जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_ 12

Submitted by अन्नू on 13 May, 2018 - 09:05

खरं तर आयडीया तिचीच होती. तिला थिएटरमध्ये सिनेमा पहायला जायचं होतं. कधी काळी तिच्या घरच्यांनी तिला सिनेमाला नेली होती, तेवढंच. त्यानंतर कोणी तिला नेली नव्हती. इतक्या वर्षांनी आज तिला सिनेमा बघायची खूप इच्छा होत होती. तिनं ती मला बोलून दाखवली. मीही तिला टोला मारत म्हणालो-

“आंम्ही मस्त नेऊ, तुला वेळ असायला पाहिजे ना!”

“नाही रे, यावेळी नक्की येईन- तू सांग फक्त कधी जायचं” बस्स.. त्या एका क्षणात मला आकाश ठेंगणं वाटू लागलं.

वर्षानुवर्षे बाहेर धूळ- थंडी- वारा- उन- पाऊस यात खितपत पडलेल्या नंदीला, देवाने दया दाखवून- स्वत: मंदिराची बंधनं तोडून- बाहेर येऊन दर्शन द्यावं, तसंच काहीसं झालं. जिच्या एका-एका क्षणाला मी आसुसलो होतो, ती स्वत: माझ्या बरोबर तीन तास सिनेमाला येणार होती! चक्क!!

तिच्या आश्वासनाने मी आनंदाने बेभान झालो.
तिचा सुट्टीचा दिवस जायचा ठरला- वेळोवेळी ती मला त्याची आठवण करुन देऊ लागली. ‘आपल्याला जायचं आहे हं- विसरु नकोस’ म्हणून बजावू लागली.

त्याप्रमाणे मीही तयारीला लागलो. कुठला थिएटर चांगला आहे, कुठे तिला जास्त आवडेल, कंफर्टेबल वाटेल या सगळ्याचा विचार करुन मी बांद्र्याचा एक मल्टीप्लेक्स निवडला.

यावेळी शुटींग बंद असल्याने माझ्याकडे खरोखरच काहीच पैसे नव्हते. अगदीच तंगी होती. पण मी हार मानली नाही.
मी पैसे उसने घ्यायचे ठरवले. त्यासाठी सर्वांत पहिल्यांदा ताईला गाठलं..

“मला काही पैसे देशील? मी तुला लगेच परत करेन” मी तिला आश्वासन देत म्हटलं. तिनं कारण विचारताच सरळ सांगून टाकलं-

“सिनेमाला जायला”

पहिल्यांदा तर तिला आश्चर्यच वाटलं. कधीही घरातली टीव्ही न बघणारा आज डायरेक्ट थिएटरला? तेही पैसे खर्चून?!!
पण नंतर मी कसलीही लपवाछपवी न करता तिला खरं-खरं सांगितलं. फक्त तिचं नाव मात्र टाळलं. फ्रेंडबरोबर जायचं आहे, एवढंचं सांगितलं. ती तयार झाली.

(हे मात्र आमच्यामध्ये अंडरस्टँडीग खुप चांगलं आहे. मी कधीही कुठल्या वाईट मार्गाने जाणार नाही किंवा चुकीचं पाऊल टाकणार नाही याची तिला पुर्ण खात्री आहे)

“मुलगी आहे नं?” जाताजाता तिनं बरोबर ओळखत मला विचारलं. मी फक्त गालातल्या गालात हसलो-

“ह्म्म..... सांगतो!” विचार करत असल्यासारखा अविर्भाव आणत, मी उत्तर द्यायचं टाळत बोललो. पण माझ्या तोंडावरच्या लालीने सगळा किस्सा अगोदरच ‘बयान’ केला होता!

“नाव काय तिचं?” कुतुहलानं तिनं विचारलं.

“सांगतो नं नंतर..” हसून मी तसाच तिथनं पळ काढला.

भावाकडे गेलो. त्याच्याकडूनही काही कॉन्ट्रीब्युशन मान्य करवून घेत आणखीन एकदोघांकडे सेटींग लावली. अशाप्रकारे एक-एक करत संध्याकाळी सहापर्यंत अवघ्या एका दिवसात मी सगळ्या पैशाची जुळवणी केली.

