कांदेपोहे(२)

Submitted by राजेश्री on 25 June, 2018 - 21:56

कांदेपोहे (२)

कांदेपोहे करूयात का ? या प्रश्नाचं उत्तर हो तेंव्हाच येणं योग्य आहे जेंव्हा तुमच्याकडे पोहे,कांदा,मिरची,कोथिंबीर, लिंबू,कडीपत्ता,शेंगदाणे या जिनसा हजर स्टॉक मध्ये असतील.चाळीत असताना कांदेपोहे करायला काही एक वांदे यायचे नाहीत कारण दहा बारा घरे एकाला लागून एक पोहे करायला लागणार साहित्य कुणाच्या ना कुणाच्या घरी मिळायचं.तेंव्हा कुणाच्या घरी काही मागायला कमीपणा यायचा नाही.हिरव्या मिरच्या आहेत का?या प्रश्नामागून कधी हो इतकंच pure म्हणता येईल असं उत्तर नसायचं.हायत्या पण लाल पडल्यात,ते ऐकून मिरच्यासारखा माझा चेहेरा लाल पडायचा ते वेगळं.मग लाल आहेत तर एक हिरवी मिरची बरोबर पाच लाल मिरच्या हे गणित वापरून आवश्यक तिखटपणा येईल असा अपसमज करून त्यो मिरच्यांचा चगाळा गोळा करून मला दिला जायचा.मम्मी अस काय घेऊन गेल की ह्यो कचरा कशाला गोळा करून आणलास म्हणत मला रागवायची.मला आपल्या घरातील पोह्यांचा बेत मिरच्याअभावी कॅन्सल व्हायला नको अस वाटायच.कारण वाढदिवसादिवशी हमखास पोहे असणार हे गणित सोडलं तर इरिवारी सकाळच जेवण हाच आमचा नाष्टा असायचा.नाश्त्यासाठी वेगळा असा तडज नसायचाच.तरी मम्मी म्हणायची आता दहा वाजत आलेत आणि तासाभरात जेवायचं पोह्यांचा तडज नको मांडायला.मग मला मिरच्या म्हणून चगाळा दिलेल्या शेजाऱ्यांचा जाम राग यायचा.मग मी मम्मीला म्हणायचे पोह्यात मिरच्या न घालता कर पोहे.असो कारण पुढच काय आठवेना आता
कांदेपोहे करायला काय नसलं तर चालेल याच उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकत.मला वाटत पोहे करायचे तर लागणारी प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे हवीच हवी.आजही स्वयंपाक घरात जाऊन मी काही करणं म्हणजे भाजपने शिवसेनेला वैतागून काँग्रेस शी युती केल्यासारखं आहे.त्यात आणि मी एखादं काम करते आहे हे जगाला दाखवायचा भारी सोस.मग मी दीदी,अव्या,स्वप्नया सगळ्यांना पोहे खायला या आणि खायला हवे असतील तर मला मदत करायला या म्हणूंन डंका पिटवायचे. मला रेसीपी शो मध्ये दाखवतात तस आवश्यक साहित्य गोल वाट्यात भरून ठेवायला,झालंस तर ते साहित्य नेमकं काय आहे हे नेलपेंट लावलेल्या बोटाने दाखवायला जास्त रस असणार.ऐन करायच्या वक्ताला कढईत टाकलेली जिरे मोहरी तडतड उडायला लागली की दिदू ,स्वप्नया गॅस कट्ट्याखाली हसत उड्या मारणार आणि मी घाबरून एक साहित्य तेलात टाकायचं की मागे पळायच मग आतंकवादी कुठे लपले आहेत हे शोधत असल्यासारख याचा दबक्या पावलाने एक एक जिन्नस कढईत टाकायला पुढं जायचं,साहजिकच या साऱ्या गोंधळात कोणत्या क्रमाने काय आणि ते विशिष्ट क्रमानेच का घालायचं या भानगडीत टाकलेले साहित्य करपु लागायचं यातून गडबडीत टाकायचं राहून गेलेलं साहित्य तेवढं वाचायचं.