वैद्यकीय क्षेत्रातील भोंदू

Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2018 - 21:55

वैद्यकीय क्षेत्रातील भोंदू
========

डॉ. सतीश चव्हाण व डॉ. अर्चना चव्हाण ह्या दांपत्याच्या भोंदूपणामुळे एका तरुण महिलेला जीव गमवावा लागल्याचे जे वृत्त आज आले आहे ते पाहून काही प्रश्न उभे राहतात.

मृत महिलेच्या छातीत गाठ असल्याने तिची शस्त्रक्रिया करण्यासाठी तिला वरील डॉक्टरांच्या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले. त्यांनी शस्त्रक्रियेची वेळ रात्री आठ आहे असे सांगितले. नंतर ती वेळ बदलून त्यांनी रात्री नऊ किंवा रात्री दहा अशी ठरवली. हा बदल करण्याचे कारण त्यांनी असे दिले की रात्री आठला यमाची घंटा होती व महिला दगावू शकली असती. ही शस्त्रक्रिया पंचांग पाहून करण्यात आली होती.

शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढून टाकली खरी परंतु तरीही रक्तस्त्राव होतच राहिल्यामुळे ह्या महिलेला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तिला अती दक्षता विभागात ठेवण्यात आले. त्या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होताना दिसत नसल्यामुळे डॉ. चव्हाण ह्यांनी चक्क एका मांत्रिकाला आय सी यू मध्ये आणले. हा मांत्रिक तिथे पोचू शकला ह्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रशासन कुठल्या पातळीला पोचलेले आहे हे समजते.

ह्या मांत्रिकाने केलेले मंत्रोच्चार वगैरे काही काम करू शकले नाहीत. महिलेचे ह्या प्रकारात निधन झाले.

ह्या भयंकर प्रकाराने आपल्या समाजात मिरवल्या जाणार्‍या भ्रामक पुरोगामित्वाचा बुरखा फाडलेला आहे. महिलेच्या भावाने केलेल्या तक्रारीमुळे अंनिसने ह्या प्रकरणात उडी घेतलेली आहे.

आजही अनेक शस्त्रक्रिया मुहुर्त पाहून होतात हे आधीच ऐकलेले होते.

१. डॉक्टरी पेशाचे शिक्षण देताना बुरसटलेले विचार बदलतील ह्याची दक्षता घेतली जाते का?

२. खासगी रुग्णालयांची विश्वासार्हता शाबूत राहील यासाठी असलेल्या यंत्रणांवर शासकीय वचक असतो का?

३. कोट्यावधी रुपये डोनेशन उकळून शिक्षण सम्राट ही पदवी मिरवणारे व एकगठ्ठा डॉक्टर्सचे उत्पादन करणारे ह्याला जबाबदार नाहीत का?

४. अशी आणखी काही भोंदूंची उदाहरणे कोणी पाहिली, अनुभवली आहेत का?

===========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चॅनेल वाल्यांसारखं एकदम निष्कर्ष काढू नका, खरा प्रकार वेगळा असू शकतो, काय आहे ते येईल बाहेर लवकर
तोवर थांबा जरा

ह्यात रुग्णालयाला दोष देणे उचित नाही. कारण हे विधी रुग्णालयाला विचारून केले असण्याची शक्यता नाही. आणि व्हिजिटर ला बंदी कशी घालणार? भेटण्याच्या बहाण्याने येऊन विधी करणे शक्य आहे.रुग्णालय प्रशासन विजिटरला भेटायचे कारण थोडेच विचारते... नर्सेस देखील कसे अडवणार ? कारण व्हिदिओ वरून वरवरच विधी केल्याचे दिसते रुग्नाला स्पर्श नाही....

दाभोळकरांनाही सांगू का जरा थांबायला?

तुम्ही म्हणालात की मग बोलतील ते!

