स्वप्नांवरती बोलू काही!

Submitted by चिमण on 25 June, 2018 - 04:18

स्वप्नांच्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे. म्हणजे मला रोज तर्‍हेतर्‍हेची स्वप्न पडतात अशा अर्थाने हो! आणखी कुठल्या कुठल्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे ते माझे हितचिंतक सांगतीलच. खरं म्हंटलं तर स्वप्न पडणं यात काही विशेष नाही कारण स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. प्रत्येकाला रोज साधारणपणे ५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात. काही लोकांना आपल्या बायकोने नक्की काय आणायला सांगितलं होतं हे जसं आठवत नाही तशी स्वप्नं पण नंतर आठवत नाहीत इतकंच! मग मी का स्वप्नांबद्दल बोलतोय? कारण माझी बौद्धिक क्षमता बघता मला फक्त स्वप्नांसारख्या हलक्याफुलक्या विषयांवरच त्यातल्या त्यात बोलायला जमतं. मी आयुष्यासारख्या जड गंभीर आणि किचकट विषयावर बोलू शकत नाही. शिवाय, मला असं जाणवलं की हल्ली मी स्वप्नांबद्दल बोलतच नाही. पूर्वी मला स्वप्न पडलं की मी सकाळी सकाळी बायकोला मार्टिन ल्युथर किंगच्या आवेषात 'I had a dream!' असं सांगायचो आणि ती तितक्याच थंडपणे 'हां, ती कालची भांडी घे धुवून!' असं सांगून माझ्या स्वप्नसृष्टीला सत्यतेची कल्हई लावायची. शिवाय मला असं वाटतं की बरेच लोकही त्याबद्दल बोलायच्या फंदात पडत नाहीत किंवा बोलायचं टाळतात. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या इकडचा मेसेज तिकडे फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात आपली स्वप्नं खरडून दुसर्‍याला कळवायला कुणाला वेळ आहे? विचार करा, इतके मेसेजेस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वरून आपल्यावर आदळतात त्यातले किती स्वप्नांबद्दल असतात? आपल्या स्वप्नांबद्दल प्रत्येकाने बोलायला हवं कारण स्वप्नं आपल्याला बनवतात.. दोन्ही अर्थांनी!

माझ्या दृष्टीने स्वप्नं म्हणजे सुप्त मनाने जागरुक मनाशी केलेली भंकस असली तरी स्वप्नांची गंमत वेगळीच आहे. आपलं स्वप्न हे एक डिझायनर स्वप्न असतं, आपण आपल्यासाठी बनवलेलं आणि फक्त आपणच अनुभवलेलं! आपलं अंतर्मन आपल्याच मनाच्या वळचणीत दडलेल्या कुठल्याशा सुप्त भावनांवर आधारित एक कथा, पटकथा संवाद झटपट तयार करून व त्यातल्या भूमिका वठवून आपल्या मनःपटलावर साकारतं हे मला फार थक्क करतं. स्वप्न निर्मिती पासून अनुभूति पर्यंतच्या सर्व भूमिका आपलं मन बजावतं. ज्या कुणाला आपण सर्जनशील नसल्याची खंत आहे त्यांनी याची जरूर नोंद घ्यावी!

