परोमा: भूमिकांच्या पलीकडे जाउन स्त्रीत्वाचा शोध

Submitted by अश्विनीमामी on 1 June, 2018 - 03:13

चित्रपट सुरू होतो तोच पुजोबाडीच्या उत्साहित करणार्‍या, प्रफुल्लित वातावरणात, तयारी चालली आहे . लगबग, गडबड संगीत... सुस्नात, सिंदूर लावलेल्या लाल काठाच्या साड्या नेसलेल्या वंगललना कामात मग्न आहेत. मुले धडपडत आहेत. बाप्ये गप्पा मारत बसले आहेत. ह्याचे एक केंद्र आहे ती मूर्ती आणि दुसरे आहे काकीमा/ बौदी परमा चौधरी, धाकटी सून. म्हणजे आपली राखी - इतके सोज्वळ खानदानी सौंदर्य, त्यातही फारशी जाणीव न ठेवलेले. घरकामात, पूजेच्या तयारीत मग्न.

ह्या घरगुती माहौल मध्ये आलेला एक सर्वस्वी परका - राहुल - फोटोग्राफर ,तिच्या सौंदर्याने मोहित होतो व एक फोटो फीचर करायची रीतसर परवानगी घेतो. परमा प्रथम बावचळते.पण मग हो म्हणते.घरात नवरा सर्वोच्च स्थानावर, त्याही वर सासुमा, व मग मुले ह्यांचे करण्यात स्वत्वाकडे दुर्लक्ष झालेली ही चाळीशीची गृहिणी. तिचे माहेर असे तसेच. एक लग्न झालेला भाउ आणि म्हातारी आई.- सुनेच्या राज्यात दबलेली.

नवरा रात्री दिवा बंद करतो तेव्हा ती चटकन ऑटोमेटेड रिस्पॉन्स असल्यासारखी त्याला सामोरी जाते. ( अचानक सापडलेली सतारीची नखी विसरून) मुलांचे सासूचे करण्यात, कधी मधी किटीपार्टीला जाण्यात दंग.

राहुलचा कॅमेरा तिला दशदिशांनी सिड्यूस करतो. फोटो प्रक्रियेत ते दोघेही मनाने शरीराने जवळ येतात. तिच्या मनाला पंख फुटतात. पण झेप घेण्याआधी तिचा हा विवाहबाह्य संबंध घरच्यांना कळतो. मग तिला रिजेक्ट केले जाते. मुले नवरा सासू, घरचे नातेवाईक तिला मखरातून काढून फेकून द्यायला बघतात. त्यांना तिची घृणा, तिरस्कार वाटतो. नवरा तर इगो दुखावल्याने अगदीच संवाद तोडतो.पण तिला अपराधी वाटत नाही. उलट् ती स्वतःशी जडलेले नाते जोपासू बघते. नोकरी करून चरितार्थ चालवायला जमेल का ते चाचपते. शरीराच्या नव्या जाणिवा पुसून न टाकता पुढे जाते. इतकी बेसिक ही कथावस्तु.

