मार्क्सवादाचे दुखणे, बॉर्द्युच्या निमित्ताने...!

Submitted by अतुल ठाकुर on 12 May, 2018 - 10:57

captal.png

सध्या फ्रेंच तत्त्वज्ञ पियरी बॉरद्युचा अभ्यास सुरु आहे. त्याने मार्क्सची "कॅपिटल" ही संकल्पना घेऊन त्यात अनेक गोष्टींचा समावेश केला. त्याला मुळी कॅपिटलचा विचार हा फक्त अर्थकारणाच्या बाबतीत मान्यच नाही. त्याचे म्हणणे असे की तुम्ही कॅपिटलचा विचार निव्वळ अर्थकारणाच्या बाबतीत करता तेव्हा त्याची व्याप्ती संकुचित करता. आर्थिक भांडवल याबरोबरच सांस्कृतिक भांडवल म्हणाजे "कल्चरल कॅपिटल" आणि सामाजिक भांडवल म्हणाजे "सोशल कॅपिटल" चा विचार बॉर्द्युने आपल्या संशोधनात केला आणि ज्याप्रमाणे मार्क्सने सामाजिक विषमतेचे मूळ आर्थिक भांडवलशाहीमध्ये शोधले, त्याचप्रमाणे बॉर्द्युने सामाजिक विषमतेमध्ये आर्थिक भांडवलाबरोबरच कल्चरल आणि सोशल कॅपिटलची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे अशी मांडणी केली. यापेकी कल्चरल कॅपिटलचा विचार त्याने अतिशय बारकाईने केला आहे.

त्याचे म्हणणे असे की सधन कुटुंबांमध्ये श्रीमंत जीवनपद्धतीला आवश्यक, ते जीवनमान जगता यावे, त्यासाठी आवश्यक ती मनोवृत्ती आणि सवयी यांचे शिक्षण आणि बाळकडू हे लहानपणापासूनच मिळते. हे कुटुंबांमध्ये वहिवाटीने चालत आले असल्याने याची गणना सांस्कृतिक कॅपिटलमध्ये करणे भाग आहे. गरीबांच्या मुलांचे बालपण आणि त्यांचे संगोपन हे बहुधा "चादर पाहून पाय पसरावेत" अशा तर्‍हेची मनोवृती जोपासण्यात जाते. त्यामुळे उच्च राहणीमानाला आवश्यक अशी जी मनोवृत्ती सधन कुटुंबांमध्ये मुलांची तयार होते तशी निकृष्ट आर्थिक परिस्थितीत जगणार्‍या मुलांमध्ये तयार होऊ शकत नाही. पुढचा टप्पा शाळा. तेथेही सधन कुटूंबाला साजेशा सवयींची जोपासना केली जाते त्यामुळे सधनकुटुंबातील मुलांना जास्त सोपे जाते असे बॉर्द्यु म्हणतो. येथे त्याने भाषा, उच्चार यांचादेखिल विचार केला आहे.

शाळेतील तथाकथित शुद्ध भाषा आणि ती बोलताना केले जाणारे उच्चार हे पुन्हा प्रस्थापित वर्गाला जवळचे असतात. त्यामुळे येथेही त्या वर्गातून येणार्‍या विद्यार्थ्यांना तेथिल वातावरणाचा जास्त फायदा होत असतो. हे अगदी उच्च शिक्षणापर्यंत चालते. त्यातच उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली पूर्वतयारी ही प्रस्थापित वर्गात सहजतेने करवून घेतली जाते. कुटूंबातच बहुधा उच्च शिक्षित मंडळी असल्याने तेथे हे साहजिकच सोपे जाते. गरीबांकडे मात्र परिस्थिती अगदी उलट असते. या सार्‍या व्यवस्थेचा समावेश बॉर्द्यु कल्चरल कॅपिटलमध्ये करतो. हे कल्चरल कॅपिटल सामाजिक विषमतेचे एक अतिशय महत्त्वाचे कारण बॉर्द्यु मानतो. त्याचे हे संशोधन साधारणपणे १९६० च्या दशकातले आहे. हे वाचताना मला जाणवले की प्रत्यक्ष परिस्थिती काही बाबतीत तशी आहे आणि नाही सुद्धा. समाजाचा अभ्यास करताना असे वाटते की बॉर्द्युच्या या संशोधनाचा अभ्यास करताना बॉर्द्युइतक्याच मार्क्सवादाच्याही मर्यादा लक्षात येतात.