कधी तरी कुठे तरी काही तरी पाहिलेलं, वाचलेलं किंवा ऐकलेलं तसंच आपल्या व लोकांच्या वर्तणुकीतलं काही तरी भावलेलं खुपलेलं आदि गोष्टींचं प्रतिबिंब स्वप्नात असतं. पण ही प्रतिबिंबं रूपकात्मक व अमूर्त स्वरुपाची असतात. बर्‍याच वेळेला तर ती दुर्बोध असतात, मोर्स कोडमधे हवामानाचा अंदाज ऐकावा इतकी! त्यामुळे त्यांचा सहजपणे अर्थ लागेलच असं काही सांगता येत नाही. स्वप्नांचा अर्थ नीट उलगडून सांगायला आपलं अंतर्मन काही हिंदी पिक्चरच्या ष्टोरी लेखकाची टोपी घालून बसलेलं नसतं. आपली स्वप्नं डिझायनर स्वप्नं असली तरी काही ठराविक स्वप्नं बहुतेकांना पडतात. उदा. आपल्याला एकंदरितच कमी आत्मविश्वास असेल किंवा आपल्या भवितव्याबद्दल शंका असतील तर परीक्षेत नापास झाल्याचं स्वप्न किंवा उद्या परीक्षा आहे आणि आपली काहीच तयारी नाही झालेली अशी स्वप्नं हमखास पडतात. आपण खोल खोल पडत चाललो आहोत हे अजून एक ष्ट्यांडर्ड स्वप्न! त्यातून असुरक्षितता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सतत वाटणारी चिंता प्रतीत होते म्हणतात.

असुरक्षितते वरून आठवलं. लहानपणी मला नेहमी काही सिंह रात्रीचे आमच्या घराभोवती फिरताहेत आणि घरात घुसायचा प्रयत्न करताहेत असं स्वप्न पडायचं. माझी जाम तंतरायची आणि मी घरभर फिरत सगळ्या दारं खिडक्या बंद आहेत ना ते पुनःपुन्हा बघायचो आणि घामेघूम होऊन थरथरत जागा व्हायचो. अर्थात हे स्वप्न पडायला एक कारण होतं. माझ्या लहानपणी आम्ही पेशवेपार्क जवळ रहायला आलो. त्या आधी चिमण्या कावळे कबुतरं कुत्री आदि सर्वत्र दिसणार्‍या सर्वसामान्य प्राण्यांच्या आवाजी दुनियेचं एकदम सिंहांच्या गर्जना त्यावर माकडांचं जिवाच्या आकांताने ओरडणं, मोरांचं म्यावणं, कोल्हेकुई अशा आफ्रिकेतल्या जंगलातल्या तंबूसदृश दुनियेत परिवर्तन झालं. त्या भीतिचा सुप्त परिणाम स्वप्न पडण्यात झाला असणार. 'मी ड्रग्ज घेत नाही कारण माझी स्वप्नं माझा पुरेसा थरकाप करतात' असं मॉरिट्स एस्कर हा मुद्रणकार म्हणायचा त्यात खूपच तथ्य आहे. मला रोज जंगली श्वापदांचे आवाज ऐकायला येतात हे मी गिरगावात आयुष्य घालवलेल्या एखाद्याला सांगितलं असतं तर त्यानं ताबडतोब वेड्याच्या इस्पितळाला कळवलं असतं. लोकलचा खडखडाट आणि बसचा धडधडाट या पलिकडे आवाज-विश्व न पसरलेल्या मुंबईकरांकडुन अजून काय अपेक्षा करणार? पण लहानपणीच त्या डरकाळ्या ऐकण्याचा सराव झाल्यामुळे माझी एक मानसिक तयारी झाली आहे असं आता मला वाटतं. आता एखाद्या सिंहाने खरंच माझ्या समोर येऊन गर्जना केली तर मला विशेष वाटणार नाही कदाचित!

मनी वसे ते स्वप्नी दिसत असलं तरी स्वप्नी दिसे ते सत्यात उतरे असं पण कधी कधी होतं! डॉ. शेन मॅक्कॉरिस्टिन हा बर्‍याच विषयांवर संशोधन करतो त्यातला एक विषय स्वप्न आहे. त्याला असं सापडलं की पूर्वी इंग्लंड मधील लोक पोलिसांना किंवा वार्ताहरांना त्यांना पडलेल्या विचित्र/चमत्कारिक स्वप्नांबद्दल सांगत असत. इतकंच नाही तर पोलीसही ती माहिती गंभीरपणे घेऊन त्याचा तपास करत असत. हार्ट्लपूल मधे १८६६ साली मिसेस क्लिंटनला (बिल क्लिंटनची कोणी नसावी) एका स्थानिक कामगाराने १५ पौंड किमतीची दोन घड्याळं चोरली असल्याचं स्वप्न पडलं. पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला मँचेस्टर मधे पकडलं. १८९६ साली विल्यम वॉल्टर्स हा खाण कामगार तो जिथे काम करायचा तिथे अपघात झाल्याचं स्वप्न पडल्यामुळे दिवसभर पबमधे बसून राहीला.

