जस्ट लव्ह मी फॉर अ मोमेंट...!‌_9

Submitted by अन्नू on 27 April, 2018 - 11:47

मी कितीतरी वेळ असा वेड्यासारखा स्वत:शीच हसत होतो.
खरं म्हणजे तिची आठवण येऊन मला तिचे मॅसेज वाचण्याची तिव्र इच्छा होणं आणि नेमकं त्याच वेळी तीनं असा मॅसेज पाठवणं- ही ठरवून केलेली गोष्ट नक्कीच नव्हती. होता तो निव्वळ योगायोग. पर्फेक्ट टाईमिंग जुळवून घडून आलेला!

आणि हा पर्फेक्ट टाईमिंग, माझ्याही नकळत- माझ्याबरोबर प्रत्येक वेळी(!) घडत होता. मी कितीतरी वेळा तिची अशी ओढ अनावर झाल्याने तिचे जुने मॅसेज पुन्हा पुन्हा वाचत बसायचो. बरं वाटायचं. म्हणजे- त्यामुळे बैचेनी काही प्रमाणात कमी व्हायची. पण असं करताना हमखास ती वेळ साधून मला मॅसेज सेंड करायची. कधी बोलायची इच्छा होऊन तिला फोन करायला जावावं तर नेमका तिच समोरुन फोन करुन माझ्याशी बोलत बसायची. आणि हे मोबाईल किंवा मॅसेजच्या बाबतीत नाही हं, इतरही बाबतीत घडत होतं. तिला भेटायची आतुरता वाढलेली असताना, या ना त्या कारणाने ती मला भेटायला बोलवायची. किंवा मग अचानक रस्त्यात तरी भेटायची. पुढे पुढे हे इतकं वाढलं की, मनापासून तिचं नाव जरी काढलं तरी- साक्षात ती समोर दिसायची! कोणाला सांगूनही या गोष्टी पटणार नाहीत पण हे होत होतं, खरं! त्यातलाच एक प्रसंग मला आठवतो-

म्हणजे मला हार्डवेअर कोर्सचे सर्टीफिकेट घ्यायला जायचं होतं तेव्हाचा.
जाण्यापूर्वी सहज मी तिला फोन केला तर म्हणाली, ‘मी सकाळीच क्लासला आलेय. आता तीनला क्लास सुटल्यावर तशीच घरी जाईन- थांबणार नाही’
फोन ठेवत मी सुस्कारा टाकला. ‘चला, म्हणजे आज ती आपल्याबरोबर असणार नाही’
का कुणास ठाऊक पण जरा हिरमोडच झाला.

मी पाचला जाणार होतो. ती तीनलाच घरी येणार होती. थांबणार तर नव्हती. मग तीच्यासाठी घाई करुन जाण्यात अर्थ नव्हता. मी चारला आरामात उठलो. फ्रेश होऊन तयारी केली. अर्ध्यातासात घराबाहेर पडलो. आज ती नव्हती. एकटं-एकटं वाटत होतं. दुपारची उरतणीला आलेली उन्हं माळरानावरचा भकासपणा दाखवत होती. नेहमीच्या रस्त्याने जाणं मला अवघड वाटू लागलं. उगीच आणखी तिची आठवण येऊन मनात तिची पोकळी प्रकर्षाणे जाणवायला लागेल. त्यामुळे मी थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवरुनच जायचं ठरवलं. त्याप्रमाणे हळूहळू पावलं टाकीत मी प्लॅटफॉर्म नंबर सहावरुन चालू लागलो. सहज डाव्या हाताला लक्ष गेलं. तीच्याशिवाय सुनासुना वाटणारा स्टेशनरोड!
छातीत एक कळ उठली- ‘ती असायला हवी होती!’ उगीचच मनात कालवाकालव झाली अन...

