मी लिहितो...

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 21 April, 2018 - 23:39

मला लिहायला आवडतं पण……
नवीन लिहिताना पहिल्यापासून भीती वाटते…आता कधीकधी वाटतं ती वाढत चाललीये...कारण लिहिण्यासारखं आता खूप काही आहे माझ्याकडं !
लिहायला बसण्याची वेळ माझी कधीच नक्की नसते...अजूनही...कितीही शिस्त वगैरे लावायचं ठरवलं तरीही अजुनपण काहीतरी खरंच सुचल्याशिवाय आणि लिहावंसं वाटल्याशिवाय लिहिलंच जातं नाही...कधी पटपट सुचत..कधी थोडंफारच सुचत आणि ते लिहून झालं कि तिथंच अडकतो...मधेच कुठंतरी लोंबकळल्यासारखी अवस्था असते... आधी जे लिहिलेलं असतं त्याच कौतुक होतं पण परत काहीच लिहायला,किंवा 'पूर्ण' लिहायला जमलेलं नसतं
धड पूर्णही होत नाही आणि धड लिहिलेलं अर्धवट आहे म्हणून पुसूनही टाकावंस वाटत नाही...लिहिलेला शब्द आणि शब्द आवडलेला असतोच असं नाही..बऱ्याचवेळा ते आवडलेलं नसतंच..पण एकदा लिहिलं कि पुसावंस वाटत नाही...ते आलंय बाहेर तर राहूंदेत तसंच असं वाटतं...कधीकधी पाटी पेन्सिल घेऊन त्यावर लिहायचं असतं...त्यावर पुसायला सोपं जातं...पण पाटीवर लिहिताना पूर्ण पाटी भरली कि जेव्हा खाली खाली लिहीत जातो तेव्हा परत काही वर लिहायचं असेल तर आपल्या हातामुळं खाली लिहिलेलं पुसलं जातं...माझं लक्ष किती लिहिलं यापेक्षा ते कसं लिहिलंय,अक्षर कसं आलंय,कुठलं पुसलं गेलय याकडेच जातं... पाटीचा पर्याय रद्द होतो..पेनानं लिहायचं तर वहीत लिहू कि आखीव ताव आणून त्यावर लिहू हा प्रश्न पडतो...कोऱ्या तावाचाही विचार येतो पण एका ओळीत सलग आणि तेही रेषा मारलेल्या नसताना लिहिणं हे आपल्याला जन्मात शक्य नाहीये हे लक्षात येत आणि तो पर्याय पण रद्द होतो...वहीत लिहिलेलं का चांगलं तर ते एकत्र राहतं हे पटतं पण वहीत लिहिणं हे जरा 'साधेपणाचं' वगैरे वाटतं ! (मला तरी वाटतं) म्हणजे असे मोठे लेखक कसे typewriter ला कागद लावून भरभर लिहितात तसं आपण करायला पाहिजे असा विचार येतो...टाइपिंग च्या क्लासमध्येपण आता computer वापरतात अशी माहिती मित्र देतो मग नेटवर typewriter कुठं मिळतील हे बघायला लागतो...लॅपटॉप सुरु करून नेट कनेक्ट करतो...browser सुरु केल्यावर समोर यूट्यूब चा लोगो दिसतो आणि त्यावर एकदा गेलो कि मग मी का नेट चालू केलं होत ते आठवायला पुढचे दोन तास जातात...एव्हाना typewriter चा विचार मागं पडलेला असतो...मग मी सगळ्या गोष्टींची तयारी हवी असा विचार करून जुन्या वह्या शोधतो...त्या शोधण्यात नेहमीप्रमाणे आई मदत करते...या अशा कामात आई का मदत करते मला माहित नाही... मी कुणाचं काही शोधून द्यायला मदत करत नाही...वह्या सापडतात,त्यात चांगली कुठली,रिकामी कुठली आहे हे बघायला सुरुवात करतो,त्यात कधीतरी काहीतरी लिहिलेलं असतं ते सापडत आणि मग ते वाचताना तंद्री लागते...काहीही फालतू लिहिलेलं असलं तरी 'लिहिलंय हे काय कमी आहे का' असं वाटून उगाचच जरा बरं वाटतं...त्यात जे लिहिलंय ते असं अर्धवट का ठेवलय ? असंही वाटतं..