फ्री...? : भाग ८

Submitted by पायस on 31 May, 2018 - 12:08

पूर्वसूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/61278

ऑगस्ट १९११
स्थळ: इंदूर

ख्रिस आरशात पाहून केस विंचरत होता. फुलके-बटाटा रस्सा असा ब्रेकफास्ट आज त्याच्या भाळी लिहिला होता. सनी साईड अप एग्ज मागितल्यावर भुर्जी मिळाल्यावर झालेल्या अपेक्षाभंगाच्या तुलनेत हा सुसह्य होता. रश्मीने त्याचे कपडे काढून ठेवले होते. तिच्यासाठी मेडचे कपडे घेताना ख्रिसला बरेच सायास पडले. भारतात आधीच इंग्लिश मेड मिळण्याची मारामार, त्यात त्यांचे कपडे कोण घेत बसेल? मग भारतीय बायकांना त्यांच्याच पारंपारिक वेशात काम करण्याची मुभा असे. पण ख्रिसमधला लंडनकर स्वस्थ बसेल तरच नवल! त्याने रश्मीची नेमणूक पार्लर मेड म्हणून केली होती व तिचा पगारही त्यानुसार ठरवला होता. पार्लर मेडचे कपडे पार्लर मेडप्रमाणेच असले पाहिजेत. अखेर मोठ्या मुश्किलीने त्या सदृश दिसणारे अ‍ॅप्रन, कॉर्सेट्स, स्कर्ट वगैरे मिळवण्यात तो यशस्वी झाला. रश्मीच्या अ‍ॅप्रनवर थोड्याच दिवसात तेलकट डागांना जागा मिळाली आणि ख्रिसवर डोक्यावर हात मारून घ्यायची पाळी आली. आज मात्र त्याच्याकडे अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता. आज नटराजा सर्कसचा पहिला शो होता आणि तो हा शो कुठल्याही परिस्थितीत चुकवणार नव्हता.

*****

तिकिट विक्री जोरात चालू होती. बॉम्बे, पूना पाठोपाठ नागपुरातला शो हिट झाल्याने नटराजा सर्कसला पुरेशी प्रसिद्धी मिळाली होती. अलोट जनसमुदायात ती उठून दिसण्याची शक्यता नव्हतीच. तिने लाल रंगाची पण साधीशीच साडी घातली होती. साडी भरजरी नसली पण ती एखाद्या प्रतिष्ठित घराण्यातील असावी हे स्पष्ट करत होती. पदर ओढून धरल्याने तिचा चेहरा नीटसा दिसत नव्हता पण तिचे ओष्ठद्वय दृष्टीस पडत होते. त्या ओठांचा रंग खूपच गडद गुलाबी होता. बहुधा काही प्रसाधन वापरून तिने ओठ रंगवले होते. वर्ण सावळ्याकडे झुकणारा असला तरी ते गडद ओठ उठून दिसतील इतपत उजळ होता. हातात बांगड्या असल्या तरी मोकळा गळा काही भोचक जीवांना कुजबुज करण्याचे कारण देत होता.
"तू कोण आहेस? अशी एकटीच काय करत आहेस?"
प्रश्नकर्ता तरुण तिच्याकडे बघत होता. अर्धपारदर्शक आवरणामागचा चेहरा न्याहळण्याचा असफल प्रयत्न करत होता. तिच्याकडून काहीच उत्तर आले नाही. त्या तरुणाने चहूबाजूला नजर फिरवली. वस्तीपासून काहीसे दूर, मोकळ्या मैदानात सर्कशीने तंबू ठोकले होते. तिकिटविक्री चालू असल्याने आत्ता वर्दळ होती. भवताली खाद्यपदार्थांचे विक्रेते, फेरीवाले संधीचा फायदा घेण्यास आले असल्याने परिसराला जत्रेचे स्वरुप आले होते. ' ही या गर्दीत हरवलेली दिसते ', असा विचार करत त्याने नजर परत तिच्यावर स्थिर केली. तिच्यावर? नजर स्थिर करायला ती तिथे होतीच कुठे? कोणी वेगळीच स्त्री तिच्या जागी उभी होती. गोंधळलेल्या त्या तरुणाने काही वेळ तिचा शोध घेतला पण ती तरुणी जणू त्या गर्दीत विरघळून गेली होती. तो मात्र अविद्राव्य खड्याप्रमाणे तिला दिसत होता. त्याच्या मित्रांच्या टोळक्याबरोबर तो तंबूत प्रवेश करेपर्यंत ती दूरवरून त्याचे निरीक्षण करत होती. तिच्या नजरेतून एक बाब मात्र सुटली. त्या टोळक्याच्या पुढेच एक इंग्लिश गृहस्थ व त्याची सेविका होते. तिकिट तपासणार्‍या छोटूनेही त्या इंग्लिश गृहस्थाला ओळखले नाही. ख्रिसने निर्विकारपणे आपली राखीव जागा पकडली आणि शो सुरु झाला.

