खातेस कि खाऊ?

Submitted by kokatay on 21 March, 2018 - 13:53

खातेस कि खाऊ?:
असं आमच्या कॉलनीतल्या एक मावशी आपल्या मुलींना विचारायच्या. अर्थातच वाढलेलं जेवण संपवा हा हेतू असायचा, आणि जर का त्यांच्या मुलींनी संपवलं नाही, तर त्या हे जेवण संपवायच्या आणि .....पुढे काय होत असेल ते इथे सांगायची गरज नाही, त्या मावशी बऱ्या पैकी "खात्या-पित्या घरच्या" असत.
मी देखील " खायच्या आधी खायचं " "खाताना खायचं" आणि "खाल्यानंतर खायचं" अश्याच काही वातावरणातून आलेली आहे.
जवळचे मित्र-मैत्रिणी सोबत पण बौद्धिक-कला इत्यादी विषयांवर बोलुन झालं कि विषय कधी खाण्यावर वळतो हे कळतच नाही.
पण आता विडंबना अशी कि माझी मुलं अजिबात ह्या पंथाची नाही ! माझी मुलगी तर मला सांगते कि अधिकांश लोकं जितकं दिवस भरात खात असतात त्यातील अर्धाच भाग तुम्हाला तुमच्या शरीरासाठी आवश्यक असतो ....असं माझी पोटची मुलगी म्हणते म्हणजे मला कसं होत असेल ह्याची तुम्ही कल्पना तरी करू शकाल का ? एवढच काय तर ती कॉलेज च्या सुट्टीत घरी आली कि आम्हाला तर सोडाच पण आमच्या गोजिरवाणी मांजरीच्या खाण्यावर पण संचारबंदी लावते.
मला एका समारंभात अभिनेत्री राजेश्री ताई ह्या भेटल्या, सत्तरीच्या पुढे असुन सुद्धा इतका सुंदर बांधा, सुंदर त्वचा बघुन मी त्यांना चक्क विचारलं: ताई तुम्ही ह्याचा साठी काय करता? तर त्यांनी मला एक सुंदर उत्तर दिलं : अग मी सगळं खाते पण अर्धच खाते ......ह्या एका संक्षिप्त उत्तरात त्या बरच काही सांगून गेल्या होत्या.
आपण जेवायची वेळ झाली कि खातो, पार्टी असली कि खातो, सणवार असला कि मेजवानी, थ्री कोर्स पद्धतीच जेवण म्हणजे तर विचारायलाच नको!
कधी कधी मात्र मी विचार करते कि खरच कि काय आपण असं करत असतो ? मग लहानपणीची हि जेवायच्या आधी म्हणायची प्रार्थना आठवते "अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म"!
हा गुरुमंत्र तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिला आहे, आणि हि प्रार्थना म्हणत आपण मोठे झालेलो आहे, मग आपण कुठे चुकतो? अशी खंत हि वाटायला लागते, पण माझी मुलं आता हि प्रार्थना दररोज न म्हणता पण ह्यावर अमल करून दाखवत आहे ह्याचा मात्र अभिमान वाटतो.
-ऐश्वर्या कोकाटे, संपादिका
मराठी कल्चर एंड फेस्टिवल्स.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

माझी मुलगी तर मला सांगते कि अधिकांश लोकं जितकं दिवस भरात खात असतात त्यातील अर्धाच भाग तुम्हाला तुमच्या शरीरासाठी आवश्यक असतो
<<<
I completely agree with your daughter Happy

बऱ्याच महिन्यानी आज नाश्त्याला गोड शिरा केला. घरचे गायीचे रवाळ तूप जरा सढळ हस्ते वापरल्यामुळे मस्त मऊ, लुसलुशीत, फुललेला असा झाला. फोटो काढल्याशिवाय खायची पद्धत लेकीत नसल्यामुळे फोटोसाठी म्हणून लेकीला मुदी पाडून दिला व मी बशीत घेऊन मोबाईलवर मायबोली चाळत खायला लागले. तीन लहान मुदयांपैकी दीड खाऊन लेकीने आता बस म्हणून प्लेट पुढे रेटली. मी माझा शिरा संपवून तिच्या उरलेल्या दोन मुदया खाणार होतेच, पण दुर्दैवाने तोवर ह्या लेखापर्यंत पोचून तो वाचून संपत आलेला. Sad मग मन घट्ट करून तिचा उरलेला शिरा परत कढईत नेऊन टाकला व डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवायला बाईला सांगितले. Sad Sad

साधना ह्या लेखाने तुझ्या तोंडचा शिरा पळवला Proud
ऐश्वर्या तुमचे लेख छान असतात. अन तुमच ते ईंग्लीश नाव वाचलं कि ते गाणं आठवतं .. पैल तो गे काऊ कोकताहे Happy

डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवायला बाईला सांगितले.>>>>>मग तो उद्या गरम करुन खाणार ना तुम्हीच Light 1 Happy

बरं हे खातेस की खाउ ची गोष्ट वेगळीच ऐकलीये मी. जी मुलं नीट जेवत नाहीत. ताटात जेवण टाकतात. त्यांना आया- आज्या अशी भिती घालायच्या की कुणी एक जखीण किंवा हडळ अशा मुलांवर लक्ष ठेवते आणि त्यांनी जेवण टाकलं/ पुर्ण खाल्लं नाही की त्यांना ती खाते. त्यांना म्हणजे मुलांना. जेवण नाही खात ती. म्हणुन ते खातेस की खाउ.

एकट्या पुरता हा निर्णय घेणे शक्य आहे पण घरच्या स्त्रीला ते अवघड जात असेल असा अंदाज आहे. दुहेरी कात्रीच ही, म्हणजे जास्त जेवण बनवलं आणि घरच्यांनी नाही खाल्लं ते टाकून देण्याचे पाप, कमी बनवले तर नवरा मुलांना आपण अर्धपोटी तर ठेवत नाही ना ही मनाची घालमेल.

मस्त लिखाण आहे. खण्यापिण्यावर नियंत्रण असलंच पाहिजे पण मला वाटते ते वयानुसार असावं अगदी लहानपणापासून याचा बाऊ करण्याचा काही गरज नाही

आवडते पदार्थ खाण्याचा मोह आवरणे खरंच मोठं कठीण काम पण आता हा लेख वाचून हे कठीण काम करावं लागणार असल्याचं दिसतंय