तू मने गमे छे !

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 3 May, 2018 - 03:28

म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते.

मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो.

तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती. मागाहून समजले की तिलाही जॉईन करून चारच महिने झाले होते. तिचाही तो पहिलाच जॉब होता. पण तरीही तिच्यामानाने मी नवखाच होतो.

कोणीतरी मग दुसर्‍याच दिवशी चिडवाचिडवीत माझी तिच्याशी जोडी जमवली. आणि पुढे त्या चिडवण्याला आणखी कोणी खतपाणी घालू नये म्हणून उगाचच, अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच..

बस्स ! मग ज्या मुलांनी मला तिच्यावरून चिडवायला घेतले होते, तेच आता आमच्यातील खुन्नसचे किस्से रंगवू लागले. आमच्यात तसे काहीही नसताना आमच्यातील शीतयुद्धाच्या कहाण्या रचू लागले. मी देखील वेड्यासारखा, कसेही का होईना, तिच्यासोबत आपले नाव जोडले जातेय यातच आनंद मानू लागलो. कधीतरी फटक्यात या सर्व अफवांतील फोलपणा जगासमोर येईल आणि आमच्यातील तथाकथित शत्रुत्व प्रेमात बदलेल या विचारांत रमू लागलो. हळूहळू मला जाणवत होते, की मी तिच्यात आता गुंतू लागलो होतो.

जेव्हा ती माझ्याकडे बघायची, रागानेच बघायची. मी सुद्धा माझी नजर कोरडीच ठेवायचो. पण नेहमी माझ्या नजरेला नजर मिळेल, अश्याच जागी ती बसायची.
माझ्या अगदी शेजारून जायची. तिच्यासाठी मी अस्तित्वातच नाही असे दर्शवून जायची. पण ज्या दिवशी मी ऑफिसला यायचो नाही, तेव्हा हलकेच माझी चौकशीही करायची.
मी कधी तिची खोडी काढल्यास, थेट माझ्याशी भांडायलाही लाजायची. पण तिच्यावरून मला चिडवणार्‍या, माझ्या मित्रांशी लाजत लाजत बोलायची.
एक वेगळीच केमिस्ट्री होती आमच्यात. तिचे नाव घेताच लोकांना मी आठवायचो, माझे नाव घेताच ती आठवायची..

वर्ष गेले अश्यातच..
आणि मग ठरवले आता बोलायचे..

निमित्त होते दिवाळीनिमित्त ऑफिसमधील एका कार्यक्रमाचे. प्रत्येकाला दहाबारा कागदांचे चिटोरे वाटण्यात आले होते. आणि ठरले असे होते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तींबद्दल त्या कागदावर लिहून तो चिटोरा त्यांच्यात्यांच्या डेस्कवर लावायचा. स्वत:चे नाव मात्र लिहायचे नाही. आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात याचा थेट फिडबॅक..

मला फक्त एकाच कागदात ईंटरेस्ट होता. काय लिहू, आणि काय नको...
अशी संधी पुन्हा येणार नव्हती... थेट भिडायचेच ठरवले !

ठरलं ! लिहून यायचे, तू मला आवडतेस !

पण भावना नेहमी मातृभाषेतच पोहोचतात. मराठी लिहिता बोलता येणारी असली तरी होती मात्र ती गुजरातीच.. मग मेहुलची मदत घेतली.. आणि गुजराती भाषेतील सर्वात गोड वाक्य त्या कागदावर अवतरले,

"तू मने गमे छे ! "

दुपारच्या सत्रात बाहेर सारे कार्यक्रमात मग्न असताना मी हळूच तो कागद तिच्या डेस्कवर डकवून आलो. जणू काळजाचा छोटासा तुकडाच तिथे ठेवून आलो. आता प्रतीक्षा होती ते तिने माझे काळीज वाचण्याची.

प्रतीक्षा संपली. ती जागेवर आली. आम्ही टोळके करून जवळपासच उभे होतो. तिने तो डकवलेला कागद काढला. तो तसाच हातात घेऊन मुद्दामच आमच्या ग्रूपसमोर आली. आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला..

जरा धक्का लागल्यास खळ्ळकन फुटावे अश्या काचेच्या हृदयावर कोणीतरी तीक्ष्ण खिळ्याने कर्रकचून ओरखडा ओढावा असे झाले..

पण ते शेवटचेच ...
त्यानंतर मन कोडगे करून घेतले. पुन्हा त्याला नजरांचे चुकीचे अर्थ काढण्यापासून परावृत्त केले. साधारण दिडदोन महिन्यातच मला नवीन जॉब लागला आणि मी तिथून बाहेर पडलो. तेथील काही मित्र नंतरही संपर्कात होते. पण पुन्हा कधी तिचा विषय निघाला नाही. पुढे तिचे लग्न झाले हे मात्र उडत ऊडत कानावर आले. पण फारसे काही वाटले नाही. कारण एव्हाना माझेही झाले होते.

पण जगही किती छोटे असते ना..
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेत अखेर आमची पुन्हा एकदा एकाच कंपनीत गाठ पडली.
बावरलेली नजर आम्हा दोघांची. काय बोलावे, कसे बोलावे. कि बोलूच नये. एक अवघडलेपण.
तरी सहा वर्षे झाली.. पण फरक असा काहीच नाही..
शेवटी मीच ठरवले, दोघांचीही लग्ने झाली आहेत. जे होते ते माझे एकतर्फी होते. उत्तरही तेव्हाच मिळाले होते. म्हणून संकोच सोडून हसतच तो विषय काढला, आणि जे झाले ते विसरून जाऊया म्हणालो..

