फ्री...? : भाग ११

Submitted by पायस on 4 June, 2018 - 11:10

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66313

१ ऑक्टोबर १९११
इंदूर

आज सर्कसचा इंदूरातील शेवटचा खेळ होता. उद्या दसर्‍याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करून नटराजा सर्कस पुढच्या प्रवासाला लागणार होती. नाही नाही म्हणता म्हणता जवळ जवळ दोन महिने सर्कशीने इंदूरात मुक्काम ठोकला होता. इंदूरच्या महाराजांनी याचा लाभ उठवत जवळच्या ग्वाल्हेर संंस्थानिकांना आमंत्रित करून सर्कशीचे काही विशेष शो केले होते. या वास्तव्यात प्रचंड धनलाभ झाला असणार याची कोणालाही शंका नव्हती. मलिका जरी मनोमन खूष असली तरी वरकरणी ती विशेष काही घडले नाही असे दाखवत होती. तिच्या दृष्टीने आता पुरेसे पैसे जमा झाले होते. तसेच आज रात्री दुसरी एक गरजेची घटनाही पार पडणार होती. तिने मनोमन सर्कसची सुरुवात झाली तेव्हा आखलेल्या योजनेची उजळणी केली. त्या योजनेतला पुढचा टप्पा राजपुतान्यात गेल्यावर पार पाडता येण्यासारखा होता. तिने मंद हसून आपल्या हातातील खंजर पुन्हा टेबलाच्या खणात ठेवून दिला. त्याच वेळी तिच्या तंबूच्या बाहेर उभा असलेला नागराज स्वतःच्या तंबूकडे परत निघाला. त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले होते.

मीर व येलेना आज पुन्हा तळाच्या बाहेर कुठेतरी जाऊन आले होते. गेला आठवडाभर ते रोजच सकाळी सकाळी कुठेतरी गायब होत होते. शोकरिता ते वेळेत हजर होत असल्याने कोणाची काहीच तक्रार नव्हती. आज मात्र त्यांचे काम झालेले दिसत होते. कारण त्यांनी सोबत नेलेली एक पेटी परत येताना त्यांच्या बरोबर दिसत नव्हती. ट्रॅपीज आर्टिस्ट म्हणून नटराजा सर्कसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची मूळची ओळख पूर्ण पुसली गेली होती. ते नावावरून वाटत होते तसे रशियन होतेच पण खोलात जाऊन सांगायचे तर ते ताजिकीस्तानमधून आले होते. कधीकाळी रशियात झारने चालवलेल्या पिळवणूक सत्राला कंटाळून त्यांचे मूळचे ज्यू पूर्वज दक्षिणेकडे सरकले. ताजिकीस्तानमध्ये काही घालवल्यानंतर आणखी दक्षिणेकडे सरकत सरकत भारताचे रहिवासी बनले होते. त्यांचे पुरेसे भारतीयीकरण झालेले होते. ओल्गा व उमा नुकत्याच स्नानादि कर्मे उरकून तंबूकडे परत चालल्या होत्या. येलेनाच्या हातात पेटी न दिसल्यावर ओल्गाने सहजपणे "दोस्तावलेन?" असे विचारले. दोघांनी मान डोलावून संमती दिली. उमाला यातले काहीच कळले नाही. ओल्गाने नंतर समजावते म्हणून तिचे तात्पुरते शंका समाधान केले. तसेही आज रात्रीच्या तयारीपुढे त्या दोघींना इतर कोणते महत्त्वाचे काम नव्हते.

*****

३० सप्टेंबरची रात्र

ठरलेल्या ठिकाणी सर्वजण जमले. उमा, ओल्गा आणि छोटू आधीपासूनच येऊन थांबले होते. ख्रिस आणि रश्मी सुद्धा लवकरच तिथे पोचले. रश्मी अजूनही ख्रिसवर काहीशी नाराज असली तरी तिला सर्कसमागच्या रहस्यामध्ये, खासकरून मलिका नावाच्या गूढामध्ये रस होता. त्यामुळे ती ठरल्याप्रमाणे ख्रिससोबत काम करत होती. ख्रिस त्या दिवशी बसलेल्या धक्क्यातून पुष्कळच सावरला होता. त्याने रश्मीची अनौपचारिकरित्या माफीही मागितली होती. रश्मीला त्यावेळी ते लक्षात आले नाही बट दॅट वॉज क्वाईट अ डील! एवढेच काय, रश्मीची नोकरीही तो पक्की करण्याच्या विचारात होता. पण उद्या रात्रीची कामगिरी फत्ते होईपर्यंत तो विषय काढणार नव्हता. घसा खाकरून त्याने बोलायला सुरुवात केली.

"आपल्या सगळ्यांना आता या सर्कसच्या आडून काहीतरी भयंकर घडते आहे याची पूर्ण कल्पना आहे. आपल्याला अंदाज आहे त्याशिवाय देखील अजून काही घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण ज्याचा अंदाज आहे ते निश्चितपणे थांबले पाहिजे. छोटूच्या मदतीने आपल्याला यावेळचा तरूण सापडला आहे. रश्मी आणि मी त्या तरूणावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहोत."

