डॉ राणी व डॉ अभय बंग ह्यांना उद्देशून

Submitted by विग५० on 2 April, 2018 - 01:33

डॉ राणी व डॉ अभय बंग ह्यांना उद्देशून

तुम्हाला भारत सरकार तर्फे पद्मश्री मिळाली ह्याचा नागपूर मेडिकल च्या आम्हा सर्व मित्रांना खूपच आनंद झाला. आम्हा सर्वांना तुमचा दोघांचा अतिशय अभिमान वाटतो.

तुमच्या दोघांच्या कार्याचे काय वर्णन करणार ? सगळ्या जगाने त्या कार्याचे कौतुक केले आहे, दखल घेतली आहे. तुम्हाला भारत सरकार तर्फे कधी पद्म पुरस्कार मिळतो ह्याची महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिकाला उत्सुकता लागलेली होती. तो पुरस्कार जाहीर झाल्यानंतर प्रत्येकाला कृतकृत्य झाल्याचे समाधान झाले असेल. एखाद्याला पद्म पुरस्कार मिळाल्यानंतर, सर्व सुजाण नागरिकांना, येव्हढे समाधान क्वचितच ह्यापूर्वी लाभले असेल.

तुमच्या जीवनाची यशोगाथा ही जणू काही एक दंतकथा झाली आहे. पुढील पिढ्यांचा ह्यावर विश्वासच बसणार नाही. ध्येय्याने झपाटलेले एक राजस जोडपे काय उत्तुंग कार्य करू शकते ह्याचा तुम्हा दोघांनी संपूर्ण जगताला आणि विशेषतः महाराष्ट्राला एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे. एव्हढी अफाट बुद्धिमत्ता, एव्हढे उत्तुंग कर्तृत्व आणि एव्हढी अथांग करूणा क्वचितच एकत्र आलेली असेल. आम्ही सर्व सहाध्यायी, आणि संपूर्ण महाराष्ट्र ह्याकडे एक ईश्वरी देणे असे म्हणून विस्मयचकित होऊन बघत असतो. तुमच्या भाग्याचा कोणीच हेवा करू शकणार नाही. त्या मागे तुम्ही केव्हढे कष्ट उपसलेले आहे, केव्हढा त्रास सहन केला आहे, केव्हढ्या हालअपेष्ठा भोगलेल्या आहे, केव्हढ्या संकटांना तोंड द्यावे लागलेले आहे ह्याची आम्हा सर्वांना चांगलीच कल्पना आहे.

बाबा आमटे ह्यांनी एक कवितेत म्हटले आहे.
अशी सृजनशील साहसे हवी आहेत
की जी बीजे पेरून वाट बघू शकतील
जी भान ठेऊन योजना आखतील
अन बेभान होऊन त्या अंमलात आणतील.
हवे आहेत विज्ञान गरुडाच्या महापंखांनी
वाहून आणलेले लक्ष लक्ष अमृतकुंभ

तुम्ही ही कविता अक्षरश: जगलात. गडचिरोली सारख्या महाराष्ट्राच्या काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जंगलात तुम्ही आयुष्यभर स्वतःला गाडून घेतले. सर्व ऐहिक सुखांचा त्याग केला. आणि तेथल्या आदिवासिंसाठी लक्ष लक्ष अमृतकुंभ वाहून आणले. सर्व तरुणांसमोर आदर्श समाजसेवेचे एक प्रारूप ठेवले. गडचिरोलीची तुमची सर्च ही संस्था आता सर्व भारत वासियांसाठी एक तीर्थक्षेत्र झालेली आहे.

