न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!!

Submitted by ललिता-प्रीति on 14 April, 2018 - 00:58

माओरी - हे न्यूझीलंडचे आदिवासी, हे शाळेत असताना कधीतरी वाचलेलं लक्षात होतं. दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांशी या पलिकडे आपला का म्हणून संबंध यावा? नाही म्हणायला माओरींशी आपल्याकडच्या क्रिकेटप्रेमींचा आणखी एक बारीकसा संबंध मानता येईल. न्यूझीलंडचा एक बॅट्समन रॉस टेलर माओरी वंशाचा आहे हे आपण ऐकत आलेलो आहोत. तरी आम्ही न्यूझीलंडला जायचं ठरवलं तेव्हा तिथले माओरी काही विशेष डोक्यात नव्हते.
न्यूझीलंडला जायचं ठरवलं, ते स्वतःच सगळं प्लॅनिंग करायचं, असं योजूनच. त्याप्रमाणे व्हीजासकट सगळी पूर्वतयारी केली. बुकिंग्ज झाली. न्यूझीलंडचा नकाशा धुंडाळताना बर्‍याच ठिकाणांची अ-इंग्रजी वाटणारी नावं दिसत होती- व्हांगारेई, वायटोमो, लेक वाकाटिपु, वगैरे. ती बहुदा माओरी भाषेतली असावीत अशी मनोमन नोंद झाली; पण त्यावर अधिक विचार केला गेला नाही. तयारीच्या तीन-चार महिन्यांदरम्यान इंटरनेटवरचे विविध फोरम्स, हाती लागतील ते ब्लॉग्ज, व्लॉग्ज, इतर माहिती धुंडाळणे, त्या देशाबद्दलची स्वतःच्या परिने एक पूर्वपीठिका तयार करणे, हे सुरू होतंच. स्वबळावर निवडणूक लढवतात तसं प्रथमच स्वबळावर परदेशी भटकायला निघालो होतो. न्यूझीलंड हा देश फिरायला अत्यंत सुरक्षित आहे असंच सगळीकडे वाचायला मिळत होतं; त्यामुळे मनोमन एक दिलासाही मिळत होता. एकीकडे स्वतःला समजावत होतो- परदेशात फिरतानाची किमान सावधगिरी इथेही बाळगावी लागेलच; पण निदान भाषेचा तरी प्रश्न येणार नाही...
जायची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपली. आणि एक दिवस अचानक एक ब्लॉग दिसला, जो न्यूझीलंडमध्ये पोचल्या पोचल्या आवश्यक असणार्‍या ‘आईसब्रेकिंग’बद्दल बोलत होता. ‘न्यूझीलंडमध्ये जाण्यापूर्वी पर्यटकांनी माओरी भाषेतले काही शब्द आत्मसात करावेत’ असं त्यात सुचवलेलं होतं; आणि पुढे त्या भाषेतले दैनंदिन वापरातले काही शब्द, वाक्यं, त्यांचे अर्थ, असं सगळं दिलेलं होतं. मी एकदा नुसती त्यावरून झरझर नजर फिरवली. विरंगुळा म्हणून ते वाचायला इतर वेळी मजा आली असती; पण त्या ब्लॉगचा एकंदर सूर पाहता असं वाटायला लागलं, की न्यूझीलंडमध्ये माओरी भाषाच अधिक वापरतात की काय! म्हणजे तिथे माओरी लोकसंख्याच अधिक आहे की काय! म्हणजे इंग्रजीचा वापर फारसा नाहीच की काय!... आणि प्रथमच जरा पाल चुकचुकली.
आमच्या न्यूझीलंड प्रवासाच्या आधीच्या पंधरवड्यात त्यांची क्रिकेट टीम भारत दौर्‍यावर आली होती. मी हा ब्लॉग पाहिला त्याच दिवशी एक वन-डे मॅच होती. मॅच संपल्यावर रॉस टेलरचाच एक छोटा इंटरव्ह्यू दाखवला. आता तोच एक आधार उरला होता अशा थाटात मी टीव्हीचा आवाज वाढवून अगदी जिवाचे कान करून त्याचं बोलणं ऐकलं. तो काय बोलतोय यापेक्षा ते कसं बोलतोय यात मला रस होता. भाषेचे, विविध उच्चारांचे सूर, ढब, प्रमाण भाषेहून वेगळ्या दिसणार्‍या त्यातल्या छटा, हे सगळं मी तेवढ्या वेळात शोधायचा प्रयत्न केला. त्यात फारसा अर्थ नव्हता हे मलाही कळत होतं, पण याला ‘प्रवासाचा ज्वर चढणे’ असं म्हणू शकतो.
दरम्यान, थोडंफार फॉरेन एक्सचेंज वगैरे खरेदी झाली होती. सहज न्यूझीलंड डॉलरच्या त्या अपरिचित नोटा न्याहाळत होते. तर त्यावर ‘द रिझर्व बँक ऑफ न्यूझीलंड’ या इंग्रजी शब्दांखाली ‘TE PUTEA MATUA’ असे शब्द दिसले. (‘गूगल ट्रान्सलेट’कडून कळलं, की ती माओरी भाषा होती; त्याचा शब्दशः अर्थ ‘मुख्य पिशवी’ असा होता!) ते पाहून माझी खात्रीच पटली, की त्यांच्या चलनी नोटांवरही माओरी भाषा नांदते आहे त्याअर्थी तो ब्लॉग म्हणत होता ते बरोबरच होतं; न्यूझीलंडला जायचं तर माओरींशी आणि माओरीशी तोंडओळख हवीच. पण आता तेवढा वेळ हाताशी नव्हता. शेवटी अज्ञानातल्या सुखावर भिस्त ठेवून प्रवासाची सुरूवात करायची ठरवली.

