ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना १९

Submitted by स्वप्ना_राज on 20 April, 2018 - 04:01

इतना क्यो सिखाये जा रही हो जिंदगी
हमे कौनसी सदियां गुजारनी है यहा

गुलजारचे हे शब्द आजकाल मनातून जाता जात नाहियेत. त्याला हे माहित नाहिये का की कधीकधी एका जन्माचं आयुष्य शतकानुशतकं जगतोय असं वाटावं इतकं ओझं बनून जातं? की नियती शतकं जगूनसुध्दा मिळणार नाही एव्हढं दु:ख, वेदना, त्रास एका जन्मात पदरात टाकून जाते? त्यात त्या बिचार्या सटवाईला दोष तरी का द्यायचा म्हणा. जन्मजात फुटलेल्या कपाळावर ती तरी कसं आणि काय चांगलं लिहिणार? ‘आपलं हे असं कसं झालं?’ ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अर्थ नसतो कारण ते कधीच मिळणार नसतं हे आता मला पुरतं कळून चुकलंय. गुलजारच्या 'जिंदगी'ने च शिकवलंय ते. हो आणखी एक.......आपली कुठलीही कमतरता कधीच कोणाला दाखवायची नाही. दारच्यांना नाहीच पण घरच्यांनासुद्धा नाही. कारण दारचे जखमेवर मीठ चोळणार हे माहित असतं आपल्याला. पण घरचे जेव्हा ते चोळतात तेव्हा धड रडता पण नाही येत. निदान उघडपणे तरी नाहीच. रडायचं ते मनातल्या मनात. आणि वाळवंटात पडलेल्या पावसासारखे ते अश्रू जिरवून टाकायचे. मनातल्या मनात. मग असं खारं झालेलं मन घेऊन जगत रहायचं. हा इतका जालीम धडा आहे की असं वाटतं पुनर्जन्म असलाच तर पुढच्या जन्मीसुध्दा आत्म्याला तो लक्षात राहील. हेही शिकवलं मला गुलजारच्या 'जिंदगी'ने च.....

पूर्वी वाटायचं की प्रत्येक छोटा प्रसंग सुध्दा आपल्याला काहीतरी शिकवून जातो, घडवून जातो, अधिक शहाणं, चांगलं बनवून जातो. आता नाही वाटत. आता हा खेळ खेळायचा कंटाळा आलाय. ह्या अनुभवांतून आपण काहीतरी नवं शिकलो, थोडे सुधारलो असं वाटून खुश होतो आपण. आणि मग साध्या वार्याच्या झुळकीने वाळलेली पानं उडवावीत तश्या सहजतेने नियती येऊन सगळं उधळून देते. तिच्या विकट हसण्याचा वीट आलाय आता मला.

म्हणूनच म्हणतेय की तू तुझा शिकवायचा नेम सुरु ठेव 'जिंदगी'. आजवर शिकलेलं, मुठीत जपलेलं हे घे सगळं आज तुझ्या वावटळीत उधळून देतेय. कारण ह्यापुढे शिकायचं की नाही ते माझं मी ठरवणार आहे......
---------------------

रोजचा पेपर 'अथ' पासून 'इति' पर्यंत वाचायचे तेव्हाचा प्रसंग आहे हा. आजकाल १० मिनिटांत समग्र पेपर वाचून होतो. खून, बलात्कार, घोटाळे, भ्रष्टाचार, मोर्चे, दंगली, जाळपोळ, लोकांची गैरसोय ह्या सगळ्याबद्दल वाचायचं नाही म्हटलं की फक्त नाटकांच्या जाहिराती, राशिभविष्य आणि शब्दकोडी उरतात.