कल्चरल कॅपिटलमुळे सामाजिक विषमता जशीच्या तशी राहात असेल, तिचे पुनर्निमाणही होत असेल कदाचित. पण नेहेमीच तसे होते का? आज कित्येक शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये, संस्थांमध्ये आर्थिक, सामाजिक परिस्थिती दुबळी असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या योजना आहेत, त्यांच्यासाठी सवलती आहेत. असंख्य लोकांनी त्या सवलतींचा फायदा घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आणि शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांनी बॉर्द्युचेचे तत्त्वज्ञान वापरायचे झाले तर एका अर्थी स्वतःसाठी कल्चरल कॅपिटल मिळवले आहे, निर्माण केले आहे. त्यामुळे विद्यालये ही सामाजिक विषमता तशीच टिकवून ठेवतात हे कितपत योग्य म्हणावे? उलट विद्यालयांनी सर्व वर्गांना कल्चरल कॅपिटल मिळावे यासाठी हातभार लावला आहे असे का म्हणू नये?

मार्क्सच्या कामगार वर्गात आता उदयाला आलेल्या मॅनेजर, इंजिनियर, आयटी कंपनीतील तंत्रज्ञ यांची वर्णी कोठे लावायची? म्हटले तर हे कामगारच आहेत. ते काही कंपनीचे मालक नाहीत. म्हणजे साधनांचे मालक ते नाहीत. पण ही मंडळी मार्क्सने म्हटल्याप्रमाणे शोषित वाटत नाहीत. प्रचंड पगारावर काम करणारी ही माणसे सधन आयुष्य जगत असतात. त्यांना बर्‍याच संधीही उपलब्ध असतात. एखाद्या तंत्रात वाकबगार असलेली माणसे शोषणाचा बळी नसतात. त्यामुळे कित्येकदा वाटतं की भविष्यात बदलु शकेल अशा परिस्थितीचा विचार या तत्त्वज्ञानात फारसा झाला नसेल कदाचित. आणि हीच या तत्त्वज्ञानाची मर्यादा तर नसेल? या थियरी सायंटिफिक मानल्या जातात. अशावेळी संकल्पनांमुळे भविष्याचा आगावू अंदाज घेता येणे शक्य व्हावे अशी अपेक्षा आहे. जी मार्क्सवादानेही पूर्ण होत नाही आणि बॉर्द्युमुळेही पूर्ण होत नाही असे मला अनेकदा वाटते. अर्थातच या महान विचारवंतांमुळे विचार करण्याचा वेगळा दृष्टीकोण मिळतो हे त्यांचे कधीही न फिटणारे ऋण आहे हे मान्य आहेच.

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बळी तो कान पिळी हे एकमेव तत्व आदमपासून आजतागायत कार्यरत आहे हे सगळ्या तत्वज्ञांना कधी कळणार कोण जाणे!

वेगवेगळ्या प्रसंगी, स्थानी, परिस्थितीत वगैरे, बळी आणि पिळल्या जाणार्‍या कानाचा मालक वेगवेगळे असतात इतकेच!

देवा!
उठाले रे भग्वान!!

बळी तोच कान पिळी असतो, हे समजले, म्हणून पिळले जाणार्‍या कानांना किंमत देण्यासाठी काय करता येईल, यासाठीच सगळे "तत्वज्ञ" तत्वज्ञान पाजळत असतात हो साहेब.

द मीक शॅल इनहेरिट द अर्थ पासून, दारावर आलेल्या भिकार्‍याला केनिकुर्डूची भाजी करून खाऊ घालणार्‍या सुनेच्या कथे पर्यंत सगळीकडे बेसिक तत्वज्ञान हेच आहे.

बळाचा माज करू नका. कमी बळ असलेल्याला नाडू नका.

कारण सिंपल असतं, तुमच्यात बळ आहे म्हणून लय उतमात केला, तर ते गरीब कधीतरी उठाव करून सगळे रशियन झार मारून टाकतात..

चौथ्या परिच्छेदात सर्व वर्गांना कल्चरल कॅपिटल मिळावे यात विद्यालयांच्या सहभागाला श्रेय देताना, विद्यालयांत कमकुवत वर्गाच्या प्रवेशासाठी राबवलेल्या योजनांमुळेच (यांचा उल्लेखही या परिच्छेदात आहे) हे शक्य झाले आहे, हे लक्षात घ्यायल हवे.

<मॅनेजर, इंजिनियर, आयटी कंपनीतील तंत्रज्ञ यांची वर्णी कोठे लावायची? > स्किल कॅपिटल?