मुंबई-हाँगकाँग-ऑकलंड असा लांऽबचा प्रवास... ऑकलंडच्या विमानात माझ्या शेजारच्या सीटवर एक भारतीय बाईच होती. ती गेली १५ वर्षं ऑकलंडमध्ये राहते आहे. मूळची पंजाबी, मराठी माणसाशी लग्न केलेली; आयतीच माझ्या हातात सापडली. प्रवासभर जेव्हा जमेल तेव्हा मी तिला नाना प्रश्न विचारून भंडावून सोडलं...
आमचं विमान ऑकलंडला उतरायला आलं होतं. खिडकीतून बाहेर पाहिलं तर नुकतंच उजाडत होतं; मात्र बाहेर पांढर्‍याधोप, दाऽट ढगांविना बाकी काहीही दिसत नव्हतं. विमानाची उंची कमी-कमी झाली तरी ढग मात्र हटायला तयार नव्हते. शेजारची बाई माझ्याकडे वळून म्हणाली - “न्यूझीलंडचं दुसरं नाव ‘एओटिआरोआ’, इट्स अ माओरी नेम; त्याचा अर्थ, द लँड ऑफ लाँग व्हाइट क्लाऊड”... परत एकदा माओरी आणि त्यांची भाषा पुढ्यात ठाकले होते. पण आता सलामी झडायला आलेली होती; माओरीचा अभ्यास करण्याची वेळ निघून गेली होती.
ऑकलंड एअरपोर्टवरचे वेळखाऊ सोपस्कार पार पाडले; एअरपोर्टवरच्याच खादाडीच्या एका छोट्याशा दुकानातून सँडविच आणि फळं घेतली आणि आम्ही निघालो. आता आपण आणि आपला ट्रॅव्हल-प्लॅन, बस्स, असा विचार करत एअरपोर्टच्या बाहेर पडलो. आता पुढचे १५-२० दिवस भारतीय इंग्रजीच्या साथीने किल्ला लढवला की झालं! दरम्यान माओरीशी सामना करायची वेळ आलीच, तर करायचे दोन हात...
----------
Cut to ‘Paihia, Bay of Islands’, न्यूझीलंडच्या पार उत्तरेकडचं, दक्षिण पॅसिफिक समुद्राकाठचं एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. (स्थानिक उच्चार : पाह्हीऽऽया)

maori-1.jpg

आम्ही घर सोडून छत्तीस-एक तास उलटले होते; त्यातले १८ तास तर विमानातच गेले होते; त्या दरम्यान, विमानातली शेजारची बाई म्हणाली तसं ‘टाईम की पूरी खिचडी’ झालेली होती; ३-४ तासांच्या झोपेत ती ‘खिचडी’ थोडीफार पचवून आम्ही ‘पाहिया जरा पाहूया’ म्हणून बाहेर पडलो होतो.
शांत ठिकाण; मुंबईत ऐन हिवाळ्यात असतो तितपत गारठा; नोव्हेंबर महिना म्हणजे तिथला हिवाळा संपून वसंत ऋतूची आणि पर्यटन मोसमाची नुकती चाहूल लागलेली असते. छोटंसं गाव, एकच मुख्य रस्ता, रस्त्यावर तुरळक माणसं; पर्यटकांना खुणावणारी मोजकी दुकानं; एकंदर सगळा निवांत मामला होता. रस्त्याच्या एका बाजूला समांतर समुद्रकिनारा, विरुद्ध बाजूला सुंदर घरं, बागा; मध्येच एखादी शाळा नाहीतर चर्च; मग दुकानं... या सगळ्यात आम्हाला जे हवं होतं ते दिसलं - तिथलं व्हिजिटर सेंटर.

maori-2.jpg

न्यूझीलंडमध्ये देशभरात सर्व प्रमुख पर्यटनस्थळांवर I-Site Visitor Centres दिसतात. पर्यटकांसाठीची ही त्यांची अधिकृत सुविधा आहे. प्रत्येक ठिकाणच्या सेंटरमध्ये स्थानिक मंडळी काम करतात. तिथे जाऊन ‘इथे पब्लिक टॉयलेट्स कुठे आहेत?’ किंवा ‘चांगली फळं कुठे मिळतील, हो?’ अशी कुठलीतरी चौकशी करा, नाहीतर ‘दोन दिवस भटकायचं आहे, बुकिंग्ज हवी आहेत.’ किंवा ‘रात्री दहाचं विमान आहे; एअरपोर्ट ड्रॉप हवा आहे’ असं सांगा; तिथे तुम्हाला हमखास मदत मिळते. ऑकलंड एअरपोर्टवरच आम्हाला त्याची प्रचिती आलेली होती. एअरपोर्टवर आम्ही जिथे सँडविच आणि फळं घेतली त्याच्या शेजारीच आय-साईटचं एक छोटंसं सेंटर होतं. ऑकलंड सिटीत जायला बस बरी पडेल की टॅक्सी, बसचं तिकीट कुठे मिळेल, ऑनलाईन तिकीट इथेच मिळेल का, सिटीतून पाहियाला जायची बस कुठे पकडू, अशा प्रश्नांच्या आधारे घरंगळत घरंगळत, २ तिकिटं आणि २-४ छापिल नकाशे हातात घेऊन, आधी एका बसनं ऑकलंड सिटी आणि तिथून दुसर्‍या बसनं पाहिया, असा आमच्या ‘आईसब्रेकिंग’चा पहिला टप्पा पार पडलेला होता. चौकशीसाठी पहिल्या काऊंटरला जावं आणि तिथेच आख्खं काम उरकून बाहेर पडावं याची आपल्याला मुळी वट्टात सवयच नसते. त्या पार्श्वभूमीवर हे म्हणजे अतीच झालं. त्यामुळे आता पाहियातही आमचे पाय आय-साईटकडे वळणे साहजिक होतं.
तिथे गेल्या गेल्या “हिलोऽ गाईऽज...”नं आमचं स्वागत झालं. (हिलो - hello चा किवी उच्चार) पुढचे ३ आठवडे न्यूझीलंडमध्ये आम्ही ‘गाईज’च होतो. चाळीशी-पन्नाशीतल्या जोडप्याला असं ‘गाईज’ म्हणवून घेताना काय गोऽड वाटतं म्हणून सांगू! खोटं कशाला बोलू! (पुढे क्वीन्सटाऊनमध्ये तर एकानं ‘आर यू गाईज मॅरीड?’ असाही प्रश्न टाकला. त्यावर काय प्रतिक्रिया द्यायला हवी होती हे अजूनही आमचं ठरत नाहीये!) तर, काऊंटरपलिकडच्या त्या माणसाला उत्तरादाखल आम्ही आमच्या स्वकष्टार्जित ट्रॅव्हल प्लॅनमध्ये पाहियाच्या रकान्यात जे जे टाकलं होतं, त्याचा पाढा वाचून दाखवला. त्यातली प्रत्येक गोष्ट त्याच्या दृष्टीने एकेका फोनकॉलच्या अंतरावर होती. त्यानं आमची नावं विचारून घेतली, आम्ही कुठून आलोय हे विचारून घेतलं; आणि मग झाला सुरू... होल इन द रॉक क्रूझला जायचंय, हा नंबर डायल कर; पॅरासेलिंग करायचंय, त्याला फोन कर... “हिलो, धिस इज ख्रिस फ्रम आय-साइट... I have two persons फ्रम India, they wish to... No, they are a couple... येह, शुअ, थँक्स” करत ५-७ मिनिटांत त्यानं पुढल्या दोन दिवसांतला आमचा कार्यक्रम आम्हाला हवा होता तसा मार्गी लावून दिला.
आमच्या हॉटेलपासून दोन-अडीच किमी अंतरावर तिथलं सुप्रसिद्ध ‘Waitangi Treaty Grounds’ हे ठिकाण होतं. तिथे फिरत फिरत जायचं असं आम्ही आधीच ठरवलेलं होतं. त्यामुळे ख्रिसनं त्याबद्दल विचारल्यावर आम्ही त्याला ‘चालतच जाणार, गाडी नको’ वगैरे सांगून टाकलं. त्यावर त्यानं ‘एक सुचवू का...’ म्हणत त्या ठिकाणी होणार्‍या माओरी शोबद्दल, नंतरच्या पारंपरिक माओरी डिनरबद्दल सांगितलं. ‘हा शो सध्या फक्त सोमवारी आणि गुरूवारी असतो, उद्या सोमवार आहे, तुम्हाला हवं तर मी बुकिंग करून देऊ शकतो,’ म्हणाला. आमच्या प्लॅनमध्ये पुढे ‘रोटोरुआ’च्या (Rotorua) रकान्यात या दोन्ही गोष्टी होत्या; पाहियातून आम्ही रोटोरुआलाच जाणार होतो. तरी, आम्ही क्षणभर विचार केला आणि त्याला ‘हो’ म्हणून टाकलं. प्लॅनिंग करताना, असे रकाने भरतानाच आमच्या डोक्यात होतं, की हे केवळ एक जनरल माहिती म्हणून सोबत ठेवायचं; ऐनवेळी यात बदल करावेसे वाटले तर करायचे. आखीव सहलकार्यक्रमाचं जोखड मानेवर नको, थोडी स्पॉन्टेनिटी हवी, म्हणून तर सगळी स्वतःची स्वतः आखणी केलेली; ती इच्छा अशी पहिल्याच दिवशी पुरी होणार असेल तर कोण ती संधी सोडेल! (रोटोरुआच्या रकान्यातला तो टाइम-स्लॉट रिकामा झाल्यामुळे पुढे तिथे गेल्यावर आम्हाला ध्यानीमनी नसताना एक निवांत आणि भारी जंगल-वॉक करता आला.)

