दरी

Submitted by मोहना on 7 June, 2018 - 22:08

"सर" लांबून कुठूनतरी लहान मुलीचा आवाज कानावर पडल्यासारखं वाटलं त्याला. फळा पुसता पुसता त्याने मागे वळून पाहिलं. मुलांच्या नजरा फळ्यावर होत्या. भास झाला असेल असं वाटून पंकजने हाताने खडूची पावडर झटकली. तो हात पाठीमागे बांधून बाकांच्या मधून फिरत राहिला. मुलांच्या चेहर्‍यावरचा कोवळेपणा निरखून पाहता पाहता त्याला बिल्वाची आठवण येत होती. कशी दिसत असेल? १४ वर्षाची असेल आता. म्हणजे जवळजवळ याच मुलांएवढी. ओळखेल? स्वीकारेल? तिला मुळात आपल्याबद्दल काही माहीत असेल? मनात येणार्‍या प्रत्येक प्रश्नाबरोबर त्याच्या फेर्‍यांचा वेग वाढत होता. आपण वर्गात आहोत. बाकांच्या मधून फेर्‍या मारतोय. मुलं आपण फळ्यावर लिहिलेलं वहीत उतरवतायत हेच तो विसरला.
"सर" कानावर पडलेल्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. दचकलाच तो.
"अं?" त्याचा गोंधळ वर्गातल्या सर्वांना जाणवला तशी वर्गात खिसखिस पिकली. तो चिडला.
"हसायला काय झालं?" सगळी एकदम शांत झाली. आता त्याला हसायला यायला लागलं. खूप जोरात. त्याने प्रयत्न केला पण थांबवताच येईना हसणं त्याला. त्याचं हसणं बघून मुलांनाही हसायला यायला लागलं. त्याच्याबरोबरीने हसणारी मुलं शांत झाली तरी तो हसत राहिला. कितीतरी वेळ. मग त्याच्या लक्षात आलं की आपण एकटेच हसतोय. बरोबरीने हसणार्‍या मुलांच्या चेहर्‍यावरचं उमटलेलं आश्चर्य त्याला जाणवलं. आता मात्र तो शांत झाला.
"मगाशी कुणी हात वर केला?" ती मुलगी उठून उभी राहिली.
"हं, काय?"
"काही नाही सर."
"काही नाही सर काय? तूच हाक मारली होतीस ना?"
"हो."
"मग?"
"फळ्यावर काय लिहिलं आहे ते कळत नव्हतं. पण समजलं आता."
"नाव काय तुझं?"
"बिल्वा."
"पूर्ण नाव सांगायची पद्धत नाही का?"
"बिल्वा पंकज आजगावकर."
"काऽय?" त्याला एकदम धक्का बसला.
"बिल्वा पंकज आजगावकर सर." ती घाबरुन पुटपुटली. तो तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. ती संकोचली. वर्गातल्या मुलांच्या नजरा पंकजकडे रोखल्या गेल्या. पण त्याचं कशाकडेही लक्ष नव्हतं. तो तिला निरखत राहिला. नाही, ती ही नव्हती. नक्कीच ही त्याची बिल्वा नव्हती. त्याने इथे येण्याआधी खात्री करुन घेतली होती. तिची शाळा, गाव सारंच निराळं होतं. पण दोघींची नावं इतकी सारखी?
"बस तू. काही विशेष नाही. माझा थोडा गोंधळ झाला." त्याने तिला बसायला सांगितलं. तितक्यात शाळा सुटल्याचीच घंटा झाली. तो निमूटपणे रस्त्याला लागला. स्वत:तच गुरफटलेला, अस्वस्थ. विचार करुन करुन मेंदू बधिर होईल असं वाटतं होतं. संपवून टाकावंसं वाटत होतं सगळं पुन्हा त्याच मार्गावर जाण्याआधी. गाड्यांचे, माणसांचे कोणतेच आवाज आता त्याच्या कानापर्यंत पोचत नव्हते. एकातून एक, अनेक प्रश्न मनात घोटाळत होते. जमेल? लिहावं पत्र? भेटेल ती? गेली कितीतरी वर्ष बरोबर असलेले तेच प्रश्न आताही त्याच्या मागे लागल्यासारखे कानात तसेच घुमत राहिले.

"बिल्वा, किती वेळ लोळत पडणार आहेस. ऊठ आता." बिल्वाने डोळे किलकिले करत आईकडे पाहिलं आणि पुन्हा डोक्यावरून चादर ओढून तिने पाय पोटाशी घेतले. पण आई सहजासहजी जाणार नाही हे ठाऊक होतं बिल्वाला. तसंच झालं. ती टेकलीच तिच्या बाजूला पलंगावर. चादरीवरच एका लयीत थोपटत राहिली. बिल्वा चादरीच्या आतून आई जाण्याची चाहूल घेत राहिली. ती तिथून उठून गेल्याची खात्री झाल्यावरच बिल्वाने चादर बाजूला केली. सवयीने तिने स्वत:चं आटोपलं पण कोणत्याच गोष्टीत उत्साह वाटत नव्हता. काल आईने हातात ठेवलेलं पत्र. तिला ठाऊक होतं, आईला त्या पत्राबद्दलच बोलायचं असणार. एरवी दारातून हाक मारुन निघून जाते ती. नाहीतर स्वयंपाकघरातून हाकांचा सपाटा चालू असतो. दार ओढून घेत तिने ते पत्र पुन्हा वाचलं. आईने ते पत्र हातात दिल्यापासून इतक्या वेळा वाचून झालं होतं की त्यातलं अक्षर न अक्षर पाठ झालं होतं. तरीही वाचावंसं वाटत होतं पुन्हा पुन्हा.
