जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_ 13

Submitted by अन्नू on 15 May, 2018 - 15:40

त्या बोलण्यानंतर आज पहिल्यादाच तिने स्वत:हून मला भेटायला बोलवले-

“आज भेटशील? खूप दिवस झाले, निवांत भेटलो नाही” तिच्या अशा स्वत:हून बोलवण्याने मला खरंच खूप आनंद व्हायचा- बरं वाटायचं. मी तयार झालो-

“कधी भेटायचं?”

“संध्याकाळी कामावरुन सुटल्यावर?
मी बरोबर सात- सव्वा सातला स्टेशनला येते. आल्यावर तुला फोन करते त्यावेळी ये”

“ओके चालेल” मी बोललो. फोन ठेवला.

2 मे 2013....
वेळ- संध्याकाळची, बरोबर- 7 वाजून 22 मिनिटे!
तिचा टेक्सट् आला-
‘मी आले भायंदर ला तू कुठे आहेस..’

मी नुकताच घरातून बाहेर पडत होतो. मोबाईलवरुन फोन करायला बघितला, तर नेटवर्क मार खात होतं.
तसाच धावत खाली आलो. एक रुपयात पीसीओ वरुन कॉल केला-

‘तिथेच थांब- आलोय मी. रस्त्यात आहे’

अक्षरश: दुसर्‍या मिनिटाला मी स्टेशन गाठलं.
मला पाहताच ती नेहमीप्रमाणे गोSड हसली. ख्यालीखुशालीच्या गप्पा चालू झाल्या. पुढे ज्युस सेंटरच्या तिथे काहीतरी थंड घ्यायला मी तिला विचारलं. ‘हो- नको’ करत ती आली.
लस्सीला नकार दिल्याने मी सरळ दोन उसाचा रस मागवला-

“मध्यंतरी आपण बोलायचं सोडून दिल्यावर, तुला कधी माझी आठवण आली होती?” तिनं कॅज्युअली विचारलं

मी हसलो. पण त्या हसण्यातही जगातलं दु:ख कोळून प्यायलेल्याचा सराईतपणा होता!..
काय सांगणार?
जी गोष्ट विसरलीच जाऊ शकत नाही, तिची आठवण कशी येणार?

“तुला कधी पापण्यांची उघडझाप करायची आठवण येते का गं?”

“अं? अरे ते... डोळे चावतात नं चश्मा काढल्यावर म्हणून असं होतं मला!!”

“काय??”

“मला जास्त नंबरचा चश्मा आहे ना!”

“अगं मी म्हणतोय..”

“माझ्या डोळ्यांचंच ना” (!!!!!)

“- जाऊ दे!” मी तो उपमांचा विषयच सोडून दिला (ही मुलगी खरंच इतकी डम्ब होती की मुद्दाम करत होती?)

“आठवण काढायला तू विसरलीस तर पाहिजेस!” मी स्पष्टच बोललो.
तिला इतकं महत्त्व देत असलेलं बघून कदाचित ती सुखावली. गोड हसली.
थोड्या वेळानं ती बोलली अहं.. सरळ स्फोटच केला..!!

“पप्पा लग्नासाठी मला मुलगा बघत आहेत”.............................................................

सगळा परिसर माझ्याभोवती गर्रकन् फिरला!
एक क्षणसाठी सर्व जाणीवा बधीर झाल्या.. तो क्षण तसाच गोठला......

माझा श्वास घशात अडकला. असंख्य वावटळांनी मनात बंडाळी करुन फेर धरला. हृदयाला वेदनेनं पीळ पडत असतानाच मी संयम राखत स्वत:ला शांत ठेवलं.. सगळी दु:ख अशी.. आत दाबून मुस्कटून टाकली.
तिच्याबद्दलच्या सगळ्या भावना, प्रेम, हर्ष, स्वप्न....
सगळं सगळं.. डोळ्यांच्या काचांत एकवटलं गेलं. डोळ्यांना टोचून मरणप्राय यातना देऊ लागलं. त्यातही मी डोळ्यांतून पाण्याचा एक थेंबही तरळू दिला नाही!
ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन उध्वस्त झालेलं मन दिसू नये म्हणून चेहरा ठार कोरा ठेवला...
शेवटी..
इथेही आमच्यातल्या पुरुषत्त्वाने आमच्यावर विजय मिळवला होता तर!