अगदी अचानकच ध्यानीमनी नसताना देवाने चमत्कार दाखवावा. तसं काहीतरी घडलं. माझे डोळे लकाकले. हाताच्या मुठी गच्च आवळल्या गेल्या. अनाहुतपणे छातीचे ठोके अनियंत्रितपणे पडू लागले- ती...
अगदी पुढे...
माझ्या पुढेच आली होती!

एका हाताने ओढणीचा मधला भाग खाली खेचत दुसर्‍या हाताने डाव्या खांद्यावर ओढणीची बाजु सावरत, माझ्या समोरुन चालत येत होती!!!
तीला पाहून मनात ज्या भावना आल्या त्या शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे.
मी चालण्याचा वेग कमी केला. पुढे येता येता तीचंही लक्ष माझ्याकडे गेलं, ती चमकली-

“तू?”

“तू तीनला घरी जाणार होतीस ना?”

“अरे सरांनी थांबवून ठेवलं, एक्सट्रा लेक्चर्स घेतलं”

“पण मग इथून कुठून आज?”

“सहज, मनात आलं आज इथून जावं- आले!”

मनात होतं तीला परत माझ्याबरोबर ‘येतेस’ का म्हणून विचरावं; पण अगोदरच ती सकाळी कधीतरी लवकर आली होती. दोन कोर्सेसचे लेक्चर अटेन्ड करुन, प्रॅक्टीकल करुन त्यात आता एक्सट्रा लेक्चर करुन आली होती, थकली होती. त्यामुळे स्पेशली माझ्यासाठी परत मागे तीची पायपीट करवणं मलाच योग्य वाटलं नाही-

“चल मग- मी सर्टीफिकेट आलंय का बघतो. तू जा घरी”

ती त्याच गोडपणे हसली. हाताचा पंजा वर करत-
“बाईईईई” म्हणत- ई चा सूर लांबवत उद्गरली. हल्ली या बाय पुरतंच ती खूप गोड हसून लाडाने ई लांबवत ‘बाईईई’ म्हणत होती.
नेहमीचा तीचा तो सूर ऐकून मी गालातल्या गालात हसलो.

“च्यल- बाय” म्हणत मी दादर्‍याकडे जायला वळलो..
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

साधारणत: कोणत्याही रिलेशनची खरी जाणीव आपल्याला त्यापासून लांब गेल्यावर होते. थोडक्यात, लॉन्ग डिस्टंन्स मध्येच रिलेशनशिपची खरी कसोटीही लागते आणि त्याचं आपल्या आयुष्यातलं महत्त्वही कळतं.

शूटींगसाठी मी लखनौला गेलेलो. त्यानंतरच खरं म्हणजे मला तिच्याबद्दलच्या भावना समजुन चुकल्या होत्या. कित्येक वेळा तिला सांगावं असं मनात येत होतं. पण तिचा अंदाज येत नव्हता. अगोदरच तिला एक बॉयफ्रेंड होता. त्याच्याबद्दल ती किती कॉन्शस होती ते माहीत नव्हतं. पण वडीलांच्या मर्जीबाहेर ती जाणार नव्हती. या नात्यांबद्दल त्यानं काही पुढाकार घेऊन कन्विन्स केल्याचं मी ऐकलं नव्हतं. मुळात तिच्या वडीलांना तो बाहेरच्या कास्टमधला असल्याने मान्य नव्हता. इथेच त्यानेही मुद्दा संपवला होता. त्यानंतर तो भेटला असेल, नसेल- गॉड नोज.