~*~*~*~*~

जुलै शेवटचा आठवडा, १९११
स्थळ: बॉम्बे

सर मॅक्सवेल ख्रिसची तार वाचत होते. सर्कस इंदूरात दाखल झाल्याची बातमी ख्रिसने कळवली होती. त्याच्या बाजूलाच जोसेफची तार पडली होती. जोसेफने लॉर्ड हार्डिंग्जची भेट झाल्यानंतर कलकत्त्यातच तळ ठोकला होता. फणींद्र कधी ना कधी कलकत्त्यात परतणार अशी जोसेफची खात्री होती आणि त्यासाठी कलकत्त्यात कोणी ना कोणी असणे अत्यावश्यक होते. अजून तरी फणींद्रने कालीमातेसमोर हजेरी लावली नव्हती पण तो लवकरच लावेल यात तिळमात्र शंका नव्हती. युरोपाच्या आघाडीवरील बातम्या मात्र चिंताजनक होत्या. जर्मनीने गनबोट पाठवल्यानंतर दोनच दिवसांनी जर्मन परराष्ट्रमंत्री कीदरलेन-वेक्टर व फ्रेंच राजदूत ज्युल्स गॅम्बोन यांनी वाटाघाटींना सुरुवात केली. त्या वाटाघाटींमध्ये नेमके काय घडले हे ते दोघेच जाणो पण २० जुलै १९११ रोजी लंडनच्या द टाइम्स वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांतानुसार जर्मनीने मोरोक्कोच्या बदल्यात फ्रेंच कांगोमध्ये रस दाखवला होता. फ्रेंच कांगो गिनीच्या आखातात येतो. तिथल्या बहुतांशी वसाहती ब्रिटनच्या होत्या. टाइम्सने असा दावा केला होता कि याने ब्रिटनच्या हितसंबंधांना धक्का पोचतो आणि ब्रिटिश सरकारने याच्याविरोधात तातडीने पावले उचलावीत. इतके दिवस हे प्रकरण चव्हाट्यावर न येऊ देण्याची तीनही देशांच्या धुरंधरांनी पराकाष्ठा केली होती. या लेखाच्या प्रसिद्धीनंतर मात्र युरोपीय बाजारात घबराट पसरली. स्टॉक्स पडण्याची पुरेपूर चिन्हे होती आणि या पार्श्वभूमिवर ब्रिटिश चॅन्सेलर डेव्हिड लॉईड जॉर्ज यांनी जर्मनीकडून मानहानी सहन केली जाणार नाही असे वक्तव्य करत कडक पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले. लंडनकरांचा स्वाभिमान सुखावण्याच्या दृष्टीने ही भूमिका योग्य असली तरी ही केवळ युद्धाच्या निखार्‍यांवर घातलेली फुंकर होती. अशा वेळी मॅक्सवेल यांना भारतीय आघाडीवर नवीन डोकेदुखी तरी अपेक्षित नव्हती. त्यातल्या त्यात दिलासादायक एकच बातमी होती, कीदरलेन-गॅम्बोन जोडगोळीने अजूनही वाटाघाटी चालू ठेवल्या होत्या. किमान दोन डोकी तरी या वडवानलात बर्फ ठेवून वावरत होती. त्यांनी तत्परतेने त्या पत्रांना उत्तरे खरडली आणि आपल्या सेक्रेटरीला बोलावून घेतले.
"एल्सा ही पत्रे लवकरात लवकर मिस्टर काल्डवेल आणि मिस्टर पॅक्स्टन पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था कर."
एल्सा फ्रिट्झ ती पत्रे घेऊन केबिनच्या बाहेर आली. त्या पत्रांचा मजकूर ख्रिस व जोसेफपर्यंत जरूर पोहोचणार होता पण डेव्हिडने वाचल्यानंतर!