“प्लिज, हे संपवा आता, मला उशीर होतोय!” ती हात जोडून चेष्टेच्या सूरात हसून बोलली.

मी मुकपणे ग्लासात निम्मा अर्धा उरलेला रस कसातरी संपवला अन तिच्याबरोबर बाहेर पडलो.
आज ती तिच्या ठरलेल्या मधल्या रस्त्यावरुन न जाता पुढून काशिविश्वनाथच्या मंदीराकडून फिरुन जाणार होती.

“या चौदा फेब्रुवारीला काय होतं तुला माहीत आहे?”

“हो”

“काय?”

“तुझा बर्थ-डे!” मी सहज उद्गरलो अन् तिनं चमकून माझ्याकडे बघितलं,

“तुला माहीत होता?” आश्चर्य दाखवत तिनं विचारलं. मी कडवडपणे हसलो.

“9930XXXX..” मोबाईल नंबर सांगत मी तिला विचारलं-
“तुला माहित आहे हा नंबर कोणाचा आहे?”

“हा?” तिनं नकारार्थी मान हलवली.

“कमाल आहे, तुला तुझा नंबर आठवत नाही?”

“अरे हो! पण हा तर नंबर बंद झाला नं आता”

“तरीपण तो मला माहित आहे! इथे तुझ्याबाबतीतली एकही गोष्ट आंम्हाला विसरता येत नाही. पण तुला त्याचं काहीच नाही. तुझ्या प्रत्येक भेटीच्या वेळी हफ्ताभर खुप काही ठरवून येतो. हे बोलेन ते बोलेन, पण प्रत्यक्षात तू समोर आलीस की काही बोलायलाचं सुचत नाही..”

“अस्सं?” ती चालता-चालता हसत उद्गरली. मग मध्येच मूड बदलत म्हणाली,

“मीपण तुझ्या ब’ड्डेच्या दिवशी तुला फोन करुन विश करणार होते...”

“तुला माझा ब-ड्डे माहीत होता?” तिचं वाक्य संपायच्या आत मी तिला खोचकपणे बोललो आणि नेमकं खोट पकडलं गेल्यासारखी ती ओशाळली. चटकन दाताखाली जीभ चावत खाली बघायला लागली.

काशिविश्वनाथ मंदीरापासून आत तिच्या घरापर्यंत मी तिला सोडायला गेलो. माहीत नाही पण...
हाच दिवस मी आधीही पाहिला होता का?
इतक्या दिवस याचीच तर मला भिती वाटत नव्हती? तो निरोपाचा क्षण... तो सर्वस्व गमावणारा क्षण...
माझ्या मनातली हुरहुर वाढली... ती कायमची हरवणार असल्यासारखी एकप्रकारची धाकधुक वाटू लागली..
माझा धीर खचू लागला..

“बरं मी जाते..”

“थोडं थांबशील..” पहिल्यांदाच मी व्याकुळ होत विचारलं अन् तिच्या मनातही गलबललं. चेहर्‍यावर स्पष्ट प्रतीत झालं.

“मला कधी तुला सांगताच आलं नाही.. तू.... तू नेहमी माझ्यासाठी स्पेशल होतीस.. तुझं असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.. तुझं हसणं, तुझं बोलणं मी कधीच विसरु शकणार नाही..”

मला पुढे बोलवेना. आजुबाजुला येणार्‍या जाणार्‍या लोकांमुळेही मला अवघडल्यासारखं वाटायला लागलं. ती शांतपणे माझ्याकडे बघत ऐकत होती...
पण आता माझ्याजवळचे शब्दच मला साथ देत नव्हते. वेंधळ्यासारखं मी तिच्या अस्तित्त्वाचा कण न कण मनात झिरपून घेऊ लागलो..

थोड्यावेळाने ती जायला वळली. म्हणाली, ‘तुला लग्नाला बोलवेन’
माझ्या डोळ्यात वेदना उमटली. सर्रर्रकन् हृदयावरुन धारदार सुरी फिरल्याची जाणीव झाली.

