चाळीतील गमती-जमती (१५)

Submitted by राजेश्री on 15 May, 2018 - 21:12

चाळीतल्या गमती-जमती (१६) :- इंदू आज्जीची खोड मोडली

गणपती आणि चंद्राच्या कथेतून मला एका नव्या मोहिमेच गुपित कळून गेलं.आणि मला इंदू आजीला छळण्याचे एक निमित्त मिळून गेले.व्हायचं असं की,दुपारी पाणी सुटण्याच्या वेळी मी एक चार पाच दगड आणून ते फ्रॉक च्या खिशात ठेऊन द्यायचे आणि पाणी भरताना अगदी आज्जीसमोरच तिचे लक्ष नाही बघून तिच्या घरावर दगड टाकायचे.ज्यावर संशय घेता येईल तो संशयित गुन्हेगार समोरच असेल तर मग दगड कुणी मारला असेल आज्जी क्षणभर बावचळुन जायची.हातातले काम उरकून बाजारला जाण्यासाठी स्वतःवरच चरफडत काही रोज सरावाने तोंडात आपसूक येणाऱ्या शिव्याचा जप करीत ती पाणी भरत राहायची.मग मी विचार करायचे,हे काही ठीक नाही,संभाव्य दोषी म्हणून इतरवेळी ही म्हातारी मला खंडीभर शिव्या देते आणि आता, हा सूर्य आणि हा जयद्रथ झाल्यावर मात्र शिव्या द्यायला तोंड आखडत घेते.म्हणून मी आणि लागोपाठ तसेच दोन दगड पुन्हा भिरकावून द्यायचे.मग माझी ही मात्रा बरोबर लागू पडायची. तिथल्या तिथे म्हातारी माझी जासूस पदी नेमणूक करून माझ्यावर आरोपीचा माग काढणे,त्यावर लक्ष ठेवणे ही कामगिरी सोपवायची. माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायच्या.मी उगीचच इकडे तिकडे फास्ट पळून आरोपीचा शोध लागतो का बघायचे.तोपर्यंत ती इकडे घरातून अंगण,अंगणातून घर अश्या फेऱ्या मारत रहायची. आमच्या घराच्या बरोबर मागे सुन्याचे घर होते.तो तोतर बोलायचा. तो तसा शांतच होता.उपद्व्यापी वैगेरे काही नव्हता.एकदा असच मी म्हातारीच्या घरावर तिच्या देखत कळू नये अशी हातचलाखी करून दगड भिरकावला आणि स्वतःच इकडे तिकडे कोण आहे ? कोण आहे? म्हणत धावून घेतलं.मागे सुन्या त्याच्या घरासमोर ऊभा होता.तसा तो कारण नसताना हसत असायचा हा त्याचा गुण मला इथे उपयोगी पडला. आणि दगड पडून कातवुन गेलेल्या म्हातारीला खबर दिली की तुमच्या घरावर सुन्याच दगड मारतोय कारण बघल तवा तो दात काढत अंगणात उभा असतोय...म्हातारीला हे सांगेपर्यंत ती तणतणतच सुन्याच्या घराजवळ देऊन त्याच्या घरादाराचा उद्धार करू लागली.तो होता तोतरा त्याला र म्हणता यायचं नाही...तो म्हणाला म्हाताले म्हाताले त्वांड सांभाळून बोल...मी दगड नाय मालला...मला राजींन सांगितलं तूच हुतास दात काढीत उभा...पुन्हा का दगड माझ्या घरावर आला तर तुला काय जित्ता सोडत नाय बघ... अशी म्हातारीने त्याला तंबीच दिली.त्या दिवशी मी चक्क म्हातारीची विश्वस्त बनले होते.. सुन्या आणि सुन्याच्या घरचे सगळे यांची म्हातारीबरोबर चांगलीच जुंपली होती.सगळं निवल्यावर मी घरात खो खो हसत सुटताना माझ्या खिशातील दगड खाली पडले समोर तायडी होती...तिने मला गालावर एक चापटी मारली...मी मम्मीला नको सांगू पुन्हा अस करीत नाही म्हणून गाल चोळत तायडीकडं दयावया करू लागले..त्यानंतर मी म्म्मीच्या धाकाने मनात असूनही म्हातारीच्या घरावर दगड मारू शकले नाही आणि म्हातारीने अंतिम आरोपी म्हणून सुन्याचेच नाव निश्चित करून त्याला मोड देखील विकत द्यायचं बंद केलं...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे काय फनी वाटले नाही. तोतरा माणूस, म्हातारी बाई ह्यांच्या बद्दल कमी संवेदनशीलता आहे असे दिसते.

हे काय फनी वाटले नाही. तोतरा माणूस, म्हातारी बाई ह्यांच्या बद्दल कमी संवेदनशीलता आहे असे दिसते.

नवीन Submitted by अमा on 16 May, 2018 - 12:55

प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमा
संवेदनशीलता पेक्षा मला वाटत ज्या वयात जे विचार होते ते मांडले आहेत

नवीन Submitted by राजेश्री on 16 May, 2018 - 13:04

छान प्रतिसाद लहानपणीच्या आठवणी आहेत त्या