विश्वकर्ता

Submitted by चकाकी on 27 April, 2018 - 22:55

ते भांडत राहिले
तुझ्या अस्तित्वाविषयीच्या समजुतींवरून...
आणि तू पाहात राहिलास -
फुलाफुलांमधून सुगंध पसरवत,
ढगांच्या गर्भातून धारा बरसवत,
सोनेरी नभावर इंद्रधनुष्य उमटवत !

ते भांडतच राहिले
कुणी तुला पुल्लिंगी ठरवलं, कुणी स्त्रीलिंगी,
कुणी तुला सावळं रूप दिलं, कुणी गोरं,
कुणी तुला निर्गुण-निराकार म्हटलं,
आणि तू ऐकत राहिलास -
पक्ष्यांच्या ओठांतून संगीत लहरवत,
सागराच्या लाटांतून गाज उसळवत,
वाऱ्याच्या पोटातून विजांना गर्जवत !

ते भांडतच राहिले
कुणी तुला अंधश्रद्धांनी झाकून टाकलं,
कुणी विज्ञानाच्या शस्त्रांनी भोसकून टाकलं,
कुणीतूला संपूर्णच नाकारून, झिडकारून टाकलं,
आणि तू हसत राहिलास -
चिमुकल्या बीजांतून अंकुर उमलवत,
तान्हुल्यांच्या खळ्यांतून हास्य झिरपवत,

तू अचल राहिलास,
अंधाराच्या गर्भातून विश्वाला जन्मवत
अंधाराच्या गर्भातून विश्वाला जन्मवत !!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त......।
अंधाराच्या गर्भातून विश्वाला जन्मवत........।