हुंदका

Submitted by ध्येयवेडा on 19 June, 2018 - 12:27

योगेश फोनवर हुंदके देत देत बोलत होता. तितक्यात बेल वाजली.
कोणीतरी आलंय, पुन्हा फोन करतो" असं सांगून त्यानं फोन कट केला. आवंढा गिळला आणि दार उघडलं.
"अरे सुरेखा? ये .. ये ... आज कशी वाट चुकली?" चेहऱ्यावर हास्य आणत त्यानं स्वागत केलं.
"सुयशंच लग्न आहे पुढच्या महिन्यात. त्याची पत्रिका द्यायला आले."
"बैस. पत्रिका द्यायला एकटीच? भावजी कुठायत? थांब हा बाबांना बोलावतो" योगेश घाईघाईत आत गेला.
"कोण आलंय" असं म्हणत वाट चाचपडत येणाऱ्या बाबांना योगेशनं आधार दिला. बाबांना खुर्चीत बसवून तो पुन्हा आत निघून गेला.

"कोण? सुरेखा का? काय म्हणतीयेस? कसं चाललंय ?"
"आम्ही मजेत. सुयशच्या लग्नाची तयारी चाललीये. त्याचीच सगळी गडबड. तुमची तब्येत काय म्हणतीये?"
"मी बराय. दिसायला थोडा त्रास होतो, आणि ऐकायला थोडं कमी येतं. वयानुसार होणारच आता" एक क्षण थांबून आजोबा पुन्हा बोलले. "आमची ही गेले तीन चार महिने अंथरुणाला खिळलीये.. काही बोलत नाही, फार हालचाल नाही. अन्न पाणी नळीवाटेच. ते ही अगदी थोडं. सगळ्या क्रिया अंथरुणातच.. तिचंच जरा..." आजोबांनी वाक्य अर्धवट सोडून दिलं.
सुरेखा लगेच उठून आजीला बघायला आतल्या खोलीत गेली. योगेश खिडकीतून बाहेर बघत पाठमोरा उभा होता. सुरेखा आत आलीये त्याची चाहूल सुद्धा त्याला लागली नाही.
पलंगावर आजी निश्चल पडून होती. सलाईन मधून येणारी नळी अंगावर अंथरलेल्या पांघरुणाच्या आड लपली होती.
सुरेखाला वाईट वाटलं. तिला आपल्या लहानपणीचे दिवस भर्रकन डोळ्यासमोरून गेलेले दिसले. शेजारीण असली तरी आजीनं तिला स्वतः:च्या नातीसारखं प्रेम दिलं.
इतक्या वर्षात आपण आजीला भेटायला सुद्धा येऊ शकलो नाही ह्याची तिला खंत वाटली. इच्छा असूनही आज आजीसमोर ती आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हती.
आजीच्या अश्या परिस्थितीत कोण काय करणार? आजीची लवकर सुटका कर इतकी प्रार्थना तिनं देवाला केली.
ती बाहेर आली. दोन मिनिटं एकटक आजोबांकडे बघत होती. आजोबा आपल्या जाड भिंगाच्या चष्म्यातून इकडे तिकडे बघत होते.
दोन मिनिटं शांततेत गेली.
सुरेखानं पिशवीतून पत्रिका बाहेर काढली आणि आजोबांच्या हातात ठेवली.
"आजोबा, येत्या २० तारखेला सुयशंच लग्न आहे... त्याला आशीर्वाद द्यायला नक्की यायचं हा" तिनं भानावर येत आमंत्रण केलं.
"अरे वा वा .. हो मी नक्की येणार. पण आमची 'ही' येईल की नाही जरा शंकाच आहे. तोपर्यंत बरी झाली तर ठीक. कारण अनेक दिवस झोपूनच आहे ती..... अरे योगेश, जरा हातावर साखर तरी ठेव हिच्या."
आजीची परिस्थिती इतकी गंभीर असून सुद्धा आजोबांना कुठेतरी असं वाटतंय की ती बरी होईल; हे बघून सुरेखाचा कंठ दाटून आला.
बाबांचा आवाज ऐकून योगेश बाहेर आला. त्यानं तिच्या हातावर साखर ठेवली. सुरेखानं फार वेळ न रेंगाळता तिथून काढता पाय घेतला.
जाता जाता अंथरुणात शांत पडलेल्या आजीकडे सुरेखानं एक नजर टाकली.
जिने उतरताना योगेशची बहीण गौरी आणि तिचे मिस्टर वर येताना दिसले. त्यांना तिथेच उभ्या उभ्या आमंत्रण देऊन सुरेखा निघून गेली.

आठवड्याभरातच आजी गेल्याची बातमी सुरेखाच्या कानावर पडली.

बेल वाजली म्हणून सुरेखानं दर उघडलं. समोर आजोबा उभे होते. तिनं त्यांना सोफ्यावर बसवलं आणि पाणी आणून दिलं.
"कसे आहात आजोबा?"
"बराय, योगेशला म्हटलं चल आज सुरेखाचं घर बघून येऊ, म्हणून आलो. तो मला सोडून गेला त्याच्या कामाला...जाताना तू फक्त रिक्षात बसवून दे तेव्हडं".
आजोबांचं घरी येणं तिला अनेपक्षित होतं. पण आजी गेल्याच्या धक्क्यातून ते सावरले आहेत आणि हिंडत फिरत आहेत, बोलत आहेत ते बघून तिला बरं वाटत होतं.
"सुयशंच लग्न उत्तम झालं बघ. जेवण सुद्धा मस्त होतं. मला येता आलं लग्नाला. कारण 'हि'चे सगळे दिवस झाले होते. सुयशच्या लग्नादिवशी सोळावा दिवस होता तिचा. घरी बसून किती दु:ख करायचं. म्हटलं जाऊयात लग्नाला. नवदांपत्याला आशीर्वाद तरी देऊन येऊ" बोलता बोलता आजोबांना हुंदका अनावर झाला.
सुरेखानं त्यांना जेवायला वाढलं. थोड्या गप्पा झाल्या. दुपारी थोडी विश्रांती आणि चहा घेऊन आजोबांना तिनं रिक्षात बसवून दिलं.

घरी आल्या आल्या तिनं कॅलेंडर बघितलं. सुयशच्या लग्नाच्या सोळा दिवस आधी. त्या तारखेवर बोट आलं तसं ती स्तब्ध झाली.
आजोबांना आमंत्रण करताना आजीचा फक्त देह तिथे होता. आजी सर्वांना सोडून आधीच निघून गेली होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह्ह...

म्हणुन योगेश आधीच रडत होता.... >>>.. + १११ याचा अर्थ अगदी शेवटालाच कळतो. छान लिहीलयं
पुलेशु.

आजोबा आणि परिवाराने सुरेखाच्या भावना जपल्या, किती सहज आणि तरीही किती अवघड.

छान कथा

सर्वांना धन्यवाद.
प्रतिसाद आले कि लिहायला अजून उत्साह येतो. Happy

खूप छान!
कथा जशी मांडली आहेस तशीच घडते आणि जशी घडत आहे तशीच्या तशी मांडली आहेस! अगदी सहज!

Pages