विश्वास संपादन करून विणलेली फसवणुकीची जाळी (कॉन स्किम्स)

Submitted by अमितव on 19 March, 2018 - 18:04

पाँझी स्किम, बॅजर गेम, स्पॅनिश प्रिझनर, नायजेरिअन स्कॅम ते चेन मार्केटिंग आणि भविष्यकथन अशी अनेकविध नावं विविध ठिकाणी आपल्या कानावर पडत असतात. हॉलिवुडने तर कॉन आर्टिस्टना (कॉन्फिडन्स आर्टिस्ट) टोटल रोमॅंटिसाईझ केलंय. या वेगवेगळ्या क्लुप्त्या नक्की आहेत काय आणि त्यात आपण कसे फसवले जातो याची लिस्ट करायचा प्रयत्न करतोय.

ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मधूनच शोधून लिहिली आहे. ही फसवणूक करण्यासाठी लिहिलेली कृती नसून मला याविषयावर माहिती एकत्र करावीशी वाटली म्हणून लिहिलेली वेब एन्ट्री आहे. कुणाला घोटाळ्यात अडकण्यापासून किंवा 'घोटाळा आहे' हे समजायला या माहितीचा उपयोग झाला तर उत्तमच.
अशा प्रकारची फसवणूक "भारताच्या" राजकारणात घडली असेल तरी हा धागा भारताच्या राजकारणावर नाही याची नोंद घ्या आणि शक्यतो कृपया इथे त्याचा रेफरन्स देणे टाळा.

कॉन्फिडन्स गेम किंवा विश्वास जिंकून फसवणूक करताना फसवणूक करणारी व्यक्ती मानवी मनाच्या सहज आणि पुरेशा पुराव्याशिवाय विश्वास ठेवणे, अती-निरागसता (नाईव्ह), सहवेदना आणि त्यातून पटकन मदत करणे, स्वतःच्या कर्तृत्वावर/ गुणांवर/ क्षमतेवर असलेला फाजील विश्वास, कधीतरी फायद्यासाठी अनैतिक वागणूक करणे पण ती नैतिक नाही याचे पुरेपुर भान असणे, अप्रामाणिकपणा, लोभ, संधीसाधूपणा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हाव इ. सहज प्रेरणांच्या वापर आपल्या फायद्या साठी करतात.

अशी विश्वास जिंकून फसवणूक करताना साधारण या सहा पायऱ्या वापरल्या जातात.
१. तयारी: आधी फसवणुक कशी करायची याची जय्यत तयारी केली जाते. कोणी मदत करणारा लागणार असेल मदतनिसाची नेमणूक होते.
२. सावज (व्हिक्टिम) हेरणे आणि त्याच्याशी संपर्क करणे
३. बिल्ट अप: या अन्यायग्रस्त व्यक्तीला फायदा मिळण्याची संधी उपलब्ध करणे. जेणेकरून त्याच्या मनात हाव निर्माण होईल आणि ती हाव सारासारविचार क्षमतेवर हावी होईल.
४. फायदा होणे: यात त्या व्यक्तीला थोडाफार आर्थिक फायदा होईल, आणि व्यक्तीचा एकुणात स्कीमवरचा विश्वास दुणावेल.
५. गोंधळाची परिस्थिती निर्माण करून अन्यायग्रस्त व्यक्तीला चटकन निर्णय घेण्यास भाग पाडणे
६. त्याच वेळी आजूबाजूच्या व्यक्ती (ज्या फसवणुकीत सामील आहेत) त्याच स्कीम मध्ये गुंतवणूक करत आहेत असा भास निर्माण करणे जेणे करून जे चालू आहे ते योग्य आहे हा भास कायम राहील.