मला कोणाला क्रिटीसाईज करायला आवडत नाही. पण जर एखाद्या मुलीवर आपलं खरोखरंच प्रेम असेल तर तसं तिच्या वडीलांना भेटून त्यांना विश्वासात घेणं गरजेचं नाही का? कितीही केलं तरी ते बापाचं मन असतं. आपल्या मुलीबद्दल अलर्ट असणारच. पण शेवटी मुलीचं सुख बघूनच जगातला कोणताही बाप निर्णय घेत असतो. तो तोपर्यंतच लढतो जोपर्यंत मुलीच्या पुर्ण सुखाची त्याला खात्री मिळत नाही.
सगळं काही नीट असताना, त्यांच्या मुलीला- मुलीसारखीच मानाने वागवणूक मिळत असताना- फक्त जात वेगळी म्हणून ते अडून बसणार का?
मग त्यांच्याशी संवाद करायला काय हरकत होती?
भले ते इंटरकास्ट असल्याने पहिल्यांदा नकार देतील. पण इथेच तर मुलाची खरी कसोटी ठरते ना! तो यात काय स्टँड घेतो, इंटरकास्ट असूनही त्यांच्या मुलीला कसा सांभाळतो, तीला कसा मान देतो, प्रत्येक अवघड प्रसंगी तीच्या मागे किती भक्कमपणे उभा राहतो, यालाच तर महत्त्वाचं असत ना. आणि याच गोष्टी पोरीचा बाप मुलात पारखत असतो.
पण या गोष्टीही समर्थपणे आणि ठामपणे मुलीच्या बापासमोर ठेवणार नसेल, आपल्या प्रेमावर ठाम राहणार नसेल तर त्या मुलाचा प्रेम करुन फायदाच काय?

असो,
पण या गोंधळात मी शुअर होत नव्हतो. विचारावं की नको?
लखनौ वरुन आल्यावर मी तिला ठरल्याप्रमाणे वेस्टला-जिथे मितालीने आम्हाला लग्नाची पार्टी दिली होती तिथेच- पहिली पार्टी दिली. तीही तिची किती आळवणी!
पहिल्यांदा तिच म्हणाली होती. काम मिळालं की मला पहिली ट्रीट पाहिजे आणि आता तिच आढेवेढे घ्यायला लागली होती! तशीच तिला पुढे करत मी तिला वेस्टच्या हॉटेलात घेऊन गेलो.

29 डिसेंबर, 2010
8:4 PM
अ‍ॅक्युरेट!

ऐन गर्दीची वेळ असूनही हॉटेल बर्‍यापैकी रिकामं होतं. (हे एक त्यादिवशीच आश्चर्यच!) म्हणजे हॉटेलमध्ये कोणी नव्हतंच. चूकून माकून एखादं माणूस असेल तरच.
कोणाही कपल साठी अगदी रोमँटीक एकांत वाटेल अशी स्थिती होती. बाहेर लोकांचे नेहमीप्रमाणे गडबड गोंधळ होते. हॉटेल मात्र पुर्णपणे शांत!

आत मस्तपैकी प्रखर प्रकाशाचे छोटे-मोठे शो लाईट्स लावलेले होते. बाजुच्या खिडकीतून काळ्याकुट्ट अंधारत नेमका हिरा चमकवा तसे शुभ्र मिठाचे ढिगारे चमकत होते. चेअरवर बसताच तिने अगोदर थोडे पाणी पिले (स्वारी प्यायले, आमच्या मास्तरणीची शिकवण!)
इतक्यात वेटर आला.

“मागव”

“नको तूच मागव, तू खाणार ना-” मी टेबलावरचं मेन्यू कार्ड तिच्याकडे परत देत उद्गरलो.

“का? तू खाणार नाहीस?”

“तू जे मागवशील, तेच मी खाईन”
तिनं मेन्यूकार्ड घेतलं. मी उगीच मान उंचावून त्यात डोकावलं. कळण्यासारखं काहीच नव्हतं.

“बघ ना काय घ्यायचं” तीही काय घ्यावं ते न समजून मला विचारु लागली.

“अगं- घे गं काहीही. तूला हवं ते घे”
माझ्या डोळ्यांसमोर, आम्ही मित्रमैत्रीणी नेहमीच घेत असलेले ठरलेलेच पदार्थ फिरु लागले- मसाला डोसा, साधा डोसा, मिसळपाव, वडापाव, वडासांबर...

“वडासांबर?” ती अनाहुतपणे उद्गरली! (मनकवड्याचा प्रकार खरा असावा का?)