सकाळचा अकराचा शो- नंतर हॉटेलमध्ये काहीतरी खाणं- पिणं, एखादं आयस्क्रिम, नंतर अमुक गार्डन, नंतर तमुक पार्क, नंतर चौपाटी, नंतर...
अगदी मिनिटा- मिनिटाचा हिशोब लावून मी प्लॅन तयार केला. सगळं काही व्यवस्थित ठरल्यावर पुन्हा एकदा तिला फोन केला-

‘अमुक-अमुक पिक्चर आहे, बघ परत- येणार नं?’

“चालेल. येते मी” तिनं ठामपणे होकार दिला अन मी खुशीने अक्षरश: गुदमरुन गेलो. तो दिवस माझ्यासाठी इतक्या वर्षातला सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस होता. मी तितक्याच आतुरतेने रविवारची वाट बघत राहीलो..

याच बैचेनीत कसातरी शुक्रवार संपून गेला. रात्री झाली..
बस्स आता उद्याचा एकच दिवस मधे की मग....
माझ्या अंगभर अत्यानंदाने शहारे आले.
अस्वस्थपणाने मला झोपही येईना..

‘किती स्लो चाललाय हा दिवस? कधी उजाडणार? कधी शनिवार जाणार? कधी रविवार येणार? कधी मी तिला भेटणार, कधी तिच्याबरोबर सिनेमाला जाणा...
अरे हो! सकाळी जायचं म्हणजे कपडे बघायला लागतील. इस्त्री करायला लागतील. पण कुठले कपडे घालायचे? तिला ऑक्वर्ड वाटायला नको असे कपडे घालूया.. हा! हे कपडे चालतील, की ते कपडे..? नको- फॉर्मलच चालेल.. आणि तो नवीन शर्ट...

रात्र पुढे सरकत होती, मी विचार करत होतो...
शेवटी साडेतीन वाजले तरी मला झोप येईना. तेव्हा मात्र मी डोळे गच्च मिटून घेतले. मनातली सगळी खळबळ दाबत अस्वस्थपणे कसातरी रात्र सरण्याची वाट पाहू लागलो...

कधीतरी एकदाची झोपेची माझ्यावर कृपा झाली. मी शांतपणे तिच्या अधीन गेलो..
मनातले सगळे विचार थंड पडत गेले आणि बरोबर सव्वा सातला मी झोपेत असतानाच मॅसेजची टोन कर्णकर्कश आवाजात वाजली. मी डोळे उघडून बघितले तर मोबाईल स्क्रिनवर तिचाच मॅसेज झळकत होता......
आनंदाबरोबरच एक शंकेची पाल चुकचुकली.. एखाद्या अनामिक जाणीवेनं छाती धडधडू लागली...
आता काय पाठवलं असेल?
मी मॅसेज ओपन केला..

‘उद्या मला आजीकडे जायचं आहे, मी येत नाही!’....

‘आणि दादा... हे माझं घर- हं...!’
इवल्याशा हातांनी रेतीत तासभर मेहनत करुन छानसं, मनोर्‍याचं टुमदार घर तयार केलं...
त्याचं इवलंसं मन त्या दृश्याने भारुन गेलं. अनिमिष नेत्रांनी ते आपल्याच घराकडे बघत राहिलं. मग त्याने आनंदाने टाळ्या पिटल्या. उड्या मारल्या. इतक्यात कुठूनशी भरतीची एक जोरदार लाट आली, त्याच्या कसल्याही भावनांचा विचार न करता आवेगाने त्याच्या घरावर झेपावली अन्.....

मी घट्टपणे डोळे मिटून घेतले...
आत खूप काही तुटून उध्वस्त झाल्यासारखं मी कळवळून गेलो...

ती येणार नाही ही गोष्ट तर मला अगोदरच माहीती होती, मग ऐन वेळी तिनं ती स्पष्ट केल्यावर मला इतकं दु:ख का व्हावं?
मुळात तिचा नकार अपेक्षितच होता. मग असं असूनही मी का म्हणून स्वप्नमहाल उभे केले? कशासाठी?
ती आपली नाही- होणारही नाही. माहीत असूनही तिच्याचभोवती आपल्या सुखक्षणांची स्वप्ने का गुंफत गेलो?
मनाच्या खोल गर्तेत काहीतरी सलत होतं. अंत:करण तुटून निघत होतं..