मांत्रिक त्याचे प्रकार करतो कसा, तिथे डॉक्टर उभा दिसत आहे तो दिसतो कसा हे प्रश्नही नंतर चर्चेला घेऊ

आपल्यातले बरेच जण शिक्षणामुळे पुरोगामी असलो तरी आतून काही क्वर्क्स, काही श्रद्धा/अन्धश्रद्धा पाळत असतोच.
प्रत्येक हॉस्पिटल मध्ये नेहमी एक मोठे मंदिर असते.परदेशात चॅपेल्/चर्च असते.जेव्हा सगळे उपचार हरले तेव्हा माणसाला एक थर्ड पार्टी पॅसिव्ह लिसनर हवा असतो. हा लिसनर काहींच्या बाबतीत देव, काहींच्या बाबतीत सोशल मिडीया, काहींच्या बाबतीत मित्र.

मिडीया मधल्या बातम्या बरेचदा दिशाभूल असते. यात काही गोष्टी स्पष्ट नाहीत
१. डॉ चे खाजगी नर्सिंग होम होते, तिथे उपचार केले आणि रक्तस्राव झाल्याने मोठ्या हॉस्पिटल ला आणले. हे डॉ खाजगी क्लिनिक आणि दिनानाथ दोन्हीकडे काम करत होते का?
२. पेशंट चे नातेवाईक व्हिडिओ शूटिंग करत होते.पण त्यांनी डॉ ला स्पष्ट 'आमचा विश्वास नाही, मांत्रिक आणू नका' असं सांगितलं होतं का?
३. काहीतरी ट्रिटमेंट चा उपयोग होऊन पेशंट सुधारला असता तर मांत्रिकाचे प्रकण गालिच्याखाली झाडून सर्व गोड गोड होणार होते का?
४. मांत्रिकाऐवजी एखादा साधा पुरोहीत महामृत्यूंजय मंत्र पठनाला बोलावला असता तर पेशंट च्या नातेवाईकांनी नंतर तक्रार केली असती का? दोन्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत.
५. मांत्रिक बोलावून दृष्ट काढणे हा मूर्खपणा आहे मानणारे किती जण घरी लहान बाळाला काही दिवस बरे नसल्यास भांड्याखाली कागद जाळून किंवा मीठ मोहर्‍यांनी किंवा मालिशवाल्या बाईकडून दृष्ट काढून घेतात?

(पेशंट सुधारत नाही म्हणून मांत्रिक बोलावणार्‍या कोणालाही अनुमोदन नाही.पण इथे साध्या दुधाच्या गाठीच्या सर्जरीत एक्सेस ब्लिडिंग का झाले आणि यात डॉ चे कमी स्किल्/निगलिजन्स्/पेशंट च्या नातेवाईकांचा पैसे वाचवायला काही अनिष्ट कॉम्प्रो आहे का याची 'मांत्रिक बोलावणे' या मूर्खपणापेक्षा जास्त चौकशी व्हावी.)

मी अनु
सुंदर प्रतिसाद. बरेच मुद्दे कव्हर केलेत. बातमी मागील बातमी कळल्याशिवाय भाष्य करणे अवघड. बातम्यांना चटपटीत पणा आणण्यासाठी त्या एकांगी व भडक केल्या जातात.
अवांतर- हॊस्पिटलच्या आवारात मंदिर वगैरे असाव का?

जर आयटी कंपनीच्या रिसेप्शन मध्ये गणपतीचा किंवा सरस्वतीचा पुतळा असेल तर दिनानाथ मध्ये मंदिर किंवा रत्ना मेमोरियल मध्ये सोनोग्राफी डीपार्टमेंट समोर मोठी गणपती मूर्ती असण्यात गैर नाही.तो 'वर्कप्लेस डेकोरेशन' चॉइस आहे.
पण या मंदिरासाठी मेडिकल मधले निधी काही इतर प्रायोरीटी मागे टाकून (म्हणजे हॉस्पिटल ला इसीजी मशिन गरजेचे आहे पण सध्या ते पैसे मंदिराच्या मार्बल मध्ये घातले) देव अरेंजमेंट ला वळायला नको.

तपशीलासकट बातमी वाचली नाही...