असली भविष्यदर्शी स्वप्नं पडायला मी काही द्रष्टा नाही. पण माझ्या एका मित्राला पडत असत त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याचं नाव अरुण! आम्ही तेव्हा बीएस्सीला होतो. कुठल्यातरी सेमिस्टरच्या परीक्षेत अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आलजिब्रा विषयात मला ४० पैकी १६ पडल्याचं कॉलेजमधे समजलं. १६ मार्क म्हणजे काठावर पास! मला धक्का बसला. काठावर पास झाल्यामुळे नाही कारण त्याची मला सवय होती! पण तो पेपर चांगला जाऊनही कमी मार्क पडल्याचा होता. माझं आणि अरुणचं त्यावर बोलणं झालं. दुसर्‍या दिवशी अरुण मला म्हणाला की मला ३६ मार्क मिळाल्याचं स्वप्न त्याला पडलं. मी अर्थातच ते थट्टेवारी नेलं. पण त्याची काही स्वप्नं खरी झाली असल्याचा त्यानं दावा केला. काही दिवसांनी मार्कलिस्ट आल्यावर त्यावर खरंच ३६ चा आकडा पाहून मला दुसरा धक्का बसला. झालं असं होतं की काही कारणाने विद्यापीठातून मार्कलिस्ट पाठवायला वेळ लागणार होता म्हणून कॉलेजने कर्मचारी पाठवून निकाल हाताने कॉपी करून आणवला होता. कॉपी करताना अर्थातच चूक झाली होती.

मी विद्यापिठात चकाट्या पिटत असतानाची गोष्ट आहे. आमच्या विभागातली काही मुलंमुली आणि २ प्रोफेसर खंडाळ्याला एक दिवसाच्या ट्रिपला सकाळी सकाळी ६ च्या सुमारास गेले होते. एक प्रोफेसर एका डोंगरावर नेहमीचा रस्ता सोडून दुसर्‍या जवळच्या पण अवघड रस्त्याने जायला निघाले. त्यांनी वर जाऊन पुढे नीट रस्ता आहे का हे बघून इतरांना सांगायचं ठरलं होतं. काही वेळ झाला तरी त्यांचा आवाज न आल्याने खालून मुलांनी आवाज दिला. उत्तराऐवजी त्या दुर्देवी प्रोफेसरांचा देह घसरत खाली आला आणि मुलांच्या डोक्यावरून आणखी खाली दरीत पडला. मदतीला खाली जाईपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. ही बातमी दुपारी १२ वाजेपर्यंत आम्हाला समजली आणि सर्व विद्यापिठात शोककळा पसरली. एक मुलगी मात्र ओक्साबोक्षी रडत होती. कारण तिला आदल्या रात्री त्या प्रोफेसरांना ट्रिपवर अपघात होईल असं स्वप्न पङलं होतं. त्यामुळे ती सकाळी लवकर विद्यापीठात त्या प्रोफेसरांना जाऊ नका हे सांगायला आली होती. पण तो पर्यंत उशीर झाला होता.

