हा खेळ सावल्यांचा

Submitted by हडेलहप्पी on 2 May, 2018 - 16:58

सोमवार, दिनांक २१.ऑगस्ट.२०१७ रोजी सूर्यग्रहण लागणार होतं. आमच्या अॅटलांटातल्या घरापासून फक्त ८० मैलांवरच्या परिसरातून कंकणाकृती ग्रहण दिसणार होतं. साहजिकच आम्ही तयारीला लागलो. ग्रहण पाहायचे चष्मे दीड महिना आधीच मागवले कारण नंतर टंचाई निर्माण होणार होती आणि झालीच. अर्थातच सुट्टी टाकली. आणि जॉर्जियातल्या ब्लॅक रॉक माऊंटन स्टेट पार्कात जाऊन ग्रहण पाहायचं ठरवलं. ८० मैल म्हणजे २ तासाच्या आत तिथे पोहोचू असा अंदाज होता. मात्र बरीच हौशी मंडळी गाड्या काढून निघतील असे अंदाज वर्तवले जात होते म्हणून आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं ठरवलं. तरीही घरातून निघायला १० वाजलेच. आणि ग्रहण दुपारी १:०५ ला लागणार होतं. वाटलं होतं सहज पोहोचू पण तसं झालं नाही.

वाटेत आमच्या आवडीचं तलुलाह स्टेट पार्क लागणार होतं. ते जस-जसं जवळ येऊ लागलं तस-तशी रहदारी वाढू लागली, अगदी बम्पर-टू-बम्पर. तलुलाहच्या साधारण दोन मैल आधी आणि नंतर लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गाड्या लावल्या होत्या. काहींनी कॅमेरे लावून ठेवले होते. काही आईस्क्रीम खात होते. काही लोक तर चक्क गाणी लावून नाचत होते. सूर्यग्रहणसुद्धा साजरं करता येतं, हे आम्ही त्या दिवशी अनुभवलं. त्या सगळ्या हौशी लोकांच कौतुक करत आम्ही मुंगीच्या गतीने पुढे जाऊ लागलो. वाटेत काही दुकानं दिसली. त्यांची स्वतंत्र जागा होती आणि त्यांनी नेमकी संधी साधून “Eclipse Parking $20” असे फलक लावले होते. म्हटलं, व्वा !! एखादा धंदा किती हंगामी असावा? तर एक दिवसा पुरता हंगामी. असो. ही सगळी गम्मत-जम्मत बघत आम्ही पुढे निघालो, ब्लॅक रॉक माऊंटन स्टेट पार्कच्या दिशेने.

ब्लॅक रॉक माऊंटन स्टेट पार्कच्या आधी क्लेटन नावाचं एक मोठं शहर लागणार होतं. आमच्या मार्गावरचं बहुतेक ते शेवटचं मोठं शहर होतं. तिथेही तीच तऱ्हा, रस्त्याच्या दोन्ही बाजूने गाड्या आणि संथ रहदारी. एव्हाना आम्हाला कळून चुकलं होतं की आपण एक वाजता काही ब्लॅक रॉक माऊंटन स्टेट पार्कात पोहोचत नाही आणि १:०५ ला ग्रहण सुरु होणार होतं. तितक्यात उजवीकडे, वरच्या अंगाला, टेकाडावर वॉलमार्ट आणि होम डेपो ही दोन मोठ्ठी दुकानं दिसली. चपळाईने गाडी उजवीकडे वर घेऊन वॉलमार्टच्या पार्किंगमध्ये गाडी लावायचा निर्णय घेतला. तिकडे एक पुरुष आणि बाई एकेक गाडी आत सोडत होते. आम्हाला पुरुषाने विचारले, “तुम्ही सूर्यग्रहण बघण्यासाठी वॉलमार्टच्या पार्किंगमध्ये गाडी लावत आहात काय?”. मी हो म्हणालो. तो म्हणाला, “आम्ही आज पार्किंगमध्ये गाडी लावण्यासाठी देणग्या घेत आहोत. तुम्हाला पाहिजे तितकी देणगी देऊ शकता आणि पूर्णपणे ऐच्छिक.” आणि त्याने कुठल्याश्या संस्थेचं नाव सांगितलं. आधीचे हंगामी धंदे पाहिल्यानंतर हे अपेक्षितच होतं त्यामुळे फारसा विचार न करता त्याला पैसे दिले आणि त्याने गाडी आत सोडली. आम्हाला लगेच आणि चांगली जागा मिळाली आणि गाडी लावली. घड्याळात बरोब्बर एक वाजला होता. आमच्या चहुबाजूंनी डोंगररांगा होत्या.

