तेरा मेरा साथ रहे - सौदागर (१९७३) - एक समर्पित भावनेचा आवाज आणि अभिनय

Submitted by अतुल ठाकुर on 8 May, 2018 - 09:03

hqdefault_4.jpg

अमिताभबद्दल वेगळ्याने काय लिहिणार? त्याचे अनेक चित्रपट आवडले तरी राजश्री पिक्चर्सचा १९७३ साली आलेला "सौदागर" चित्रपट मनात एक वेगळेच स्थान पटकावून आहे. चित्रपटाबद्दल केव्हातरी लिहायचं मनात आहेच. पण येथे मात्र एका आवडत्या गाण्याबद्दल काही बोलावंसं वाटतं. "तेरा मेरा साथ रहे" हे माझं लताने गायिलेल्या आवडत्या गाण्यांपैकी एक गीत. लताबाई गाताना अनेक चमत्कार करतात, मात्र ते त्यांच्या आवाजात गाणार्‍या अभिनेत्रींना पडद्यावर पेलवतातच असे नाही. येथे मात्र नुतन पडद्यावर असल्याने सोन्याला सुगंध मिळाला आहे. बाकी आवाजात ओलावा, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दलची समर्पणाची भावना आणावी ती लतानेच.

गावात राहणारी, विधवा प्रौढा, आयुष्यात आलेल्या अनुभवांमुळे असेल पण जराशी फटकळ, खाष्ट. तिच्या आयुष्यात येतो तो तरणाबंड मोती नावाचा रसिया. ताडाचा रस काढण्यात वाकबगार असलेला तरुण. तिला आधी विश्वास बसत नाही. पण या तरुणाने घातलेल्या लग्नाच्या मागणीने तिच्या आयुष्याच्या जणु सुकलेल्या वेलीला जीवनरस मिळाल्यासारखे होते. लग्नानंतर तृप्त नुतनने आपल्या अपेक्षांचे एक सुरेख चित्र या गाण्याने रेखाटले आहे.

तिला फक्त ती दोघं नेहेमी बरोबर रहावेत इतकीच अपेक्षा आहे. बाकी काही नाही. "दर्द की शाम हो या, सुख का सवेरा हो, सब गवारा है मुझे, साथ बस तेरा हो, जी के भी, मरके भी हाथोंमें हाथ रहे..." समर्पित भावना असलेली गाणी हा आमचा वीक पॉईंट. आणि या गाण्याचा शब्द न शब्द समर्पणाने भिजलेला आहे. रविंद्र जैन यांचे शब्द आणि त्यांचेच संगीत. कधी कधी वाटतं दोन्ही गोष्टी एकाच माणसाने केल्याने हे गाणं इतकं परिणामकारक झालं असेल का?

जीवनरसाने भरलेली वेल जशी हिरवीगार होऊन डोलु लागते, जणु तिचा कायापालटच होतो त्याप्रमाणे पांढरी साडी नेसलेली खाष्ट माजुबी आता गुलाबी साडीत घरातील कामे करताना गुणगुणु लागते, लताने हे सुरुवातीचे गुणगुणणे इतके सुरेख घेतले आहे की एखादी तृप्त ललनाच नजरेसमोर यावी. आणि समोर येते ते हसरी, लाजरी नुतन. लाजरी या अर्थाने जणू एखादी नुकतंच लग्न झालेली नवथर तरुणी ज्या प्रमाणे चेहर्‍यावर दिसेल न दिसेल असा लज्जेचा भाव घेऊन वावरते आणि त्यामुळे ती आणखी सुरेख दिसते तशी नुतन दिसली आहे.

मातीने लिंपलेलं साधंच घर पण अंगणात नुतनचा गाणे म्हणत वावर अगदी सहज झाला आहे. ते तिचं मिरच्या वाळवायला घालणं, हुक्का खांबावर टांगणं सारंच काही हौसेने नवीन संसार सजवणार्‍या तरुणीला सजेसं. हे दिग्दर्शकाचं कौशल्य खरंच. पण जेव्हा नुतनसारखी अभिनेत्री असं करते तेव्हा त्यात अलैकिक प्रतिभेचा रंग मिसळलेला असतो.