एखादे तत्त्वज्ञान कालनिरपेक्ष परिपूर्ण असेल असं मानायची गरज नाही, हे मान्य आहेच.

धन्यवाद ठाकूर सर ही ओळख करून दिल्याबद्दल.

>>>
आज कित्येक शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये, संस्थांमध्ये आर्थिक, सामाजिक परिस्थिती दुबळी असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या योजना आहेत, त्यांच्यासाठी सवलती आहेत.
>>>
म्हणजेच या भांडवलाचा ऍक्सेस या सवलती नसत्या तर या वर्गास मिळाल्या नसत्या. तेव्हा विद्यापीठे सामाजिक विषमता दूर करण्याचे साधन आहेत मात्र विषमता कमी करण्याचे कारण या पॉलिसीज आहेत असे नाही का?

≥>>>>
मॅनेजर, इंजिनियर, आयटी कंपनीतील तंत्रज्ञ यांची वर्णी कोठे लावायची?
>>>>
मार्क्सच्या काळात देखील बाबूलोक होते जे मालक नव्हते पण मध्यमवर्गीय नोकारदार होते बुर्जवा क्लास. आजचे इंजिनीअर आयटी तंत्रज्ञ या वर्गात येतील. यात सुद्धा एक कामगार वर्गाला जवळ आणि एक त्यावर असे दोन वर्ग होतील असे मला वाटते.
मार्क्सला अभिप्रेत भांडवलशाही व्यवस्था पुढल्या 20 ते 25 वर्षात जन्माला येईल असे माज्या तोकड्या बुद्धीस वाटते. एक्स्त्रीम ओलिगारकी जन्माला आल्यावर व कृत्रिम बुद्धी तंत्रज्ञान आजच्या मध्यमवर्गास बेकार करेल व तिथे क्रांतिला* पूरक वातावरण तयार होईल.

*अति अब्युज्ड शब्द वापरल्याबद्दल क्षमस्व.

तुमच्या या लेखाच्या मुख्य विषयानुषंगाने
>>
कल्चरल कॅपिटलमुळे सामाजिक विषमता जशीच्या तशी राहात असेल, तिचे पुनर्निमाणही होत असेल कदाचित
>>>
सांस्कृतिक भांडवलामुळे सामाजिक विषमता नक्कीच कायम राहते. उच्च वर्गातील बोर्डिंगशाळातून, आजूबाजूला आपल्याच आर्थिक व सामाजिक वर्गातल्या सहाध्यायांबरोबर राहिलेल्या मुलांना त्यापेक्षा खालच्या स्तरातून आलेल्या मुलांपेक्षा कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात एक जम्प स्टार्ट मिळतो. हे सोफट स्किल लागणाऱ्या मॅनेजर / लीडर (लष्कर, व्यवस्थापणातले जॉब) इथे प्रामुख्याने दिसते. प्रोफेशनल वा tangible स्किल लागणाऱ्या प्रोफेशनमध्ये हे सांस्कृतिक भांडवल तुलनेने कमी कामाला येते. एक क्रूड उदा द्यायचे तर डॉक्टर सर्जनचे स्किल सांस्कृतिक ठेव्याने येत नाही, गरीब विद्यार्थ्याला डॉक्टर होण्याचे शिक्षण मिळाले तर तो उत्तम सर्जन होऊ शकतो. मात्र हेच वकिलाच्या बाबतीत होत नाही कारण एका मोठ्या वकील फर्मच्या मालकाचा मुलगा केवळ त्या फर्मचा क्लायंट बेसच नाही तर त्या वर्गातली उठबस, आत्मविश्वास घेऊन सुरुवात करतो जे त्या खालच्या वर्गातून आलेल्या मुलाला फोडायलाच कैक वर्षे जातात.

परफेक्ट उदाहरण टण्या. ज्या फील्ड मधे "नेटवर्क" वर सगळे चालते तेथे हे होतेच. पूर्वी इथे याला ओल्ड बॉइज क्लब ही टर्म ऐकली होती. याची उदाहरणे सगळीकडे पाहायला मिळतात. अमेरिकेत आता डायव्हर्सिटी ज्या कंपन्या व इण्डस्ट्रीज मधे आहे (उदा: सॉफ्टवेअर) तेथे हे बरेचसे बदलले आहे. पण गंमत म्हणजे नवीन कल्चर्स मधून येणार्‍या लोकांचे ग्रूप्स बनतात आणि त्यांचे त्यांचे मिनि-क्लब्ज तयार होतात. व्हिएटनामीज, एशियन्स, भारतीय असा एकगठ्ठा ग्रूप नसतो पण तमिळ, तेलुगु, गुज्जू असे ग्रूप्स होताना व ते एकमेकांना सपोर्ट करताना पाहिले आहेत. म्हणजे एका अर्थाने अ‍ॅनिमल फार्म ची कथा चालूच राहते - "माणसे" व "प्राणी" बदलतात.