मजा अशी की ती बातमी काय होती हेही नीट आठवत नाही आता. कुठल्याश्या चांगल्या शिकल्या-सवरलेल्या, मोठ्या पदावर असलेल्या बाईने ब्राह्मण नसलेल्या स्वयंपाकीणबाईने घरचा पूजेचा स्वयंपाक केला म्हणून पोलिसांत तक्रार केली होती का तिला कामावरून काढलं होतं असं काहीतरी झालं होतं. ‘काय तरी एकेक बायका असतात' वगैरे अगदी स्टॅन्डर्ड प्रतिक्रिया झाली माझी त्यावर. मग 'माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये कोणाची काय जात आहे हे मी कधी चेक नाही केलं' अशी कॉलरसुध्दा ताठ करून झाली. पण हे अर्धसत्य आहे. म्हणजे काही आडनावावरून नाही म्हटलं तरी जातीचा अचूक अंदाज येतोच की उदा. रेगे, जाधव, गुप्ते. पण काही जोशी, कुलकर्णी असले मराठी तर पाठक, विश्वकर्मा, गोहिल वगैरे अमराठी मंडळींच्या जातींबाबत निश्चित माहिती नसते. ती मात्र जाणून घायचा प्रयत्न कधीच केला नाही हेही तितकंच खरं.

पेपर घडी करून ठेवला आणि विसरून गेले. मग विकांताला पार्कवर वॉकला गेले. लहान मुलांच्या गार्डनजवळ कसलंसं पत्रक लटकावलेलं दिसलं म्हणून कुतूहलाने पुढे जाऊन पाहिलं. गाण्याचा प्रोग्राम होता रविवारी संध्याकाळी. गायक मंडळींची नावं दिली होती. लिस्ट वाचली - नेने, कामत, भोसले, देवस्थळी, कोरान्ने, सबनीस, पारसनीस, म्हात्रे.......जी आडनावं बोल्डमध्ये दिसताहेत ती लिस्टमध्ये बाकी आडनावांसारखीच लिहिली होती. पण माझ्या दृष्टीने बोल्ड फॉन्टमध्ये झाली. कारण ती सारस्वतांची. माझ्याही नकळत मी ह्या यादीत सारस्वत कोण हे पाहिलं होतं. त्या गायकांची नावं (first names) तर मला समोर असून दिसलीच नाहीत. खरं तर मी सारस्वत म्हणवून घ्यायला सर्वस्वी नालायक आहे कारण ओलं खोबरं, मासे वगैरे सारस्वतांना प्रिय असलेल्या वस्तू मला डोळ्यांसमोर नको असतात. सारस्वतांच्या देवांची नावं विचारलीत तर म्हाळसा, शांतादुर्गा, मंगेश ह्यांच्यापलीकडे माझी गाडी जायची नाही. कुलाचार, कुलदेवता कसला कसला काही गंध नाही. मी सर्वार्थाने caste-less आहे. पण तरी जन्मापासून चिकटलेल्या जातीचा हा असा पगडा आहे. शिकली-सवरलेली असून.

माझ्यात आणि पेपरातल्या बातमीतल्या त्या बाईत काहीही फरक नाहीये. ना तसूभर ना काडीचा. असलाच तर एव्हढाच की माझं नाव पेपरात छापून आलेलं नाही. निदान अजूनतरी.
-------

‘शी! कसलं गरम होतंय. ह्यापेक्षा सहारा वाळवंट परवडलं.’ गाडीच्या एसीकडे टवकारून बघत मी (बहुतेक!) शंभराव्यांदा म्हणाले. गाडीतल्या बाकीच्यांनी माझ्याकडे क्रुध्द कटाक्ष टाकला. माझा नाईलाज आहे. मला अतिगर्मी आणि अतिथंडी दोन्ही सहन नाही होत. स्वभाव थोडा 'अति' असल्याने हे होतं ह्यावर मला ओळखणार्या जवळपास सर्वांचं एकमत आहे. असो.

‘आता डी-मार्ट मध्ये थांबायलाच हवं का? जाऊ या न आता डायरेक्ट' मी पुन्हा कुरकुरले.
‘थोडं सामान घ्यायचं आहे. परत इतक्या लांबवर कोण येणार? तू?’ भाऊ करवादला.

