निघते आहेस ना...

Submitted by मोहना on 11 April, 2018 - 21:53

आप्पांची प्रकृती गंभीर आहे हे कळल्यावर प्रणाली तातडीने निघालीच. नको त्या विचारांना मनात थारा द्यायचा नाही असं ठरवूनही आप्पांची भेट होईल की नाही ही भिती काही दूर होईना. प्रणाली या एकाच विचाराने विमानात कितीतरी वेळ रडत राहिली. मुंबईपर्यंत २२ तास आणि पुढे कुडाळपर्यत पोचायला आणखी ८ तास. विमानतळावर पोचल्यावर आप्पा आहेत हे कळल्यावर तिचा जीव शांत झाला. घरी पोचल्यावर प्रणाली धावलीच आप्पांच्या पलंगापाशी. रया गेलेले आप्पा पाहून भडभडून आलं प्रणालीला. डोळे मिटून शांतपणे निजले होते आप्पा. काहीवेळ भरुन आलेल्या डोळ्यांनी ती त्यांच्याकडे पाहत राहिली. तिच्या चाहुलीने त्यांनी डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागलं. पुढे होऊन प्रणालीने त्यांचे डोळे पुसले.
"कुणीही आलं तरी रडतात." माईला आप्पांचं इतकं हळवं होणं आवडत नाही हे प्रणालीला ठाऊक होतं. ती काहीच बोलली नाही. आप्पांना आधार देत तिने बसतं केलं.
"जास्त वेळ बसतं ठेवू नकोस. नाहीतर एकाच दिवसात वर्षभराचं बोलायला जाशील. झेपणार नाही त्यांना." तिने माईकडे नाराजीचा कटाक्ष टाकला. हलक्या हातांनी आप्पांचे पाय चेपत ती लहानपणच्या आठवणी जागवत राहिली. तिच्या बालपणच्या विश्वातले आप्पा तिने पुन्हा उभे केले. तिचे हट्ट, आप्पांबरोबरचे खेळ, तिचा त्यांनी पुरा केलेला अभ्यास, वेळोवेळी सुनावलेल्या शिक्षा. ओठांवर हलकंच हसू उमटलं का आप्पांच्या? प्रणाली निरखून पाहत होती. आप्पा ऐकतायत याची खात्री करत कितीतरीवेळ बोलत राहिली ती. माईंनी हाक मारुन चहा पोहे तयार आहेत सांगितलं तसं तिने अलगद आप्पांना पुन्हा पलंगावर आडवं केलं. ती स्वयंपाकघरात गेली.

"नंद्या, पक्या पोचतील तासाभरात. जयु येईल थोड्यावेळात. जयु राहणार नाही. तशी येऊन जाऊन असतेच सतत म्हणा. सासर माहेर गावातच म्हटलं की हे असंच. पण पक्या, नंद्या राहणार आहेत ८ दिवस." माईंनी पोह्याची वाटी पुढे करत म्हटलं. प्रणाली काही न बोलता पोह्याचा एकेक चमचा पोटात ढकलत राहिली. खरंतर माईंच्या हातचे पोहे म्हणजे स्वर्ग. पण ती प्रचंड थकली होती. प्रवास, आप्पांना पाहून बसलेला धक्का, आप्पांसमोर बसून एकट्यानेच केलेली भूतकाळाची सैर.
"अगं ऐकतेयस ना?" माईंनी पुन्हा तेच सांगितलं तशी ती वैतागली.
"ऐकलं गं. मी जरा पडते. उठव जयु आली की." ती उठून खोलीत पडून राहिली. माईंनी येऊन चार शब्द बोलावे, आप्पांबद्दल सांगावं असं तिला वाटत होतं पण माई सकाळची कामं आटोपल्याशिवाय येणार नाही हे ही तिला ठाऊक होतं. तरीही कुठल्यातरी अंधुक आशेने ती वाट पाहत राहिली. स्वयंपाकघरातून पातेल्यांचे आवाज ऐकायला यायला लागले तसं माई कामाला लागल्याचा अंदाज आलाच तिला. डोळेही मिटायला लागले होते.