अतुल - इण्टरेस्टिंग लेख. thought provoking.

एक क्रूड उदा द्यायचे तर डॉक्टर सर्जनचे स्किल सांस्कृतिक ठेव्याने येत नाही, गरीब विद्यार्थ्याला डॉक्टर होण्याचे शिक्षण मिळाले तर तो उत्तम सर्जन होऊ शकतो. मात्र हेच वकिलाच्या बाबतीत होत नाही कारण एका मोठ्या वकील फर्मच्या मालकाचा मुलगा केवळ त्या फर्मचा क्लायंट बेसच नाही तर त्या वर्गातली उठबस, आत्मविश्वास घेऊन सुरुवात करतो जे त्या खालच्या वर्गातून आलेल्या मुलाला फोडायलाच कैक वर्षे जातात.
टवणे सर हे उदाहरण पटले पण मला शंका वाटते. समजा गरीब विद्यार्थी सर्जन झाला. त्याला सवलत वापरल्याने सांस्कृतिक भांडवल जमा करता आले. आणि त्याच्या मुलाला वकिल व्हावेसे वाटले तर त्याला इतरांच्या तुलनेने सोपे जाईल की. म्हणजे उशीराने का होईना हे दुष्टचक्र भेदण्यास सुरुवत तरी होईल. सर्जनचा मुलगा मॅनेजर किंवा वकील होणार नाही असं थोडंच आहे?
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.

कल्चरल कॅपिटलमुळे सामाजिक विषमता जशीच्या तशी राहात असेल, तिचे पुनर्निमाणही होत असेल कदाचित. पण नेहेमीच तसे होते का? आज कित्येक शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये, संस्थांमध्ये आर्थिक, सामाजिक परिस्थिती दुबळी असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या योजना आहेत, त्यांच्यासाठी सवलती आहेत. असंख्य लोकांनी त्या सवलतींचा फायदा घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आणि शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांनी बॉर्द्युचेचे तत्त्वज्ञान वापरायचे झाले तर एका अर्थी स्वतःसाठी कल्चरल कॅपिटल मिळवले आहे, निर्माण केले आहे. त्यामुळे विद्यालये ही सामाजिक विषमता तशीच टिकवून ठेवतात हे कितपत योग्य म्हणावे?>>
अतुल,
आज भारतात वंचित घटकांसाठी ज्या सवलती, आरक्षण वगैरे आहे ते नसते तर आपणहून एक सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यालयाची दारे या घटकांसाठी कितपत उघडली गेली असती? शिक्षण, मग ते जुन्या काळी पाठशाळेत वेदाभ्यास असो किंवा पाश्चात्य देशातील एका ठराविक वर्गातील -लॉर्ड वगैरे- मंडळींच्या मुलासाठीच्या संस्था असो हे नेहमीच एका ठराविक वर्गासाठीच उपलब्ध होते. म्हणजेच विद्यालये ही सामाजिक विषमता टिकवून ठेवायला वापरली गेली. विषमता कमी करायची तर उत्तम शिक्षणाची दारे सर्वांना खुली हवी. त्यासाठी कायदेच करावे लागले. तरीही आज दर्जेदार शिक्षणाची संधी सर्वाना खरोखर उपलब्ध आहे का? सरकारी शाळा ,अनुदानित शाळा , विनाअनुदानित शाळा, इंटरनॅशनल स्कुल्स असे जे प्रकार आहेत ते एकप्रकारे सामाजिक विषमता राखत नाहीत का? २१व्या शतकाची दहा वर्षे उलटल्यावरही राईट टु एज्युकेशनचा कायदा येतो हे चित्र पुरेसे बोलके आहे.
इथे अमेरीकेत गुलामांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुक्त झाल्यावर वेगळ्या शाळा, पुढे वेगळी कॉलेजेस, सर्वांना एकत्र शिक्षण मिळावे यासाठी लढाच द्यावा लागला. आज ही गरीब वस्त्यांमधील सरकारी शाळा आणि श्रीमंत वस्त्यांमधील सरकारी शाळा येथील शिक्षणाचा दर्जा, सुविधा यात खूप फरक आहे . कॉलेजच्या शिक्षणासाठी जी तयारी हवी त्यात कुठल्या भागात रहाता त्यानुसार तफावत असते. इथे विषमता कमी करण्यासाठीअफर्मेटिव अ‍ॅक्शन सारखे प्रकार आहेत. तरीही इथे नावाजलेल्या विद्यापिठातून लिगसी अ‍ॅडमिशन नावाचा प्रकार असतो. हारवर्ड सारख्या विद्यापिठातील जवळ जवळ १/३ अ‍ॅडमिशन या लिगसी प्रकारत होतात. म्हणजे तुमच्या कुटुंबातील व्यक्ती त्या विद्यापेठात शिकली असेल तर तुम्हाला प्रेफरन्स. ही लिगसी अ‍ॅडमिशन म्हणजे सामाजिक विषमतेला हातभार नाही का?
शिक्षणासाठी सरकारी सवलती, आरक्षण याने दुष्ट्चक्र भेदायला मदत नक्कीच होते. पुढल्या पिढीला सांस्कृतिक संचित मिळाल्याने प्रगती साधणे थोडे सोपे होते पण हे जे शिक्षणाची दारे खुले होणे आहे त्यासाठी कायदे करावे लागतात. याचाच अर्थ सामाजिक विषमता राखण्यासाठी विद्यालयाची बंद दारे महत्वाची भूमिका बजावत होती/बजावतात.