अशा तर्‍हेनं पंधरा-एक मिनिटांनी ‘I-site Visitor Centre’ला मनोमन ‘Like’ करत, ख्रिसच्या ‘Enjoy your stay in Paihia, Guys...’चं मोरपीस अंगावर फिरवत आम्ही तिथून बाहेर पडलो. ख्रिसनं अशी निरोपाची भाषा केली असली तरी पुढच्या दोन दिवसांत मी काही ना काही कारणं काढून तिथे जाणार होते; तिथल्या लोकांना हे ना ते प्रश्न, माहिती विचारून त्यांच्या मदत करण्याच्या क्षमतेची एका परिनं परिक्षाच घेणार होते; आणि पाहियाचा प्रत्यक्ष निरोप घेतेवेळी ‘Like I-site’वरून ‘बदाम I-site’वर शिफ्ट होणार होते.
दुसरा आख्खा दिवस मोकळाच होता. त्यामुळे सकाळी आरामात आवरून आम्ही समुद्राच्या कडेकडेनं रमतगमत चालत, फोटो काढत, दक्षिण गोलार्धातलं सुखद ऊन खात, पॅसिफिक वार्‍याचे घोट घेत आणि एक डोळा फोनमधल्या गूगल-मॅप्सवर ठेवत वायटँगी ट्रीटी ग्राऊंड्सचा रस्ता पकडला. (संध्याकाळ होईतो या ‘सुखद’ उन्हाचा असा काही तडाखा बसला, की दुसर्‍या दिवशी सकाळी आधी ‘सनस्क्रीन लोशन घ्यायचं आहे, Is there any super-market around?’ - असा प्रश्न घेऊन मला आय-साइटमध्ये शिरायचं निमित्त मिळालं.)

maori-3.jpg

वाटेत काही अंतरापर्यंत छोट्या-छोट्या ईटरीज, आईसक्रीम शॉप्स, सूवनीर शॉप्स दिसत राहिली. एका ईटरीच्या काऊंटरपलिकडच्या दोघांकडे माझं सहज लक्ष गेलं. तर त्यांची चेहरेपट्टी साधारण भारतीय, पंजाबी वाटली. मग उगीचच त्यांच्या मागच्या मोठ्या मेनू-डिस्प्लेकडे बघितलं गेलं; जणू तिथे मला चना-भटुरा, पुलाव वगैरे शब्दच दिसणार होते. पुढच्या एका ईटरीतही काऊंटरपलिकडच्या दोघांच्या चेहर्‍यांकडे अपेक्षेनं पाहिलं गेलं; रंग भारतीय होता, मात्र चेहरेपट्टी भारतीय नव्हती; पण किवी-युरोपीय गोरी अशीही नव्हती. आणि अचानक माझी ट्यूब पेटली - ते दोघं, एक पुरूष-एक स्त्री, माओरी होते! मग जाणवलं, ऑकलंड-पाहिया बसमध्ये आमच्या पुढच्या सीटवर एक कॉलेजवयीन मुलगा होता, तो माओरीच होता! त्यानं कानांना लावलेले मोठाले हेडफोन्सच लक्षात राहिलेले होते; पण त्याच्या चेहरेपट्टीची नोंद मनोमन घेतली गेली होती. त्याआधी, ऑकलंड स्काय-सिटी टर्मिनलला पाहियाच्या बसचं तिकीट काढलं तिथली क्लार्क मुलगीही अशीच, म्हणजे माओरी, होती! आणखी मागे जाऊन, ऑकलंड एअरपोर्टवर आम्ही सँडविच-फळं घेतली ती विक्रेतीही माओरी होती! न्यूझीलंडचे आदिवासी न्यूझीलंडमध्ये पाय ठेवल्यापासूनच असे अधूनमधून समोर आलेले होते; आणि ते अजिबात आदिवासी वाटलेले नव्हते.

