अपूर्ण प्रेम

Submitted by somu on 5 May, 2018 - 08:07

" मला पण तुझ्यासारखाच जोडीदार हवा आहे पण मी तुझी जोडीदार होऊ शकत नाही. माफ कर मला " म्हणून अमृता तेथून निघून गेली.....

कुमारच्या पाणीभरल्या डोळ्यासमोरून पूर्ण घटनाक्रम येऊन गेला........

-----------------------------------
" कुमार, अरे आजीची तब्येत बरी नाही तिला ऍडमिट करावे लागू शकते. म्हणूनच सांगतेय ना तुला की आम्हाला नाही जमणार दिप्तीच्या लग्नाला जायला, तू जाशील का ? "

" माहिती आहे ना तुला, मला नाही आवडत असल्या कार्यक्रमात जायला. आणि काकूचे माहेरकडचे कधीतरी बोलतात का आपल्याशी. मग का जायचे आपण ? " कुमार वैतागत बोलला.

" दीप्ती दोन वर्षांची होती तेंव्हा तुझ्या काकांनी काकूंना घटस्फोट देऊन ते वेगळे राहायला लागले. काकूनेच मोठे केले तिला. माहेरी भाऊं गेल्यानंतर त्याच्या घरात राहत कसे दोघींनी दिवस काढलेत तिथे तुला काय सांगू.... आम्हीच जाणे गरजेचे होतंस पण.... " आई बोलली.

" हो ग, माहिती आहे मला. पण तुम्ही नाहीत, मी एकटा जाऊन काय करणार ? मला तर कोणीही ओळखत पण नाही तिथे. " कुमार तक्रारीच्या स्वरात बोलला.

" तुला कधीपासून ओळख हवी रे, बालवाडीतल्या मुलांपासून नव्वद वर्षाच्या लोकांबरोबर मिसळून असतोस की आणि आपली कीटी आहे की बरोबर "

" ते मांजर नाही नेणार मी बरोबर.. किती पकवते ती आणि आवरत पण नाही लवकर. दुपारी चारला जायचे तर तिला सकाळी दहा सांगावे लागते.. मी जाईन पण तिला नाही नेणार तिला हं... "

" जा मग एकटा, मी येईन बसने. मला नाही गरज तुझी आणि तुझ्या फडतूस गाडीची. " केतकी फणकार्यात बोलली..

" आता तर नाहीच नेणार तुला, मांजर कुठली.... किटी... म्याव म्याव..."

" कोक्या थांब बघतेच तुला " केतकी कुमारला मारायला धावली.

कुमार तिला चुकवून ऑफिसला निघून गेला..

कुमारने कॉलेज झाल्यावर startup सुरू केले होते. कामाची चिकाटी आणि तोंडात साखर याच्यामुळे अल्पावधीतच जम बसवला होता.

केतकीने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.

आई हसत आपल्या दोन्ही बाळांची भांडणे बघत होती. तुझे माझे पटेना आणि तुझ्या शिवाय करमेना अशी अवस्था होती दोघांची.

केतकी नावाप्रमाणे गोरीपान, घारे डोळे आणि बिन फ्रेमचा चष्मा..... आणि कुमार गोरा पण थोडा रापलेला, कराटे ब्लॅक बेल्ट त्यामुळे स्पोर्ट्स बॉडी... पण स्वभावाने दोघेपण नम्र आणि दुसऱ्याच्या हृदयात स्थान मिळवणारे....

अभिमान होता आईला दोघांचा..

" कोक्या, तू नीट चालवं गाडी नाहीतर कोणत्यातरी मुलीकडे बघत खड्ड्यात घालशील गाडी " केतकीने कुमारला चिडवले.

" हट्ट, मी नाही बघत मुलींकडे माहिती आहे ना तुला "

" अजून एखादी सुंदर अप्सरा आली नसेल तुझ्यासमोर म्हणून.. ती येऊ दे मग सांग मला "

-----------------------------------------

" अरे या, दीप्ती.... कुमार आणि केतकी आले बघ " काकूने त्यांना बघून दिप्तीला हाक मारली.

" कुमार तू आलास हे बरे झाले. मला वाटले तू येत नाहीस. " कुमारच्या मिठीत जात दीप्ती बोलली.

" तुझ्या त्या घोड्याचे कान पिळायला नकोत का ? " कुमारने हसत उत्तर दिले..

" हे बरंय, काकू बघ बंधुप्रेम किती उफाळून आलाय ते.. मी आलेली कोणालाच दिसत नाहीय " गाल फुगवत केतकी बोलली.