अतुल - इण्टरेस्टिंग लेख. thought provoking. >> +१

स्वाती मला वाटते लेखकाला ह्यात विद्यालयांपेक्षा कल्चरल कॅपिटल चा दोष आहे असे सुचवायचे आहे त्या पॅरामधे. विद्यालय हे फक्त त्यात येणारे साधन असल्यामूळे ते कसे वापरले जातेय ह्यावर श्रेय किंवा दोषारोप ठरावा.

स्वाती २ अतिशय सुरेख प्रतिसादाबद्दल आभार. असे प्रतिसाद धाग्याला श्रीमंत बनवत असतात.

शिक्षणासाठी सरकारी सवलती, आरक्षण याने दुष्ट्चक्र भेदायला मदत नक्कीच होते. पुढल्या पिढीला सांस्कृतिक संचित मिळाल्याने प्रगती साधणे थोडे सोपे होते पण हे जे शिक्षणाची दारे खुले होणे आहे त्यासाठी कायदे करावे लागतात. याचाच अर्थ सामाजिक विषमता राखण्यासाठी विद्यालयाची बंद दारे महत्वाची भूमिका बजावत होती/बजावतात.

माझा नेमका भर यावरच आहे. आणि खरं सांगायचं तर कायदा करावा लागला यात मला फारसे गैर वाटत नाही. कारण जर विद्यालये चालवणारा "क्लास" प्रस्थापितांचा असेल तर त्यांचाच भरणा विद्यार्थी म्हणून व्हावा असे त्यांना वाटणार. त्यांना असे वाटते हे योग्य आहे असे मी म्हणत नाही याची कृपया नोंद घ्यावी.
मला म्हणायचे आहे ते हे की तत्वज्ञानात सकारात्मकतेला जागा असते का? एखाद्या गोष्टीबाबत आशा वाटणे हे भाबडेपणाचे लक्षण आहे का? की फक्त दुखणे काय आहे याकडे बोट दाखवून तत्वज्ञानाने बाजुला व्हावे. हे थोडं भावनिक झालंय हे मला मान्य आहे. त्यामुळे या विचारवंतांच्याच भाषेत बोलणे योग्य.
यांनी मांडलेल्या थियरीज या सायंटिफिक आहेत असे दावे केले जातात. त्यासाठी प्रचंड डेटा गोळा केला जातो. त्यामुळे आपल्याला विचार करण्याचा दृष्टीकोण मिळतो यात अमान्य करण्यासारखे काहीही नाही. पण कायदे करून का होईना हे दुष्टचक्र भेदता येईल, तसे भेदले गेले आहे. हळुहळु ही दारे खुली होत आहेत याचा उल्लेख या थियरीजमध्ये दिसत नाही. भविष्यात असे घडु शकते असाही उल्लेख नाही. या मला तत्वज्ञानाच्या मर्यादा वाटतात.
विद्यालयात कल्चरल कॅपिटलने सामाजिक विषमता निर्माण होते असे एक चिरेबंद विधान करून कसे थांबता येईल? जणु काही ही आता काळ्या दगडावरची रेघच आहे. यापुढे काहीच नाही. हे असे म्हणजे असेच होणार. यावेगळं काहीच होऊ शकत नाही. असाच अर्थ यातून ध्वनित होतो. परंतु व्यवहारात पाहिलं तर दिसतं कि ही विषमता नाहीशी करण्यासाठी उपायही झाले आहेत. ते लागुही पडत आहेत.