भविष्यदर्शी स्वप्नं हे भलतंच अगम्या व गूढ प्रकरण आहे. असली स्वप्नं पडण्या मागची कारणमीमांसा आत्ता तरी सर्व शास्त्रांच्या पलिकडची आहे. पण सर्जनशील स्वप्नं ही तितकी अचंबित करीत नाहीत. कारण आपल्याच अंतर्मनाच्या चोरकप्प्यात त्या विषयाशी निगडित काहीतरी घोळत असतं आणि त्याचा शेवट स्वप्नात होतो. माझ्या कामाशी निगडित काही कठीण समस्या मला भेडसावत असली तर ती सोडविण्यासाठी मला स्वप्नांमधे क्लू मिळाले आहेत! आचार्य अत्रेंनी 'घराबाहेर' नाटक त्यांच्या स्वप्नात घडलं व दुसर्‍या दिवशी त्यांनी ते फक्त लिहीण्याचं काम केलं असा उल्लेख 'मी कसा झालो' मधे केल्याचा मला आठवतंय. त्यांनी तिथे असंही म्हटलं आहे की वर्तमानपत्रात त्या संदर्भात वाचलेली एक बातमी त्यांच्या डोक्यात दिवसभर घोळत होती. बीटल्सच्या पॉल मॅकार्टनीला Yesterday हे गाणं स्वप्नात झालं असं त्याचंच म्हणणं आहे पण त्याच्या डोक्यात काय घोळत होतं त्या बद्दल मला काही सापडलं नाही अजून.

काही लोकं स्वप्नांच्या मागे पळतात, काही स्वप्नांपासून तर माझ्यासारखे काही स्वप्नांमधे पळतात. मला सांगली मिरज या ट्रेनची बर्‍याच वेळेला स्वप्नं पडायची कारण माझ्या लहानपणी मी सांगलीत काही वर्षं काढली आहेत आणि मला त्या रेल्वेचं अप्रूप होतं. तर माझ्या एका स्वप्नात मी सांगलीच्या दिशेची ट्रेन पकडायला चाललो होतो आणि ट्रेन सुटली. मी ती पकडायला धावतोय धावतोय पण जमत नव्हतं. मग अचानक एका डब्याच्या दारातून खुद्द अमिताभ बच्चनने मला 'अरे पळ पळ लवकर पळ!' असं चिअरिंग केलं. इथेच मला जाग आली आणि त्यामुळे ट्रेन मिळून अमिताभशी गप्पागोष्टी झाल्या की नाहीत ते माहीत नाही. मी तेव्हा या स्वप्नाबद्दल कुणाला सांगितलं नाही कारण परवीनबाबी (सुलताना नाही) व रेखा असल्या सुपरहॉट नट्या स्वप्नात येण्याऐवजी अमिताभ स्वप्नात येतो म्हंटल्यावर माझी इतकी टिंगल झाली असती की त्याची वेगळी स्वप्नं पडली असती.

मला एकदा बंगलोरला जायचं असतं. माझ्या बरोबर एक मुलगा आणि एक मुलगी असतात. ते दोघेही माझ्या ओळखीचे नसावेत. त्यांची नावं लक्षात येत नसतात पण चेहरे उगीचच खूप ओळखीचे वाटत असतात. कधी कधी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर काही अनोळखी माणसं उगीचच आपल्याला चिकटतात ना, त्यातले ते असावेत. हे अर्थातच माझं पोस्ट स्वप्न अ‍ॅनॅलिसिस! तर आम्ही तिघे पुण्याच्या विमानतळावर असतो. विमानतळावर खूप गर्दी असते. आम्हाला नक्की कुठल्या गेटकडे जायचं आहे ते कळत नसतं. आता पुण्याच्या विमानतळावर इतकी गेटं आली कुठुन? पण स्वप्नाच्या दुनियेत तर्कशास्त्राला फारसा वाव नसतो. कुठेही आमच्या विमानाच्या गेटबद्दल माहिती सापडत नाही.

