मित्र नव्हे, परिचित !

Submitted by कुमार१ on 16 April, 2018 - 02:01

माझ्या वैद्यकीय कारकिर्दीच्या सुरवातीच्या टप्प्यातील हा प्रसंग आहे. एम.डी. ही पदवी प्राप्त करून मी एका हॉस्पिटलमध्ये सल्लागार म्हणून रुजू झालो. ते हॉस्पिटल नव्यानेच सुरू झाले होते. त्यामुळे माझ्यासह इतर सहकारीही पायाभूत उभारणीची कामे मन लावून करीत होते. हळूहळू हॉस्पिटलचा विस्तार होत गेला. मग तेथील डॉक्टरांची संख्याही वाढवण्यात आली. अशाच एका नवीन भरतीच्या वेळी माझ्या विभागात डॉ. सतीश हा माझा कनिष्ठ सहकारी म्हणून रुजू झाला. महिनाभरातच मी त्याच्याविषयी एक अंदाज बांधू शकलो. तो जरी फारसा हुशार नसला तरी तो नेमून दिलेली कामे व्यवस्थित करीत असे.

रोज जेवणाच्या सुटीत आम्ही दोघे एकत्र डबा खाऊ लागलो. त्या वेळेस मी विवाहित होतो तर तो अविवाहित. असंख्य विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा होत. त्यामध्ये क्रिकेट, राजकारण, नाटक-चित्रपट इ. नेहमीचे विषय तर असतंच, पण त्याचबरोबर स्त्री-पुरुष संबंध या तारुण्यसुलभ विषयाचाही समावेश असे. सतीश या विषयातील त्याच्या शंकांचे माझ्याकडून निरसन करून घेई. त्याचे असे कुतूहल पाहून मलाही माझ्या विवाहपूर्व दिवसांची आठवण होई! आमच्या विभागात आम्ही दोघेच डॉक्टर असल्याने आमची मैत्री दृढ होत गेली.

कालांतराने सतीशच्या घरच्यांनी त्याच्यासाठी मुली पाहणे सुरू केले. त्या ‘पाहण्याच्या’ कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत तो मला दुसऱ्या दिवशी सांगत असे आणि बायको कशी असावी यावर माझा सल्लाही विचारत असे. यथावकाश त्याचे लग्न झाले. हळूहळू तो संसारात रमला. दोन वर्षात नोकरीतही रुळला.

एव्हाना आमचे हॉस्पिटल सुरू झाल्याला चार वर्षे झाली होती. आता हॉस्पिटलचा विस्तार करण्याचे व्यवस्थापनाने ठरवले होते. त्यामुळे आम्हा सर्वांची जबाबदारी अधिकच वाढत गेली. सतीश व मी दिलजमाईने रोजची कामे जास्त वेळ थांबून पूर्ण करीत होतो. त्यामुळे आमची मैत्री घट्ट होत गेली. आम्हा दोघांना एकमेकांच्या आयुष्यातील काही माहिती नाही असे काहीच उरले नाही.

दरम्यान मी नोकरीची चार वर्षे समर्थपणे पूर्ण केल्याने आणि वाढत्या जबाबदाऱ्या स्वीकारत असल्याने मी माझ्या बढतीचा प्रस्ताव वरिष्ठांपुढे मांडला. मग माझे मूल्यमापन करण्यात येऊन त्यांनी तो व्यवस्थापनापुढे ठेवला. थोड्याच कालावधीत मला ‘वरिष्ठ सल्लागार’ या पदावर बढती देण्यात आली. नवीन पदभार स्वीकारण्याचा दिवस होता १ जानेवारी. पगारामध्ये अर्थातच आकर्षक वाढ दिलेली होती.

नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला हे समजू शकेल की तिथल्या पहिल्या बढतीचा आनंद हा अवर्णनीय असतो. तरुणपणी योग्य वयात बढती मिळणे हा त्या व्यक्तीच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा असतो. मात्र जर का तुम्ही पहिल्याच पदावर बरीच वर्षे कुजलात, तर मात्र तुमची प्रगती नक्कीच खुरटते. माझ्याबाबतीत ही बढती योग्य वयातच झाली होती. त्यामुळे एक प्रकारचे चैतन्य माझ्यात संचारले होते.
बढतीचा आदेश स्वीकारतानाच कार्यालयातील अनेकांनी “डॉक्टर, पेढे पाहिजेत, खरे तर पार्टीच हवी’, असा गलका केला. त्याने मी खूप भारावून गेलो. आमचे संपूर्ण हॉस्पिटल म्हणजे एखाद्या मोठ्या कुटुंबांसारखेच होते. त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी त्या सर्वांना पेढे वाटण्याचे ठरवले. तारुण्यात आपण तसे शौकीन असतो. त्यानुसार माझ्या शहरातील सर्वात प्रसिद्ध मिठाईवाल्याकडून त्याच्याकडील सर्वात मोठ्या आकाराचे केशरी पेढे मी खरेदी केले.

हॉस्पिटलच्या उभारणीपासून आम्ही सगळे एकत्र राबलेले असल्यामुळे आमच्यात जिव्हाळा निर्माण झाला होता. त्यामुळे आमच्यातील कोणाच्याही आनंद वा दुखःद प्रसंगात सगळेच सामील होत. ठरवल्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलभर फिरून पेढेवाटप सुरु केले. मला पहिला पेढा खरे तर सतीशला द्यायचा होता पण त्या दिवशी तो नेमका कामावर उशीरा येणार होता. म्हणून मी इतरांचे वाटप सुरु केले. त्या सगळ्यांनी माझे मनापासून अभिनंदन केले.
आता मी सतीशची आतुरतेने वाट पाहत होतो. साहजिकच होते ते, कारण आम्ही रोज जास्तीत जास्त काळ एकत्र असायचो आणि जेवणही बरोबर करायचो. थोड्या वेळाने सतीश आमच्या विभागात आला. आमची नजरानजर झाली. आमच्या मैत्रीच्या नात्याने तो आल्याआल्याच माझ्या बढतीबद्दल काही बोलेल अशी माझी अटकळ होती. परंतु, इथेच मला पहिला धक्का बसला. त्याने निर्विकारपणे त्याच्या कामास सुरवात केली.
मी त्याच्याजवळ जाऊन त्याला पेढा दिला. त्यावर त्याने “काय विशेष?” असा अनपेक्षित प्रश्न विचारला. हा मला बसलेला दुसरा धक्का होता. एव्हाना माझ्या बढतीची बातमी हॉस्पिटलभर आणि कर्णोपकर्णी अनुपस्थित लोकांपर्यंतही पोहोचली होती. त्यामुळे ती सतीशला माहिती नसणे जवळपास अशक्य होते. त्याच्या “काय विशेष” ला मी ,”माझ्या बढतीबद्दल”, असे उत्तर दिले. तिसरा धक्का मला आता बसायचा होता. “हं” एवढाच हुंकार काढून त्याने पेढा तोंडात टाकला. मग तो “पेढा मस्त आहे”, म्हणाला अन त्याच्या कामात गढून गेला.

दोन मिनिटे मी अगदी सुन्न झालो. माझ्या या आनंदाच्या प्रसंगी हॉस्पिटलमधील माझ्या सर्वात जवळच्या ‘मित्रा’कडून ‘अभिनंदन’ हा पंचाक्षरी शब्दही ऐकायला मी पारखा झालो होतो. माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात एवढा नकारात्मक प्रतिसाद मी प्रथमच अनुभवत होतो. थोड्या वेळाने माझा पेढेवाटप कार्यक्रम संपला. नंतर रोजची जेवणाची वेळ झाली. सतीश व मी एकत्र जेवायला बसलो. त्या दिवशी मी चांगल्यापैकी कपडे केले होते. बुटांनाही चकाचक पॉलिश केले होते. जेवताजेवता सतीशने माझ्या पायांकडे पाहिले आणि “बूट छान आहेत” असे म्हणाला. जेवण संपेपर्यंत तो तसा अबोलच होता. माझ्या बढतीचा विषय तर त्याने कटाक्षाने टाळला.

माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यात पेढे वाटण्याचे अनेक प्रसंग आले होते. किंबहुना सर्वांच्याच आयुष्यात ते कधीना कधी येतात. परंतु अशा प्रसंगी, “ अरे वा, छान झालं” असे न म्हणणारी व्यक्ती मला अद्याप भेटली नव्हती. द्वेष, मत्सर, असूया इत्यादी गुण हे मानवी स्वभावाचेच भाग आहेत. प्रत्येकाच्या ठायी ते वास्तव्य करतातच. पण एखाद्याच्या आनंदाच्या प्रसंगी वरकरणी तरी त्याचे अभिनंदन वा कौतुक करणे, ही व्यावहारिक सभ्यता असते. बहुसंख्य लोक ती पाळताना दिसतात. एखाद्याजवळ आपण आपला आनंद व्यक्त केल्यावर त्याने ‘अरे वा’ वगैरे काहीही नाही म्हटले तरी चालेल, हा विचार म्हणून ठीक आहे. पण, तेवढी स्थितप्रज्ञता आपल्यात असायला आपण साधुसंतच असायला हवे. ते नसल्यामुळे आपला अपेक्षाभंग होतो. किंवा ‘फलाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा’ हे पचवणे भल्याभल्यांना संपूर्ण आयुष्य खर्ची पडले तरी जमत नाही. मी तर तेव्हा जेमतेम तिशीत होतो.

प्रस्तुत प्रसंगात सतीश हा कुठल्याच प्रकारे माझा स्पर्धक नव्हता. त्याचे वय आणि अनुभव हे माझ्याहून कमी होते. मी एम डी होतो तर तो एम बी बी एस नंतरचा डिप्लोमा धारक.
तसेच नजरेत भरावे असे काही वेगळे कामही त्याने केलेले नव्हते. तेव्हा याप्रसंगी त्याचे माझ्यावर जळणे हे माझ्या आकलनशक्तीबाहेरचे होते. आमच्या संपूर्ण स्टाफपैकी माझे अभिनंदन न करणारी सतीश ही एकमेव व्यक्ती होती आणि या गृहस्थाला मी माझा सर्वात जवळचा मित्र धरून चाललो होतो !

या एका कडवट प्रसंगाने माझ्या आनंदावर अगदी विरजण पडले. अनेक दिवस हे सतीशचे वागणे माझ्या डोक्यातून जात नव्हते. किंबहुना वरिष्ठ पदावर काम करण्याचा उत्साहच कुणीतरी काढून घेतल्यासारखे वाटत होते. त्यावेळेस मला माझ्या पूर्वायुष्यातील दोन व्यक्तींच्या उद्गारांची प्रकर्षाने आठवण झाली.

मी शाळेत नववीत असताना माझ्या वर्गात सुदेश नावाचा विद्यार्थी होता. त्या वयातही त्याचे विचार परिपक्व होते. वर्गातील सर्वजण त्याला ‘अकाली प्रौढ’ म्हणत. तो एकदा आम्हाला गप्पांच्या ओघात म्हणाला होता, “आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे.

तर दुसरे उद्गार मी एका दैनिकाच्या संपादकांच्या लेखात वाचले होते. त्यांनी लिहीले होते, “संकटकाळी जो उपयोगी पडतो तो खरा मित्र, ही मित्राची व्याख्या आता फार जुनी झाली आहे. सध्याच्या काळातील व्याख्या म्हणजे, आपल्या आनंदात मनापासून सहभागी होतो तो खरा मित्र !”
या दोन्ही उद्गारांची प्रचिती मला वरील प्रसंगातून पुरेपूर आली हे सांगायलाच नको.
…..
आज वरील घटनेनंतर २५ वर्षांनी मी त्याकडे तटस्थपणे बघू शकतो, हे नक्की. परंतु तेव्हा काय वाटले होते त्या ऊर्मितून हे लेखन झाले इतकेच.

