येल्लो येल्लो डर्टी फेल्लो !!

Submitted by ऋन्मेऽऽष on 25 September, 2014 - 14:01

अर्रे आज अगदी सकाळी सकाळी......... ओ भाई साऽऽऽब ..

आपका स्टेशन आ गया !

आमची मुंबई लोकल म्हटली, की समोर दिसणार्‍या रोजच्या माणसाशी किमान एवढी ओळख तरी नक्की काढावी, की तो आपले स्टेशन आल्यावर आपल्याला झोपेतून जागे करून देईल.

अर्धवट झोपेत, अर्धवट उघडलेले डोळे चोळत मी स्टेशनबाहेर पडलो. समोरच दिसणार्‍या सुर्याची सोनेरी किरणे.. हे आपले उगाचच अलंकारीक झाले.. खरे तर पिवळी किरणे अचानकपणे डोळ्यावर पडली तसे त्यांचा भार सहन न होता मी बाजूला नजर फिरवली तेच ........ मी माझे डोळे पुन्हा पुन्हा चोळतच राहिलो! आतापर्यंत तर मी बरा होतो, अचानक मला काय झाले, एवढा कसा आजारी पडलो, कावीळ वगैरे तर नाही ना झाली मला, अशी शंका पटकन मनात आली. कारण सभोवतालचे सारे जग मला फक्त आणि फक्त पिवळ्या रंगातच दिसत होते. या आंतरजालावर चालणार्‍या राजकीय वादात कित्येकांना मी हिरव्या रंगाचा चष्मा घालून वावरताना पाहिलेय, तर कित्येक भगव्या रंगाचा चष्मा चढवून असतात. पण मला मात्र स्वताला पिवळ्या रंगाचा चष्मा चढवल्यासारखे वाटू लागले. सुर्याच्या सोनेरी किरणांना पिवळे संबोधण्यामुळे तर नाही ना त्या सुर्यनारायणाचा कोप झाला अशी शंकाही मनात येऊन गेली. ईतक्यात मला आठवले, अरे हो कीऽऽ... आज घटस्थापना! नवरात्रीतला पहिला दिवस! हल्ली महिलांना रात्री कुठे फिरायची सोय राहिली नसल्यामुळे असावे कदाचित, त्या नवरात्री हा सण नऊ दिवसांना नऊ रंगाचे कपडे घालून साजरा करतात. आणि आज त्यातलाच एक पिवळा दिवस असावा.

थोड्याच वेळात पिवळ्या रंगाची लाट ओसरली आणि पांढरे, निळे, काळे, करडे रंग दिसू लागले. महिलांचा लेडीज डब्बा रिकामा होऊन मागाहून पुरुष आपल्या नेहमीच्याच वेशभूषेत अवतरत होते. मगाशी मनात आलेल्या वेड्यावाकड्या विचारांना हुश्श करत मी एक सुस्कारा टाकतो तोच माझी नजर माझ्या स्वताच्या शर्टावर गेली आणि आणखी एक पिवळा धक्का बसला. म्हणजे पिवळा सिग्नल पाहताच गाड्या स्लो होतात तसे माझी पावले मंद मंद झाली. माझे स्वताचे शर्ट, मी आज कधी नव्हे ते, नेमके पिवळ्या रंगाचे घालून आलो होतो. ते देखील लाईट येल्लो वा लेमन येल्लो नाही तर पिवळाभडक, पिवळागर्द, पिवळाकुट्ट, पिवळाशार ... पुढे होणार्‍या परीणामांची कल्पना येताच मी थंडगार!

काल दुपारीच "रंग रंग कोणता?" हा मेल प्रत्येक कॉम्प्युटरवर फिरला होता, पण हे काय आपल्या कामाचे नाही हा हलगर्जीपणा मला नडला होता. पुरुषांमध्ये ‘अन-कॉमन’ असा पिवळा रंग मी आज एकलाच कन्हैय्या बनत ऑफिसच्या सर्व गोपिकांमध्ये मिरवत असणार याची खात्री होती मला. कॉलेजला असतो तर आल्यापावलीच परत फिरलो असतो आणि शर्ट बदलून आलो असतो. पण इथे तर साधा लेटमार्कही परवडणारा नव्हता. दबकत दबकतच मी ऑफिसच्या आवारात प्रवेश केला, जिन्याने बिल्डींग चढून पहिल्या मजल्यावर गेलो आणि इतक्यातच डावीकडून कोणीतरी आरोळी ठोकली, "ए आपला शाहरूख बघ... फूल्ल टू पिवळा बनून आलाय.."