“तू मला मित्र मानतेस ना?”

“हो” तिनं संभ्रमात पडत उत्तर दिलं

“मग मला कधीच बोलवू नकोस!” पुढच्या मरणयातना नको म्हणून मी तिला साधी विनंती केली होती. निदान मित्र म्हणून इतकी तरी दया दाखव असं मला- तिला सूचवायचं होतं. पण...
याही वेळी तिनं त्याचा वेगळाच अर्थ काढला असावा.
व्यथित नजरेनं ती माझ्याकडे बघू लागली. नंतर माझा निरोप घेऊन ती गेली..

ती रात्र खुप वाईट गेली. रात्रभर झोप लागली नाही. सतत ती जात असल्याचा भास व्हायचा अन मन तीळ तीळ तुटत जायचं. मध्येच तिच्या जाण्याच्या कल्पनेनं आक्रंदून उठायचं.
सकाळ झाली. तगमग काही कमी झाली नव्हती. मनाची चलबिचल होतच होती. ती एक मुर्ख आहे, इतकं सांगूनपण का विश्वास ठेवत नाही माझ्यावर?

‘अग मुर्ख मुली तू माझं सर्वस्व आहेस गं, कधी कळणार तुला?’

संध्याकाळी मात्र मी स्वत:च एक निर्णय घेतला. मरण्याच्या भितीनं आपण जीव तोडून धडपड करतो, पण नंतर समोर मरण निश्चितच आहे म्हटल्यावर मात्र आपोआप शुष्क पाषाण होऊन जातो. माझंही तसंच झालं.
असंही आणि तसंही अंत आहेच तर मग..
प्रयत्न करायला काय हरकत आहे? मी ठाम निश्चय केला-
मी तिच्या वडीलांना भेटायचं ठरवलं!

ते मला चांगलं ओळखत होते. जरी काही गैरसमज झाले तरी ते मी सोडवू शकलो असतो.
तिनं एकदा सांगितलं होतं, तिचे पप्पा संध्याकाळी सहानंतर कधीही खाडीवर येतात.
ठिक आहे- हीच वेळ आहे काहीतरी हालचाल करायची. तिच्या पप्पांना भेटून कन्वेंन्स करायचं. तिच्या प्रत्येक सुख-दु:खाच्या क्षणी तिची साथ देण्याचं वचन द्यायचं. तिला प्रत्येक क्षणी सुखी ठेवण्याची खात्री द्यायची. फक्त तोंडी नाही प्रॅक्टीकली. त्यांच्याकडून वेळ मागून घ्यायचा. 'या वेळात स्वत:ला सिद्ध करुन तिच्या लायक झालो तरच हो म्हणा!' सरळ सरळ स्वत:ला त्यांच्या कसोटीवर आणून ठेवायचं. आणि स्वत:ला त्यात झोकून द्यायचं. बस्स- आर या पार!

अवघड नव्हतं ते. माझं फॅमिली बॅग्राउंड भक्कम होतं. त्यांनाही ते माहीत होतं. फक्त स्वत:ची पात्रता सिद्ध करुन दाखवायची होती. बाकी त्यांची मर्जी.
सगळं काही प्लॅन करुन मी त्यांना खाडीवर गाठण्याचं ठरवलं.
खाडीवर यासाठी की, तेथे ते एकटे भेटणार होते. बिना कसल्या अडथळ्याचं बोलणं होणार होतं. पण तेच घरी बोलणं केलं असतं तर ते योग्य दिसलं नसतं आणि सगळ्या फॅमिलीसमोर अशा नाजुक विषयावर बोलणं म्हणजे- तेही अवघडून गेले असते..
जर मी त्यांच्या मुलीला मनापासून प्रेम करत असू तिच्याशी रितसर लग्न करण्याचा विचार करत असू, ते पण माझी पात्रता सिद्ध झाल्यानंतर- तर मग यात वाईट काय आहे? मी काही इतर मुलांसारखा तिला फसवणार नव्हतो.