********************************
( पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक. काही सुधारणांसह येथे प्रकाशित )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी उत्तम लेख. मानवी स्वभावाचे निरिक्षण करताना आपल्याला अनुतरीत प्रश्न राहतात. त्याला तुम्ही पुढे गेलात याबद्द्ल कुठेतरी मनात भीती वजा असूया निर्माण झाली व त्याला ती लपवता आली नाही. एका अर्थाने हे ठीकच झाले. कारण खोटे खोटे केवळ सामाजिक संकेत म्हणून जर त्याने अभिनंदन केले असते तरी देह बोलीवरुन तो कुठेतरी नाराज आहे हे लक्षात आले असते. कदाचित त्याने उत्तम अभिनय केला असता तर नसते लक्शात आले.स्पर्धेच्या युगात या गोष्टी घडतात. पण काही काळाने त्यांने सावरायला हवे. अन्यथा ते मानसिक आरोग्यास धोकादायक असते.

@ कुमार१, इतक्या वर्षांनंतरही ही घटना आपल्या हृदयात रुतून आहे. त्यावरून आपल्या मित्राचे वागणे तेव्हा आपल्या किती जिव्हारी लागले असेल याची कल्पना आली.

खरे आहे. अगदी जवळच्या माणसांनाही असे वागताना पाहीले आहे! वरुन "त्यात काय म्हणायचे?...... आपल्याला असे वरवर स्तुती करणे जमत नाही. ..." आदी स्पष्टिकरण देखिल आहे. पण मनात सल कायमचा राहतो.

खूप सुंदर!

मित्राची जुनी व्याख्या अजूनही बरोबरच आहे. मित्राच्या आनंदात सहभागी न होण्याने बसणार्‍या धक्क्यापेक्षा अडचणीत पाठ फिरवण्याने बसणारा धक्का कैक पटीने जास्त असतो.

मजेशीर स्वभाव(दोष) असतात काहींचे. आपल्या पातळीवर होता तोवर मित्र अशी त्याची मैत्रीची कल्पना असावी. त्यामुळे आता याला बढती मिळाली आता काही हा आपला मित्र राहिला नाही. अशी काहीशी मानसिकता या व्यक्तीची झाली असावी. बायदवे, आपणही यांच्याबरोबर कष्ट केले. पण फायदा मात्र फक्त यांनाच झाला असे त्याला वाटले असेल काय? माहित नाही. एक आपला आंधळा अंदाज. पण तसे जरी असले तरीही त्याने मैत्री हि मैत्रीच्या ठिकाणी ठेवायला हवी होती. कधीकधी याच्या उलट पण पाहायला मिळते. प्रमोशन मिळाल्यावर पूर्वीच्या मित्रांशी (जे आता कनिष्ट झाले) असलेले वागणे बदलते.

मला सातत्याने असे वाटते कि आयुष्य जगताना ज्या क्वालिटीज आपण अवलंबणे आवश्यक असते, आणि त्या आपल्या ठाई स्वाभाविकपणे जर नसतील तर त्या शिकणे गरजचे असते, अशा क्वालिटीज शालेय जीवनात आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत. जसे जीवनाभिमुख शिक्षण जपानमध्ये वगैरे शाळांमध्ये देतात तसे. परिणामी कित्येक "सुशिक्षित" लोक आपले स्वभावदोष तसेच घेऊन बाहेर पडतात. तुलना न करता आपले आयुष्य आपल्या ठिकाणी राहून जगता येणे खूप महत्वाचे आहे. पण अनेकांना ते होत नाही. जवळपासच्या इतरांच्या प्रगती/अधोगतीवर यांचे सुख दु:ख अवलंबून असते.