"त्याचे नाव श्रीरंग आहे. धनाढ्य नसले तरी त्याचे घर बर्‍यापैकी सुखवस्तु आहे." रश्मी तिने काढलेली माहिती सांगू लागली. "वडील त्याला दुकानात हळूहळू कामाला लावायला बघत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अर्थातच ते श्रीरंगावर नाराज आहेत. त्यांना संशय आहे की तो सर्कशीतल्या कोणा मुलीच्या नादी लागला आहे जो की अगदीच चूक नाही. गोम अशी आहे की कोणीच श्रीरंगला एखाद्या मुलीसोबत फिरताना पाहिले नाही आहे. पण इथे कशाचा शोध घ्यायचा हेच त्यांना ठाऊक नसल्याने त्यांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. बर्थोल्टच्या खुन्याला काही जणांनी पाहिले असल्याने ते उपलब्ध एकमेव वर्णन आहे. त्यानुसार खुनी एक स्त्री आहे. ती कायम डोक्यावरून साडीचा पदर ओढून घेते जेणेकरून कोणाला तिचा चेहरा दिसू नये. मी श्रीरंगच्या जवळून जाणार्‍या सर्व व्यक्तींवर लक्ष ठेवून होते. एक लाल साडीतील स्त्री दररोज श्रीरंगच्या संपर्कात येते आणि तेही तो सर्कस बघायला आलेला असतो तेव्हा!"
"लाल साडीतील स्त्री? पण सर्कसमध्ये अशी कोणीच स्त्री नाही. मी पूर्वी साड्या नेसायचे पण आता मीसुद्धा साडी नेसणे बंद केले आहे. मलिकाकडे कदाचित?" उमाने छोटू आणि ओल्गाकडे प्रश्नार्थक नजर वळवली. दोघांनी नकारार्थी मान हलविली.
"मी असे म्हणत नाही आहे की ही स्त्री उघडपणे सर्कशीत वावरते." ख्रिस पुढे बोलू लागला. "किंबहुना माझी अशी अपेक्षाच नाही की सर्कशीतल्या सर्व स्त्रियांची चौकशी केली तरी आपल्याला हवी ती बाई सापडेल. आम्ही दोघे इंदूरात आल्यापासून एक संशयास्पद स्त्री सर्कसच्या आजूबाजूला दिसत होतीच. ती कधीच सर्कसच्या आत प्रेक्षकांत दिसत नाही आणि शो नंतर जवळून पाहताना कलाकारांमध्ये तिच्या बांध्याचे कोणी दिसून येत नाही. रश्मीच्या म्हणण्यानुसार तिची चाल आणि कपडे बघता ती एखाद्या चांगल्या घरातील स्त्री असावी. त्यामुळे तिचे एकटे हिंडणे अजूनच डोळ्यावर येते."
"मी श्रीरंगवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवली. ही स्त्री कधीच श्रीरंगशी बोलत नाही. तिच्याशी संपर्क साधण्याचा कोणताही मार्ग श्रीरंगकडे नाही. ती कायम चिठ्ठ्यांमार्फत त्याच्याशी संवाद साधते. श्रीरंग तिच्याकडे आकर्षित का झाला असावा हे मला अजून समजत नाही."
"तिच्या गूढ वागण्याचे तर त्याला आकर्षण वाटत नाही ना?" ओल्गाने शंका उपस्थित केली.
"श्रीरंग तसा सामान्य तरूण आहे. सर्कसला रोज हजेरी लावायची गरज नसल्याने मी त्याच्या मित्रमंडळींची निवांत चौकशी करू शकलो. त्यांच्यामते श्रीरंगच्या आपल्या जोडीदाराकडून तिच्याभोवती एक गूढ वलय असावे अशी अवास्तव अपेक्षा खचितच नव्हती. तो मुख्य मुद्दा नाही. मुख्य मुद्दा हा आहे की श्रीरंगच्या जीवाला धोका आहे."
ख्रिस पुढचा संपूर्ण वेळ त्यांना त्याची योजना समजावत होता. ही योजना सफल झाली तर श्रीरंगचा जीव वाचणार होताच पण या हत्याकांडामागचा सूत्रधारही त्यांच्या हाती लागणार होता.

******

त्या खानावळीच्या मालकाने आवश्यक त्या नोंदी करून खोलीची चावी गिर्‍हाईकाच्या सुपूर्त केली. त्या गिर्‍हाईकाला एकाच रात्रीपुरती त्या खोलीची जरुरी असली तरीसुद्धा काहीशा नाखुषीनेच त्याने खोली देऊ केली होती. त्याचा इंग्रज किंवा युरोपियनांवर राग नव्हता पण त्याला आपल्या खानावळीत कोणीही विचित्र व्यक्ती नको होत्या. यात त्याला दोष देण्यात अर्थ नव्हता म्हणा. जर अचानक एक उपटसुंभ खांद्यावर पोपट ठेवून उगवला, त्याच्यातर्फे तो पोपट बोलू लागला आणि त्याने एका रात्रीपुरती खोली मागितली तर तुम्ही सुद्धा वैतागणार नाही का? आजकाल इंदूरात कुठून कुठून लोक येतात देव जाणे!