प्रिय बिल्वा,
आज तुला पहिल्यांदाच पत्र लिहितोय. गेल्या कितीतरी वर्षात मी तुला पाहिलेलं नाही. नेमकं सांगायचं तर ११ वर्षात. या ११ वर्षात मी तुला कितीतरी पत्र लिहिली. पण लिहिली ती फाडून टाकण्याकरताच. धीरच झाला नाही पत्र पेटीत टाकण्याचा. आता संगणकाचा जमाना आहे पण तुझा इ मेल पत्ता माझ्याकडे नाही. तुझं नाव घालून शोधायचा प्रयत्न केला आंतरजालावर. पण नाही सापडलीस तू. त्यामुळे पत्र हाच मार्ग योग्य वाटला. मी परत आलोय भारतात. कायमचा. एकदा, एकदाच तुला भेटायची इच्छा आहे. अगदी खरं सांगायचं तर मला हे ही ठाऊक नाही की तुला माझ्याबद्दल काय आणि कितपत ठाऊक आहे. तुझं आडनाव चौधरी असलं तरी तू माझी मुलगी आहेस. बिल्वा पंकज आजगावकर. तुझ्या आत्याने तुला दत्तक घेतलंय म्हणून तू चौधरी. हे इतकं तरी ठाऊक आहे का तुला? तुझी आताची आई आहे ती माझी सख्खी बहीण आहे. माझ्या हातून तुझी आई मारली गेली. खून केला मी तुझ्या आईचा. या घोर अपराधाची शिक्षा तुला भोगायला लागू नये यासाठीच आत्याने तुला दत्तक घेतलं. त्यालाही बराच काळ झालाय. कायदेशीर रित्या तुझा ताबा तिच्याकडे गेल्यावर ताईने माझ्याशी एकदाही संपर्क साधलेला नाही. म्हणूनच मला थेट तुलाच भेटायचं आहे. मध्ये कुणी नको. मला ठाऊक आहे, हे पत्र ती आधी वाचेल आणि मगच तुझ्या हातात ते पडेल. हरकत नाही. पण मला तुला काय घडलं ते माझ्या तोंडून सांगायचं आहे. प्रत्यक्ष भेटूनच. भेटशील? माझा पत्ता देतोय. फोन नंबरही. वाट पाहतोय मी तुझ्या फोनची, भेटीची. - तुझे बाबा.

पत्र हातात घेऊन ती तशीच बसून राहिली. तेवढ्या वेळात काका दोनदा आत येऊन चक्कर टाकून गेले हे तिच्या लक्षात आलंच. तिला हसायलाच आलं. अवघी १४ वर्षाची असली बिल्वा तरी काकांची अस्वस्थता तिला समजत होती. काका आणि आई दोघांनाही त्या पत्रात काय असेल त्याची उत्सुकता असणार. बाबांना वाटलं तसं ते पत्र दोघांनीही फोडलं नव्हतं. तिच्या हातात दिलं होतं. पण ती जशी रात्रभर जागी होती तसेच ते दोघंही असणार. ती ते पत्र घेऊन उठली. बैठकीच्या खोलीत आली. दोघंही बेचैन होऊन बसले होते.
"हे घ्या." तिने ते पत्र काकांकडे दिलं. काका आणि आई दोघांनीही जवळजवळ हिसकावलंच तिच्या हातून. वाचून झालं तसं दोघंही तिच्याकडे बघत राहिले.
"भेटू मी बाबांना?" तिने चाचरत विचारलं. आत्याने काकांकडे पाहिलं. काकाही काही न सुचल्यासारखे आत्याकडे पाहत राहिले.
"मी बाबांना भेटायला गेले तरी कायमची नाही जाणार त्यांच्याकडे. मी तुमचीच आहे. तुमची दोघांची." बिल्वाने आईच्या गळ्यात हात टाकले. तिच्या हातांवर आई कितीतरी वेळ थोपटत राहिली.
"सांग ना गं. काका तुम्हीतरी बोला ना काहीतरी. तुम्ही दोघं नाही म्हणत असाल तर नाही भेटणार मी बाबांना. पण मला त्यांना भेटायचं आहे. खरं सांगू, जाब विचारायचा आहे. असं कृत्य करताना क्षणभरही माझा विचार डोकावला नाही का मनात ते विचारायचं आहे." आपल्या टपोर्‍या डोळ्यातून पाणी न येऊ देण्याची खबरदारी घेत बिल्वा म्हणाली.
"भेट तू पंकजला. मलाही भेटायचं आहे त्याला. सख्खी बहीण भावंडं आम्ही. पण एकमेकांना कधी ओळखलंच नाही असं वाटतंय आज. त्याने जे केलं ते तर कल्पनेपलीकडचं होतं. अवघी ३ वर्षाची होतीस तू. अजाण वय. आमच्या सगळ्यांच्याच हातून निसटली असतीस तू त्या परक्या देशात म्हणून घाई घाईत निर्णय घ्यावा लागला तुला दत्तक घ्यायचा. पर्यायच नव्हता. पंकजने तेव्हाही खूप त्रास दिला. आणि आज इतक्या वर्षानंतरही त्याला प्रश्न पडलाय की तुला किती आणि काय सांगितलंय आम्ही. स्वत: नालायक निघाला तो निघालाच. मलाही तोलतोय त्याच तराजूत. पण पिल्लू, काही लपवलं नाही गं तुझ्यापासून आम्ही. जशीजशी तुला समज येत गेली तसतसं थोडंफार, तुला समजेल असं सांगितलं. कधीतरी वाटायचं, तुझं सगळं मार्गी लागलंय. तो नाही म्हटलं तरी एकटा पडलाय. परक्या देशात. इथे आपले नातेवाईक आहेत. तिथे आहे कोण त्याला. खचून गेला असेल. कधीतरी लिहावं पत्र, करावा एखादा फोन. पण काळजावर दगड ठेवून संबंधच संपवले मी. तुझ्यासाठी बिल्वा. तुझ्या भल्यासाठी." आईला हमसाहमशी रडताना पाहून बिल्वा गोंधळली. काकांकडे पाहायला लागली.
