ब्युटी पार्लर- भाग 7 (अंतिम)

Submitted by द्वादशांगुला on 29 April, 2018 - 06:01

आधीचे भाग वाचले नसल्यास पुढील लिंकवर टिचकी मारा.

ब्युटी पार्लर भाग 1

ब्युटी पार्लर भाग 2

ब्युटी पार्लर भाग 3

ब्युटी पार्लर भाग 4

ब्युटी पार्लर भाग ५

ब्युटी पार्लर भाग ६

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

पूर्वभाग-

यानंतर नाईक आणि शिंदेंच्या आनंदाला पारावार उरला नव्हता, कारण त्यांना या पानामागे त्या अघोरस्वामीला मात देण्याची विधी मिळाली होती. आता त्याचा अंत निश्चित होता.

आता पुढे-
●●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज बर्‍याच दिवसांनी नाईकांना जरा मोकळा श्वास घ्यायला वेळ मिळाला होता. त्याचबरोबर त्यांच्या मनात थोडं दडपण, उत्सुकताही होती. आपण जे करतोय ते सर्वांच्या भल्यासाठी, एवढंच माहीत होतं त्यांना. हा मार्ग वैध की अवैध हेही माहीत नव्हतं त्यांना. पण दुसरा मार्ग तरी कुठं होता? आता तर त्या अघोरीबाबाला संपवणं हे खरं ध्येय होतं. त्यानं शिंदेंच्या वडिलांना मारलं होतं, नाईकांनाही प्रचंड मनस्ताप दिला होता, वर त्यांच्या जिवामागे हात धुवून लागला होता. त्याला फक्त जगातल्या सर्व शक्ती आपल्या ताब्यात मिळवायच्या होत्या. स्वतःला वरचढ सिद्ध करायचं होतं. त्यासाठीच त्याने आपली शक्ती प्रचंड वाढवली होती. शक्तिशाली आत्मे स्वतःच्या वश केले होते. पण रामानंद स्वामींनी त्याची शक्ती अडकवून ठेवली होती. त्यामुळेच तो चवताळला होता. पण नाईकांना हेही माहीत होतं, की जर त्याच्या शक्ती मुक्त झाल्या, तर त्याने नक्कीच सर्वशक्तिनिशी हल्ला केला असता. मग त्याला थांबवणं शक्य नव्हतं. त्यामुळे ठोस पावलं उचलणं गरजेचं होतं. पण शिंदेंच्या वडिलांनी सांगितलेल्या प्रक्रियेतील शेवटची पायरी धोकादायक होती, ती करता येईल की नाही, याबाबतच ते साशंक होते.

आज नाईकांच्या स्वप्नात रामानंद स्वामी आले होते. ते नाईकांना म्हणाले, " ऐक. येत्या अमावस्येचा दिवस खूप महत्वाचा आहे. तो अघोरस्वामी त्याच्या शक्ती परत मिळवण्यासाठी पूजा करणार आहे, पण स्मशानात नव्हे, त्याच्या कार्यक्षेत्रात. यालाही एक मोठं कारण आहे. तो मुळातच कापलिकत्वाच्या परिसीमा ओलांडून दैत्यशक्तींची पूजा करणार आहे. त्याला कसंही करून आपल्या शक्ती मिळवायच्या आहेत. त्यासाठी तो आपल्या प्रभावाखाली असलेल्या दुष्ट शक्तींना आळवेल. त्याला हे आतापुरतं तरी स्मशानात करता येणार नाही. कारण एक कापलिक नेहमीच आपला प्रभाव पडलेल्या जागी, ठरावीक स्मशानठिकाणीच साधना करतो. तू पूर्वी त्या काठीने त्याच्या गावापुरत्या प्रभावावर मर्यादा आणल्या होत्यास, तरी त्याने तिथूनच आपलं पुढील नीचकर्म आणि परलोक शक्ती वाढवायचे प्रयत्न केले, ज्यात तो सफल झाला. मात्र त्याने हे केलं होतं अदृश्य रूपात. पण तो आता तिथं साधना करणार नाही, कारण तिकडे आपण प्रभुरामचंद्राच्या पवित्र शेल्याने त्याच्या नकारात्मक शक्ती जखडून ठेवल्यात, तिथे केंद्रस्थान असल्याकारणाने त्याला तिथं जाऊन साधनेसच मुळी अडथळा येत आहे. त्याच्या जवळच्या कापलिक शक्ती आणि वाईट शक्ती आपण बांधून ठेवल्यात. त्याच्याकडे परत त्या कापलिक शक्ती प्राप्त करण्याचा संयमही नाहीय. म्हणून तो कापलिकत्वाच्या पलिकडे इतर दुष्ट शक्ती आळवेल. त्याच्याकडे अद्याप काही शक्ती आहेत नि बंधनातल्या त्याच्या शक्तीही त्याचीच साथ देतील. जरी तो त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करू शकत नसला तरी. कारण त्या अद्याप अस्तित्वात आहेत. त्यांना पूर्णपणे नष्ट करायचंय तुला. /द्वादशांगुला- जुई नाईक/