" अग किटी, तू कशी नाही दिसणार मला... माझी लाडूबाई " म्हणत दिप्तीने केतकीलापण जवळ घेतले.

" तू आणि अमू दोघी करवली आहात ना ? " काकूपण केतकीचे लाड करत बोलली.

" अमूताई कधी येत आहे ग? " केतकीने विचारले

" मुंबईला गेली आहे प्रोजेक्ट प्रेझेंटेशन साठी. उद्या सकाळी येईल ती"

" बरं झाले. कितीतरी वर्षे झाली तिला भेटून. मजा येईल ती आली की. " खुश होत केतकी बोलली.

" अरे आलात तसे बसा थोडे , नाहीतर तुमचे आई बाबा म्हणतील आम्ही त्यांच्या मुलांना कामे लावली म्हणून " थोडे तिरसटपणे मामी आत येत बोलल्या.

ते ऐकून काकूंचे डोळे पाणावले.

मामी गेल्यावर काकू दोघांना बोलल्या " लक्ष देऊ नका तुम्ही. बोलतात पण मनाने चांगल्या आहेत त्या "

" काकू, तू काही वाटून घेऊ नको. आता आलोय ना मी सगळे सांभाळून घेतो.. बघच तू " काकुजवळ जात कुमार बोलला.
------------------------------------------

संध्याकाळी जेवण झाल्यावर सर्वजण हॉल मध्ये गप्पा मारत बसले.

" मामी काकू , कामाचे काय प्लांनिंग आहे ते सांगा म्हणजे उद्या सकाळपासून काम सुरू करता येईल " कुमार बोलला.

" अमृता आली की ती सांगेल सर्व. दिप्तीच्या खरेदी पण आहे ती पण अमृता अली की करता येईल " मामीनी सांगितले.

" मेहंदीचे काय ठरवले आहे , मी काढू का ताई तुला मेहंदी ? " केतकीने विचारले.

"नको, अमृताची मैत्रीण येणार आहे मेहंदीसाठी. अमृता आली की तिला फोन करेल " मामीनी सांगितले.

रात्री झोपताना केतकी उद्गारली " कोक्या, इथे सगळे अमुच करणार आहे असे दिसतंय. आपण नुसते हुकमाचे ताबेदार "

" तसे नाही ग. हे बघ आपण दोघेही या गावात नवीन. दीप्ती नवरी मुलगी, तिला बाहेर पडता येणार नाही. म्हणून त्या म्हणत असतील की अमृता आली की सर्व बघेल. "

" हम्म, खरं आहे तू म्हणतोस ते "

" हे बघ, आपण आपल्याला जमेल तितकी मदत करायची. आई बाबा इथे नाहीत ही जाणीव पण नाही झाली पाहिजे त्यांना "

" हो ना. बघू उद्या बोलते मी अमृता आली की...... आता ओळखणार पण नाही अमृता समोर आली की. दहातरी वर्षे झाली असतील बघून "

" हम्म " झोपेच्या अधीन होत कुमार म्हणाला

----------------------------------

" कुमार, कोठे गेला होतास इतक्या सकाळी " काकूने विचारले.

" मॉर्निंग वॉकला गेलो होतो. का ग काही काम होते का ? " अरे हो. अमृता येतेय रेल्वेने. तिला घेऊन येशील का ? "

" हो आणतो. पण तिचा मोबाईल नंबर दे. तिला बघून भरपूर दिवस झालेत. बहुदा मी ओळखणार नाही तिला "

" हम्म, हा घे तिचा नंबर " म्हणून काकूने त्याला नंबर दिला तो त्याने मोबाईलमध्ये सेव्ह केला.

दिप्तीकडे जाऊन कुमारने विचारले "अग अमृता कशी दिसते. कसे ओळखू मी तिला ".

" हम्म. तू सध्या बघितले नाही ना तिला म्हणून. हे बघ, गाडीतून उतरणारी सर्वात जाड मुलगी.... तीच अमृता " दिप्तीने सांगितले.

" जाड मुलगी.... काय नशीब आहे आमचे " असे बोलत कुमार फ्रेश व्हायला गेला.
-------------------------------
" लहानपणी किती जाड होती ती, गहुवर्ण, कुरळे केस. किती गोड हसायची. गालावर सुंदर खळी पडायची तिच्या....... " असा विचार करत कुमार बसला असताना त्यांच्या कानावर अनऊन्समेंट पडली
" मुंबईहून येणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 वर येत आहे.... " हे ऐकून कुमार प्लॅटफॉर्म नंबर 1 कडे चालू लागला.