*****

"त्या कीदरलेनला कोणी हाकलून का देत नाही?"
डेव्हिड रागाने धुमसत होता. त्याची साधी सरळ अपेक्षा होती कि त्याच्या मतास अनुकूल असलेल्या टाळक्यांनी कैसरला याहून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यास उद्युक्त करावे. जितक्या लवकर आक्रमक पावले उचलली जातील तितक्या लवकर युरोप जर्मन पंखांखाली येईल आणि म्हणूनच ब्रिटिशांनी फ्रेंचांना मदत पाठवण्याआधीच मोरोक्कोत जर्मन हस्तक्षेप व्हायला हवा होता. पण कीदरलेनच्या काहीशा सामोपचाराच्या धोरणाने हस्तक्षेप लांबणीवर पडत होता. एल्साला डेव्हिडची मनःस्थिती समजत असली तरी तिला हेही ठाऊक होते कि कीदरलेनच्या धोरणामुळेच युद्ध टळण्याची देखील आशा होती आणि यामुळेच जर्मन बाजारपेठ अजून तरी कोसळली नव्हती. इथे जर्मन सामरिक संबंधांपेक्षा आर्थिक संबंधांना अधिक महत्त्व देणे सुयोग्य भूमिका होती पण हे डेव्हिड व त्याच्या धन्यांना पटणे शक्य नव्हते. एल्साने मग विषय बदलला,
"कीदरलेन किंवा इतर कोणीही असेल ते, मोरोक्कोत काय निर्णय घ्यायचा असेल तो घ्यायचे काम त्यांचं आहे. इथे मोरोक्को प्रकरणानंतर काय झटका द्यायचा हे आपल्यावर आहे. आपल्या महान भारतीय मित्राच्या मूर्खपणामुळे मॅक्सवेल व त्याच्या दुकलीला आपल्या हेतुंची पूर्ण कल्पना आहे. योजनेत तुला काही बदल करायचे असले तरी करता येणार नाहीत कारण फणींद्र कलकत्त्यात अजून पोहोचला नाहीये. त्याने पाठवलेला शेवटचा संदेश आपल्या मूळ योजनेस अनुसरून असला तरी गोंधळ व्हायचा तो झालाच आहे. आपली योजना अजूनही सफल होईल का?"
"एल्सा, वेत्राऊ मिर. माझे अंदाज सहसा चुकत नाहीत. योजनेचे सर्व धागे फणींद्रच्या हाती न दिल्याचा फायदा तुला आता कळून चुकला असेल. बर्थोल्ट फणींद्र सर्कशीत भेटण्यामागे एक कारण होते जे तुला ठाऊक आहेच."
"मान्य! बर्थोल्टही थोडा विचित्रच होता. सर्कशीत एकदा गेला असता तरी पुरलं असतं, वारंवार जायची गरज नव्हती."
"त्याने फरक पडत नाही, फणींद्र कलकत्त्याला आज ना उद्या पोहोचेलच. सुदैवाने आपल्याकडे अजूनही भरपूर वेळ आहे. फणींद्र जोपर्यंत ठरल्यानुसार आपल्याला हवा तसा माणूस उभा करेल तोपर्यंत आपल्या योजनेला धक्का लागणार नाही. तोवर काय करायचे आहे ते तुला माहित आहे."
एल्साने मान डोलावून होकार दिला. ती डेव्हिडचा निरोप घेऊन बाहेर पडली तेव्हा डेव्हिड आता पूर्ण दुरुस्त झालेल्या पॅपीची चाचणी घेत होता.
"हेर पॅपी, इंदूरला जायची ही तुमची पहिलीच वेळ असावी."

