लव्ह.. लग्न.. लोचा..

Submitted by VrushaliSungarKarpe on 6 April, 2018 - 04:02

‘लग्न’ हा आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. म्हटलं तर हो , म्हटलं तर नाही सुद्धा. लग्न का करावे? ह्या बद्दल बरीच अनुमाने वा निष्कर्ष थोऱ्या मोठ्यांनी त्यांच्या अनुभवातून काढले आहेत आणि त्यालाच तिखट मीट लावून एक झणझणीत फोडणी हि युवा पिढीसमोर ठेवलेली आहे. माझ्याच एका मैत्रिणीच्या वडिलांनी तिला ,”लग्न का करायला हवे?” याचं कारण सांगितलं. कारण तसे खुपच मजेशीर आहे. लग्न केल्यामुळे हाडांचे शुद्धीकरण होते म्हणे. आता हाडांचे शुद्धीकरण म्हणजे नेमके काय? हा विषय खुप मोठा असेल हि. ह्या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर प्रत्यक्षात त्यांनाच भेटावे लागेल .कधी हा विषय निघालाच तर मग लग्न करायचं कारण काय, कुणी विचारलं तर आम्हीपण हेच कारण आता पुढे सरकवतो.

कांदेपोहे हा एक महत्वाचा घटक जो कुणालाही चुकलेला नाही. मुलगी बिचारी पार केविलवाणी होऊन सर्वांसमोर येऊन बसलेली असते . आधीच भयभीत झालेली आणि त्यात प्रश्नांचा भडीमार. त्यातच कुठे तरी ‘च’ चा ‘का’ होतो आणि होत्याचं नव्हतं होऊन जातं. मुलगा ,मुलगी परिपक्व म्हणजेच mature झाले कि हा ‘शाही सोहळा’ थाटामाटात आपल्याकडे संपन्न होतोच होतो. आणि अशातच गमतीशीर किस्से पुढे येतात. परवाच माझ्या एका मैत्रिणीच्या बहिणीचा दाखवायचा कार्यक्रम झाला. मुलगा हा मूळचा भारतीय असून अमेरिकेत कामासाठी गेलेला होता. पद्धतशीर पोह्यांचा कार्यक्रम झाला सर्वांचा मान पान हि . कुणाकडे हि नजर वरकरून न बघता दबकत दबकत ती मुलगी सर्वांसमोर येऊन बसली होती. सहसा खेडेगावात हे असे दृश्य बघायला मिळते. मुलीला प्रश्नांची पृच्छा केली गेली. जाताना मुलगा बोला कि, “मी चार मुली बघितल्या आहेत. तुमची कन्या आवडली तर कळवतो”. एवढ्या मुलींमधून तो कोणती हि एकच मुलगी निवडणार हि काळ्या दगडावरची रेघ. पण ज्या ज्या मुलींना त्या मुलाने नाकारले आणि फुकटचे पोहे हादडले त्याच्या घरातील आयांनी नक्कीच त्याच्या नावाने बोटे मोडले असतील. हल्लीच येऊन गेलेला एक सुप्रसिद्ध मराठी सिनेमा “ची. व ची. सौ.का.” ह्या सिनेमाच्या डायरेक्टरने मुलीला दाखवायच्या कार्यक्रमापासून ते अगदी लिव्ह-in रिलेशनपर्यंतचे सर्वच प्रसंग त्यात मांडले आहेत. मुलांच्या ह्या निर्णयानंतर एक माध्यम वर्गातील आई वडिलांच्या गंभीर अश्या भावना विनोदातून रेखाटल्या आहेत. लग्न करावे कि करू नये किंवा मग हाडांचा शुद्धीकरण होईल कि नाही हे हि माहिती नाही. माझ्या आजीने मला सांगितलं होतं लग्न म्हणजे “दोन जीवांचा मेळ” असतो. हक्काचं माणूस असतं सोबत. प्रेमाने बघणार ,प्रसंगी ओरडणार , आपले रुसवे फुगवे काढणार . असं नातं जे कि,” तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना झाल्यासारखा”. कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणाने आपण आयुष्यभर एकमेकावर नितांत प्रेम करत असतो. ‘शादी का लड्डू जो खायेंगे वो भी पचतायेगा और जो ना खयेगा वो भी पचतायेगा’ अशी गत होते. लग्न करणे जरी आवडत नसले तरी आपण आई वडिलांच्या कृपेमुळे बोहल्यावर चडतोच. अश्याच एका भन्नाट लग्नाचा अनुभव काही दिवसांपूर्वी आला.