" एस 6 बोगी " असे मनाशी म्हणत तो "S6" च्या बोर्डखाली उभा राहिला.

त्या बोगीतून भरपूर मुली उतरत होत्या. आपल्या आठवणींवर जोर देत कुमार अमृताला शोधत होता.

थोड्या वेळाने एक जाड मुलगी गाडीतून उतरली. कुमार पुढे गेला आणि तिची बॅग हातात घेत म्हणाला " हाय, मी कुमार... "

" कोण कुमार, मी ओळखत नाही तुम्हाला " ती मुलगी बोलली.

" अग, दिप्तीचा चुलत भाऊ "

" कोण दीप्ती, पहिला बॅग खाली ठेवा बघू " ती चिडून बोलली.

आणि एकदम कुमारला मागून हसू ऐकू आले तसे त्याने मागे पाहिले आणि तो स्तब्ध झाला.

बेबी पिंक कलरचा टॉप, निळी जीन्स घालून अमृता त्याच्या मागे हसत उभी होती. कुमार तिच्याकडे बघतच उभा राहिला.

" अरे, मला न्यायला आला आहेस ना मग तिच्याशी काय बोलतोयस " हसत अमृताने विचारले.

" अमृता ? " कुमारने बिचकत विचारले.

" तू अजून तसाच आहेस बघ कुमार " अमृता बोलली.

" अग आता घरी जाऊन ती दीप्ती कशी मार खाते बघ माझा "

" का, काय झाले ? "

" ती म्हणाली की तू जाड झाली आहेस. गाडीतील सर्वात जाड मुलगी म्हणजे तू.... म्हणून मला वाटले ती "
अमृता खळखळून हसली......

" अजूनही हिच्या गालावरच्या खळ्या पडतात.. " कुमार बघत राहिला तिच्याकडे.

" चलायचे का आता ? " अमृताने त्याला भानावर आणत विचारले.

" हो " तिची बॅग उचलून तो गाडीकडे निघाला.

बॅग डिकीत टाकून तो ड्रायविंग सीटवर बसला. अमृता शेजारी येऊन बसली त्याच्या.

त्याला हम आपके है कोन मूवी मधला "आज पहली बार कोई लडकी हमारे गाडी के फ्रंट सीट पे बैठी हैं " डायलॉग आठवला..

" तू. BE Instruments शिकती ना. कसे गेले पेपर.." काहीतरी विचारायचे म्हणून कुमारने तिच्याकडे बघत विचारले.

""अरे कोक्या, तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा किती छान दिसतायत. ""

" चांगले गेले. तुझे काय चाललय सध्या. दीप्ती म्हणाली तू तुझी कंपनी सुरू केली म्हणून " अमृताने विचारले.

" हम्म, स्टार्टअप आहे. ग्राफिक्स डिझाईन आणि वेब मार्केटिंग चे काम करतो आम्ही. सध्या सहा जणांचा स्टाफ आहे. " कुमारने पुढे माहिती दिली

" सध्या पुणे, मुंबई आणि युरोपचे क्लायंट आहेत ".

" छान... "

अमृताशी गप्पा मारत कुमार घरी आला.

बॅग घेऊन दोघे घराच्या दरवाज्यात उभे राहिले आणि समोरूनच केतकी आली आणि ती दोघांकडे बघतच राहिली..

" हाय केतकी, किती बदलेली आहेस तू आणि किती छान दिसत आहेस " अमृता तिच्या हात हातात घेत म्हणाली.

" थँक्स, तू पण किती बदलली आहेस.. एकदम दीपिका पदुकोण सारखी दिसत आहेस.. हो ना रे दादा.. " केतकीने विचारले.

कुमारला काय बोलावे समजेना...

" ती दीप्ती कोठे आहे. आज तिच्यामुळे मी एका मुलीचा मार खाताना वाचलो आहे " म्हणत तो रूमकडे निघून गेला.
-----------------------------

" आज काय एक मुलाची विकेट पडली वाटते .... " खट्याळपणे हसत केतकी कुमारच्या मागे येऊन बोलली.

" गप्प, गाढव कुठली. कोठे काय बोलायचे ते समजत नाही तुला " कुमारने तिला डोक्यात टपली मारत रागावले.

" खरे बोललं की माणसे कशी कावरी बावरी होतात ते बघा " केतकी कुमारकडे बघत बोलली........

