कोण आहे रे तिकडे

Submitted by nimita on 9 May, 2018 - 09:14

मी जेव्हा सैन्यगाथा लिहायला सुरुवात केली तेव्हा तिला वाचकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असं खरंच नव्हतं वाटलं.. जर एखादा भाग share करायला उशीर झाला तर काही वाचक मित्र मैत्रिणी अगदी हक्कानी विचारतात..” झाला का लिहून पुढचा भाग? वाट बघतोय आम्ही, लवकर लिही!”

या आणि अश्या वाचकांमुळे, त्यांच्या प्रेमामुळे लिहायची स्फूर्ती मिळते.

इथे हैदराबाद मधे आम्हां मराठी साहित्यप्रेमींचा एक ‘साहित्य कट्टा’ आहे. महिन्यातून एकदा आम्ही सगळे मिळून हा कट्टा जमवतो, आणि विविध प्रकारच्या साहित्याचं वाचन आणि त्यावर चर्चा, गप्पा होतात.

एप्रिल महिन्यात कट्ट्यावर विनोदी लेखन (आणि तेही स्वलिखित) वाचायचं ठरलं होतं.

त्या निमित्तानी मी माझा एक गमतीशीर अनुभव शब्दबद्ध केला.

आज तेच लिखाण सगळ्यांबरोबर share करते आहे….

सैन्यगाथेचा पुढचा भाग ही लवकरच पोस्ट करीन…

माझ्या या लिखाणाचं शीर्षक आहे…

‘कोण आहे रे तिकडे ???’

माझा सैन्यगाथेचा हा प्रवास आता फक्त माझा एकटीचा नाही राहिला, तर माझ्या या प्रवासात आता माझे वाचक मित्र मैत्रिणी पण माझ्या बरोबर वेगवेगळे अनुभव घेताहेत.

आज तुम्हाला परत लोहितपुर ला घेऊन जाणार आहे. माझ्या त्या पहिल्या वहिल्या घरात…

नितीन LRP साठी गेलेला असताना एके दिवशी मी माझा मॉर्निंग वॉक संपवून परत आले होते. पहाटेचे पाच सव्वापाच वाजले असावे. पक्ष्यांचा किलबिलाट सोडला तर बाकी सगळं कसं शांत होतं. तशी तिथे कायमच एक सुखद शांतता असायची म्हणा!

मी जेव्हा माझ्या खोलीत जात होते तेव्हा मला अचानक dining रूम मधून काहीतरी आवाज ऐकू आला. काहीतरी आपटल्याचा….. तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या घराची रचना… kitchen, डायनींग रूम आणि लिविंग रूम असं एक वेगळंच युनिट होतं. मी रात्री झोपायला जाताना kitchen च्या दाराला बाहेरून कुलूप लावून बेडरूम्स च्या सेक्शन मधे जायचे.

Kitchen च्या दाराजवळ जाऊन पाहिलं तर कुलूप लागलेलंच होतं. मला वाटलं की भास झाला असावा. पण तेवढ्यात परत तोच आवाज… आणि आता तर लागोपाठ २-३ वेळा! आवाजावरून असं वाटत होतं की कोणीतरी लाकडावर काहीतरी आपटतंय… तसाच टक टक टक असा आवाज येत होता. आणि आवाज आतूनच येत होता.

आतमधे कोणीतरी होतं हे नक्की ! पण कोण असेल? माणूस की पुन्हा कोणी प्राणी ??

पटकन बेडरूम मधे गेले आणि नितीनची हॉकी स्टिक घेऊन आले.. self defense साठी काहीतरी हत्यार हवंच ना! कुलूप उघडण्याआधी एकदा तिन्ही खोल्यांचा mental scan केला.. लाकडाच्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कुठे कुठे ठेवल्या आहेत ते आठवलं. स्वैपाकघरात फक्त store room मधली shelves लाकडाची होती.

Dining room मधे dining table आणि खुर्च्या..आणि हो, कोपऱ्यात एक छोटं लाकडी स्टूल होतं.