संध्याकाळी व्हाट्सअप group वर धीरजचा संदेश आला कि, I am coming to पुणे .जवळ जवळ एक दिड वर्ष नाशिकमध्ये काम केल्यावर धीरजला पुण्यामध्ये नोकरी मिळाली. पुण्यामध्ये असलेले त्याचे बाकीचे मित्र मैत्रिणी पुण्याच्या जगमगत्या वातावरणासोबत जमवून घेत स्वतःची ठाम अशी ओळख करण्याच्या दिशेने पाऊल टाकत होते. आपल्या मित्रांपासून लांब राहणे कधी कधी त्याला असह्य होत असे. खुप दिवसांनंतर धीरज येणार होता म्हणून त्याच्या गॅंगने त्याच्या स्वागताची जोरदार तयारी चालू केली होती. सर्वजण खुप दिवसांनी भेटणार होते. दुसऱ्या दिवशी शनिवार आणि रविवार असल्यामुळे गप्पांना उधाण येणार होते. ह्या दिड वर्षात पश्याला एक गोड मुलगी झाली होती. काही जणांनी गर्लफ्रेंड पटवली होती तर काहींचे बॉयफ्रेंड हि झाले होते .बिचारे मुलं लग्न न करताच सासुरवास भोगत होते . त्यांच्या बॅचलर आयुष्याची राखरांगोळी झालेली धीरज बघत होता आणि मनोमन हसत हि होता. मोन्याचं आणि पक्याचं लग्न तोंडावर आले होते. हे सगळं बघून धीरज सुखावला होता आणि आपल्या माणसात आलेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.

नेहमीच आनंदी असणारा धीरज आज मात्र थोडा खिन्न दिसत होता. नकोस वाटणारा भूतकाळ आकस्मितपणे त्याच्यासमोर आला होता. मित्रांसमोर आज मोकळे व्हायचे अशी खूणगाठ मारूनच धीरज आला होता. आणि त्याने त्याचा भूतकाळ सर्वांसमोर मांडला. त्याचा हि आयुष्यात एक मुलगी होती कल्पना नाव होत तिचं. एका कॉलेज इव्हेंटमुळे ते दोघे एकमेकांना ओळखू लागले होते. आधी त्यांच्यात मैत्री झाली आणि मग हळू हळू प्रकरण वाढलं कधी त्यांना पण समजलं नाही. मग रोज गुपचूप एकमेकांना भेटणे , डोळ्यातूनच खाणा खुणा चालू होत्या. धीरजला कल्पना आवडू लागली होती. पण माशी कुठे शिंकली कळलंच नाही. धीरज नाशिकला गेल्यावर तिने त्याच्या सोबतचे सर्वच संबंध तोडले. धीरज तिला कॉल, messages करून मेटाकुटीला आला होता. तरी तिचा काही रिप्लाय आला नाही. तिच्याबद्दल त्याने तिच्या मैत्रिणींकडे विचारपूस केली. पण काहीच हाती लागत नव्हते. एके दिवशी Facebook वर तिचा फोटो त्याला दिसला. गळ्यात मंगळसूत्र असलेला. आज आपण तिथे असायला हवे होते त्या जागी कुणी तर तिसराच मुलगा आज तिथे उभा होता. हा विचार करून आणि ते छायाचित्र बघून तो मात्र पुरता कोलमडून गेला होता. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांना समजले कि जोर जबरदस्तीने तिला लग्न करायला भाग पडले होते तिच्या घरच्यांनी. धीरज मात्र त्यानंतर शांत शांत राहू लागला होता. तिच्या आठवणीमध्ये कित्येक रात्री जागून काढल्या होत्या. शेवटी मनाला समजावून धाय कोकलून रडला तो आणि ते शेवटचं. कल्पना हा विषय त्याच्यासाठी त्यानेच बंद केला कायमचा. धीरजच शिक्षण हे सोलापूर सारख्या शहरात झालं होत. त्याचे सर्व मित्र मैत्रिणी सुद्धा चांगल्याच घरातून आले होते. छोटे शहर असल्यामुळे आणि नातेवाईक आजूबाजूला असल्यामुळे धीरजवर चांगले संस्कार झाले होते. साधी सरळ माणसं. शेतकरी कुटुंब . घरी आई वडील आणि त्यांचा एकुलता एक मुलगा धीरज. त्याची आई घरीच असायची. एक मुलगा तोही कामासाठी बाहेर असायचा. करमणूक म्हणून त्याची आई घरीच काहींना काही काम करत असायची. त्यातूनच एक छोटा पार्लरचा व्यासाय चालू केला होता. धीराजला पुण्यामध्ये येऊन दोन वर्ष झाले होते. बऱ्यापैकी चांगला पगार होता त्याला आणि थोडा सेटल होत होता. त्याच्या घरच्यांनी त्याच्या कांदेपोह्यांचा कार्यक्रम करायची सुरुवात केली होती. आमच्या ग्रुपने ही हे काम खुपच मनावर घेतलं होतं. आपल्या आपल्या friend circle मध्ये कुणी मुलगी आहे का हे बघायला सुरुवात झाली.