मग हेच ते कांदापोहे म्हणून ताटात मी जे काही वाढलं आहे त्याला हो हे पोहेच आहेत असं फक्त दिदू आणि स्वप्नया म्हणायचे कारण ते माझे भक्त होते.तायडी म्हणायची राजू पोहे काळे पांढरे दिसत नसतात ते पिवळे असतात रंगाने.हळद कोण टाकणार.शिवाय मिरच्या कोण टाकणार,चिरून कशाला ठेवल्यास, कांदा कसा करपला असे मला दडपू पाहणारे प्रश्न एकामागून एक विचारून मला नामोहरम करायचा प्रयत्न करायची.मग याचा अंतिम निष्कर्ष तूच खा पोहे म्हणत ती प्लेट माझ्यासमोर रागाने आपटणार आणि यापुढे तू स्वयंपाकघरात काही करायला जायचं नाहीस ही धमकी देखील देणार.मग मी मला संधी मिळत नसून ,संधीअभावी मला जेवण करता येत नाही माझ्या अश्या परिस्थितीला तूच कारणीभूत आहेस म्हणून तिच्यावर ओरडत स्वतःच पोहे केले असल्याने चेहरा शक्य तेवढा नॉर्मल ठेऊन पोहे खायचा अयशस्वी प्रयत्न करत असायचे.
अलीकडे मला यायला लागले पोहे करायला नाही असं म्हणता येणार नाही पण पोहे केल्यावर हे पोहेच आहेत असं फक्त पप्पांच न सांगता मुकाट्याने खात असतात आणि मम्मी तुला सांगत कोण काय करायला अस म्हणत माझा उद्धार करत राहते.कधी माझे पोहे पोहेकांदा होतात तर कधी कांद्याअभावी नुसतेच पोहेपोहे होतात. अजूनही कडीपत्ता कढईत तडतड उडया मारायला लागला की मी त्याला encourage करायला जात नाही.नाच नाचायच तेवढा आणि मग पड आडवा शांत कढईत म्हणूंन मागे सरून त्याकडे दुर्लक्ष करते. कंदापोहे करताना पप्पा मला कायम कांदा चिरून देतात मी मास्टर कुक असल्याच्या थाटात केवळ फोडणी घालायचे काम करत असते.कारण पप्पांना आपल्या पोरीला कांद्यानेही रडवलेले चालत नाही.पोहे खाल्यावर , छान होते राजा पोहे पुढच्या वेळी मात्र पोह्यात मिरच्या टाकायला विसरू नकोस अशी पप्पांची वाक्ये असतात या वाक्यात गौराईचे ओटी घालायचे गाणे गाताना कस सुपारी, खारीक,नारळ शब्द बदलतात तस मिरच्यांच्या जागी शेंगदाणे,मीठ,कडीपत्ता,कोथिंबीर असे शब्द बदलत राहतात.कंदापोहे आज लिहायचं प्रयोजन हेच की आजही मी पोहे केले होते प्लेट चा फोटो काढायचं तेवढं विसरले नाहीये.बाकी काय घातलं होत लक्षात नाही .कसे झाले होते हे सांगायचंच झालं "यथाराजा तथा पोहे" असेच होते ते पोहे तुम्हाला खायचे असतील तर आपआपल्या जबाबदारीवर अवश्य येणेचे करावे...इति कांदापोहे पुराणम् समाप्तम्...