~*~*~*~*~*~

तांबडे फुटायला अवकाश होता. हुगळी नदीच्या पात्रात तो एक ठिपका वेगाने उत्तर दिशेकडे सरकत होता. कलकत्ता अजूनही शांतपणे झोपलेले होते. कालीमातेच्या काकडआरतीच्या तयारीसाठी उठलेल्या पुजार्‍यांव्यतिरिक्त कोणीही नदीच्या घाटांवर फिरकणार नव्हते. ज्यांची भीति होती ते इंग्रज अजूनही साखरझोपेत होते. वरकरणी ती कोणा मच्छिमाराची नाव वाटत होती. तिच्यात चार-पाच जण बसलेले होते. वल्हवणारे सर्वशक्ती लावून शक्य तितक्या वेगाने झपाझप नाव पुढे नेत होते. त्या सर्वांमध्ये एकाला कलकत्त्याच्या सीमेबाहेर एका होडक्यात बसवून देणे हे त्यांचे काम होते. फणींद्रचे डोळे अंधाराला सरावले होते. तो नकाशा बघून ठरलेले ठिकाण अजून किती लांब आहे याचा अंदाज घेत होता. नकाशातील खुणांनुसार या वेगाने अजून काही मिनिटात ते सुरक्षित ठिकाणी पोहोचणार होते. तिथून पुढे फणींद्र एकटा होडीतून शांतिपुर पर्यंत प्रवास करणार होता. रणघाट पर्यंत पोलिसांचा कडक पहारा होता पण शांतिपुरापासून पुढे वेढा थोडा सैल होता. तिथून ट्रेनने त्याला अलाहाबाद गाठणे सहज शक्य होते.

ती विशिष्ट जागा आता हाकेच्या अंतरावर होती. खुणेच्या मशालीही दिसू लागल्या होत्या. एवढ्यात फणींद्रने नाव थांबवायचा इशारा दिला. नदीचे पात्र संथ होते. सोबत आलेल्या माणसाच्या कानात तो हलकेच कुजबुजला. त्याचे नाव कौशिक होते. कौशिकने आपल्या हातातली मशाल पेटवली आणि जोरात नदीत फेकली. विझण्याआधी काही क्षण पिवळसर झळाळी आली. तिकडून सावकाश एक होडगे पुढे आले. त्यात एकच माणूस बसला होता. कौशिकने त्याला विचारले,
"सबकिछु ठीक आछे?"
"हां, एकदम ठीक."
"किंतु आमी एकटी बिशाल समस्या देखते बाड़ी."
"बिशाल समस्या? किंतु आमी तो एखाने किछु भुला देखची ना"
"तुमी समस्या देखते परे ना. कारण आपनि समस्या"
एवढे बोलून कौशिकने बिनदिक्कत त्याला गोळी घातली. ख्रिसचा तो बेनाम खबरी मरून पडला होता. लगोलग समोरून होड्यांचा एक ताफा या नावेच्या दिशेने सरकू लागला. कौशिकला अंधारात जोसेफ दिसला नाही पण त्याचा आवाज ओळखू आला. त्या दिवशी जोसेफला दफनभूमित हटकणारा तरुण कौशिकच होता. जोसेफचा पाठलाग करणे युगांतरच्या पथ्यावर पडले होते. इतके दिवस सावधगिरीने राहिलेला तो अज्ञात खबरीही आज सापडला होता. आता फणींद्र इथून निसटला की ब्रिटिशांना सणसणीत चपराक बसणार होती. यात कौशिकने फक्त एक शक्यता विचारात घेतली नव्हती. जोसेफने मूठभर पोलिस आणले नव्हते. या चार-पाच जणांविरोधात जवळ जवळ तीस ते चाळीस हत्यारबंद शिपाई होते. फणींद्रच्या नजरेने मात्र लगेच हा विषम सामना हेरला. तो हलकेच कौशिकच्या कानात काही कुजबुजला. तिकडे जोसेफ आपले पिस्तुल सज्ज करत होता. आज तो फणींद्रला निसटू देणार नव्हता.

