आम्ही १२ - अनंत अवधूत

Submitted by धनश्री on 14 March, 2018 - 12:06

सिअ‍ॅटल आणि सिहॉक्स हे अतूट नाते आहे. "बाराच्या गावांत बाराच्या भावात!!" असं अभिमानाने ज्यांच्याविषयी म्हणलं जातं, त्या नात्याविषयी, त्यांच्या "१२" या सामान्यांतील असामान्याची ओळख करून देण्यासाठी हा लेख सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळाचे सचिव अनंत अवधूत यांनी लिहिला आहे. मंडळाचे कार्यकर्ते "१२" आहेतच पण मंडळाच्या कार्यक्रमांचे नियोजन करताना आधी "१२" चे वेळापत्रक पाहून दिवस ठरवावा लागतो. Biggrin

------------------------------------------------------------------------------------------------------------

आवाज कोणाचा?
१२ चा!! आवाज कोणाचा? गेल्या ३ पिढ्या महाराष्ट्रात विचारल्या जाणाऱ्या ह्या प्रश्नाचे उत्तर अमेरिकेत मात्र वेगळे मिळते. आवाज १२चा!!

‘१२’. तुमच्या आमच्या सारखाच सामान्य. रोज कुठल्यातरी ऑफिस मध्ये काम करणारा, नित्य नियमित आपला संसार करणारा, मंदिर, मस्जिद, चर्च, देवाची नियमित प्रार्थना करणारा, अलास्का पासून सिअॅटल् पर्यंत कुठेही कोणत्याही रूपात या १२ ची भेट होऊ शकते. १२ शाळेच्या मैदानावर असेल, १२ कॉर्पोरेट ऑफिस मध्ये एखादे प्रेजेंटेशन देत असेल, १२ कॉलेज कॅम्पस मध्ये असेल, एखाद्या पबमध्ये वारुणीचा आस्वाद घेत असेल, किंवा कराओके संगीत गात असेल, कदाचित प्रवासात तुमचा सहप्रवासी असेल.
१२ कुठेही आणि कोणत्याही रूपात असू शकतो. ह्या सगळ्या वेगवेगळ्या रूपात वावरणाऱ्या १२ च्या निष्ठेची एक समान जागा म्हणजे सेंच्युरी लिंक फील्ड, सिअॅटल्. १२ ला ओळखणे एकदम सोपे. सिअॅटल् सीहॉक्सची निळ्या, हिरव्या, आणि पांढऱ्या रंगाची जर्सी घालून कोणीही दिसला/ दिसली की समजायचे तुमची "१२" शी भेट झाली. १२ म्हणजे Seattle सीहॉक्स ह्या अमेरिकन फुटबॉल खेळणाऱ्या टीमचा समर्थक.

ह्या १२नी आपल्या सामूहिक आवाजाने सीहॉक्सच्या समर्थनार्थ मैदान दणाणून सोडले आहे. सर्वात जास्त डेसिबल मध्ये सामूहिक आवाज करण्याचे २ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् १२च्या नावे आहेत. १३७.५ हा आवाजाचा रेकॉर्ड १२नी केला आहे. १५० डेसिबल आवाजाला कानाचे पडदे फाटतात. हे लक्षात घेतले तर तो आवाज किती भयंकर असेल याचा अंदाज येईल. त्यांचा आवाज, दणदणाट पाहुण्या संघाला प्रसंगी घाबरवून सोडतो. तर त्यांच्या स्वतःच्या सीहॉक्स संघाला लढण्याचे बळ देतो. २००५ मध्ये न्यूयॉर्क जायंट्सच्या पाहुण्या संघाने ह्या आवाजामुळे भरपूर चुका केल्या. त्या गेमचा विजय तेव्हाच्या सीहॉक्सचा मुख्य प्रशिक्षक माईक हॉलंग्रेनने ह्या १२ ना अर्पण केला. त्या गेम मधला बॉल आजही १२व्या खेळाडूचा बॉल म्हणून सेंच्युरी फील्ड क्लब मध्ये पाहायला मिळतो.

१२ च का? तर अमेरिकन फुटबॉल मध्ये ११ खेळाडू मैदानात असतात. मैदानाबाहेरचा त्यांचा समर्थक हा १२ वा भिडू. त्या चाहत्यांसाठी १२ नंबर सीहॉक्सने राखून ठेवला. १२ नंबर जर्सी कोठल्याही खेळाडूला दिल्या जात नाही. तो मान फक्त चाहत्यांचा. १२ चा वेगळा ध्वज आहे. प्रत्येक खेळाआधी कोणीतरी १२ तो ध्वज सेंच्युरी लिंक फील्ड वर फडकावतो. कोठल्याही महत्वाच्या सामन्याच्या आधी कितीतरी कॉर्पोरेट ऑफिसेस वर १२चा ध्वज फडकतो. घरांवर १२ हा आकडा, घराभोवती लँडस्केपिंग करताना १२ च्या आकारात हिरवळ, सामन्याच्या दिवशी हिरव्या/निळ्या रंगाची नखे / केस, इतकेच काय पण सामना बघताना या रंगाचे अन्नपदार्थ असा तुफान वेडेपणा १२ च करू जाणे. असा मान दुसऱ्या कोणत्याही फुटबॉल संघाच्या चाहत्यांना मिळाला असेल असे मला वाटत नाही.
अशा ह्या १२च्या नगरीत तुम्हां सगळ्यांचे आम्हा मराठी जनांकडून जल्लोषात, उच्च स्वरांत स्वागत. कारण आम्ही पण १२च ना!!
भेटूया!!

लेखक :- अनंत अवधूत

Group content visibility: 
Public - accessible to all site users