काही प्रसिध्द फसवणुकीची जाळी

१. स्पॅनिश प्रिझनर: किंवा अ‍ॅडव्हान्स फी, नायजेरिअन पत्र इ. : यात फसवणूक करणारी व्यक्ती आपण एका श्रीमंत माणसाच्या संपर्कात आहोत जो/ जी स्पेन मध्ये जेल मध्ये आहे असं सांगते. त्याची श्रीमंत व्यक्तीची ओळख जाहीर केली तर त्या व्यक्तीला भयानक परिणामांना सामोरे जायला लागेल हे ही सांगते. यात कधीकधी ती व्यक्ती लांबची नातेवाईक आहे, परिचित आहे असंही भासवले जाते. त्या व्यक्तीच्या तुरुंगातून सुटकेस पैसे उभे करण्यासाठी जर तुम्ही मदत केलीत तर नंतर तिच्या संपत्तीतला वाटा आणि संपतीशिवाय काही फायदा जसे... तिच्या सुंदर मुलीशी विवाह इ. आमिष दाखवले जाते. तुम्ही एकदा मदत केलीत की थोडे दिवसांनी, त्याच्या सुटकेत आणखी काही विघ्ने येतात आणि आणखी जास्त पैशांची गरज भासू लागते.
ही फसवणूक तुमच्याकडचे पैसे संपे पर्यंत किंवा तुम्ही पैसे देणे बंद करे पर्यंत चालू रहाते.
यात कुठेतरी ठेवलेली मौल्यवान वस्तू वेअरहाउस मधून सोडवून घेणे, हरवलेल्या सामानात काही मौल्यवान आहे ते एअरपोर्ट वरून सोडवून घ्यायचे आहे, कोणा आफ्रिकन माणसाला कोट्यावधी हवाला करायचे आहेत त्यासाठी इनिशिअल रक्कम भरा, फेसबुक अकौंट हायजॅक करुन सगळ्या फ्रेंडलिस्टला ही व्यक्ती परदेशी अडचणीत आहे पैसे पाठवा मेसेज पाठवणे अशी अनेक व्हेरीएशन आज काल करण्यात येतात.

२. सोन्याची फवारणी करुन खाण आहे भासवणे (सॉल्टिंग/ सॉल्टिंग द माईन): : सोन्याच्या खाणीवर शॉटगन मधून चक्क सोने फवारणे आणि भावी खरेदीदाराला प्रचंड मौल्यवान साठा सापडला आहे असं भासवून पैसे उकळणे. डायमंड होक्स, ब्रेक्स इ. ठिकाणी याचा वापरा केला गेलेला.

३. झाकली मूठ (पिग इन अ पोक/ कॅट इन अ बॅग) : पिशवीत डुक्कर (काही तरी मौल्यवान) आहे सांगून ती विकायची, आणि न उघडताच खरेदी करणारा जेव्हा उघडून बघेल तेव्हा कवडीमोल मांजर (मीटच्या दृष्टीने कवडीमोल, मांजरप्रेमींनी स्वतःला दुखापत करून घेऊ नये) बाहेर पडेल.
letting the cat out of the bag ह्या वाक्पाराचाराचा उगम ह्या हातचलाखीत आहे म्हणतात.
ह्याचा बळी आपण कधी कधी झालोय असं वाटत रहातं.

४. बॅजर गेम: : ही अशी फसवणूक लग्न झालेल्या संसारिक माणसाची केली जाते. समजा 'क्ष' या पुरुषाचे 'य' ह्या स्त्रीशी लग्न झाले आहे. तर त्याला 'ज्ञ' ही स्त्री आपल्या प्रेमात अडकवून विवाहबाह्य संबंधात अडकवते आणि हे 'फ' बघतो, जो 'ज्ञ' चा नवरा/ भाऊ असतो. तो 'क्ष' कडून हे गुप्त ठेवण्यासाठी पैसे मागतो.
यात ज्ञ ही हा संबध जबरदस्ती तून होता सांगून बलात्कार/ विनयभंग इ. आरोप करू शकते. यात समलिंगी संबंध, लहानमुलांबरोबर संबंध,
पॉर्नोग्राफी, समाज 'अ'मान्य पद्धतीने लैंगिक भावनाचा निचरा इ. बदल असू शकतात.
आणखी एक प्रकार म्हणजे आजारी असण्याच्या बहाण्याने डॉक्टरकडे जाऊन फिजिकल चेकप मध्ये डॉक्टरने अतिप्रसंग केला असा बहाणा करणे. लैंगिक भावनाचा वापर न करता, समाजात टॅबू असणाऱ्या गोष्टी जसे दारू पिणे, मांस भक्षण इ. केल्या तर त्या झाकायला ही हा प्रकार वापरला जातो.