मनाशी पक्का निश्चय करुन मी सहा वाजताच खाडीवर गेलो. ते कुठे दिसताहेत का, हे बघत पहिली खाडी पालथी घातली. मग ते येण्याच्या वाटेकडे लक्ष ठेवत तिथेच बाजुला उभा राहून अतूरतेने त्यांची येण्याची वाट पाहत थांबलो.

सात वाजले- आठ वाजले- नऊ वाजले- दहा वाजत आले.. त्यांचा पत्ता नाही.
मग मात्र मी पुन्हा पुन्हा खाडीचा फेरफटका मारत त्यांना शोधत राहिलो....
शेवटी रात्रीचे साडे अकरा वाजून गेले तरी ते आले नाहीत!..

हताश होत मी तसाच मोकळ्या हातांनी घरी परतलो...
माझी हार झाली होती..
सर्व बाजुंनी..............
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

4 मे...
7 वाजून दहा मिनिटे!

आज मी स्वत: तिला फोन केला. एकदा अर्जंट भेट म्हणून सांगितलं. भेट मिस होऊ नये म्हणून पावणे सातलाच स्टेशनजवळच्या रिक्षा स्टँडजवळ उभा राहीलो.
बरोबर सात दहाला ती आली. मी घाईघाईने तिच्याकडे गेलो..

“मला तूझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे”

“काय काम आहे?”

“रस्त्यात नको आपण कुठे बसूया का?”

“नको, असंच बोल”

“असं कसं बोलणार?, हे बघ- आपण इथे बसूया... तू ज्युस घेणार का?” परवा बसलेल्या ठिकाणी निर्देश करत मी बोललो-

“च्यक्! मी नाही येत- मला वेळ नाही बसायला”

“अगं मग कुठेतरी थांबूया- खाडीला जाऊया का? प्लिज मला बोलायचं आहे गं तूझ्याशी!” मी काकूळतीला येत उद्गरलो.

“चालेल- चल तूझ्या घरी!”

“घरी? आपण बाहेर बसलं तर नाही का चालणार-”

चुचकारत ती पुन्हा त्याच वेगाने पुढे जाऊ लागली..

“चालेल-चालेल, तू म्हणतेस तसं- चल आपण माझ्या घरी जाऊ”

“च्यक्- मला नाही आता यायचं”

“अगं आत्ता तर तू बोलत होतीस घरी जाऊया म्हणून- हे बघ- काळजी करु नकोस- घरी ताई असेल, चल तू”

“मी सांगितलं ना एकदा तुला नाही येत म्हणून? इथेच बोल!
बोल काय बोलायचं आहे?”

अचानक तिच्यात झालेल्या बदलाने मी थक्कच झालो. वाईटही वाटलं ‘ही अशी का परक्यासारखं बोलतेय?’

“तुझा प्रॉब्लेम काय आहे?”

“मला काय झालंय?”

“मग तू अशी का बोलतेस?”

“कशी बोलतेय?”
तिच्यात नक्कीच बदल झाला होता. मी तिच्या चेहर्‍याकडे बघत म्हटलं-

“तू खुश नाहीस, ...”

“हो!! नाही मी खुश, बस्स? तुला काय करायचं आहे त्याच्याशी?” (!!!!!!!!!!!!!!!!!!!!)

“मला लग्न करायचं आहे गं तुझ्याशी!....”

“पण मला तुझ्याशी करायचंच नसलं तर? पप्पा ज्याच्याशी सांगतील त्याच्याशीच मी लग्न करेन!”

किती विरोधाभास? पप्पा सांगतील त्या कोणाशीही ती लग्न करेन पण तो मी नसायला पाहिजे!

“का?”
चुचकारत ती पुन्हा तशीच चालायला लागली-

“हे बघ- हे बघ, *** माझ्यात काही कमी आहे, असं काही आहे का? तू सांग ना मला स्पष्ट-”

“......”

“माझ्यात कमी आहे? मी दिसायला खराब आहे?..” मी पुन्हा धावत तिच्या चालण्याची बरोबरी करीत विचारलं

“नाही”

“मग?... मी वागण्याला वाईट आहे? तुला माझा स्वभाव आवडत नाही?”

