साठा उत्तरांची कहाणी

Submitted by अनन्त्_यात्री on 18 April, 2018 - 07:05

एक टिनपाट महानगर होतं
तिथं एक आय्-डी होता
हा आय्-डी कसा होता?
विद्वज्जड, विचारवंत, साक्षेपी, प्रत्युत्पन्नमति इ.इ.
त्याचा दिवस कसा जायचा?
सक्काळी सक्काळी कायप्पावर इधरका माल उधर सर्कवायचा
लंच टायमात एका संस्थळावर काही अभ्यासपूर्ण टंकायचा
काॅफी ब्रेकात दुसर्‍या संस्थळी थोडा साक्षेपी पिंकायचा
परतीच्या घामट ट्रॅफिक जॅमात पाठथोपट्या प्रतिसादकांस धन्यवादायचा अन् पायखेच्या प्रतिसादकांना हेडाॅन भिडायचा.

एकदा काय झालं?
जरी सबकुछ होतं झिंगालाला तरी वैचारिक वैफल्य आलं बिचार्‍याला.

या वैफल्यानं काय झालं?
त्यास आंजावैराग्य आलं
आंजावैराग्याची लक्षणे कोणती?
तो टंकेना की पिंकेना
समस्त स्क्रीनांकडे तो पाठ फिरवू लागला.
दगडामातीच्या, हाडामासाच्या जगात २४x७ वायफायरहित जगायचं स्वप्न बघू लागला.
त्याच्या घंटो मिटल्या लॅपटाॅपची बिजाग्रं बिघडली.
त्याच्या मिनिटोमिनीट बंद चलाखफोनावर कोळीष्टकं जमली.
अनरेड कायप्पा पोष्टींनी सहस्रक ओलांडलं.

विचारवंताचं हे कडकनाथ वैराग्य देखून इकडे समाजमाध्यमेशांची तंतरली.
झुक्याची झोप उडाली
पिचई पेचात पडला
गेट्स गडबडला
संस्थळमालक सटपटले
"आज एकास पण उदईक समग्र विचारवंतांस समाजमाध्यमांप्रति ऐसे शुकवैराग्य आले तर आपल्या जगड्व्याळ पोटा-पसार्‍यांचे काय?" ही कुशंका त्यांस पोखरू लागली.

समाजमाध्यमेश सत्वर मिटींगले.
दूतास रदबदलीस पाठविण्याचे मुकर्रर केले.

दूत विचारवंतादारी पोहोचून
त्यास विनविता झाला,
"एकडाव, फक्त एकडाव अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिना.
समाधान न पाविल्यास बंद्यास बेशक बे-सीपीयु करा"

विचारवंत द्रवले.
अमुकअमुक सायटीवर डोळेझाक लाॅगिनले.
डोळे उघडतात तो काय?
सभोवती वरती खालती लखलख आरशांची खडी
आरशाआरशातून खुणावणारे स्वत:चेच जुने आय् डी
विचारवंत दिपले पण क्षणात सावरले.
एकेक आरशात पाहते झाले.
...निरागस, उथळ, भावुक, रसिक, आक्रमक, तत्वज्ञ...
विस्मृतीत गाडलेले माझे इतके उत्क्रांतीटप्पे येकगठ्ठा?
विचारवंत गुंग झाले,
क्षणभर नोस्टाल्जिले,
जुन्या आय्-डींच्या नजरपहार्‍यात सांप्रतच्या आय्-डी ला शाबूत राखण्यात आंजाव्यग्र झाले.
मग जगड्व्याळ मायासुरी जाळ्यात नकळत गुंतत गेले,

ग्रहण सुटले, वैराग्य सरले, विचारवंत आभासी रूटीनात पुनश्च आकंठ रुतले,
समाजमाध्यमेश सुटकेचा सुस्कारा सोडते जाहले.

ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी......

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Lol सही रे सही! आजकाल सगळ्यांची हीच अवस्था झालीय, भले ना का देवाचे नाव घेतील, पण सकाळी उठुन मोबाईल वर आधी कस्सकाय व थोपु नक्कीच बघतात. Proud

छान कहाणी. आता अशा अवस्थेसाठी एखादे व्रत असल्यास ते ही कथन करावे ही विनंती.
आधी वचन ही मागा हवे तर - उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.

सुंदर कोपरखळ्या . नथीतून तीर मारणे हेच ते . तुमच्या कवितात तुम्ही खूप गंभीर दिसता . हा एक सुंदर वेगळा पैलू दिसला .

दत्तात्रयजी, आपल्या प्रोत्साहक प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक आभार!