मग ते पूर्ण करून टाकायचं असा ‘पण’ होतो...पण यात पुन्हा तासभर गेलेला असतो...संध्याकाळचे चार वाजायला दहा मिनिट कमी असतात..आता सगळं तयार आहे...बरोब्बर चारला सुरुवात करू असा 'प्लॅन' ठरतो...मग त्याआधी कॉफी करूया असं म्हणून मी सगळं बाजूला ठेवतो आणि आत जाऊन कॉफी करायला लागतो..कॉफी करून बाहेर येईपरेंत साडेचार झालेले असतात...मगाशी हातात असलेला पेन आता हरवलेला असतो तो सापडत नाही मग दुसरा पेन घेऊन मी लिहायला बसतो...चांगलं नाही वाटलं तर कधीही फाडता येईल असं म्हणून मी मधलं पान हुडकतो तर नेमकं त्यावर काहीतरी अर्धवट लिहिलेलं असत मग मी ते फाडतो आणि नवीन मधल्या पानावर लिहायला सुरु करतो... एखादा परिच्छेद लिहून होतो आणि मला लक्षात येतं अक्षर फारच वाईट येतंय...आखीव ताव तिथंच टेबलवर असतात...ते उचलतो...विचार फार झाला आता लिहायचंच असं म्हणून त्यातला एक ताव घेतो त्याची नीट घडी घालतो ज्यात समास नीट यायला तीन चार वेळा घडी घालायला लागते...शेवटी घडी बरोब्बर येते आणि मग लिहिताना त्या तावाखाली काय धरायचं याचा शोध सुरु होतो...उरलेले तावच मग मी त्याखाली धरतो आणि लिहायला सुरुवात करतो...एक पान पूर्ण होत पण परत प्रश्न पडतो कि,मी शाळेत असताना ओळीच्या खाली चिकटून लिहायचो आणि कॉलेजमध्ये आल्यावर ओळीवर लिहायला लागलो...आत्ता अक्षर चांगलं यायला ओळीच्या वर लिहिलं तर ? मी ओळीच्या वर लिहायला सुरुवात करतो...एक परिच्छेद होतो आणि मग ‘मी मराठी लिहून पण ओळीच्या वर कसं लिहितोय ?’ असं वाटतं...परत ओळीच्या खाली लिहायला लागतो...एकदा वर,एकदा खाली असं लिहिलेलं बघितलं कि ते विचित्र दिसतं...कॉफी गार झालेली असते...मी लिहिलेले ताव टेबलवर परत ठेवून देतो...कॉफी गरम करायला आत जातो...
मित्राचा फोन येतो...एकांकिकेच्या प्रॅक्टिसला बोलवतो...मला न्ह्यायला तो घरी येतो...तो यायच्या आत कॉफी संपवतो… लिहिलेलं सगळं गायब करतो ! कारण मी लिहिलेलं बघून ते कौतुक करत नाहीत..मापं काढतात ! मित्र मापं काढणारेच असावेत !
मी प्रॅक्टिसला जातो...येईपरेंत नऊसाडेनऊ होतात...मी आल्यावर टीव्हीवर आईनं लावलेल्या एकदोन सिरीयल chat करत करत बघतो...दादा येतो आम्ही जेवतो...सगळे झोपायचा तयारीला लागतात...आईला स्वयंपाकघरातलं सगळं यावरून झोपायला उशीर होतो...मी आतल्या खोलीत जाऊन बसतो,लॅपटॉप उघडतो,चार्जिंग कमी असत...एक्सटेंशन घेऊन चार्जिंगला लावतो...
सगळे शांत झोपलेत...माझ्याच खोलीतला दिवा चालू...मी मराठी टायपिंगचं पेज उघडतो आणि पहिली ओळ लिहितो...

“मला लिहायला आवडतं पण…..”

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

☺️

वा मस्त वर्णन केलंय! Happy

मला लिहायला आवडतं पण……
नवीन लिहिताना पहिल्यापासून भीती वाटते…>>>>>> तरीही भयकथा अचाट असतात तुमच्या! लिहीत रहा.

धन्यवाद द्वादशांगुला
तरीही भयकथा अचाट असतात तुमच्या! लिहीत रहा.>>>धन्यवाद पण अजून पाहिजे तसं जमत नाहीये..!! भीती अजून वाढवायचीये...!!