~*~*~*~*~*~

श्रीरंगची भिरभिरणारी नजर तिला शोधत होती. आज सर्कसचा इंदूरातला अखेरचा शो होता. तसे बघावे तर ती सर्कसमध्ये काम करते याचा कोणताही पुरावा श्रीरंगकडे नव्हता. तिला त्याने सर्कशीत एकदाही पाहिले नव्हते. पण ती सर्कसवाल्यांसोबत नव्हती तर इंदूरात ती कोणासोबत आली होती? या प्रश्नाचे उत्तर श्रीरंगकडे तरी नव्हते. त्याने प्रत्येक शो बघूनही त्याला ती कधीच सापडली नव्हती. असे म्हणतात मनुष्य प्राण्याला जात्याच रहस्याचे आकर्षण असते. एखादी गोष्ट गुपित म्हणून सांगितली तर त्रयस्थ व्यक्तीलाही त्यात कुतुहल निर्माण होते. श्रीरंगने हे शंभर टक्के मान्य केले असते. ती कोण आहे, कुठून आली आहे, तिचे मूळ गाव कोणते, ती दिसते कशी, तिचा आवाज कसा आहे ..... अनुत्तरित प्रश्नांची यादी करायला बसला तर श्रीरंग म्हातारा झाला असता पण यादी संपली नसती. त्याला फक्त तिच्या जवळ येताच जाणवणारा एक मंद सुगंध लक्षात राहिला होता. त्याच्या अल्प माहितीनुसार उत्तम दर्जाची अत्तरे कनौजमध्ये बनतात. एवढा मोहक सुगंध असणारे अत्तरही मग कनौजमध्येच तयार झाले असावे. त्यावरून त्याचा प्राथमिक अंदाज ती कनौजी असावी हा होता. आज तरी ती सर्कसमध्ये दिसेल अशी आशा बाळगून तो त्या मोहक सुगंधाच्या शोधात तंबूत शिरला. तिकीट खिडकीवर बसलेल्या मलिका आणि छोटू, दोघांनीही त्याची मनोमन नोंद केली. तसेच काही प्रेक्षक सोडून रांगेत उभे असलेल्या ख्रिस आणि रश्मीनेही त्याची नोंद घेतली होती.

******

आजचा शो नेहमीपेक्षा अधिक लांबीचा होता. अखेरचा दिवस असल्याने सर्कसचे सर्व अ‍ॅक्ट्स दाखवले जात होते. ख्रिस आणि रश्मीने इतक्या दिवसात सर्व अ‍ॅक्ट्स पाहिले असल्याने त्यांनी समोर काय चालू आहे याकडे पूर्ण दुर्लक्ष केले होते. रश्मीने सर्व लक्ष श्रीरंगवर केंद्रित केले होते. ती त्याला आपल्या नजरेआड होऊ देणार नव्हती. छोटूचा अ‍ॅक्ट शोच्या सुरुवातीलाच होता. तो संपल्यावर तो ख्रिससोबत प्रेक्षकांवर नजर ठेवून होता. ख्रिसला कोणी संशयास्पद हालचाल करत आहे असे वाटले तर तो छोटूला त्या भागात जाऊन तपासणी करून यायला सांगत होता. लहान चणीचा छोटू एवढ्या गर्दीतूनही सहज वाट काढून संशयिताचे निरीक्षण करून येई. नागराजचा अ‍ॅक्ट सुरू होईपर्यंत प्रत्येक वेळी ख्रिसचा संशय व्यर्थ ठरत होता. पण ख्रिस कोणताही धोका पत्करणार नव्हता. ओल्गा आणि उमाचे अ‍ॅक्ट्स नुकतेच संपले होते आणि नागराजचा अ‍ॅक्ट सुरु झाला तेव्हा त्या कपडे बदलण्यासाठी आपल्या तंबूत परतल्या. त्यांना लवकरात लवकर कपडे बदलून परत जायचे होते, जेणेकरून ख्रिसकडे प्रेक्षकांवर लक्ष ठेवायला डोळ्यांच्या दोन जोडी आणखी मिळाव्यात.
ख्रिस आणी छोटूचे नागराजकडे अजिबात लक्ष नव्हते. त्याने नेहमीप्रमाणे आपला अ‍ॅक्ट सुरू केला. त्याला स्वतःलाही अजून खात्री नव्हती की तो जे करतो ते संमोहन आहे का आणखी काही. पण त्याच्या इच्छाशक्तीला त्या भारलेल्या वातावरणाची जोड मिळून लोक जडवत होत असत. भद्राकडे कसलीशी वनस्पती होती. तिचा गंध हलकीशी गुंगी आणत असे. तिचे पाणी मुद्दामून गुलाबपाण्यात मिसळून नागराजच्या अ‍ॅक्टच्या आधी फवारले जात असे जेणेकरून तो प्रभाव आणखीनच वाढावा. या प्रभावाखाली तंबूतला गोंगाट एकाएकी थांबला. गोंगाट कमी झाल्याचा एक महत्त्वाचा फायदा होता. कोणतीही हालचाल लगेच डोळ्यात भरणार होती. ख्रिस याच अ‍ॅक्टची वाट पाहत होता. त्याने छोटूचे लक्ष एका विशिष्ट जागी वेधले. लाल साडी नेसलेली एक स्त्री गर्दीतून वाट काढत श्रीरंगच्या दिशेने चालली होती.