झालं! खेळ खल्लास !!

डावीकडे वळून पाहिले तर कॅंटीनच्या बाहेर आमचाच टवाळखोर मुलांचा कंपू जमला होता. इतर दिवशी ज्यांना हिरवळ म्हटले जाते त्यांना आज पिवळ्या रंगात नटलेले न्याहाळत होता. दुर्लक्ष करतच मी सटकलो खरे, पण ते सटकणे आता तात्पुरतेच आहे हे आजवरच्या इतिहासावरून मी ओळखून होतो. रोजच्यासारखे सकाळी सर्वप्रथम कॅंटीनची चक्कर न मारता मी कामाचे नाटक करत जागेवरच थोडावेळ टाईमपास केला आणि मग थोडा अंदाजा घेत वॉशरूमच्या दिशेने प्रस्थान केले. वॉशरूमचे दार उघडून आत शिरलो तो मला पाहताच एक कार्टा खेकसला, "ओये बेहेनजी गलत जगह घुस आये, आपका तो बाजू मै है.. " ... आणि पाठोपाठ ती जीवघेणी खसखस.. शरमेने मी आणखी पिवळाबावळा झालो. ज्या कामासाठी आलेलो त्याला टुल्ली देत तिथून लवकरात लवकर सटकलो.

जागेवर येऊन कामाला लागलो. जवळपासच्या चारचौघांच्या चिडवण्याला झेलत समोरच्या स्क्रीनवर कॉन्संट्रेट करत काम करू लागलो. तरी दर दहा-पंधरा मिनिटांनी एखाददुसरा जण माझ्या जागी येऊन "पुष्कराज दर्शन" घेतल्यासारखे मला बघून जात होता. मुले तर मुले, मुलीही खिदळत होत्या. कहर म्हणजे सरांना सुद्धा माझी थट्टा उडवायची लहर आली. एकामार्फत मला बोलावणे धाडले. मी त्यांच्या केबिनचा दरवाजा उघडत आत शिरतो तेच त्यांनी माझ्याकडे बघितल्या न बघितल्यासारखे करत म्हणाले, "अग्ग तू नाही, रिशीला पाठव ...." .. लगोलग जवळच टपून बसलेल्यांनी दात काढायला सुरुवात केली.
"ओ सर...." कळवळल्याचा अभिनय वठावत मी कसेबसे पुटपुटलो आणि तडक केबिनच्या बाहेर पडलो. हा अभिनय ईतक्यासाठीच की मेल्यांना थोडीतरी दया यावी ... पण.. ते.. होणे. नव्हतेच!

दुपारी जेवताना तरी किमान वातावरण प्रसन्न राहावे म्हणून एकटाच सटकलो. पण डब्यात बटाट्याची पिवळी भाजी बघून तिथेच ढेकर दिला. जेवणानंतरच्या शतपावलीला सर्वांसोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता, म्हणून मायबोली उघडून टाईमपास करत बसलो. ईतक्यात एका गोड मुलीने सुंदर आवाजात हाक मारली. एका खुर्चीवर बसायला सांगितले. ‘आता मी त्या खुर्चीवर बसताच ती मोडून खाली कोसळणार’, अशी क्रूर थट्टा ती सुंदरी करायची सुतराम शक्यता नसल्याने मी बिनधास्त बसलो आणि इथेच घात झाला. मी खुर्चीवर बसताच टपाटप माझ्या चोहोबाजूंनी दहाबारा मुलींनी मला असा काही गराडा घातला की मी क्षणभर अविश्वासाने आज आपण कसलेसे परफ्यूम वगैरे तर शिडकून नाही ना आलो म्हणत शर्टाकडे पाहिले, तसे त्याचा पिवळा रंग माझ्या डोळ्यात शिरताच डोक्यात बल्ब Light 1 पेटला. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. समोरून क्लिकक्लिकाट होत तीन-चार फोटो टिपले गेले होते. त्या सभोवतालच्या पिवळ्या पाकळ्यांमध्ये घेरलेला लाजेने चूरचूर माझा लालतांबडा चेहरा म्हणजे फोटोत सुर्यफूलच दिसत असणार जणू, जे येत्या एकदोन दिवसात सर्व मित्रांच्या फेसबूक अकाऊंटवर मला टॅग करत फिरणार होते.