" कोक्या, खरे सांगू, तुम्ही दोघे दरवाज्यात उभे होता ना तेंव्हा........... लग्न केल्यावर जसे नवरा बायकोला घेऊन घरी येतो अगदी तसे दिसत होता दोघे "

" गप्प, वात्रट कोठली "

" पण मला ती कोकी म्हणून चालेल " म्हणत केतकी तिथून पळून गेली.

कुमार आरश्यात स्वतःकडे बघत हसला.
--------------------------
" कुमार, बाजारातुन भाजी घेऊन येशील का.... "

" कुमार, फोटोग्राफर आणि व्हिडिओ शूटिंगच्या माणसाकडे जाऊन ये... तुझ्या नवीन कांही डिझाईन कन्सेप्ट असतील तर त्याला सांग... "

" कुमार, बँकेतून पैसे काढून आणशील का ? "

" कुमार, जरा....... कुमार इकडे..... कुमार तिकडे..... "

कुमार नुसती पळापळ करत होता. आता पु. ल. देशपांडेंच्या नारायण सारखे त्याच्या पण लग्न भिनले होते.

काकू, मामी, दीप्ती कोणाचेच पान कुमारच्या शिवाय हालत नव्हते.
---------------
" कुमार, चल काही खरेदी करायची आहे जाऊन येऊ....... " अमृताने कुमारला विचारले.

" ये जाऊन या आरामात. मी बघते सगळे इथलं " केतकी कुमारकडे बघून हसत बोलली.

" चल, आलो मी कपडे बदलून " कुमार फ्रेश होऊन आला आणि गाडी घेऊन दोघे निघाले.
" हे बघ ना, किती छान हा ड्रेस... दिप्तीला छान दिसेल. माझ्या कडून गिफ्ट देणार आहे मी. सांगू नको कोणालाच. " अमृताने कुमारला सांगितले.

" हम्म, खरच सुंदर आहे. घे हा. मी आलोच जरा वरती जाऊन " म्हणून कुमार वरती गिफ्ट सेकशन कडे गेला.

१५ मिनिटात, " चल, झाली का खरेदी " कुमारने अमृताला विचारले.

" हम्म, चल " तिने बिल पेमेंट केले आणि ते तेथून निघाले.

---------------------

खोलीत येऊन कुमारने बॅग उघडली आणि खिशातून एक वस्तू काढून आत ठेवली...

" बघू तरी, कोक्याने कोकीसाठी काय आणलंय ते ? " म्हणत केतकीने ती वस्तू काढून घेतली.
हस्तिदंती कुंकवाचा करंडा होता तो....

" दादा खरेच... मुजरा तुला. हे बघून खरच तू कोक्या नसून माझा दादा आहेस असे वाटले. एवढे आर्टिस्टिक गिफ्ट बायको साठी कोणीच घेतले नसेल " हात जोडत केतकी बोलली.

" अग, असे काही नाही. आवडली म्हणून घेतली इतकेच "

" हो का... बरं... असू दे... असू दे"

------------------------------------------------

कुमार बाहेरून आला आणि त्याने मामीचा आवाज ऐकला " एवढी मोठी झाली तरी तुला समजत नाही का. पैसे सांभाळून ठेवता येत नाहीत का ? " मामी त्यांच्या खोलीत अमृतावर ओरडत होत्या आणि ही गप्प ऐकत होती.

तो रूममध्ये गेला आणि त्याने दीप्तीला वर बोलावले.

" दीप्ती, कांही प्रॉब्लेम झालाय का ? खाली मामी ओरडताना दिसल्या ? "

" अरे कसे सांगू " दीप्ती पुटपुटत बोलली.

" बोल, निश्चिंत होऊन बोल. हे फक्त माझ्याकडे राहील "

" अरे मामीने सकाळी अमुला ATM वरून 10 हजार काढायला सांगितले होते खरेदीला. ते तिच्याकडून हरवले. कोठे आणि कसे हे तिला माहिती नाही. म्हणून मामी तिला ओरडत होत्या " दीप्तीने माहिती पुरवली.

" हम्म, आलोच मी " म्हणून कुमार बाहेर पडला.

--------------

" मामी, अमृता कोठे आहे ? " कुमारने विचारले

" असेल तिच्या खोलीत. का रे काय हवंय ?

" आहो, गाडीत सीट खाली तिचे पैसे पडले होते. आत्ता गाडी साफ करताना सापडले. हे घ्या " म्हणून त्याने पैसे मामीकडे दिले.

