पुरण, पुरण यंत्र आणि पुरणपोळी

Submitted by हडेलहप्पी on 3 May, 2018 - 10:48

होळी म्हटलं की तेलपोळी/पुरणपोळी पाहिजेच. तिथूनच सुरु होतो एक प्रवास, एक ईच्छासत्र !

प्रथम बायको बाजारात शिधा आणायला पाठवते. हल्ली ‘whatsapp’ मुळे सामानाची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच जाते, अगदी खरेदी संपेपर्यंत. अर्जुनाचा जसा अक्षय्य भाता होता तशी अक्षय्य यादी घेऊन मी दुकानातील प्रत्येक खिंडीत लढत असतो.
एका ठराविक क्षणी बायकोला कळवण्यात येतं की, “बाई, आता मी फोन बघत बसणार नाही, तू फोन कर जर मूळ किंवा विस्तारीत यादीत काही राहिलं असेल तर”. शेवटी एखादी वस्तू राहतेच आणि बायकोचा फोन येतो आणि तिला सांगावं लागतं, “परतीचे दोर कापून टाकले आहेत, आता माघारी जाणे नाही !”
बायको दरडावते.
मी पटकन नवरा होऊन सांगतो, “पैसे देतो आहे आता परत आत जात नाही खूप मोठी रांग आहे”. पूर्ण वाक्य न ऐकताच फोन बंद केल्याचा मला भास होतो पण नंतर विश्वास बसतो आणि मी माझा अग्निरथ हाकत घरी पोहोचतो.
स्वतःच दार उघडतो, बायको मस्त चहा पीत बसलेली असते, मुलगा शक्य तितकं दुर्लक्ष करून बाहेर खेळायला जातो. मी सर्व सामान पिशवीतून बाहेर काढून ठेवतो. “ढेप फोडून देतोस का?” असा प्रश्न वजा आदेश येतो. मी गुळाची ढेप फोडून देतो.

दुसऱ्याचं काम संपतं आणि एकाचं सुरु होतं.
मी चहा घेत जरा पाय लांब करून बसतो आणि बायको पदर खोचून कामाला लागते.
बायको वेलची केशर घालून मस्त मस्त पुरण बनवते. आहाहा !
पुरणाचा छान वास येत असतो, कपात अजूनही अर्धा चहा उरलेला असतो, “हेच ते सुख” या जाणीवेने चहुबाजूनी हल्ला चढवलेला असतो आणि मुलगासुद्धा बाहेर खेळत असतो…. तितक्यात…. तितक्यात…. एक परिचित आवाज येतो, “उद्या तेलपोळ्या आणि पुरणपोळ्या हव्या असतील तर पुरण दळून दे”
तत्क्षणी अंगात प्रचंड जडपणा येतो, हा देह आपला नसून आपण एक निमित्तमात्र आहोत याची प्रकर्षाने अनुभूती येते. आधी ‘तत्क्षणी’च्या जागी मी ‘निमिषार्धात’ शब्द वापरला होता, पण त्यामुळे मला ‘बायको काय बोलली हे कळायला वेळ लागतो’ असा अर्थ निघू शकला असता.
एकाचं काम संपतं आणि दुसऱ्याचं सुरु होतं.

मी पुरण (दळायचं) यंत्र वरच्या कपाटातून खाली काढतो, स्वच्छ घासून घेतो, सुकवतो आणि दळायला सुरुवात करतो. जस-जसं पुरण थंड होते तस-तसा अधिक जोर लावावा लागतो. पुरण दळता-दळता मला पुरण यंत्राचं आश्चर्य वाटायला लागतं. मी माझ्या लहानपणी बाबांना याच धाटणीच्या यंत्रात पुरण दळताना पाहिलं आहे. मग मी थोडा मोठा झाल्यावर ते काम माझ्याकडे आलं होतं. या प्रवासात पुरण करणाऱ्या बदलल्या, पुरण दळणारे बदलले पण पुरण यंत्र काही बदललं नाही. म्हणजे उत्पत्ती-स्थिती-लय या त्रिकालाबाधित सत्याला अपवाद असणारं हे यंत्र आमच्याकडे वर कपाटात असतं याचा मला अभिमान वाटू लागला. बराच कल्पनाविस्तार झाला होता, मन रमवत होतो आणि पुरण दळून संपत आलं होतं, संपतच. खूप उशीर झालेला असतो आणि दिवस संपतो.