चित्रपटाचे वेगळेपण आहे त्याची ट्रीटमेंट. एका संवेदनशील स्त्री दिग्दर्शिकेने बनविलेला जेनिफर ह्या आपल्या मैत्रिणीला अर्पण केलेला चित्रपट. परमेचे व्यक्तिमत्व तिच्या कौटुंबिक सामाजिक भूमिकेत इतके मिसळून, हरवून गेलेले असते कि ती देखील आपले स्वत्व विसरून जगत अस्ते आणि सुखी देखील दिसते. राहूल च्या निमित्ताने शरीर मनावर जमलेली सुखवस्तू धूळ उडून जाते व आतले कलासक्त, हसरे मन झेप घेउ पाहते. राहूल पहिल्यांदी तिच्या माहेरी गच्चीवर एकांतात तिचे पहिले चुंबन घेतो तो सीन अतिशय सुरेख चित्रीत केला आहे. एक स्त्री दिग्दर्शकच इत की लिरीकल संवेदनशीलता दाखवू शकते. त्याच्याबरोबर अनिर्बंध असे सूख अनुभवल्यावर तिला परत नवृयाबरोबर संसार करणे अतिशय जखडल्या सारखे वाट्ते ती मुक्त होउ बघते. ती असे करू पाहते आहे ह्या शक्यतेनेच नवर्‍याचे विश्व हादरते. तो तिला हातखर्चाला जास्तीचे पैसे देउन समेट घडवू बघतो. पण आधी तिला वेश्या म्हणून त्याने नाते काय लेव्हलला आहे ते स्पष्ट केलेच आहे. हा सीन बघवत नाही. मुले, सासरचे दूर जातात. जी भूमिका इतक्या सहजतेने इतकी वर्षे नि भवली ती हातातून सहज निसटून जाते. त्याचे स्पेक्स बदलले की अ‍ॅप्रुव्हल रेटिंग गेल्या सारखे.

एका अलिप्त भावनेने ती हे सर्व नाकारते व स्वतःचे जीवन जगू पाहते. त्यात तिला राहूल आला तरी आता फारसा फरक पडणार नाहीये. त्या सुखद पण अल्पजीवी नात्याने तिला एका वेगळ्या शक्यतेकडे धाडले आहे. आधीच्या मजबूत बांधण्या तोडमोड करून.

राखीने ह्यात अतिशय सहज अभिनय केला आहे. अप्रतिम दिसते. आपल्यालाही प्रेमात पडायला होते. काय ते सुरेख लांब केस, ते डोळे आणि ते कुंकू. ते हसणे, त्या सुती साड्या आणि तो गृहिणीचा वावर. ते राहूल म्ह्णून चित्कारणे. ते बिलोरी हसणे.

आजच्या मानसिकतेतून बघायला गेले तर अनजान माणसा बरोबर कोणी इतक्या लिबर्टीज घेणार नाही. दूर फिरायला जाणे, काय छापणार ह्या बद्दल करार नसणे, फोटो काढताना तिसरे कोणीच नसणे. पण ती काही ट्रेन्ड मॉडेल नाही.

राहुलच्या सहवासाची चटक लागल्यावर तयार होउन जाताना सासूने/ मुलीने हटकल्यावर ती बावरते, बिचकते पण तरीही जातेच. एक प्रकारे इच्छेची बळी. आपले कुटुंब खरे तर आपले नाहीच ही तिला जेव्हा जाणीव होते तो खरा मुक्तीचा क्षण. मग पुढे राहूलची साथ असो वा नसो. हाच मुद्दा लंचबॉक्स चित्रपटातही आला आहे १९८४ मधली मानसिकता, नैतिकतेच्या कल्पना आता जरा विचित्र वाटतात.
वैयक्तिक स्वातंत्र्या बाबत तर आपण माय चॉइस हे वळण घेतले आहे. तीस वर्शापूर्वी आलेल्या ह्या चित्रपटाने भद्रलोक
मानसिकतेला तडा गेला असेल कि नाही माहीत नाही पण तो एक सशक्त प्रयत्न तरी आहे.तिच्या बाजूने पाहिले तर जरी काही एक मोडतोड झाली तरीही तिला आयुष्यात काही जेन्युइन सुखाचे क्षण मिळाले तरी. व्हेन यू फील ११० % अलाइव्ह. नुसते इंटीमेट नाही तर एका छान सहचरा बरोबर काहीही करण्याचे. त्यात ते एकाठीकाणी जातात व ते लोक त्यांना अमेरिकेत कारावान घेउन हिंडणारे समजतात. परमा जिथे तिथे सतारवादनाचे कार्य क्रम करते असे राहूल थापा मारतो. तर ते विचारतात मग तबला कोण वाजवते साथीला? तर ती म्हणते अल्लारखा !!! राहूल तर चोकच होतो हसून. नवरा तिला फारच गृहित धरतो. मला तर ते जास्त व्हायोलंट वाटले. स्त्री, तिचे रूप, अस्तित्व
एका चौकटीत घट्ट बसवायचे. तरच ते सुखद आहे; हे पटत नाही. जगू दे कि तिला मोकळे.