मी गप्प बसले. गाडी डी-मार्ट मध्ये शिरली. "बाकीच्यांना जायचं तर जाऊ देत आपण आत बसून रहायचं" असा पक्का निश्चय केला होता खरा. पण गाडी थांबते न थांबते तोच मी टुणकन बाहेर उडी मारली. कारण होतं पार्किंग लॉटमध्ये उभी असलेली एक ९-१० वर्षांची मुलगी आणि तिच्या कडेवरचं छोटं गुटगुटीत बाळ. बहुतेक कोणाची तरी वाट बघत एका गाडीजवळ उभी होती ती. ‘काय गोड बाळ आहे!’ मी त्या बाळाच्या गालाला हात लावला तर कसलं क्यूट हसलं. डोक्यावर फार केस नव्हते पण काळेभोर टपोरे डोळे, सावळा गोल चेहेरा आणि पुरीसारखे टम्म फुगलेले गाल. ते हसलेलं बघून ती पोरगी पण हसली. तिला त्या बाळाचं कौतुक ऐकून सवय असावी. मी त्या बाळाचं नाव विचारलं. ‘विशाल' का काहीतरी म्हणाली ती.

माझ्यापाठोपाठ माझा भाऊपण तिथे आला होता. ‘तुझा भाऊ का हा?” त्याने विचारलं. ‘हो' ती म्हणाली.

‘आणि तुझं नाव काय?’ त्याने विचारलं तशी मी चमकले. त्या बाळाचं कौतुक करायच्या नादात मी त्याच्या बहिणीला विसरूनच गेले होते. तिचं नाव काय, ती कुठल्या इयत्तेत आहे ते विचारावं हे माझ्या ध्यानातच आलं नव्हतं.

तिने काय नाव सांगितलं मला आठवत नाही आता. कारण माझ्या भावाकडे बघून मी हा विचार करत होते की आत्ताआत्तापर्यंत 'तुझी स्वप्नाच लाडकी आहे’ म्हणून आईशी भांडणारा माझा भाऊ एव्हढा मोठा कधी झाला.
-----

‘अरे बाप रे! आज एक पण बेंच रिकामा नाही बसायला. एव्हढे नवे बेंचेस केलेत पण सगळे नेहमी आशुक-माशुकांनी भरतात. तुला दात काढायला काय झालं?' माझी मैत्रीण वैतागून म्हणाली. तिच्या तोंडून ‘आशुकमाशुक' हा शब्द ऐकून मला जाम हसायला आलं होतं.

‘काही नाही. तू म्हातारी झालीस आता' खरं तर ती बिचारी मोजून नऊ महिनेच मोठी आहे माझ्यापेक्षा. पण मी एक संधी सोडत नाही. ‘चल, इथे खाली बसू यात. होईल एखादा बेंच रिकामा.’ असं म्हणत आम्ही टेकलो. मग पुढची काही मिनिटं माझ्या आजीच्या शब्दात सांगायचं तर 'तुझं कसं? माझं कसं?’ करण्यात गेली.

अचानक माझं लक्ष डावीकडे कोपर्यात फिरणाऱ्या एका माणसाकडे गेलं. वयाचा पक्का अंदाज बांधणं त्या अंधुक उजेडात शक्य नव्हतं तरी पन्नाशीच्या पुढचा नक्कीच वाटत होता. डोक्याला टक्कल. पेहराव एका ठराविक वयाच्या पुढचे सगळे भारतीय पुरुष घालतात तो - म्हणजे स्वच्छ पांढरा शर्ट (ह्याला आम्ही कॉलेजात असताना 'नवरा शर्ट' म्हणायचो!) आणि काळी पॅन्ट. हातात काही नाही, अगदी मोबाईलसुध्दा. हे एक नवलच म्हणायचं. पार्कच्या डाव्या बाजूला एका ठराविक भागात तो येरझार्या घालत होता. आणि तोंडाने काहीतरी बोलत होता.