जाग आली तेव्हा जयुचा आवाज कानावर येत होता. जयु मागोमाग नंद्या, पक्या पोचलेच. घर अगदी भरुन गेलं. प्रणालीचा थकवा कुठल्याकुठे पळाला. ती उत्साहाने सर्वांबरोबर गप्पा मारत राहिली. प्रत्येक क्षण तिला आप्पांबरोबर काढायचा होता. पुन्हा सर्वांनी लहान व्हायचं, भूतकाळाला अलगद वर्तमानात आणायचं, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. चौघं भावंडं आणि माई आप्पा. यावेळचं सर्वाचं एकत्र येणं शेवटचं. या मुक्कामातल्या आठवणी तिला मनाच्या कुपीत जपून ठेवायच्या होत्या कायमच्या. आप्पांचं वय झालं होतं. मेंदूला रक्त पुरवठा कमी होत चालला होता. उपचार थांबवलेच होते. जितके दिवस मिळतील ते आपले हेच खरं. मग ते खर्‍या अर्थी उपभोगायला नकोत? प्रणालीला अगदी हेच करायचं होतं.
"माई, आज सांदणं करु या." प्रणाली म्हणाली आणि काही क्षण शांतता पसरली. नंद्या तडकला,
"तू काय तुझे डोहाळे पुरवून घ्यायला आली आहेस का? तिकडे मिळत नाही. इथे आलात की या सगळ्या गोष्टींची हौस भागवायची हे इतर वेळी ठीक पण घरात काय परिस्थिती आहे त्याचं भान ठेव." प्रणालीचे डोळे भरुन आले.
"तेवढं कळतं रे नंद्या मला. आप्पांचा जीव की प्राण आहेत सांदणं म्हणून वाटलं. झाडावरुन फणस काढणं, कापणं, गर्‍यातून रस काढणं ही कामं आप्पा करायचे. माई पुढचं करायची पण ती सांदणं होईपर्यंत स्वयंपाकघरात ठाण मांडलेलं असायचं आपण सर्वांनी. आजही एकत्र खाऊ या ना त्यांच्याबरोबर बसून. मी पुन्हा येईन तेव्हा तो योग नाही यायचा आता कधीच म्हणून म्हटलं." तिच्या उत्तरावर कुणीच काही बोललं नाही. माई सांदणांच्या तयारीला लागल्या. प्रणाली निमूटपणे मदत करत राहिली. उसनं अवसान आणून काही बाही बोलत राहिली. तिच्या उत्साहावर पाणी पडलं तरी आप्पांसमोर तिने मुखवटा चढवला. प्रेमाने तिने त्यांना सांदणाचा एकेक घास भरवला. सगळ्यांना गप्पा गोष्टीत सामील केलं आणि हास्य विनोदाने प्रत्येकाच्या मनात पुन्हा आनंदाने घर केलं. उत्साहाने आठवून आठवून ती बेत पार पाडत राहिली. नव्याने भूतकाळ अनुभवत राहिली. सर्वांच्या चेहर्‍यावरचा आनंद मनात साठवत राहिली. नंद्या, पक्याचा निघायचा दिवसही जवळ येऊन ठेपला. त्या दिवशी दुपारच्या निवांत क्षणी भावंडं खोलीत सतरंज्या टाकून लवंडली.
"प्रणाली, तू इथे आहेस तोपर्यंत काही गोष्टींबद्दल बोलायचं होतं." नंद्या म्हणाला.
"बरं, पण आप्पासाठी काही करता येणारच नाही का आता? तुम्ही वय वय म्हणता पण आताच्या काळात ७२ म्हणजे जास्त नाही. तसे ठणठणीत वाटतात." प्रणालीला ती आल्यापासून त्यांनी उभारी धरली आहे असं वाटायला लागलं होतं.
"सगळ्या शक्यता तपासून झाल्या आहेत. हृदय कमजोर होत चाललंय, मेंदूला रक्त पुरवठा कमी. आता पुन्हा पुन्हा याच विषयावर बोलून बदल होणार आहे का? आधी नंद्या काय म्हणतोय ते ऐक." पक्या म्हणाला.
"आप्पांनी मृत्युपत्र केलं आहे. वाचून घ्यायचं का? माईकडे आहे." नंद्याने विचारलं. सर्वांनी होकार दिला. माईंना हाक मारायला नंद्या उठला. प्रणालीला राहवलं नाही.
"सांदणं करु या म्हटल्यावर मला परिस्थितीचं भान नाही का विचारत होतास. आता तुम्ही जे करताय ते काय आहे रे?"
"तुझा हेतू ठाऊक नव्हता म्हणून बोलून गेलो मी. आता तेच धरुन राहणार आहेस का? आणि मृत्युपत्राची आप्पांनीच माईला आठवण करुन दिली."
"ठीक आहे. वाचा तुम्ही. मला काही रस नाही त्यात. मी चक्कर मारुन येते." ती उठली तशी जयु भडकली.
"प्रणाली कुठे जायचं नाही. इतर गोष्टीही बोलायच्या आहेत. मृत्युपत्र आम्हाला लोभ आहे म्हणून नाही वाचणार आम्ही. आप्पांसाठी वाचतोय. काही बदल हवे असतील तर वेळेवर हालचाल करता येईल असं त्यांना वाटतंय."
"एकूण एकच. तुम्ही मृत्युपत्राच्या मागे आहात सगळे." प्रणाली एकदम रडायलाच लागली. काही क्षण कुणीच बोललं नाही.
"रडतेस काय लहान असल्यासारखी? तू आली आहेस म्हणूनच काढलंय आम्ही हे सगळं. इतर बर्‍याच गोष्टींबद्दल ठरवायचं आहे. तू आलीस तशी जाशील निघून. नंतर आम्हालाच पाहायचं आहे हे. तुझ्या सह्या लागतील आप्पांची बचतपत्र आहेत त्यावर. ते पण काम करायचं आहे. माईच्या बाबतीत पण ठरवायला लागेल. घर रिकामंच ठेवायचं, भाड्याने द्यायचं का अशा पर्यायाचा विचार करावा लागेल." जयु समजुतीच्या स्वरात म्हणाली.
"घराचा कसला विचार करायचा. माई राहील की इथेच." प्रणालीला तिघंही खूप घाई करतायत असं वाटत होतं.
"एकटी?" पक्याने तिच्याकडे रोखून पाहत विचारलं.
"तिला विचारलंत?" पक्याच्या प्रश्नाला उत्तर न देता प्रणालीने विचारलं.
"नाही अजून. आपण सगळे ठरवू आणि मग तिच्याशी बोलू. आणि प्रणाली तुला वाटतंय तसे आम्ही उलट्या काळजाचे नाही. पण कटू असले तरी काही निर्णय घ्यावे लागतात. आम्हालाही सारखं यायला नाही जमत. आप्पांच्या प्रकृतीत चढ उतार आहेत कितीतरी महिने. रजा जवळजवळ संपल्या सगळ्या." नंद्या, पक्या दोघं एकदमच म्हणाले.
"मग आत्ता कशाला हे विषय? आपण फक्त आप्पांचा विचार करु या ना आत्ता. पुढच्यावेळेला येईन तेव्हा या गोष्टी शांतपणे ठरवू." प्रणालीला या क्षणी हा विषयच नको होता.