आणि तो हे क्रूर कर्म कुठे करणार आहे माहीत आहे? तो त्याची साधना पूर्ण करेल त्याच ठिकाणी, जिथे त्याने कापलिकत्वाचा वापर करून केशतंत्रविद्येच्या सहाय्याने त्या लाल केसांच्या मुलीला - मीनाला मारलं होतं. ती त्याचा पहिला बळी ठरली होती. कारण ते ठिकाण त्याच्या पहिल्या विजयाची खूण आहे, त्याच्या कार्यारंभाची गूढी त्याने तिथेच उभारली होती, नि तो आता शक्ती परत मिळवण्याचा प्रयत्न तिथेच करणार. कारण पहिला विजय मिळवायच्या प्रबळ इच्छेने तेव्हा त्याने उत्साहाच्या भरात आपल्याजवळील बहुतेक शक्तींचं पाचारण तिथे केलं होतं. त्यांचं अस्तित्व थोड्याबहुत प्रमाणात अद्यापही तिथे आहे. यामुळे त्याच्या पूजेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणं त्याला सोपं जाईल. मात्र आपल्याला अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत त्याच्यावर मात मिळवायची आहे, तेही त्या लिहून ठेवलेल्या साधनेनेच, हे लक्षात ठेव. तुझ्या मनातलं मी जाणतो. तुला प्रश्न पडला असेल, की मी एक वैष्णव साधू असूनही तुला शैव पंथाच्या समर्थनासाठी प्रोत्साहन का देतोय. तर हे जाणून घे, की अध्यात्माचं सार कळलेली व्यक्ती कधीही पंथांमध्ये द्वेष करत नाही. आणि मुळात दोन्ही पंथांच्या अग्रस्थानी असलेले भगवान विष्णू व भगवान शंकर यांत परस्पर आदर व प्रेम आहे आणि मी हेच सत्य मानतो. "

असं बोलून रामानंद स्वामी अंतर्धान पावले. नाईकांचं स्वप्नही भंग पावलं. नाईकांना रामानंद स्वामींच्या बोलण्याने हुरूप आला होता. पुढे करायच्या कृतीविषयी प्रबळ आत्मविश्वास आला होता. शिंदेंच्या वडिलांनी त्या कागदात दिलेल्या प्रक्रियेतील प्रबळ कार्यक्षेत्र म्हणजे काय ते त्यांना नीट कळलं होतं. आता त्या कापलिकाच्या शक्तींवर नि त्याच्यावर थेट हल्ला करण्याचा दिवस जवळ येत होता. तो दिवस होता, येत्या अमावस्येचा. आणि योगायोग म्हणजे तो कापलिकही तिथे त्याच दिवशी आपली साधना करणार होता.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

शेवटी तो दिवस उजाडला. आज अमावस्या होती. नाईकांनी सर्व तयारी केली. त्यांना माहीत होतं, आज सर्वकाही प्रक्रिया फक्त आपल्याला नि शिंदेंनाच करायची होती. संध्याकाळपर्यंत ते 'ओम नमो नारायणाय' या रामानंद स्वामींनी सांगितलेल्या मंत्राचं पठण करत होते, सकारात्मक शक्ती प्राप्त व्हावी अन् मनःशांतता वाढावी म्हणून. या मंत्रपठणाने नाईकांना आत्मविश्वास आला होता. संध्याकाळी त्यांनी शिंदेंना तयार रहायला सांगितलं. शिंदेंना तो प्रक्रिया लिहिलेला कागद अन् ती अवजड पेटीही आणायला सांगितली. जाताजाता नाईकांनी मनोभावे देवाचं स्मरण केलं, नि ते त्या मीनाच्या ब्युटी पार्लरमध्ये जायला निघाले. जाताना मध्ये एक शंकराचं हेमाडपंती देऊळ लागत होतं. नाईकांनी अभावितपणेच बाईक थांबवली. ते देवळाच्या गाभार्‍यात गेले. शंकराची पिंड फार प्रसन्न वाटत होती. भारलेलं, गंधित वातावरण होतं. नाईकांनी मनोभावे नमस्कार केला. बाजूला उदबत्त्या, धूप यांची राख पडली होती. नाईकांनी ती उचलली. खिशातून एक कागद काढला. त्यात ती राख भरून ठेवली. महत्त्वाची विभूती त्यांना मिळाली होती.
/ द्वादशांगुला- जुई नाईक/

ते आता मीनाच्या ब्युटी पार्लरकडे जात होते. त्यांनी बाईक पार्क केली आणि ते शिंदेंची वाट पाहू लागले. थोड्याच वेळात शिंदे ती पेटी घेऊन आले. नाईक आत जाणार, इतक्यात शिंदेंनी त्यांना थांबवलं. पेटीतला काळा दोरा त्यांनी काढला आणि स्वतःच्या , नाईकांच्या दंडावर बांधला. आता त्या दोघांना अदृश्य नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळणार होतंच, वर त्यांना या शक्ती आसपास असल्यावर जाणवणारही होतं. आता ते दोघं आत गेले. तिथं त्या दोघांना तो अघोरी दिसत नव्हता, पण तो इथेच असणार हे त्यांना पक्कं माहीत होतं. वातावरण खूपच गूढ, गंभीर वाटत होतं. वातावरणात एकप्रकारचा तणाव आलेला जाणवत होता. इथे तापमानही वाढलेलं जाणवत होतं. अदृश्य जगतातून त्या नकारात्मक शक्तींनी नक्कीच इथे प्रवेश केला असणार. त्या अघोरस्वामीने नक्कीच त्यांना आळवायला सुरूवात केली असणार.