" मला वाटले या वेंधळीने हरवले, म्हणत मामी ते पैसे घेऊन रूममध्ये ठेवायला गेल्या.

---------------------------------------

" कुमार, थँक्स पैसे दिल्याबद्दल " अमृता कुमारच्या रूममध्ये येत बोलली.

" अग, थँक्स काय. गाडीत मिळाले मला म्हणून आणून दिले "

" किती सापडले ? "

" दहा हजार "

" सकाळी आपण खरेदीला गेलो होतो. तिथे मी दीप्तीसाठी एक ड्रेस खरेदी केला. त्याचे पैसे मी दिले. ते त्या दहा हजार मधून होते " अमृता गंभीरपणे म्हणाली.

आपण पकडले गेलो हे कुमारच्या लक्षात आले. तो खाली बघत बोलेला " सॉरी. अग तुला मामी ओरडत होत्या म्हणून मी ATM वरून पैसे काढून त्यांना दिले "

" अरे सॉरी काय, उलट मीच थँक्स म्हणायला पाहिजे " हसत अमृता म्हणाली.

" अग नको. तुला बोलत होते म्हणून मला वाईट वाटले "

अमृताने त्याच्या निरागस चेहऱ्याकडे बघत राहिली. तिला वाटले विचारावे त्याला "" हम आपके है कौन ? ""

--------------------------

" चला 2 वाजले. गाडी आली आहे. कार्यालयात जायची वेळ झाली. श्रीमंतपूजन सात वाजता करायचे आहे. मुलाकडील सर्व पोहचतील 5 वाजता. आपल्याला पण जायला 2 तास लागतील. " मामी सर्वांना बोलल्या.

"आई, अग दीप्तीची साडी आली नाही अजून पिको होऊन. एक तासात मिळेल. मी येते घेऊन बसने " अमृताने सांगितले.

" अग, बसने कशाला. दादा थांबू दे. तो घेऊन येईल तुला. चालेल ना ? " केतकी बोलली.

" अमू, तसेच कर. तू कुमारबरोबर ये. आम्ही जातो पुढे" मामीने सांगितले.

" चला निघायला पाहिजे लवकर " म्हणत केतकी बॅग घेऊन कुमार जवळ आली आणि त्याला डोळा मारत हळू आवाजात म्हणाली " उगीच कबाब मध्ये हड्डी नको.. "

-------------------------

" मग, कोणी गर्लफ्रेंड वैगरे आहे की नाही तुझी " अमृताने विचारले.

" नाही ग. वेळच नाही मिळाला बघ या सर्वांसाठी. स्टार्टअप सुरू करायचा हे कॉलेज पासूनच ठरवले होते. त्या मुळे बाकी कोठेच लक्ष दिले नाही " तिच्याकडे बघत कुमारने उत्तर दिले.

" हम्म. ते मात्र खरं. दीप्ती नेहमी कौतुक करत असते तुझे. तुझ्या dedication ने तू भरपूर क्लायंट मिळवले आहेत. भरपूर कमी वेळात भरपूर प्रगती केली आहेस. छान "

" मग, BE नंतर पुढे काय प्लॅन आहे तुझा ? "

" मला. M.Tech करायचे आहे पण.... "

" पण काय ? "

" अरे ऑलरेडी आईने माझ्या इंजिनीरिंग साठी भरपूर खर्च केला आहे. आता M.Tech चा भार तिच्यावर टाकायला नको वाटतंय. बहुदा मी जॉब करेन कांही दिवस आणि पैसे जमा झाले की ऍडमिशन घेईन "

"" आईचा किती विचार करते ही "" कुमारच्या मनात अमृताबद्दल आदर आणखीच वाढला.

" गुड प्लॅन. माझी कोठे मदत लागली तर सांग. मला जॉईन कर म्हणाले असते पण आमचे काम आणि तुझे काम पूर्णपणे वेगळे "

" हो. नक्की सांगेन "

" बाकी कोणी मित्र वगैरे तुझा " कुमारने तिच्याकडे पाहत विचारले.

" कालपर्यंत तरी कोणीच नव्हता. पण आता आहे असं वाटतंय " अमृताने मिश्कीलपणे बोलत त्याच्याकडे हात केला आणि म्हणाली " फ्रेंड्स ? "

तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला " फ्रेंड्स "

----------------------------------------------------------------------------

कुमार तयार होऊन हॉलमध्ये आला. मोती कलरचा झब्बा त्याला छान दिसत होता. सर्व पाहुण्यांना भेटून तो त्यांची विचारपूस करत होता. पण त्याचे लक्ष होते तिच्या वाटेवर... सारखी त्याची नजर जिन्याकडे होती....

