मेंदीच्या गोष्टी

Submitted by Arnika on 27 May, 2018 - 15:07

मी तिसरीत असताना मामाच्या लग्नात पहिल्यांदा मेंदीचा कोन हातात घेतला. तो सुऱ्यासारखा धरून घरभर फिरले माझ्या पहिल्या गिऱ्हाइकाच्या शोधात. मी जवळ गेले की सगळ्या बायका एकतर करंज्या तळायला लागायच्या किंवा केरसुणी घेऊन केर काढायच्या. त्यांना हातावर कोयऱ्यांची नक्षी हवी होती आणि माझ्या मनात कितीही असलं तरी मला फक्त कुरडयाच काढता येत होत्या. शेवटी मला नाराज करायला नको म्हणून मामाने त्याच्या हातावर मला मेंदी काढू दिली.

मेंदी काढून घ्यायचा पेशन्स माझ्यात कधीच नव्हता, पण स्वत: नक्षी काढताना मी कितीही वेळ स्वस्थ बसू शकत होते. बाकी अवतीभोवती मेंदीचं वातावरण होतंच. श्रावणी शुक्रवारची अर्धा दिवस शाळा, मेंदीच्या स्पर्धा, आणि डझनावारी येणारे मेंदी विशेषांक... या ना त्या प्रकारे कधीतरी मेंदीचं वेड लागणारच होतं मला. शाळेत स्पर्धेच्या वेळी कोण कोणाच्या हातावर कुठलं डिझाइन काढणार; ज्या मुलाने स्पर्धेत भाग घेतलाय तो मुलाच्याच हातावर मेंदी काढेल की कुणा मुलीचा हात हातात घेऊन काढेल (I know, खळबळजनक!) असल्या चर्चा महिना-महिना आधीपासून चालायच्या. सातवीतल्या विजेतीने घंटाळीतल्या ‘विजय’मधून कोन आणला असं कळलं तेव्हापासून ब्रह्मदेव आभाळात कोन बांधतो आणि फक्त ठाण्याच्या एका दुकानात पाठवतो असं वाटून सगळी शाळा दहाच्या नोटा घेऊन त्या दुकानात लोटायची. पण स्पर्धेच्या बक्षिसाची कोणालाही पडलेली नसायची. आपण मेंदी काढणार आणि शंभर माणसं ती एकदम बघणार यातच सगळा आनंद!

सहावी-सातवीच्या वर्षांत मी फरशीच्या कोपऱ्यात, वह्यांच्या मागच्या पानावर, आणि कोणी हात पुढे करायला नाही म्हंटलं तर झोपेत त्यांच्या पावलांवर मेंदी काढत बसायचे. कुरडयांच्या हळुहळू कोयऱ्या होत होत्या. बटबटीत ठिपक्यांमधून काही महिन्यांनी फुलं उगवली. आपल्या मनाने चार रेघा ओढता यायला लागल्या आणि दीडेक वर्षाने हात भरेल अशी मेंदी जमायला लागली. शाळेत दुसऱ्या वर्गातल्या मुलीही “आमच्या हातावर मेंदी कढशील का?” असं विचारायला आल्या तेव्हा पहिल्यांदा वाटलं की हे काम आपण वाईट करत नसू बहुतेक. त्यावेळी आसपासच्या ओळखीतल्या सगळ्यांच्या हातावर मी खूप सराव केला होता.

इंग्लंडच्या शाळेत आले तेव्हापासून सगळा सीनच बदलला! पहिल्या माहिन्यात शाळेत माझी ओळख तीन गोष्टींमुळे झाली होती: बॉयफ्रेंड आहे का असं विचारलं तर ती रडायला लागते; तिला एकोणतीसचा पाढा येतो; आणि ती तिच्या हातावर हेनाचं आइसिंग करते. त्या शाळेत मधल्या सुट्टीत मुली एकमेकींची नखं रंगवून द्यायला, सागरवेण्या घालायला, रबरबॅंडची ब्रेसलेट विणून द्यायला एखाद-दोन पाउंड किंमत लावायच्या आणि आपापला पॉकेटमनी मिळवायच्या. बऱ्याच मुलींना ‘आइसिंग’ करून हवं होतं, पण मेंदी म्हंटलं की सगळे संशयाने बघायचे, कारण स्पेन आणि मोरोक्कोला केमिकल घालून कालवलेल्या मेंदीचा बऱ्याच जणींना तडाखा बसला होता (त्वचा सोलवटली किंवा अंगभर चट्टे उठले होते). मग मी सुट्टीनंतर ठाण्याहून लंडनला येतानाच कोन घेऊन आले.