कफ वात पित्त या शारीरिक दोषांवर जसे वेळीच उपाय केले जातात तसे द्वेष, मत्सर, असूया या मानसिक दोषांवर काही औषध नाही का हो डॉक्टरसाहेब? Happy

वरील सर्वांचे आभार !
‘मित्रा’च्या अनेक व्याख्या लोकांनी अनुभवातून केल्या आहेत. त्यापैकी एक अशी:
जो आपण घेतलेल्या कर्जाच्या अर्जावर हमीदार म्हणून सही करतो तो खरा मित्र ! बाकी सगळे ...….
*
द्वेष, मत्सर, असूया या मानसिक दोषांवर काही औषध नाही का हो डॉक्टरसाहेब? >>>>>
अजून निघालेले नाही. संशोधनास वाव आहे ☺

जो आपण घेतलेल्या कर्जाच्या अर्जावर हमीदार म्हणून सही करतो तो खरा मित्र !... हे मित्रत्वाच्या कसोटीस उतरायला फारच अवघड आहे.
मुळात जो घेतलेल्या कर्जाच्या अर्जावर हमीदार म्हणून आपली सही मागतच नाही ( व आपल्याला अशा पेचात पाडतच नाही!) तोच आपला खरा मित्र! Happy

>> मुळात जो घेतलेल्या कर्जाच्या अर्जावर हमीदार म्हणून आपली सही मागतच नाही ( व आपल्याला अशा पेचात पाडतच नाही!) तोच आपला खरा मित्र!
+१११ सहमत

मित्राची त्यावेळेची अवस्था अत्यंत डिप्रेस असू शकते.घरात किंवा येताना रस्त्यावर काही वाद झाले असू शकतात.त्याने असा रिस्पॉन्स देणे जरी योग्य नसले तरी बरेचदा रिफ्लेक्स हे त्याच्या आधी इमिजीएट घडलेल्या घटनेवर बेस्ड असू शकतात.तुमच्या मागे बोलताना हा माणूस 'हा सर्वात योग्य माणूस, ही गॉट व्हॉट ही डीझर्व्हड असेही म्हणत असेल.
खरं सांगायचं तर आपल्याकडे यश किंवा छान काहीतरी आलंय हे फॅक्ट त्यावर कोण कसं रिऍक्ट करतं याने बदलत नाही.

“आपण वर्गातील सर्वजण हे एकमेकांचे ‘परिचित’ आहोत. एकमेकांना ‘मित्र’ म्हणण्याची चूक कोणी करू नका कारण, मित्र हे खूप वरच्या पातळीवरचे नाते आहे. >>> सहमत

बी द बिगर पर्सन. त्याला जड गेले असेल. त्याच्या परीने त्यानेही प्रमोशन साठी प्रयत्न केले असतील व यश मिळाले नसेल. माफ करून टाका मित्रांच्या अश्या चुका मनात धरायच्या नाहीत. डिड यू लाइक हिम इन स्पाइट ऑफ हिज फ्लॉज? ऑर ओन्लि टिल ही एको ड युअर फीलिन्ग्स.

असतात असे लोक.
आपण मित्र-मैत्रिण समजतो पण त्यांना आपली तेवढी कदर नसते.
मित्र नव्हे, परिचित ! हेच खरं.

छान लिहीलयं

बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवतो, अन त्या सोबतीला मैत्री समजतो, पण तसे नसते. ती फक्त एक सोबत असते मैत्री वगैरे काही नाही.

आमच्या इथे प्रमोशन्स/ग्रेड कुठेही पब्लिक पेपर वर येणार नाही याची काळजी घेण्यात येते.आधी एलिजीबल सर्व लेव्हल च्या माणसांना एका खोलीत एकत्र बोलावून त्यांच्या ग्रेड वाढल्याची माहिती दिली जायची.आता डिस्क्रीटली खोलीत एकट्याला बोलावून माहिती दिली जाते.कम्पेनसेशन चे आकडे शेअर करू नयेत असा अलिखित रुल सगळीकडे असतो.एखाद्याला प्रमोट करणे/एखाद्याला लायकी असूनही यंदा न करणे हे मॅनेजमेंट साठी अप्रिय निर्णय असतात.कितीही योग्य निर्णय असला तरी तो ऐकल्यावर 10 "साला कुत्ता प्रमोट हो गया, कुत्ती मॅनेजमेंट" विचार करणारे असतातच, त्यानं प्रमोट होणार्याचे यश व आनंद कमी होत नाही.

