भिल्ल भारत

Submitted by Rituparna on 2 April, 2018 - 05:45

काळाच्या कसोटीला पुरून उरणारी कलाकृती म्हणून आज महाभारताचा उल्लेख करू शकतो. मानवी स्वभावाचे अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे आपल्याला महाभारतात आढळून येतात. प्रत्येक संस्कृतीने महाभारताकडे स्वतःच्या दृष्टिकोनातून पाहिले आहे. या कॅलिडोस्कोप ने प्रत्येकाला वेगळे आकार वेगळे रंग दाखवले. असाच एक वेगळा रंग मला दिसला तो भिल्ल भारतामध्ये. हे महाभारत ज्याला रूढार्थाने आदिवासी म्हणता येईल अश्या आदिम संस्कृतीमध्ये स्वतःचा वेगळा बाज धरून उभे राहिले आहे. मुळात आदिवासी समाज हा कैक पटीने आपल्या सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या समाज पेक्षाही सुसंस्कृत आहे. काही मोजके अपवाद वगळता मातृसत्ताक असलेली हि संस्कृती प्रामुख्याने स्त्रीप्रधान म्हणजेच स्त्रीला प्रमुख स्थान देत वाटचाल करत आहेत. समाजातील स्त्रियांच्या आवडी निवडीला प्राधान्य देणारा समाज म्हणून आदिवासी जमातीकडे बोट दाखवता येईल. भिल्ल भारताच्या स्त्रिया देखील त्याला अपवाद नाहीत. या महाभारतातली द्रौपदी हि मूळ द्रौपदी पेक्षा जास्त खंबीर आणि आत्मकेंद्रित आहे. त्या द्रौपदीचीच हि काहीशी अज्ञात कथा.

या कथेतली द्रौपदी हि मूळ कथेप्रमाणे पांडवांची सेवा करणारी बायको नसून एक ठाम राणी आहे. सोबतीला दासींचा लवाजमा ठेवून स्वतःची सेवा करवून घेणारी एक पट्टराणी. या दासींचं प्रमुख काम म्हणजे सतत आपल्या महाराणींचा साज शृंगार करत राहणे. द्रौपदी झोपलेली असताना तिचे केस विंचरण्याचे काम त्या इमाने इतबारे करत. अशाच एका वेळी काहीश्या धसमुसळेपणामुळे द्रौपदी चा एक केस तुटून जातो. घाबरलेली दासी तो सुवर्णपेक्षा तेजस्वी असा केस खिडकीवर ठेवून देते, जेणेकरून वारा तो उडवून लावेल आणि मालकिणीच्या दृष्टीमध्ये तिचा निष्काळजीपणा येणार नाही. लबाड वारा तो केस खोल पाताळात फेकून देतो. नेमका तो केस पडतो पाताळात निद्रा घेत असलेल्या शेषनाग अर्थात वासुकीवर. इतका तेजस्वी केस पाहूनच तो शेष द्रौपदी वर मोहित होऊन तिच्या मागावर येतो. शेषाला आपल्या दारात पाहून द्रौपदी त्याच्याकडे आकर्षित होते. दोघांचा प्रणय सुरु असताना अर्जुन यायची वेळ होते. ती शेषाला परोपरीने तिथून जायची विनंती करते. पण पुरुषार्थाचं प्रतीक असा शेष तिथून जाण्यास नकार देतो. अर्जुनाच्याच केसांनी त्याला त्याच्याच पलंगाशी बांधून तो त्याची मानखंडना करतो. द्रौपदी कडून तो आपली सेवा करून घेतो. तिच्या हातून सुग्रास भोजन चवीने खातो. तिच्याकडून आपले अंग दाबून घेतो आणि अर्जुनाच्याच समोर द्रौपदी चा उपभोग घेतो.