"तुला त्रास होऊ नये, तुझं बालपण पंकजच्या वागण्याने गढूळ होऊ नये असं वाटायचं तिला. तू नकळत्या वयात त्याच्या संपर्कात राहिली असतीस तर परिस्थितीने तुला मोठं करुन टाकलं असतं असं मत होतं तिचं, आमचं दोघांचंही. त्यामुळे नाईलाजाने तिने स्वत:च्या भावाला आपल्या आयुष्यातून दूर केलं. वेगळ्या शब्दात सांगितलं असेल पण हे तुला आधीच सांगून झालंय आमचं. पण पंकजने, आम्ही पत्र वाचून मग तुझ्या हातात दिलं असेल अशी शंका व्यक्त केली आहे ना ते आवडलेलं नाही तुझ्या आईला. म्हणून थोडी वैतागली आहे. हो ना गं?" बिल्वा आईकडे पाहून हसली. काका आईची बाजू घेऊन तिला समजावू पाहतायत की त्यांचीही अस्वस्थता लपवतायत ते तिला समजेना. लहान असली तरी ती तिच्या बाबांना भेटू इच्छितेय याचं दोघांवरही दडपण आलंय हे तिला कळत होतं पण काय केलं की त्यांना ते निरर्थक आहे, ती त्यांचीच मुलगी आहे आणि कायम त्यांचीच राहील हे पटेल ते तिला कळत नव्हतं. ती काकांना जाऊन बिलगली. प्रेमाने तिच्या केसावर थोपटत काका म्हणाले,
"आता आलाय ना तो इथे तर आपण त्याला घरीच बोलवू. एकदा काय ते बोलून घ्या तुम्ही दोघी त्याच्याशी. मी थांबेन पाहिजे तर." दोघींनी मान डोलवली.

बिल्वाने पुन्हा एकदा ते पत्र वाचलं आणि धडधडत्या काळजाने तिने फोन फिरवला. बराचवेळ फोन वाजत राहिला आणि कुणीतरी धावतपळत आल्यासारखा फोन उचलला.
"बिल्वा? बिल्वा ना तू?" पंकजने घोगर्‍या आवाजात विचारलं. त्याच्या हाताला कंप फुटला होता पण फोन बिल्वाचाच होता याची त्याला खात्री होती. दुसरं कोण करणार होतं त्याला फोन? चार दिवसापूर्वी ते पत्र त्याने पेटीत टाकलं होतं. तेव्हापासून तो फोनची वाटच पाहत होता.
"बिल्वा. बोल गं. काहीतरी बोल." त्याच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. बिल्वाचा आवाज ऐकायला तो उत्सुक होता.
"मी विक्रांत बोलतोय."
"अं?" पंकज गोंधळला.
"फोन बिल्वाने केला पण मी तिच्या हातून घेतला. कसा आहेस तू?"
"मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? ताई?"
"आम्ही सगळे ठीक आहोत. तुझं पत्र बिल्वाने दिलं आम्हाला वाचायला. कधी येतोस? बिल्वाची तुला भेटण्याची इच्छा आहे. तुझ्या ताईलाही भेटायचं आहे तुला." बिल्वाला बाजूला करुन विक्रांतने फोन घेतला तेव्हा त्याला वाटलं आता बिल्वाची भेट होणं अशक्यप्राय. पण विक्रांत घरी बोलावतोय. शक्य आहे हे? खरंच का बोलावतोय तो घरी? मनातल्या शंका कुशंका त्याने आतल्या आत गाडून टाकल्या.
"विक्रांत, बिल्वाची मन:स्थिती आहे मला भेटण्यासारखी? तिला किंवा तुम्हा दोघांना त्रास होईल असं माझ्या हातून काही होऊ नये असं वाटतं मला."
"उशीरा आलेलं शहाणपण आहे हे पंकज. पत्र तर पाठवलंस आणि आता असं विचारतोस. पण बिल्वा आमची मुलगी आहे. एवढ्या तेवढ्याने कोसळून जाणारी नाही ती. तिला आम्ही कोणत्याही प्रकारे अंधारातही ठेवलेलं नाही. तेव्हा ये तू. तू भारतात कायमचा आला आहेस. आपण एकाच गावात आहोत पण तुझ्या संपर्कात राहायचं की नाही हे केवळ बिल्बा आणि बिल्वाच ठरवेल. आणि ती जे ठरवेल त्याला तुझ्या ताईचा आणि माझा पाठिंबा असेल. हे मान्य असेल तर आजच ये. मग बोलू आपण." विक्रांतने फोन ठेवलाच. हातातल्या फोनकडे पंकज बराचवेळ पाहत राहिला. बिल्वाला भेटायचं ही काळ्या दगडावरची रेघ होती पण विक्रांतच्या आवाजातला ठामपणा ऐकून नाही म्हटलं तरी डळमळायला होत होतं. काय करावं? जावं लगेच की नाही?