रात्री मी खाली मोकळ्या हवेत गेलो. पण आज ती थंड खेळकर हवा, ते काळंशार मोकळं सुंदर आकाश, माझं दु:ख हलकं करु शकत नव्हतं.. मला सावरु शकत नव्हतं..
मी पुर्णपणे विखरत चाललो होतो..

स्वत:चा श्वास घेणंही किती वेदनादायक होऊ शकत याचा पहिल्यांदाच अनुभव घेत होतो. तिचा प्रत्येक क्षणाचा हसरा चेहरा आठवून मन आणखी कळवळून विद्ध होत होतं. वेदनेनं चेहरा पिळवटला जात सारखं भडभडून येत होतं. कसातरी मग श्वास रोखत मी डोळ्यांतलं पाणी परतवलं. मन घट्ट केलं. एका गडद छायेखाली असल्यासारखा मी फोन घेतला. डबडबत्या अश्रूंनी डोळ्यांची आज्ञा ठोकरुन कोसळण्याअगोदरच तिला मॅसेज टाईप केला..

“मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ***, कदाचित त्यामुळेच तुझ्याबरोबरचा एकही क्षण मी मिस करत नाही,
पण मला वाटतंय तुला माझी किंमत नाही- गरज नाही.
थँक्यू.. व्हेरि मच!
यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही, तुझ्याशी कसल्याही प्रकारे कॉन्टॅक्ट करणार नाही.
हा माझा शेवटचा मॅसेज आहे...
गुड बाय... फॉरएव्हर. सुखी रहा!”

मी फोन बंद केला आणि अक्षरश: तिथेच पाय पसरुन जोरात भेकांड पसरावसं वाटलं मला. गळ्याच्या शिरा ताणून ओरडावंस वाटलं... गदगदून हमसाहमशी रडावसं वाटलं...!
पण मी स्वत:ला खूप आवर घातली..

जेमतेम किती- अगदी पंधराच मिनिटं.
फोन टोन वाजली. पाहिलं- तिचाच फोन आला होता!
तो फोन नाकारताना मनाला असंख यातना होत होत्या तरीही मन कठोर करत मी तो कट केला. तिने पुन्हा-पुन्हा फोन केला-
मी कट करत गेलो...

बोलायचंच नव्हतं, असं नव्हतं पण, या क्षणाला मी वेदना न भावनेच्या अशा प्रचंड गर्तेत फेकला गेलो होतो कि, मला- स्वत:च स्वत:ला आवरता येत नव्हतं. दु:खातिरेकाने गळा असा दाटून आला होता की, एक शब्द बाहेर पडत नव्हता. मग फोन उचलून बोलणार काय? शिवाय ती वेगळं काय बोलणार?

‘मी तुला मित्र मानते, तू असा का बोलतोस, माझा अगोदरच बॉयफ्रेंड आहे’.........!!!! (????)

अगं इतक्या वर्ष ओळखतोय तुला, तुझ्यापेक्षा जास्त सांगू शकतो तू आत्ता काय बोलणार ते!
पण या बोळवणीने खरंच माझं समाधान होणार होतं?
ह्ं!
उलट अशा बोलण्याने मी आणखीनच रक्तबंबाळ होणार होतो. त्यामुळेच मी तिचा फोन उचलायचा टाळत होतो. पण ती फोन करतच होती. शेवटी न रहावून तिने मॅसेज केला-

“प्रणित, प्लिज माझा फोन उचल..”

मी मोबाईलकडे बघितलं- दिसलं मात्र काहीच नाही!
नव्यानं आलेल्या आसवांनी सगळी दृश्य धुवून टाकली होती. तिचा पुन्हा मॅसेज आला-

“हे बघ, तू फोन उचलला नाहीस तर मी आज जेवणार नाही”

मीही टेक्सनं उत्तर देत म्हटलं-
“काळजी करुन नकोस, माझ्यासाठी तरी तू जेवण सोडणार नाहीस!” किती हा निष्ठूरपणा? (कदाचित प्राप्त परिस्थितीमुळेच मला इतकं रुक्ष बनवलं होतं का?)

