चाहूल (शतशब्दकथा)

Submitted by स्वप्ना_राज on 14 June, 2018 - 05:20

त्याने कानोसा घेतला. रात्रीच्या शांततेत कुलूप उघडल्याचा केव्हढातरी मोठा आवाज झाला. त्याला आश्चर्य वाटलं. इथे तर सगळी सेकंड होम्स होती. दोन महिन्यांपूर्वी रहायला आल्यापासून त्याने केअरटेकर्सशिवाय इथे कोणालाही पाहिलेलं नव्हतं. रात्री तर शुकशुकाट असायचा. सिक्युरिटी गार्डससुध्दा क्कचितच फेरी मारायचे.

कडी काढल्याचा आवाज आला तेव्हा मात्र तो सावध झाला. आपल्याच बंगल्याचा दरवाजा कोणीतरी उघडतंय हे त्याच्या लक्षात आलं. वरच्या मजल्याच्या जिन्यावरून त्याने हळूच वाकून पाहिलं. एक मध्यमवयीन जोडपं सामान घेऊन आत शिरत होतं.

आधी तो गोंधळला. पण मग खाली येऊन त्यांच्यासमोर उभं राहायचं त्याने ठरवलं. त्याच्या तिथे असण्याने त्यांना फरक पडायची शक्यता फार कमी होती.....

......कारण भूतं थोडीच सगळ्या माणसांना दिसतात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

MAST