ग्रुपमधल्या मुलींना तर वेळ, काळ ह्या कोणत्याच गोष्टीचे भान उरले नव्हते. मुलगी दिसली कि दिसली तिला बोलतं करायचं आणि आपला काम साधून घ्यायचं. असाच उद्योग करताना एक किस्सा झाला. मी पुणे स्टेशनच्या बस stop वर उभी होते. बराच वेळ झाला तरी हि माझ्या route ला जाणारी एकही बस फिरकली नाही म्हणून कंटाळून बस स्टॉपच्या आतील बाकावर जाऊन बसले. बस यायला बराच अवधी होता काय करायचं म्हणून मी आमचा उद्योग परत चालू केला. माझ्याच बाजूला एक मुलगी बसली होती. छान सिल्कची साडी घातलेली , हातात गुलाबी रंगाच्या बांगड्या होत्या , केसाची वेणी घालून गजरे लावले होते. मी बोलणं चालू केलं. तुझं नाव काय ? बराच वेळ झाला तरी तिच्याकडून काहीच प्रतिकीर्या येत नव्हती. बहुतेक तिला ऐकू येत नसेल असा विचार करून मी परत बसची वाट बघत होते. मला एक प्रश्न पडला होता कि एवढ्या उन्हात हि बाई चेहरा झाकून का बसली आहे आणि डोळ्यावर गॉगल का लावला आहे. तिला विचारावं तरी कसं म्हणून मी शांत बसले. थोड्या वेळाने तिनेच चस्मा काढला आणि तो काळाकुळकुळीत गॉगल पण. तिच्याकडे बघून मी तर मोठा ‘आ’ वसला. ती माझ्याकडे बघून बोली,” दीदी, wrong number “ म्हणत चालू लागली. तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिले. तेवढ्याच चला कुणी YCM आहे का ? ऐकू आले आणि मी गडबडीने स्वतःला सावरत बस मध्ये बसले. झालेला सगळा प्रकार आठवून माझंच मला हसू येत होत. धीरज आणि ती कल्पना करवत नव्हती.