लिविंग रूम मधल्या सोफा chairs तर upholstered होत्या. त्यामुळे तिथून आवाज येणं शक्य नव्हतं. पण तिथली side tables लाकडी होती.

अचानक लक्षात आलं की माझ्या घराची सगळी जमीनच मुळी लाकड्याच्या पट्टयांनी बनली होती.

म्हणजे शत्रू कुठेही दबा धरून बसलेला असू शकतो.. मी हॉकी स्टिक वरची पकड अजून घट्ट केली.

माझा scan पूर्ण झाल्यावर मी हळूच कुलूप उघडलं. लाकडी जमिनीवर चोरपावलांनी जाणं केवळ अशक्य होतं. कितीही हळूहळू पावलं टाकली तरी आवाज व्हायचाच.

आत शिरल्यावर आधी स्वैपाकघरातूनच तिन्ही खोल्यांत एक नजर फिरवली. कोणीच नव्हतं.. म्हणजे मला कोणीच दिसत नव्हतं. तेवढ्यात परत तोच आवाज .. टक !!

आता माझ्यातला शेरलॉक होम्स जागा झाला. मी room by room स्कॅनिंग करायचं ठरवलं. स्वैपाकघरात सगळं ठीकच होतं.. मग store room मधे गेले..हॉकी स्टिक तयारच होती हातात. सगळी shelves चेक केली.. तिथेही all clear..अचानक आवाज बंद झाला. मी किचनच्या दारातून हळूच खाली वाकून dining table आणि खुर्च्यांच्या खाली चेक केलं.. कोणीच नव्हतं तिथे… ना माणूस ना प्राणी! मग via dining room मी लिविंग रूम मधे गेले..तिथेही वरच्या ,खालच्या, मधल्या सगळ्याच लेव्हल्स वर all clear !

आवाज नक्की कुठून येत होता ? कुठेच काही संशयास्पद नव्हतं.

तेवढ्यात पुन्हा ‘टक’ …. आवाज dining room मधून आला होता. मी माझा मोर्चा त्या दिशेनी वळवला.. आणि “युरेक्का….” finally आवाजाचा स्रोत सापडला…. Dining table वर ….

त्याचं असं झालं की ..आदल्या रात्री मी टेबल वर दुसऱ्या दिवशीच्या ब्रेकफास्ट च्या हिशोबानी टेबल सेट करून ठेवलं होतं.. टेबल मॅट वर मधे काचेची प्लेट ,वरच्या बाजूला एका side ला ग्लास आणि दुसरीकडे प्लेट वर तिरकी उपडी ठेवलेली काचेची कटोरी..

पण मधल्या वेळात कसं कोण जाणे, कुठून तरी एक छोटुकलं उंदराचं पिल्लू टेबल वर चढलं. बहुतेक ते खाणं शोधायला प्लेट च्या जवळ गेलं असावं आणि त्याचा धक्का लागून ती तिरकी ठेवलेली वाटी घसरली आणि ते पिल्लू त्या वाटीखाली अडकलं.

ते त्या कैदेतून सुटायची धडपड करत होतं आणि या सगळ्या प्रयत्नात ती वाटी मधून मधून टेबल वर आपटत होती… ‘टक, टक!

सुरुवातीला तर मला त्या पिल्लाची खूप दया आली… इवलासा जीव , एका काचेच्या पिंजऱ्यात अडकून पडला होता.. अंगातला सगळा जोर पणाला लावून ती वाटी उलटवून लावण्याचा प्रयत्न करत होता. क्षणभर वाटलं ,’ वाटी उचलावी आणि त्याला मोकळं करावं.’ पण मग मला सुरुवातीच्या दिवसांतला माझा आणि तमाम उंदरांचा तो लपाछपीचा खेळ आठवला. घराला उंदिरप्रूफ करण्यासाठी मी घेतलेले कष्ट आठवले. छे! आता परत घरात उंदीर नको बाई!

मग आता करू काय या पिल्लाचं? शेवटी पूर्ण विचार करून मी ठरवलं की या उंदराला घराबाहेर नेऊन सोडायचं.