५. बोगस लाँड्री बिल पाठवणे: गावातल्या एखाद्या खऱ्या लाँड्रीच्या बिलाच्या अनेक प्रती सगळ्या महागड्या उपहारगृहांना पाठवून तुमच्या वेटरने अंगावर अन्न/ पेयं/ वाईन सांडली त्यामुळे आलेलं हे कपडे धुवायचं बिल भरा असं पत्र पाठवणे. 'थोडक्यात निभावलं' म्हणून अनेक उपहारगृहे हे बिल भरून मोकळे होतात. पत्ता अर्थात मेल बॉक्सचा असतो.

६. आजी/ आजोबांची फसवणूक: आजोबांना नातवाचा/ नातीचा फोन किंवा मेल येतो की तिला दुसऱ्या देशात अटक केली आहे आणि जामिनासाठी पैसे हवे आहेत. आणि तिला हे आई वडिलांपासून लपवून ठेवायचं आहे. मग काय दुधावरची साय विरघळते.

७. भविष्यकथन: अस्पष्ट दावे ऐकले की माणूस ते आपापल्या बकुवा प्रमाणे आपल्याला चिकटवून घेतो. शारीर हालचाली इ. वरून चुकीच्या माहिती वरून पटकन दूर जायचे आणि बरोबर माहिती ठसवत रहायची... की विजय असत्याचाच होतो. भविष्यकथन काही आपल्याला नवीन नाही.

८. थाई मोती (आपण श्रीलंकन मोती, केरळची वेलची, म्हैसूरचे चंदन, आणि कुठली साडी/ रेशीम इ. म्हणू): परदेशी प्रवाश्यांना ड्युटी फ्री मौल्यवान रत्ने दाखवत अनेक दुकानातून हिंडवणे आणि शेवटी आपल्याच दुकानातून साध्यासुध्या गोष्टी भरमसाठ भावात विकणे. यात अनेक स्तरांत अख्खीच्या अख्खी इंडस्ट्रीही सामील असते.

९. मेरे पिया रहे रंगून (रोमान्स स्कॅम) : ऑनलाईन डेटिंग इ. च्या माध्यमातून रोमँटिक संबंध प्रस्थापित करून मग भेटायचं आहे पण तिकिटाला पैसे मागणे. अर्थात पैसे मागण्यासाठी अनेकविध कारणे सांगता येतात. किंवा पैसे न मागता एनकॅश न होणारे चेक्स पाठवणे आणि पैसे रेमिट करायला सांगणे.

१०. वैयक्तिक माहिती जमा करणे: पे-डे लोन, किंवा इतर लोन देतो म्हणून ग्राहकांकडून माहिती मागवणे आणि नाव, पत्ता, वाहन चालक परवाना इ. माहिती मिळाली की टी विकणे ज्यातून आयडेंटिटीची चोरी करुन त्याच्या नावावर लोन घेणे, खोटी कर भरल्याची पत्रे सरकारला देऊन सोशल सिक्युरिटी इ. चे पैसे घेणे इ.

११.विमा घोटाळा : मुद्दाम वाहनाचा अपघात घडवून आणणे. जसे हा बदमाश सावजापुढे वाहत्या रस्त्यात आपली गाडी आणतो आणि त्याचा दुसरा साथीदार त्या बदमाशाच्यापुढे गाडी आणतो. आता अपघात वाचवण्यासाठी ती बदमाश व्यक्ती अचानक ब्रेक दाबतो. साथीदार वेगात पुढे जातो पण मागून सावज त्या बदमाशाच्या गाडीवर आपटतो. मग इंश्युरंस कंपनीला अवतीर्ण व्हावेच लागते आणि केस आणि खर्च वाचवण्यासाठी कितीही खोटी केस वाटली तरी ती कॉनला पैसे देऊन मोकळी होते.