संसारासुखात भिजून तल्लीन होऊन गाणार्‍या माजुबीला काय ठावूक की तिचा मोती एका फुलबानु (पद्मा खन्ना)नावाच्या मदनिकेत अडकलेला आहे. आणि तिच्याशी लग्न करता यावे, त्यासाठी पैसे जमवता यावे म्हणून त्याने या माजुबीशी लग्न केले आहे. ती तर या रसियासाठी केवळ एक शिडी आहे. गाण्याच्या शेवटी अमिताभ येतो. गाणे ऐकून त्याचे पाय थबकतात. त्याला आपण जे करीत आहोत ते गैर आहे असं क्षणभरासाठी तरी जाणवत असेल का?

बहुधा नसेल कारण गाण्यातच हे प्रकरण फार पुढे गेलेलं दिसून येतं. तो येण्याआधी मात्र येथे समर्पित भावनेने वातवरणच पवित्र व्हावे अशा तर्‍हेने नुतन गात असते " तु कभी मेरे खुदा मुझसे बेजार न हो...!" नुतनचं हे समर्पण, तो भाव मनात कायम वस्ती करून राहिला आहे.

अतुल ठाकुर

गाण्याचा विडियो येथे पाहता येईल
https://www.youtube.com/watch?v=DKRHhVY6kQw

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. माझा अत्यंत आवडता सिनेमा आणि हे गाणं पण अत्यंत सुंदर.. खास करून नूतन अमिताभच्या मिठितून धावत सरळ बाहेर येऊन थेट आंगण झाडू लागते, गूळ तयार करते ते, हुक्का भरते हे प्रसंग प्रचंड खरेखुरे वाटतात.

पुन्हा पुन्हा पाहिला तरी एक कंटाळा न आणणारा सिनेमा.

वा! उत्तम लिहिलंयत Happy अत्यंत आवडतं गाणं आणि चित्रपट. प्रत्येक शब्दाशी सहमत आहे. अशा गाण्यांवर लिहिता ह्यासाठी तुम्हाला विशेष धन्यवाद दिले पाहिजेत.
कुठेही केव्हाही ऐकलं तरी थबकून पूर्ण ऐकूनच पुढे होण्याच्या कॅटेगरीतल्या काही गाण्यांपैकी एक गाणं आहे हे. घरी असले तर तेवढी मिनिटं काम सपशेल ठप्प केलं जातं.

हा एक जमून आलेला चित्रपट आहे. (शबाना-कार्नाडांचा स्वामीसुद्धा असाच आहे) साधी चारच ओळींची पण रंगवून सांगितलेली गोष्ट, पार्श्वभूमीला देखणं बंगाली खेडं, कोड्यांमधल्या रिकाम्या जागांमधले तुकडे चपखल जाऊन बसावेत तशी पात्रयोजना, कान आणि मन दोन्ही तृप्त होतील अशी स्वर-शब्दरचना आणि त्यांचं डोळे तृप्त व्हावेत असं चित्रिकरणही. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुरेख आहे. डोलायला होतं अगदी. नूतन तर ए वन आहेच, पण ह्यातला अमिताभही खूप आवडून जातो. सुरुवातीचा रगेल, माजखोर, स्वार्थी ते शेवटचा ओशाळलेला, डोळे उघडलेला असा ग्राफ प्रभावी रेखाटलाय त्यानं. त्याचं 'हर हसीं चीज का' सुद्धा झकास आहे. तो किशोरसुद्धा वेगळा आहे, रविंद्र जैन जादूगार वाटतात.

हा मूवी जेव्हा मला ‘कळला’ त्याच्यानावासकट तेव्हा खूपच भावला. अमिताभचा ( मोतीचा) राग आलेला पुर्ण चित्रपट बघताना कारण त्याचा स्वार्थेर्पणा आपल्याला दिसलेला आणि नुतनला नाही( माजिबीला) आणि ती भोळेपणाने सर्वस्व देते.
नुतनच्या साड्या सर्व लिनन आणि बंगाल कॉटनच्या मस्त आहेत ह्यात.
फक्त एकच अजूनही गाणं बघते तेव्हा खटकतेच,
माजीबी मुस्लिम असूनही कपाळाला कुंकू लावलेली दाखवेलीय.
वातावरण तर मुस्लिम बंगाली आहे ते खटकते आणि सर्व शब्द ठ्ळक शुद्ध हिंदीत आहेत , एखाद दुसरे उर्दु शब्द सोडले तर.
पुर्वी चित्रपटात दाखवलेल्या वातावरणाशी, पात्राच्या बोलीनुसार गाणे असायचे असे मला वाटायचे.
ह्यातले दुसरे सुद्धा माझे फेव गाणे आहे,
सजना है मुझे

बाकी, ह्या खजूरच्या गुळाची खीर अप्रतिम होते . माझ्या साबांना दुसरा गुळ आवडतच नाही.