“नाही!!” ती चिडीला येऊन, पुन्हा वैतागत उद्गरली.

“मग?”

“मग काय? मी नाही ना करु शकत तुझ्याशी लग्न”

“पण का?” मी अक्षरश: रडकुंडीला आलो होतो.

“माझं तुझ्यावर प्रेम नाही!! आणि जी मुलगी तुझ्यावर प्रेमच करत नाही, तिच्याशी तू लग्न करशील?”

“हो! करीन मी” मी आवंढा गिळत ठामपणे उद्गरलो

“का? माझं तुझ्यावर प्रेम नसताना तू का म्हणून माझ्याशी लग्न करशील पण?”

“कारण मी प्रेम करतोय तुझ्यावर!! आणि मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे..”

“आणि मला करायचं नाही!”

“अगं पण एकदा...”
क्षणात ती थांबली. गर्रकन रागाने माझ्याकडे वळत उद्गरली-

“पप्पांना बोलवू.......”

बस्स तो एकच क्षण.
माझे सगळे शब्द खुंटले.. आत कुठेतरी जबरदस्त घाव केल्यासारखी कळ उसळली. मी थंड, दुखावल्या नजरेनं फक्त तिच्याकडे पाहात राहिलो...

या मुलीवर हसावं की रडावं तेच मला कळेना..
क्षणात तिने मला गलिच्छ, सडकछाप ठरवलं होतं! तिच्या दृष्टीने माझी काहीच किंमत नव्हती.
आणि भिती कोणाची- तर पप्पांची??

वेडे, तुला कल्पना नसेल पण, त्यांनाच प्रत्यक्ष भेटायला मी काल साडे पाच तास खाडीवर पाय दुखेपर्यंत वणवण केली गं! कोणासाठी-
तुझ्यासाठी!
आणि तू मला त्यांची भिती दाखवतेस?

ओठ आवळत मी गप्प बसलो.
कळवळून डोळे पाण्याने डबडबले. तिनं ते बघणं शक्यच नव्हतं ती तिच्याच दुनियेत होती. तरीही झटकन खाली बघत मी ते तसेच पापण्याआड लपवले. डोळे कोरडे केले..

“एखादी चांगली मुलगी बघ- लग्न कर...” थोड्या वेळानं चालता-चालता वातावरण हलक करत ती पुन्हा हसून नॉर्मल होत विनोदीपणाने बोलली.
मनात म्हटलं-
जीला हेच कळत नाही की तिच माझं आयुष्य आहे- तिच्यातच माझं जग सुरु होऊन तिच्यातच संपतंय- तिला अजुन काय समजवणार?

दगडी चेहर्‍याने मी हसल्या न हसल्यासारखं करत निमुटपणे तिच्याबरोबर चालत राहिलो. तिचं घर येताच ती निरोप घेऊन गेली.

हे शेवटचं दर्शन होतं तिच...
माहीत नव्हतं यापुढे ती कधी उभ्या आयुष्यात भेटेल की नाही...
पण तरीही, तिची शेवटची वेदना देणारी- ही दूर जातानाची मुर्ती तरी मनात राहायला नको म्हणून वळून बघण्याचे कष्टही न घेता मी सरळ पाषाणी चेहर्‍याने पुढे चालत राहिलो...
आयुष्यातलं तिचं चाप्टर कायमचं क्लोज झालं होतं!

विशाल वॉज राईट.. मुली- जीवनातल्या वळणासारख्या असतात....
पण हे वळण माझा जीवच घेऊन गेलं रे.................
================================================================
क्रमश:

अंतिम भाग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आईग्ग.. प्रेमाची अशी जबरदस्ती नसते.. मुलगी ताकास तूर लागू देत नाही हे दुर्देव.. वेळीच वाटा बदललेल्या ब-या.. हुलकावणी देणारी, स्वतःचे महत्त्व अपरंपार वाढवणारी मुलगी कथानायकासाठी योग्य नाही.. पुढेही त्रास च होईल.. खूपच इन्व्हॅल व्हायला झाले..
फार छान लिहीता तुम्ही.. संवाद तर अतीउत्तम.. Happy