नाईक काही बोलायच्या आधीच काळोख घालवण्याकरता शिंदे लाईटचं बटन दाबायला गेले. पण अर्थात, एकही बटन चालत नव्हतं. मिट्ट काळोख पसरला होता. फॅन मात्र चालू बंद होत होता. पण तो काही उपयोगाचा नव्हता. याचा अर्थ अघोरस्वामीने आपल्या साधनेचे जाळे पसरवायला सुरूवात केली होती. मग दोघांनीही आपले मोबाईल बाहेर काढले. फोनमध्ये रेंज नव्हती. नाईक आसपास तरी रेंज आहे की नाही, हे बघायचं ठरवलं.. ते ब्युटी पार्लरचा दरवाजा उघडायला गेले, पण तो उघडलाच नाही. त्यांनी हा दरवाजा बंद कधी केला, हे त्यांना आठवत नव्हतं. शिंदे तर त्यांच्या पुढेच चालत होते. ही त्या अघोरीची कमाल होती तर. आता या दोघांना त्या अघोरस्वामीला मारल्याशिवाय नि इथल्या नकारात्मक शक्ती नष्ट केल्याशिवाय बाहेर पडता येणार नव्हतं. इतक्यातच दोघांच्याही मोबाईलची बॅटरी संपली, अचानक. अघोरस्वामी आपली चाल खेळत होता. म्हणजे या काळोखातच आपल्या पुढील साधनेचा आरंभ करायचा होता.

थोड्या वेळाने दोघांचेही डोळे अंधाराला सरावले. नाईकांनी शिंदेंना खूणेनेच ती पेटी उघडायला सांगितली. शिंदेंनी तो प्रक्रिया लिहिलेला कागद काढला. नाईकांना वाटलं होतं, की या कागदावरचं लिहिलेलं काहीच दिसणार नाही. पण ती अक्षरं चक्क चमकत होती. ती प्रक्रिया ठळकपणे दिसत होती. यानंतर नाईकांनी प्रक्रियेवर नजर फिरवली. पुन्हा एकदा सर्वकाही लक्षात घेतलं. पण एकाएकी त्या कागदाच्या एका टोकाला आग लागली. नाईक, शिंदे दोघेही घाबरले. पण इतक्यात झटदिशी नाईकांनी खिशातल्या देवळातून आणलेली विभूती त्यावर टाकली, आणि काय आश्चर्य, ती आग झटकन विझली. तो कागद जणू आग न लागल्यासारखाच दिसत होता. मग नाईकांनी ती विभूती आसमंतात उधळली, अदृश्य शक्ती थोडावेळ तरी लांब रहाव्यात आणि प्रारंभ तरी निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून. त्यानंतर नाईकांनी खरा प्रारंभ केला, त्या प्रक्रियेचा.

नाईकांनी शिंदेंना ती पेटी आणि तो कागद रक्षण्याचं काम दिलं. हे कार्य पूर्ण करण्याकरता या गोष्टी फारच महत्त्वाच्या होत्या. तो कागद नाईकांनी एकवार वाचला. नारायणाचं, शंकराचं स्मरण केलं. त्यानंतर त्यांनी पेटीतली विभूती घेतली. तिने दोन वर्तुळं आखली. त्या वर्तुळाच्या बाजूने काळ्या धाग्याचं वर्तुळ बनवलं. एका वर्तुळात शिंदेंना त्या पेटीसह बसायला सांगितलं, तर दुसर्‍या वर्तुळात स्वतः बसले. नाईकांनी पुढील कार्यवाहीसाठी एका डाॅक्टर मित्राकडून आणलेली रक्तीची बाटली खिशातून काढली. त्यांनी ते हातात घेतलं. मात्र ते त्या हातातल्या द्रवाकडे पाहतच राहिले. कारण ते पाणी होतं. अघोरस्वामीला प्रत्येक पायरीत विघ्नं आणायची होती. नाईकांना का कोणास ठाऊक पण असं काहीतरी होणार वाटलंच होतं. म्हणून त्यांनी शिंदेंना काही कळायच्या आत बूटाच्या सोलमध्ये लपवलेली छोटी सुरी काढली आणि आपल्या हातावर सपकन वार केला, हात त्या बाटलीवर धरून भळाभळा वाहू लागलेलं रक्त त्यात जमा केलं. शिंदे अचंबित होऊन पाहतच होते. पुरेसं रक्त जमल्यावर नाईकांनी बाटली बाजूला ठेली. इतक्यात शिंदेंनी पेटीतली एक विभूती काढून ती नाईकांच्या जखमेला लावली. ती जखम झटक्यात बरी झाली होती. साधा व्रणही शिल्लक राहिला नव्हता.

' भैरवाय नमः' या मंत्राची तीन आवर्तनं झाल्यावर नाईकांनी त्या काळ्या दोर्‍याच्या आणि विभूतीच्या मधून रक्ताने मंडल रेखाटलं. ती दोन्ही रिंगणं आता चमकू लागली होती, निळ्या प्रकाशाने. नाईकांनी पेटीतली मातीची जुनाट वाटी घेतली. त्यात रक्त नि विभूती कालवली. हे करताना त्यांनी कागदावर लिहिलेला मंत्र मोठ्याने उच्चारण्यास प्रारंभ केला.