ज्ञानवृद्धीच्या आनंदात पुढचं काही अंतर काटलं. आता जरा चढाचा रस्ता सुरू झाला. दुकानं संपली; वस्ती जरा विरळ झाली; डाव्या हाताला एक लहानसा डोंगरकडा सुरू झाला. उजव्या हाताला समुद्र होताच. चढाचा रस्ता असल्यामुळे रस्ता आणि समुद्रकिनारा यांच्यामध्ये रेलिंग लावलेलं होतं. आणि रेलिंगवर थोड्या थोड्या अंतरावर त्या प्रदेशात आढळणार्‍या विविध पक्ष्यांची माहिती देणारे छोटे छोटे फलक लावलेले होते. प्रत्येक फलकावर त्या पक्ष्याचा फोटो, एकीकडे इंग्रजी नाव, दुसरीकडे माओरी नाव, इंग्रजी नावाखाली इंग्रजीतून माहिती, माओरी नावाखाली माओरी भाषेतली माहिती लिहिलेली होती. माओरी भाषेची लिपी रोमनच असल्यामुळे आपसूक त्यातल्या शब्दांचा उच्चार करण्याचा प्रयत्न होत होता आणि ते उच्चार भलतेच असल्याचं जाणवत होतं.
रेलिंगच्या कडेकडेने आणखी ५-१० मिनिटं चालल्यावर आम्ही त्या ट्रीटी ग्राऊंड्सच्या परिसरात शिरलो. १९व्या शतकात ब्रिटिश वसाहतवादी आणि स्थानिक माओरी नेते यांच्यातल्या करारावर (Treaty of Waitangi) इथे सह्या झाल्या, असं इतिहास सांगतो.
आम्ही त्या परिसरातले दिशादर्शक फॉलो करत रिसेप्शनपाशी पोहोचलो. तर तिथल्या दाराच्या बाहेर दोन्ही बाजूंना एक तरूण स्त्री आणि एक तरूण पुरूष एकदम रंगीबेरंगी, चित्रविचित्र पोषाख घालून उभे होते; त्यांच्या अंगावरचे कपडे लौकिकार्थाने ‘कमी’ या कॅटेगरीतलेच होते. त्यांच्या हातांत प्रॉप्स होते; फूट-दीड फूट लांबीची दोरी आणि त्याला पुढे बांधलेला गोळा; ते स्वतःच्या चेहर्‍यांसमोर ते प्रॉप्स इंग्रजी आठाच्या आकड्यात फिरवत होते आणि आपांपसांत हळू आवाजात अनाकलनीय भाषेत बोलत होते. त्यांच्या दंडांवर, मांड्यांवर, मानेवर, गालावर नाहीतर कानामागे जागा मिळेल तिथे मोठाले पण कलात्मक टॅटूज होते. त्या मुलीने काळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली; मुलाच्या डोळ्यांभोवती रंगरंगोटी केलेली; त्यांच्या कमरेला, गळ्यांत, हातांत माळा, झिरमिळ्या, वगैरे... ‘हां! याला म्हणतात आदिवासी!’ ही पहिली तत्पर प्रतिक्रिया झाली. त्यांचं तिथे तसं उभं राहण्यामागेही तोच उद्देश असावा; कदाचित पर्यटन व्यवसायाची काही गणितंही असावीत. मला त्यांचं बारकाईने निरिक्षण करत तिथेच थांबण्याचा एक क्षण मोह झाला; पण का कोण जाणे, परग्रहावरचा प्राणी पाहिल्याच्या नजरेनं त्यांना न्याहाळायचं, फोटो काढायचे, हे काही मला बरं वाटेना. त्यामुळे दोघांकडे एकदा नजर टाकून आम्ही पुढे झालो.

ट्रीटी ग्राऊंड्सच्या परिसरात फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय होते. २ तासांचा पास, फक्त म्युझियम, आख्ख्या दिवसाचा पास... आम्ही संध्याकाळच्या शोचं बुकिंग केलेलं असल्यामुळे आम्हाला डे पासचा पर्याय निवडण्याबद्दल सुचवलं गेलं. काऊंटरवरच्या तरूणाने त्याच्या पुढ्यातल्या कॉम्प्युटरवर काहीतरी खाडखुड-खाडखुड केलं आणि आमचे दोन पासेस आम्हाला काढून दिले. त्या पासेसवर आम्ही त्या परिसरात दोन वेळा प्रवेश करू शकणार होतो. तो कॉम्प्युटरवाला मुलगाही अर्थातच माओरी होता, पण शहरी वेषातला. बाहेरच्या दोघांपेक्षा आता तो उगीचच जरा परिचितासारखा वाटायला लागला. पासेस घेऊन आम्ही दर्शवलेल्या मार्गाने काही पावलं गेलो ते थेट ‘Te Kongahu Museum of Waitangi’च्या दारातच.
पाहियाचा रकाना भरताना हे म्युझियम आम्ही विचारात घेतलेलं नव्हतं. पण आता त्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली होती. त्यामुळे त्याला अव्हेरून पुढे जाणे शक्यच नव्हतं. आधुनिक म्युझियम्स इंटरअ‍ॅक्टिव मल्टिमिडिया वगैरेंनी युक्त असतात असं ऐकलं होतं. त्या प्रकारचं मी पाहिलेलं हे पहिलंच म्युझियम. माओरींचा समग्र इतिहास, टाईमलाईन, पुरातन नकाशे; आपल्या भूभागाकडे ठेवा म्हणून पाहण्याची माओरींची परंपरा, त्याविरुद्ध भूभागाचा उपयोग व्यापारासाठी करण्याचा ब्रिटिशांचा रिवाज, या मुद्द्यावरूनच माओरींना something is not right ची कुणकुण लागली; माओरींची विविध आयुधं, वाद्यं; त्या-त्या ठिकाणी दिलेली बटणं दाबली की त्या-त्या वाद्यांचा अगदी खरा वाटणारा आवाज येत होता, जणू आपल्या मागे एखादा बाहेरच्या त्या दोघांसारख्या अवतारातला माओरी उभा राहून ते वाद्य फुंकतोय, छेडतोय नाहीतर धोपटतोय; हे सारं बघत बघत एका अंधार्‍या दालनातून दुसर्‍या अंधार्‍या दालनात जायचं; ज्यांना इतिहासाचा तळ शोधायचाय त्यांनी ते करावं; माहिती वाचावी; पुरातन नेत्यांचे फोटो बघावेत; त्यांचे कोट्स वाचावेत… काही टचस्क्रीन्स होते, तिथे विविध मेनू होते; ते नॅव्हिगेट करत गेलं की दक्षिण पॅसिफिकचा गेल्या काही शतकांचा धांडोळा समोर उलगडत होता. एका दालनात एक आख्खी भिंत व्यापलेला मोठा स्क्रीन होता; स्क्रीनच्या पुढ्यात टेकायला काही ठोकळे, मोडे, बाक; स्क्रीनवर १२-१५ मिनिटांची फिल्म सतत दाखवत होते. मी लक्ष ठेवून फिल्मची सुरूवात पकडली आणि तिथे बसून ती संपूर्ण फिल्म पाहिली. ब्रिटिशांचं जगाच्या या कोपर्‍याकडे कसं लक्ष गेलं, त्यांनी त्याचं महत्व कसं हेरलं; माओरींशी आधी संवाद, मग व्यापार आणि मग करार; काही माओरी नेत्यांना अंधारात ठेवलं गेलं, काहींची मुस्कटदाबी केली गेली. ब्रिटिशांचा लौकिक पाहता त्यात काही वेगळं नव्हतं, तरी ते पाहताना अस्वस्थ वाटलंच. मग एका निसर्गविषयक विभागात शिरले. त्या भूभागात आढळणार्‍या वनस्पती, प्राणी, पक्षी, तशीच बटणं दाबून त्यांचे आवाज, त्यांच्या अधिवासाची मॉडेल्स, माओरींचं त्यांच्याशी असलेलं अतूट नातं... एक मजली म्युझियम, सबकुछ माओरीकेंद्री.