‘कसं होतं ना पूर्वी? हे असे स्वत:शीच बोलणारे लोक पाहिले की ते वेडे असल्याची खात्री असायची. आजकाल फोनवर बोलणारे कुठले आणि वेडे कुठले काहीच कळत नाही.’ मी मैत्रिणीला म्हटलं.

‘कोणाबद्दल बोलते आहेस तू?’ तिने विचारलं. मी त्या माणसाकडे बोट दाखवलं.

‘ओह! तो होय. तो नेहमीच येतो इथे संध्याकाळी. गेली २-३ वर्ष पाहतेय मी त्याला. स्वत:शीच बोलत असतो तो.’ ती सहजपणे म्हणाली.

मी परत एकदा त्याच्याकडे पाहिलं. आपण सोबत असणाऱ्या माणसाशी बोलू तसं हातवारे करून बोलत होता तो. आपल्यालाच वाटावं की ह्याच्या सोबत कोणीतरी व्यक्ती आहे आणि आपल्यालाच ती दिसत नाहीये. कपड्यांवरून व्यवस्थित वाटत होता. कामावरून घरी जायच्या आधी एक फेरफटका मारायला, पाय मोकळे करायला पार्कात आला असावा असं वाटावं तसा. काही मानसिक आजार असेल का? का ह्या परक्या शहरात प्रचंड एकाकीपण असेल आणि ते घालवायला त्याने सोबत कोणीतरी आहे अशी समजूत करून घेतली असेल? ह्या जगडव्याळ शहरात गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते असताना माणसाला एकाकी वाटण्याची शक्यताच जास्त आहे. पण काल्पनिक सोबत्याची गरज वाटावी एव्हढं एकाकीपण हे शहर बहाल करत असेल तर समाज म्हणून आपण किती हरलोय.

का खरंच त्याच्यासोबत कोणी होतं जे मला किंवा माझ्या मैत्रिणीला दिसत नव्हतं?

मध्ये बरेच महिने गेले. भेटू, भेटू म्हणत माझ्या आणि मैत्रिणीच्या भेटीचा योग काही आला नाही. मग एके दिवशी भेटलो तेव्हा पुन्हा पार्कातच गेलो. आज आशुकमाशुक थोडे कमी असल्याने बसायला बाक मिळाला म्हणून मैत्रीण खुश होती. बोलताबोलता सहज आठवलं म्हणून डावीकडे नजर टाकली. पण तो माणूस दिसला नाही.

‘तो माणूस ना? गेले १-२ महिने दिसत नाहीये.’ मी काही न विचारताच माझी मैत्रीण म्हणाली.

‘ओह' ह्याहून अधिक काही बोलायचं सुचलं नाही. पण नाही म्हटलं तरी मनात विचार आलेच. 'आजारी असेल का?’ हा त्यातल्या त्यात benign विचार. "गेला असेल का? का मानसिक रोग बळावला म्हणून हॉस्पिटलमध्ये ठेवलं असेल?” ‘मन चिंती ते वैरी ना चिंती' ह्या न्यायाने हेही विचार पाठोपाठ आलेच.

आणि मग वाटून गेलं - कदाचित इतक्या वर्षांनी रिटायर झाला असेल. इथलं सगळं आवरून आपल्या गावी रवाना झाला असेल. हाडामांसाच्या माणसांशी चार गोष्टी बोलत मुलाबाळांत, आपल्या लोकांत, आपल्या मुलुखात सुखासमाधानाने बसला असेल.

तसंच असावं. तसंच असू देत. नाहीतरी आपल्या सगळ्यांना 'The End’ च्या पाटीपेक्षा ‘And They Lived Happily Thereafter’ ची पाटीच जास्त आवडते, नाही का?
----

‘जयललिता पास्ड अवे' कोणाचातरी व्हॉट्सप मेसेज आला.
‘जयललिता गेली' मी बाकीच्यांना सांगितलं. आम्ही माथेरानच्या वाटेवर होतो. ‘हो का? आजारीच होती नै. सुटली बिचारी’ कोणीतरी म्हणालं आणि मग नेहमीच्या गप्पा पुढे सुरु राहिल्या. तिच्या असण्याने किंवा नसण्याने फरक पडणार्यातले आम्ही नव्हतो. हॉटेलवर पोचेतोवर जयललिता माझ्या खिजगणतीत पण राहिली नव्हती.