लूसी नावाच्या माझ्या मैत्रिणीच्या आईला मेंदीने यिनयान काढून हवं होतं. मी त्यांच्या घरी हात धुवून खोलीत गेले आणि तिला हात पुढे करायला सांगणार इतक्यात तिची आई कमरेची पँट सैल करून माझ्यासमोर पाठमोरी बसली. ईऽ! मी इकडेतिकडेच बघायला लागले. नक्षीकडे न बघता कशाबशा कंबरेवर कोयऱ्या काढून दिल्या. तेव्हापासून मी फक्त हातांवर मेंदी काढते असं शाळेत जाहीर केलं.

धंदा चालू होण्याआधीच बंद पडला. कोणाला मानेवर विंचू काढून हवा होता, कोणाला बेंबीभोवती फूल हवं होतं तर कोणाला मांडीवर त्यांच्या कुत्र्याचं नाव लिहून हवं होतं. माझ्या एका मैत्रिणीने शाळेतल्या त्या सगळ्या मुलींना परस्पर पिटाळलं; सांगितलं की अर्निकाच्या मागे लागू नका, तिची कारणं रिलिजिअस आहेत. हुश्श! त्यानंतर दोन वर्ष मधली सुट्टी मी फक्त डबा खायला राखून ठेवली.

पुढे इथल्या काही भारतीय कुटुंबांमध्ये लग्न निघाली तेव्हा चुलत-चुलत ओळखीने मला मेंदीसाठी बोलावलं होतं. नवऱ्या मुलीची मेंदी पहिल्यांदाच काढायची म्हणून मी बोर्डाच्या परीक्षेच्या आदल्या दिवशी जायलाही तयार झाले. त्या लग्नघरी अनोळखी माणसं असूनही इतकी प्रेमाने वागत होती की मला घरच्याच मेंदीला गेल्यासारखं वाटलं. दुसऱ्या दिवशी खऱ्या कमाईचा पहिला चेकसुद्धा माझ्या पत्त्यावर पाठवलेला होता.

तो हंगाम भारतीय लग्नांचा असावा. एका महिन्यात मला तीन लग्नांची मेंदी होती. एका नवऱ्या मुलीची मेंदी काढायला बसले तर तिच्या आईने माझ्यासमोरच पाहुण्यांना सांगितलं, “त्या गुजराती मुली दीड-दोनशे पाउंड घेतात मेंदीचे. म्हणून म्हंटलं हिलाच बोलावलेलं बरं. आपलाही खर्च वाचेल आणि हिलाही इंग्लंडमधलं लग्न बघायला मिळेल.” दुसरीकडच्या काकू मी हातावर मेंदी काढताना मला गाणं म्हणायचा आग्रह करत होत्या आणि पाहुण्यांना “ही एकदम फ़ुल्ल सर्व्हिस मुलगी आहे हं” असं सांगत होत्या. तिसरीकडच्या काकू मेंदी झाल्यावर मला जवळ घेऊन मोठ्याने म्हणाल्या, “पैसे वगैरे देऊन फ़ॉर्मॅलिटी करणार नाही मी, त्यापेक्षा आमच्याकडच्या लग्नात छान जेवण असेल. तू ये नक्की”.

मला हे सगळंच नवीन होतं. चांगल्या सुशिक्षित लेकांचं असं बोलणं ऐकून, ते परत परत आठवून रडू यायचं. नुकतीच अकरावीत गेले होते; राग आला तरी चारचौघात काय उत्तर द्यायचं हेही कळायचं नाही. आपल्याकडे कोणत्याही कामासाठी येणाऱ्या कुठल्याही माणसाशी (किंवा माणसाबद्दल) कसं बोलायचं नाही हे मात्र मी तेव्हा कायमचं शिकले.

मग म्हंटलं बास झाली मेंदी-बिंदी. त्यातली मजा गेली होती. माझी आत्तेबहीण अमृता सुंदर मेंदी काढते. त्यावेळी ती तिने काढलेल्या मेंदीचे फोटो पत्रातून पाठवायची. न चुकता इथे येणाऱ्या प्रत्येकाबरोबर माझ्यासाठी मेंदीचे कोन पाठवायची. हाताची सवय जाऊ नये म्हणून मी सुरुवातीला सराव केला, मग तेही बंद केलं.

वर्षाभराने माझ्या लंडनच्याच एका मैत्रिणीच्या, म्हणजे श्वेताच्या, घरी कार्य निघालं. नवऱ्या मुलीच्या मेंदीसाठी एक सॉलिड आर्टिस्ट येणार होती, आणि श्वेताला माझ्याकडून मेंदी काढून हवी होती. लाडक्या मैत्रिणीसाठी मीही एका पायावर तयार झाले; मनसोक्त मेंदी काढून आले. वनवास संपवल्यावर खूप समाधानाने झोप लागली होती त्यादिवशी… आणि रात्री साडेबाराला फोन खणखणला.