मग त्या गर्दीत भटकता भटकता माझी आणि त्यांची चुकामुक होते. विमानतळाचा सीन अधुनमधुन रेल्वे स्टेशन सारखा वाटत असतो. स्टेशनवर जसे जिने वर खाली करून प्लॅटफॉर्मवर जावं लागतं तसं इथेही करावं लागत होतं. असाच मी एका जिन्यावरून खाली उतरत असताना मला टीसीसारखा कुणी तरी, ज्याला स्टेशनवर काय चाल्लंय याची बित्तंबातमी असते असा, पळताना दिसतो. त्याला मी पळत पळत जाऊन गेटाबद्दल विचारतो. तो पळता पळता अक्षरशः एका बोळाकडे बोट दाखवितो. मी त्या बोळात घुसतो आणि थेट एका रनवे वर येतो. मला माझं विमान टेकॉफ साठी पळायला लागलेलं दिसतं. आता ते माझंच विमान आहे हे मला कशावरून समजलं ते विचारू नका. मी विमानाच्या मागे पळायला लागतो. तेव्हढ्यात तो मघाचा टीसी वायरलेस वरून काही तरी बोलताना दिसतो. मग थोड्या वेळाने ते विमान पळायचं थांबतं आणि रनवेवर चक्क यू-टर्न घ्यायला लागतं. मी हाशहुश करत तिथे पोचतो. विमान यू-टर्न घेतंय म्हणून आतले लोक खाली उतरलेले असतात. गंमत म्हणजे कुणाच्याही चेहर्‍यावर कसलाही वैताग त्रास दिसत नसतो. सगळे हसत खेळत उभे असतात. त्यात मी माझे सोबती शोधून काढतो. त्यातली ती मुलगी आता एका मोटरसायकलला किका मारत असते आणि ती काही सुरू होत नसते. इथे स्वप्न संपतं आणि माझी पळापळही!

मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात पण माझ्या बाबतीत मनी नसे ते स्वप्नी दिसे असं पण थोडंसं आहे. मी एके काळी ऑक्सफर्डला रोज कामासाठी ५० मैलांवरून जात येत असे. पण हे स्वप्न मी ऑक्सफर्डला रहायला लागल्यावर पडलेलं आहे. माझी बायको गाडी घेऊन जाणार असते म्हणून मी रेल्वेनं ऑफिसला जायचं ठरवतो. मी एक तर गाडीने जायचो किंवा बसने त्यामुळे ट्रेनने जायचं कसं काय ठरवलं ते एक कोडंच आहे. मी स्टेशनवर जातो तिथे प्रचंड गर्दी असते. तिथे २ काउंटर असतात. रांगेत उभा राहून एका काउंटरला पोचल्यावर तिकीटाचे पैसे हवाली करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे ३ बॅगा असतात त्यामुळे स्वप्नात ३ कशा आल्या ते मला माहीत नाही. नेहमी मी एक छोटी बॅग घेऊन ऑफिसला जातो. स्टेशनावर सर्व भारतीय लोकच दिसतात. मी काउंटरपासून दूर गेल्यावर माझ्या लक्षात येतं की मी तिकीट घ्यायचं विसरलोय. मग मी परत काउंटरला जातो. मला आता हे आठवत नाही की मगाशी मी कुठल्या काउंटरवर गेलो होतो.

एक ट्रेन गेल्यामुळे गर्दी ओसरलेली असते. मी त्या काउंटरच्या आत डोकावतो. एक क्लार्क झोपायची तयारी करत असतो. मी त्याला माझ्याकडून पैसे घेतल्याचं आठवतंय का ते विचारतो. तो नाही म्हणतो. मग मी दुसर्‍याला विचारतो, त्याला आठवत असतं. तो मला कुठे जायचं आहे ते विचारतो. मी ऑक्सफर्डचं नाव घेतल्यावर तो मला कुठे गाडी बदलायची आहे ते माहिती आहे का विचारतो. मला त्या स्टेशनचं नाव काही आठवत नाही. त्याला ही ते आठवत नसतं. तो कुणाला तरी फोन करून माहिती काढायला जातो तर फोन चालू नसतो. मी माझ्या बायकोला फोन करून माहिती काढायचं ठरवतो. मी फोन बूथ वर जाऊन फोनसाठी एका बॅगेतून चिल्लर काढायला लागतो.