~*~*~*~*~

ऑगस्ट १९११
स्थळ: कलकत्ता

जोसेफला आता कलकत्त्यात येऊन महिना झाला होता. बॉम्बे आणि कलकत्त्यात साम्ये बरीच असली तरी फरकही तेवढेच होते. दोनही शहरे ईस्ट इंडिया कंपनीने वसवली होती पण बॉम्बेचे जेवढे आंग्लीकरण झाले होते तेवढे कलकत्त्याचे झाले नव्हते. तरीही कलकत्ता राजधानीचे शहर होते हे डावलता येत नव्हते. संपूर्ण भारताचा कारभार कलकत्त्यातून चालत होता. खुद्द व्हॉईसरॉय यांचे निवासस्थान कलकत्त्यात होते. बंगालच्या इतर भागांना औद्योगिकीकरणाचा स्पर्श झाला नसला तरी कलकत्ता आणि त्याच्या आसपासच्या वसाहतींमध्ये चौकाचौकात औद्योगिक क्रांतीच्या खुणा दिसत. असे असतानाही जोसेफला बॉम्बे अधिक ब्रिटिश, टू बी स्पेसिफिक इंग्लिश, वाटे. जोसेफला यानंतरही बॉम्बे अधिक जवळचे वाटे. कारण कलकत्त्याचा सामान्य माणूस हाडाचा बंगाली होता. बॉम्बेमधला सामान्य माणूस हा कोणीही असू शकत होता. बॉम्बे इतकी विविध संस्कृतींची इंग्लिश संस्कृतीबरोबरची सांगड कलकत्त्यात नव्हती. बंगाली बाबूंनी आंग्लीकरणाचे वारे अंगावर घेतले असले तरी कुठे तरी त्यांच्यातला भोद्रोलोक जागृत होता. रविंद्रनाथांनी अंगबंग म्हणून हेटाळणी केलेले काटा चमच्याने हिल्सा भात खाणारे बंगाली सुद्धा दुर्गापूजा तेवढ्याच जोशात साजरी करत होते. नेमक्या याच कारणाने जोसेफला पुण्याप्रमाणेच कलकत्त्यातही असंतोष जाणवत होता. पुण्याप्रमाणेच कलकत्त्यात जहाल गटाचे वर्चस्व होते. एकोणीसाव्या शतकातल्या लंडनप्रमाणेच गूढतेची चादर ओढलेले कलकत्ता कोणत्याही गुप्तहेरासाठी स्वप्नवत बाजारपेठ होती. ख्रिसला हे शहर आवडावे यात काहीच नवल नव्हते पण जोसेफ काही गुप्तहेर नव्हता. त्याच्यासाठी फणींद्रला पकडणे हे एकमेव उद्दिष्ट होते. राजधानी असली तरी अशा कलकत्त्यातला असंतोष घातक असल्याचे त्याने ओळखले होते. म्हणूनच त्याने आल्या आल्या सर्व बातमीदारांना युगांतरच्या मागावर लावले. त्याने फार काही फायदा झाला नाही पण जोसेफला किमान आपल्या शत्रुपक्षाची ओळख होण्यात मदत मिळाली. कलकत्त्याच्या बोळांमध्ये किती सहजतेने चकवा देता येतो याची चुणूकही अनुभवायला मिळाली. त्याच्या सुदैवाने युगांतरचे नजीकचे मुख्य लक्ष्य काही वेगळेच होते. १९०५ मध्ये तेव्हाचे व्हॉईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी केलेली बंगालची फाळणी आता ब्रिटिश सरकारच्या चांगलीच अंगलट येऊ लागली होती. प्रत्युत्तरादाखल १९०८ पासून फाळणीच्या विरोधात असलेल्या बहुतांश प्रमुख नेत्यांची धरपकड करण्यात आली होती. युगांतरचा मात्र निव्वळ निदर्शनांवर विश्वास नव्हता. बंगालची फाळणी मागे घेतली जात नाही तोवर ब्रिटिशांना रट्टे देत राहायचे हा त्यांचा साधा सरळ हिशोब होता. जर्मनांसोबत आखलेली योजना ही देखील त्यांच्या दृष्टीने असाच एक दणका होती. याचा अर्थ संपूर्ण युगांतर या दणक्यामागे लावणे त्यांच्या तत्वात बसणारे नव्हते. ही बाब लक्षात आल्यानंतर जोसेफने निश्वास सोडला होता. फणींद्र कितीही धोकादायक असला तरी संघटनेचे बळ वेगळेच असते आणि त्या बळाशी सामना करायचा नाही आहे ही देखील आश्वस्त करणारी बातमी होती.