“अ‍ॅ??? काय?” मी गोंधळून तिच्याकडे बघितलं, “एवढ्या लांब काय हेच खायला आलोय?”
तिनं तीच्या स्टाईलनं ओठ मुडपत लीस्ट पाहिली-

“एक चीजी पिझ्झा!”

“इथं पिझ्झा मिळतो?”

“हो.. हे काय- इथं मेन्यूमध्ये दिलं आहे” तीनं मला तिच्या नाजूक बोटांनी लीस्टमधलं नाव दाखवलं. इतक्यात मख्ख चेहर्‍याचा वेटर उद्गरला-

“मिलता हय् ना” त्याच्या काळ्याकुंद्र्या तेलकट तोंडाकडे बघून मला तेच मेन्यूकार्ड तसंच त्याच्या तोंडावर बदाबदा हाणून तिथून पळून जावसं वाटलं!

“हा- एक देदो! की तुला अजुन पाहिजे”

“अ‍ॅ?” त्याच्यावरुन नजर हटवून मी भानावर येत तिच्याकडे बघितलं- (हीनं काय विचारलं?)

“..काय ते?”

“तुला अजून एक मागवायचा आहे का? मी जास्त खाणार नाही. तुलाच सगळा संपवावा लागेल”

“अ?.. न्.. नको-नको... एकच बस!” मी शहारुन त्या चंप्याकडं बघत बोललो.

वेटर जाताच तीने नेहमीप्रमाणे इवल्याश्या रुमालाने सगळा गळा न् चेहरा पुसला. मग एक छानशी पोझ घेत मला म्हणाली-

“ए- फोटो काढ ना!”

हा एक मुलींचा आवडता कार्यक्रम, काय झालं की काढं फोटो! म्हणजे आत्ता बोकाळलेली सेल्फी यांच्याच मुळे पसरली होती त्याचा हा जीवंत पुरावा होता!
मी लाईटीकडे बघत तिचा एक त्यातल्या त्यात बरा फोटो काढला- बघतानाच तिनं जरासं तोंड (हो तीच्याच स्टाईलने) वेंगाळलं.

“ईई... किती घाण आलाय! शी!!! डिलीट कर तो-” अगं मग काढायला का सांगितलास? घामानं निथळलेल्या तुझ्या चेहर्‍याचा फोटो कसा येईल? तसाच ना- का, फाऊंडेशन लावल्यासारखा गोरागोमटा येईल?

मी काहीच बोललो नाही, फोटो डिलीटही केला नाही. सरळ फोन बंद केला.

“ए- ए, आत्ता काढ” थोड्या वेळानं ओढणी सारखी करत ती पुन्हा उत्साहाने सावरुन बसत उद्गरली. मी केविलवाण्या नजरेनं तिच्याकडे बघितलं-

“इथं लाईटच बरोबर नाही- मी तुझा बाहेर फोटो काढतो हं!” मी तिची समजुत काढली.

हळूहळू वाट बघून आमच्यातला पेशन्स संपत आला होता. पिझ्झा बनवणारा कदाचित- गहू आणायला रानात गेला होता. तिथून तो गहू कांडून, पिठ करुन, त्याचा पिझ्झा तयार करणार होता! अर्धा तासाच्या वर वेळ झाला, तरी त्याचा पत्ता नव्हता.

“कधी येणार पिझ्झा” ती चुटपुटत किचनकडे बघत म्हणाली आणि मला त्याही परिस्थितीत तिचं हसू आलं.
शेवटी पंचेचाळीस मिनिटांचा, पिझ्झा बनवण्याचा विश्व विक्रम मोडीत काढत, तेलकट्या चक्क पिझ्झा घेऊन आला.

आता पहिलीच ट्रीट तेही, मुलगा मुलीला देतो म्हटल्यावर ती बरी असावी. निदान तिच्या समोर त्याची उतरली जाऊ नये, एवढी माफक अपेक्षा असते की नाही त्या भोळ्या मुलाची? पण नेमके अशाच वेळी ही सुखावर विरजण- नव्हे ‘रायताच’ पसरवतात आणि वर मुलाची मुलींदेखत छान मारतात!