कल्चरल कॅपिटलच्या संदर्भात माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न 'कुणाचे कल्चर' हा आहे. जाती अथवा अर्थव्यवस्थेत खालच्या पायरीवर असलेल्यानी शिकून उच्चवर्णिय समाजाचे कल्चरल कॅपिटल आपलेसे करणे, यापेक्षा स्वतःच्या कल्चरल कॅपिटलबद्दल सार्थ अभिमान आणि आत्मविश्वास असणे जास्त गरजेचे नाही का?

>>विद्यालयात कल्चरल कॅपिटलने सामाजिक विषमता निर्माण होते असे एक चिरेबंद विधान करून कसे थांबता येईल? जणु काही ही आता काळ्या दगडावरची रेघच आहे. यापुढे काहीच नाही. हे असे म्हणजे असेच होणार. यावेगळं काहीच होऊ शकत नाही. असाच अर्थ यातून ध्वनित होतो. परंतु व्यवहारात पाहिलं तर दिसतं कि ही विषमता नाहीशी करण्यासाठी उपायही झाले आहेत. ते लागुही पडत आहेत.>>

मी त्या विधानाकडे काळ्या दगडावरची रेख म्हणून बघत नाही तर एक सावधानतेचा इशारा म्हणून बघते. सामाजिक विषमतेवर काम करायचे असेल तर मुलांचे सांस्कृतिक संचित लक्षात घ्यायला हवे. वंचितांसाठी शिक्षणाची दारे उघडणे हा एक भाग झाला. मात्र त्या जोडीला उपलब्ध सोयी, सवलतींचा पुरेपुर वापर करुन आपापल्या पूर्ण क्षमतेनुसार यश मिळवण्यासाठी इतर अनेक स्तरावर या मुलांना लढावे लागते. पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक पातळीवर शिक्षण देताना मुलांमधील प्रमाणित सांस्कृतिक संचिताची कमतरता आणि जोडीला प्रमाणित जे काही आहे त्यापलीकडचे म्हणून जे काही असते त्यातले वैविध्य लक्षात घेवून उपाय योजना हवी. वरती आगाऊ यांनी मांडलेला जो मुद्दा आहे की 'कुणाचे कल्चरल कॅपिटल' तो मुद्दा फार महत्वाचा आहे. सांस्कृतिक संचित अजिबात नाही असे काही नसते. पारंपारिक संचित असते मात्र ते समजून घेतले जात नाही, व्यवस्थेत फक्त प्रमाणित संचितालाच महत्व दिले जाते , त्या नुसार गृहितक मांडून अपेक्षा व्यक्त केल्या जातात, आणि त्या पूर्ण करण्यात मुलांना अपयश येते तेव्हा जजमेंटल होवून फेल्युअरचा शिक्काही दिला जातो. तसे न करता प्रमाणित सांस्कृतिक संचित आणि पारंपारिक संचिताची योग्य सांगड घालत पालक आणि विद्यार्थी या दोघांसाठी आधाराचे जाळे हवे. आपण जेव्हा वंचितांच्या प्रगतीचा विचार करतो तेव्हा नामोहरम होवून अर्ध्या रस्त्यात हार मानणे, आर्थिक झळ सोसून मिळवलेली पण व्यवहारी जगात कुचकामी डिग्री, प्रमाणित संचित गोळा करताना आपल्या मूळांपासून दुरावत जाणे - त्यातून निर्माण होणारे कंन्फ्लिक्ट , ना पारंपारिक कौशल्य ना प्रस्थापितांचे प्रमाणित कौशल्य अशी त्रीशंकू अवस्था असे बरेच काही त्यांच्या बाबतीत घडत असते. हे टाळायचे असेल तर प्रमाणित आणि पारंपारिक कल्चरल कॅपिटल लक्षात घेवून सहृदयतेने उपाय योजना हवी. यातून विषमता दूर होण्यास मदत होतेच त्याशिवाय वंचितांचे आपल्या मूळांशी सहजतेने बंध राखणे देखील होते. एकीकडे कमीपणाची भावना आणि एकीकडे जातीबद्दल वृथा अभिमान अशा गुंत्यांत अडकलेल्या समाजाचा वापर स्वार्थी राजकारणी जातीपातीच्या अस्मितेच्या राजकारणासाठी सहजतेने करुन घेत असतात. ते थांबवायचे असेल तर प्रमाणित आणि पारंपारिक अशा दोन्ही संचितांचा समन्वय हवा. भारतासारख्या देशात पारंपारिक जातीव्यवस्था, कलोनियल काळातील बाहेरुन आलेली मूल्ये, स्वातंत्र्य मिळाल्यावर स्विकारलेली मूल्ये आणि आता ग्लोबलायझेशनच्या रेट्याबरोबर आलेली मूल्ये या सगळ्याचे एक युनिक मिश्राण आहे. ते आपल्याला एकाचवेळी बलवानही बनवते आणि कमकुवतही. विषमता दूर करत समाज बांधलेला ठेवायचा तर कल्चरल कॅपिटल , शिक्षण आणि विषमता यावर सावध राहून सहृदयतेने काम करायला हवे.