"शांतपणे राहायला कधी आली आहेस तू? मुळात येतेस कुठे फारशी? आत्तासुद्धा आप्पा आजारी म्हणून काही लगेच आली नाहीस." जयु पुटपुटली.
"लगेच आले नाही म्हणजे? धड कुणी सांगत होता का तुम्ही? बरे आहेत, काळजी करु नकोस हेच ऐकत होते मी सतत." प्रणालीचा संयम सुटत चालला होता.
"तू इतक्या लांब काळजी करत बसशील म्हणून सांगत नव्हतो."
"मग कसं म्हणता आले नाही म्हणून. स्पष्ट कल्पना दिली असती तर आले असते. आणि पैसे पाठवले ना लगेच."
"पैसे पाठवले की झालं?"
"का त्याचा उपयोग नाही झाला? नसते पाठवले तरी म्हणाला असता अमेरिकेत राहूनही विचारलं नाही खर्चाबद्दल म्हणून."
"म्हटलं आहे का कुणी तसं?" जयुचा आवाज चढला.
"म्हणायला कशाला हवं? वागण्यातून दाखवता. आल्यापासून ऐकते आहे, मी हे केलं, मी ते केलं, तू होतीस म्हणून बरं, तू किती केलंस आप्पाचं, किती दिवस चाललं आहे आजारपण, धावपळ सतत... थोपटा नुसती एकमेकांची पाठ. उपयोग झाला ना पाठवलेल्या पैशांचा? पण एकाने तरी उल्लेख केला माझ्या मदतीचा? आणि आप्पा अजून आहेत तोवर निघाले घर खाली करायला. आवराआवरी करतायत म्हणे. माई आहे अजून हे विसरू नका. आणि आप्पांना काय वाटेल काही बदल सुचवलेत तर?"
"त्यांची मानसिक तयारी झाली आहे. त्यांनीच सांगितलं पुन्हा वाचा आणि काही बदल हवेत, पटत नसेल तर आताच सांगा. ते गेल्यावर वाद नकोत म्हणाले." नंद्याने आप्पा काय म्हणाले ते सांगितलं. प्रणालीला हसायलाच आलं.
"आणि तुम्हीही सरसावलात बदल करायला. काय करायचं ते करा. मला काही नको हे आधीच सांगते. त्यांनी मेहनतीने मिळवलेलं आपण केवळ मुलं म्हणून हक्काने घ्यायचं हे नाही पटत मला." प्रणालीने ठामपणे सांगितलं.
"आम्हालाही काही कसला लोभ नाही. कळलं ना प्रणाली. पण आहे ते आहे. वाचावं तर लागेलच ना कधीतरी. तुला नको तर नको. तू सांग आप्पांना. आणि तसंही तू इथे नव्हतीसच कधी गरजेला. ते आजारी पडले तेव्हापासून आतापर्यंत सगळं आम्हीच करतोय." पक्या म्हणाला तसं एक कानफटात लगावून द्यावी असं वाटलं प्रणालीला. कसाबसा राग आवरला तिने.
"पक्या तोंड आवर. पुन्हा सांगतेय आप्पांच्या आजारपणाबद्दल तुम्ही नीट कल्पना दिली नाहीत मला. आणि सारखं काय आम्ही होतो, आम्ही केलं. होता रे होता तुम्ही. हजारवेळा ऐकून कान किटले. आता आप्पा आजारी आहेत म्हणून. पण एरवी पण तुम्ही असंच जाणवून देत असता मला. मी या देशात नाही त्यामुळे माझ्यावर कसली जबाबदारी नाही असं वाटतं तुम्हाला. पण माझ्याही मनात अपराधी बोच असते वेळप्रसंगी मदतीला धावून येता येत नाही ह्याबद्दल. पण आता माझा संसार तिकडे आहे त्याला काय करु? येऊ सगळं सोडून इकडे? इथेच असते तर मी तुम्हाला हातभार लावला असता. कळलं ना? ते शक्य नव्हतं म्हणून आर्थिक भार उचलायचा प्रयत्न करते. आणि सारखं तुम्ही किती करत होता त्याचे गोडवे नका गाऊ. आप्पा, माई पण राबले आहेत तुमच्यासाठी तेवढेच. कधीही फोन करा. कुणाच्या तरी गरजेला माई तिकडे गेलेली. आप्पा एकटे घरी. आणि इतकं करून शेवटी मलाच धडे देताय. मी अमेरिकेत गेले ते नोकरीसाठी पण आता वाटतं बरंच झालं. तुमच्यापासून सुटका तरी झाली." दार जोरात आपटून प्रणाली खोलीबाहेर पडली आणि स्वयंपाकघरात एकट्याच बसून राहिलेल्या माईंसमोर तणतणत उभी राहिली.
"माई, तुला सांगून ठेवते. हे घर विकू नकोस. तुझं लग्नानंतरचं आयुष्य या घरात गेलंय. इथेच जन्म झालाय गं माझा. लग्नापर्यंतचे दिवस इथेच तर होते मी. आणि आता आप्पा असतानाच घराचं, तुझं काय करायचं यावर विचार करायला हवा म्हणतायत सगळी. कसं समजत नाही गं त्यांना. तू नको हे घर सोडू. एकदा सोडलंस की मग त्यांच्याकडेच राहशील. विभागणी होईल तुझी महिन्यांमध्ये. तू कणखर आहेस माई. आप्पा नेहमी म्हणतात तुझ्यामुळे संसार नीट पार पडला. तुला ठाऊक आहेत आप्पांचे सगळे व्यवहार. तू लक्ष घाल त्यात आणि ठाम राहा तुला काय वाटतं त्याबद्दल."
"प्रणाली, अगं तुझी भावंडं नुसतं बोलली तर टोक गाठते आहेस तू." माई हसायचा प्रयत्न करत म्हणाल्या.
"असेल तसंही असेल. मी साता समुद्रापलीकडे राहते त्यामुळे कितीही नाकारलंत तरी बाजूलाच पडते. रोज बोलणं होत असलं तरी ते ख्यालीखुशालीचं. मला कोणीही मोकळेपणाने अडचणी सांगत नाही, सल्ला मागत नाहीत आणि मी मात्र तिकडे राहून फक्त तुमचा सर्वांचा विचार करत असते सतत. तुम्ही इथे सगळे एकमेकांना कारणाकारणाने वारंवार भेटत असता. आत्ता माझ्यासमोर जे बोलणं झालं ते या ना त्या मार्गे आधी झालं असणार तुमचं बोलून. आप्पा आजारी पडल्यावर किंवा त्या आधीच. माझ्याशी हे फोनवर कसं बोलायचं म्हणून कुणीच कधी बोललं नसणार. पण माझा जीव गलबलतो हे ऐकताना. मला नाही हे सहन होत. हे सगळं एकदम माझ्या अंगावर कोसळल्यासारखं वाटतंय गं माई. भिती वाटतेय मला. भिती वाटतेय." आपल्या हळव्या मनाच्या मुलीची समजूत कशी घालावी ते माईंना समजेना. समजतूचीचे शब्द शोधत राहिल्या त्या.