म्युझियममध्ये तास-दीड तास घालवून बाहेर पडलो; पुन्हा एक दिशादर्शक दिसला. त्याचं ऐकायचं ठरवलं, तर त्यानं आम्हाला थेट तिथल्या सूवनीर शॉपमध्ये आणून सोडलं. खरेदीची इच्छा आणि योजना दोन्ही नव्हतं, त्यामुळे तिथे नुसता एक फेरफटका मारला. तरी त्यातल्या त्यात लाकडी कोरीव कामाच्या वस्तूंच्या रॅकसमोर मी थोडी रेंगाळलेच. शॉपवाल्या माओरी मुलीनं लगेच ‘मागे एक वूड कार्विंग स्टुडिओ असल्याची’ माहिती पुरवली. आम्हीही लगेच तिकडे वळलो.
न्यूझीलंडच्या जंगलांत आढळणारे महाकाय वृक्ष लाकडी कोरीव कामासाठी आदर्श मानले जातात; तिथल्या समुद्रकिनार्‍यांवर नैसर्गिकरीत्या सापडणार्‍या ग्रीनस्टोनपासून पुरातन काळातली कोरीव कामासाठीची हत्यारं बनवली गेली. कोरीव काम केलेले खांब, तुळया, घराचे बाह्य भाग, मुखवटे; पुन्हा यातल्या प्रत्येक कोरीव कामाला काहीतरी अर्थ होता. स्थानिक माओरींपैकी काहीजण आजही या कलेची जोपासना करत आहेत. (पुढे रोटोरुआत एक मोठा वूड-कार्विंग-स्टुडिओ-कम-कॉलेज पहायला मिळालं.) वायटँगीच्या स्टुडिओत दोघं आडदांड माओरी काम करत होते. आम्ही तिथे गेल्यावर त्यांनी काम थांबवून आमच्याशी बोलायला सुरूवात केली. वूड-ग्रेन, ते कसे ओळखायचे, त्यानुसार लाकडाच्या रंगांमध्ये कसा फरक पडतो, लाकूड तासण्याची दिशा का आणि कशी महत्त्वाची… एकानं त्यांचं टूल-किट उलगडून दाखवलं, त्यात २०-२५ प्रकारच्या पटाशाच होत्या. ‘यातली नेमकी कोणती पटाशी कशासाठी लागणार हे तुम्हाला कसं कळतं?’ असा एक मठ्ठ प्रश्न मी माझ्या सुदैवाने ऐनवेळी फिरवून जरा चतुराईनं विचारला. त्यानंही मग त्यांचं थोडंफार क्लासिफिकेशन समजावून सांगितलं.

maori-4.jpgmaori-5.jpg

आमचं १०-२० टक्के लक्ष त्यांच्या उच्चारांना ग्रहण करण्याकडे होतं. किवी इंग्रजीला अजून कान रुळलेले नव्हते; त्यात माओरी ढब आणखी जराशी वेगळी पडते; त्यांतल्या एकाला ते जाणवलं की काय कोण जाणे; अचानक थांबून त्याने Am I talking fast? असं विचारलं. त्यावर आम्ही ‘तू बोल रे, फास्ट की स्लो त्याची चिंता करू नकोस, जे सांगतोयस ते भारी आहे; ठरवून स्लो बोलायला लागलास तरच व्यत्यय येईल, जे आम्हाला नकोय, त्यामुळे लगे रहो’ हे सगळं सांगणारे चेहरे करून त्याच्याकडे नुसतं नकारार्थी मान हलवत हसून पाहिलं. हा प्रश्न तो तिथे येणार्‍या सर्वच अ-इंग्लिश पर्यटकांना विचारत असणार आणि ते सगळेच त्या आपुलकीने खूष होत असणार.
दोघांशी १५-२० मिनिटं गप्पा मारून आम्ही निघालो. नाकासमोरच्या चढाच्या पायवाटेने जात जात प्रत्यक्ष ट्रीटी ग्राऊंड्सवर पोहोचलो.

maori-19.jpg

विस्तीर्ण हिरवंगार राखलेलं मैदान; परिसरात चिटपाखरूही नव्हतं. एका बाजूला खाली समुद्र दिसत होता. दुसऱ्या बाजूला जुन्या इंग्रजी पद्धतीचं एक मोठं घर होतं. पण त्यापेक्षा लांबवर दिसणाऱ्या आणखी एका घरानं आम्हाला खुणावलं. ते होतं पारंपरिक माओरी घर. तिथे गेलो; घराला दार नव्हतं, तिथे राखणीला कुणी नव्हतं, आत डोकावून पाहिलं तर काही बाक, बाकांसमोर सादरीकरणासाठी वाटणारी मोकळी जागा; संध्याकाळचा शो इथे होत असणार याचा अंदाज आला.

maori-6.jpg

समुद्र, हिरवंगार मैदान, घसघशीत मोठी स्थानिक झाडं, किलबिलणारे पक्षी; बराच वेळ तिथे फिरलो; पाय निघत नव्हता. पण जेवणाची वेळ होत आली होती आणि आसपास त्याची काही सोय दिसलेली नव्हती.
मैदानातून निघणारी आणखी एक पायवाट दिसत होती. कडेला To Ceremonial War Canoe असं लिहिलेलं होतं. खाली लगेच त्याचं माओरी भाषांतर. सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीच्या बरोबरीने माओरी भाषेचा वापर दिसत होता खरा; पण त्या ब्लॉगवर लिहिलं होतं तशीही काही परिस्थिती आतापर्यंत वाटली नव्हती.

maori-7.jpg

ती War Canoe म्हणजे अबब प्रकरण निघालं! एक ३०-४० फुटी लांब लाकडी बोट, संपूर्ण लाकडी, सुरेख कोरीव काम केलेली, तिथे एका खुल्या शेडखाली उभी केलेली होती. ट्रीटी ग्राऊंड्सच्या तुलनेत हे ठिकाण खाली होतं; जवळपास समुद्रकिनार्‍यावरच. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात वायटँगी ट्रीटी दिन साजरा होतो. तेव्हा ती बोट पाण्यात ढकलली जाते. पारंपरिक माओरी वेषातले लोक तेव्हा ती बोट वल्हवतात.