विक्रांतने दार उघडलं. ताई आणि बिल्वा लगेच नजरेला पडतील असं वाटलं होतं पण घरात शांतता होती. पंकज निमूटपणे खोलीत येऊन बसला. अस्वस्थपणे दाराकडे पाहत राहिला. बिल्वा आणि ताई दोघी एकदमच आल्या बाहेर. पंकजने उठून घाईघाईत ताईला नमस्कार केला. बिल्वाला जवळ घ्यावं असं वाटत होतं पण नक्की काय करायचं ते त्याचं त्यालाही ठरवता येईना. बिल्वाही त्याला निरखीत अवघडून उभी होती.
"बस." ताईच म्हणाली. तो अवघडून बसला.
"कधी आलास?" संभाषणाला कुठूनतरी सुरुवात करायला हवी होती. विक्रांतकडे बघत पंकज हसला,
"झाला महिना."
"सुटलास कधी?"
"महिन्यापूर्वी."
"लगेच आलास इकडे."
"हो."
"पुढे?"
"नोकरी मिळाली आहे. शिक्षक म्हणून."
ताईने दचकून पाहिलं.
"शिक्षक? काय शिकवणार तू?"
"संगणक, म्हणजे कॉम्प्युटर."
"हं." तिच्या आवाजातला निरुत्साहीपण जाणवला पंकजला.
"ताई, तुम्ही दोघं मला कधीच क्षमा करणार नाही का?" त्याने कळवळून विचारलं.
"असं का विचारतोस पंकज? आणि तुला क्षमा करणारे आम्ही कोण? क्षमा मागायला हवीस ती बिल्वाची. एका निरागस मुलीची आई हिरावून घेतलीस तू तिच्याकडून, बापाचं छत्र गमावलं तिने. माफी मागायची तर तू तिची माग." बिल्वा एकटक त्याच्याकडे पाहत होती.
"बेटा मला माफ कर." तो एकदम तिच्या पायाशीच वाकला. बिल्वा पटकन बाजूला झाली. विक्रांतच्या बाजूला जाऊन उभी राहिली.
"तिला घेऊन बाहेर गेलो तर चालेल? मोकळेपणाने बोलणं होईल. मला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. पण आधी बिल्वाशी बोलून होऊ दे." पंकजने परवानगी मिळेल की नाही याची खात्री नसतानाही आर्जवी स्वरात विचारलं. पण दोघंही पटकन हो म्हणाले. बिल्वाही निमूटपणे त्याच्यामागोमाग बाहेर पडली.

"खायला जाऊ बाहेर. काय आवडतं तुला?"
"काहीही चालेल." ती अवघडून म्हणाली.
"चायनीज?"
"चालेल." घराच्या जवळच असलेल्या रेस्टॉरंटमध्ये तो तिला घेऊन गेला. समोर आलेले पदार्थ दोघंही चिवडत राहिले. शेवटी पंकजने बोलायला सुरुवात केली.
"माझ्या हातून संगिनी मारली गेली गं. मी मुद्दाम नाही केलं. बायको होती ती माझी. का मारेन मी तिला? अजाणता जे झालं त्याची शिक्षा मी ११ वर्ष भोगली. ती तशी गेली. तू, तुझी आई आणि बाबा दोघंही एकाचवेळी गमावलेस. तुला जेव्हा सरकारी संस्थेच्या ताब्यात दिलं गेलं ना तेव्हाच कळलं काय गमावून बसलोय मी ते. संगिनीचं मृत्युपत्र नव्हतं त्यामुळे झालं तसं, मी दोषी. तेव्हा वाटायचं मी काही मुद्दाम मारलेलं नाही संगिनीला. पटवून देईन मी ते पोलिसांना. माझी सुटका होईल आणि तुझा ताबाही मिळेल ताबडतोब. म्हणूनच ताईला देखील तुझा ताबा द्यायला तयार नव्हतो मी. मी खून केला. खुनी म्हणतात सगळे मला. पण खरं सांगतो, काय करतोय तेच मुळी मला कळलं नाही. मी तिच्या पोटात सुरा खुपसला हे खरंच. पण का? मला कळलंच नव्हतं मीच सुरा खुपसलाय ते. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली संगिनी पाहिली आणि घाबरलो मी. मला वाटलं, चोर घुसला घरात. वेड्यासारखा घरभर फिरलो शोधत. परत आलो खोलीत तेव्हा तिचे निस्तेज डोळे माझ्याकडेच टक लावून पाहत होते. लक्षात आलं आधी हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. फोन करायला हवा कुणाला तरी. मित्राला फोन केला आणि संगिनीला उचलायला गेलो. बघतो तर माझे हात रक्ताने बरवटलेले. मी माझ्याच हातांकडे बघत राहिलो तेवढ्यात मित्र आला. क्षणात भानावर आलो मी बिल्वा. मी, मीच मारलं होतं संगिनीला. आता काय? चिडलो स्वत:वर, रडलो आणि संतापाने तोच सुरा माझ्या हातात खुपसत राहिलो. कितीवेळ कुणास ठाऊक. शुद्ध हरवत चालली होती. मित्र घाबरुन उभा होता काही वेळ. भानावर आल्यावर भराभर त्याने फोन केले असणार. हळूहळू सगळं धूसर झालं नजरेसमोरुन. जाग आली तेव्हा रुग्णालयात होतो. आणि एकदम मला तुझी आठवण झाली. पण कुणी काही सांगायलाच तयार नव्हतं. मी नीट बोलू शकेन याची खात्री पटेपर्यंत वाट पाहायची होती त्यांना. ऐकतेयस ना? मला ठाऊक आहे मी पाठ केल्यासारखं तुला सांगतोय हे सारं. पण खरंच पाठ झालंय माझं. दुसरा उद्योगच नव्हता कैदखान्यात. सुरुवातीला मित्र मैत्रिणी भेटायला यायचे. हळूहळू तेही बंद झालं. रिकाम्या मनाला दुसरा काय उद्योग? आठवणी उगाळायच्या. पण तुरुंगात गेल्यामुळेच कळलं माझ्या वागण्याला कारण होतं. माझं संगिनीचं भांडण नव्हतं, वाद नव्हते. सर्वसामान्यांसारखे चढ - उतार होते पण खुनापर्यंत मजल जाईल असं काही नव्हतं. माझ्या हातून ही अक्षम्य चूक कशी झाली ते मला तुरुंगात कळलं."