‘आता मस्त ताणून देऊ यात. मग संध्याकाळी लेकवर जाऊ' ही कल्पना सर्वाना मान्य झाली. आणि जो तो आडवा झाला. सहज चाळा म्हणून व्हॉट्सप मेसेजेस बघायचं ठरवलं. आणि तामिळांची ही पुराची थलैवी माझी दुपारची झोप उडवून गेली.

तो मेसेज होता माझ्या सरांकडून....अर्थातच फॉरवर्डॅड होता. जयललिताच्या फिल्मी, राजकीय आणि (अर्थातच!) खाजगी आयुष्याचा लेखाजोखा होता त्यात. आणखी एक उल्लेख होता - ती 'एकाकी राजकन्या' असल्याच्या. अर्थात ह्याचा रोख तिने कधी लग्न केलं नाही ह्यावर होता हे सुज्ञास सांगणे न लगे. माझं पित्त खवळलं.

कलाम गेले तेव्हा ते 'एकाकी राजपुत्र' होते असं कोणी म्हटलं होतं का हो सर? त्यांचं जाऊ द्यात. अटलबिहारी, मोदी जातील तेव्हा त्यांचाही उल्लेख 'एकाकी राजपुत्र' असा होईल का? उलट त्यांचं अविवाहित असणं/सांसारिक नसणं कौतुकाचा विषयसुध्दा होऊन जाईल. सगळा वेळ देशाच्या कामात दिला म्हणून. मग बाईने कोणा ना कोणाची तरी मिसेस म्हणूनच जगलं पाहिजे हा अट्टाहास का आहे समाजाचा? एखादी विवाहित नाही म्हणून लगेच ती 'एकाकी' होती हे ठरवण्याचा अधिकार ह्यांना कोणी दिला? तिच्या आणि एमजीआरच्या नात्याचा जाहीर पंचनामा करणार्यांना हे माहित आहे का की तरुण वयात केलेल्या तिच्या एका अस्खलित इंग्रजी भाषणाचं इंदिरा गांधीनी कौतुक केलं होतं? हे का नाही लिहित कोणी? लग्न न केलेली बाई म्हणजे उठसुठ कोणीही कसलीही चर्चा करायचा विषय आहे? तुम्ही असा मेसेज कसा फॉरवर्ड केलात?

अतिशय संतापून मी सरांना लिहिलं. आणि मग एकदम भानावर आले. किती झालं तरी ते माझे सर होते. थोडा संयम बाळगून लिहायला हवं होतं मी. पुढची काही मिनिटं अस्वस्थपणे सरांनी मेसेज वाचलाय का ते पाहण्यात गेली. शेवटी एकदाचं सरांचं उत्तर आलं.

शाबास! तुला जे वाटलं ते स्पष्ट शब्दांत लिहिलंस तू. आवडलं मला. आणि पटलंही

मी पुन्हापुन्हा त्या ओळी वाचल्या. सर अजिबात चिडले नव्हते. उलट त्यांनी माझं म्हणणं पटल्याचं मोकळ्या मनाने कबूल केलं होतं. मनाचा एव्हढा मोठेपणा मला आजतागायत दाखवता आलेला नाही आणि पुढेही दाखवता येईल असं वाटत नाही.

अजून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. एव्हढी मोठी झाले तरी सरांच्या एका 'शाबास' ने खूप मस्त वाटलं. किती वर्षांनी कोणीतरी हा शब्द वापरला होता. आपल्यातली छोटी मुलगी अजून कुठेतरी शिल्लक आहे हे तेव्हा जाणवलं मला.