maori-8.jpg

3०च्या दशकात कधीतरी या बोटीसाठी ३ महाकाय ‘काऊरी’ (Kauri) वृक्ष पाडण्यात आले असं तिथल्या छोट्याशा माहितीफलकावर लिहिलेलं होतं. तशाच आणखी एका अंदाजे ८०० वर्षं पुरातन वृक्षाच्या खोडाचा साधारण २ फूट उंचीचा स्लाईस त्या माहितीफलकामागे ठेवलेला होता. त्या महाकाय वृक्षांची काया किती महा असावी ते त्या स्लाईसवरून लक्षात येत होतं.

maori-9.jpg

आपले दोन्ही हात पसरले तरी त्याचा व्यास त्याला पुरून उरणारा होता. बोटीसाठी ३ वृक्ष पाडण्यात आले हे वाचल्यावर आधी जरा विषाद वाटला होता; पण त्यांच्या खोडाची ती ‘स्टँडर्ड साईझ’ पाहून वाटलं की तिथल्या जंगलातली तशी ३ झाडं म्हणजे दर्या में खसखस! तेवढीच जरा इतर १००-२०० वर्षांच्या झाडांना खेळायला जागा मिळाली असेल... त्या ८०० वर्षं जुन्या खोडाला स्पर्श करताना जे वाटलं ते मात्र शब्दांत नाही सांगता येणार!

----------

Cut to दुसर्‍या दिवशीचे संध्याकाळचे ७:००; माओरी शोसाठी आलेले सगळे म्युझियमनजीकच्या एका बागेत जमले होते. बागेलगत एक रेस्टॉरंट होतं. अजूनही स्वच्छ उजेड होता. मात्र हवेतला गारठा चांगलाच वाढला होता. आमच्यासारखे थंडीची विशेष सवय नसणारे लपेटून, गुरफटून बसले होते. तीच हवा इतर काही जणांसाठी beautiful, warm weather होती! एकीकडे शोच्या यजमानांची लगबग सुरू होती. पूर्ण काळ्या शहरी पोशाखांतले २० ते ३० वयोगटातले काही माओरी पुरुष, त्यांतल्या एकाने बोलायला सुरुवात केली. पुरातन काळी माओरी टोळ्या पाहुण्या टोळ्यांचं स्वागत ज्या पद्धतीने करत त्याच पद्धतीने पर्यटकांच्या टोळीचं स्वागत होणार होतं. आणि मग वर माओरी हाऊसमध्ये प्रत्यक्ष शो होणार होता. त्यानंतर Hangi, म्हणजे पारंपरिक माओरी जेवण आणि मग टाटा-बाय बाय, असा एकूण तीन तासांचा ऐसपैस कार्यक्रम होता. आम्ही बसलो होतो तिथेच एका कोपऱ्यात त्या ‘हांगी’ची तयारी सुरू होती.
हे हांगी म्हणजे आपल्याकडच्या पोपटीचं किवी भावंडं म्हणता येईल. जमिनीत मोठे खड्डे केलेले; भट्टीत सणकून तापवलेले दगड त्या खड्ड्याच्या तळाशी ठेवायचे; खड्ड्याच्या तोंडाशी स्टीलच्या जाळीची मोठी बास्केट, बास्केटमध्ये भाज्यांचे, मांसाचे तुकडे, ते आधी मोठ्या पानांनी झाकायचे, आणि त्यावरून कापडाचं आच्छादन; दगडांच्या उष्णतेने भाज्या, मांस शिजतात; मग त्यावर खास हांगी सीझनिंग घालून खायचं; असा तो साधारण प्रकार. आम्ही तिथे जमलो तेव्हा शिजण्यापर्यंतची प्रक्रिया पार पडलेली होती. आमच्यासमोर त्यांनी ती बास्केट बाहेर काढली.

maori-10.jpgmaori-11.jpg

मुरत मुरत शिजलेल्या अन्नाचा मस्त खमंग वास येत होता. त्यांनी त्याचे नमुने काहीजणांना चाखायला दिले. मी भाज्यांमधला एक तुकडा उचलून तोंडात टाकला, तर तो नेमका लाल भोपळा निघाला! अगदी ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ सिच्युएशन! पण त्याचा अर्थ इतर सर्व चवी त्याहून फर्मास असणार होत्या!! रात्री मस्त गारठ्यात ते जेवण जेवायला मजा येणार होती.

आता पारंपरिक स्वागत आणि शो. आदल्या दिवशी आम्ही कोरीव कामाच्या स्टुडिओपासून जो चढाचा रस्ता पकडला होता तिथूनच जायचं होतं. पर्यटकांच्या ‘टोळी’तून लीडर्स म्हणून तीन Volunteers निवडले गेले. प्रास्ताविक करणारा शहरी माओरी आमच्यासोबत चालत होता; आम्हाला माहिती सांगत होता. माओरी टोळ्या विरुद्ध टोळीच्या नेत्यांना आधी जोखून घेत. समोरची टोळी युद्ध करणार की मैत्री हे ओळखण्याची त्यांची एक पद्धत होती. ते तिथल्या स्थानिक नेच्याची (Fern) एक डहाळी खुल्या जागेत विरुद्ध टोळीच्या नेत्याच्या पुढ्यात ठेवत. ही टोळी मैत्रीभावनेनं आलेली असेल तर टोळीचा नेता माओरी नेत्याच्या नजरेला नजर भिडवत पुढे जाऊन ती डहाळी उचले आणि माओरी नेत्याच्या हातात देई. असं तीन टप्प्यावर तीन वेळा झालं की मैत्रीची खात्री पटे. हे तीन टप्पे पार पाडत आम्हाला त्या माओरी हाऊसपर्यंत जायचं होतं. हा साधारण त्या माहितीचा सारांश.

गर्द झाडीतून जाणारी वाट होती. वाटेत ठिकठिकाणी माओरी टोळ्यांमधली माणसं उभी होती; सर्वांचे पेहराव आदल्या दिवशी सकाळी दिसलेल्या त्या दोघांसारखे ‘खर्रेखुर्रे आदिवासी’. कुठूनतरी एका स्त्रीचं खड्या, खणखणीत आवाजातलं माओरी भाषेतलं गाणं ऐकू आलं. ती कुठून गातेय हे शोधायला मान आवाजाच्या दिशेला वळवली तर विरुद्ध दिशेच्या झाडीतून मोठा आवाज, चित्कार करत एक माओरी अचानक उडी मारून पुढ्यात आला. दचकायलाच झालं. त्याच्या हातात भाल्यासारखं शस्त्र होतं; वटारलेले डोळे, चेहऱ्यावर उग्र भाव, आ वासून जीभ पूर्ण बाहेर काढलेली, मधेच तो फुत्कार टाकत होता; गळ्याच्या शिरा ताणून माओरी भाषेत जोरजोरात काहीतरी बोलत होता; एकंदर अक्राळविक्राळ अवतार! (यांना फुफ्फुसाचे, हृदयाचे विकार कधी होत नसणार.)