*****

छोटूने शिताफीने हालचाल करून त्या स्त्रीच्या आधी श्रीरंगला गाठले. श्रीरंग नागराजच्या अ‍ॅक्टच्या जादूत गुरफटला होता. त्याने छोटू अक्षरशः खेटून उभा राहिला तरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. छोटूने एक आवंढा गिळला. जरी वयाने तो लहान असला तरी त्याला "खुनी" या शब्दामागची भयावह संकल्पना कळत होती. ती लाल साडीतील स्त्री एक संशयित असली तरी तिच्यापासून संभवणारा धोका प्रचंड होता. ती दृष्टीपथात येताच छोटू थोड्या दूर जाऊन उभा राहिला. त्याला एक विचित्र असा वास आला. अजून वयात आलेला नसल्याने त्याला तो प्रभाव नीटसा जाणवला नाही. पण त्याच्या शरीराला एकप्रकारचा हलकेपणा आला. त्याच्या हालचालींमध्ये एक प्रकारचा गलथानपणा आला. त्या स्त्रीने श्रीरंगच्या विजारीच्या खिशात काहीतरी सरकवले आणि मग ती छोटूकडे वळली. छोटूला हे लक्षात येत होते की ती स्त्री त्याच्याच दिशेने येत आहे. त्याच्या हेही लक्षात येत होते की आपण इथून पाय काढता घेतला पाहिजे. पण तो एका अदृश्य बंधनात जखडला गेला होता. त्या स्त्रीने सराईतपणे उजव्या हाताने छोटूच्या मानेवर एकच फटका मारला. शुद्ध हरपण्यापूर्वी छोटूच्या डोक्यात एकच विचार होता - ही कोण आहे हे सांगता येत नसले तरी ही अनोळखी नाही. हिचा आणि आपला परिचय आहे.

*****

मलिका आपली रंगभूषा करण्यात गर्क होती तेव्हा भद्राने तिच्या तंबूत प्रवेश केला. मलिका काही प्रतिक्रिया देणार इतक्यात त्याने पाठुंगळीवरचे डबोले जमिनीवर आदळले. छोटूच्या मुसक्या आवळल्या होत्या. मलिकाच्या चेहर्‍यावर मोठ्ठे प्रश्नचिन्ह होते. भद्राने आधी छोटूला तंबूच्या कनातीला टेकवून बसवले आणि त्याने मलिकाच्या मूक प्रश्नाचे उत्तर दिले.
"तिने पाठवला. काही नको त्या लोकांच्या आसपास घुटमळत होता."
मलिकाच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने छोटूला मजबूतीने बांधले आहे याची खात्री करून केली. "तू प्रेक्षकांमधून नजर फिरवली का?"
"हो. पुण्यातला तो चहावेडा इंग्रज अधिकारी मला प्रेक्षकांत दिसला. तो इंदूरात असण्याचे काही कारण मला तरी सुचत नाही"
"हम्म. आज रात्रीचे काम झाले की छोटूकडे बघता येईल. त्या इंग्रज अधिकार्‍याला या सगळ्याची कितपत कल्पना आहे ते सांगता येणे कठीण आहे."
"त्याला काहीतरी माहिती असेल? मला शंका वाटते."
"त्याला हलके लेखू नको भद्र! मला आधी भीति होती की रुद्र त्याच्या साथीदाराच्या मृत्युस अप्रत्यक्षरीत्या जबाबदार असल्यामुळे तो आपला माग काढत येईल. पण आता असे दिसते की त्याचे हात या प्रकरणात आपल्याला वाटले होते त्यापेक्षा खोलवर गुंतले आहेत. सावध राहा."
भद्र तंबूतून बाहेर पडला. पुढच्या अ‍ॅक्टची सुरूवात होण्याआधी सूत्रसंचालक स्टेजवर असणे गरजेचे होते.