तिनं कळवळून परत मॅसेज केला-

“प्रणित, तू जर कधी माझ्यावर खरंच प्रेम केलं असशील तर माझा फोन उचलशील!”
लक्-कन काळजात काहीतरी हललं.
तिच्याकडून पहिल्यांदाच असं मला प्रेमासंबंधी उद्देशून वाक्य बघून माझं हृदय पुन्हा तिच्यासाठी धडधडू लागलं, जखमांनी विव्हळणारं मन शांत झालं. तिचं प्रेम डोळ्यांत पाणी बनून झरु लागलं,
पण-
दुसर्‍याच क्षणी त्याच्यातली मन वळवण्यासाठी वापरलेली कटू वास्तवता लक्षात आली आणि मी तसाच कोरडा पाषाण होऊन गेलो! ओठ थरथरले, काळीज चिरलं गेल्याची जीवघेणी जाणीव झाली- छातीत वेदनेचा डोंब उसळला. गरम अश्रूंनी गालावरुन नव्याने पाझरायला सुरवात केली..

“... तुला माझी शप्पथ आहे प्रणित, फोन उचल”

एकतर या दु:खाने अगोदरच माझ श्वास कोंडला जात होता. प्रचंड वेदनेनं मन सुन्न झालं होतं. त्यात हीचे असे मॅसेज येत होते.
कसा उचलणार तिचा फोन?
तिला मी काहीच रिप्लाय दिला नाही, नंतर मात्र ती अगतिक झाली. गडबडीत मॅसेज करत म्हणाली-

“प्रणित, मी येते रे तुझ्याबरोबर उद्या पिक्चरला” ते वाचून मात्र माझ्या दगडी चेहर्‍यावर कडवट हास्य पसरलं!

मनात म्हटलं- ‘वेडे, तू सिनेमाला यावसं म्हणूनच का केलं होतं मी हे सगळं?
मी केलं, कारण तुझा प्रत्येक क्षण मला हवा होता.
फक्त त्यासाठीच मी भुकेलेला होतो गं...
अगं.. माझ्यासाठी तो सिनेमा कधीच महत्त्वाचा नव्हता- होतीस ती तू! तुझी सोबत!
त्या वेळेपुरता तुझा सहवास मला लाखो पटीनं मोलाचा होता. पण तुला मात्र हे कधी कळलंच नाही!

तिच्या वारंवारच्या मॅसेजवरुन ती अगदी रडायच्या बेताला आल्याचे वाटत होते. पण माझी अवस्था इतकी वाईट होती की, मला काही सांगणं अन बोलणं शक्य नव्हतं. बोललं तरी तिच्या पडदा टाकलेल्या हृदयापर्यंत ते कधी पोहोचणारही नव्हतं!
कळवळून मी फोन बंद केला. तिचे मॅसेज कायमचे बंद झाले...!

आयुष्यात कधी असा रडलो नसेन ते त्या दिवशी रडलो. सर्व बाजुंनी हारलेल्या योद्ध्याच्या आक्रोशाने कोसळून रडलो. उन्मळून रडलो. वाटलं एक कानाखाली खेचून द्यावी तिच्या. तशीच ओढून करकचून मिठीत घेत म्हणावं,

“आय लव्ह यू डॅमिट!... आय लव्ह यू व्हेरी मच!!
का इतकं समजावूनपण तुला समजत नाही? का? का....?”

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत मी उशी छातीशी घट्ट आवळून घेत सर्वस्वी धीर सुटल्यासारखा ओक्साबोक्शि रडत राहीलो. तोंड उशीवर दाबत करुणपणे आवाज बंद करत आक्रोश करत राहिलो..
पण शेवटपर्यंत, साध्या हुंदक्याचा आवाजही तोंडातून बाहेर येऊ दिला नाही!
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

चार दिवस याच डिप्रेशनमध्ये गेले. तिने यावेळी फोन करण्याचा प्रयत्न केला. मला फेसबुकवर टेक्स केलं. मी रिप्लाय दिला नाही.