पाचच मिनिटात चंद्राचा लंच टाईम सुरु होणार होता. तो सूर्याला गिळंकृत करायला सुरुवात करणार होता. आणि आम्हीसुद्धा काहीतरी गिळायचं ठरवंल. वॉलमार्टमध्ये हमखास असतं ते म्हणजे ‘सबवे’. श्रावण असल्यामुळे शाकाहारी सबवे घ्यायचं ठरलं. चंद्र आमच्यासाठी न थांबता सूर्य गिळू लागला होता. आम्ही सबवेच्या रांगेत असताना सारखे बाहेर जाऊन बघत होतो. चंद्राने सूर्याचा टवका उडवला होता. सबवेच्या कर्मचाऱ्यांना काहीही फरक पडत नव्हता असं दिसत होतं. ते तितक्याच स्थिर चेहऱ्याने आणि संथपणे काम करत होते. आमची रांग खूपच हळू सरकत होती. दहा एक गिऱ्हाईकं आमच्या पुढे होती आणि आमचा नंबर शेवटी अर्ध्या तासाने लागला. पटकन ऑर्डर दिली आणि खाऊ घेऊन बकाबका खायला सुरुवात केली, संपवलं आणि पटकन बाहेर जाऊन उभे राहिलो. चष्मे चढवले आणि वर पाहू लागलो. चंद्राचा साधारणत: तीस टक्के सूर्य खाऊन झाला होता.

चंद्राने ठरविल्याप्रमाणे हळू हळू सूर्यास ग्रासणे सुरूच ठेवले होते. आणि आम्हालासुद्धा दुपारी २:३६ वाजता दिसणाऱ्या कंकणाकृती ग्रहणाचे वेध लागले. काही हौशी मंडळींनी कोळशाचे ग्रिल्स आणले होते आणि मस्तपैकी निखारे पेटवून ग्रिलिंग करत होते. जोडीला काहींनी बीअर तर काहींनी व्हिस्कीच्या बाटल्या उघडल्या होत्या. ज्यांनी कॅमेरे लावले होते त्यांचे फोटो काढणं सुरूच होतं, प्रत्येक क्षणी न भूतो न भविष्यति असं काहीसं कॅमेऱ्यात कैद केलं जात होतं. आता सूर्य चंद्रकोरी प्रमाणे दिसू लागला. चंद्राने आपलं एक रूप सूर्याला बहाल केलं होतं किंबहुना सूर्याला घ्यायला भाग पाडलं होतं. एखाद्या व्यक्तीची प्रतिभा जशी स्वयंभू असते तशीच सूर्याची प्रभा ! कोरीचा आकार घेऊनसुद्धा पडणारा प्रकाश म्हणावा तितका कमी झाला नव्हता. चंद्र-सूर्याचं द्वंद्व अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं होतं. २:१६ वाजले होते आणि वीसच मिनिटात अंधारून येणार होतं.

आता चंद्राची चकती सूर्याच्या चकतीवर अगदी बेमालूमपणे बसणार होती. सौरमंडळातल्या या भौमितीय रचना कशा घडून येत असतील याचं आम्हाला नवल वाटत होतं. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच रेषेत आणि आपण अमावास्या म्हणतो त्या दिवशी. त्यातच सूर्य आणि चंद्र पृथ्वीपासून वेगवेगळ्या अंतरावर. म्हणजे कुणीतरी कोनमापक, पट्टी आणि पेन्सिल घेऊन आकृत्या काढल्या आणि त्याप्रमाणे हे सगळं घडवून आणलं आहे असं वाटू लागलं. अगदी पाच टक्केच सूर्य उरला असेल, तरीही तो सूर्य होता आणि फक्त संध्याकाळ होत आल्यासारखी वाटू लागलं होतं. आणि त्या विविक्षित क्षणी चंद्राने आपली टिमकी वाजवत सूर्याला पूर्णपणे गारद करून टाकले, झाकोळून टाकले. पाकोळीने दिवा आच्छादला, शुक्राची चांदणी दिसू लागली, झाडांनी सुस्कारा टाकला, प्रकाशाने विश्रांती घेतली आणि अंधाराने सूर्य माखवला. त्याच वेळी आजूबाजूच्या सगळ्या डोंगर रांगांच्या क्षितिजांवर गुलाबी-केशरी संधिप्रकाशाची महिरप दिसू लागली. जणू सूर्याने आपलाच प्रकाश या डोंगरांवर पेरून ठेवला होता आणि वेळ येताच तो सूर्याचा अंश सहज मंद स्मित करत डोकावू लागला होता. असं अप्रतिम दृष्य मी प्रथमच पाहत होतो. आम्ही इतके भारावून गेलो होतो की फोटो काढायचंसुद्धा लक्षात आलं नाही. जवळपास अडीच मिनिटं आम्ही तो अनुभव स्वतःत सामावून घेत होतो.

लगेचच भास्कराने आपली हिऱ्याची अंगठी अवनीला देऊ केली आणि अवनीने होकार देत साज-शृंगार चढवायाला सुरुवात केली. दाही दिशा उजळू लागल्या आणि चंद्राने नमतं घेऊन स्वस्थानी जायचं मनावर घेतलं. आम्हीसुद्धा सूर्यग्रहणाचा नयनरम्य सोहळा साजरा करून घरी जायच्या संथ रहदारीत सामील झालो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी वर्णन केलंय ग्रहणाचं ! Happy

बायदवे, हा तोच काळ ना जेव्हा लागोपाठ चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आले होते? ते चंद्रग्रहण मीही पाहिलंय. भारी अनुभव होता तो. पण तुम्ही केलेल्या वर्णनाला दाद द्यायला हवी. Happy