मी चिल्लर काढत असताना एक माणूस माझ्या बॅगेतले पैसे चोरायचा प्रयत्न करतो. माझ्या ते लक्षात येताच माझी त्याच्याशी मारामारी होऊन मी माझे पैसे परत मिळवतो. पण हे करता करता माझी दुसरी बॅग चोरीला गेल्याचं लक्षात येतं. सुदैवाने त्यात काही मौल्यवान नसतं. मग प्रथम मी बायकोला घरी फोन करायचं ठरवतो. पण ती घरात नसेल हे लक्षात आल्यावर तिच्या ऑफिसात करायचा ठरवतो. पण मला तिच्या ऑफिसचा नंबरच आठवत नाही. पहिले ४ आणि शेवटचे ३ आकडे आठवतात पण मधले ३ जाम आठवत नाहीत. शेवटी मी तिला मोबाईल वरून फोन करायचं ठरवतो पण मला मोबाईल वरचं नीट वाचता येत नसतं. मी वाचायचा प्रयत्न करता करता भलतीच कुठली तरी बटणं दाबली जातात आणि काही तरी स्क्रीन रेसोल्युशन इ. सेटिंगचा मेन्यु दिसायला लागतो. मला काही त्या सेटिंगमधून बाहेर पडता येत नाही आणि तिकडे बॅटरी संपत आलेली असते. मी घाईघाईने काही तरी दाबत फोन नंबरांच्या यादीकडे येतो पण विविध प्रकारचे मेन्यु येत जात रहातात. असं करता करता ती बॅटरी आणि स्वप्न एकदमच संपतं. मला वाटतं कधी तरी मला साध्या साध्या गोष्टी न जमल्याची खंत किंवा त्याची बोच या स्वप्नामागचं कारण असावं. पुढे काय होणार ते प्रत्यक्ष पडद्यावर पहा अशी पाटी स्वप्नात कधी येत नसल्यामुळे गुमान आपली उत्सुकता दाबायची आणि पुढल्या स्वप्नाची वाट बघायची इतकंच आपल्याला करता येतं!

स्वप्नात आपण कुणाच्या नकळत, काही काळ का होईना, वेड्यासारखं मनसोक्त वागू शकतो असं कुणी तरी म्हंटलेलं असलं तरी स्वप्नं आपल्याशी हितगुज करत असतात. ते हितगुज वरकरणी तर्कसुसंगत वाटलं नाही तरी मला फार चित्तवेधक आणि मनोरंजक वाटतं.

-- समाप्त --

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) मी जागेवर टेकऒफ घेउन हवेत ब्रेस्ट स्ट्रोक मारुन उडत आहे पण काही अंतर कापले की कंपल्सरी खाली उतरावे लागे.
२) मी दरीत पडतो आहे. डोळे मिटुन घेतो पण प्रत्यक्षात जमीनिवर मात्र अलगद उतरतो
३) बेसीनवर चूळ भरत असताना चूळीबरोबर दात पण बेसीन मधे पडू लागतात.
अशा प्रकारची स्वप्ने नेहमी पडायची. स्वप्नांची दुनिया काही अजबच असते.

लेख खूपच रिलेट झाला. मलापण अशीच स्वप्ने पडत असतात. एखादा सिनेमा पहावा तशी. अत्रेंनी 'घराबाहेर' बद्दल लिहीलय अगदी तसंच. मध्येच झोपमोड झाली तर परत झोपल्यावर स्वप्नपण continue होते. प्रत्येक स्वप्नाची स्टोरीलाईन/ त्यातली माणसे वेगळी असली तरी लोकेशन मात्र खूपदा लहानपणचे घर असते.
वाघ- सिंहाचा प्रत्यक्ष कधीच संबंध आला नाहीये तरी माझ्यापण स्वप्नात येतात बर्याचदा.

लेख अगदीच रिलेट झाला. मला कायम स्वप्न आठवतात, अगदी डिटेल. मला स्वप्नात कथा दिसतात. कट्टा क्रू ने जी शॉर्टफिल्म केली आहे तिची कथा मला सिनेमा दिसावा तशीच स्वप्नात दिसली होती. सकाळी मी ती थोडी फाईन ट्युन करुन लिहून काढली. त्या स्वप्नामागे दिवसभरातल्या काही बघितलेल्या, घडलेल्या घटना कारणीभूत होत्या हे ही खरय.