१२. फिडल गेम : याच्यात दोन व्यक्ती सामील असतात. एक गबाळ्या कपड्यात भारी उपहारगृहात खायला जातो. खाऊन झाल्यावर पैशाचं पाकीट तपासतो तर ते घरी राहिलेलं असतं. मग त्याच्या जवळची कुठली तरी मौल्यवान वस्तू जसं व्हायोलीन इ. तारण ठेऊन घरी पैसे आणायला जातो. तो गेल्यावर दुसरा तिकडे येतो आणि काही अचाट रक्कम देऊन ते फिडल खरेदी करू इच्छितो. पण मग तेवढ्यात त्याला एक फोन येतो आणि तो आपलं कार्ड आणि नंबर देऊन जातो.
थोड्यावेळाने पहिला फाटका माणूस पैसे घेऊन आपलं व्हायोलीन परत न्यायला येतो. पण रेस्टॉरंट ओनर त्या दुसऱ्या व्यक्तीची ऑफर आहे समजून ते जास्त पैशात विकत घ्यायला त्याला पटवतो. नाखुशीनेच फाटका माणूस ते विकायला तयार होतो. रेस्टॉरंट ओनरला आता फायदा होणार वाटते, पण तो दुसरा कधी उगवतच नाही.

इंटरनेट वापरून अजून अनेक प्रकारे फसवणुकीचे सापळे लावलेले सापडतील. वेळ मिळाला की त्यावर लिहितो. तुम्हाला आणखी माहिती असतील तर लिहा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगात स्वतःचा फायदा न करता दुसऱ्याचा फायदा करणारी व्यक्ती जन्माला यायची आहे. काही फार चांगलं होणार असं कोणी सांगत असेल तर ते नक्कीच खोटं आहे असं मानून शहानिशा करा. >>+१११

संमोहन करून दागिने लंपास करणे हे एके काळी फार कॉमन होते. संमोहन हे एक शास्त्र आहे. त्यात कोण किती तरबेज आहे हे आलेच, तसेच ज्याची विल पॉवर स्ट्रॉंग असते ते लोकं सहजी संमोहनाला बळीही पडत नाहीत. पूर्वी ज्या बायका हाऊसवाईफ असायच्या त्या बळी पडणे सोपे असावे. आमच्या आईआज्जींनीही याचे बरेच किस्से सांगितले आहेत.

मला एकदा फ्रॉड कॉल आलेला. माझ्या पॉलिसीचा वार्षिक ८८ हजाराचा प्रिमियम मी दहा दिवस आधीच भरला तर मला ८ हजार कन्सेशन मिळून तो फक्त ८० हजार भरावा लागणार होता. आणि हा कॉल ११ दिवस आधी आला. म्हणजे फक्त एकच दिवस शिल्लक. मी देखील कामाच्या नादातच त्यांचे बॅंक डिटेल्स टिपून घेतले आणि नंतर बघूया म्हणून विसरलो. नंतर तासाभराने पुन्हा कॉल आला तेव्हा मला संशय आला. मी माझ्या एजंटला कॉल केला. तो बोल्ला असे काही नाही. मग पुन्हा तासाभराने तिसर्‍यांदा कॉल आला तेव्हा मी उलटतपासणीला सुरुवात करताच फाफलले. विचार करतोय की जर वेड्यासारखे घाईत ८० हजार भरून मोकळा झालो असतो तर नंतर खरंच येडाच झालो असतो.

एक तो टाटा कंपनीच्या नोकरीचा आणि त्यासाठी डिपॉजिट ४-५ हजार भरायचाही कॉल कॉमन आहे. मला आणि माझ्या गर्लफ्रेंडला दोघांनाही अनुभव आला आहे. माझ्या गर्लफ्रेंडने तर सिरीअस होत मला विचारलेलेही, काय करू? मी तिच्याकडून त्यांचा मेल घेतला. गूगल केले. तर धडाधड त्या फ्रॉडचे डिटेल्स समोर आले. गर्लफ्रेंडला लागलीच कळवले. थोडे ईम्प्रेशन आणखी वाढले Happy

प्लिज इथेच थांबा, >>> +७८६

अजून एक प्रकार म्हणजे तुमचाच ओटीपी आपला आहे म्हणून मागणे.
तुम्हाला एक कॉल येतो - हेलो सर मला अमुकतमुक ठिकाणी रजिस्टर करायचे होते. पण चुकून मी तुमचा नंबर वा मेल आयडी दिला. कारण त्यात साम्य होते. आता तुम्हाला त्यावर एक ओटीपी - वन टाईम पासवर्ड आला असेल. तर तो प्लीज मला अर्जंट कळवाल का? हे अमुकतमुक आताच होणे गरजेचे आहे.