स्वाती२, पुन्हा एकदा उत्तम प्रतिसाद.
आगाऊंनी मांडलेल्या नेमक्या मुद्द्याचा तुम्ही सुंदर विस्तार केलात.

कल्चरल कॅपिटलच्या संदर्भात माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न 'कुणाचे कल्चर' हा आहे. जाती अथवा अर्थव्यवस्थेत खालच्या पायरीवर असलेल्यानी शिकून उच्चवर्णिय समाजाचे कल्चरल कॅपिटल आपलेसे करणे, यापेक्षा स्वतःच्या कल्चरल कॅपिटलबद्दल सार्थ अभिमान आणि आत्मविश्वास असणे जास्त गरजेचे नाही का?

मुद्दा बरोबर आहे पण मला याबद्दल नेहेमी शंका वाटते. विशेषतः भारतीय समाजाच्या बाबतीत. येथे खरोखर दोन भागात आपल्या समाजाची विभागणी करता येईल का? आणि कल्चरल कॅपिटलच्या बाबतीत तर हे मला विशेषकरूनच वाटते. येथे प्रत्येक समाजाचे, जातीचे स्वतःचे कल्चरल कॅपिटल आहे. स्वतःच्या अहंता आहेत. अशावेळी स्वतःचे कल्चरल कॅपिटल म्हणजे काय?

स्वाती२ तुमचा प्रतिसाद अतिशय सुरेख आहे. पण नेहेमीप्रमाणेच काही गृहितकांबद्दल मनात शंका आहेतच. Happy
प्रमाणित संचित गोळा करताना आपल्या मूळांपासून दुरावत जाणे - त्यातून निर्माण होणारे कंन्फ्लिक्ट , ना पारंपारिक कौशल्य ना प्रस्थापितांचे प्रमाणित कौशल्य अशी त्रीशंकू अवस्था असे बरेच काही त्यांच्या बाबतीत घडत असते.
खरंच असं होतं आजकाल? उलट मला तर प्रमाणित संचित गोळा करण्यासाठी उत्साहाने प्रयत्न करणारी मंडळी आढळतात. आणि त्यासाठी मूळांपासून कधी लवकरात लवकर दूर जातोय याची त्यांना घाई झालेली असते.
मूळाकडे परत जाण्याची ओढ सर्वांनाच असते हाच मूळात मोठा भ्रम तर नसेल?

बाकी वरचा लेख मी लिहिलाय तो समाजशास्त्रातील तथाकथित "ग्रँड थियरीज"च्या बाबतीत. काळ्या दगडावरची रेघ असल्यासारखा निष्कर्ष देताना जग बदलत चाललं आहे याचं भान काहीवेळा राहात नाही असं मला वाटतं. शिवाय साठ सत्तरच्या दशकात कदाचित हे म्हणणे योग्यही असेल. एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाच्या प्रगतीने अनेक संधी आणि पर्यायाने कॅपिटल मिळविण्याच्या संधी पूर्वीच्या काळापेक्षा सुलभ झाल्या आहेत अशी माझी समजूत आहे.