मला तू लिहील्येस तशी पुढे जाऊन सेम तसं खरं घडणारीही स्वप्न आधी पडतात. त्यामागचा तर्क मला माहिती नाही पण हे घडतं याचा अनुभव मी आणि काही जवःळच्या मित्र मैत्रिणींनी घेतला आहे.

त्येक स्वप्नाची स्टोरीलाईन/ त्यातली माणसे वेगळी असली तरी लोकेशन मात्र खूपदा लहानपणचे घर असते.>>> हे ही डिट्टो. माझी बरीचशी स्वप्न ही माझ्या आजोळच्या घरी घडतात. त्यात कधी कधी माझे सगळे जवळचे आत्ता हयात असलेले नसलेले नातेवाईकही असतात.

मस्त, खूपच रीलेट झालं..
मला नेहमी गणिताच्या पपरला जात असल्याचं स्वप्नं पडतात, आणि माझा अभ्यास झालेला नसतो. Happy

मस्तच लिहिलय. आवडले.
मला हार्मोनिअमवर भिमसेन जोशींचे ‘आपण गेलो, विश्व बुडाले’ काही केल्या जमत नव्हते. एकदा स्वप्न पडले की मित्राने त्याच गाण्याची फर्माईश केली आणि मी ऊत्तम वाजवले. वाजवतानाच मला लक्षात आले की आपल्याला हे गाणे येत नाही. त्यामुळे माझेच वाजवणे मीच बारकाईने पाहिले. सकाळी ऊठुन मी प्रयत्न केला आणि मला तंतोतंत नोटेशन सापडले. Happy

छान लेख.
५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात.>> एवढंच नाही, तर बरेचदा या ५ स्वप्नातल्या घटना एकमेकांत मिसळून त्यातलं पण फार थोडंसं सकाळी आठवतं Happy
शाली यांचं स्वप्न आणि सत्य दोन्ही फार आवडलं !

चिमण ,
आम्हीपण पेशवे उद्यानाजवळ रहायचो. त्या काळी पेशवे उद्यानाचे सर्व दरवाजे चोवीस तास उघडे असायचे. त्यामुळे घरून शाळेत जाण्या-येण्याचा मार्ग उद्यानातूनच असायचा. गंगा- जमुना आणि सोनाली सिंहीण ; अनारकली हत्तीण ( दुसर्या हत्तीचे नाव आठवत नाही आता) वगैररेरोजच्या जीवनातले शेजारी होते. दिवसात ३-४ वेळा सिंहांचा डरकाळीचा कार्यक्रम असे.
मलाही लहानपणी पेशवे बागेतून सिंह सुटून बाहेर आला आहे असे स्वप्न नेहेमी पडायचे आणि तो आमच्या बिल्डिंगच्या जिन्यात पोहोचलेला मला खिडकीतून दिसतोय ... आणि इथेच कायम स्वप्न संपायचे !

भारीये....

पेशवेबागेतील दुसरी हत्तीण.... सुमित्रा... Happy

चिमण खरं सांग, शेवटचे २-३ पॅरा खरे आहेत ना? Wink
मला दाट शंका आहे की तु रियलिटी थोडी फार मोडिफाय करुन स्वप्न 'बनवलय'.

सगळ्यांना धन्यवाद!
>> बेसीनवर चूळ भरत असताना चूळीबरोबर दात पण बेसीन मधे पडू लागतात.
आता मला हे प्रत्यक्षात होईल की काय अशी भीति वाटण्याइतकं वय होतंय, प्रकाश Lol

>> वाघ- सिंहाचा प्रत्यक्ष कधीच संबंध आला नाहीये तरी माझ्यापण स्वप्नात येतात बर्याचदा.
चैत्रगंधा, तुला रिंगमास्टर व्हायचं आकर्षण आहे का? Proud

>> त्यात कधी कधी माझे सगळे जवळचे आत्ता हयात असलेले नसलेले नातेवाईकही असतात.
हो कवे, मला पण पडतात तसली स्वप्नं.

