फुलून आले जीवन

Submitted by निशिकांत on 23 March, 2018 - 00:22

फुलून आले जीवन---( परवा कवितादिनाच्या निमित्ताने अट्टहासाने कविता लिहिण्यास बसलो; मनात कोणताही विषय नसताना. शेवटी बर्‍याच प्रयत्नानंतर ही बंडखोर धाटणीची कविता तयार झाली. )

कधी न गोंजारले तयाला, तरी बरसला सावन
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

दु:ख, वेदना कडून शिकलो तंत्र मंत्र जगण्याचे
उन्हानेच तर स्वप्न पाडले सावलीत बसण्याचे
सहवासाच्या सुखास असते विरह नेहमी कारण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

मनी मनसुबे कधीच नव्हते, भव्य दिव्य जगण्याचे
मीच शिकविले मला संकटी धडे मस्त हसण्याचे
नाही केले मी दु:खांच्या गाथेचे पारायण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

एकलव्य मी मला घडविले, दोष कुणाला द्यावा?
मी नावाडी, बोट बुडाली, करू कुणाचा धावा?
करता मी अन् मीच कराविता, नको शोधणे कारण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

अशा स्वयंभू जगण्यासाठी, नको शोक हंबरडे
मरणोत्तर का कधी मोडते आप्तांचे कंबरडे?
पिंडदान मी करीन माझे, अन् माझे मी तर्पण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

सामान्याचे जीवन जगता मौज आगळी असते
बिनध्येयाच्या भणंगासही हवे हवे ते मिळते
नराप्रमाणे जगलो, नव्हते बनायचे नारायण
वेळोवेळी ठोकरले पण फुलून आले जीवन

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users