" होतेय, कोकी तयार होतेय " केतकी हळूच त्याच्या कानात बोलली.

" होऊ दे की मग. मला काय ? "

" असे का.... सारखे साहेबांचे लक्ष जिन्याकडे आहे म्हणून सांगितले आणि वरतीतर नुसता तुझ्या नावाचा जप चाललाय. सगळे नुसते कुमार.... कुमार.... "

" सगळे ? " कुमारने केटकीकडे बघत विचारले .

" कोकी सुद्धा " हसत केतकी बोलली.

-------------------

जांभळ्या कलरच्या घागरा आणि चोळीमध्ये अमृता खरंच सुंदर दिसत होती. कुमार हॉलमध्ये कोठेपण असला तरी त्याचे लक्ष फक्त अमृतकडेच होते.

चोरून त्याने तिच्या भरपूर छबी कॅमेरामध्ये टिपून घेतल्या.

श्रीमंतपूजन झाल्यावर मस्त गाण्याच्या भेंड्या रंगल्या होत्या........ आज काय माहीत अमृता आणि कुमारच्या तोंडातून फक्त रोमँटिक गाणी निघत होती.. आणि प्रत्येक गाण्याच्या वेळी त्याचे लक्ष एकमेकांकडेच होते.

केतकीने हळूच दिप्तीला डिवचले आणि खुणेनेच दोघांकडे बघ म्हणून सांगितले... दिप्तीच्यापण लक्षात सगळं आले. तिच्या चेहऱ्यावर हसू आले आणि तिने केतकीला डोळा मारला...

-----------

भेंड्या संपल्यावर दिप्तीने कुमारला स्टेजवर बोलावले.

" काय चाललय तुझे कुमार.. मघापासून बघतेय मी "

" काय कोठे... काही नाही " कुमार चपापुन बोलेला.

" नाही काय.. सारखे अमूकडे बघत असतोस "

" नाही ग.. तू समजते तसे काही नाही "

" नाही काय.. मी काय दूधखुळी आहे.... तिला कांही बोलला नाहीस ना "

" नाही " खाली मॅन घालून कुमार बोलला.

" अरे मग खुळ्या कधी बोलणार... " हसत दीप्ती बोलली.

" किती घाबरवलं तू मला "

" अरे, अमू आवडेल मला वहिनी म्हणून. पण तिला कल्पना दे की मी सांगू ? "

" नको मी बोलतो तिच्याशी.... Thanks for understanding... "

" वेळ करू नको "

---------------------------------------

रात्री सगळे झोपायला गेले. कुमार अजून स्टेजवर नवरा नवरीच्या खुर्चीत बसून होता.

" कसला विचार करतो आहेस. झोपणार नाहीस " अमृता त्याच्याजवळ जाऊन त्याच्या शेजारील खुर्चीत बसत बोलली.

" सहज बसलो होतो.. "

" कसला विचार चाललाय ? "

खाली बघत कुमार शांत बसला.

" बोल रे, काय झाले ? "

" कसे बोलू समजत नाही "

" सांग, आपण आता बेस्ट फ्रँड आहोत ना "

" हम्म.. " तिच्या डोळ्यात बघत तो पुढे म्हणला " मला वाटतंय की...... "

" काय ? "

" मी प्रेमात पडलोय.... "

" मस्त.... कोणाच्या ? " उत्साहीत होत अमृताने विचारले.

" माझ्या बेस्ट फ्रँडच्या.... तुझ्या... "

अमृता एकदम गंभीर झाली..

कुमार ते बघून बोलेला " हे बघ, ही माझी फीलिंग आहे.. not necessary तुला पण तसेच वाटले पाहिजे... "

" तसे नाही रे, तुझ्याबरोबर हे चार दिवस घालवल्यावर मला पण काहीसे असेच फीलिंग आले आहे "
अमृता गंभीरपणे बोलली आणि एकदम खळखळून हसली...

" I also love u my dear friend " अमृता बोलली...

" thank god... मला वाटले तू चिडशील "

" नाही रे, उलट तू express केले ते बरे झाले...may be मी बोलू शकले नसते "

" मी घरी जाऊन बोलतो घरच्यांशी... तू पण सांग... तसे दिप्ती आणि केतकीला माहिती आहे हे.. " कुमारने सांगितले

" हम्म, एवढी लग्नाची गडबड आवरली की मी बोलते आईशी "

हळूच तिचा हात हातात घेत कुमार बोलला " लव्ह यू "

" मी टू " तिने लाजत उत्तर दिले.