पण कसं?? त्याला हातात धरून बाहेर घेऊन जाण्याइतकी काही मी शूरवीर नव्हते. आणि तसंही मी त्याला पकडू शकले नसते!

मी टेबल जवळ जाऊन परिस्थितीचं निरीक्षण केलं. नीट पाहिल्यावर असं लक्षात आलं की ती काचेची वाटी अर्धी टेबल मॅट वर होती. मी माझी strategy तयार केली.. त्याप्रमाणे मग मी वाटीला वरून एका बोटानी हलकेच दाबून ठेवलं आणि वाटीच्या खालचं अर्ध्यापर्यंत असलेलं ते टेबल मॅट हळू हळू पुढे सरकवत पूर्णपणे वाटीच्या खाली आणलं. माझ्या या कृतीमुळे आता ते उंदराचं पिल्लू टेबल मॅट आणि वाटी यांच्या मधे बंदिस्त झालं.

हा सगळा द्राविडी प्राणायाम आत्ता लिहिताना जितका सोपा वाटतोय तेवढाच त्यावेळी कृतीत आणायला अवघड होता. कारण माझ्या समोर एक चालता फिरता उंदीर होता… पिल्लू जरी असलं तरी होतं उंदराचंच ना! त्यामुळे त्या वाटीला वरून नुसतं बोटानी press करायला पण मला खूप हिम्मत लागली… कारण ते पिल्लू आतून अजूनच धडपड करायला लागलं होतं.

त्यामुळे माझं अर्धं लक्ष तिकडेच लागलं होतं.

परिस्थिती गंभीर होती.. शत्रूपक्ष माझ्या बरोबर डावपेच खेळत होता, पण मी सुद्धा एका आर्मी ऑफिसर ची बायको होेते….आणि तीही शिवाजीच्या मातीतली.

मी गनिमी कावा वापरायचं ठरवलं.

पण जसं जसं मॅट वाटीच्या खाली जायला लागलं तसा तसा उंदिरमामांचा ब्रेकडान्स वाढतच होता.

मी अर्जुनाप्रमाणे फक्त माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि शेवटी त्या उंदराला कैद करण्यात यशस्वी झाले.

आता माझ्या गनिमी काव्यातल्या युद्धनीती चा दुसरा आणि महत्वाचा टप्पा आला होता… शत्रूला त्याच्या कैदखान्यासकट हद्दपार करणे..

मी हळूहळू टेबल मॅट सरकवत टेबलच्या कडेशी आणलं, आणि in one sweeping move, ते मॅट आणि त्याच्यावरची वाटी उचलून घेतली.. मॅट च्या खालून एका हातानी आणि वाटीच्या वरून दुसऱ्या हातानी घट्ट पकडून ऑलमोस्ट पळत आमच्या main gate च्या बाहेर रस्त्यावर गेले.. हो ना … जर तडीपार च करायचं तर मग सरळ देशनिकाला च द्यावा , नाही का ?

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनी जंगल सुरू होत होतं. मी तिकडे गेले आणि खाली वाकून मॅट जमिनीपाशी नेत हळूच वरची वाटी काढून घेतली.. वाट मोकळी मिळताच माझ्या कैद्यानी जिवाच्या आकांतानी जमिनीवर उडी मारली.. माझ्या चेहेऱ्यावर विजयी हास्य झळकलं….

पण ते काही क्षणांपुरतंच….

कारण माझ्या तावडीतून निसटून खाली उडी मारल्यानंतर त्या उंदरानी सरळ about turn केलं आणि माझ्या दोन पायांमधून वाट काढत तो पुन्हा माझ्या घराच्या दिशेनी पळत सुटला आणि बागेतल्या गवतात शिरून नाहीसा झाला!!!

आणि मी मात्र एकाच प्रश्नाचं उत्तर शोधत राहिले……

”गनिमी कावा नक्की कोण खेळलं !”

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाहाहा छान लिहिलाय किस्सा..
टकमक टोकावरून कडेलोट करायचा होता त्याचा. मनीमाऊचा भाचा तो, असं नाक्यावर सोडून याल तर परत येणारच Happy