वरील सर्वांचे आभार !
...
मागे एकदा रीमा लागूंची मुलाखत ऐकली होती. त्या असे म्हणाल्या होत्या,
“ आपल्या कामानिमित्ताने अनेकांच्या ओळखी होतात. जर आपण वयाच्या पन्नाशी नंतरही त्यांच्याशी संपर्क ठेवून असू तरच त्यांना मित्र म्हणता येईल. अन्यथा ते लोक आपल्या “ओळखीचे” आहेत, एवढेच म्हणावे”.

Keep your friends close and enemies closer Happy I am just happy that you got to know the true nature of the person when you were having happy times and not challenging ones.

एका वेगळ्या विषयावर पण खुप छान धागा. आपल्या पैकी बहुतेकांनी असा अनुभव आपल्या आयुष्यात घेतला असेल. थोडक्यात काय तर it should stand to the test of time.

रणांगणावर आपल्याला "साला कुत्ता" म्हणणाऱ्या दर 12 लोकांच्या पलटणीमागे आपल्याला "भला देवता" म्हणणाऱ्या 3 लोकांची फौज उभी करण्याचा अविरत प्रयास म्हणजेच जीवन.

- संत अनवानंद ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
(दवणीय अंडे साठी एंट्री दिलीय ☺️☺️☺️)

या लेखासंबंधी एक आठवण सांगतो. लेख २००५ साली छापील मासिकात प्रकाशित झाला होता. त्यावेळेस मी परदेशात होतो. तो अंक पुण्याहून टपालाने मला मिळायला १२ दिवस लागत.
हा अंक प्रकाशित झाल्या नंतर दोनच दिवसात मला औरंगाबादच्या एका वाचकाची इ मेल आली. त्यात त्याने लेख आवडल्याचे आणि त्यालाही अगदी तसा अनुभव आल्याचे लिहिले होते.
माझा छापील लेख मी पाहण्यापूर्वीच मला जलद वेगाने त्यावर आलेला प्रतिसाद सुखावून गेला. इ- माध्यमामुळे जग किती जवळ आलंय याचे तेव्हा अप्रुप वाटले होते.

या लेखासंबंधी एक आठवण सांगतो. लेख २००५ साली छापील मासिकात प्रकाशित झाला होता.
>>
तरीच आधी कुठेतरी वाचल्यासारखा वाटतच होता.

हे सर्व मानवी स्वभावाचे पैलु आहते ते "आपल्या" सगळ्यांमधे असतात. फक्त वेळेनुसार, परिस्थीतीनुसार, अनुभवानुसार व आपल्या आकलनानुसार आपण प्रत्येकजण त्या घटनेत कसे व कितीप्रमाणात व्यक्त होतो ते बदलते.
---
मित्राची त्यावेळेची अवस्था अत्यंत डिप्रेस असू शकते.घरात किंवा येताना रस्त्यावर काही वाद झाले असू शकतात.त्याने असा रिस्पॉन्स देणे जरी योग्य नसले तरी बरेचदा रिफ्लेक्स हे त्याच्या आधी इमिजीएट घडलेल्या घटनेवर बेस्ड असू शकतात.तुमच्या मागे बोलताना हा माणूस 'हा सर्वात योग्य माणूस, ही गॉट व्हॉट ही डीझर्व्हड असेही म्हणत असेल.
खरं सांगायचं तर आपल्याकडे यश किंवा छान काहीतरी आलंय हे फॅक्ट त्यावर कोण कसं रिऍक्ट करतं याने बदलत नाही.
Submitted by mi_anu on 16 April, 2018 - 14:29
>>
+१

बरेचदा आपण एखाद्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवतो, अन त्या सोबतीला मैत्री समजतो, पण तसे नसते. ती फक्त एक सोबत असते मैत्री वगैरे काही नाही.
Submitted by VB on 16 April, 2018 - 17:08
>>
+१