उत्तम लेख

हा सिनेमा ज्या वयात पाहिला तेव्हा अमिताभबद्दलचे वेड इतके होते की त्याचा गूळ विकला जात नसताना त्याच्या चेहर्‍यावर उमटणारे केविलवाणे भाव पाहून अक्षरशः रडायला येत असे.

सुरूवातीच्या काळातला अमिताभचा एक खूप चांगला सिनेमा.

अगदी अगदी विजय, मला पण रडू यायचे.
पद्मा खन्नाने पण सुरेख काम केलेय.
'क्यों लाये सैय्या पान, मेरे होठ तो यु ही लाल... मध्ये तर बहार आणली आहे तिने.
सजना है मुझे, आणि तेरा मेरा साथ रहे ही दोन गाणी इतकी गाजली की मेरे होठ् तो यु ही लाल थोडं मागे पडलं,
पण गाणं सुरेल आहे..

गाणं पहिल्यांदा पाहतेय..
मिरच्या अश्या का उबडल्या तीने...आणि शिंक वगैरेपन येत नाही असं करताना? वर तेच हात धुतलेल्या साडीला लावले Sad
मला त्याचच टेन्शन आलं जास्त..
गाणं मस्तच बाकी.. सौदागर पिच्चर पाहिला नाहीए मी..

माजीबी मुस्लिम असूनही कपाळाला कुंकू लावलेली दाखवेलीय.
वातावरण तर मुस्लिम बंगाली आहे ते खटकते आणि सर्व शब्द ठ्ळक शुद्ध हिंदीत आहेत , एखाद दुसरे उर्दु शब्द सोडले तर.
पुर्वी चित्रपटात दाखवलेल्या वातावरणाशी, पात्राच्या बोलीनुसार गाणे असायचे असे मला वाटायचे.>>>>>>

बंगालात असेच होते. तिथले मुस्लिम धर्माने मुस्लिम होते, पण संस्कृती बंगाली होती. बांगला देशाने पाकिस्तान नाकारून स्वतःचे स्वतंत्र राष्ट्र वसवले त्यात त्यांची संस्कृती व त्यांच्यावर लादण्यात आलेली उर्दू संस्कृती यांचा मेळ होत नव्हता व बंगाल्याना स्वतःची संस्कृती जीवापाड प्रिय होती हे प्रमुख कारण होते. कित्येक बंगाली मुस्लिमांची नावे हिंदू आहेत. त्यांच्या स्त्रिया या देशाची मूळ संस्कृती पाळतात. तस्लिमा नसरीन कित्येक फोटोत ठळक कुंकू लावून दिसते. आता हे सगळे लयाला जातेय, संस्कृतीपेक्षा धर्म श्रेष्ठ ठरतोय. स्वतः तस्लिमा नसरीनने तिच्या आत्मचरित्रात तिची बंगाली संस्कृतीबद्दलची ओढ व आता मुस्लिम धर्माचे त्यावरील आक्रमण याबद्दल लिहिलेय. असो.

हे गाणे माझे अतिशय आवडते. लताच्या सगळ्याच गाण्यात भावना दिसतात. सूर नीट लागला का, शब्द नीट उमटताहेत का वगैरे चिंता करायचा प्रसंग तिच्यावर कधी आलाच नसल्याने तिचे लक्ष कायम गाण्यातल्या भावना आवाजातून पोचवण्याकडे असायचे बहुतेक Happy त्यामुळे तिने गायलेले गाणे कायम सुंदरच वाटत राहिले. तेच गाणे जेव्हा इतर गातात तेव्हा लताचा आवाज काय चीज आहे हे कळते.