सकाळी घडलेला प्रकार सर्वांना सांगून हसून हसून बेजार झालो. धीरज खुप वेळ mobile मध्ये काही तर करत होता. मोन्यानेच त्याला विचारलं काय रे काय चालू आहे? धीरज हसला आणि थेट mobile मधला एका मुलीचा फोटोच दाखवला. धीरजला मुलगी आवडली होती त्याच्या नजरेत दिसत होते ते. चला सर्व मुलींनी सुटकेचा एक निश्वास सोडला. आता नसते उद्योग करावे लागणार नव्हते. आकांशा नाव होतं मुलीचं. दिसायला सुंदर, देखणी , गोरीपान होती. धीरज आणि आकांशा एकमेकाला शोभून दिसत होते. कांदेपोहे न करता आकांशाला भेटायचं ठरलं. दोन दिवस सुट्ट्या होत्या म्हणून सर्व गॅंग माझ्या घरी येणार होती. दोन दिवस आकांशाला आम्ही सर्व जण बारीक नहाळात होतो अर्थात तिच्या नकळत. आमच्या सर्वांना हि ती आवडली होती तास हिरवा कंदील धीरजला आम्ही दिला. म्हणतात ना माणसांचा स्वभाव समजण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो तर कधी कधी आयुष्य जातं. बघता बघता त्या दोघांच्या लग्नाची तारीख ठरली. व्हाट्सअँपच्या ग्रुप वर पूर्ण लग्नाचा माहोल तयार झाला होता. काही झालं तरी “हमारे यार कि शादी है..” प्रश्नच नव्हता.

लग्न म्हटलं तर एक विधी असतो का? मेहंदी , बांगड्यांचा कार्यक्रम , साखरपुढा, हळदी, नाच गाणं असे अनेक कार्यक्रम होतात. धीरज आणि आकांशा आपल्या परीने आपल्या आई वडिलांचा भार कसा कमी करता येईल यावर लक्ष देत होते. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या आवडीचे पोशाख पुण्यामधून घायला सुरुवात केली. मुंडावळ्यापासून ते हळदीचे कपडे शेरवानी, मोजडी, बूट ,चपलापर्यंत सर्व खरेदी दर शनिवारी किंवा रविवारी करत होते. आकांशासोबत मी ही एकदा खरेदीसाठी गेले होते. हा.. हा.. म्हणता म्हणता लग्नाची तारीख जवळ आली होती. प्रत्येकजण आपला जॉब सांभाळून संध्याकाळी लग्नाला जाण्यासाठी सज्ज झाला होता. कुणी सकाळी निघणार होते तर कुणी संध्याकाळी तर कुणी दुपारी. हळदीचा समारंभ आम्हांला मिळाला नाही. पोहचल्यावर सर्वांची गळाभेट झाली. थंडीचे दिवस असल्यामुळे कडकडून भूक लागली होती. जेवणाची आमची पंगत बसली आणि वाढपी म्हणून आमचेच कार्यकर्ते. सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद औसांडुन वाहत होता. आणि त्यातच भेट झाली होती शर्मिष्ठा म्हणजे प्रणवची बायको आणि तिची ३ वर्षची चिमुरडी स्वरा. हल्लीच एक दिड वर्ष झाले होते त्यांना भारत सोडून. खास धीराजच्या लग्नासाठी परदेशातून आल्या होत्या दोघी. जेवण झाल्यावर श्रावणीचा वाढदिवस पण साजरा केला. धीरज बिचारा बराच वेळ जागा होता. त्याचा हि पाय निघत नव्हता. शेवटी आम्ही सर्वांनी जबरदस्ती केल्यामुळे तो झोपायला गेला. दिवसभर ऑफिसचं काम आणि नंतर प्रवास ह्या मुळे सर्वजण दामले होते. थंडीचा वाढता औघ बघून सर्वजण आपल्या आपल्या खोली मध्ये गेले. लग्न घर म्हटल्यावर तशी हि झोप कुणालाच येत नव्हती. बाजूच्या खोलीतून अधून मधून हसण्याचा , तर कधी बांगड्यांचा आवाज येत होता. त्यातच एखाद्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज. हे सर्व नानाप्रकारचे आवाज श्रवण करत आम्हाला सर्वांना झोप लागली.