प्रणालीशी नंतर कुणीच या विषयावर काही बोललं नाही. तिनेदेखील आला दिवस आप्पांचा असंच ठरवून टाकलं होतं. नंद्या, पक्या ठरल्याप्रमाणे परत गेले. प्रणाली आप्पा आणि माईंचा सहवासाचं सुख अनुभवत होती. गेल्या काही दिवसात या पूर्वी कधीच न ऐकलेले प्रसंग, आठवणी तिने ऐकल्या होत्या. आप्पां जेव्हा तरतरीत असत तेव्हा ते त्यांचं लहानपण तिच्यासमोर उभं करत, तरुणपणच्या गमती जमती सांगत. माई बरोबरच्या लग्नाची हकिकत खुलवून सांगत आणि त्यात स्वत:ही हरवून जात. माई देखील खुलून त्यांच्या संसारातले किस्से सांगत राहायच्या. आप्पा सुखावल्यासारखे ऐकत राहायचे. बोलण्या बोलण्यात आप्पांनी कधीतरी तिचा संसार वाट पाहतोय याची आठवण करुन दिली. त्यांच्या बोलण्याने तिला बळ आल्यासारखं वाटलं. हृदयावर दगड ठेवून तिने निघायचा दिवस पक्का केला. ती निघण्याआधी पुन्हा पक्या, नंद्या, जयु निरोप द्यायला आले.