बिग बॅड इंटरनेट. यूट्यूब वर भाग सहा, सात आठ चे व्ह्यूज आहेत २ ४ ते ८ लाखाच्या घरात. फॉर द इंटिमेट सीन्स. :angry: बाकी भागांचे हजाराच्या घरात. शेवटच्या १२ व्या भागात कथेची संगती पूर्ण होते. ती शोधत असलेले झाडाचे नाव तिला सापडते. मध्यमवर्गीय गृहिणीच्या जीवनात घडणार्‍या नाट्याचे साधे चित्रण. जीवन बदलून टाकणारे मोहाचे क्षण...त्यांना हो म्ह्णायचे कि नाही हा आहे खरा हर चॉइस.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. राहुलचं काम कुणी केलंय?>> अपर्णा सेन दिग्दर्शिका आहे. कॉकणाची आई तिचे पती ह्यांनीच राहुलचा रोल केला आहे. ७० च्या दशकात अमेरिकेत शिफ्ट झालेले लोक जसे वागायचे तसा अ‍ॅक्सेंट व वागणे बोलणे आहे. परमाच्या मैत्रीणींचे रोल पण छान आहेत. त्या बद्दल लिहीते. आणि ती वेडीझालेली व शेवटी आत्महत्या केलेली नात्यातली स्त्री. मनासारखे वागण्याचे स्त्रियांना नेहमीच अघोरी परिणाम भोगावे लागले आहेत. त्यातलीच ती एक. एक एक पात्र जबरी उभे केले आहे. प्रथम दर्शनात चित्रपट म्हणजे एका स्त्रीच्या अफेअरची कथा वाटते पण तिला ते का करावे वाट्ते त्याचे मार्कर्स सर्वत्र आहेत.

बर्‍याच वर्षांपूर्वी हा सिनेमा पाहिला होता.नीट आठवत नाही,लक्षात राहिलेले राखीचे रूप.आता परत पहायला हवा.

छान परिक्षण.
मी लहानपणी हा सिनेमा पाहिल्याचे आठवते. म्हणजे टिव्ही चालू होता आणि माझी मी खेळता खेळता सिनेमा पाहिला Happy
तेव्हा फक्त एवढेच कळले कि भरल्या घरातल्या बाईला एक माणूस आवडतो आणि ती घर सोडून निघून जाते. शेवटी ती त्या झाडाबद्दल काही तरी असंबद्ध बोलते म्हणजे तिच्या डोक्यावर परिणाम होतो असा माझा समज झालेला.

राहुलचं काम कुणी केलंय?>>>

मुकुल शर्मा. अपर्णा सेन चा दुसरा नवरा. कोन्कणा चे वडिल वेगळे आहेत.

राखीचा हा सिनेमा मी फार पुर्वी पाहिला होता. अप्रतिम सिनेमा. मला खुप आवडला होता, माझ्या आईला हा फार आवडला होता. त्यतलं ते झाड तिने नर्सरीतुन शोधुन आणलं होतं.

आता यु ट्युब वर सहज पहायला मिळतो.

मी पाहिला आहे हा सिनेमा आणि आवडलाही खूप. अमा तुम्ही किती छान लिहिलं आहेत. ते वाचून सिनेमा आपल्याला का आवडला हे नीट समजलं Happy

ओह.. किती सुंदर लिहिलय, अमा. बघितलाय हा सिनेमा. खूप सुंदर आहे.
तुमचं वाह्चल्यावर परत एकदा बघितला. काही काही फ्रेम्स अधिक सखोल बघता आल्या.
मनापासून धन्यवाद.

साबांच्या कृपेने आधी बंगालीत पाहिला मग हिंदीत. राखी तिथे छान वाटली हिंदीपेक्षा , हिंदीत तिचे ते सदोष उच्चार एकण्यापेक्षा.