>> ते दरीत पडायचं स्वप्न कॉमने काय ?
हो बागुलबुवा!

शाली, मी गायक नसल्यामुळे संगीत समस्या मला भेडसावत नाहीत. पण समस्येवर स्वप्नात तोडगा मिळण्याचं हे चांगलं उदाहरण आहे.

पशुपत, तुझ्या प्रतिक्रियेमुळे परत तो काळ डोळ्यासमोरून गेला Happy

>> मला दाट शंका आहे की तु रियलिटी थोडी फार मोडिफाय करुन स्वप्न 'बनवलय'.
अग्न्या, माझी शिक्रेटं अशी चारचौघात नाय सांगायची राव!

चैत्रगंधा, तुला रिंगमास्टर व्हायचं आकर्षण आहे का? >> > Lol नाही. कदाचित माझा मागचा जन्म व्याघ्र असल्याने असेल का? :विचारात पडलेली बाहुली:
मोबाईल जमान्यापूर्वीच्या कॉईन बॉक्सच्या काळात हमखास पडणारे स्वप्न म्हणजे माझे एकच कॉईन उरले आहे. ते टाकलेय आणि नंबर डायल करायला जातेय तर फोन लागतच नाहीये / नंबर आठवत नाहीये.

छान लिहिलंय. Happy आवडलं!

मला आजच स्वप्नात एक अजगर आणि एक कोब्रा दिसला. अजून भीती वाटतेय!

अमित, द्वादशांगुला, निलुदा, बब्बन धन्यवाद!

>> माझ्या स्वप्नात वेगवेगळ्या ग्रुप मधील मित्र एकत्र येतात. ते एकमेकाना ओळखत नाहित तरिही...
बब्बन, हे स्वप्न तुला मायबोलीवर यायला लागल्यापासून पडायला लागलं का? Happy

>> मला आजच स्वप्नात एक अजगर आणि एक कोब्रा दिसला. अजून भीती वाटतेय!
द्वादशांगुला, तू सर्पोद्यानाजवळ रहातेस की कॉय? Proud

लेख विनाकारण पाल्हाळीक व म्हणून कंटाळवाणा झाला आहे. पहिले चार परिच्छेद नसते तरी चालले असते. आता जरा गती येतेय वाटले तेवढ्यात शेवटचे चार परिच्छेद पुन्हा एकदा पाल्हाळीक होतात. सुरवातीच्या आणि शेवटच्या चार चार परिच्छेदांची अजिबात गरज नाही.

द्वादशांगुला, तू सर्पोद्यानाजवळ रहातेस की कॉय? >>>>> Rofl नाही हो! पण दोनेक वर्षांपूर्वी डिस्कवरी चॅनल , खासकरुन वेगवेगळे साप दाखवायचे तो प्रोग्राम सारखा बघायचे ! नंतर नंतर आईला किळस, भीती वाटायला लागली, तेव्हा तिने बंद करायला लावलं. Lol

पण काही दिवसांपूर्वी एक घोणसाचं पिल्लू आणि गेल्या रविवारी साक्षात घोणस साप पाहून प्राचीन काळी इथे सर्पोद्यान असावं, ही शंका बळावतेय ! Uhoh

पण बाकी ते घोणस पिल्लू फार म्हंजे फार क्युट होतं ! Proud

Lol

मस्त लिहीले आहे. अशी स्वप्नं का पडतात काही समजत नाही. कधी टिव्ही वर आदल्या दिवशी बघितलेल्या घटना मॉडिफाय होऊन स्वप्नात दिसतात पण कधी काहीही संबंध नसलेली स्वप्नं पडतात. काही वेळेस तर अगदी लहानपणी जवळ राहणारा मित्र दिसतो स्वप्नात आणि आपल्याला कळतच नाही काय घडतंय ते.