यानंतर जोसेफने कलकत्त्यात यायच्या मार्गांवर पाळत ठेवायला सुरुवात केली होती. रेल्वे स्टेशन, वेशी, गंगेचे घाट या सर्वांवर त्याच्या माणसांची कडक गस्त होती. याची भरपाई म्हणून युगांतरच्या इतर कार्यकर्त्यांना काहीसे मोकळे रान मिळाले होते पण समोरच्या संकटाला तोंड देण्याकरिता चुकवावी लागलेली ती किरकोळ किंमत होती. एके दिवशी असाच "ऑगस्ट उजाडला तरी फणींद्र अजूनही कसा सापडत नाही? तो गेला तर गेला कुठे?" या विचारात जोसेफ गढलेला असतानाच अकस्मात त्याच्यासमोर एक चमत्कारिक रिपोर्ट आला. गंगेच्या किनारी त्याच्या गस्त घालणार्‍या तुकडीपैकी एकाचे शव सापडले होते. त्या प्रेताची अवस्था बघता मरण्यापूर्वी त्याने चांगलीच झटापट केली असली पाहिजे. गंमत म्हणजे आसपास कुठेही नांगरलेली होडी दिसत नव्हती ना होडी नांगरल्याच्या खुणा होत्या. अगदी नदीच्या प्रवाहाने खुणा मिटवल्या असे मानले तरी तिथे येणार्‍या मासेमार्‍यांपैकी देखील कोणी आल्याचे पाहिले नव्हते. साधारण फर्लांगभर अंतरावर कुठेतरी एक होडी सापडली खरी पण ती पूर्णतया रिकामी होती. बरं होडी म्हणताही येत नव्हते एवढं ते होडगे लहान होते. असे असेल तर याचा खूनी नक्की कोण? तो कलकत्त्यात आला कि बाहेर पळाला? जोसेफला आत्ता ख्रिसची नितांत गरज भासत होती. इथे ख्रिस असता तर त्याने काय केले असते? निश्चितच त्याने मृत इसमाच्या जागी स्वतःला ठेवून विचार करून पाहिला असता. जोसेफनेही प्रयत्न करून पाहिला.
"मी गस्त घालत आहे. मला काही संशयास्पद हालचाली नजरेस पडतात. मी त्या हालचालींचा पाठपुरावा करतो, त्या एक वा अनेक संशयितांचा सामनाही करतो. दुर्दैवाने माझे प्रतिद्वंद्वी प्रबळ ठरतात. मला मृतवत अवस्थेत सोडून जातात. माझे मरण अटळ आहे. अशा वेळी माझ्यापुढे एकच पर्याय उरतो, त्या संशयितांची ओळख पटली असल्यास त्यांची ओळख पटवणारी काही खूण, काही संदेश मागे सोडणे."
हा संदेश, जर असा काही संदेश असल्यास, तो कुठे बरे असू शकेल? जोसेफ आपल्या बुद्धिला शक्य तितका ताण द्यायचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात डॉक्टरांनी त्याला प्राथमिक अहवाल दिला. शारिरिक जखमा खूप असल्या तरी मृत्यु श्वास कोंडल्याने झाला असे त्यांचे म्हणणे होते. श्वास कोंडल्याने? श्वास का कोंडेल? इतक्या जखमा झाल्यावर, असा मार पडल्यावर कोणी श्वास कोंडून का मरेल? कोणाला श्वास कोंडून मारण्याचा प्रयत्न का केला जाईल? जोसेफच्या डोक्यात अचानक प्रकाश पडला. त्याने तात्काळ शवविच्छेदनाचे आदेश दिले. तो आतुरतेने आपला अंदाज खरा ठरतो का याची वाट पाहू लागला.