गाणे इतके सुरेख, शब्द इतके ओघवते की ऐकताना सोबत गुणगुणले तरी प्रेमाची नशा चढल्यासारखी वाटते. पूर्ण समर्पणाची स्त्री सुलभ भावना एक पुरुष कवी इतक्या तरलतेने मांडू शकला याचे कधी आश्चर्य वाटते.

चित्रपट पाहिलेला तेव्हा फारसा आवडला नव्हता कारण मी जेव्हा पाहिला तेव्हा अमिताभचा यंग अँग्री मॅन बेधुंद राज्य करत होता, त्या राज्यात हा माजोरडा, फसवणारा व नंतर शरण जाणारा अमिताभ कुठेच बसत नव्हता. दूरदर्शनवर पाहिलेला, खूप निराशा झालेली.

त्यामुळे आता फारसे आठवत नाही. परत पाहायला हवा. आता आवडेल याची खात्री आहे Happy

साधना.... किती सुंदर प्रतिसाद! Happy
धूप हो, छाया हो, दिन हो की रात रहे......! अप्रतिम शब्द, मुग्ध, मधुर स्वर आणि नूतनचं लाजवाब सादरीकरण !

खुप छान लिहिलय.. खरच या गाण्यातील तिचा वावर अन गाण सहजगता वाटत राहतो.. छान आहे चित्रपट.. सजना है मुझे हे गाणं देखिल मस्त..

छान लिहिले आहे. आवडीचा चित्रपट आणि आवडीचे गाणे. अमिताभचा राग येतो पूर्ण चित्रपटात आणि त्याला अद्दल घडावी असे वाटते. सर्वांचा अभिनय खूप सुरेख.

त्याचं 'हर हसीं चीज का' सुद्धा झकास आहे. तो किशोरसुद्धा वेगळा आहे, रविंद्र जैन जादूगार वाटतात.
सई अगदी खरं आहे. अशा तर्‍हेच्या वेगळ्या किशोरवर सुद्धा लिहावंसं वाटतं. प्रतिसादाबद्दल आभार.

झंपी "सजना है मुझे" सुरेखच. मला पद्मा खन्नासाठी खास आशाताईंचा आवाज घेणे खुप आवडले. अल्लडपणा असलेला आणि त्याचवेळी नुतनसाठी लताचा समजुतदारपणाची छटा असलेला आवाज.

विजय, दक्षिणा, तो सीन मस्तच आहे. पहिल्या दिवशी लोकांना मागच्या वर्षीची आठवण होऊन अमिताभचे टोपले लगेच रिकामी होते आणि गुळ निकृष्ट आहे म्हटल्यावर माणसे दुसर्‍या दिवशी कांगावा करतात. बाकी बच्चनसाहेबांची टोपली घेऊन उठण्याबसण्याची देहबोली अप्रतिमच.

साधना सुरेख प्रतिसाद. आभार.

बाकी सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy

छान लिहीले आहे. मलाही 'हर हसीं चीज....' जास्त आवडते.

यात ती अमिताभ पेक्षा चांगला गूळ बनवते ना? तो अमिताभच्या फिल्मी आयुष्यातला त्याच्या बायकांचे कौशल्य त्याच्यापेक्षा जास्त चांगले असण्याचा दौर असावा Happy उदा: अभिमान. तसेच पूर्ण पिक्चरभर मिशा असलेले काही एक दोनच रोल आहेत त्याचे, त्यातलाच हा एक, आणि गंगा की सौगंध.

गाणे यु ट्यूबवर पाहताना लगेच लक्षात येणारी अजून एक गोष्ट - माजुबी सुरवातीला गुणगुणत असते तेव्हा काट्यानी भरलेला पांगारा दाखवलाय व त्या काट्यात फुललेली फुले, तिच्या आयुष्याशी किती साम्य..

एक अत्यंत चांगला सिनेमा. अमिताभ सुपरस्टार बनायच्या आधीचा असल्यामुळे हा निगेटिव्ह रोल स्वीकारला असावा. स्टोरी साधी असली तरी प्रभावी आहे. अत्यंत चाकोरीबाहेरची सिचुएशन, बंगाल, ताडाचा गूळ बनवण्याचा व्यवसाय इ. पण सगळे तपशील व्यवस्थित दाखवले आहेत. सिनेमा हिंदीत असल्यामुळे भाषा हिंदी हे खटकते पण ती एक तडजोड आहे.