हिंदीत काही सिन्स कापलेत....

छान लिहिलंय अमा.
चित्रपट बघावासा वाटतोय.

===
नवरा रात्री दिवा बंद करतो तेव्हा ती चटकन ऑटोमेटेड रिस्पॉन्स असल्यासारखी त्याला सामोरी जाते.

राहुलबरोबर अनिर्बंध असे सूख अनुभवल्यावर तिला परत नवृयाबरोबर संसार करणे अतिशय जखडल्या सारखे वाट्ते ती मुक्त होउ बघते. ती असे करू पाहते आहे ह्या शक्यतेनेच नवर्याचे विश्व हादरते. तो तिला हातखर्चाला जास्तीचे पैसे देउन समेट घडवू बघतो. पण आधी तिला वेश्या म्हणून त्याने नाते काय लेव्हलला आहे ते स्पष्ट केलेच आहे. हा सीन बघवत नाही.
>>
रोचक!
हातखर्चला पैसे देत नव्हता/ कमी देत होता तेव्हा ती उच्च नैतिक पातळीवर होती आणि आता वेश्या झाली असे का?
उच्च/मध्यम वर्गातल्या गृहिणीमधे आणि रखेलमधे काय फरक असतो समाजमान्यते खेरीज? काहीनाकाही अ/प्रत्यक्ष मोबदला देऊन 'कामा'साठीच 'ठेवलेल्या'असतात ना दोघीही?

===
मुले नवरा सासू, घरचे नातेवाईक तिला मखरातून काढून फेकून द्यायला बघतात. त्यांना तिची घृणा, तिरस्कार वाटतो.

परमेचे व्यक्तिमत्व तिच्या कौटुंबिक सामाजिक भूमिकेत इतके मिसळून, हरवून गेलेले असते कि ती देखील आपले स्वत्व विसरून जगत अस्ते आणि सुखी देखील दिसते.

मुले, सासरचे दूर जातात. जी भूमिका इतक्या सहजतेने इतकी वर्षे नि भवली ती हातातून सहज निसटून जाते. त्याचे स्पेक्स बदलले की अॅप्रुव्हल रेटिंग गेल्या सारखे.
आपले कुटुंब खरे तर आपले नाहीच ही तिला जेव्हा जाणीव होते तो खरा मुक्तीचा क्षण.
>>
अगदी अगदी!
आपापल्या घरातल्या गृहिणी असलेल्या आजी, पणजी, काकू, मामी, आई, बायकोच्या पाककौशल्याचा, पितळेची भांडी लखाकती ठेवण्याचा, नातेवाईक संभाळण्याचा उदोउदो चाललेला असतो तेव्हा त्यामागे 'घरच्यांनी किंवा स्वतः गळ्यात बांधून घेतलेल्या एका'च' पुरुषच्या शारीरिक गरजा पूर्ण करणारी, त्याला हवी तितकी मुले काढून देणारी मादी' निर्माण करत राहण्याचा छुपा अजेंडा रेटणे हे कितपत असते?

===
एका संवेदनशील स्त्री दिग्दर्शिकेने बनविलेला

राहूल पहिल्यांदी तिच्या माहेरी गच्चीवर एकांतात तिचे पहिले चुंबन घेतो तो सीन अतिशय सुरेख चित्रीत केला आहे. एक स्त्री दिग्दर्शकच इतकी लिरीकल संवेदनशीलता दाखवू शकते.
>>
मध्यमवयीन गृहिणीचा पाय घसरणे यावर तसे बरेच चित्रपट असतील. यात सडाफटिंग पुरुषाची इडीपस फॅन्टसी दाखवली असण्याची शक्यता जास्त. युट्यूब व्युजदेखील तेच कन्फर्म करतायत. पण अपर्णा सेनचे एकदोन चित्रपट पाहिलेत त्यामुळे इथे वेगळे असेल...