*****

आदल्या रात्री

नदीचे वर्णन करा सांगताच निळेशार पाणी, झुळझुळ/खळखळ/मंजूळ इत्यादी ळकारान्ती शब्दांनी वर्णिलेला आवाज करत वाहणारा प्रवाह वगैरे गुळगुळीत शब्दसमूह प्रथम डोळ्यांसमोर येतात. परंतु त्या रात्री गंगेचे पाणी शाईसारखे काळे दिसत होते. मध्येच वाळलेला रंग खरवडल्यावर खालचा पांढरा कागद दिसावा तसे चंद्रबिंब पाण्याबाहेर आले होते. जसे कागदावरील पाण्याचा ओघळ रंगांना फिक्के पाडत आपला रस्ता काढतो तसा त्या शाईतून एक गहूवर्णी ठिपका आपली वाट काढत होता. त्या ठिपक्याचा ओघळ फर्लांगभर अंतरावरील एका छोट्या होडग्यातून उगम पावला होता. तो पोहण्याच्या कलेत तरबेज होता. कलकत्त्यातून वाहणारा गंगेचा प्रवाह हुगळी नदीच्या नावाने ओळखला जातो. हुगळी समुद्राला लागून असल्याने ठराविक महिन्यांमध्ये समुद्राच्या भरतीचे पाणी नदीत शिरते आणि हुगळीमध्ये आठ ते दहा पुरुष उंचीच्या लाटा उसळतात. सध्या तो काळ नसल्याने ती भीति नव्हती पण तरी तो वगळता कोणालाही नदीतून पोहत कलकत्त्यात प्रवेश करायची कल्पना सुचली नसती. त्याने विविध मार्गांनी प्रथम ओरिसा गाठले होते. ओरिसातून छोटी होडगी बदलत बदलत तो कलकत्त्याच्या अगदी जवळ पोहोचला आणि मग अखेरचा पल्ला त्याने पोहत पोहत पार केला होता. काठावर पोचल्यावर त्याने नदीतीरावर अंग टाकले. इथून पुढे असलेल्या गस्तीला चुकवण्याचा त्याला सराव होता. थोडी विश्रांती घेऊन पुढची वाटचाल करायचे त्याने ठरवले.
"कोण आहेस रे तू? इकडे काय करत आहेस? आणि तू इथे आलास तर आलास कुठून? मला येताना दिसला कसा नाहीस?"
त्याच्या डोक्याशी उभा राहून कोणी सार्जंट प्रश्नांची सरबत्ती करत होता. त्याच्या हातात दंडुका होता पण इतर कोणते शस्त्र दिसत नव्हते. गळ्यात शिट्टी होती पण याने अजून ती वाजवलेली दिसत नव्हती. छान! तो उत्तरादाखल हसला आणि पुढच्या क्षणी त्या सार्जंटच्या डोळ्यासमोर तारे चमकले. सावरेपर्यंत त्याची शिट्टी ओढली गेली होती आणि गळ्यातल्या हाडकावर ती दाबली जात होती. सर्वशक्ती पणास लावून त्याने कोपर हल्लेखोराच्या कपाळावर मारले तशी ती शिट्टी सोडली गेली आणि दोघेही मातीत आदळले. सार्जंटच्या गळ्याला हलके कापले होते. त्याने संधी आहे बघून जोरात शिट्टी फुंकली पण शांततेचा भंग जणू रात्रीस मंजूर नव्हता. सार्जंटची शिट्टी मोडली आहे लक्षात येताच तो पुन्हा एकदा हसला. सार्जंटनेही दात ओठ खाऊन झोंबाझोंबीस सुरुवात केली. तो ताकदीने उजवा वाटत असला तरी होडी वल्हवणे, नदीत पोहणे इत्यादि कष्टांनी थकला होता. त्यामानाने त्याचा प्रतिस्पर्धी ताजातवाना होता. ही झटापट अधिक लांबवणे त्याच्या हिताचे नव्हते. या समयी बुद्धिदेवतेखेरीज कोणाचा वरदहस्त त्याला जिंकवू शकत होता? सार्जंट दोन्ही हातांची मूठ वळून प्रहार करणार इतक्यात त्याच्या पोटातून रक्ताची धार निघाली. नदीकाठी सापडलेल्या खेकड्याची नांगी पुरेशी खोलवर जखम करून गेली होती. पाठोपाठ त्या खेकड्याला चेचत त्याने ती जखम मोठी केली. आता तो विश्रांती घ्यायला मोकळा होता. सार्जंटच्या हातात जे चिठोरे आले त्याच्याकडे त्याचे क्षणमात्र दुर्लक्ष झाले. ते चिठोरे महत्प्रयासाने त्याने गिळले आणि तो थंडगार पडला.

******

जोसेफच्या हातात तो कागदाचा कपटा डॉक्टरांनी दिला. मृतदेहाच्या घशातून तो कपटा काढण्यात त्यांना यश मिळाले होते. सुदैवाने त्या कपट्यावर रसायनांचा खूप प्रभाव पडला नव्हता. प्रकाशात धरून पेन्सिलीने लिहिलेले ते दोन शब्द जोसेफने मोठ्याने वाचले
"ब्लॅक आईज!!"
फणींद्रनाथ दत्त कलकत्त्यात परतला होता.