एव्हढे सगळे यश, नांव, कीर्ती मिळाल्यानंतर सुद्धा तुम्हा दोघांचे वागणे हे अतिशय नम्र आहे. कोठलाही बडेजाव नाही, कोठलाही गर्व नाही, मोठेपणाचा कसलाही आव नाही. अतिशय down to earth असे तुमचे वागणे असते. त्यामुळे प्रत्येकाला तुम्ही दोघे अगदी जवळचे मित्र वाटता. तुमच्या आदर्श सहजीवनाचा मात्र प्रत्येकाला हेवा वाटत असेल. प्रत्येकाच्या utopia मध्ये असे सहजीवनाचे स्वप्न असते. ते तुम्ही प्रत्यक्ष पृथ्वीवर उपभोगलेले आहे.

आपल्या पिढीतल्या कोणीच महात्मा गांधींना बघितलेले नाही. मागच्या पिढीतल्या ज्या ज्या व्यक्तीला गांधीजींचा सहवास लाभला त्या प्रत्येकाने म्हटले आहे की केव्हढे आमचे भाग्य की आम्हाला गांधीजींचा परीसस्पर्श लाभला. आमचे जीवन उजळून निघाले. आम्हाला सुद्धा तसेच वाटते. तुम्हा दोघांचा सहवास आम्हा सर्व सहाध्यायांना लाभला हे केव्हढे आमचे भाग्य. तुमच्या स्वरुपात आपण गांधींच्या जवळ वावरलो असा अनुभव आम्हा प्रत्येकाला ( आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना ) नेहमी येत राहील .

गांधींच्या बाबतीत आईनस्टाईन ने लिहिलेले एक वाक्य आठवते.

“ Generations to come, it may well be will scarce believe that such a man as this one ever in flesh and blood walked upon this earth.”

तुमच्या दोघांच्याही बाबतीत आम्हालाही हेच म्हणायचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यांच्या कार्याला प्रणाम. हि खरी मोठी माणसं!

गडचिरोली सारख्या अतिदुर्गम भागात तिथल्या कुपोषित मुलांसाठी, आदिवासींच्या आरोग्यासाठी आणि तेथील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आयुष्य झोकून देऊन एक ध्यास घेऊन अविरत कार्यरत राहणे यासाठी खूप मोठा जिगर लागतो.

या लेखात महात्मा गांधींचा अगदी उचित उल्लेख आला आहे. डॉ. अभय बंग यांचे वडील ठाकूरदास बंग हे महात्मा गांधींच्या सर्वोदय श्रमदान चळवळीशी जोडलेले होते. अर्थातच ते गांधीवादी होते. अर्थशास्त्रातील डॉक्टरेट मिळवण्यासाठी ते अमेरिकेला जाणार होते. तत्पूर्वी महात्मा गांधीचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून ते त्यांना भेटावयास गेले. गांधीजीनी त्यांच्याकडे क्षणभर पाहिले आणि एकच वाक्य बोलले,

"तरुण माणसा, अर्थशास्त्रातला अभ्यास करायचा असेल तर अमेरिकेला नव्हे, भारतातील दुर्गम खेड्यापाड्यात जा"

झाले. केवळ त्या एका वाक्यावर ठाकूरदासजीनी अमेरिकेला जायचा बेत तिथल्या तिथे रद्द केला आणि त्यांनी दुर्गम भागात खेड्यापाड्यात जाऊन तेथील व्यवस्था आणि जीवनमान कसे उंचावेल यासाठी प्रयत्न आणि अभ्यास सुरु केला. डॉ. अभय बंग यांचे बालपण महात्मा गांधींच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात गेले. त्या संस्कारक्षम वातावरणात त्यांचा पिंड घडला.

पुढे जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांनी शोधलेल्या उपचारपद्धतीचा भारतभर आणि आफ्रिकेच्या काही भागात अवलंब केला.

विग५०, खूप छान लेख.
पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. अभय बन्ग आणि डॉ. राणी बन्ग यान्चे अभिनन्दन.

या निमित्ताने २०१३ साली एका स्पर्धेसाठी मी इथेच लिहीलेल्या एका लेखाची लिंक देत आहे.

https://www.maayboli.com/node/44790