बी द बिगर पर्सन. त्याला जड गेले असेल. त्याच्या परीने त्यानेही प्रमोशन साठी प्रयत्न केले असतील व यश मिळाले नसेल. माफ करून टाका मित्रांच्या अश्या चुका मनात धरायच्या नाहीत. डिड यू लाइक हिम इन स्पाइट ऑफ हिज फ्लॉज? ऑर ओन्लि टिल ही एको ड युअर फीलिन्ग्स.
Submitted by अमा on 16 April, 2018 - 15:17
>>
+१

मस्त लेख.
अशा क्वालिटीज शालेय जीवनात आपल्याकडे शिकवल्या जात नाहीत. जसे जीवनाभिमुख शिक्षण जपानमध्ये वगैरे शाळांमध्ये देतात तसे. परिणामी कित्येक "सुशिक्षित" लोक आपले स्वभावदोष तसेच घेऊन बाहेर पडतात. >>>>
+ 1

कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या पुढील ओळी आठवल्या .

अपुल्या हाती नसते काही
हे समजावे
कुणी दिले जर हात आपुले
हाती घ्यावे

लोकांना गृहीत धरणे धाडसाचेच , मा . बो . सुध्दा अपवाद नाही .

छान आहे सर लेख
या निमित्ताने 'आपल्याला अभिनंदनापेक्षा सांत्वन करायला जास्त आवडते' हे आठवले .

मी एक अनुभव सांगते मग मला सांगा तुम्हाला काय वाटते ते :

माझ्या घरात एक अगदी जवळचे नातेवाईक गेले, ते हि अचानक आणि मी तिथे नसताना. मी ज्या गावात राहत होते तिथल्या एका मैत्रिणीने - हि news तिला (दुसरीकडून ) समजल्याक्षणी इतर सर्व मैत्रिणींना इमेलने हि माहिती दिली, cc मध्ये मी होते, मी निघायच्या आधीच तिचा इतरांना पाठवलेला मेल मला आला होता. मला तिचा हा उद्योग आवडला नाही.

नंतर मी तिथे गेले जवळपास महिन्याभराने वापस माझ्या घरी आले, तेंव्हा तिने फोन करून मी कशी आहे वगैरे विचारले आणि मग तीच्याकडे एक खूप चांगली न्यु आहे हे सांगत दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे हि बातमी पुरवली. अर्थात मी तिला wish तर केले.
पण माझे मन तेंव्हा थाऱ्यावर नव्हते, मला तिच्या newsमध्ये इंटरेस्ट नव्हता. उलट मला हे आत्ता सांगण्याचा रागच आला. अर्थात याचा अर्थ हा हि नव्हता कि मी jealous वगैरे आहे. only the thing was - I was not interested.

सांगायचा मुद्दा हा कि याला वेगवेगळे पैलू असू शकतात . इथे १+१=२ असेलच असे नाही. माणसाचे मन preoccupied असु शकतं. कोणत्यातरी पूर्वीच्या गोष्टीचा राग दुसऱ्या गोष्टीवर निघु शकतो. प्रत्येकच वेळी माणुस मोकळा बोलेलच असे नाही मग एवढ्या तेवढ्यावरून मैत्री नसेल - परिचित असेल - असे म्हणून अढी बाळगण्यापेक्षा बोलून टाकत यायला हवे आपल्याला, जे नेहमीच जमत नाही.
(माझ्याबाबतीत ती प्रेग्नन्ट असताना मला विषय वाढवायचा नव्हता म्हणून मी बोलले नाही, तेंव्हा आणि नंतरही )

शिल्पा, सहमत. पण त्याही परिस्थितीत तुम्ही अभिनंदन केलेत हे महत्वाचे. या लेखातील तो महा बेरकी आहे. तो मला “ बूट छान, पेढा मस्त” हे म्हणू शकतो त्याला ‘अभिनंदन’ शब्द मात्र जड जातो !
आमच्या बऱ्याच मित्रांचे त्याच्याबद्दलचे असेच अनुभव आहेत

Pages