maori-12.jpg

न्यूझीलंडच्या रग्बी टीमचा मॅच सुरू होण्यापूर्वीचा ‘हाका’ डान्स कुणी पाहिला असेल तर त्यावरून याची थोडीफार कल्पना येईल. समोरच्याला आव्हान देणे हा त्यामागचा उद्देश. रग्बी टीममधले अ-माओरी खेळाडूही त्याच त्वेषानं ‘हाका’ करताना दिसतात. समोरच्या टीमनं तेवढा वेळ त्यांच्या नजरेला नजर देत उभं राहायचं. क्रिकेट टीममध्ये रॉस टेलर बिचारा एकटाच माओरी; शिवाय तो एक नेमस्त खेळाडू म्हणूनच आपल्याला माहिती आहे. तो हे असं जिभा वगैरे बाहेर काढून डेल स्टेनसारख्यांना आव्हान देईल ही अशक्यकोटीतली बाब वाटते. असो. मुद्दा असा, की गुजराथी माणूस जसा जन्माला येतानाच गरबा शिकून येतो तसेच हे माओरी लोक आक्रमकपणा सोबत घेऊनच जन्माला येतात की काय असं वाटायला लावणारी दृश्यं होती ती.

maori-13.jpg

तर अशी तीन टप्प्यावर तीन गाणी ऐकत, तीन वेळा दचकत, नेच्याच्या तीन फांद्या उचलत, आमचे ‘लीडर्स’ पुढे आणि आम्ही त्यांच्या मागे मागे असे त्या माओरी हाऊसपाशी पोहोचलो. आम्हाला वाटेत दिसलेले माओरी वेगळ्या वाटेने आमच्या आधी तिथे पोहोचलेले होते. तिथे त्यांच्यातला मुख्य नेता उभा होता. हाऽ असा अगडबंब देहाचा, उग्र! आता हा आणखी कोणतं तांडवनृत्य करणार असा प्रश्न पडला; तर तो चक्क स्वच्छ इंग्रजीत बोलायला लागला. एकदम ‘हुश्श’ वाटून ‘कोई मिल गया’मधला बालबुद्धी हृतिक रोशन हसतो तसं हसावंसं वाटलं. भाषा हा जवळीक साधण्याचा किती हुकुमी मार्ग असतो!

पर्यटकांच्या टोळीने पात्रता फेरी पार पाडली होती, मैत्रीसाठी हात पुढे केला होता. आमच्या तीनही लीडर्सना त्या अगडबंबानं जवळ बोलावलं आणि खास माओरी पद्धतीनं एकेकाच्या कपाळाला आपलं कपाळ टेकवून डोळे मिटून वंदन केलं. (न्यूझीलंड टुरिझमसंबंधीच्या अनेक वेबसाइट्सवर या कृतीचा फोटो दिसतो.) त्यांच्या आधीच्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर ही कृती इतकी शांतावणारी होती की विचारायची सोय नाही! केवळ त्या कृतीसाठी तरी आपण volunteering करायला हवं होतं असं मला फार वाटून गेलं.

maori-14.jpg

आम्हाला सर्वांना त्यानं आत बोलावलं; बाकांवर बसायला सांगितलं. मग माओरी परंपरा, चालीरीती, लोकजीवन, परस्परव्यवहार यांच्याबद्दल माहिती देत देत त्यांचा नृत्याधारित शो सुरु झाला. ते सादरीकरण वेगवान आणि गुंगवून ठेवणारं होतं. त्यात तालबद्धता होती; लय होती; रौद्रता होती; प्रचंड आवाजी ऊर्जा होती. (आवाज त्या कलाकारांचेच.) शोचं व्हिडीओ शूटिंग करायला मनाई होती. मी सुरुवातीला काही फोटो काढले आणि मग निमूटपणे कॅमेरा ठेवून दिला. फोटो काढण्याच्या नादात त्या ऊर्जेला दुर्लक्षित करणं म्हणजे कर्मदरिद्रीपणा ठरला असता.

maori-15.jpgmaori-16.jpg

शो साधारण अर्ध्या तासाचा होता. तो संपल्यावर सगळे बाहेर आलो. आता त्या कलाकारांसोबत बातचीत करायला, फोटोसेशनला वगैरे थोडा वेळ बहाल केला गेला. त्यांच्या नृत्यादरम्यानची स्त्री-कलाकारांची एक विशिष्ट कृती मला लक्षवेधी वाटली होती. पुरुष कलाकार ती कृती करताना दिसले नव्हते. त्याबद्दल मी त्यांच्यातल्या एकीशी जाऊन बोलले; त्या कृतीचा अर्थ विचारला. तिनं अगदी खड्या, खणखणीत माओरी इंग्रजीत त्याचं उत्तर दिलं. आमच्या न्यूझीलंडमधल्या ‘आईसब्रेकिंग’ची ती सांगता होती.

Ceremonial Canoe च्या वाटेनंच परत खाली उतरलो आणि रेस्टॉरंटमध्ये जमलो. टेबलं डेकोरेट केली गेली होती – नेच्याच्या नाजूक फांद्यांची नागमोडी वेलबुट्टी, जोडीला तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरचे दगडगोटे आणि छोट्या छोट्या पणत्या/मेणबत्त्या. एकीकडे बुफे जेवण तयार होतं. परक्या देशातलं, परक्या संस्कृतीतलं जेवण; सर्वच पदार्थांची, सीझनिंगची चव अगदी सौम्य, तेल-तिखटाचा मागमूस नाही; पण स्मोकी स्वाद अप्रतिम होता.

maori-17.jpgmaori-18.jpg

जेवण उरकलं तोवर १० वाजत आलेले होते. दिवसभराच्या भटकंतीने दमायला झालं होतं. आदल्या दिवशी ख्रिसनं ‘माझं ऐका, रात्री मी एक टॅक्सी सांगून ठेवतो, ती १० वाजता तिथे येईल, १० मिनिटं तिथे थांबेल, तोवर शो संपला तर त्या टॅक्सीनं या, नाहीतर मग चालत या’ असं सुचवलं होतं. त्यानुसार ती टॅक्सी बाहेर उभी होती. प्रास्ताविक करणाऱ्या माओरी माणसानंच आम्हाला ते येऊन सांगितलं. या लोकांचं नेटवर्क भारीच होतं एकदम. त्याला थँक्स म्हटलं आणि टॅक्सीत बसलो, तर स्टीअरिंगवर एक काकू होत्या! त्यांना साडेदहा वाजता एका ‘फियामिली’ला एअरपोर्टवर सोडायला जायचं होतं. ‘शो वेळेवर संपला ते बरं झालं, नाहीतर मी निघालेच होते,’ म्हणाल्या. काकूंनी जी झूम टॅक्सी मारली, ते आम्ही ५ मिनिटांत आमच्या हॉटेलच्या दारात पोहोचलो. टॅक्सीचं भाडं चुकतं केलं, काकूंना थँक्स म्हटलं. काकू तशाच झूम निघून गेल्या.

