अनवट वाट ३

Submitted by अनाहुत on 4 June, 2018 - 21:45

" तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "
" अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "
" म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "
" काय होईल मारून टाकतील ना मग मारू दे ना, तुला असाच जर सोडून गेलो तर मनाने पूर्णपणे तुटून जाईन मी , आणि फक्त रोज रोज थोडा थोडा मरत राहीन . असं झुरुन मरण्यापेक्षा एकदाच मेलेलं काय वाईट. तुझ्याशिवाय आता विचारही नाही करू शकत मी . "
आता तिचाही निर्धार होत होता , शेवटचे किंतु परंतुही गळून पडले होते .
" पटतंय मला तुझं पण असं एकाएकी मला नाही येता येणार तुझ्या सोबत . बरोबर नाही दिसणार ते . तू काळजी नको करू . येईन मी पण आधी मला घरी गेलं पाहिजे . मी बोलेन त्यांच्याशी . "
" अग तुझं कोण ऐकणार आहे तिथं . "
" खरं आहे तुझं , इतके दिवस हेच होत आलं , आणि मी यालाच माझं नशीब मानत आले पण आता नाही मी ठामपणे माझं मत मांडणार आणि मग सर्वांसमोर बाहेर पडणार . "
" अग असं कोण जाऊ देईल तुला ? "
" काय करतील मारून टाकतील ना ? मारू दे मग . पण मी अशी लपून छपून पळून नाही जाणार . "
" अग ऐक तरी "
" आता दुसरा काहीही विचार नाही . " ती निर्धारान बोलली .
तेव्हढ्यात गर्दीतल कोणीतरी बोललं "अरे बघा काय चाललंय इकडं स्वतःच घर वाऱ्यावर सोडून बाहेरच्या लोकांसोबत .... "
तिनं त्याच्याकडं पाहिलं आणि त्याला मधेच अडवत म्हणाली " कुठलं घर माझं ? "
" बघा जिथं लग्न केलं ते घरही विसरलं वाटत ? "
" इतके दिवस मी जगतेय कि मरतेय याचा कधी विचार केला नाही आणि आज का माझा विचार करायचा ? "
" बघा लोकांना जरातरी शरम आहे का ? "
" शरम ? कुणाला हवी मला कि त्यांना जे मला रोजरोज मारत होते . "
" घरच्या लोकांची बदनामी करायची नसते . घराची ईज्जत राखायला हवी . "
" कसली इज्जत , मला कधी माणूस म्हणूनही पाहिलं नाही त्यांचा विचार मी का करू ? आणि माझ्यावर अत्याचार करत होते तो रोखायला कोणीच का आलं नाही ? "
" थोडंफार होतंच कि प्रत्येक घरात पण ते असं चव्हाट्यावर आणायचं का ? "
" का होत ? कोणी दिला त्यांना हा अधिकार ? खरंतर चूक माझीच आहे , हा अन्याय सहन केला हि फार मोठी चूक आहे . मी दुसऱ्या कुणाकडे अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःहून विरोध करायला हवा होता . "
" आता मात्र हद्द झाली लोक योग्य ते ऐकायलाही तयार होत नाहीत . जाऊ द्या आपल्याला काय करायचं आहे ? " तेव्हड्यात तिचा दीर तिथे आला . तो गावातल्या राजकीय नेत्यासोबत असायचा. आताही तो पुढारी त्याच्या सोबत होता. " साहेब बघा हि रां* आमच्या घराची अब्रू वेशीवर टांगायला निघाली आहे . "
" हे बघ आता निवडणूक आहे आणि आपल्याला यात पडायचं नाही ती पळून गेली असती तर एकवेळ तिच्या नावं बोंबलत आलं असत . पण ती तर समोरच उभी आहे आणि तुमच्याच तोंडात शेण घालतेय यात तुम्ही काय सुटत नाय आणि मी यात पडलो तर फुकाची बदनामी होईल . इतर वेळी ठीक होत पण आत्ता नाही मागच प्रकरण सायबानी निस्तरलंय आता एवढ्यात, तेबी निवडणुकीच्या तोंडावर हे केलं तर मग मात्र ते यात हात वर करतील म्हणून नको . अन तुला काय करायचंय तुजा भाऊ बघून घेईल काय ते, तू आणि घरातलं दुसरं कुणीही यात पडू नका .." त्याला राग तर येत होता पण सर्वांसमोर काही करता येत नव्हतं . त्यानं घरी फोन लावला व घडलेला प्रकार भावाला सांगायला सांगितलं . तो तसाच निघाला तिथून . थोड्याच वेळात तिचा नवरा तिथे पोहोचला .

" अग कुठं निघालीस या सोन्यासारख्या नवऱ्याला सोडून ? कुठं शेण खायला निघालीस ? फिर माघारी नाहीतर मुस्कड फोडीन " असं म्हणत तो पुढे सरसावला आणि तिला मारायला त्याने हात उगारला तो तिने वरच्यावर पकडला " अरे नालायक बायकोला सांभाळायचं सोडून तिच्यावर हात कुठं उगारतो आहेस . तुझी लायकी नाही माझा पती म्हणून घ्यायची, म्हणून सोडून चालले आहे तुला . आणि सर्वांच्या समोर जाते आहे कारण चूक माझी नाही , तुझी आहे लाज मला नाही तुला वाटायला हवी . " तिला राग आला होता . तिने त्याचा हात रागाने झिडकारला . तसा त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला . तिला आलेला राग आणि त्यामुळे तिचा झालेला अवतार पाहून आता त्याची हिम्मतही होत नव्हती तिला काही बोलायची . शेवटी तीच त्याला आणि सगळ्यांना उद्देशून बोलली , " बाईमाणूस म्हणता ना तुम्ही मग बाई हि सुद्धा एक माणूसच असते, जनावर नाही हे का विसरता ? तिलाही भावना असतात, तिलाही दुखत खुपत त्रास होतो . ती काही मशीन नाही कि तुम्ही कसेही वागा ती मरतच राहील आणि गुलामासारखी काम करताच राहील . मी सोडते आहे या नीच माणसाला ज्याला माझ्या भाव-भावनांची सोडा माझ्या असण्याचीही किंमत नव्हती . " असं म्हणत तिनं स्वतःचे दागिने काढले . आणि ते त्याच्यावर भिरकावत म्हणाली " आणि या सौभाग्य नाही तर दुर्भाग्य लक्षणांची मला गरज नाही . " शेवटी स्वतःच्या बांगड्या काढून तिने त्या त्याच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाली " घे घाल या . " आणि ती त्याचा हात पकडून निघाली ज्याला खरंच तिच्याबद्दल आपुलकी, प्रेम आणि आदर होता . सगळेजण तिच्याकडे पाहत होते पण तिला अडवण्याची हिम्मत म्हणा किंवा गरज कुणालाच वाटत न्हवती . कारण तीच काही चुकलं आहे असं कुणालाही वाटलं नाही .
( संपूर्ण )

भाग १ : https://www.maayboli.com/node/64844
भाग २ : https://www.maayboli.com/node/64921

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली कथा,
पण पहिल्या 2 भागांच्या तुलनेत शेवट तजोड घाईत केल्यासारखा वाटला.

आवडली कथा,
पण पहिल्या 2 भागांच्या तुलनेत शेवट तजोड घाईत केल्यासारखा वाटला.

.

छान.
पण पहिल्या दोन भागांच्या तुलनेत हा भाग थोडा गडबडीत उरकल्यासारखा वाटतोय.