अन्धश्रद्धा आपला क्र. १चा शत्रू आहे. सर्व ठिकाणी मी त्याला विरोध करेल. दाभोलकरान्सारखे तुरळक लोक समाजातील अन्धश्रद्धेविरुद्ध खर्‍या अर्थाने लढत आहेत अशा लोकान्ची हत्या होते.... हत्या झाल्यावरही ४.५ वर्षान्नी केस कूर्मगतीने सरकरत (पुढे अथवा मागे) आहे. खरे कारण सर्वान्ना माहित आहे पण त्यावर लक्ष केन्द्रित करण्यापेक्षा...

हे सर्व कशाचे लक्षण आहे ? जर आपण आपल्या समाजाचे कठोर आत्मपरिक्षण नाही केले तर या आणि अशा घटना वारम्वार होणारच... आपल्याला १०० दाभोलकरही कमी आहेत.

भारतात हा स्लिपरी स्लोप आहे Sad
आज 'उपचारांचा उपयोग होत नाही म्हणून मांत्रिक', उद्या 'मांत्रिक म्हणतो म्हणून देवाला अमावस्येला कोंबडं' परवा 'मांत्रिक म्हणाला म्हणून कुमारिका किंवा नरबळी' अश्या कोणत्याही लेव्हल ला गोष्टी खेड्यात जातात.
पुण्यासारख्या ठिकाणी हे होणे खूप आश्चर्याचे आहे.

(लुक हू इज टॉकिंग! माझे स्वतःचे सी-सेक्शन साबांनी फॅमिली फ्रेंड ज्योतिष्याला विचारुन तारीख आणि वेळ ठरवून झाले आहे.डॉ ना एकंदर 'मुहूर्त आणि बाळ जन्म' कल्चर ची कल्पना आणि सवय असल्याने 'सी सेक्शन लागणार आहे, तुमच्या डोक्यात काही विशीष्ठ तारीख वगैरे असल्यास आणि डॉ त्या दिवशी अव्हेलेबल असल्यास त्या प्रमाणे करु शकतो' असे म्हणाल्या होत्या.कागद जाळून दृष्ट वगैरे प्रकार मूल लहान असताना मालिशवाल्या बाईने केले आहेत.)

अनू...अगदी प्रॉपर प्रतिसाद. माझ्याही मनात नेमके हेच आलेले. बातम्या भडक करण्या साठी त्या एकांगी व अर्धवट दिल्या जातात. मांत्रिकाने फारतर अंगारा वगैरे लावला असेल, बाह्य उपचार केले असतील . त्यांनी ती दगावली असे नाही. मांत्रिक आणण्याच समर्थन नाही पण रुग्णालय प्रशासन याला कसे जबाबदार? व्हिझिटर कुणीहि असू शकतो. आणि अंगारे वगैरे तर नॉर्मलीच सगळे लावतात. हा भाऊ तेव्हा काय करत होता? बरी झाली तर ठीकच असा विचार करुन थांबला होता? चव्हाण डॉ नी मांत्रिक कुणाच्या परवानगीने आणला.....कदाचित तिच्या सासरच्या लोकांच्या....!! सो त्यांना आता काटशह म्हणून हे प्रकरण चव्हाट्यावर आणले?

जर रुग्णालयाचे उपचार बंद करुन फक्त मांत्रिक तांत्रिका च्या उपचारामुळे ती दगावली असे घडलेले दिसत नाही. उपचार तर चालूच आहेत सोबत जरा "दृष्ट"ही उतरुन टाकू असा प्रकार दिसतो. अशा परिस्थितीत रुग्णाला बर वाटाव या भूमिकेतून असे प्रकार केले जातात. त्यावेळी बुद्धी काम करत नाही. भावनेला प्रतिसाद दिला जातो. यात मि अनु म्हणते तस वैद्यकीय हलगर्जीपणा झाला आहे एवढे बघावे.
आता सी सेक बद्दल मुहूर्त जर सुरक्षिततेच्या टाईम झोन च्या बाहेर असेल तर डॉक्टर व नातेवाईकसुद्धा त्याच विशिष्ट मूह्रूर्ताचा आग्रह धरत नाहीत. कारण त्यात धोका असतो हे सर्वांना माहित असत.