तरीही उसने अवसान आणत, मला याने काहीही फरक पडत नाही, काढा आणखी दोनचार फोटो असे त्यांना सुनावले. पण आपले काम उरकल्यावर त्यांनी मला जास्त भाव दिला नाही. व्हॉटसअ‍ॅप या सोशलसाईटचा खरा दुरुपयोग मला आज समजला. तो म्हणजे त्याचा बातमी पसरवण्याचा वेग. जो खराब काळ येता शाळेत शिकवलेली काळ काम वेगाची सारी सुत्रे धाब्यावर बसवतो. पुढच्या काही मिनिटांतच ते फोटो ऑफिसमधील एकेकाच्या मोबाईलवर फिरू लागले. फक्त कोणाच्या ते बघणे नशिबी नव्हते तर ते खुद्द माझ्या! ‘मलाही दाखवा’ म्हणत मागणार तरी कोणाकडे होतो आणि कोणत्या तोंडाने...

पुढची दुपार अशीच गेली. कुठल्यातरी कोपर्‍यातून खिदळण्याचा आवाज यावा आणि मला वाटावे तो माझ्यासाठीच आहे. पोचला वाटते माझा फोटो तिथेही.
संध्याकाळी पाचच्या काट्यावर मी बॅग उचलली आणि चालू पडलो. मनाची स्थिती अत्यंत नाजूक होती. ट्रेनला गर्दी होती. पण मागच्या रिकाम्या ट्रेनसाठी थांबावे इतका संयम आता माझ्यात शिल्लक नव्हता. कसेबसे आत शिरत एक कोपरा पकडला. दिवस एकदाचा संपला म्हणतानाही दिवसभरात घडलेले सारे लज्जास्पद प्रसंग डोळ्यासमोर नाचत होते. इतक्यात कोणाचा तरी हात माझ्या खांद्यावर फिरतोय असे जाणवले आणि मी मोठ्ठ्याने ओरडलो...... अबे ओये, आदमी हू मै !!!

"तो फिर ......... बांदरा उतरना है क्या?" ..
सुदैवाने समोरच्याला माझ्या वाक्याचा काहीही अर्थबोध झाला नव्हता!
झाला असता तर नक्कीच म्हणाला असता .. येल्लो येल्लो डर्टी फेल्लो ..

....................................................................................................
...............................
...............

देवाऽऽऽऽऽऽ ...... पण मी हे काय केले.
घाईघाईच्या नादात उद्या ‘रंग रंग कोणता’ हे देखील न बघताच सटकलो. आता उद्या काय घालू... पुन्हा नेमका तोच रंग निघाला तर....... नहीऽऽऽऽऽऽऽऽ

- ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिसिद्धी, मेल उद्याच बघून रिप्लाय देईन. आता दक्षिण मुंबईत रात्रीचे सव्वातीन उलटून गेलेत ..

शीत, ज्वाला (मस्त नावे आहेत, परस्परविरोधी) धन्यवाद Happy

१००

हा लेख वर आला की नवरात्र आलीय हे समजते.. अन्यथा माझे रंगाचे आणि सणवारांचे ज्ञान तसे तोकडेच आहे
मस्त, फेसबूकवर टाकता येईल नवरात्रीच्या निमित्ताने..

Navratri2018.png

विक्षिप्त मुलगा, छायाचित्रे कुठे कशी पाठवायची याची माहिती प्रसिद्ध झाली की तीही इथे द्याल ना? मायबोलीवरच्या महिला सदस्यांसाठी हो!

विक्षिप्त मुलगा, छायाचित्रे कुठे कशी पाठवायची याची माहिती प्रसिद्ध झाली की तीही इथे द्याल ना? मायबोलीवरच्या महिला सदस्यांसाठी हो!
Submitted by भरत. on 9 October, 2018 - 09:22

https://www.maayboli.com/node/1556

भरत त्यांचा ईमेल आयडी असतो त्यावर पाठवायचे फोटो, माझ्या एका मैत्रिणी कडे आहे बहुदा, असेल तर ईकडे देइन मी

Pages