बिल्वा निर्विकार नजरेने बाबांकडे पाहत होती. रडायला यायला हवं, बाबांचा राग यायला हवा, आईची आठवण व्हायला हवी असं वाटत होतं. पण फक्त फोटोतच पाहिलेली आई काही केल्या तिला डोळ्यासमोर आणता येईना. हे असं का होतंय ते समजत नव्हतं. बाबा गप्प झाले आहेत आणि आपल्या प्रतिसादाची अपेक्षा करतायत हे कळल्यासारखं तिने विचारलं,
"काय कळलं तुम्हाला तुरुंगात?"
"तिथे मानसोपचारतज्ज्ञ यायचे. आठवड्यातून एकदा. दोन तास. समोरच्याला बोलतं करायचंच त्यांचं काम. सुरुवातीला हट्टाने गप्पच राहायचो. पण नेहमीचं झालं तसं नकळत मोकळा होत गेलो. संगिनीबरोबर घालवलेला काळ. उजळणी चालू असायची प्रसंगांची, वादाची, माझ्या दिनक्रमाची, मित्र - मैत्रिणींची. त्यांच्याशी असलेले आमचे संबंध, वादाची कारणं, आनंद झाला की कसा व्यक्त व्हायचो, राग आला की काय व्हायचं. त्यातून कितीतरी प्रसंग असे लक्षात आले की त्या वागण्याला निश्चित असं काही कारणच नव्हतं. संगिनीने त्या त्या वेळी ’कसलं हे विचित्र वागणं, विक्षिप्तपणा नुसता’ असं शिक्कामोर्तब केलेलं असायचं हे मात्र ठळकपणे आठवायचं ते प्रसंग सांगताना."
"एखादा प्रसंग सांगा ना बाबा." बिल्वाला बाबांच्या बद्दल असलेली अढी, राग कुठेतरी निवळत चाललाय असं स्वत:लाच जाणवत होतं. तिला ते खरं तर होऊ द्यायचं नव्हतं. कळत्या वयापासून बाबांनी आईला मारलं इतकंच तर ती ऐकत आली होती. म्हणजे त्यांच्या घरात जेवढं माहीत होतं तेवढं तिच्या आईने तिला प्रामाणिकपणे सांगितलं होतं. २ वर्षापूर्वी तिला आई - काकांनी जवळ बसवून जे सांगितलं होतं त्याने सुरुवातीला गोंधळून गेलेल्या बिल्वाला नंतर नंतर बाबांना भेटण्याची इच्छा अनिवार होत होती. तसं तिनं आई- काकांना बोलूनही दाखवलं होतं. पण आई - काकांना काही वर्ष अजून जाऊ देत असं वाटत होतं. तिला आई - काकांनी बाबाबद्दल सांगितलं तो दिवस आठवला,
"बिल्वा, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं." आई - काकांचे गंभीर चेहरे पाहून बिल्वा घाबरलीच.
"बापरे, मी काही केलं का? माझं चुकलं आहे का? तुम्ही असं का म्हणताय?" काका हसले
"नाही. तू काही केलेलं नाहीस. वेगळंच बोलायचंय आम्हाला दोघांना."
"आणि जे काही तू ऐकणार आहेस त्यामुळे आताच्या परिस्थितीत काहीही फरक पडणार नाही हे मात्र लक्षात ठेव."
"म्हणजे?"
"तू ३ वर्षांची असल्यापासून आमच्याकडे आहेस." बिल्वा धक्का बसल्यासारखी दोघांकडे पाहायला लागली.
"म्हणजे? आधी कुठे होते?" प्रश्न विचारतानाच तिच्या काहीतरी लक्षात आलं.
"मी तुमची मुलगी नाही?" रडकुंडीला येऊन तिने विचारलं. दोघांच्या नकारार्थी हललेल्या माना पाहून बिल्वा चिडली.
"मला काही ऐकायचं नाही." ती तिथून उठून आतल्या खोलीत जायला निघाली पण आईने तिचा हात धरुन आपल्या दिशेने ओढलं. बिल्वा एकदम तिच्या कुशीत शिरली.
"का सांगताय तुम्ही हे मला. माझे आई - काका तर तुम्ही आहात. मग का सांगताय?" बिल्वा हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून बसली.