त्रीं त्रीं तृतीयनेत्रोदयमार्गे संहार: बभूव ।
भ्रं भ्रं भ्रमनिवारणं तत्साहाय्येन कुरू ॥
धं धं धृतिप्रदानं श्रीत्रिशुलदर्शनेन भवति।
गं गं निगर्वाय पराक्रमवीराय शिवाय नमः ॥

नंतर तयार लेप त्यांनी कपाळावर फासून झाल्यावर बाजूला ठेवला. ते हे प्रथमच करत होते. याआधी त्यांनी असं काही पाहिलंही नव्हतं. पण मनावर, भावनांवर काबू ठेवून त्यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली. स्वरक्षणाचा टप्पा पार पडला होता. रिंगणात असताना ते पूर्णतः सुरक्षित होते.

तो अदृश्य अघोरस्वामीही तिथेच होता. त्याला आता खूप राग आला होता या दोघांचा. आपण यांना स्वरक्षण टप्पा पार करण्यात थांबवू शकलो नाही, याची त्याला चीडही आली होती. याच रागात तो स्वतःच्या समोरच्या धूनीत काष्टाहुती टाकत होता. पण संरक्षणकवचामुळे याचा नाईक आणि शिंदेंवर अजिबात परिणाम होत नव्हता. हे त्यांना जाणवलं नसतं, पण शिंदेंनी दंडावर बांधलेल्या काळ्या दोर्‍यामुळे त्या दोघांना हे जाणवलं होतं. अघोरस्वामी चवताळून मंत्र म्हणत होता. मात्र त्याने काबूत घेतलेल्या आत्म्यांपर्यंत त्याचा निरोप पोहोचत नव्हता. कारण त्या जागी नाईकांच्या मंत्रोच्चरणामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आता निर्माण झाला होता आणि त्यामुळे उतावीळ अघोरस्वामी आपली पारलौकिक एकाग्रता गमवून बसला होता. हे लक्षात आल्यावर तो भावभावना काबूत ठेवून एकाग्रता आणायचा प्रयत्न करत होता, आणि याच वेळी नाईकांनी पाऊल उचलेलं योग्य ठरणार होतं. त्यांनी पुढची प्रत्येक पायरी सावकाश, अजिबात चूक होऊ न देता करायचं ठरवलं होतं. बारीकशी चूकही महाग पडणार होती. नाईकांनी आता त्या पेटीतून भारमंत्रित काठ्या काढून धूनी पेटवली. निळ्या -पिवळ्या प्रकाशाने तो गाळा उजळून निघाला होता. नाईकांनी पुन्हा एकदा तो मंत्र म्हणत काष्टाहुती देण्यास सुरूवात केली. त्यानंतर ते हा मंत्र सातत्याने उच्चारू लागले,
' वं वं अयोग्यं, अचेतं, अधेयं भस्मयेत। '

आणि याबरोबर अघोरस्वामीची अदृश्यता नष्ट झाली. रागाने लालबुंद झालेला तो आणखीनच बीभत्स दिसत होता. तो रागाने थरथरत होता. त्याचा श्वास फुलला होता. त्याच्या समोरची धूनीतली अग्नी हळूहळू शमत होती. हे बघून अघोरस्वामी आणखीनच चवताळला. मात्र साधनेदरम्यान शत्रूशी बोलणं वर्ज्य असल्याने तो नाईकांना रागावून काही बोलू शकत नव्हता. मग त्याने सोबत आणलेला धारदार दगड घेतला, नि स्वतःच्या करंगळीवर सपकन वार करून आत्म्यांना बोलावत विझत चाललेल्या अग्नीला रक्ताची धार अर्पण केली. काही क्षण फक्त स्तब्धता होती. अन् तेवढ्यात त्याच्या धूनीतल्या आगीचा भडका उडाला अन् त्याबरोबर अघोरस्वामी बीभत्स हसू लागला. त्याने बोलवलेले आत्मे दिलेल्या आहुतीने आले होते. वातावरण क्षणार्धात पालटलं होतं. नाईक आणि शिंदेंना हे जाणवलं होतं. आता नाईकांनी शिंदेंना इशार्‍यानेच सावध रहायला सांगितलं. अघोरस्वामीने आपले डोळे बंद केले आणि एक हात वर करून कसलासा मंत्र मोठ्याने म्हणायला सुरूवात केली. त्यानंतर हातात आलेली पांढरी पूड आसमंतात पसरवली. तो मानवी हाडांचा चूरा होता. या कृतीने त्या दुष्ट आत्म्यांच्या माणसाला मारणार्‍या, मांसाचे लचके तोडणार्‍या लांब जिभा पुन्हा लपलपू लागल्या होत्या. मानवी मांसाच्या त्यांच्या सुप्त इच्छा पुन्हा जाग्या झाल्या होत्या. अघोरस्वामीने आपली चाल खेळली होती. त्या आत्म्यांना या दोघांच्या शरीराचं, मांसाचं आमीषच दाखवलं होतं त्याने. त्यामुळे ते दुष्ट आत्मे पूर्णपणे अघोरस्वामीला सहाय्य करणार होते.