आता सी सेक बद्दल मुहूर्त जर सुरक्षिततेच्या टाईम झोन च्या बाहेर असेल तर डॉक्टर व नातेवाईकसुद्धा त्याच विशिष्ट मूह्रूर्ताचा आग्रह धरत नाहीत. कारण त्यात धोका असतो हे सर्वांना माहित असत.>>>> एकदम बरोबर. कुठलाही डॉक्टर रुग्णाच्या जीवाशी खेळत नसतो. पण हा बाबाजी व त्याची डॉ. पत्नी यांच्या हातुन चूक झाल्यानेच हे वरील उद्योग केले गेले आहेत. आणी दुसरे म्हणजे स्वारगेटच्या जवळच ( सारसबागेसमोर ) डॉ. पाटणकरां चे एवढे मोठे हॉस्पिटल ( प्रसुती ) असतांना एवढ्या लांब दिनानाथ मध्ये हा बाबा ( डॉ. ) जातो, म्हणजे आधी तेथे ओळख होती त्याचा गैरफायदा घेतलेला दिसतोय.

पुण्याच्या तत्कालीन कमिश्नरांनी प्लँचेट करुन दाभोळकरांचा आत्माच तपासकार्यात मद्तीकरिता बोलावला होता त्या तुलनेत हे प्रकरण फारच सौम्य म्हणावे लागेल (म्हणजे अंधश्रद्धेच्या अनुषंगाने.. पण वैद्यकीय निष्काळजीपणाच्या मुद्द्याबाबत अर्थातच अतिशय गंभीर).

एका डॉक्टरच्या हलगर्जीपणाchaa निषेध व मृतात्म्याला श्रद्धांजली!

हा डॉक्टर दीनानाथशी कनेक्टेड होता असे कळते. त्यामुळेच तो रुग्णाला तेथे घेऊन गेला.

आता वरील काही प्रतिसादांबाबतः

१. दीनानाथमध्ये गणपतीचे मंदिर आहे. पण ते मंदिर तिथे आहे ह्याचा अर्थ स्वतः सर्जनने आय सी यू मध्ये मांत्रिक घुसवायला हरकत नाही असे नाही.

२. आय सी यू मध्ये रुग्णाबरोबर 'फार तर'एक पेशंट असू शकतो. इथे मांत्रिक, डॉक्टर व व्हिडिओ घेणारा असे किमान तिघे असावेत. हा प्रशासनाचाच गलथानपणा आहे.

३. मांत्रिक मांत्रिकासारखा दिसत नव्हता. म्हणजे गळ्यात माळा, कोणतातरी पायघोळ झगा, तांबारलेले डोळे, हातात कवटी वगैरे आवेशात तो तेथे आलेला नव्हता. त्यामुळे प्रशासनाला हा मांत्रिक आहे हे समजलेच नसणार हा युक्तिवाद ठीक आहे. पण तो डॉक्तर चव्हाण तिथे शुंभासारखा उभा राहून मांत्रिकाचे बिनडोक चाळे कसा काय बघत बसला? रुग्णाची अवस्था काय हे व्हिडिओत दिसत आहे. असा मरणासन्न अवस्थेतील रोगी असताना एक डॉक्टर मांत्रिकाचे चाळे खपवून घेतो ह्याचा अर्थ काय?

* मला यात फक्त हॉस्पिटल ची चूक दिसत नाही.
* मूळात पेशंट मरणासन्न होता हे डॉक्टर आणि नातेवाईकांना दोघांनाही माहित होते.
* डॉक्टर मांत्रिकाला घेऊन आला तेव्हा पेशंटचे नातेवाईक झोपले होते? म्हणजे आशा त्यांनाही होतीच ना की या ना त्या प्रकारे आपला पेशंट बरा व्हावा?
* ज्या अर्थी त्यांनी पण मांत्रिकाला सर्व काही करू दिले त्या अर्थी तो अघोरी काही करत नसावा/त्याने काही अघोरी केले नसावे. उत्सुकतेपोटी ते चित्रित केले गेले.
* पेशंटच्या मृत्यूनंतर कुणावर तरी खापर म्हणून डॉक्टर आणि मांत्रिकास वेठिस धरण्याचा प्रकार वाटतो.
* समजा पेशंट बरा झाला असता तर मांत्रिकाचा उल्लेख तरी बाहेर झाला असता का?