*****

रश्मी लक्ष वेधून न घेता ख्रिसच्या जवळ जाऊन उभी राहिली. तिने हलकेच एक चिठ्ठी काढून ख्रिसच्या हातात कोंबली. ख्रिसने निर्विकारपणे ती चिठ्ठी आपल्या खिशात कोंबली. थोड्याच वेळात ते दोघे सर्कसच्या तळापासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्या उपाहारगृहात चहाचा आस्वाद घेत होते.
"मला माहिती आहे की हा चहा अतिशय निकृष्ट प्रतीचा आहे पण लवकरच अंधार पडेल. मग परत आपल्याला चहा बनवायला वेळ मिळणार नाही आहे."
"अ‍ॅलेक्सीने सकाळीच चहा ब्रू करून ठेवला असता."
"सकाळचा शिळा चहा पिणार तुम्ही?"
"या चहापेक्षा शिळा चहा परवडला."
"चहा महत्त्वाचा का आज रात्रीची कामगिरी?"
प्रश्न बिनतोड होता. ख्रिसने मुकाटपणे चहा म्हणून खपवलेला तो द्राव घशाखाली ढकलला.
"नशीब की मी त्या स्त्रीला छोटूला घेऊन जाताना पाहिले. ओल्गाच्या म्हणण्यानुसार तो मलिकाच्या तंबूत बंदिवान आहे. उमा त्याला रात्री सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे."
"मलिका त्यावेळी कुठे असणार आहे?"
"तिच्या तंबूत निश्चितपणे नसेल. श्रीरंगच्या मागावर आणखी कोणी असतील याची शक्यता त्या लोकांनी लक्षात नाही घेतली. मी त्याच्या खिशातली चिठ्ठी काढून घेतली. आता तो रात्री इकडे फिरकणार नाही. चिठ्ठीनुसार त्याला मध्यरात्री शहराबाहेरच्या माळरानावर यायला सांगितले आहे."
"त्याच्या जागी आता मी रात्री तिकडे जाईन. तू प्रथम उमाच्या मदतीने छोटूला सोडव. त्यानंतर पोलिसांना घेऊन माझ्या मदतीला ये."
"आणि सर्कस?"
"ते सर्कसवर छापा घालायला तयार नाहीत. त्यांचा मुद्दा पटण्यासारखा आहे. जोपर्यंत त्यांना ठोस पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांना सर्कसवर छापा घालणे परवडण्याजोगे नाही. त्यात ही सर्कस बहुतांशी भारतीय आहे. सध्या व्हाईसरॉयचे धोरण बघता, फणींद्रसारख्या इतर जणांच्या हातात ते कोलीत दिल्यासारखे होईल. किमान दिल्ली दरबार होईपर्यंत तरी यांना अधिक सावधगिरीने वागणे भाग आहे."
"आणि त्यानंतर?"
ख्रिसकडे यावर काही उत्तर नव्हते. लॉर्ड हार्डिंग्जचे धोरण मवाळ असले तरी पुढचे व्हॉईसरॉय कसे निघतील याची काही शाश्वती नव्हती.