पुढे Hokitika मध्ये आम्हाला अशाच आणखी एक झूम गाडी चालवणाऱ्या भन्नाट काकू भेटणार होत्या… मस्त गप्पीष्ट होत्या त्या; रंगरूपाने गोर्‍या किवीच दिसत होत्या. पण गप्पांच्या ओघात कळलं, की त्यांच्या नजीकच्या पूर्वजांमध्ये काहीतरी माओरी लिंक होती. पण काकूंना जुजबी माओरीच तेवढं समजत होतं. त्यांची चिल्लीपिल्ली नातवंडं मात्र इंग्रजीबरोबरच अस्खलित माओरी बोलणारी होती. ते कसं काय? तर आता तिथल्या शाळांमध्ये रीतसर माओरी भाषाशिक्षणाचा अंतर्भाव केला गेला आहे. वायटँगी ट्रीटीपश्चात हळूहळू अडगळीत ढकलली गेलेली ही भाषा आधुनिक युगात आता परत दिमाखाने मिरवते आहे. पण हे सांगत असताना ‘आमच्यावेळी असं नव्हतं...’ हा काकूंच्या बोलण्यातला सूर लपला नाही. ‘जगभरातल्या जवळपास लोप पावलेल्या, मात्र यशस्वीरीत्या पुनरुज्जीवित केल्या गेलेल्या काही निवडक भाषांपैकी एक माओरी आहे’ असं त्यांनी सांगितलं. सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीच्या बरोबरीने माओरी का दिसत होती त्याचं कारण तेव्हा आमच्या लक्षात आलं. पण हे आमचं ज्ञानवर्धन आणखी १० दिवसांनी होणार होतं...
त्याआधी रोटोरुआतल्या ‘ते पुइया’च्या (Te Puia) माओरी व्हिलेजमध्ये त्यांचं धनधान्य साठवण्याचं, सुंदर कोरीव कामाचं ‘स्टोअरेज हाऊस’ दिसणार होतं; ‘बाहेरून जितकं अधिक कोरीव काम, तितकाच आतला धनधान्याचा साठा जास्त’ हे समीकरण आश्चर्यचकित करणार होतं. माओरी शोमधल्या कलाकारांच्या पेहरावातल्या झिरमिळ्या न्यूझीलंडच्या पाणथळ भागात आढळणार्‍या एका झुडुपाच्या चिवट पात्यांपासून तयार होतात, ही माहिती गाठीशी जमा होणार होती; ती वस्त्रं विणणार्‍या शहरी वेषातल्या माओरी मुलींच्या पुढ्यात उभं राहून त्यांचं काम बारकाईने निरखता येणार होतं.
दूर जगाच्या एका कोपर्‍यातल्या चिटुकल्या देशातल्या आदिवासी लोकांबद्द्ल आयुष्यभर पुरणार्‍या आठवणी जमा होतील असं निघण्यापूर्वी स्वप्नातही वाटलं नव्हतं.

----------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाली आहे सुरुवात. मी ऑस्ट्रेलियामध्ये दीड-पावणे दोन वर्षे होते पण न्युझीलंड बघायचं राहूनच गेलं. ऑस्ट्रेलियात असताना आम्ही अशाच एकदा अबोरिजिनल शोला गेलो होतो त्याची आठवण झाली.

माओरी आदिवासी असले तरी ब्रिटीशांसाठी बर्‍यापैकी वरचढ ठरले. त्यामानाने ऑस्ट्रेलियन अबोरिजिनल्स आणि नेटीव्ह अमेरिकन्स एवढे स्ट्राँग नव्हते असे वाटते.

काय सुंदर लिहीले आहे! अतिशय आवडला लेख, आणि फोटोही मस्त. नीट वेळ असताना वाचायचा म्हणून राहून जात होता आणि या वीकेण्डला शेवटी जमले. ललिता-प्रीति - अजून खूप वाचायला आवडेल या ट्रीप बद्दल. (लेख २ दिसला आहे)

यांचे माओरी कल्चर व परंपरा एकूणच पॉलिनेशियन बेटांवरच्या इतरांशी खूप साम्य असलेल्या वाटतात. हवाई मधले असेच कार्यक्रम साधारण एकाच स्टाइलचे वाटतात.

आम्ही २०१४ साली गेलो होतो. माओरी लोकांचा इतका डीटेल्ड कार्यक्रम आम्ही पाहिला नाही - आम्ही दुपारच्या एका इव्हेन्ट ला गेलो होतो. तेथे 'हाका' बद्दल माहिती मिळाली पण पाहिल्याचे लक्षात नाही. पण ते 'हांगी' जेवण मात्र खाल्ले. अतिशय आवडले होते ते. आम्ही बहुधा ते रोटोरुआ ला खाल्ले. खुद्द ऑकलण्ड मधे मुख्य इण्टरेस्ट 'इडन पार्क' होता Happy ते व इतर शहरी गोष्टी पाहिल्या. पण हे तू लिहीलेले राहिले. एकूणच आम्ही साउथ आयलंड मधे जास्त दिवस होतो.

तेथील उच्चारांबद्दलही एकदम सहमत. एअर न्यूझीलण्ड चे सारखे इयर न्यूझीलण्ड ऐकायची सवय लागली होती, तेथे ही २-३ डोमेस्टिक फ्लाइट्स घेतल्याने.

फारएण्ड,
आम्ही पाहिलेल्या तिथल्या क्रिकेट ग्राऊंडसबद्दल थोडंफार लिहायचा विचार आहेच. Happy

दुसरा भाग दिसला नाही असा काहीजणांचा मेसेज आला.
या भागाच्या शेवटी दुसर्‍या भागाची लिंक द्यायला हवी होती; पण आता मला हे संपादित करता येणार नाही.

अ‍ॅडमिन, या भागाच्या शेवटी https://www.maayboli.com/node/66047 ही दुसर्‍या भागाची लिंक टाकता येईल का?

काही वर्षा पूर्वी न्यूझीलंडवर एक पुस्तक वाचल होत
तीथे बर्याच देशातील लोकांनी स्थलांतर केल होत भारतातीलही लोक होती
तुम्हाला असे भारतीय नाही भेटले का
भेटले असतील तर
त्यांचे ही अनुभव पडताळून सारांश सांगीतला तर वाचायला
आवडेल
बाकी तुमची लेखनशैली मस्त आहे

Pages