सकाळी १० वाजता वरात सुरु झाली. लग्नाच्या आधी नवऱ्या मुलाला नाचवत गाजवत पारण्याला घेऊन गेले. सोबत एक चार पाच करवल्यादेखील होत्या. तिकडे आकांशाची तयारी चालू होती. गडद चॉकलेटी रंगाच्या शालूमध्ये तिचा गोरापान देह खुलून दिसत होता. हातात हिरवा चुडा. त्यामध्ये एक एक मोत्यांच्या बांगड्या भरल्या होत्या. केसांची मस्त हेअर style केली होती. कोरीव भुयांवर पेन्सिल काम केले. डोळ्यात काजल , कपाळावर मधोमध लाल रंगांची टिकली . कपाळाच्या एकदम वरती मधोमध केसांमध्ये बिंदी . हातावरचा मेहंदीचा रंग चढत चाला होता. आकांशाच्या मनात असंख्य प्रश्नांनी काहूर माजवले होता. तिचा वाद हा तिच्या मनापर्यंत पोहचला होता. तिची समजूत घालू पाहत होता. आपल्याला आता जायचे आहे. वयाची २५ वर्ष आपण आई वडिलांच्या सोबत होतो. प्रत्येक सुख दुःखात ते आपल्या सोबत होते. खुप लाडात वाढलेली होती ती. त्यांना आपण आज सोडून जाणार आहोत. त्यामुळे ती खुपच हळवी झाली होती. तिच्या जन्मांपासून ते अगदी आजच्या दिवसापर्यंतच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागल्या होत्या. आपलं घर आपली माणसं सोडून एक नवीन जगात जाणार आहोत. असे जग कि पूर्णपणे अनोळखी. तिला घरातील एक एक प्रसंग आठवत होता तसं तिचं मन भरून येत होतं. मी अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि डोळ्यांनीच दोघीनीं एकमेकींना खुप काही सांगितलं . तिचं आवरून झाल्यावर खिडकीतून सहजच तिची नजर तिच्या लहानपणीच्या सायकलवर गेली. आज ती सायकल एकदम स्वच्छ दिसत होती . तिच्या बाबांनी तिला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं होतं. ह्याच अंगणात तिला त्यांनी सायकल चालवायला शिकवली होती. किती तरी वर्ष ती सायकल पडून होती पण त्यांनी कुणाला दिली नाही. आज ती आकांशासोबत जाणार होती. आकांशा तिच्याच विचारात असताना तिची आई रूममध्ये आली आहे हे तिला जाणवले नाही.
आईसोबत घालवलेले अनमोल क्षण तिला आठवत होते. दोघींनी केलेलं डान्स, फॅशन शो ची तयारी, शाळेची तयारी आणि खुप सिक्रेटस. तेवढ्यात मुलींचा घोळका ओरडत आला,”ए, नवरा मुलगा आला गं चला खाली”. जोराचा आवाज ऐकल्यावर तिची तंद्री तुटली. लहानपणी गंमत म्हणून भातुकलीचा खेळ ती मैत्रिणींसोबत खेळायची. आज तो खेळ ती जगत होती. आपल्या परीला एकदा gathering मध्ये आपण नवरीच्या पोशाखात घेऊन गेलो होता हे तिच्या आईला आठवलं आणि घरी आणलं देखील होतं. पण आता परीला आपण फक्त सोडून येणार तिला घ्यायला तिचा राजकुमार आला आहे. आईच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धरा वाहू लागल्या. आईचा पदर धरून दुडू दुडू धावणारी आकांशा आज तोच पदर धरून डोळे पुसत होती. दोघीनीं हि एकमेकाला घट्ट मिठी मारली. परीला नजर लागू नये म्हणून आईने तिला काळा टीका लावला. त्या घोळक्यांत आकांशा दिसेनासी झाली .“नवरी मुलीला घेऊन या..” सगळीकडेच ऐकलेले शब्द परत एकदा कानावर आले. आम्ही सर्वजण धीरजच्या मागे उभे होतो. ‘शुभमंगल सावधान’ ऐकताच अक्षदांचा पाऊस पडत होता. मग विधी चालू झाले. आम्ही सर्वजण फोटो काढण्यामध्ये रमलोत. कुणी फेसबुक वर तर कुणी इन्स्टावर तर कुणी व्हाट्सअँपचा स्टेटस ठेवत होतं.