प्रमाणित संचित गोळा करताना आपल्या मूळांपासून दुरावत जाणे - त्यातून निर्माण होणारे कंन्फ्लिक्ट , ना पारंपारिक कौशल्य ना प्रस्थापितांचे प्रमाणित कौशल्य अशी त्रीशंकू अवस्था असे बरेच काही त्यांच्या बाबतीत घडत असते. हे टाळायचे असेल तर प्रमाणित आणि पारंपारिक कल्चरल कॅपिटल लक्षात घेवून सहृदयतेने उपाय योजना हवी.>>>
प्रचंड महत्वाचा मुद्दा. ब्रिटीश आल्यानंतर आपल्या पहिल्या काही पिढ्या या त्रिशंकू अवस्थेला नक्कीच सामोर्‍या गेल्या पण त्यातूनच नवी व्यवस्था निर्माण झाली. इथे डॉ. आंबेडकरांचे उदाहरण लख्खपणे दिसते. नव्या कल्चरल कॅपिट्लला आत्मसात करतानाच आपल्या मुळांना कशाची गरज आहे याचे त्यांचे भान अजिबात सुटले नाही. अर्थात हे करणे किती अवघड आहे हेच या उदाहरणातून दिसते. पराकोटीचा न्यूनगंड आणि फुकाचा अहंभाव याचा बॅलन्स अवघड आहे.

>>प्रमाणित संचित गोळा करताना आपल्या मूळांपासून दुरावत जाणे - त्यातून निर्माण होणारे कंन्फ्लिक्ट , ना पारंपारिक कौशल्य ना प्रस्थापितांचे प्रमाणित कौशल्य अशी त्रीशंकू अवस्था असे बरेच काही त्यांच्या बाबतीत घडत असते.
खरंच असं होतं आजकाल? उलट मला तर प्रमाणित संचित गोळा करण्यासाठी उत्साहाने प्रयत्न करणारी मंडळी आढळतात. आणि त्यासाठी मूळांपासून कधी लवकरात लवकर दूर जातोय याची त्यांना घाई झालेली असते.
मूळाकडे परत जाण्याची ओढ सर्वांनाच असते हाच मूळात मोठा भ्रम तर नसेल?>>

जेव्हा आपण कल्चरल कॅपिटलचा विचार करतो त्यात साहित्य, कला, खाण्या-पिण्याच्या सवयी/पद्धती, पेहराव, भाषा, समाजातील आणि कुटुंबातील स्त्री-पुरुषांचा वावर अणि भूमिका -त्याबाबतच्या अपेक्षा, नाते संबंध, कुठल्या गोष्टींवर किती खर्च, काय महत्वाचे, करमणूकीची साधने , शिक्षण-व्यवसाय, धार्मिक बाबी-श्रद्धा-समजूती, पैसा हाताळायची पद्धत वगैरे बरेच काही येत असते. हे संचित समजून -उमजून घेणे फार गरजेचे.
मुळापासून लवकरात लवकर दूर जाण्याची घाई कशासाठी? पारंपारिक जे आहे त्यातले काही अयोग्य असेल, काही कालबाह्य असेल आणि काही काळाच्या कसोटीवर उतरणारे योग्य असेही असेल. त्यातले योग्य ते उचलून जोडीला प्रमाणित संचित अशी शिदोरी योग्य नाही का होणार? घाईघाईने प्रमाणित संचित गोळा करताना नुसतेच अंधानुकरण होत नाहीये ना हे देखील पडताळून बघायला हवे.
मूळाकडे सगळ्यांना परतावेसे वाटलेच पाहिजे असे नाही पण बरेचदा आपल्या मूळांबद्दल एक प्रकारचा कमीपणा मनात असतो, मूळच नाकारायची धडपड दिसते, त्यात पारंपारिक सकस असे जे असते ते देखील नाकारले जाते. मनात हीनत्वाची भावना ठेवून घाईघाईने मूळं नाकारून बाहेर संचित गोळा करायला धावल्यावर कुठेतरी कंन्फ्लिक्ट निर्माण होणारच ना?

तंत्रज्ञानाने संधी वाढल्यात आणि संचित मिळवणे सोपे झाले आहे हे खरे मात्र त्या जोडीला व्यक्तीकडे एक ग्राहक म्हणून बघणेही वाढले आहेच. संचित गोळा करताना आपण खरेच सकस असे काही गोळा करतोय की पारंपारिक नाकारायच्या नादात मार्केटिंग स्ट्रॅटेजीला बळी पडतोय हे देखील तपासून बघायला हवे.
शाश्वत विकास साधायचा तर पारंपारिक संचित समजून घेणे फार महत्वाचे. यातील कुठल्या गोष्टी प्रगतीला मारक आहेत हे लक्षात घेवून उपाय योजना हवी आणि कुठल्या गोष्टी प्रगतीला पुरक ठरतील ते लक्षात घेवून त्यांना प्रोत्साहनही हवे. काही वेळा पारंपारिक टाकून न देता फक्त कालसुसंगत करणे एवढेच पुरेसे असते. प्रमाणित म्हणून नवे स्विकारताना ते आपल्यासाठी खरोखर योग्य आहे ना हे तपासणे फार गरजेचे.