पेशंट आईसीयूत असताना जवळच्या नातलगांनाही नर्सला विचारल्याशिवाय आत जायला मिळत नाही, आत जाऊन तिथे थांबणे अशक्य. अशा वेळी हॉस्पिटलात काम न करणाऱ्या, एका बाहेरच्या डॉक्टरला व त्यासोबत अजून एका व्यक्तीला आईसीयूत कसे जाता आले? यात हॉस्पिटलची चूक नाही?

बाकी पेशंट दगावला म्हणून ही बोंबाबोंब हे खरेच आहे. वाचला असता तर कुणी काही बोलले नसते.

आणि हे प्रकरण जितके छापून आलेय तितकेच नाही हेही खरे आहेच. सगळेच छापून येत नाही.

<<डॉ चे कमी स्किल्/निगलिजन्स्/पेशंट च्या नातेवाईकांचा पैसे वाचवायला काही अनिष्ट कॉम्प्रो आहे का याची 'मांत्रिक बोलावणे' या मूर्खपणापेक्षा जास्त चौकशी व्हावी.>>
अनुमोदन.
<<<लुक हू इज टॉकिंग!>>>
तुम्ही प्रामाणिकपणे हे आधीच लिहून टाकले हे बरे. एव्हढा प्रामाणिकपणा नक्कीच वा़खाणण्यासारखा आहे. नाहीतर इथले लोक म्हणजे काय, मुद्दा सोडून कुणाची तरी बदनामी करायला टपले असतातच. त्यांनी लग्गेच लिहिले असते, मग स्वतःच्या बाबतीत का मुहुर्त बघितला?

मायबोलीवर मत मांडणे म्हणजे जाहीर पणे शिव्या खाण्याला आमंत्रण.

सोशल नेटवर्किय आंतरजालावरील शिव्या आणि प्रेम हे दोन्ही हॉवरक्रॉफ्ट आणि पाण्या सारखे असतात.मध्ये एक हवेचा लेयर कायम ठेवायचा असतो.दोन्ही बॉडी ला डायरेक्ट लागू द्यायचे नसतात Happy Happy

- द्रुपलसाईटमहर्षी नेटवर्कलेखनभक्तीपारायण संत अनवानंद.

मुळात हा सगळा प्रकारच बिनडोकपणाचा आहे. उगाच ह्याची चूक नाही, त्याची चूक नाही, मिडीया ने हवा दिली, छापून आलेलं सगळच खरं नसतं वगैरे प्रकार म्हणजे निव्वळ चर्चेसाठी चर्चा / वादासाठी वाद. एका हॉस्पिटल मधे, ऑपरेशन थिएटर / आयसीयू सारख्या ठिकाणी एक मांत्रिक जातो आणी तो काहीतरी 'उपचार' करू शकतो ह्या घटनेचाच धिक्कार आहे. आणी हे कुणाच्याही मर्जीनं असलं तरिही एका लायसेन्स्ड डॉक्टर च्या आणी हॉस्पिटल च्या पे-रोल वर असलेल्या स्टाफ समोर घडत असेल आणी त्याला अ‍ॅक्टीव्ह विरोध होत नसेल, तर प्रकरणाची कितीही सालं काढली तरी डॉक्टर आणी हॉस्पिटल प्रशासनाचीच ती जवाबदारी आहे. बाकी कुठे देऊळ आहे, सुप्रिम पॉवर ची मनाला गरज असते की नाही, वैय्यक्तिक आयुष्यात पत्रिक पाहिली होती की नाही वगैरे मुद्दे गौण आहेत.

दीनानाथ रुग्णालयात कार्यरत असलेल्या चव्हाण आडनावाच्या डॉक्टरांचे सर्वप्रथम अभिनंदन.