~*~*~*~*~*~

ऑक्टोबर १९११
बर्लिन

"ब-आमटर, थोडक्यात आजच्या मीटिंगचा अजेंडा स्पष्ट करा."
"या माईन हेर. आपण सर्वजण कित्येक दिवसांनी एकत्र आलेलो असल्याने आधी थोडी उजळणी करूयात. आपल्या सर्वांना लक्षात असेलच की तीन महिन्यांपूर्वी अखेर आपण कैसरला मोरोक्कोत कारवाई करण्यासाठी राजी करण्यात यशस्वी झालो. आपल्या युद्धनौका अजूनही भूमध्य समुद्रातच तळ ठोकून आहेत. मोरोक्कोतल्या आपल्या कारवाईचा उद्देश्य फ्रेंचाकडून आपल्या मोरोक्कोतील आर्थिक हितांना होणार्‍या विरोधाचे प्रत्युत्तर देणे हा होता. ब्रिटिशांचा होऊ शकणारा हस्तक्षेप लक्षात घेता, त्यांच्या विरोधात काही योजना असणे आवश्यक होते. डेव्हिड वोल्फ या आपल्या एजंटने अतिशय हुशारीने एक योजना आखली. बर्थोल्ट होनेस हा त्याच्या ओळखीतला जर्मन ज्यू पूर्वीपासून भारतात होता आणि त्याचे काही ब्रिटिश विरोधी विचारांच्या भारतीयांशी ओळख निर्माण झाली होती. डेव्हिडने याचा फायदा उठवला. त्या क्रांतिकारकांच्या हस्ते त्याने दिल्ली दरबारात ब्रिटिशांच्या सम्राटांची हत्या करण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्याने कागदावर मांडली."
"हा डेव्हिड काहीसा बेभरवशाचा व्यक्ती नाही का? मला आठवते त्यानुसार तो जरा विचित्रच आहे."
"तो विचित्र आहे पण बेभरवशाचा नाही. प्रशियन साम्राज्य आणि त्यातही जर्मनीविषयी असलेल्या त्याच्या स्वामिभक्तीवर कोणी शंका घेऊ शकत नाही. त्याच्या विचित्रपणाला लगाम बसावा म्हणून फ्राऊ एल्सा फ्रिट्झ हिला सोबत पाठवण्यात आले होते."
"दिल्ली दरबार डिसेंबरमध्ये आहे. अजून जवळपास दोन महिने अवकाश आहे. तोपर्यंत आपल्यापुढे इतर प्रश्न वाढून ठेवले आहेत त्यांचे काय?"
"माईन हेर, हाच आजचा अजेंडा आहे. आत्तापर्यंत अनेक अनपेक्षित अडचणींमुळे ठरल्याप्रमाणे घटना घडलेल्या नाहीत. बर्थोल्ट होनेसचा खून झाला. एल्साचा प्राथमिक अहवाल होता की डेव्हिडने त्याच्या भारतीय मित्राला सोबत घेऊन हा खून केला. पण तिच्या शेवटच्या अहवालात ब्रिटिश तपासाविषयी माहिती होती."
"काय म्हणतो ब्रिटिश तपास?"
"आपली भीति ही होती की ब्रिटिशांना या योजनेचा सुगावा लागला तर ते प्रतिबंधक हालचाली करतील आणि आपली त्यांच्यावर दबाव आणण्याची योजना खरी ठरेल. ते प्रतिबंधक हालचाली करत आहेतच पण त्यांचा निष्कर्ष असा आहे की बर्थोल्टचा खूनी एक त्रयस्थ व्यक्ती आहे आणि केवळ योगायोगाने हे सर्व उघडकीस आले."
"हा योगायोग आपल्याला कितपत महागात पडेल याचा अंदाज बांधणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या पदरात काहीच पडणार नाही."
"कीदरलेनच्या आघाडीवर काय घडते आहे?"
"कीदरलेनच्या वाटाघाटींना हळू हळू यश येते आहे. आपल्या सुदैवाने इटलीने ऑटोमन तुर्कांशी भांडण उकरून काढले आणि आपल्याला दबाव आणायला आणखी एक मुद्दा मिळाला. कीदरलेन मोरोक्को नाही तरी फ्रेंच कांगोमध्ये आपल्याला भूभाग मिळवून देऊ शकतो."
"पण फ्रेंच कांगो संसाधनांनी तितका समृद्ध नाही ना?"
"मोरोक्को इतका नाही. पण तिथल्या कांगो नदीमुळे त्या संसाधनांची वाहतूक करणे सोयीचे आहे."
"डेव्हिडच्या आघाडीवर काय बातमी आहे?"
"एल्साकडून अहवाल येऊन आता काही दिवस लोटले. खात्रीलायक बातमी नसली तरी डेव्हिडने एल्साचा खून केला आहे असे कळते. त्यामुळे काहीही झाले तरी डेव्हिडला अतिरेकी ठरवून आपण हात झटकलेच पाहिजेत. प्रश्न इतकाच उरतो की वाटाघाटी किती ताणायच्या?"
अध्यक्षस्थानी बसलेली व्यक्ती काहीशी विचारात पडली. फ्रेंचांशी वाटाघाटी करणे तिला फारसे पसंत नव्हते पण त्याच वेळी प्रशियन साम्राज्याची प्रतिमा खूप मलीन करूनही चालणार नव्हती. तसेच कैसरला संसाधनांनी समृद्ध आफ्रिकेत कोणता ना कोणता हिस्सा मिळणे अधिक महत्त्वाचे वाटत होते. औद्योगिक प्रगतीचा वेग टिकवण्यासाठी ते गरजेचे होते.
"डेव्हिडचा भारतीय मित्र? त्याचे काय?"
"डेव्हिड आणि तो भारतीय अजूनही ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत. व्हाईसरॉय हार्डिंग्ज काहीही झाले तरी पंचम जॉर्जना दिल्लीत आणूनच राहील. त्यामुळे दिल्ली दरबार भरणार हे नक्की! पंचम जॉर्जची हत्या होण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त! तसेही ब्रिटिश तपास बर्थोल्टचा खूनी आणि डेव्हिड या दोन आघाड्यांवर विभागला असल्यामुळे विस्कळीत आहे"
"जर तसे असेल तर आपण चिंता करण्याची काळजी नाही. कीदरलेनशी मी बोलतो. आपल्याला फक्त हे भासवायचे आहे की डेव्हिडशी आपला काहीही संबंध नाही. कीदरलेनच्या वाटाघाटींमधून आपले हित सहज साध्य होईल असे दिसते. जर डेव्हिड सफल झाला तर .. त्झूगाब!

******

मुंबईत सर हेन्री अस्वस्थ होऊन येरझार्‍या घालत होते. दिल्ली दरबाराची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली होती तसे तसे त्यांचा कामाचा व्याप वाढत होता. बॉम्बेचे गव्हर्नर सर क्लार्कना दिल्ली दरबारच्या आत गेटवे ऑफ इंडिया पूर्ण करून पाहिजे होते जेणेकरून सम्राटांच्या आगमनासाठी एक भव्य प्रवेशद्वार तयार असेल. पण ही धामधूम आणि एवढ्या विशाल बांधकामाकरिता लागणारी सुरक्षा तसेच आर्थिक गणिते जुळत नसल्यामुळे ते बांधकाम लांबणीवर पडत होते. त्यात सम्राटांचे आगमन मुंबईत होणार होते. त्यांची भारतातली पहिले पाऊले मुंबईच्या बंदरात पडणार होती. त्यांच्या सुरक्षेची योग्य ती तजवीजही हेन्रींनाच करायची होती. या सर्व धांदलीत एल्साच्या मृत्युची बातमी त्यांना मिळाली होती. आता एल्साचा या जर्मन लोकांशी कितपत संबंध होता ते स्पष्ट नसली तरी ती भरवशाची सेक्रेटरी होती. तिच्या मृत्युची चौकशी चालू होती. पण या सर्वापेक्षा काही महत्त्वाचे त्यांच्या मनात घोळत होते. जोसेफ आज पहाटे फणींद्रला पकडणार होता.
सकाळपासून ते जोसेफच्या संदेशाची वाट बघत होते पण त्याच्याकडून अजून कोणतीच बातमी आली नव्हती. त्यांच्या चिरूटाचा कडक धूर संपूर्ण घरभर पसरला होता. अखेर त्यांच्या बटलरने टेलिग्राम्सची चळत आणून ठेवली. हेन्रींनी सावकाशपणे टेलिग्राम्स चाळले. त्यातला जोसेफचा टेलिग्राम त्यांनी आधी वाचला. प्रथम त्यांचे डोळे क्षणभर उजळले. पण लगेचच निराशेने त्यांनी तो टेलिग्राम दूर भिरकावला.