तेवढ्यात बाहेर कोणीतरी आलं. नाईक आणि शिंदेंनी नीट पाहिलं, तर कमिशनर साहेब आले होते. ते दार उघडून आत आले. नाईकांना हे सारं करताना पाहून ते रागवले. ते रागाने ओरडले, " नाईक, तुम्ही हे काय करताय? अक्कल आहे का तुम्हाला? आणि शिंदे तुम्हीपण? तुम्हा दोघांकडून ही अपेक्षा नव्हती... आताच्या आता चला तुम्ही चौकीत! "
हे ऐकून शिंदे खडबडून उठले. ते रिंगणाच्या बाहेर पाऊल टाकणार, इतक्यात नाईकांनी त्यांना थांबवलं. ते म्हणाले, " शिंदे, ही त्या अघोरस्वामीची चाल आहे. तुम्ही बाहेर पडू नका. कमिशनर साहेब त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीत आहेत. त्यांना इथे येण्याचं काहीच कारण नाही."
शिंदे परत खाली बसले. हे पाहून कमिशनर साहेबांच्या रूपातल्या दुष्ट शक्ती बीभत्स हसली नि पाहता पाहता हवेत विरून गेली. / द्वादशांगुला जुई नाईक /

इतक्यात त्या जागी सोसाट्याचा वारा वाहू लागला. वार्‍याने नाईकांनी पेटवलेली धूनी विझत आली होती. रिंगणात बसून राहणंही अशक्य होत होतं. शिंदेंनी नाईकांच्या हातात त्या पेटीतला एक चमकता खडा दिला. नाईकांनी त्यावर डबीतली विभूती टाकली, मग आता पेटवलेल्या धूनीतली राखेची विभूती टाकली. त्याच बरोबर तो खडा आत्यंतिक चमकू लागला. त्यातून निळसर लाल प्रकाश बाहेर पडत होता. हा त्याच खड्यांपैकी एक होता, ज्यामुळे पेटी उघडताना ते दोघं बेशुद्ध पडले होते. काही क्षणांतच त्यातून अत्यंत प्रखर प्रकाशाची वलयं बाहेर पडून पसरू लागली अन् काही वेळातच त्या आत्म्यांच्या शक्तीवर त्याचा प्रभाव पडला होता. त्या शक्ती काहीवेळ संमोहित झाल्या होत्या. हे संमोहन किती वेळ टिकणार होतं, हे काही त्या कागदावर लिहिल्याचं त्यांना आठवत नव्हतं. पण त्यांच्याही नकळत त्यांनी पेटीमधलं ते जुनाट वाळूचं घड्याळ काढलं आणि समोर उभं करून ठेवलं. हे काही त्यांनी मुद्दामहून केलं नव्हतं. काही क्षणातच त्यांच्या सगळं लक्षात आलं. त्यांच्या भोवतीच्या त्यांना सहाय्य करणार्‍या शक्तींनी त्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर संकेतामधून दिलं होतं. याचा अर्थ त्या दुष्ट शक्तींवर त्याचा प्रभाव ही सारी वाळू खालच्या फुगवट्यात जमा होईपर्यंत राहणार होता. अर्थात तेवढ्या वेळात अघोरस्वामीलाही मारावं लागणार होतं, कारण प्रभाव संपल्यावर त्या शक्ती चवताळून अजून उठणार होत्या, हे नक्की होत्या.

आता करायच्या पायर्‍यांवर वेळेचं बंधन लागलं होतं. ती वाळू हळुहळू खाली सरकत होती. इकडे आपल्या शक्तींना रोखलेलं पाहून अघोरस्वामी चवताळला. नाईक आणि शिंदेंकडे काहीच शक्ती नसल्याचं समजून पुरता फसला होता तो. तो इथे मुळी अजून दुष्ट शक्ती वश करायला आला होता. आणि हे दोघं इथे येणार, याची त्याला कल्पना नव्हती. त्याच्याजवळ उरलेले मोजके आत्मे त्याने मानवाचं आमीष दाखवून बोलावले होते, मात्र आता तेही संमोहित झाले होते. आता काय करावं, हे त्याला कळत नव्हतं. त्याच्याजवळच्या कापलिक शक्ती तर यांनी कधीच ओढून घेतल्या होत्या. आता त्याच्याकडे आपल्याकडचे आत्मे पुन्हा जागे होईपर्यंत वाट पहावी लागणार होती. आता नाईक थोडे अस्वस्थ झाले होते. ही शेवटची पायरी होती. या बद्दल मात्र त्यांना साशंकता होती. कारण त्या कागदावर लिहिलं होतं,

' त्या अघोरस्वामीच्या सर्व शक्ती त्याच्याजवळ असल्यावर तुम्ही इथपर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य आहे. जर तुम्ही त्या सर्व शक्ती जखडून ठेवल्या असतील, आणि आता त्याला मारायची योजना आखत असाल, तर ते या अघोरस्वामीपेक्षाही जास्त भयानक होईल. कारण तो मेल्यावर कोणताच वाली नसलेल्या त्या शक्तींवर कोणाचंच बंधन नसेल. त्या चवताळून पूर्ण जगात हैदोस माजवतील. मग त्यांना नष्ट करणं जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे तुम्हाला त्या तुमच्या बंधनातून मुक्त कराव्या लागतील. यानंतर दोन शक्यता आहेत. एकतर त्या सर्व शक्ती त्यांच्या मालकाचं न ऐकता चवताळून तुमच्यावर नि अघोरस्वामीवर धावून येतील, तेव्हा त्या अघोरस्वामीकडे त्यांना लगेच नष्ट केल्याशिवाय कोणताच पर्याय नसेल, कारण क्षणात येणार्‍या संकटापासून कोणीही वाचण्याचाच प्रयत्न करतो. तो स्वतःच्या जिवावर खेळून तुम्हाला मारण्याचा विचार करणार नाही. इथेच तो चूक करेल. मग त्याचा मृत्यू निश्चित आहे. पण दुसरी शक्यता म्हणजे त्या शक्तींना तुम्हाला मारायचा संदेश अघोरस्वामी देईल. तेव्हा तुम्हाला एकतर स्वतःचं बलिदान देण्याचं ठरवून आतापर्यंत उच्चारलेले सर्व मंत्र म्हणून व सार्‍या विभूती अग्नीला अर्पण करून जीव गमवावा लागेल. यात तुम्ही, त्या शक्ती आणि अघोरस्वामी या सार्‍यांचा नाश होईल. पण यातही एक पर्याय आहे. जर तुम्ही अघोरस्वामीने जीव घेतलेल्या एखाद्या आत्म्याला आपल्या बाजूने करून त्याला आपलं रूप घेऊन तात्काळ उभं केलंत, तर त्या कालावधीत तुम्ही या वरील कृतीनेच आता गोंधळलेल्या शक्ती नष्ट करू शकता. यात अघोरस्वामीचाही नाश आहे. पण तुमच्या जिवाला कमी धोका असेल.'