"कधीतरी सांगायला हवं होतं. आधी खूप लहान होतीस, तुला ही सगळी गुंतागुंत कळणार नाही म्हणून सांगितलं नव्हतं. पण आणखी वाट पाहणं किंवा न सांगणं योग्य नव्हतं. बाहेरुन, नातेवाईकांकडून समजण्यापेक्षा आमच्याकडूनच समजलेलं चांगलं नाही का? या आधीच तुला बाहेरुन काही कुणकुण लागली नाही आमच्या सुदैवाने. आणि दत्तक असलीस तरी रक्ताचं नातं आहे आपलं. मी तुझी आत्याच आहे." त्यानंतर आई - काकांनी जे झालं, त्यांना जे माहीत होतं ते ते सांगितलं होतं. आईने तिला तिच्या लहानपणचे त्यांच्याकडे होते ते फोटोही दाखवले. या २ वर्षात तिचं विश्व बदललं होतं. नातेवाईकांकडे गेलं की उगाचच तिला आपल्या बाबांबद्दल विचारावंसं वाटायचं, प्रत्यक्षात मात्र तिने ते कधीच केलं नाही. बाबांना मात्र आता भेटायचंच होतं. तिच्या आईच्या खुनाला जबाबदार असणार्‍या बाबांना तिला जाब विचारायचा होता. पोरकं केल्याबद्दल ताडताड बोलायचं होतं. आई - काकांच्या परवानगीची ती वाट पाहत होती आणि आज ती वेळ आली होती. पण आता जे काही होत होतं ते वेगळंच. तिला बाबांबद्दल सहानुभूती वाटायला लागली होती. ही सहानुभूती होती की रक्ताच्या नात्याची ओढ तेही तिला समजत नव्हतं. पण कळत होतं ते एकच. जे काही बाबा सांगत होते तेच अगदी तेच तिच्याबाबतीतही घडलं होतं. म्हणूनच तिला बाबांची बाजू ऐकावीशी वाटत होती. विचारांची साखळी तोडत ती बाबांना म्हणाली,
"एखादा प्रसंग सांगा ना."
"हो, हो सांगतो ना. मला वाटलं तुझं लक्ष नाही. मला आठवतंय, तू अगदी छोटी होतीस. वर्षाची असशील. आपण माझ्या मित्राकडे राहायला गेलो होतो. पहाटे कधीतरी मी बाहेर सोफ्यावर बसलो होतो. आणि अचानक मांडी घालून रामरक्षा म्हणायला सुरुवात केली मी. तुझी आई, तू झोपला होता बाजूच्या खोलीत. मित्र उठून आला बाहेर आणि माझी तंद्री भंगली. दुसर्‍या दिवशी हा विषय निघालाच. तेव्हा संगिनी हसून म्हणाली होती, थोडं ’फिक्स’ करायला हवंय पंकजला. खूपदा वागतो तो असं विचित्र. आम्ही सगळेच त्यावर हसलो होतो. विषय तेवढ्यावरच संपला. पण तुरुंगात हे जेव्हा मी सांगितलं मानसोपचारतज्ज्ञाला तेव्हा ते गप्प झाले. बराच वेळ. मग त्यांनी आठवून आठवून लिहून ठेवायला सांगितले असे प्रसंग."
"मग? लिहून काढलेत?"
"हो. खूप होते असे. म्हणजे त्या त्या वेळी जाणवले नव्हते. दुर्लक्ष केलं होतं, हसण्यावारी नेलं होतं. पण एकच निष्पन्न झालं त्यातून की असं होतं. आणि हा विचित्रपणा नाही तर मेंदूतील विकृती आहे. लवकर समजली तर उपचार करता येण्यासारखी. माझ्याबाबतीत खूप उशीर झाला. संगिनीला गमावलं मी कायमचं, तुझ्यापासून दुरावलो. तुझ्या मोठं होण्यात माझा काहीही सहभागच नव्हता. तुरुंगात खितपत पडलो. ज्या वेळेस माझ्या सुटकेचा दिवस जवळ यायला लागला ना तेव्हाच ठरवलं होतं, भारतात परतायचं, जी मिळेल ती नोकरी स्वीकारायची आणि तुला भेटायचं. तुझी क्षमा मागायची. पण इतकं सोपं नव्हतं ते. तुझ्या आत्याने माझ्याशी संपर्क पूर्ण तोडला होता."
"आई, माझी आई आहे ती." बिल्वाच्या आवाजातली धार, तुटकपणा जाणवला पंकजला. आता काहीही बिनसायला नको होतं. तो घाईघाईने म्हणाला,
"चुकलं, तुझ्या आईने अजिबात संपर्क ठेवला नव्हता माझ्याशी. मी तिचा सख्खा भाऊ असूनही."
"तिला वाटायचं मला त्रास होईल. कितीतरी वर्ष मला काहीही ठाऊक नव्हतं." आईबद्दलचं प्रेम बिल्वाच्या आवाजातून जाणवत होतं.
"इथे यायचं ठरवलं तेव्हा मनात ताई घरात तरी घेईल की नाही ही भिती होतीच. तुला कधीच भेटू शकणार नाही या कल्पनेनेच जीव घाबराघुबरा व्हायचा. खरं तर खूप वेळा फोन केला पण कधी लागलाच नाही. मग वाटलं राहायची जागा बदलली असेल. बिल्वा, मी शेवटी लपून छपून येऊन हेच घर आहे याची खात्री केली. पण घरी यायचं धाडस झालं नाही. कशाचीच खात्री नव्हती ना. मग पत्र लिहिलं आणि वाट पाहत राहिलो. तुझा फोन नसता आला तर किती दिवस तग धरता आली कुणास ठाऊक."