हा आहे खरा होलिस्टिक अ‍ॅप्रोच!!!

केवळ आमची अ‍ॅलोपथीच महान असा हट्ट न धरता, अत्यंत खुल्या मनाने, भाजपाच्या केंद्रिय सरकारच्या "आयुष" मिनिस्ट्रीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून डॉक्टरसाहेबांनी योग्य पावले उचलेली दिसत आहेत.

आयुष चा उद्देश भारतातील पारंपारिक उपचारपद्धतींना प्रोत्साहन व वापरात आणण्यास अधिकाधिक उत्तेजन, हा आहे. यात आयुर्वेद, योगा, युनानी, सिद्ध व होमिओपथी यांचा समावेश आहे. मंत्रतंत्र हे सिद्ध उपचारपद्धतीत येतात. योगाभ्यास करणार्‍यांना मंत्रजपाची महती ठाऊक आहेच. आयुर्वेदातही शल्यकर्मावेळी, आधी व नंतर करावयाच्या मंत्रजपांबद्दलच्या व आवाहन करावयाच्या देवतांबद्दलच्या नोंदी विपुलतेने आढळतात.

आयसीयूत महामृत्युंजय मंत्राचा जपही करायला हवा होता. भाजपाच्या केंद्रसरकारच्या या नव्या AYUSH धोरणानुसार आमच्याही रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक वेगवेगळ्या बाबा बुवा बापू यांच्या जपाची यंत्रं पेशंटच्या डोक्याशी लावून ठेवतात, त्याला आम्ही *आजकाल* आक्षेप घेत नाही. (उगा झंझट नको. जमेल तितकं होलिस्टिक असलेलं बरं)

तेव्हा इथे कुणी कितीही धागे काढून, व स्वत:च्याच प्रतिसादातून डॉ.बद्दलची पोटदुखी दाखवली, तरी हे जे काय झालं ते केंद्र सरकारच्या "प्रचंड वेगाने भूतकाळाकडे" या अत्यंत स्पृहणीय धोरणास व प्रगल्भ व्हिजनला धरूनच आहे, हे नोंदवू इच्छितो.

या सर्व प्रकारात डॉ. चव्हाणसाहेबांची चूक नसून ती यमाची घंटा वेळ पंचांग वाचणार्‍याने चुकीची वाचली असावी असे मला तरी वाटते. त्या चुकीमुळेच डॉ. साहेबांनी नेमके चुकीच्या वेळी ऑपरेशन केले असावे. पुढे घडला तो इतिहास!

ज्योतिषविज्ञानात थोडीशीही गणिती चूक किती भारी पडू शकते, त्याचेच हे मूर्तीमंत उदाहरण म्हणावे लागेल. असो. आपल्या उज्ज्वल परंपरांबद्दल कितीही लिहिले तरी कमीच आहे.

दीनानाथ हॉस्पिटल व नव्या आयुष उपचारपद्धतीस शुभेच्छा. पुण्यातूनच या प्रकरणाची सुरुवात व्हावी हा पुणेरी पगडीतला शिरपेचच म्हणावा लागेल. दीनानाथ रुग्णालयाबद्दल धागाकर्त्यांनी इथे पूर्वी लिहिलेले लेखन पाहू जाता, त्यांच्याकडूनच या उज्ज्वल प्रतिगामी वाटचालीची सुरुवात होईल ही अपेक्षा होतीच, ती पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

डॉ आरारा,
आपला अगतिक संतापातून जन्मलेला उपरोध पोहचला, आता एक एक्सपर्ट डॉक म्हणून नक्की काय चुकले असेल दुधाच्या गाठीच्या सर्जरीत यावरही मते द्या.

(24 वर्ष वय फक्त, काही गंभीर आजाराची हिस्टरी नसेलच Sad दुधाच्या गाठी काढण्या सारखी रुटीन वाटणारी सर्जरी इतकी का फसली असेल?)