~*~*~*~*~

शो संपल्यानंतर ख्रिस शक्य तितका वेळ सर्कसपाशी रेंगाळला. त्याने प्रेक्षकांच्या गर्दीत संशयास्पद चेहरे दिसतात का बघण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सर्कसच्या कलाकारांपैकी कोणी त्याला ओळखलेले दिसत नव्हते. मलिकाच्या नजरेस न पडण्याची मात्र त्याने पुरेपूर काळजी घेतली. ती आपल्याला ओळखेल याची त्याला खात्री होती. पहिल्या दिवशी तरी त्याला काही खास जाणवले नाही. रश्मी ख्रिसच्या सांगण्यानुसार तंबूच्या आतल्या कोंडाळ्यात काही काळ रेंगाळली. मुख्यत्वे वेगवेगळ्या कलाकारांना अधिक जवळून पाहण्यास इच्छूकांची ती गर्दी होती. रुद्र, मलिका वगळता तिला बहुतांशी कलाकार जवळून बघता आले. रुद्र संग्रामसोबत असल्याने आणि संग्राम इतक्या गर्दीने बिथरण्याची शक्यता असल्याने त्या दोघांना भेटता येणार नाही असे कारण भद्राने पुढे केले. मलिका का गायब होती हे मात्र तिला समजू शकले नाही. तिच्या नजरेलाही काही वावगे जाणवले नाही. अखेर दोघे परत फिरले. ख्रिस पूर्णवेळ आपल्याच तंद्रीत चालत असला पाहिजे, अन्यथा तो तिला धडकला नसता. "आय बेग युअर पार्ड..." ख्रिसला 'न' पूर्ण करण्याची संधीच मिळाली नाही. तिने घाईघाईत आपला पदर अजूनच ओढून घेतला आणि ती ख्रिसच्या विरुद्ध दिशेला बघता बघता दिसेनाशी झाली. तिने लाल रंगाचे पातळ नेसले होते. सरासरी भारतीय स्त्रीच्या मानाने ती बरीच उंच होती. हे सर्व इतक्या वेगाने घडले कि ख्रिसला तिचा चेहरा तर सोडाच, साधे नखही दिसू शकले नाही. ख्रिसने रश्मीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. त्याच्यासोबत काही दिवस काढल्यावर तिला या नजरेला काय प्रकारचे उत्तर अपेक्षित आहे हे समजू लागले होते.
"तिच्या साडीचे कापड बघता ती नक्कीच एखाद्या सधन घरातील असावी. अशा स्त्रियांनी आपला चेहर्‍यावरून पदर ओढून घेणे स्वाभाविक आहे."
"घरंदाज भारतीय स्त्रिया एकट्या सर्कस बघायला जातात का? विसावे शतक उजाडले तरी अजून इंग्लिश स्त्रिया सुद्धा एकट्या हिंडत नाहीत, किमान एक नोकर त्यांच्या दिमतीला असतो."
रश्मीला त्याचा मतितार्थ ध्यानी आला. त्यांना परत येण्यासाठी ठोस कारण मिळाले होते.

*****

रात्रीचे जेवण झाल्यानंतर रश्मी गव्हाची खीर डेझर्ट म्हणून घेऊन आली. अं अं, गव्हाची खीर नव्हे क्रॅक्ड व्हीट पुडिंग! पुडिंग काय खीर काय, हा नवा मालक जोवर फुकाची बडबड करत नाही तोवर रश्मीला काही फरक पडत नव्हता.
"डेलिशिअस!" ख्रिसने पसंतीची पावती दिल्यावर, तिने निश्वास सोडला. चला आज रात्री वायफळ बडबड ऐकावी लागणार नाही. ख्रिसने पुडिंग बाजूला ठेवत एक वही हातात घेतली. त्याने रश्मीला बसण्याचा इशारा केला. रश्मी मनात म्हणाली, उजळणी!
"ओके. सर्कसमध्ये आपल्याला भेटलेल्या संशयास्पद व्यक्ती?"
" ती बाई. बस तेवढी एकच!"
"अं, मी मलिका आणि रुद्रला सुद्धा जमेत धरतोय. त्यांचा या सर्वांशी नक्की काहीतरी संबंध आहे. ती मिशीवाली मुलगी उमा, तिचा देखील याच्याशी काहीतरी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही."
"मला नाही वाटत तसं. जर तुम्ही त्या निशाणाच्या मागे असाल तर ती मिशीवाली यात सामील नसावी."
"बरी आठवण केलीस, ते निशाण! मला तरी ते कुठे दिसलं नाही. तुला?" रश्मीने उत्तरादाखल नकारार्थी मान हलवली. ख्रिसने तिला जायची परवानगी दिली.

ख्रिसच्या कपाळावर आठ्यांचे जाळे होते. त्याच्या हातात एकच धागा होता आणि त्याने दाखवलेली वाट तुटक! रश्मीने सांगितलेला निशाणाचा इतिहास तो परत वाचू लागला. या सांगोवांगीच्या गोष्टीतून आपल्या कामाची गोष्ट शोधणे कठीण काम होते पण ख्रिसकडे दुसरा इलाजही नव्हता.