पुरुष दिग्दर्शकाने आपल्या म्युज, प्रेमिका, बायको चित्रित करणे आणि इथे झाला तसा रोल रिव्हरसल यात काय फरक पडत असेल?

===
मग पुढे राहूलची साथ असो वा नसो.
>> ज्जे बात!

movie is not about an affair. it is about freedom of choice. being true to one's personal needs as opposed to social demands/conditioning. where as culture expects a wom an to kill her own impulses to ensure security. same experience with hubby is routine and robotic while it is rapturous with another. but can a woman really choose and experiment without losing her pedestal. her social status financial security and prestige in family. where as from a mans perspective bibi to saal me baasi hoti hai?! saali toh aadhi gharwali hoti hai type allowing accepting dialogues in popular culture .

अमा, छान लिहलय
बंगाली पार्श्वभूमीचे सिनेमे आवडतात मला बघायला.

स्वैर जगण्याचे, स्वतःच्या चॉईसने जगण्याचे स्वातंत्र्य किती जणांना मिळते? स्त्री व पुरुष दोघांनाही?

वाचताना व पाहताना खूप छान वाटते पण आपल्या आईने अथवा आजीने अचानक एक दिवस असे स्वातंत्र्य घ्यायचे ठरवले तर मुले कितपत त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करणार ? इथे परोमाच्या मुलांच्या जागी स्वतःला कल्पून पाहिले की सगळे लक्षात येते.

मानव जंगलात एकेकटा राहायचे सोडून एकत्र कळपाने राहण्याची प्रक्रिया घडत असताना जशी गरज पडली तसे निर्णय घेतले गेले, त्यांचे पुढे काय परिणाम होतील याचा विचार करायला तेव्हा वेळ नव्हता. स्वतःच्या नैसर्गिक मर्यादांमुळे किंवा पुरुषाच्या तुलनेतल्या शक्तीसामर्थ्यामुळे, स्त्रीकडे संरक्षकाची भूमिका न येता संवर्धकाची भूमिका आली, कदाचित तेव्हा स्त्रिया त्या भूमिकेसाठी जास्त योग्य होत्या. नंतर समाज एकदा स्थापन झाल्यावर त्यातले फायदे तोटे लक्षात आले, कुणाला दाबण्यात व कुणाचा जयजयकार करण्यात फायदा आहे हे समजायला लागले व पुढे रोल्सना तसा आकार दिला गेला. बीबी साल मे बासी, साली आधी घरवाली वगैरे बोलणे हे त्या घडत गेलेल्या सामाजिक व्यवस्थेची फळे आहेत पण म्हणून प्रत्येक पुरुष बाहेरख्याली असतो व बाहेर लफडे असलेल्या प्रत्येक पुरुषाला समाजात मानाने जगता येते असे नाहीय ना? स्त्रीएवढा त्रास त्याला होत नाही कारण स्त्रीची योनीशुचिता हे अजून एक लफडे असते जे त्याच्या गळ्यात नसते. बाकी स्वैर राहू इच्छिणाऱ्या व प्रत्यक्ष वागणाऱ्या पुरुषालाही या समाजात त्रास होतो.

आता परत ते रोल्स बदला, प्रत्येकाला हवे तसे स्वातंत्र्य द्या म्हणणे म्हणजे त्या 250 वर्षे मागे जा बीबीसारखे म्हणणे होईल.

त्यामुळे स्वातंत्र्य वगैरे खूप आकर्षक वाटले तरी आज परत त्या मानव समूहाने राहायच्या आधीच्या काळात जाऊन कुणावर कसलेही रोल्स करायचे बंधन झुगारून देता येईल असे वाटत नाही. हे बंधन नको असेल तर कुटुंब हवे की स्वातंत्र्य याचा विचार कुटुंब सुरू करण्याआधी करायला हवा. तुमच्या स्वातंत्र्याविषयक निर्णयांनी बाकी कुटुंबीय गोत्यात नको यायला.