पण त्या दुसर्‍या पर्यायात म्हटल्याप्रमाणे घडलं, तर नाईकांजवळ आत्मसमर्पणाखेरीज दुसरा मार्ग नव्हता. कारण मुळातच नाईक काही या विद्येत मुरलेले साधू नव्हते. आणि एखाद्या अशा आत्म्याला वश करणं, ज्याचा मृत्यूच मुळी दुसर्‍या साधकाने आत्मे वश करण्याकरता घडवून आणला होता, हे कठीण होतं. कारण तो आत्मा आता त्या साधकाच्या बांधीलकीत असणार होता आणि तिथून त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रचंड एकाग्रता लागणार होती, जी कित्येक तपं साधना केलेल्या साधकाला शक्य होणार होती. मात्र कमी तपोबलाच्या साधकांमध्ये ही विद्या प्राप्त करणारा लाखांत एक असणार होता, जो देवाचाच प्रेषित असू शकेल. असं त्या कागदावर लिहिलं होतं. तरीही सोबत असे आत्मे आपल्या बाजूने वळवण्याची पायरीही दिली होती. नाईकांनी रामानंद स्वामींचं स्मरण केल्यावर ते लगेचच अघोरस्वामीच्या शक्तींना मुक्त करणार होते. पण यापुढे सर्वस्वी निर्णय नाईकांचा होता.

पण नाईक निडर होते. ते रामानंद स्वामींना संकेत देण्याआधी शिंदेंना म्हणाले, " जर त्या शक्ती मालकाच्या आज्ञेबाहेर गेल्या तर ठीक, नाहीतर माझ्याकडे आत्मसमर्पणाखेरीज दुसरा मार्ग नाहीय. कारण उगाच अशा बंधनातील आत्म्याला आळवणं हे धोक्याचं आहे. जर तो आला नाही, तर या अघोरीला कोणीच संपवू शकत नाही. "
यावर शिंदेंना बोलायला काहीच उरलं नव्हतं. ते फक्त आदराने नाईकांकडे बघत राहिले. नाईकांना मृत्यू समीप दिसत होता. तर तो अघोरस्वामी मंत्रोच्चरणाने आपले सुप्त झालेले आत्मे जागवण्याच्या प्रयत्नात होता. काहीच क्षणात आपल्या पूर्वीच्या शक्ती मोकळ्या होणार आहेत, असं त्याला वाटलंही नव्हतं. यापासून तो पूर्णपणे अनभिज्ञ होता.

आता नाईकांनी रामानंदस्वामींना आठवलं. लगेच त्या दुष्ट शक्ती मुक्त होऊन इथे येणार होत्या. नाईकांनी बाजूच्या वाळूच्या घड्याळाकडे पाहिलं. अगदी थोडी वाळू बाकी होती. नाईकांनी एक मोठा श्वास घेतला. इतक्यात नाईकांनी स्वतःच्या नकळत पूर्ण भान हरपून समोरच्या धूनीशेजारी पेटीतली धातूच्या प्रतिकात्मक मानवी मुंडके गोवलेली माळ, काळ्या लोकरीच्या धाग्याचा गोंडा असलेली माळ, प्रतिकात्मक शिंग बांधलेली माळ, काळी वस्त्रे ठेवली. त्यावर आधी उरलेलं रक्त शिंपडलं. भान हरपून मंत्रोच्चारण करत विभूती टाकल्या. ते साक्षात कपालेश्वराला आवाहन करत होते. शिंदे त्यांच्याकडे विस्मयजनकरित्या पाहू लागले. अघोरस्वामीही हडबडला. इतक्यात समोरची धूनीतली आग काळ्या रंगाची दिसू लागली. ही साधना करताना नाईक वेगळेच भासत होते. त्यांच्या चेहर्‍यावर अलौकिक तेज आलं होतं. अघोरस्वामी याने पूर्णपणे अचंबित झाला होता. कपालेश्वराला आवाहन करून ते साध्य करणं हे शेकडो तपं साधना केलेला साधूच करू शकत होता. ही साधना अद्याप अघोरस्वामीलाही जमली नव्हती. तर शिंदे आश्चर्यचकित झाले होते कारण या कठीण साधनेची कृती त्या कागदावर कुठेही लिहिली नव्हती. याचा अर्थ नाईकांची ही पूर्वजन्माची देणगीच असू शकणार होती.

