चाळीतील गमती-जमती (१३)

Submitted by राजेश्री on 13 May, 2018 - 21:21

चाळीतल्या गमती-जमती (१३):- इंदू आजीचे वेळापत्रक

अस म्हंटल जात की आपल्याला आपल्या स्वतःपेक्षा जास्त माहिती आपल्या शेजाऱ्यांबद्दल असते.आणि ती माहिती मिळावी म्हणून आपण आपल्यापेक्षा जास्त लक्ष शेजाऱ्यांकडे देत असतो.तर इंदू आज्जीकडे मी माझ्याही नकळत बारीक लक्ष देऊ लागले.हेतू शून्य पण चारचौघांना तिच्याबद्दल उत्सुकता वाढविणाऱ्या बाबी सांगत राहाव्यात अस वाटू लागलं.त्यावेळी मी साधारण आठवी नववीत असेंन.
इंदू आज्जी कमालीची स्वच्छता प्रिय आहे आणि ती दिवसातून तीन तीन वेळा अंघोळ करते हे त्यावेळी कौतुकाचा विषय म्हणून गणला गेला.ती जेवढी कमालीची स्वच्छताप्रिय आहे तेवढीच ती काटेकोर वेळापत्रक आखून अंमलबजावणी करणारी आहे हे देखील मला समजलं.ती एकटी म्हातारी अस म्हंटल तरी ती कमावती होती.वय वर्षे सत्तरीत ही ती भाजीपाल्याचा व्यापार करीत असे.ती मोड आलेले धान्य विकायची.स्वतः धान्याला मोड आणून ती बाजारात जायला नेमक्या वेळेला घरातून जायची.तिच्या ये जा करण्यावरून किती वाजले हे समजायचं. म्हणजे ती बाजारला घरातून निघाली की तीन वाजले .परत आली तर सात वाजले अस.तिचा दिनक्रम काय तर सकाळी पहाटे उठणे,अंघोळ,देवपूजा आणि मग स्वयंपाक.हो आता तुम्हाला वाटेल एकटी म्हातारी काय करणार स्वयंपाक करून करून तर.पण तिच्या घरात बनवलेल्या खाद्य पदार्थाचा दरवळ साऱ्या गल्लीभर सुटायचा.ती काय करते हे आम्हाला एवढा भांडणतंटा करून कळलं कस तर ती मोड विकायची कधी कधी मी देखील पैसे घेऊन तिच्याकडे मोड आणायला जायची.म्हातारी चाणाक्ष होती ती कधी व्यवहारात भांडण आणायची नाही.मोड मागायला गेलं की ती मात्र दारात उभं करायची पैसे पायरीवर बाजूला ठेऊन द्यायचे.मग ती कागदातुन मोड बांधून आणणार.मी बाहेर उभा असले तरीही तिचे घर बाहेरून बघायला मिळेल तितक टिपून घ्यायचे.व्यवस्थितपणा,टापटीपपणा हा तिचा आणखी एक गुण.घरातील प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे असायची.एकटी आहे म्हणून कधी कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती तिच्या घरात.तांबे आणि पितळ्याच्या स्वच्छ, नितळ भांड्यांनी भांड्याचे कपाट सोन चांदी ठेवल्यासारखं लखलखायचं.त्यामुळे वाटत या भांड्याचा उजेड तिच्या घरात पडायचा.उजेडासाठी तिला वेगळा असा प्रकाश पाडायची गरज नाही वाटायची.शिवाय ती खूप कंजूष होती.तिचे मेहनत करून मिळवलेले पैसे ती पितळेच्या डब्यात ठेवायची.मला वाटत इंदू आज्जी गेल्यावर त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी साठवून ठेवलेले पैसे मोजून मोजून कंटाळा आला असेल.ती पैसे साठवण्यावर फार जोर द्यायची.मला वाटत तिचा विश्वास कोणावरच नव्हता अगदी तिच्या स्वतःवरही.सगळं आवरून इंदू आज्जी बाजारला निघाली की घराला भलंमोठं पितळी कुलूप लावायची.ते ती किमान दहा पंधरा वेळा तरी नीट बसलं आहे का ओढून पहायची.कधी कुलूप ओढायच राहील की काय अस तिला वाटून पुन्हा ती ओढून बघायला माघारी यायची.तिची ही सवय माहीत झाल्यावर शेजारची काही मोठी मुलं तिच्या मागे उभारून पलट....पलट...असे का म्हणायची हे मला मोठं झाल्यावर DDLJ बघून समजलं..

राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१२/०४/२०१८

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

OCD होता बहुतेक आजींना..

मजा येतेय वाचायला. पण किस्से इतके छोटेछोटे आहेत कि २-३ किश्यांचा एक भाग बनवला असता तर चाललं असतं.