हि झाली कथेची एक बाजू. पण मुळातच भिरभिरणाऱ्या वाऱ्याप्रमाणे स्वछंद असलेली हि संस्कृती तिथल्या लोकगीतांमध्ये असे काही रंग भरते कि लाजेकाजेच्या कोशात गुरफटलेल्या आपल्या समाजाला घेरी यावी. एका आदिवासी लोकगीतानुसार अर्जुनाने सुभद्रेला पळवून आणल्यामुळे झालेल्या अपमानाने द्रौपदी भयंकर क्रोधीत झाली आहे. स्त्रीला पळवून आणण्यामध्ये पुरुषार्थ समजणाऱ्या अर्जुनातल्या क्षत्रियत्वाला ती आता त्याच भाषेत प्रत्युत्तर करणार आहे. वाऱ्याला आपल्या कटात सामील करून तीच आपल्या तेजस्वी केसांचा मोह शेषाला पडेल अशी व्यवस्था करते. कामविव्हळ असा शेष जेव्हा तिच्याकडे प्रणय सुखाची मागणी करतो तेव्हा ती त्याचाही पुरुषार्थ डिवचते. रागाने पेटून उठलेला शेष मग चिडून तिच्या समोर अर्जुनाला बांधून हतबल करून टाकतो. अर्जुनाच्या डोळ्यादेखत तो तिचा उपभोग घेतो खरा पण अपमानाच्या आगीत धगधगत असलेल्या द्रौपदी च्या खेळातला तो निव्वळ एक प्यादा आहे.

अर्जुनाची निर्भत्सना करून शेष निघून जातो. पण त्याचे भोग इतक्यात चुकलेले नाहीत. इथून पुढे आपल्याला दिसते ती एक धूर्त अशी राजकारणी महाराणी. अर्जुनाच्या पुढे ती शेषासमोर हतबल झाल्याची भाषा करते. हताश अर्जुन देखील तिच्यापुढे असहाय बनून तिलाच एखादा उपाय सुचवण्याची विनंती करतो. द्रौपदी चा सूड आत्ता कुठे अर्धवट पूर्ण झालाय. तिला आता शेषाचा काटा तर काढायचाच आहे पण या प्रसंगाचा उपयोग करून अर्जुनाने तिचा गैरवापर करू नये याचा देखील बंदोबस्त तिला आता करायचा आहे. निष्क्रिय अशा अर्जुनाला ती कर्णाची मदत घेण्यास सुचवते. अर्जुन आता दुबळ्या पेक्षा दुबळा आहे. स्वतःची लाज वाचवण्याकरता त्याला आता यःकश्चित अश्या सुतपुत्राची मदत घायला लागणार आहे.

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग!!
बरेच कांड केलेत की द्रौपदीने. >>> + १११

फक्त जरा मोठे भाग टाका

हे प्रत्येक संस्कृतीने आपल्या मूल्यांचे/भावनांचे त्या काव्यवर/प्रोटोगोनिस्ट वर केलेले आरोपण आहे असे मला वाटते. (आपल्या कडे क्वचित जसा गणपती गांधी टोपी आणि झब्बा घालून, किंवा स्वामींनारायण संघाचा गणवेश घालून दिसतो तसेच.)

तेव्हा लोककथांवरून कोणाचे चारित्र्य जोखु नये. (आणि काव्यातल्या लोकांचे तर अजिबातच जोखु नये ;))

चारीत्र्य कुठे जोखलंय???
ह्याचा सुड घ्यायला त्याला नकळत उद्युक्त करणं, मग त्याचा सुड घ्यायला आणि तिसर्‍याला अशा ३-४ कथा ऐकल्यात द्रौपदीबद्दल.
म्हणुन कांड केलीत असं लिहिलंय.
तुम्ही कांडचा काय अर्थ घेतलात सिम्बा?? Happy

इंटरेस्टिंग.
महाभारताच्या जनसामान्यांत प्रचलित असलेल्या आवृत्तीत शेष हा बलरामाच्या रूपात/अवतारात आहे ना?
हरीविजयात तसं आहे.

हो भरत

मी ही तसेच ऐकले आहे

रच्याकने, मलाही सस्मित ने लिहिलेले ते कांड म्हणजे उचापती सारखे वाटले
म्हणूनच मीही अनुमोदन दिले त्याला

ही कथा नव्हती ऐकलेली कधी. इन्टरेस्टिंग. जुन्या आख्यायिकांना आताचे नीती-अनीतीचे नियम लावता येत नाहीत.
शेष हा बलरामाच्या रूपात >> हे माहित होते. पाताळातून शेष नाग आला यापेक्षा ते बिलिव्हेबल ही वाटते ( अर्थात आधुनिक समाजाच्या नितिमत्तेच्या कल्पनेप्रमाणे ट्विस्टेडच )