हे माझ्या मित्राशी घडले आहे. अर्थात तो सावध असल्याने आणि त्याला याची कल्पना असल्याने फसला नाही.

छान धागा... यात ते चेन बिझिनेसवाले बसतात का??? खूप लोकांनी पिळायचा प्रयत्न केलाय, पण कधीच बधलो नाही... उलट तुम्हीच माझे भरा, मी नंतर देतो असं म्हणताच, पलटी मारलेली लोकांनी... दुर्दैवाने यात अगदी जवळचे लोक आपल्याला खेचू पहायचे, आणि त्यांना नाही म्हणणं अवघड व्हायचं, पण तरीही नाहीच घेतला कशात भाग...

मस्त आहे धागा

"सर!!! मै क्ष NGO से सना बोल रही हुं....."मधाळ आवाजात एक कोणी चिरकली बरं पत्ता नागपाड्यातला.
कितीदा नाही म्हणायच. मग माझ्या मित्राने सांगितलेली क्लुप्ती केली.
"सर!!! आपने बोला था के...."
"क्ष NGO से सना ना?"
"हां हां सर आप...."
" अभि अभि मैने १५०० दे दिये रामशरण आया था डोंबिवलीसे"
इतका आनंद झाला
"क्याsssssssss!!!!!!!!"

अज्ञानामुळे फसवले गेलेल्यांबद्दल सहानुभुती वाटते पण लोभामुळे फसवले गेलेल्यांबद्दल नाही.

काही केरळी लोक येतात व दुकान सुरु करतात. अगदी साधी स्कीम. १/३ पैसे आज भरा व तीन महिन्याने वस्तू घेऊन जा. सुरुवातीला स्वस्त वस्तू देतात व विश्वास संपादन करतात. पोलिसही तक्रार नसल्याने काही करू शकत नाहीत. मग एक दिवशी अचानक गायब होतात.

मी भारतात गेलो तर एका परिचिताने वेगळीच योजना संगितली. फार पूर्वी अफ्रिकेत गेलेला एक भारतीय माणूस करोडोची संपत्ती मागे ठेवून गेला. त्याला मूलबाळ नाही. त्याचा एक पुतण्या भारतात आहे व ती संपत्ती तो आणणार आहे. पण ती आणण्यासाठी आर बी आय चे अधिकारी, अर्थखात्यातले अधिकारी वगैरे लोकांना लाच द्यावी लागणार आहे. काही लोक प्रत्येकी दहा लाख (!) रुपये जमा करून हे करणार आहेत. एकदा पैसे आले की दहा लाखाच्या बदल्यत एक करोड मिळणार ! मलाही गळ घालत होत, शेवटे "ज्याचे करावे भले तो म्हणे माझेच खरे" असा तुच्छ कटाक्ष टाकून परत गेला.

बाप रे! किती प्रकार!
फसगत करून घेणारे आहेत, म्हणून फसवणारे आहेत.

Curb painting scam
A flyer will be put on your house that the 'city' is going to paint house numbers on your street. Then someone will come and paint your house number on your curb without your permission. Then they will extort you by DEMANDING payment.
http://boredomtherapy.com/curb-painting-scam/
So far I have encountered the curb painting, dent repair AND electricity bill scammers. These things are becoming way too common. Watch out!

छान धागा.
पाय, तुम्ही दिलेली फसवणुक आहे हे आत्ता कळले. आम्हाला पण असे पत्र आले व १५$ पाकिटात घालून घराबाहेर ठेवा असे लिहीले होते. आमच्या घरी रात्री लोक आले के त्यांना घरच सापडायचे नाही. त्यामुळे आम्ही करुन घेतले. बरीच वर्षे झाली. नम्बर अजुनही व्यवस्थीत आहेत व नशिबाने पोलिसानी वगैरे कोणी हरकत घेतली नाही.