... उद्या निघायचं होतं. प्रणालीचा जीव वर खाली होत होता. अमेरिकेतून निघताना आप्पांची भेट होईल याचीच शाश्वती वाटत नव्हती. कुडाळला आल्यावर आप्पांच्या प्रकृतीतल्या चढ उताराप्रमाणे ती रजा वाढवत होती. पण कधीतरी परत जायला हवं होतं याची आप्पांनीच आठवण करुन दिली होती. तिकडे चार डोळे तिची वाट पाहत होते मूकपणे. रजा वाढवताना एका कमजोर क्षणी तिने ती इथे असतानाच आप्पांनी जगाचा निरोप घ्यावा म्हणून हात जोडले होते देवापाशी. नंतर तिचं तिलाच अपराधी वाटत राहिलं. पण ती परत गेल्यावर आप्पांनी जगाचा निरोप घेतला तर तिला लगेच परत येता येणं शक्य नव्हतं. आणि आप्पांना अशा अवस्थेत सोडून निघायचं म्हणजे आयुष्यभराची मनाला टोचणी. विचार करुन करुन डोकं भणभणलं प्रणालीचं. रात्री काही केल्या झोप येईना तसं तिने सगळ्यांना उठवलं. आप्पा नुसते पडून असतात. आताही ते जागेच असणार हे माहीत होतं तिला. सगळ्यांना आप्पांबरोबरच्या आठवणी जागवण्याची गळच घातली प्रणालीने. डोळे चोळत सगळे आप्पांभोवती जमा झाले. कुणीतरी सुरुवात करायला हवी होती. नंद्या हसला. त्याला एकदम आप्पांबरोबर तो विटी दांडू खेळायचा ते आठवलं. आठवणी होत्याच. आप्पांसमोर त्याची माळ गुंफणं सुरु झालं. कुणालाच वेळेचं भान नव्हतं. प्रणाली आपल्या भावंडांकडे, आप्पा माईंकडे टक लावून पाहत राहिली. बालपण आनंदाने आजूबाजूला बागडत होतं. तिला ते घट्ट धरुन ठेवायचं होतं त्यातल्या माणसांसह. पहाट झाली तसं फटफटायला लागलं आणि अचानक आप्पांनी विचारलं,
"आज निघते आहेस ना बेटा?"
"काय?" भानावर आलेली प्रणाली गोंधळली. निजूनच त्यांच्या गप्पात सामील झालेले आप्पा कसेबसे उठून बसले.
"आज निघते आहेस ना?" दाटून आलेल्या गळ्याने त्यांनी विचारलं. आप्पांचा प्रश्न तिच्या कानातून मनात शिरला. मन चिरत गेला. तिने कानावर हात ठेवला पण तरीही तोच प्रश्न पुन्हा पुन्हा आदळत राहिला. आज निघते आहेस ना, आज निघते आहेस ना....
आप्पांच्या मांडीवर प्रणालीने डोकं टेकवलं.
"आप्पा, मला नाही जायचं हो तुम्हाला सोडून. राहू दे ना मला इथेच. मला नाही जायचं. आणि तुम्हीही जाऊ नका ना आप्पा. आप्पा..." आप्पा कमजोर मनाने, थकल्या देहाने प्रणालीच्या डोक्यावरून हात फिरवीत तिचा आक्रोश शांत व्हायची अगतिकपणे वाट पाहत राहिले.