चेंडू मी तिच्या कोर्टात ढकलला होता. आता अवघडून जायची वेळ तिची होती.
पण तिच्या डोळ्यात अविश्वास होता !
ते.. ते.. तू लिहिलं होतंस?? पण असं कसं.. तू मने गमे छे.. ते अक्षर तर मेहुलचे होते ना ....

थोडसं गरगरलं मला.. आणि ते तर होणारच होते.
क्षणात जे एवढ्या वर्षांची कॅसेट रिवाईंड होत माझ्याच डोक्यावर आदळली होती...

- भन्नाट भास्कर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय ssss,
उघड्या पुन्हा जाहल्या, जखमा उरातल्या....

मस्त.. आवडली शैली Happy
आणि आठवली कोणीतरी पैली Wink

मराठी मुलांच्या कितीतरी लव्हईस्टोर्‍या अश्या गैरसमजातून शहीद झाल्या असाव्यात.. हा त्यातलाच एक प्रकार..
प्रपोज कधीही तोंडाने आमनेसामने बोलूनच करावा हा धडा आयुष्यात मी सुद्धा एक ठेच खाऊनच शिकलोय Happy

अरेरे! Lol
गमे छे नंतर नाव लिहायचं की. उगीच काय बॉलीवुडीय सीन करायचा.
का नाव न लिहिता लिहायचा खेळ होता? तसं असेल तर खरंच वाईट झालं. Happy

सस्मित तसे लेखात लिहिलेय,
<<< प्रत्येकाने आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तींबद्दल त्या कागदावर लिहून तो चिटोरा त्यांच्यात्यांच्या डेस्कवर लावायचा. स्वत:चे नाव मात्र लिहायचे नाही. >>

असंही नाव न लिहिण्याची अट असल्यामुळे कोणत्याही भाषेत लिहिले असते तरी तिला कोणी लिहिले हे समजणार नव्हतेच. मग कशाला 'मन्ने 'च्या भानगडीत पडलात ? भन्नाट भावा काही झाले तरी तुझ्या भावना तिच्या पर्यंत पोहोचणार नव्हत्याच, मग तिने कुठलीही चिठ्ठी फाडली तरी तुला नकार दिला असा अर्थ कसा काढलास?

तिच्या मातृभाषेत लिहुन इंप्रेशन पाडायचे असेल Lol
मला हा किस्सा वाचुन खरंच खुप हसु येतंय.

एक टेक्निकल प्रश्न पडलाय,
गुजरातीत मन्ने म्हणतात की मने? मला फार गुजराती येत नाही पण आमच्या जुन्या बिल्डींगमध्ये 30 टक्के गुजराती राहायचे. थोडेफार कानावर पडणारे शब्द आहेत... मन्ने की मने याबद्दल डाऊट आहे.

च्यक् च्यक् च्यक

आणि पुढे त्या चिडवण्याला आणखी कोणी खतपाणी घालू नये म्हणून उगाचच, अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच.. >> काय केलं होतं?

===
हे चिडवाचिडवीचे प्रकार फारच घाणेरडे आणि annoying आणि irritating वाटतात मला...

छान लिहले आहे...
जरे तिने तुम्हाला मेहुल बरोबर लग्न लावायला साक्षिदार म्हणुन बोलवले असते तर जलसा करो जयन्तीलाल ह्या गुजराती नाटकासारखा शेवट झाला असता.

छान लिहीलंय

आता इतक्या वर्षांनंतर यावर विनोद केलेला चालणार असेल, तर मुकद्दर का सिकंदर च्या सीन च्या उलटा प्रकार झाला असे दिसते Happy त्यात अमिताभ विनोद खन्ना कडून लिहून घेतो आणि राखी समजते की विनोद खन्नानेच लिहीले आहे. ते 'दिल तो है दिल' गाणे याच गैरसमजातून आले आहे.

चांगलं लिहिलय..

>>>>जरे तिने तुम्हाला मेहुल बरोबर लग्न लावायला साक्षिदार म्हणुन बोलवले असते तर जलसा करो जयन्तीलाल ह्या गुजराती नाटकासारखा शेवट झाला असता.
दिवना-मस्ताना आठवला.. Lol
आप दोनो कौन है?
दोस्त है...

अर्रर्र.

चांगलं लिहिलंय, ओघवतं.

मला मुकद्दर का सिकंदर आठवला, थोडा वेगळा असला तरी.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद Happy

तू मने गमे छे यात मने बरोबर आहे, मन्ने चुकीचे आहे. बरीच वर्षे झाली त्या किस्स्याला. माझे गुजराती भाषेचे ज्ञान शून्यच. त्या गुजराती मित्राने मने च लिहिले असणार. मी हा किस्सा लिहिताना मला जे आठवले, बरोबर वाटले ते लिहिले.

संपादनाची सोय असल्यास दुरुस्त करून घेतो. तेवढ्यासाठी ज्याचे गुजराती चांगले आहे अश्याचा रसभंग व्हायला नको.
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

Pages