बापरे ... केवढी ही जाळी...

आम्ही विजबिल कमी करून देतो या जाळ्यात मी अडकले होते. आम्ही नवीन रहायला आलो होतो एका कम्युनिटीमधे. तिथे बर्ञाचदा पीएसईजीवाले आहोत असं सांगून लोकं यायचे... एकदा अशीच एक मुलगी आली लाईट बील बघायला मागितलं. म्हटली कमी यायला लागेल, कसलं काय, डबल बील पुढच्या महिन्यापासून... १ तास कस्टमर केअरशी बोलल्यावर ठिक झालं ते.

Curb painting scam << हे कळल नाही. पेन्टिंसाठी दिलेल्या पैश्या शिवायही काही नुकसान होते का? आमच्याकडे सगळीकडे कर्ब पेन्टीग नंबरच घर ओळखायला वापरले जाते. असे फ्लायर्स बघितल्याचे आठवते पण कधीही पैसे मागायला कोणी आले नाहीये.
The only part of the letter that seemed legitimate was: “[Curb painting] is an important service as the police, fire department, and paramedics look at the curbs first for your address.” << हे जर खर आहे तर सिटीनेच करायला पाहिजे अशी पेन्टीग.

पण घरावर नंबर असतोच की! कर्बवर असेल तर एक सेकंद लवकर कळेल फक्त.
बाकी ९११ वाल्यांकडे त्यांचेही मॅप्स असतात.

गाडि चालवताना घरावरचे नबर दिसत नाहीत काहिवेळा , कर्ब वरचे दिसु शकतात,कॅलिलाच बघितले कर्ब वर हाउस नबर, आमच्या टाउन मधे नव्हते कर्बवर नबर मेलबॉक्स वर बघुन्च कळत.

( भारतात ) सध्या मोबाइल टॉवर साठी जा गा / घराचे छत भाड्याने द्या आणि भरपुर उत्पन्न मिळवा.
त्या साठी करार खर्च आधी द्या इ.
अजुन एक रोज १००० ते १०००० कमवा मित्र मैत्रिणी बनवुन .
आणि हा चेहरा / डोळे ओळखा आणि जिंका.
सर्रास चांगल्या न्युज पेपरला येतात अश्या जाहिराती
फक्त अधार कार्ड दाखवा अन लोन घ्या तुमचा डी डी तयार आहे काही रक्कम पाठवा आणि लोन रक्कम खात्यात जमा.

सारांश ... सावध रहा. (टाइप ल मराठी एकदाच) Happy

मेल बॉक्स आणि घरावरचे नंबर्स शोधावे लागतात. कुठे असायला पाहिजे ह्याबद्दल काही स्टॅन्डर्ड नाहीये. (बे एरियात तरी ) पण कर्बचे त्यामानाने पटकन दिसतात.
अजुन एक स्कॅम बघितला आहे रिफायनान्स साठीचा. त्यांच्याकडे तुमचा अगदी लेटेस्ट लोन चा आकडा असतो, महिन्याला ईन्टॉलमेन्ट किती देता ते ही माहीत असत. मग त्या हप्त्या पेक्ष्या ८/९ शे ने कमी असलेला आकडा देउ करतात. पुढे कसे लुबाडतात माहीत नाही पण असे भरपुर मेल्स बघितले आहेत.