छान लिहीले आहे. या चित्रपटाबद्दल ऐकले होते पण आर्ट फिल्म असेल असे वाटल्याने दुर्लक्ष झाले. ८० च्या दशकातील असल्याने राखीच्या सुंदर दिसण्याच्या उल्लेखाबद्दल आश्चर्य वाटले. मी राखी पाहिली ती अमिताभच्या चित्रपटात. तेव्हा ती ऑलरेडी पोक्त दिसत होती (समकालीन रेखा, झीनत वगैरेंच्या तुलनेत). नंतर मग शर्मिली, जीवन मृत्यू वगैरेंची गाणी पाहिली तर त्यात ती खूप सुंदर दिसते.

ब्रिजेस ऑफ मॅडिसन काउंटी पुस्तक वाचले आहे. फारसे आवडले नव्हते. तुम्हाला असाच कोणीतरी रँडम पुरुष भेटतो, तुम्ही त्याच्याकडे अतिप्रचंड आकर्षित होता, ते extreme carnal शारीरिक प्रेम फारच समाधान देणारे असते, सगळा एकाधदोन दिवसांचा मामला...

===
मूळ विषयाबद्दल:
Eyes wide shut चित्रपटात श्रीमंत,
पॉवरफुल पुरुषांसाठी तयार केलेल्या sex slave दाखवल्या आहेत. त्यांना बऱ्याच लहानपणापासून ट्रेन, मोल्ड केलेलं असतं. हे वाचायला, बघायला कसेतरी वाटू शकते पण
आपल्यालातरी वेगळे काय करतात? बालपणापासून एक बाहुली, भातुकलीचा खेळणी देऊन चूल मुल सांभाळन्यासाठी ट्रेन, मोल्डच तर केलेलं असतं. पत्नी म्हणून करावी लागणारी 'इतर कर्तव्य' मोठी झाल्यावर (काहीजणींना लग्न झाल्यावर) कळतात. मग त्याला राखीसारख डोळे मिटून पार पाडत रहायचं....ं

Bridges of Madison County खूप आवडलं होतं आणि सिनेमा ही सुरेख आहे.. Meryl Streep ने अप्रतिम काम केले आहे!
अमा, लेख आवडला! सिनेमा बघायला घेतला तेव्हा लक्षात आले की हा मी अर्धवट पाहीला आहे आधी. आता पूर्ण पाहीन.
त्यात राखीचा नवरा आपल्या सेक्रेटरीशी खुलेआम फ्लर्ट करताना दाखवला आहे पण ते चालतं! आप करें तो गलती हम करें तो गुनाह असंच होतं स्त्रियांच्या बाबतीत दुर्दैवाने!

जि +१ स्त्री जीवनावर भाष्य असणार्‍या अनेक सिनेमात मेरिल स्ट्रीप दिसते. तिचा ऑगस्ट ओसेज काऊंटी पण आवडला होता.
साधनाचे म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. स्त्रीच्या योनिशुचितेचे लफडे म्हणजे नक्की काय - गरोदर राहण्याची भीती?? कुटुंब हवे की स्वातंत्र्य याचा विचार कुटुंब सुरू करण्याआधी करायला हवा असे म्हणणे तर पाण्यात पडण्याआधी पोहता येण्याची अपेक्षा करण्यासारखे झाले.
प्रत्येक स्त्रीला बाहेरख्याली होण्याची वा लफडे करण्याची हौस नसते. पण एखादीला 'लफड्यातून' उपरती होते की कुटूंब हे जाचक बंधन आहे. कुटूंबापेक्षा इतर काही महत्त्वाचे (राहुलच असे नाही, नोकरी-छंद इ.), आवडीचे जिला गवसले आहे, तिला सन्मानाने त्या बंधनातून मोकळे करण्याचा विचार इतर कुटूंबियांनी करावा. "तू गेलीस तर आम्हाला त्रास होतो, म्हणून तू घरी त्रास काढत रहा" असा स्वार्थीपणा दाखवून कटूता वाढवू नये इतकाच विचार मला सिनेमात आढळला.

Pages