"तुमचं पत्र दिलं मला लगेच आईने. खरं तर मला सगळं सांगितल्यावर मी म्हटलं असतं तर तुम्हाला तिकडे पत्र पाठवायची, फोन करायची तिची तयारी होती. पण मध्ये थोडा काळ जायला हवा असं काकांना वाटत होतं. मलाही पटलं ते. तुमचा फोन आला नसता तरी कधी ना कधी भेट झाली असती आपली. भेटायचं होतंच मला."
"भेटायचं होतं? रागावली नाहीस का तू माझ्यावर? मला तुझी प्रतिक्रिया काय होईल, तू माफ करशील याची शाश्वती वाटत नव्हती."
"रागावले नाही? असं कसं होईल? अगदी खरं सांगू मी आई - काकांना सांगितलं नाही पण तुम्हाला भेटायचं होतं त्याचं कारण वेगळं होतं. त्या दोघांना कदाचित वाटत असेल की आता मी त्यांना दुरावेन. पण आमच्या नात्याचे बंध खूप घट्ट आहेत. मला तुम्हाला भेटायचं होतं ते एका निष्पाप जीवाचा बळी घ्यायचा अधिकार कुणी दिला, माझी आई तुम्ही का हिरावून घेतलीत माझ्यापासून हे विचारण्यासाठी. सांगायचं होतं, तुमचा माझा संबंध कधीच संपला आहे. ज्या क्षणी तुम्ही माझ्या आईला माझ्या आयुष्यातून जाऊ दिलंत ना त्याच क्षणी तुम्ही मला गमावलं होतं. आता तर मी तुमचं नावंही लावत नाही. पण हे मला माझ्या तोंडाने तुम्हाला सांगायचं होतं. माझे शब्द आयुष्यभर तुमचा पाठलाग करावेत ही सुप्त इच्छा होती मनात." पंकज मुकाट्याने बिल्वा काय म्हणते आहे ते ऐकत होता. कधी तिच्याकडे एकटक पाहत होता, मध्येच तिची नजर चुकवत होता. ऐकता ऐकता त्याला जाणवलं की ती मी सांगणार होते, इच्छा होती असं म्हणते आहे. म्हणजे तिला आता तसं म्हणावंसं वाटत नाही?
"बिल्वा तुला जे बोलायचं आहे ते बोल. आज ही आपली पहिली आणि शेवटची भेट आहे असं गृहीत धरुनच मी इथे आलोय."
"नाही बाबा, तुमच्या लक्षात नाही का आलं मी मला जे करायचं होतं ते सांगतेय. पण तुम्ही जे सांगितलंत ना त्यावरुन कळलंय मला. अजाणता केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्ही भोगली आहे. आई तिच्या जीवाला मुकली. तुम्ही आयुष्यातून उठलात. सुदैवाने माझ्यासाठी आई - काका होते. ज्यांनी तुमचा जो आजार आहे तोच माझ्यातही आहे हे ओळखलं आणि त्यावर वेळीच उपचार सुरु केले."
"काऽऽय?" पंकजला बिल्वा काय म्हणतेय तेच समजेना.
"हो, तुम्ही तुरुंगात असलात तरी तुम्ही हे असं कृत्य का केलं त्याचा उहापोह होतच राहिला बाबा. मग तुमचं बालपण, नंतरचं जीवन त्यातले काही प्रसंग खूप माहिती जमवली आईने. भारतातून ती तुमच्या अमेरिकेतल्या मित्रांना फोन करायची. तुमच्याबद्दल बारीकसारीक प्रश्न विचारायची. माझ्या आणि तुमच्या वागण्यात खूप साम्य आढळत गेलं तिला. लहान असताना मी तास न तास हसत राहायची. आई ओरडायची मग तेवढ्यापुरतं मी गप्प व्हायचे. पुन्हा तेच. दुर्लक्ष करावं इतकं साधं नव्हतं ते. मग अशाच अनेक गोष्टी. घरात सगळी असली तरी मी कोपर्‍यात जाऊन बसायचे. नखं कुरतडत राहायचे. कुणाच्या लक्षात आलं नाही तर तास न तास एका ठिकाणी बसून राहायचे. सुरुवातीला सर्वांना नादिष्टपणा वाटायचा, नंतर तेच वागणं वेडेपणाची झाक असल्यासारखं वाटायला लागलं. कुठेतरी तुमच्या वागण्याचे धागे दोरे जुळवायचा प्रयत्न आई - काका करत असणार. मग शाळेतही आईने माझ्या शिक्षकांना सांगितलं असावं. शाळेतलं माझं वागणं काही वेळा विचित्र असायचं. मी काय करतेय ते माझं मलाच कळायचं नाही. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर मी हसत सुटायचे. कधी रडायला लागले की थांबायचेच नाही. त्या त्या वेळी कधी कधी कारणं योग्यं असली तरी त्याबद्दलची माझी प्रतिक्रिया अतिरेकी असायची. माझ्या वागण्यातले सूक्ष्म बदलही नोंद करुन ठेवले जात होते काही वर्ष. आणि त्यातूनच मानसोपचारतज्ज्ञाकडे फेर्‍या सुरु झाल्या. आता मी व्यवस्थित आहे. तुम्हाला सुद्धा अशा एका मानसोपचारतज्ज्ञाची गरज होती असं आईला वाटायचं. तिला ठाऊक नव्हतं हेच अगदी हेच झालं होतं का तुमच्याबाबतीत; कारण तुम्ही तुरुंगात गेल्यावर तुमच्याशी आमचा काही संपर्कच नव्हता. पण जे काही तुमच्या मित्र मंडळीकडून ऐकलं, तुमच्या लहानपणाबद्दल तिला आठवत राहिलं त्यावरुन तिचा हा अंदाज होता. आज तुमच्याकडून ऐकताना शिक्कामोर्तबच झालं तुम्ही हे मुद्दाम केलं नाही यावर. आम्हाला कुणालाच ठाऊक नव्हतं की तुम्ही परत भारतात याल. आईने मी तुमच्याशी संपर्क साधायचा की नाही हे माझ्यावरच सोपवलं होतं. पण आज अचानक तुमची भेट झाली. इथे येताना ही पहिली आणि शेवटची भेट हेच मीही मनात ठरवून आले होते पण भेटू या आपण अधूनमधून. माझ्या आयुष्यातली महत्त्वाची वर्ष तुम्ही असं का केलं असेल या विचाराने खाल्ली आहेत. ती परत मिळणार नाहीत पण तुम्ही माझे बाबा आहात. माझं असं कुणीतरी रक्ताचं आहे ही भावना सुखावह आहे. आई - काकांमुळे माझं बालपण सुखात गेलं. पण माझं सुरक्षित विश्व ढवळून टाकणारा तो दिवस आणि त्यानंतर तुम्हाला भेटेपर्यतचा आजचा हा दिवस म्हणजे एखाद्या काळोख्या बोगद्यात उभं असल्यासारखे जीव घुसमटवून टाकणारे होते. " बिल्वा हमसून हमसून रडायला लागली. पंकजने घाईघाईने स्वत:कडचा रुमाल पुढे केला. पुढे होऊन तिला कुशीत घ्यायची इच्छा त्याने आवरली.
