गुडाकेश. (शतशब्दकथा)

Submitted by दासानु दास on 15 June, 2018 - 11:21

त्याचा प्रचंड वेग आज सर्वांना चकीत करत होता. त्याचे ऐश्वर्यही त्याच वेगाने त्याचा पाठलाग करत होते. परंतू, ती सुद्धा ह्या खेळात नविन नव्हती. आजपर्यंत भल्याभल्यांना तीने धूळीत मिळवलं होतं, तो तर केवळ एक कच्चा खेळाडू होता.

ती बरोबर वेळ साधून त्याच्या समोर आली, आणि त्यांची नजरानजर झाली. काय नव्हतं त्या नजरेत, साक्षात कामदेवालासुद्धा घायाळ करण्याचं सामर्थ्य होतं तिच्या नजरेत! तो तर एक बालक होता.

फक्त क्षणभरासाठी त्यांची नजरानजर झाली, बस्स! पुढच्याच क्षणी तीच्या शिगेला पोहोचलेल्या अहंकाराचा कचरा झाला होता. हा तिच्यासाठी एक अनपेक्षित धक्का होता....

कारण त्याला इतक्या जन्मांनंतरही ते शब्द आठवत होते, ".... मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लिहिलंय
फक्त ते >>आणि त्याला इतक्या जन्मांनंतरही ते शब्द आठवत होते, ">>> ऐवजी
कारण त्याला इतक्या जन्मांनंतरही ते शब्द आठवत होते, " ― असे केले तर अधिक छान होईल असे वाटते

ती- निद्रा
तो- अर्जून
अर्जून गूडकेश होता, निद्रेवर विजय मिळवला होता त्याने.

गूडकेश.. निद्रेवर विजय..
हे आणखी समजवा ना जरा.. नेमका काय प्रकार आहे?
तसेच संस्कृत श्लोकाचा अर्थही सांगा कोणीतरी..

धन्यवाद अंबज्ञ, बदल केला.

धन्यवाद शितल! पण गुडाकेशाचा अजून एक अर्थ होतो: ज्याने भगवंताच्या बहिरंगा शक्तीवर (माया) विजय मिळवला आहे. पण तुम्ही सांगितलेला अर्थही योग्य आहे. माया म्हणजे अशी शक्ती जी आपल्याला लक्ष्यापासून परावृत्त करते.

संस्कृत श्लोकाचा अर्थः कृष्ण म्हणतो, "तीन प्राकृतीक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे; परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरून पलीकडे जातात" भ. गी. ७.१४

ओह, अर्जुनाचं नाव गुडाकेश आहे का? मी कृष्णाचं समजत होते. तरी वेग आणि ऐश्वर्याचा रेफरन्स नाही लागला अजून.

तरी वेग आणि ऐश्वर्याचा रेफरन्स नाही लागला अजून>>> वेग म्हणजे जीवनाच्या ध्येयप्राप्तीकडे जाण्याचा वेग. (माया अश्या वेगवान लोकांवरच निशाना साधते.) आणि त्याच वेगात त्याचे भौतीक ऐश्वर्यही वाढत होते.