पाटील v/s पाटील - भाग १

Submitted by अज्ञातवासी on 9 May, 2018 - 07:23

"डॉक्टर तो माझ्यासाठी नव्हता आला."
"म्हणजे?"
"त्याला माझ्या बहिणीशी लग्न करायचं होतं."
अश्या अनेक केसेस माझ्याकडे यायच्या. प्रेमभंगाच्या, एकतर्फी प्रेमाच्या, आणि बऱ्याच काही...
२-३ वेळा तर भावाने दुसऱ्या भावाची बायको पळवून नेल्याच्याही केसेस आल्या होत्या. पण पेशंट ज्याने बायको पळवून नेली तो होता...
"हे बघ, यात तुझी काहीही चूक नाहीये. त्याचा तुझ्या बहिणीवर जीव जडला, आणि त्याला लग्न करावंसं वाटलं त्यात गैर काय? त्याने तुझ्यात तर काही कमी होतं नाही ना?"
"तुम्हाला डॉक्टर कुणी बनवलं हो? आधी ऐकून घ्या कि माझं..." ती इतक्या जोरात माझ्यावर खेकसली, की मी अक्षरशः अंग चोरून खुर्चीवर बसलो.
"तो माझ्या आजीसाठी आला होता.." ती लाजत म्हणाली.
देवा... अशी केस मी पहिल्यांदाच बघत होतो.
ह्या नराधमाला हिच्या बहिणीशी लग्न करायचं होतं, हिच्या आजीवरही याचा डोळा होता... आणि हि चक्क लाजतेय?
वेडेपनाची कुठलीही झाक मला हिच्यावर दिसत नव्हती. तसा मीही नवखाच होतो या क्षेत्रात, पण मला माझ्या ज्ञानावर पूर्ण विश्वास होता.
मला या केसची समूळ माहिती हवी होती.
"तो खूप चांगला होता.... खूप भारी... ताईसाठी तर त्याने जीव एक केला. आजीसाठी तर त्याने अक्षरशः आमच्या घराण्याशी पंगा घेतला."
केस हाताबाहेर आहे, याची मला खात्री पटत होती.
"ताई म्हटली, याच्याशी लग्न केलं असत तर सुखी झाले असते."
तुझी ताई येडी आहे....
"त्याने सगळं इतकं नीट केलं, कि आजीला त्याच्याबरोबर पाठवताना सगळं घर रडत होतं."
तुझा सगळं खानदान येडं आहे....
"तो आला ना, त्यादिवशी मला कळलंही नाही तो कोण आहे, पण जाताना मात्र तो अशी छाप सोडून गेला, कि आता मी त्याच्याविना नाही राहू शकत...."
"असं बोलू नकोस. आपण करू ना उपचार तुझ्यावर. तू नक्की यातून बाहेर पडशील."
"मी वेडी दिसतेय तुम्हाला?" पुन्हा ती इतकी जोरात खेकसली, की....की.... जाऊ दे. आता खुर्चीत जागाच नव्हती अजून अंग चोरण्याइतकी.
तेवढ्यात माझा दरवाजा लोटून कुणीतरी आत आलं.
"सोने, अगं काय वेडापणा लावलाय? मला आता आबांनी सांगितलं."
हि बाई माझ्याकडे ढुंकूनही न बघता सॊनीकडे गेली.
"ताईईईईईई.... "सोनी रडायला लागली.
माझ्या क्लिनिकमध्ये मीच परक्यासारखा बसलो होतो.
पण माझ्या क्लीनिकचा आब राखण मला भाग होतं.
"एक्सक्यूज मी, हे क्लिनिक आहे, आपण स्वतःला आवरा. याचा तुम्हालाही त्रास होईल आणि बाकीच्या पेशंटलाही." मी उत्तरलो
माझ्याकडे कुणी ढुंकूनही बघितलं नाही.
"मला माफ करा, पण आता तुमची वेळ संपत आलीये. बाहेर पेशंट वाट बघतायेत. मी काही गोळ्या....."
"बाहेर काळं कुत्रं बसलंय फक्त, ते तुमचं पेशंट का?" सोनी माझ्यावर खेकसली.
"असूही शकत. तसाही हा चेहऱ्यावरून जनावराचाच डॉक्टर वाटतोय." ताई शांतपणे म्हणाली.
"चल सोने निघुयात... आजी वाट बघतेय घरी..."
आणि मी बेशुद्ध पडायचाच बाकी होतो.......

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहेर काळं कुत्रं बसलंय फक्त, ते तुमचं पेशंट का?" सोनी माझ्यावर खेकसली.
"असूही शकत. तसाही हा चेहऱ्यावरून जनावराचाच डॉक्टर वाटतोय." ताई शांतपणे म्हणाली.
"चल सोने निघुयात... आजी वाट बघतेय घरी..."

>>> lol