©राजश्री
IMG-20180610-WA0033.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Lol

मी पण अजून ही कडीपत्ता कढईत टाकून पळते Happy

छान

कारण पप्पांना आपल्या पोरीला कांद्यानेही रडवलेले चालत नाही.पोहे खाल्यावर , छान होते राजा पोहे पुढच्या वेळी मात्र पोह्यात मिरच्या टाकायला विसरू नकोस अशी पप्पांची वाक्ये >>>> अगदी अगदी झाले ह्या वाक्याला. तसेही मुली असतातच बाबांच्या लाडक्या Happy

मस्तच Lol आम्हाला जमतात पोहे कधीपासून ते माहित नाही. पण कधीतरी एखादं साहत्य विसरलं जातं. Lol दोन लहान बहिणी शिकल्यायत माझ्याकडून पोहे बनवायला( हे त्यांच म्हणनं आहे). तिसरीला जमतात पण ती नाही म्हणून सांगते, कारण तिला सारखं पोहे बनवायला सांगतील म्हणून. Lol

फोटो आहे तर टाक की.>>> हे मी फोटो ऐवजी पोहे वाचलेलं. Lol

मी पोह्यात काहीही घालायला विसरत नाही कधीच.
पण कधीही मस्तपैकी जमलेत असं वाटत नाही खाताना Sad
कधी कसे कधी कसे.
पण ताईच्या हातचे पोहे अप्रतिम असतात. अगदी नेहमी सेमच चवीचे.

सर्वांच्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार
छान वाटत असे दिलखुलास अभिप्राय मिळाले की

@VB
अगदी अगदी झाले ह्या वाक्याला. तसेही मुली असतातच बाबांच्या लाडक्या <<<<<हो आई पेक्षा मुली बाबांच्या लाडक्या असतात

<<<कारण पप्पांना आपल्या पोरीला कांद्यानेही रडवलेले चालत नाही>>> अगदी भावलं. पप्पांना बोलवा खायला.

मस्त आहे. मला शिर्षकात किंवा कांदापोहे आयडी दिसला की पोहे करुन खायचं क्रेव्हिंग होतं. Wink मी दोनदा करुन खाल्लेही आहेत.
मी हल्ली पोह्यात कांदा, कढिपत्ता, मिरच्या ह्या मस्टच आहेत पण त्यांच्या बरोबरीने बटाटा, टोमॅटो आणि कोबीही घालते. कोथिंबीर हवीच हे वेगळं सांगायला नकोच.

माझ्या सासूबाईचे असे होते की तुम्ही लिहिल्याप्रमाणे एकही जिन्नस नसेल तर नो पोहे . कोथिन्बिरी शिवाय पोहे ?ते कसे होणार ?मिरच्या आणि कढीपत्ता हे तर अति महत्वाचे घटक .बटाटे आणि मटार पण हवेतच .
पण माझ्या आईचे असे होते की पोहेच नसले तरच पोहे होणार नाहीत .
म्हणजे समजा कान्दे नाहीत तर ठीक आहे शिवराक करा . म्हणजे कान्दे न घालता. दिवाळीच्या पहिल्या दिवशी करतात तसे . बटाटे घाला असले तर नाहीतर सोडून द्या . मिरच्या नाहीत ?तिखट घाला .कढीपत्ता नाही तर हरकत नाही . थोडे धणे नाहीतर आले किसून छानच लागते की .कोथिन्बिरीला पर्याय ओल्या खोबर्याचा. आणि अर्थात मीठ हवेच घरात .
पण हे सगळे जिन्नस यथासान्ग घालूनही माझे पोहे आईच्या पोह्याइतके चवदार कधीच नाही होत .

पण माझ्या आईचे असे होते की पोहेच नसले तरच पोहे होणार नाहीत .>> माझेपण बऱ्यापैकी असेच आहे. पोहे आणि कांदा/बटाटा हे दोनच घटक हवेत'च'. फक्त पोहे असतील तर दुधपोहे खायचे.

माझा रूम मेट पोहे असे बनवतो की उपमा बनतो. आम्ही त्याला पोह्याचा उपमा म्हणतो.
बिलकुल अंदाज नाही त्याला किती वेळ पोहे भिजवायचे याचा.

>>मला शिर्षकात किंवा कांदापोहे आयडी दिसला की पोहे करुन खायचं क्रेव्हिंग होतं.---+१

हेच होतंय मला रोज हा धागा पाहुन