दुसऱ्याचं काम संपतं आणि एकाचं सुरु होतं.
होळीच्या दिवशी, सकाळीच बायको तिंबवलेला मैदा, दळलेलं पुरण ई. ई. घेऊन मैदानात उतरते. पुरणपोळ्या करण्याचा तिचा वेग थक्क करणारा असतो. पुरणाच्या बाजूने मैद्याचे आवरण चढवणे, ते बंद करणे, हाताने दाब देऊन थोडं सपाट करणे, बंद केलेली बाजू पोळपाटाला लागेल अशा पद्धतीने ठेवून, ते शक्य तितक्या हलक्या हाताने लाटून पोळी मोठी मोठी करत जाणे, आवश्यक तिथे थोडासाच जोर देणे ! क्या बात है !! “जेणो काम तेणो ठाय बीजा करे सो गोता खाय” ही गुजराथीतील म्हण बहुतेक एखाद्या मराठी सुगरणीला पुरणपोळी करताना बघून प्रचलित झाली असावी. तशी पुरुषांसाठीसुद्धा एक मराठी म्हण आहेच, “करायला गेला मारुती अन झाला गणपती” पण त्याबद्दल नंतर कधीतरी. तर सुगरण जेव्हा पुरणपोळ्या करत असेल आणि ती तुमची जर बायको असेल, तर त्या काळात तुम्हाला अतिशय सावध राहणं अनिवार्य आहे. बायको प्रचंड तन्मयतेने सोनेरी रंगाची फुलपाखरं जन्माला घालत असते आणि त्यात तिला कुठलाही अडसर नको असतो. थोडक्यात म्हणजे, चहा करू का? पटकन अंड टाकून देऊ का? खाऊन घे – अशा ऐहिक गोष्टींचं आमिष तिला दाखवू नका, ती लक्षसुद्धा देणार नाही. टॉवेल सापडत नाहीयेच्या अखत्यारीतील प्रश्न जरी अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असले तरी त्याचा योग्य समाचार घेतला जाईल. तुम्ही आदल्यादिवशीच दुसऱ्यादिवशीची जय्यत तयारी करून ठेवावी असा अलिखित नियम लक्षात असू द्या. नैवेद्य दाखवून झाल्यावर तुम्ही आपली ताटली घेऊन बायकोच्या बाजूला जाऊन उभे रहाण्यास हरकत नाही. बहुतेक वेळेस “नैवेद्याचं ताट घे” असेच तुम्हाला सांगितले जाईल.

“शेवट गोड होणे” हा वाक्प्रचारसुद्धा पुरणपोळी संदर्भातूनच आला असावा. गरमा-गरम पुरणपोळी तूप/दूध घेऊन खाण्यास सुरुवात केली की लगोलग तोंडातच विरघळते. आणि आत्तापर्यंत केलेल्या मेहनतीला न्याय मिळाल्याचं समाधान मिळतं. ईच्छासत्र पूर्णब्रह्मात साकारलं जातं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तं लिहिलंय. आवडलं. आपण पुरणपोळीचं सामान आणता, पत्नी पुरणपोळी बनवून देते आणि आपण ती खाता, एव्हढा साधा प्रसंग आपण किती सुंदर रीतीने खुलवून लिहीलाय याचे कौतुक वाटते. पंचेसही छान जमलेत.

मी माझ्या लहानपणी बाबांना याच धाटणीच्या यंत्रात पुरण दळताना पाहिलं आहे. मग मी थोडा मोठा झाल्यावर ते काम माझ्याकडे आलं होतं. >>> खरोखर, माझ्याही मनात कधीकधी हाच विचार येतो. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपले आईवडील करत होते आणि आता आपला संसार सुरू झाल्यावर आपण करत असतो. आणि काही वर्षांनी आपली मुले करणार असतात. त्यापासून कोणाचीही सुटका नाही. Lol

छान लिहिलंय.
नवर्‍याला पोळ्यांसाठी लागणार्‍या सामानाची लिस्ट देउन सामान आणायला पाठवायला हवं. Happy

खूपच सुरेख लिहिले आहे. Happy
लहानपणी पुरण वाटून देणे हे माझे काम होते. पुरणपोळी ताटात पडेपर्यंत आईच्या भोवती मी लुडबुडत असे.
यावर्षी लेकीने पुरण वाटून दिले मला (एकाच विनंती नंतर :P). इतके छान वाटले.. आपलं बालपण तिच्या रुपाने डोळाभर पाहून घेतले. Happy

खूपच छान! आवडले.

लहानपणी पुरण वाटून देणे हे माझे काम होते. पुरणपोळी ताटात पडेपर्यंत आईच्या भोवती मी लुडबुडत असे.>>मी पण Happy

छान लिहिलंय.
>>>बायको प्रचंड तन्मयतेने सोनेरी रंगाची फुलपाखरं जन्माला घालत असते आणि त्यात तिला कुठलाही अडसर नको असतो. - हा पॅरा छान आहे.