बरोबर चौथ्या दिवशी एफबीवर एक मॅसेज झळकला-

“तुला मी चांगला मित्र मानत होते, पण तू फ्रेंडच्या नावावर ब्लॅक स्पॉट आहेस! जर तुझ्यामुळे माझा....”

डोळे डबडबून येत असतानाच चेहर्‍यावर तेच कडवट हास्य पसरलं. कंप्युटर बंद करत मी गॅलेरीत जाऊन बसलो.
मनात आलं, हेच तिनं मला इतक्या वर्ष ओळखलं तर!

तसं बघायला गेलं तर आम्ही कधीच गुड बॉय वगैरे नव्हतो. इतर मुलांसारखं बेबंद, बेछुट होतो. वात्रटपणाचे विचार आंम्हीही करतच होतो. पण हीच्यासमोर मात्र तसलं कधी मनात आलं नाही. का कुणास ठाऊक पण, ही सोबत असताना या सगळ्यांना आपोआप पायबंद बसत होता. कितीही काहीही झालं तरी तसले विचार लांब लांब पर्यंत आमच्याकडे फिरकत नव्हते. मी तिच्या सोबत, भले तिच्याजवळ बसलेलो असायचो, तिच्याबरोबर इतका वेळ घालवायचो, पण म्हणून कधी त्या नजरेनं बघणं सोडा साधं तिला हलकंसं स्पर्शही करणं मला कधी सूचलं नाही.

विश्वास वाटणार नाही पण, क्लासच्या पहिल्याच दिवशी मिळवलेल्या हाताच्या, त्या तीन बोटांच्या स्पर्शाव्यतिरिक्त, इतक्या वर्ष मी तिला साधं एका बोटानंही स्पर्श केलेलं नव्हतं!
आणि हीच मुलगी आता मला त्याच नीती-अनीतीच्या खालच्या पातळीवर बघत होती!
कमाल आहे!

खुर्चीत मागे रेलत मी शांतपणे वर संध्याकळच्या- काळवंडत चाललेल्या लालभडक आभाळाकडे भकासपणे बघत राहीलो....

आकाश मोठं की आपलं दु:ख मोठं? सांगणं अवघड होतं...
डोळ्यांतून येणारी उष्ण अश्रूची सर मात्र मुकपणे त्याचे उत्तर देऊन जात होती....
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

मी अतिशय सर्वसामन्य माणूस आहे. मला कोणाबद्दलही राग- द्वेष- असूया- जास्त वेळ मनात साठवून ठेवता येत नाही. आणि ती तर माझ्या सगळ्यात जवळची होती. तिला मी आपली मानली होती. तिच्याबद्दल मी कशी अढी ठेवेन?

खरं तर तिच्यावर रागावणंही मला कधी जमलं नाही. ती मला आवडत नव्हती-
प्रेम होतं माझं तिच्यावर!
प्रेम आणि आवड यात जमीन आस्मानाचा फरक आहे. आवडणारी प्रत्येक गोष्ट आपण निर्दयपणे तोडून आपल्याजवळ ठेवण्याचा प्रयत्न करतो- तोच प्रेम करणार्‍याच्या बाबतीत नसतो. म्हणूनच तर प्रेमाला महत्त्व आहे ना!

सलग दोन महिने तिच्याशी कसलाच कॉन्टॅक्ट नव्हता. दरम्यान तिचे फोन, मॅसेज सगळं बंद होतं. माझ्याकडे नंबर होता, पण कधी फोन करावसा वाटलं नाही. कारण तेच-
तिला आवडेल की नाही यापेक्षा मला तिला दुखवायचं नव्हतं.

अगोदरच त्या रात्री भावनेच्या भरात मी तिला खूप तोडून बोललो होतो. मी असं करायला नको होतं हे मला खूप उशीरा कळलं. पण ती परिस्थितीच माझ्या हातात नव्हती, त्याला मी तरी काय करणार?

असो. काहीही झालं असलं तरी, मी मुर्खपणानं तिला खूप दुखावलं होतं, तिला वेदना दिल्या होत्या, कदाचित ती त्या रात्री रडलीही असेल. त्यामुळे ती नंतर जे बोलली तो तिचा हक्कच होता. माझी त्याबद्दल काहीही तक्रार नव्हती. फक्त आपल्याबद्दलची अढी तिच्या मनात राहू नये, असं वाटत होतं. एकदा तिच्याशी बोलावं असं प्रकर्षाणे जाणवायला लागलं होतं.