*****

ही दंतकथा म्हणायची का सांगोवांगी का अजून काही हा तुमचा प्रश्न आहे. हिच्यावर किती विश्वास ठेवायचा हाही तुमचा प्रश्न आहे. मात्र हे सत्य आहे कि ते निशाण फक्त आणि फक्त विनाश घडवून आणते. माझे जन्म गाव अरावलीच्या पर्वतराजींमध्ये कुठे तरी आहे. रांगण्याच्या वयाची असताना माझे वडील वारले. नक्की काय घडलं हे आईने कधीच सांगितलं नाही. आईला दम्याचा त्रास होता. अशा परिस्थितीत जगण्यासाठी जे करता येईल ते सर्व करत गेले आणि ...............................................................................................
........................................................................................................................................................................................................................................
(ख्रिसः कटिंग द जार्गन इन बिटविन)
एके रात्री आमच्या घरी काही जणांनी घुसखोरी केली. त्यांचे चेहरे राक्षसी मुखवट्यांनी झाकलेले होते. आईकडे म्हणे कसले तरी कागद होते, जे त्यांना हवे होते. माझा हात कातडी सोलवटून निघेपर्यंत मेणबत्तीवर धरला होता. आईची नखे उपटून काढली गेली. तरीही आईने एक चकार शब्द उच्चारला नाही. अखेर त्यांचा म्होरक्या, नव्हे ती कोणी स्त्री होती. आई तिला सुलक्षणा या नावाने ओळखत होती. तिने खांदे उडवले. 'माझ्याजवळ इतरही मार्ग आहेत' असे म्हणून ती आपल्या माणसांसोबत निघून गेली. तेव्हा मला प्रथम ते निशाण दिसले. तिच्या दंडावर ते निशाण गोंदलेले होते. त्याच रात्री आईने माझ्या हाती एक कागदपत्रांचा गठ्ठा दिला आणि मला तडक दूर निघून जाण्यास सांगितले. ती स्वतः भल्या पहाटे हातात एक छोटी पेटी घेऊन कुठेतरी दिसेनाशी झाली. तिच्या मागोमाग मला काही मशाली हलताना दिसल्या. माझ्या अंतर्मनाने मला धोक्याचा तीव्र इशारा दिला. मी वाट फुटेल तिथे पळत सुटले. मग कधी तरी या चोरीच्या धंद्यात पडले. .........................................................................................................................................................................
(ख्रिसः कटिंग मोअर जार्गन)
त्या कागदांमध्ये काय होते? बरंच काही होते सर! सगळं तर काही मला समजलं नाही. आता नुसतंच र ट फ वाचता येत असलेल्या माणसाला एवढं सगळं कसं काय समजणार? मी ते सर्व कागद आईची आठवण म्हणून जपून ठेवले आहेत. काही कागद नकाशांसारखे आहेत. काही कागदांवर कसल्या तरी आकृत्या आहेत आणि बाजूला कोणत्या तरी वेगळ्याच लिपित बरंच काय काय लिहिलं आहे. उरलेल्या कागदांमध्ये कोणत्या तरी संस्थानाचा इतिहास आहे. यासाठी कोणी आमच्यावर का हल्ला करेल हे मात्र माझ्या आकलनापलीकडचे आहे. पण माझा अनुभव आणि माझ्या आईने केलेली शेवटची सूचना सांगते कि त्या निशाणापासून दूर राहा.

~*~*~*~*~

क्रमशः

पुढील कथासूत्र येथे वाचू शकता - https://www.maayboli.com/node/66302

Group content visibility: 
Use group defaults

मस्त रे! वास्तविक पुन्हा पहिल्यापासून सगळी कथा वाचायला हवी आहे. पण अगदीच धीर न धरवल्याने आधीचे १-२ भाग चाळून लगेच हा वाचला. Happy चांगली चाललीये कथा.

पायस राव जागे झालात हे बघून अत्यंत आनंद झालेला आहे. परत एकदा पहिल्या पासून वाचल्यावर व्यवस्थित लिंक लागेल

पहिल्यापासून वाचून काढली. प्रचंड दमदार गोष्ट!!! जंगलातले भाग तर प्रचंड उत्कंठावर्धक!! सगळा चित्रपट डोळ्यांसमोर घडत असल्यासारखे!!

याच्या आधीचा भाग जानेवारी 2017 मधला आहे हे लक्षात घेता, शेवटची टीप भयंकर आशावादी वाटतेय... Happy

बापरे.. पायसा.. मित्रा किती ती वाट पहायला लावलीस....
मी सगळे भाग एका लायनीत पुन्हा वाचुन काढलेत.. आता मात्र पुढील भाग पटापटा येवु द्या Happy

- प्रसन्न