"तुम्ही भेटा मला बाबा. आवडेल मला. पण मी आई - काकांची मुलगी आहे हे विसरु नका. तुमच्याकडे येऊन राहावं असा आग्रह करु नका. चालेल?"
"चालेल. नक्की चालेल. ताईने माझ्याशी काही संबंधच ठेवला नाही याचा राग होता माझ्या मनात. पण लक्षात येतंय तुझ्या भल्यासाठी, बालमनाचा गोंधळ टाळण्यासाठी केलं तिने ते. खरं तर डोंगराएवढे उपकार आहेत तिचे, विक्रांतचे माझ्यावर. मी तुझा ’बाबा’ होण्याचा मनापासून प्रयत्न करेन. नाही, काळजी करु नकोस. तुझ्या काकांची जागा घ्यायचा प्रयत्नही नाही करणार मी. माझ्या मनातली माया तुझ्यापर्यंत पोचावी इतकंच आणि एवढंच. मान्य?"
"मान्य." बिल्वा पंकजच्या हातावर हात ठेवून गोड हसली. लेकीच्या गालावर पडणार्‍या खळीकडे पाहत तोही मनापासून हसला. दोघांमधल्या दुराव्याची दरी थोडीशी कमी झाल्यासारखं वाटलं त्याला. अजून खूप वाटचाल करायची होती. पुढचं सारंच अंधुक असलं तरी आशादायी होतं. सर्वांच्याच आयुष्यातला एक नवा अध्याय सुरु झाला होता. त्याला सामोरं जायला हवं होतं.

"घरी जाऊया?" आई - काका वाट पाहत असतील. पंकजने मान हलवली आणि मधली वर्ष पुसून टाकल्यासारखी बिल्वा पुन्हा एकदा अल्लड मुलीसारखी घराच्या दिशेने उत्साहाने वळली. तिच्या बाबांबरोबर!

पूर्वप्रसिद्धी - माहेर मासिक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

छान कथा.
पण ताईला जर अशा विचित्र वागण्याची/ मानसिक आजाराची शंका होती तर तिने भाऊ आल्यावर त्याच्याशी जरा सहानुभूतीने वागायला हवं होतं असं वाटतं. ' तू काय शिकवणार? ' हे जरा हेटाळणीयुक्त वाक्य वाटलं. अर्थात हे माझं मत.

खूपच छान कथा! Happy

पण ताईला जर अशा विचित्र वागण्याची/ मानसिक आजाराची शंका होती तर तिने भाऊ आल्यावर त्याच्याशी जरा सहानुभूतीने वागायला हवं होतं असं वाटतं. >> मला पण असंच वाटलं. विक्रांतने पण समजून घ्यायला हवं होतं असं वाटलं. पण कदाचित बिल्वाला गमावण्याची भीती वाटली असेल असाही विचार केला. Happy

ही कथा फेसबुक वर वाचली होती. त्यात सत्यकथा असा उल्लेख होता. ही सत्यकथा आहे का? अश्या प्रकारचा एखादा मानसिक आजार खरच असतो का?
कथा ठीक आहे. काही गोष्टी खटकल्या.

सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
वावे, निधीने म्हटलंय तसंच आहे ते. आणि मनावर असलेलं दडपण. त्यातून माणूस पटकन काहीतरी बोलून जातो तसं तिचं झालं असं दाखवलंय.
वत्सला, काय खटकलं ते समजलं तर सांगता येईल मला. कथा सत्यघटनेवर आहे. मानसिक आजार असतो असा. बहुतांशी सर्व प्रसंग काल्पनिक आहेत कथेतले. पत्नीचा खून, कैद, मुलगी आत्याने दत्तक घेणे, सुटल्यावर भारतात जाऊन शिक्षकाची नोकरी, मुलीलाही तोच आजार या घटनेवर/ माहितीवर बेतलेले आहेत सर्व प्रसंग. काही माहिती कथेत घालणं उचित न वाटल्याने त्याचे उल्लेख नाहीत.