या तेलकट्यनंही असाच काहीसा प्रकार केला होता. नाही येत तर सांगायचा ना येत नाही- दुसरी ऑर्डर द्या. पण नाही याची पहिलीवाहीली रेसीपी आमच्यावर अत्याचारासाठी ट्राय करायची होती. घरात नववधू भाकर्‍या बरोबर करतात पण याने पिझ्झा नामक पदार्थ चक्क लाकडासारखा कडक केला होता. त्या लाकडालाही लाज वाटेल असा त्याचा टीकाऊपणा होता. त्यात फोडणी दिल्यासारखा खालून करपून धुरळा केला होता. चीज तर करपण्यात वाया गेल्यामुळे अजुन वरुन टाकलं होतं- कच्चच! आणि तो भयानक पदार्थ त्या ठोंब्यानं आमच्यासाठी आणला होता.

त्यानं तो समोर ठेवताच तिनं जरा त्याकडे निरखून बघितलं मग माझ्याकडे बघितलं.
आम्ही आपलं तिला पहिल्यांदा पिझ्झाचं ट्रीट दिल्यामुळे ऐटीत तीच्याकडे ताठ मान करुन बघण्यात गुंग होतो!

‘कसं वाटलं?’

“करपलेला वाटतोय, नाही?” तिनं कसंतरी बोलून दाखवलं.

“अगं तेवढं असतंच ते” थोडसं असेल म्हणून सहज मी हसून बोलत त्या प्लेटकडे नजर टाकली आणि जवळजवळ आठ हजार आठशे व्होल्टचा झटका लागावा तशा छातीत कळा आल्या!

मी रागानं त्याच्याकडे बघितलं. आता काय वेडवाकडं बोलावं तर समोर ती!
बेण्याला धड काही मुक्त शब्दाने बोलताही येईना. मी हताश नजरेनं तिच्याकडे पाहिलं
असा विचका होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. माहीत असतं तर बाहेरच चांगल्या दोन प्लेट पाणीपुरी आणि आईस्क्रीम खायला घातलं असतं मी तिला. पण आता काय-

“ये ऐसाइच होता है!!” मध्येच तेलकट्यानं आपलं ज्ञान पाझळलं आणि माझं टाळकं फिरलं. काही बोलणार इतक्यात-

“भैया एक सॉस दो नं इसपे” हळूवार आवाजत रिक्वेस्ट करत ती उद्गरली. त्यानं बाजुच्या टेबलावरची बाटली तिच्यासमोर ठेवली.
तिनं पिझ्झानामक खालून काळ्याठीक्कर झालेल्या त्या पदार्थाचा एक त्रिकोण घेतला. खालचे करपलेले कोळसे त्यातल्या त्यात नखाने खरवडून काढले. मग सॉसचे लालभडक थर त्या तुकड्यावर पसरवत तिने शांतपणे एक घास तोडला!

“ह्म्म..” तुकड्याचा घास तोंडात घोळवत ती उद्गरली-

“अरे सॉस लावून घे- मस्त लागतंय!”

मी थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहीलो. दुसर्‍याचं मन कसं राखावं ते आज तिनं मला शिकवलं होतं!
काहीही तक्रार नसल्यासारखी ती कडवट करपलेला पिझ्झा चवीनं खात होती.
वाईट वाटलं!
पण समाधानही वाटलं. मी तिच्याकडे एकटक बघत तिचा चेहरा.. मनात साठवत गेलो.. खुद्द तीला अनुभवत राहीलो...
=============================================================
क्रमश:

भाग=>> 10

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे pudhche bhag yeu dya lovkar

Aani Gambler chya pudhil bhagache link dile aste tar bare zhale aste katha punrn keli ahe ka? Aslyas naki dya