जोसेफने फणींद्र आणि त्याच्या सोबत्यांना कोंडीत पकडले होते. नदीमार्गे निसटण्याची त्यांची योजना होती. प्रत्यक्ष बोटीत चारजण आणि नदीघाटात लपलेले आणखी एक दहाजण असे फणींद्रच्या मदतीला होते. सगळे क्रांतिकारक ठार झाले. पण .......

............

............

फणींद्र निसटण्यात यशस्वी झाला.

~*~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66334

Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
छान वेग आलाय कथेला. ऊत्कंठा वाढतच चाललीय.>> +1.

मी कालपासून सर्व भाग परत वाचून काढले. तेव्हा लिंक लागली.

एक्स्ट्रा फीचर

हा भाग थोडा जर्मन हेवी आहे आणि ऐतिहासिक दाखल्यांनी भरलेला आहे. त्याबद्दल थोडेसे.
औद्योगिक क्रांतिनंतर युरोपीय जीवनमान कमालीचे सुधारले. पण हा प्रगतीचा वेग राखण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीची नितांत आवश्यकता होती. खासकरून विविध खनिजांच्या खाणींची. आफ्रिकेत हे सर्व विपुल प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे "बळी तो कान पिळी" या न्यायाने वसाहतवादी युरोपीयांनी आफ्रिका आपापसात वाटून घेतली. या शर्यतीत एक देश मागे राहिला - जर्मनी. जर्मनी, किंवा प्रशिया ज्याचा प्रमुख हिस्सा जर्मनी होता, ही बिस्मार्कचा उदय होईपर्यंत युरोपातली दुय्यम शक्ती होती. बिस्मार्कच्या नेतृत्वाच्या जोरावर जर्मनांनी फ्रेंचांना नमवले आणि साधनसंपत्तीत तेव्हा सर्वात श्रीमंत असलेल्या आणि पुढारलेल्या ब्रिटिशांना लाजवेल अशा वेगाने प्रगती करायला सुरुवात केली.

जर्मनांना मोरोक्कोच्या रुपाने आफ्रिकेतला आपला हिस्सा हवा होताच. पण ते या खेळात उशीरा उतरल्यामुळे त्यांची आर्थिक बाजारपेठ अजून तितकी सक्षम नव्हती आणि अँग्लो-फ्रेंचांनी प्रत्यक्षात मोरोक्कन क्रायसिस केवळ जर्मन अर्थव्यवस्थेवर ताण आणून थांबवला. त्यात जर्मन युद्धनौकांना प्रत्युत्तर देण्यास मदत म्हणून स्पेनने आपले आरमार उतरवण्याची तयारी दर्शविली. या सगळ्यात नाचक्की होऊ नये म्हणून गोष्टीत लिहिल्याप्रमाणे जर्मन मुत्सद्द्यांनी पर्यायी वसाहत - फ्रेंच कांगो - स्वीकारली. फ्रेंच कांगो म्हणजे ज्याला भूगोलाच्या पुस्तकात झैरे नावाने संबोधले जाते तो देश. जसे जर्मनांना युद्ध नको होते तसे ते फ्रेंचांनाही नको होते कारण मग मोरोक्को बंडखोराच्या हाती जाऊन स्वतंत्र होण्याची शक्यता होती म्हणून त्यांनी फ्रेंच कांगोवर पाणी सोडले.

ब-आमटर - गोष्टीतल्या उपयोगांसाठी ब-आमटर म्हणजे ऑफिसर. Beamter ही जर्मनीतली सिव्हिल सर्व्हंट्सची एक श्रेणी आहे. हे उच्चपदस्थ अधिकारी असून यांच्या जर्मन कायदेही वेगळे असत, अजूनही काही प्रमाणात असतात. यांना मुख्यत्वे विशेष कामांसाठी नेमले जाते.

त्झूगाब - Zugabe म्हणजे बोनस