दुसरे म्हणजे स्वारगेटच्या जवळच ( सारसबागेसमोर ) डॉ. पाटणकरां चे एवढे मोठे हॉस्पिटल ( प्रसुती ) असतांना एवढ्या लांब दिनानाथ मध्ये हा बाबा ( डॉ. ) जातो, म्हणजे आधी तेथे ओळख होती त्याचा गैरफायदा घेतलेला दिसतोय.
<<
अहो रश्मी ताई.

साधा सिंपल बिझिनेस सेन्स आहे.

पाटणकरांच्या समोर दुकान टाकलंय. माझा पेशंट आज तिथे नेला, तर पुढच्या वेळी तो माझ्याकडे न येता तिकडेच जाईल की! कशाला बिचार्‍याच्या पोटापाण्याबद्दल उणीदुणी काढताहात?

अन ओळख असल्यावर तिचा फायदा कोण घेत नाही बरे? यांनी दीनानाथचा फायदा घेतला. तुमची पाटणकरांशी ओळख दिसते. म्हणून तुम्ही तिकडे पेशंट आणला नाही म्हणून पोटदुखी दाखवत आहात, असा निष्कर्ष काढावा की काय अशी द्विधा मनःस्थिती झालिये बघा माझी!

***

रच्याकने. तुम्ही त्या एरियात राहता असे दिसते. या चव्हाण डॉक्टरांची नक्की डीग्री काय ते जरा शोधून सांगणार का इथे? म्हणजे ते कोणत्या पॅथीचे डॉक्टर आहेत ते जरा स्पष्ट होईल.

आर आर आबा, उपरोध पोचला....
पण विशिष्ट जातीचेच डॉकटर हुशार असतात व त्याम्च्याकडूनच मी उपचार करून घेतो ह्या विचारासाराणीत आणि ह्या भोंदू गीरीत काय फरक ?मग धाग्याचा उद्देश काय?? चव्हाण नाव आल्याने की काय ?

आर आर आबा, उपरोध पोचला....
पण विशिष्ट जातीचेच डॉकटर हुशार असतात व त्याम्च्याकडूनच मी उपचार करून घेतो ह्या विचारासाराणीत आणि ह्या भोंदू गीरीत काय फरक ?मग धाग्याचा उद्देश काय?? चव्हाण नाव आल्याने की काय ?

१. डॉक्टरी पेशाचे शिक्षण देताना बुरसटलेले विचार बदलतील ह्याची दक्षता घेतली जाते का?
बाकी हा प्रश्न लैच इनोदी . जातवार डॉक्टर्स ची विभागणी करणे हे विचार बुरशी पुसून मांडलेले असावेत Wink

नक्की काय चुकले असेल दुधाच्या गाठीच्या सर्जरीत यावरही मते द्या.
<<
हवेत गोळीबार कसा काय करता येईल?

तुम्हाला झालेली सर्दीदेखिल मी इंटरनेटवरून योग्य डायग्नोज करू शकत नाही.

साधा फुटाणा खाताना श्वासनलिकेत जाऊन जीव जाऊ शकतो.

हजार गोष्टी कारणीभूत असू शकतात. पेशंट दगावल्यानंतर नेमकं कशात काय चुकलं ते सांगायचं काम पॅथॉलॉजिस्ट, फोरॅन्सिक एक्स्पर्ट व सीपीसी ऑडिट -उर्फ क्लिनिको-पॅथॉलॉजिकल-कोरिलेशन साठी मोठ्या रुग्णालयांतून सर्व क्वालिफाईड स्टाफ एकत्र बसून(वा छोट्या रुग्णालयांत एकट्या-दुकट्याने) फसलेल्या केससचे जे एव्हॅल्युएशन करतो- त्यांचे आहे.

पेपरात / टीव्हीवरची अर्धवट बातमी वाचून मेडिकली साउंड उत्तर लिहिता येत नाही. हां, डॉक बॅशिंग धागे जरूर पाडता येतात Wink

ओके ओके Sad
मला बँक वेब साईट वर 500 एरर पाहिली की वेब सर्व्हिस कुठे चेक टाकायला चुकली असेल याचा अंदाज येतो तसा काहीसा विचार केला.

Pages