गेल्याच आठवड्यात सिक्रेट सर्व्हिसने क्रेडिट कार्ड विषयी एक वॉर्निंग दिली आहे. यात चिप असलेली डेबिट/ क्रेडिट कार्ड टार्गेट केली जातात, मेनली मोठ्या कंपन्यांची.
http://philadelphia.cbslocal.com/2018/04/06/secret-service-credit-card-c...
मोठ्या कंपन्यांना फायनान्शिअल इन्स्टिट्यूट कडून येणाऱ्या मेल इंटरसेप्ट करून कार्ड वरची चिप काढली जाते आणि जुनी/ वापरातून गेलेली चिप बसवली जाते. योग्य तापमानाला चिप चिकटवायला वापरलेला गोंद वितळतो आणि चिप निघते. आता ते कार्ड परत मेल मधून तुमच्याकडे येतं. तुम्ही ते कार्ड वापरण्यासाठी आधी फोन करून activate करता. एकदा का ते कार्ड activate झालं की तुमची चिप चुकीची असल्याने तुमचं कार्ड चालत नाही पण मिडल मॅन कडे योग्य चिप असल्याने त्याला ते कार्ड वापरता येते आणि तो/ती रक्कम काढून घेते.
पोस्टांतून ते कार्ड तुमच्या आधी तिसऱ्याव्यक्तीच्या हाती कसं पडतं ते कोडं आहे, पण युएसपीएस मधील लागेबांधे वापरलेले असू शकतात. कार्ड हाती पडलं तरी ते activate होई पर्यंत त्याला काही करता येत नाही त्यामुळे ते तुमच्या पर्यंत येते, आणि मगच तुम्ही फसवले जाता.

जगात कुठे वापरत नाहीत अशी पद्धत अमेरिकेत चिप कार्डवाले (क्रेडिट कार्ड वाले तरी सर्रास)वापरतात. चिप कार्ड असतं पण पासवर्ड टाईप करायला लागतंच नाही! अचाट!
अगेन मॅन इन द मिडलचा टेक्स्टबुक नमुना आहे.

IRS scam चा फोन माझ्या घरी दोनदा आलाय. गम्मत म्हणजे माहीत असूनही फसतात. गेल्या वर्षी नवऱ्याला आला. त्याने मला ऑफिसमध्ये कॉल करून सांगितलं 'I am getting arrested'. मला काहीच कळेना, कॉन्फरेन्स मधून बाहेर आले आणि त्याला सांगितलं सविस्तर बोल. त्याने सांगायला सुरुवात केल्यावर म्हटलं अरे गेल्या आठवड्यातच बोललो ना आपण ह्या विषयावर. मग त्याची ट्युब पेटली. ह्या वर्षी मुलासोबत झालं. कॅम्पस वर. त्याला आधी काही कळल नाही. पण समोरच्याने apple स्टोर मध्ये पैसे घेऊन ये सांगितलयावर त्याला आठवलं आईने वॉर्निंग दिलेली. पण जाम घाबरला होता. त्याला सांगितलं कॅम्पस वर कोणी अनोळखी माणूस तुझी चौकशी करायला लागलं तर नाव सांगायचं नाही. तसाच कॅम्पस security कडे पाठवलं होत. त्यांनी त्याला डायरेक्ट नंबर दिला security चा आणि परत काही झाल्यास ताबडतोब कॉल करायला सांगितलं.

विमा घोटाळा - अनुभव आहे. आमच्या कंपनीत एका माणसाने डिसॅबिलिटी उकळली एक वर्ष असा करून. सगळ्यांना माहीत होत तो खोट बोलतोय. पण डॉक्टर cetificate देत असल्याने काहीच करता आलं नाही

आणखी एक स्क्याम -
स्पिरिट एरलाईन्स ने ट्रॅव्हल करत असाल, स्वस्त तिकिट मिळते आणि ऑफर असते की रिबेट मिळेल पण अमुक अमुक क्लब ( shopper club ) चा मेंबर व्हावा लागेल, 1 मंथ मध्ये कॅन्सल करू शकता मग काहीच चार्ज नाही करणार, कार्ड डिटेल्स देणे जरूरी असते.
लोक विसरतात मेम्बरशीप कॅन्सल करायला, किंवा कॉल करतात कॅन्सल करायला तरी ते चार्ज करत राहतात.
एखाद्या दिवशी चुकून आपण क्रेडिट कार्ड ऍक्टिव्हिटी बघतो आणि कळते की हे चार्ज करत आहेत दर मंथ, मग आपण कॉल करतो त्यांना ते म्हणतात तुम्ही कॅन्सल केलीच नाही, आपण भांडतो मग ते म्हणतात मॅक्स 6 मंथ रेफंड देऊ बाकी नाही... तुम्ही गपचूप accept करता.