याने अचंबित झालेल्या अघोरस्वामीला आपण कुणाच्या वाकड्यात शिरलोय, हे कळलं. ही नक्की कोणतीतरी सिध्दहस्त व्यक्ती आहे, हे त्याच्या लक्षात आलं. तो खूप घाबरला होता. साक्षात कपालेश्वराला यशस्वीपणे आवाहन करणारी व्यक्ती त्याने आयुष्यात कुठेही पाहिली नव्हती. इतक्यात अघोरस्वामीच्या बंदिस्त शक्ती मोकळ्या होऊन परत आल्या. अघोरस्वामीच्या सामर्थ्यामुळे त्या अजूनही त्याच्या आज्ञेत होत्या. हे पाहून नाईक म्हणाले, " त्यांना ताबडतोब नष्ट कर. " पण हा आवाज नाईकांचा वाटत नव्हता. एखाद्या सर्वश्रेष्ठ मनुष्याचा वाटत होता तो. शिंदे या रूपाकडे पाहतच राहिले. घाबरलेल्या अघोरस्वामीने लगेच त्याचं पालन केलं. काहीच क्षणात त्याने संहारमंत्राने आपल्या सर्व शक्तींचा नाश केला. तो आता एक शक्तिहीन साधा मनुष्य उरला होता. त्याचा चेहरा आणखी भेसूर दिसू लागला होता. इतक्यात ते सुप्तात्मे जागृत झाले. ते नाईकांवर चाल करणार, इतक्यात ते आसमंतात विरून गेले होते. ही तर निव्वळ कपालेश्वराची कृपा होती. हे पाहून अघोरस्वामी नाईकांची माफी मागायला पुढे झाला. इतक्यात नाईकांनी एका क्लिष्ट मंत्राचं उच्चारण सुरू केलं. त्याने अचानक अघोरस्वामी तडफडू लागला. त्याचं शरीर जळल्यासारखं दिसू लागलं नि क्षणार्धात त्याची राख झाली. त्याच्या किंकाळ्या कितीतरी वेळ तिथे गुंजत राहल्या होत्या. अघोरस्वामी नि त्याच्या दुष्ट शक्तींचं पर्व संपलं होतं. इतक्यात नाईकांना शक्तिहीन वाटू लागलं नि त्यांची शुद्ध हरपली.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

ते जागे झाले, तेव्हा ते त्यांच्या घरी होते अन् त्यांच्या शेजारी शिंदे बसले होते. त्यांना जागं झालेलं पाहून शिंदे म्हणाले, " साहेब, तुम्हाला काय झालं होतं तिथे? तुमचा आवाज अचानक कसा बदलला? तुम्ही ती साधना कशी मिळवलीत?"
हे ऐकून अचंबित झालेले नाईक म्हणाले," मला नीट सांगा. मी रामानंद स्वामींना आठवलं, त्यानंतरचं मला काहीच आठवत नाहीये. "
यावर शिंदेंनी त्यांना त्यानंतर घडलेला सगळा वृत्तांत कथन केला. नाईकांना याचं खूप आश्चर्य वाटलं होतं. त्यांनी याबद्दल रामानंद स्वामींना विचारायचं ठरवलं.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज रामानंद स्वामी नाईकांच्या स्वप्नात आले. ते म्हणाले, " तू पूर्वजन्मीचा एक महान कापलिक आहेस. ज्याक्षणी तुला वाटलं की आपण हा जन्म सोडून जातोय, तेव्हा तुझा आत्मा काही क्षण या जन्माच्या पलिकडे पोहोचला. तेव्हाच तुझ्यातला कापलिक जागा झाला. तू तुझी तेव्हाची पुण्यसाधना आळवलीस नि त्या अघोरस्वामीचा नाश केलास.
लक्षात ठेव, तुझ्या आयुष्याला आता ही सर्वस्वी कलाटणी मिळाली त्या मीनाच्या ब्युटी पार्लरमध्येच. आणि तुझ्या आयुष्यात अघोरस्वामीचा खर्‍या अर्थाने शिरकाव झाला इथेच, कारण पूर्वायुष्यात घडलेली घटना हा निव्वळ योगायोग होता. त्या अघोरस्वामीने आपल्या साधनाप्राप्तीची गूढी तिथेच रोवली होती, अन् तू त्याचा संहारही तिथेच केलास. तिथे झालेल्या तिच्या खूनामुळे तुला त्याच्या शक्तीचा, इच्छेचा अंदाज लावता आला. जीवनाचं परमोच्च ध्येय जाणून घेता आलं. तुझ्या पूर्वजन्माचा मोठा ठेवा तुला इथेच गवसला नि तो तू विधायक कामासाठी इथेच वापरलास. पण आता तू हे सारं सोडून नव्या आयुष्याची सुरुवात कर. तुझ्या आयुष्याचं ' ब्युटी पार्लर' चं पान बघ कधीच उलटलंय. आता आपण कधी भेटणार नाही. माझं काम संपलंय.'

अन् नाईकांचं स्वप्न भंगलं. त्यांना आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होतीच, पण सोबतच त्यांना जगण्याचं सार कळलं होतं. मिथ्या, सत्य यातला फरक कळू लागला होता. आयुष्याचं एक पान उलटलं होतं. पुढची नवीन आशा, उमेद त्यांना खुणावत होती.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●

- द्वादशांगुला.