“Arnika? Please, we need to speak to Arnika.” श्वेताच्या काकांच्या घरून फोन होता. अर्जंट आहे असं ते म्हणत होते. मेंदीची काही रिऍक्शन उठली की काय अशा भीतीने मीही उठले आणि फोन घेतला. नवऱ्या मुलीला त्या हेना आर्टिस्टची मेंदी खूप बटबटीत वाटली म्हणे. मग श्वेताची मेंदी बघून ती रडायला लागली. वर बाथरूममध्ये जाऊन बसली आणि म्हणाली श्वेताच्या मैत्रिणीलाच बोलवा तुम्ही. या बाईंना त्यांचे पैसे द्या आणि प्लीज घरी जायला सांगा. ड्रामा नि काय!

त्यांनी पूर्ण मेंदीचा सोहळा पुन्हा पुढच्या दिवशी ठेवला. मला न्यायला आले. काल एवढा गोंधळ झाल्याचं ऐकून मी जरा घाबरले होते. शिवाय श्वेता सोडून मी तिथल्या कोणाला ओळखतही नव्हते. पण हॉलवर गेले आणि त्या रोशनी बेनने दारातच दोन्ही हात पुढे केले. म्हणाली, “तुला जे हवं ते डिझाइन कर. तुझ्या मनासारखं”. मीही रिलॅक्स होत स्वतःला ऑटो-पायलट्वर टाकलं. चार-पाच तास काय मजा आली मेंदी काढायला! तिच्या सासरची जर्मन मंडळी तिला पुन्हा हसताना पाहून मला मिठी मारून जात होती. बाकी पाहुणेही “बहु सरस छे”, “बहु फ़ाइन छे” म्हणून जात होते. त्यादिवशी रोशनी बेनने दिलेल्या चेकमधून मी माझ्या बारावीच्या बॉलसाठी (म्हणजे प्रॉमसाठी) ड्रेस घेतला... त्या दिवसानंतर मेंदीचा रंग चढतच गेला. अगदी मोजक्या संधी असल्या तरी कुठलं काम घ्यायचं आणि कुठलं टाळायचं हे हळूहळू जोखता यायला लागलं. Art of repetition म्हणतात मेंदीला. तरी दर वेळी तिची वेगळी मजा कशी येते कुणास ठाऊक?

...आणि हो खरं, गेल्या वर्षी लंडनच्या गरब्याला एक शाळेतली मुलगी आली मला तिची मेंदी दाखवायला. बरोबर लहान भाऊ होता. मला ‘मासी’ म्हणाली, स्वत:चं नाव श्रेया सांगितलंन आणि मग पुन्हा एकदा हात दाखवून पळून गेली. तेवढ्यात मागून तिची आई आली. अकरा वर्ष आणि दोन मुलं झाली होती. रोशनी बेन तितकीच सुंदर दिसत होती...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नावात काय आहे - असे कुणाला म्हणायचे असेल तर म्हणूदेत बापडे, पण नावात बरेच काही असते.

लेखाचे नाव वाचून यात मला वाचण्यासारखे काही नाही असे वाटले होते. पण मग अर्निका हे नाव वाचल्यावर लेख वाचण्याचा मोह टाळता आला नाही.

नेहमीप्रमाणेच सुंदर लेखनशैली.

छान लिहीलं आहेस अर्निका, सुरेख मेंदीच्या डिझाईनसारखं Happy >>>>> +9999 Happy

जमलेली लेखनईष्टाईल..... Happy

किती सुरस! तुझं लिहिलेलं वाचायला बसले की वाचतच रहावं, संपूच नये असं वाटतं. पोट भरतं, पण मन भरत नाही.
वाचता वाचता बालपणातही बुचकळून काढलंस जाता जाता.

सुंदर !
काल वाचलं आणि झंकारत राहिलं मनात.

मस्त लिहिलंयस. नेहमीप्रमाणेच. Happy

माझा मुलगा आता 'प्रोफेशनल हेन्ना आर्टिस्ट' आहे. त्याचा भारतीय कस्टमर्सचा अनुभव याच जातकुळीचा आणि तितकाच उद्वेगजनक होता, त्याची आठवण झाली वाचताना.

मस्त लिहिलंयस. देसी लोक असे का वागतात काही कळत नाहीत. कोणत्याही सर्विस चे पैसे द्यायला हवेत एवढे साधे कळत नाही? ती व्यक्ती स्टुडन्त असली म्हणून काय फक्त जेवणावर बोळवण करणार?! कठीण आहे!!

Pages