आजही जेव्हा खूप मोठ्ठं, कधीकधी जरा म्हातारं झाल्यासारखं वाटतं ना तेव्हा त्याच मुलीचा हात धरून ठेवते मी.....अगदी घट्ट.
--------

बुरा जो देखन मै चला, बुरा न मिलया कोय
जो मन खोजा आपना तो मुझसे बुरा न कोय

कबीराच्या ह्या ओळी वाचल्या आणि लक्षात आलं की गुलजारच्या प्रश्नाचं उत्तर कबीराने दिलंय. आयुष्य आजवर शिकलेलं पार उधळून देतं आणि आपल्याला पुन्हा पुन्हा धूळपाटीत मुळाक्षरं गिरवायला बसवतं कारण त्याला पक्कं माहित असतं की आपण कितीही शिकलो तरी आपली पाटी पुन्हापुन्हा कोरी होणारच आहे. आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून फक्त आपणच मेहनत घेत नसतो, आपलं आयुष्यसुध्दा खपत असतं. त्याचं खपणं सार्थकी लावायचं की मातीमोल करायचं ते मात्र आपल्या हातात असतं.

आज माझी मूठ रिती आहे. पण ती पुन्हा भरेल. आणि भरत राहील. जोवर जगण्या-मरण्यात एका श्वासाचं अंतर शिल्लक आहे तोवर हा खेळ चालू राहील......

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय.
जयललितांबद्दल पण छान विचार मांडलेयत. मला पण पेपरमध्ये वगैरे वाचताना फार विचित्र जाणवत राहिलं ते. तुमचे सर पण मोठ्या मनाचे आहेत. विद्यार्थ्याकडून विरूद्ध विचार ऐकून ते पचवणारे व पटलेयत हे मान्य करणारे शिक्षक सद्ध्याच्या काळात तरी दुर्मिळ झालेयत. Happy

कधीकधी एका जन्माचं आयुष्य शतकानुशतकं जगतोय असं वाटावं इतकं ओझं बनून जातं? की नियती शतकं जगूनसुध्दा मिळणार नाही एव्हढं दु:ख, वेदना, त्रास एका जन्मात पदरात टाकून जाते? त्यात त्या बिचार्या सटवाईला दोष तरी का द्यायचा म्हणा. जन्मजात फुटलेल्या कपाळावर ती तरी कसं आणि काय चांगलं लिहिणार? ‘आपलं हे असं कसं झालं?’ ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अर्थ नसतो कारण ते कधीच मिळणार नसतं हे आता मला पुरतं कळून चुकलंय.>> हे माझेच विचार अगदी नेमके मांडलेयत. हल्ली या विचारांनी घेरून टाकलंय अगदी.

अॅमी, पहिल्या किश्श्यात जातीचा अस्पष्ट असला तरी किती पगडा आहे हे मला जाणवलं त्याबद्दल लिहिलंय. >> हो ते आलं लक्षात.

पण खोले बाईंच्या defense(??) मधे "त्या ५० वर्षांच्या अविवाहित आहेत, आपल्या लहान (अविवाहित!) बहिणीसोबत राहतात, आईवडील नुकतेच एकपाठोपाठ एक गेलेत, देवधर्म-कर्मकांडच्या नादात वाहवत का गेल्या असतील ते थोडं समजून घ्या" अशी एक फेसबुक पोस्ट आलेली. आणि मग त्यावर आपल्या ओळखीतल्या 'सायको' अविवाहित बायकांबद्दल काहीजणांनी सांगितलेलं...

केवळ अप्रतिम! Happy पॉझिटीव्ह विचार आवडले, भावले.
मला वाटतं दोन्ही विचार आपापल्या परिनं योग्यच आहेत. एकीकडे तुमचा पॉझिटीव्ह तर दुसरीकडे जीवनाच्या जखमा असह्य होऊन गुलजारच्या तोंडून निघालेल्या ओळी जीवनाचं भयाण वास्तव दाखवितात.

Pages