लग्न..लग्न..लग्न.. अगदी काही तासांचा खेळ आहे. पण त्यासाठी लागणारी तयारी , होणारी धावपळ किती तरी महिन्यांपासून चालू असते. असा हा लग्न सोहळा सर्वांच्याच आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. जुनी नाती सोबत धरून नवीन नात्यांमध्ये रुजताना त्यात प्रेम, मधुरता भरायची असते. मनात हूर हूर असंख्य प्रश्न घेऊनचं नवरी मुलगी आयुष्याच्या जोडीदार सोबत चालत असते. सारखपुडापासून ते विदाईपर्यँतचा प्रत्येक क्षण मनाला लावून जातो, एकमेकची मनं सांभाळत ,मान पान जपत दोन्ही घर एकमेकांमध्ये गुंतून जातात आणि मग सुरु होते नवीन आयुष्याची घोडदौड.

ह्या सर्व गोष्टीतून एक बोध घेता येईल तो म्हणजे आयुष्याचा साथीदार निवडण्यासाठी 'फुकटचे कांदेपोहे' न हादडता धीरजप्रमाणे कांदेपोह्याचा कार्यक्रम रद्द करून आई वडिलांना विश्वासात घेऊन मुलगा आणि मुलीने भेटण्याचा बेत आखावा. एका 'कांदेपोह्या' वरून किंवा एक-दोन प्रश्न विचारून ती कशी आहे याचे तर्क वितर्क करता येऊचं शकत नाहीत. कांदेपोह्याच्या कार्यक्रमला मुलीच्या घरचे डोळे लावून असतात आणि तशातच काही नकार आलाच तर कधी कधी मुलीचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो तर कधी नकार पचवायची ताकद तिच्यामध्ये नसते. रूढी परंपरेने चालत आलेली हि प्रथा आपण किती दिवस कुरवाळत बसणार हे आता आपण ठरवायला हवे.

वृषाली सुनगार-करपे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेखन!!

तिनेच चस्मा काढला आणि तो काळाकुळकुळीत गॉगल पण >>>?????

छान, आवडले..

गॉगलवाल्या मुलीचा किस्सा मलाही समजला नाही..

"दीदी, wrong number" चा अर्थ काय? नक्की काय म्हणायचे आहे? आणि YCM म्हणजे काय? (बसस्टॉपचे नाव आहे का?)

मला तर काय झेपलंच नाही बाबा, चॅनेल चेंज करून तीन चार पिक्चर एकसाथ पाहिल्यावर काय सरमिसळ होईल तसा प्रकार झालाय

गॉगलवाल्या मुलीचा किस्सा मलाही समजला नाही.. >>> +११११

चॅनेल चेंज करून तीन चार पिक्चर एकसाथ पाहिल्यावर काय सरमिसळ होईल तसा प्रकार झालाय >>> अगदी अगदी

@आस @ ऋन्मेऽऽष @आशुचँप @उपाशी बोका @ वत्सला
YCM हे पुण्यातील एका बस स्टॉपचे नाव आहे. चस्मा आणि गॉगल ह्या दोन्ही पैकी एक गोष्ट तिथे असायला हवी होती. लिखाणातील चूक आहे. दाखवून दिल्याबद्दल आभार. बस स्टॉपचा विषय हा तृतीय पंथी मंडळीं सोबत घडलेला दाखवला आहे. ती बाई मग गॉगल काढून लेखिकेला "सॉरी, didi wrong number " असे उच्चारते. आता पुःन्हा वाचले तर तो प्रसंग आपल्या लक्षात येईल अशी आशा बाळगते.

धन्यवाद