एक गोष्ट ह्यातून दिसते ती म्हणजे मुस्लिम महिलांची दयनीय स्थिती. स्वार्थी नवरा कुठलेही कारण नसताना तलाक देऊ शकतो आणि समाजाला ते स्वीकारावे लागते. स्त्रीला अन्यायाविरुद्ध कुठलीही दाद मागता येत नाही. नायकाने आधीच ठरवले असते की केवळ पैसे मिळवण्याकरता त्या स्त्रीशी लग्न करायचे आणि यथावकाश टाकून द्यायचे पण तरी काही दाद फिर्याद करता येत नाही. अत्यंत पुरुषप्रधान संस्कृती.

नायकाने आधीच ठरवले असते की केवळ पैसे मिळवण्याकरता त्या स्त्रीशी लग्न करायचे आणि यथावकाश टाकून द्यायचे पण तरी काही दाद फिर्याद करता येत नाही. अत्यंत पुरुषप्रधान संस्कृती.>>>>

दाद फिर्याद दूरची गोष्ट, होऊ घातलेल्या सासर्याला तो सांगतो की 'दक्खनकी हवा शुरू हुई की गयी मझुबी उसके साथ उडते' आणि सासरा 'तुम दिमाग से काम करनेवाले लगते हो, खूब निभेगी तुम्हारे साथ' म्हणत ते योग्यच असल्याचे मान्य करतो.

मोतीची नमकहरामी सहज स्वीकारणाऱ्या माणसाचे मला नवल वाटले. पण तशा घटना कायम घडत असणार, त्यामुळे त्याला काहीही खटकले नाही, उलट असे काही आपल्या मुलीच्या बाबतीत झाले तर तिचे हाल नको म्हणून तो भरपूर मेहर घेतो, तिच्या नावावर पोस्टात ठेवायला.

पूर्ण चित्रपट कोलकात्यातील गावात चित्रित केलाय. गावातल्या घरापेक्षा अंगणेच जास्त वेळ दिसतात. त्यांची कुंपणे त्या घरात राहणाऱ्या माणसांची आर्थिक स्थिती दाखवतात. मझुबीचे अगदीच शिरटाचे कुंपण, मोतीचे वेताच्या बांबूचे तर मझुबीच्या तिसऱ्या नवऱ्याचे बांबूच्या चटया लावून एकदम पॅक केलेले कुंपण. नदी, त्यातल्या छोट्या होड्या व पाठीला पोटे लागलेले त्यांचे नावाडी.

छान आहे लेख. त्रोटक नाही वाटला. अमिताभ आवडता असल्याने, हा असला निगेटिव्ह रोल त्याने का केला असे वाटुन पूर्ण सिनेमात त्याच्या स्वार्थीपणाचा रागच आला. आणी साहजीक आहे की नूतनसाठी वाईट वाटले. दोन्ही कलाकार उच्च दर्जाचे असल्याने हा सिनेमा सुसह्य झाला. पद्मा खन्ना पण बरी वाटली यात. निगेटिव्ह रोल करणे सोपे नसते, कसौटीच असते ती पण एक.

साधना ने दिलेली माहिती आवडली. साधनाकडुन नेहेमीच नवीन चांगले वाचायला मिळते. धन्यवाद साधना!

अतुलजी, लिहीत रहा. तुम्ही जुन्या सिनेमांबद्दल खूप छान माहिती देता.

साधना अतिशय सुरेख प्रतिसाद. खुप खुप आभार.
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार Happy
आणखी अशी अनेक जुनी गाणी, चित्रपट यांवर लिहायचंय. लिहिताना पुन्हा नव्याने चित्रपट पाहता येतो. पुन्हा गाण्यांचा आस्वाद घेता येतो. त्या जुन्या जगात जाण्याचा आनंदच वेगळा Happy

सुरेख लिहिले आहे. मस्तच.
माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी हा एक आहे. कलेक्शनमध्येही आहे.
सुंदर चित्रपट, सुंदर लेख.

हा लेख वाचून पुन्हा ऐकले/पाहिले गाणे. अतिशय सुंदर आहे. नूतन थोडी मोठी दिसते वयाने. अमिताभची फिल्म पर्सनॅलिटी तयार होण्याच्या आधीचे त्याचे रोल्स वेगळेच वाटतात एकदम.

Pages