<<< अज्ञानामुळे फसवले गेलेल्यांबद्दल सहानुभुती वाटते पण लोभामुळे फसवले गेलेल्यांबद्दल नाही. >>>
सहमत. म्हणूनच बर्नी मेडॉफच्या स्कीममध्ये पैसे बुडले त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही.

<<< कारब वरच्या नंबर आधी मेलबॉक्स वरचा नुम्बर दिसतोच की.
कोण खाली बघून नुम्बर शोधणार? >>>
प्रत्येक घरासमोर मेलबॉक्स नसतो.
कर्बवरचा नंबर न्यूजपेपर, पिझ्झा डिलिवरीसाठी सोईस्कर पडतो.

<<< डॉक्टर cetificate देत असल्याने काहीच करता आलं नाही >>>
सिद्ध करता आलं नाही तर ती फसवणूक नाही. विषय संपला.

<<< लोक विसरतात मेम्बरशीप कॅन्सल करायला >>>
यात फसवणूक कसली? हा तर मूर्खपणा आहे.

रविवारच्या मुंबई मिरर का मिड डे मध्ये बिट कॉइन स्कॅमची पूर्ण माहिती आली आहे ही पण टिपिकल पिरॅमिड स्कीम सारखी चालवली पण बिट कॉइन क्रॅश झाल्याने गळपटले. व्हेरी मनोरंजक रीड. पीपल आर सो स्टुपीड.

गाडि चालवताना घरावरचे नबर दिसत नाहीत काहिवेळा , कर्ब वरचे दिसु शकतात>>>>>
कर्ब म्हणजे रस्ता आणि फुटपाथ वेगळे करणारी सिमेंट ब्लॉकची पट्टी का?

आपल्या भारतात अशी 'कर्ब' वर घर क्रमांक लिहिण्याची पद्धत असती तरीही त्याचा काहीच उपयोग झाला नसता! नंबर लिहिल्यावर काही तासातच लोकांनी त्यावर पिचकाऱ्या मारून नंबर दिसणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली असती!!!
(अवांतराबद्दल क्षमस्व!)

बरोबर, आमच्या राज्यात पत्रपेटी लांब असते जरा. आणि घरावरचे नम्बरची रंगसंगती नम्बर ठळकपणे दिसेल अशी नसते. रात्री तर फारच त्रासदायक , गाडी १ च्या वेगात असेल तरी दिसत नाही. काधीकधी बाहेरचा बल्ब जातो, घरासमोरील मोठ्या झाडाने नम्बर झाकला जातो. त्यामुळे रात्री अंधारातही ठळकपणे दिसणारे कर्बवरचे नंबर खुप उपयोगी आहेत.

काही वर्षापुर्वी, १ वर्ष फुकट एच्बिओ देतो असे सांगुन आमच्या टीव्हीवर ते चालुही करुन दिले व आता पैसे एमोनी वालमार्ट मधुन पाठवा सांगितले. चॅनल दिसू लागल्यावर वाटले खरे असेल. कारण डिशच्या अशा ऑफर्स अधुनमधुन असत. मात्र वालमार्टला आधी विचारले तर ते म्हणाले , नका पाठवू. मग डीशला फोन केल्यावर ते म्हणाले, अशी स्किम नाहीये व तुमच्या नावाने कोणीतरी डिश वेबसाईटवर खाते चालू केले आहे. व त्या द्वारे काहीतरी युक्ती करुन तुमच्या टीव्हीवर चॅनल दिसत आहे.
हा पहिला अनुभव होता, तेव्हापासुन कोणतीही ऑफरचा फोन , खरा असेल तरी बंद करतो.

गंमत म्हणजे, ज्या माणसाने हा फोन केला त्याने नंतर ३-४ वेळा फोन करुन मेसेज सोडला की लवकर पैसे पाठवा.
त्याहुन दुसरी गंमत अशी की महिनाभरात अजुन एक मेसेज फोनवर की, तुमचा आयआरएसचा मोठा प्रॉब्लेम आहे, पोलिसापर्यंत जाईल तर या नम्बरवर फोन करा वगैरे... आणि गेस व्हाट.... तो ‘तोच’ आवाज होता, डीशची भानगड वाला.

Pages