तळटीप :

ही कथा पूर्णपणे लेखिकेच्या (पक्षी : माझ्याच) मेंदूवरच्या सुरकुत्यांतून बाहेर पडली असून याचा वास्तविकतेशी काडीमात्र संबंध नाही ... नसावा. त्याचप्रमाणे अंधश्रद्धा पसरवण्याचा दूरदूरपर्यंत हेतू नाही. (चुकून) सत्यता आढळल्यास डोळे चोळून परत नीट तपासून पहावे नि येथे नमूद करावे कारण-
काही सत्यं अर्धसत्यं असतात; हे जग मायावी आहे आणि त्यात काही सत्यं लपली आहेत.... नकळत. आणि हेच सत्य आहे................

-द्वादशांगुला

कळकळीची विनंती-
माझी ही कथा व्हाॅट्सअॅपवर फिरत आहे. तेव्हा कृपया जर आपल्याला ही कथा नावाविरहित फाॅरवर्ड झाली, तर पाठवणार्याला दुसरीकडे पाठवण्याआधी कृपया माझे नाव टाकायला सांगितलेत तर फार उपकार होतील. मी आपली ऋणी राहीन.

आपली कृपाभिलाषी,
द्वादशांगुला
जुई नाईक.

Protected by Copyscape

Group content visibility: 
Use group defaults

Happy छान लिहीलंस जुई ! लेखनशैली, शब्दयोजना आणि कथानकाची मांडणी हे सर्व आवडलं.

हे जाणून घे, की अध्यात्माचं सार कळलेली व्यक्ती कधीही पंथांमध्ये द्वेष करत नाही. आणि मुळात दोन्ही पंथांच्या अग्रस्थानी असलेले भगवान विष्णू व भगवान शंकर यांत परस्पर आदर व प्रेम आहे आणि मी हेच सत्य मानतो. " >>
+१ खूप छान आणि मोजक्या शब्दांत मांडलंस हे !

इतक्यात समोरची धूनीतली आग काळ्या रंगाची दिसू लागली.>>
मला वाटतं, सभोवताली आधीच काळोख पसरलेला असताना 'काळी आग' ही भन्नाट कल्पना तेथे बघणाऱ्याला 'दिसणार' नाही ! तिला 'जांभळी आग' बनवता येईल. Lol

पूजाविधी चालू असताना मस्त तंद्री लागलेली होती एवढ्यात मध्येच पोलीस कमिशनर आल्याने रसभंग झाला आणि मग तुझा आणि कमिशनरचा अस्सा राग आलता ना पण तितक्यात बाबा अघोरीची चाल आहे कळाल्यानं बिचारा कमिशनर आणि तू दोघंही वाचलात... Wink Lol

ब्युटीपार्लर बंद झालं आता कसलं दुकान उघडणारेस ? Proud

पुलेशु ! Happy

Chan Katha. Aawadli khup. Kuthehi na bharkatta agdi utsukta shewat paryant Kayamkulam theun Purna jhali.

शेवट आवडला.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

धन्यवाद सायुरीताई, सिम्बा जी, रश्मी जी, आनंद दा, प्रीती जी, अधांतरी जी, भाग्यश्री जी, अॅन्जेलिका जी, आदिसिद्धी Happy

. सोपे नसते कथेत वाचकांना असे खिळवुन ठेवणे.>>>>>>> याबद्दल खास धन्यवाद. Happy

१ खूप छान आणि मोजक्या शब्दांत मांडलंस हे !>>>>>>> तुम्हीच मागे सांगितलेलंत म्हणून नीट लिहू शकले. त्याबद्दल तुम्हाला खासच धन्यवाद

मला वाटतं, सभोवताली आधीच काळोख पसरलेला असताना 'काळी आग' ही भन्नाट कल्पना तेथे बघणाऱ्याला 'दिसणार' नाही ! तिला 'जांभळी आग' बनवता येईल. Lol>>>>>>> अघोरीच्या धूनीतल्या आगीने बर्यापेकी उजेड असतो (कारण आधी तो, त्याचं साहित्य अदृश्य असल्याने काळोख असतो, पण नंतर मंत्राने त्याची अदृश्यता जाते) नि काळ्या रंगाची आग इमॅजिन करा. हा थोडा प्रकाशमान काळा रंग असेल, या आगीच्या ज्वाळांची टोकं पांढरट प्रकाशमान असतील.

पूजाविधी चालू असताना मस्त तंद्री लागलेली होती एवढ्यात मध्येच पोलीस कमिशनर आल्याने रसभंग झाला आणि मग तुझा आणि कमिशनरचा अस्सा राग आलता ना पण तितक्यात बाबा अघोरीची चाल आहे कळाल्यानं बिचारा कमिशनर आणि तू दोघंही वाचलात>>>>>>>>> Rofl मतलब मै 'बाल बाल ' बच गई!!!!

Kuthehi na bharkatta agdi utsukta shewat paryant Kayamkulam theun Purna jhali.>>>>>> याबद्दल खास धन्यवाद हं! Happy

खुप छान आवडली ....>>>>> धन्यवाद!

अघोरी बाबा, कापालिक हे फारच बारकाईने लिहीले आहेस. काही पुर्वानुभव आहे का ?>>>>> Biggrin Lol नाही हो! प्रत्यक्षात तर नाहीच, पण कधी स्वप्नंही नाही पडलंय याबद्दल!

पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा... लवकरच नवीन कथा येऊ द्या... Happy >>>>>> हो नक्कीच... Happy काही कथांचे सांगाडे डोक्यात नाचताहेत खरे! लवकर शब्दबद्ध करेन. Happy

सांगाडे Rofl>>>>>> भयकथाच डोक्यात शिजल्या जाताहेत, म्हणून हेच वर्णन बरोबर वाटलं मला.... Wink

Pages