त्या सकाळी मला ती संधी मिळाली. सरांनी मला एका सिरिअलसाठी आमच्या टीममध्ये सपोर्टींगसाठी काही मुलंमुलीं बघायला लावली होती. त्यांना जास्त एडीची गरज होती. सगळीकडे चौकशी केली कोणीच भेटेना, शेवटी तिची आठवण आली. कॉलेजमध्ये वगैरे तिचे काही फ्रेंन्डस असतील तर ती सांगू शकेल म्हणून मी भाईंदरला जाण्याअगोदर सकाळचा तिला एक टेक्स्ट मॅसेज केला-

“आय एम एक्सट्रीमली सॉरी ..., मागं जे झालं ते पास्ट म्हणून विसरुन जाऊन, आपण पुन्हा पहिल्यासारखे मित्र नाही का होऊ शकत? माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे, प्लिज लवकर रिप्लाय दे”

मी तयारी करुन घराबाहेर पडलो. जेमतेम गेटपर्यंत पोहोचलो तोच तिचा रिप्लाय आला-

“मंद! मी आत्ता फ्रिच आहे- बोल” वाचून जरा भार हलका वाटला. कित्येक दिवसानंतर पुन्हा तिचा-
‘मंद!’ हा टोन ऐकायला मिळाला होता...!
बरं वाटलं-

तोंडात एखादं गाणं गुणगुणावंसं वाटलं, म्हणून एफ एम चालू केला. कसलीशी कव्वाली चालू होती. म्हटलं चांगलं आहे- कव्वाली म्हटलं की सगळं विसरायला होतं. मन त्या दुनियेत कुठेतरी हरवून जातं. आता निदान त्यामुळे तरी आपलं मन डायव्हर्ट होईल. मनातले भुतकाळातले तिचे विचार थांबतील, म्हणून मग मी व्हॉल्युम फुल्ल ऑन करत दोन्ही हेडफोन कानात लावले, तर कोणीतरी गायक आर्त स्वरात बोलत होता...

रुठकर हम उन्हेs भूsल जाने लगे,
वो हमें और भी याsद आने लगे...!

मनात म्हटलं- छे! हे फक्त एक गाणं आहे. आपला अन त्याचा काय संबंध? पैसा कमवण्यासाठी कोणीतरी ते लिहिलं, कोणीतरी गायलं, बस्स! यापुढे त्याचं काही महत्त्व नाही. निदान आत्ता आपल्या आयुष्यात तरी नाही.
आणि असंपण आपल्या मनातलं वाचल्यासारखं थोडी नं ते काही बोलणार आहे?
.. इकडे गायक हृदय पिळवटून टाकत गातच होता..

हमने दिल से कहीss अपनी, मजबुरीयाँs...
दिल को लेssकीन, ये- स्सारेs.. बहाने लगे!

मी हेडफोन काढले. चौक आला होता. इकडे तिकडे बघत मी रस्ता क्रॉस केला. गाड्यांतून रस्ता काढत पलिकडल्या रस्त्याला लागलो. आतल्या बाजुने चालत असताना मी पुन्हा हेडफोन कानात अडकवले आणि..
ते शब्द अ‍क्षरश: माझं काळीज चिरत आरपार निघून गेले...

उनसेS एक पल मेंS कैssसे.. बिछड जाए हम.....
जिनसे.. मिलsनें- मेंS- शाSयद(!).... जमाने लगे.....

टचकन डोळ्यांत पाणी आलं. काळीजाच्या चिंधड्या होत असताना पुढच्याच क्षणी मी भरल्या डोळ्यांनी स्वत:वरच खदखदून हसायला लागलो...

आता माझ्या विमनस्क अवस्थेची बिचार्‍या आजुबाजुच्यां लोकांना काय कल्पना? समोरुन चालत येणार्‍या पोरींच्या ग्रुपसकट झाडून जो तो रस्त्यावर माझ्याकडे वेड्यासारखा चमकून बघायला लागला होता!
=============================================================
क्रमश:

भाग=>> 13

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users