पूर्वप्रसिद्धी - माहेर मासिक - जानेवारी २०१७

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

आपलं मूलपण संपताना होणारी पडझड तंतोतंत रंगवली अहे. >> ++१११
मला का रडायला आलं हे कळत नव्हतं...हा प्रतिसाद वाचुन ते कळलं.
खुप सुंदर लिखाण....

निशब्द ... डोळ्या समोर उभं राहील सगळं... आसवांसह ...

(तुमची "इच्छा" हि कथा वाचली होती त्यामुळे काही वाक्य जशी च्या तशी लिहिल्याने खटकली. )

सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद.
माधव, मला हेच दाखवायचं होतं. तुमच्या प्रतिक्रियेने ते जमलंय असं वाटतं. अर्थात इतर कंगोरेही मांडायचे होते.
मयुरी - ’इच्छा’ ही लेखवजा छोटी गोष्ट होती. आणि तो लिहिताना त्यातल्या काही कल्पना मनात ठाम रुतल्या आहेत त्याचा परिणाम असावा तो.

छान कथा Happy
.काटा आला अंगावर.आक्रोश करणारी प्रणाली डोळ्यासमोर आली.

हळवं आहे सगळंच... इकडे राहिल्यामुळे नाही म्हटलं तरी थोडंफार रिलेट झालं.... छान लिहिलंय.

पक्या हे नाव खटकलं मात्र. कोणीतरी गळ्यात रुमाल बांधलेला, जाळिचा बनियन वाला माणूसच समोर आला एकदम. बाकी छान मांडणी>

खुप छान. नेहमीच छान लिहिता तुम्ही. आपलेच जवळचे भाउबहिण आपल्याला समजुन घेउ शकले नाहीत की खरच वाईट वाटते. प्रॅक्टिकल, प्रॅक्टिकल वागण्याने मने दुखावतात त्याचे काय!

धन्यवाद सर्वांना.

अंजली_१२ <<<पक्या हे नाव खटकलं मात्र. कोणीतरी गळ्यात रुमाल बांधलेला, जाळिचा बनियन वाला माणूसच समोर आला एकदम>>> :-). पुढच्या कथेत हे वर्णन वापरेन :-).

मोहना, अतिशय सुरेख कथा, साचेबद्ध मांडणी, संयत ओघ...पुढील कथेची आवर्जून वाट बघतोय!