान Happy
जुन्या पिढीला नाही पटत, पण चालायचेच

खरंच काय गरज होती तुला? कशाला अपेक्षा ठेवायची? काय म्हणून आणलीस हि फांदी? तुझ्या बायकोने जपली व्रत - वैकल्य, पुढच्या पिढीनेहि ती जपावी असा अट्टाहास का? >>>> हे एकदम पटलं.
साबुंचा उद्देश आणि त्या मागची भावना योग्य असली तरी सुनेला विश्वासात घेणं ही तितकचं आवश्यक होतं .

सुनेने जरा समजावून सांगितलं असत तरी चाललं असतं .

धन्यवाद शाली Happy

पण प्रतिसादांवरून असं वाटतंय सुनंच जास्त ठसली वाचकांच्या मनावर... म्हातारे, एकटे काका बाजूलाच राहिले.

सुनेला हेच जरा वेगळ्या शब्दात सांगता आले असते. समोरच्याच्या काही भावना आहेत त्यांना हर्ट न करताही नकार देता येतो.

काही काही लोकांना समजवायला गेलं तर ते डोक्यावर बसतात म्हणून काही लोकांबाबत फार कडक पवित्रा घ्यावा लागतो.

मला मात्र सासर्‍यांचं वाईट वाटलं पण सुनेची बाजुही पटली

विषय जुनापुराणाच.. पण लिहिलेय छान.

रोखठोक आणि फटकळ यात फार बारीक सीमारेषा असते... असे मी कालच आमच्या ऑफिसमधील एका फटकळ मुलीला रोखठोकपणे सुनावले.

या कथेतील सून अश्याच सीमरेषेवर आहे. ज्याचे त्याने ठरवावे.

प्रतिसादासाठी धन्यवाद दक्षिणा, मंगेश.... , अदिति, बाबा कामदेव , रीया, भन्नाट भास्कर.

दोघांचीही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.