-------------------------------

सकाळी उठल्यावर केतकी उठून अमृताकडे गेली.. ती शांत झोपली होती आणि तिच्या चेहऱ्यावर स्मित होते..

" उठा मॅडम " तिच्या जवळ बसत केतकी बोलली.

" हम्म " केतकीला बघून अमृता उठून बसली.

" काय मग, काय बोलत बसला होता दोघे रात्री ? " केतकीने तिला विचारले.

" तुला माहिती आहे की ? " अमृता लाजून बोलली.

" माझी कोकी ग ती " तिच्या गालावर हात फिरवत केतकी बोलली

" कोकी म्हणजे काय ? " न समजून अमृता बोलली.

" कुमार कुलकर्णी म्हणजे कोक्या... आणि तू कोक्याची कोकी "

अमृताच्या गालावर फुललेले गुलाब पाहायला कुमार खरच हवा होता तिथे....

-------------------------------------

पूर्ण लग्नाचा दिवस कुमार, अमृत दोघेही हवेत असल्यासारखे वागत होता. केतकी आणि दीप्ती त्यांना चिडवत मजा घेत होते.

दिप्तीने जाताना दोघांना जवळ बोलावून सांगितले आता योग्य वेळ बघून दोघेही घरी सांगा....

----------------------------------------
" कुमार आणि केतकी..… अभिमान आहे आम्हाला की तुम्ही आमची मुले आहात " आई आणि बाबा कौतुकाने म्हणाले.

" काकू, मामी आणि सगळे पाहुणे सांगत होते दोघांनी पूर्ण लग्न ओढून नेले. प्रत्येक कामात मदत केली म्हणून "

" हो ना, कोक्यातर मनच जिंकून आलाय " केतकी कुमारकडे बघत बोलली.

" हम्म... सगळ्यांचे मन जिंकलाय त्याने " कौतुकाने आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.

" अग तसे नाही, कोक्याने कोकी शोधली आहे तिथे " केतकी आईच्या पाठीमागे लपत बोलली.

" कोण, कोण ग ? जरा आम्हाला पण समजू दे " हसत आई बोलली.

" त्याचा कॅमेरा घेऊन बघ, तुला फक्त एकीचेच फोटो दिसतील............. आपली अमू "

" काय सांगते, अमृता... अरे वा...."

" आई, मला आणि दिप्तीला कोकी पसंत आहे...... "

कुमार लाजून खाली बघत होता.

" आहो, तुमचं बाळ कसे लाजतंय बघा "

----------------------------------------------

" कुमार आणि केतकीची भरपूर मदत झाली ना ? " काकूने मामीला म्हणले.

" हो, कुमारने बाहेरची सगळी आणि केतकीने दिप्तीची पूर्ण जबाबदारी घेतली. आणि भरपूर नम्र आहेत दोघेही. " मामी बोलेल्या.

दोघांचे कौतुक ऐकून अमृता खुश होत होती... तिच्या गालावर मस्त लाली चढली होती...

--------------------------------------------------

" हॅलो कुमार, मी येतेय कोल्हापूरला. युनिव्हर्सिटीला काम आहे माझे. तुला वेळ येशील का माझ्या बरोबर ? "

" किती पर्यंत पोहचशील ? मी येऊन थांबतो स्टँड वर "

-------------------------------------------------

" या मॅडम " कुमार हसत अमृताच्या समोर गेला.

कुमारला बघून अमृता येऊन त्याला बिलगली...

" काय काय प्लॅन आहे तुझा " गाडी सुरू करत कुमार बोलला.

" युनिव्हर्सिटीमध्ये कॉव्होगेशन आहे आज. डिग्री मिळणार आहे. माझी इच्छा होती की तुझ्यासोबत डिग्री घ्यावी. "

" छान, its my pleasure " कुमारने तिचा हात हातात घेत म्हणले.

कॉव्होगेशन झाल्यावर दोघे रंकाळ्याच्या बागेत येऊन बसले.

" कुमार, आज माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस आहे. आज मला डिग्री मिळाली आणि आज घरी जाऊन मी आईशी बोलणार आहे आपल्याबद्दल... " कुमारचा हात हातात घेऊन घेऊन त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन बोलली.

" हम्म...मी घरी बोललोय आणि माझ्या घरचे तयार आहेत... " तिच्या खांद्यावर आपला हात ठेवून बोलला.

ते दोघे बराच वेळ गप्पा मारत बसले... संध्याकाळी कुमारने तिला गाडीत बसवले.

---------------------------------------

" आई मला तुझ्याकडून माझ्या डिग्रीचे गिफ्ट हवंय " आईच्या गळ्यात हात टाकून अमृता बोलली.

" बोल, काय हवंय तुला ? ड्रेस, दागिने काय हवंय ? " मामी कौतुकाने बोलल्या.

" आई, बस ना.. "

मामीनी अमृतकडे आश्चर्यचकित नजरेने बघितले.

अमृताने मामीना हात धरून बैठकीवर बसवले आणि ती त्यांच्या पायात बसली.

" आई, कुमार आणि केतकी कसे वाटले तुला " अमृताने विचारले.

" चांगले आहेत की .. का ग ? "

" तसे नाही, कुमार तुला जावई म्हणून कसा वाटला ? "

" काय ? " मामी मोठ्या आवाजात बोलल्या.

" आई, सांग ना. मला तो आवडतो "

" अमू, खरे सांगू. मला हे मान्य नाही "

" का पण ? " अमृताने रडवेली होऊन विचारले.

" अमू, मला कुमारबद्दल काहींच प्रॉब्लेम नाही. पण मला त्याच्या घरच्यांचा प्रॉब्लेम आहे...........
तुला माहितीच आहे..... कुमारच्या काकांनी तुझ्या आत्याला जेंव्हा घटस्फोट दिला तेंव्हा दीप्ती फक्त 2 वर्षाची होती...... त्या वेळी, कुमारच्या बाबा आणि आईची जबाबदारी नव्हती का त्यांना समजवायची....मी आणि तुझे बाबा, किती वेळा त्यांच्याकडे गेलो होतो त्यांचा संसार सुरू राहूदे म्हणून... तुझे बाबा पण लवकर गेले तेंव्हा तर त्या दोघींची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आणि वय काय होते माझे सत्तावीस वर्षे... तुझी जबाबदारी पण माझ्यावर. त्या वेळी त्यांनी येऊन आत्या आणि दिप्तीची जबाबदारी घ्यायला नको होती का ? "

" हम्म, पण कुमार तसा नाही " अमृताने वर बघत बोलले.

" मी म्हणले ना, मला कुमारचा प्रॉब्लेम नाही............ पण मला असे वाटते की जो त्रास तुझ्या आत्याने सहन केला तो तुझ्या नशिबात येऊ नये "

" आता तसेच परत कसे होईल "

" हे बघ अमू... हे मला मान्य नाही.... "

" आई पण एकदा विचार कर की "

" अमृता, मी आयुष्यात कधीच कांही मागितले नाही तुझ्याकडे... असे समज की ही माझी इच्छा आहे की आणि अपेक्षा आहे की तू पूर्ण करशील...." म्हणून मामी उठून निघून गेल्या...

-------------------------------------

रंकाळ्याच्या बागेत कुमार आणि अमृता भेटले. अमृताने त्याचा हात हातात घेऊन घडलेले सर्व सांगितले.. आणि म्हणाली

" आईने माझ्यासाठी पूर्ण आयुष्य वेचलय.. तिने एकटीने मला मोठे केलाय. माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्यात....... आता तिने माझ्याकडे काहीतरी मागितलं आहे "

" मी कितीतरी स्वप्ने बघितली आहेत आपल्या संसाराची..... मी मनोमन तुला जोडीदार म्हणून निवडलं आहे "

" मला पण तुझ्यासारखाच जोडीदार हवा आहे पण मी तुझी जोडीदार होऊ शकत नाही. माफ कर मला " म्हणून अमृता तेथून निघून गेली.....

लेखक, संकुल
http://sancool172.blogspot.in/

Group content visibility: 
Use group defaults

छान लिहिलीय.. हलकीफुलकी ओघवती शैली.. आवडली Happy

पण शेवट घाईत केल्यासारखा वाटला. त्यामुळे अर्धवटही वाटली. नकारामागची भुमिका अजून स्पष्टपणे यायला हवी होती असे वाटले. आणि त्यानंतर त्या दोघांमध्येही आणखी संवाद व्हायला हवा होता. पण ठिक आहे, चार दिवसांत जमलेले प्रेम विसरणे तुलनेत जास्त सोपे असावे.
पुलेशु Happy

चार दिवसांत जमलेले प्रेम विसरणे तुलनेत जास्त सोपे असावे. << हो न झाल पण आणि संपल पण.
लिहील छान आहे.